✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?

ग
ग्रेटगणेश यांनी
गुरुवार, 04/30/2015 - 12:14  ·  लेख
लेख
देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ? (सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.) आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं. ते मुल त्याचा अनुभव घेऊ शकतं, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहातो व त्यातूनच पुढे ते मुल 'असं का?' हा विचार करायला लागतं. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळतं. ‘A’ म्हणजे Apple हे ते मुल शिकते ते घोकंपट्टीने पण ते ‘अॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्या व्यतिरीक्त कुठेच आढळत नाही. या उलट आंबा ते झाडावर पाहू शकतं. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते. या पार्श्नभूमीवर नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदीवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृष्य आहे. मुल त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांच अजिबात लक्ष नाहीय कारण त्यांच्या दृष्टीने काहीतरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेलं वा अनुभवलेलं नाहीय. शेवटी कंटाळून ती मुल शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेंव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटर मध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी 'सर्वात चांगले विनोदी दृष्य' म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत. इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तीनत्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही. पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मागासलेली हा विचार मात्र कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्यागीक क्रांती झाली याचं श्रेय नि:संशय त्या भाषेचंच आहे. पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची 'मातृभाषा' इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शुन्याचा क्रांतिकारी शोध लागला, ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्यांच्या खूप पुर्वीपासून होती, आयुर्वेदासारखं शास्त्र आपल्या देशात फारच पुर्वी विकसीत झालेले होते. कालीदासाचे मेघदूत, रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही जगभर मान्यता पावलेली होती आणि ही सर्व त्याकाळी प्रचलीत असलेल्या संस्कृत या समृद्ध 'देशी' भाषेतच आहेत. भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्वाज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले सहीत्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पुर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही तर प्रतयेक भाषा ही परिपूर्ण असतेच तर मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान्साधानेसाठी मातृभाषा हि इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे तर एकमेव असते. आपल्या देशात प्रथम मोंगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाट्याने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदूकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लीश शिक्षणतज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागु केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढु नये, किंबहूना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा 'रोबो' नोकरवर्ग हवा होता तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेनुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणं सोप्पं झालं असं म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथ इंग्रजी शिक्षण देण्यास सुरूवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या दरा-यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जीतांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची संस्कृतीची पुनर्स्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागु केलेल्या 'रशीयन भाषेचा' जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हा समाजाला ताब्यात ठेवण्याचं वा एकसंघ ठेवण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्ष उलटून गेलियावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेत्साहन देऊन 'फाड फाड इंग्लीश' बोलणारा मात्र विचारशक्ती पुरेश्या प्रमाणात विकसीत न झालेला असा उच्चशिक्षीत नोकरवर्गच तयार करीत आहोत असं म्हणण्यास जागा आहे. इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा आहे हे खरंच ! परंतू संपर्काची भाषा असणे व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे एक परिचित केवळ १० वी पास. तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले. परंतू इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करायचे कारण एका इंग्लीश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्ष शिपाई म्हणून काम केलेलं..! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबई सारख्या शहरात अनेकजण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तम रित्या बोलु शकतात वा वाचु शकतात यात विशेष असे काहीच नाही कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात. परंतू अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरं आहे. जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते कि त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते. नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात या अर्थाचे विधान केले. खरतर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचं मुख्य मध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्यावेळी व्यवहारात देशी भाषांचे महत्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेंव्हाच इंग्रजी भाषेचं महत्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलने देखील करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच देशी भाषांचं महत्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फर्ड्या इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा ब-याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्या सारखा एकदा या वकिलाकडे तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते हा माझा अनुभव आहे. सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसाला देखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामन्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावं की रडावं या प्रश्नाच्याही पलिकडचा आहे व असतो. मी बॅंकेत नोकरी करत असताना रिझर्व बॅंकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्र यायची. पत्रं अगदी उच्चस्तरीय अस्खलित इंग्रजी भाषेत लिहीलेली असायची पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेलं एक वाक्य असायचं ' हम हिन्दी मे पत्र व्यवहार का स्वागत करते है'. म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशांत सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही 'नं. १' वर आहे. मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपड्यात मंत्रालायासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते..आता इतक्या वर्षानंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजून पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाट आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षीत असोत वा अशिक्षित आई बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मनात आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काहीतरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी convent मध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात या कडे कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे आई-बाप देखील माहागड्या फिया भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. अस का करता, हे बहुतेकांना विचारलं असता उत्तर एकच मिळतं, इंग्लीश छान बोलता येतं म्हणून. पुन्हा इंग्लीश छान बोलता येण्यानं काय होणार असं विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळतं. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्ष पाच ते पंधरा अशी महत्वाची १० वर्ष केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असं काहीतरी विचित्र चाललंय..!!मुल दिवसभर स्कूल मध्ये काढून घरी येतो तो मम्मी त्याला ‘स्नॅकस’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्क ला दुध म्हणताना तो ऐकतो व दुध म्हणतो त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दुध, से मिल्क..’. आता पोर गोंधळात, की मग ही का दुध म्हणते..मग ती सांगते कि दुधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरग आपल्याशी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरग ज्या समाजात वावरते तेथील शब्द संपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही. वर उल्लेख केलेला ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील प्रसंग या पार्श्वभूमीवर आठवून पहावा. भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्द संपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद मुल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात. मनुष्य जेवढ्या भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो पण या सर्वांचा पाया मात्र नि: संशय मातृभाषा असावी. थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी.. आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरुपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भासह जिवंत आहे असे समजण्यास काहीच अह्रकत नाही. आज आपण जी शुद्ध (?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश आहे हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर, शंकरपाळं ह्या शब्दांचं मुळ अरबी/फारसी आहे हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेड्यात काढू पण ते खर आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सीम-कार्ड, इंजिनीअर असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/भारतीय भाषेतील मेज, स्थानक, अभियंता असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. भाषा शुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतील देखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. अवतार, जंगल, बंगला, गुरु, लुट, महाराज, मंत्र, रोटी असे कितीतरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठ्या सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ७०० हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली किंवा बाटली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषा रुपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल परंतु त्याची सुरुवात वा त्यतील मोठेपणा आपल्या जनतेला कोणीतरी समजावून देणे गरजेचे आहे. - गणेश साळुंखे ९३२१८ ११०९१
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
66344 वाचन

💬 प्रतिसाद (240)

प्रतिक्रिया

शिर्षक बघुन प्रतिक्रिया देतोय.

होबासराव
गुरुवार, 04/30/2015 - 12:21 नवीन
ह्यावर पु.ल. नि आपल्या खुमासदार लेखणितुन फार छान लिहिले आहे, फार फार फार वर्षांपुर्वि. सोन्या बागलाणकर
  • Log in or register to post comments

खूप काथ्याकूट झालाय मिपावर या

वेल्लाभट
गुरुवार, 04/30/2015 - 12:33 नवीन
खूप काथ्याकूट झालाय मिपावर या विषयी. मातृभाषा'च' तरीही हे बघा.
  • Log in or register to post comments

दुवा गंडला आहे

कपिलमुनी
गुरुवार, 04/30/2015 - 16:55 नवीन
http://www.unesco.org/education/education_today/ed_today6.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

मराठी भाषाच....

कलंत्री
गुरुवार, 04/30/2015 - 14:30 नवीन
आपले शिक्षण आणि लोकसंचार मराठीतच असला पाहिजे, त्यासाठी काय करायला हवे यावर काय ते सांगा.
  • Log in or register to post comments

वा

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/30/2015 - 14:37 नवीन
चांगला मुद्दा रे गणेशा. गेले अनेक वर्षे ह्यावर चर्चा चालू आहे भारतात.
मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते.
मग तुमच्या त्या मोठ्ठ्या कंपन्यांचे मुख्य अधिकारी,सैन्यातील मोठे पदाधिकारी,भारतिय विदेश सेवेतले अधिकारी,मोठे आय.पी.एस.अधिकारी..ह्यांचे शि़क्षण अनेक वेळा इंग्रजीत झालेले दिसून येते.ह्यांची मानसिक वाढ तुलनेत कमी असते असे आहे का?
  • Log in or register to post comments

माई तुम्ही अथवा तुम्चे "हे"

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/30/2015 - 14:59 नवीन
माई तुम्ही अथवा तुम्चे "हे" पुण्यातले कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माई,तुमच्या ह्यांच शिक्षांण

जेपी
गुरुवार, 04/30/2015 - 15:09 नवीन
माई,तुमच्या ह्यांच शिक्षांण कंच्या मिडीयम मध्ये झाल..नाय मंजे मानसिक वय वाढल्यासारख वाटत नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईला साक्षात सरस्वती

सूड
गुरुवार, 04/30/2015 - 15:17 नवीन
माईला साक्षात सरस्वती लँग्वेजेस शिकवायची. गणितं शिकवायला गणपतीबाप्पांनी त्यांचे दोन शिष्यगण माईंसाठी दिले होते. भूगोल ब्रह्मदेव वेळ मिळेल तसा शिकवायचे. केमिस्ट्री महादेव आणि लव्ह केमिस्ट्री रतिमदन!! नाना-माईंची केमिस्ट्री बघून याची कल्पना आलीच असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आणि वेळोवेळी नवीन अवतार घेणे

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/30/2015 - 16:12 नवीन
आणि वेळोवेळी नवीन अवतार घेणे साक्षात भगवान विष्णू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))

अजया
गुरुवार, 04/30/2015 - 18:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/30/2015 - 18:49 नवीन
=)) आणि माईसुद्धा त्या सगळ्यांना मधून मधून, "अगो सरस्वती / अरे ब्रम्हदेवा / अरे महादेवा आमचे हे तर असे म्हणतात की... " अशी सुरुवात करून शिक्षकांनाच एकदोन ज्ञानकण पाजत असत असे त्यांच्या "ह्यांच्या" बोलण्यात आले असे अमुक अमुक आयडी तमुक तमुक आयडीला सांगताना ढमुक ढमुक आयडीने ऐकल्याचे कानावर आले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बघा नायतर, माई हा ब्रह्मदेव

बॅटमॅन
गुरुवार, 04/30/2015 - 18:53 नवीन
बघा नायतर, ब्रह्मदेव हा माईचाच डुआयडी असल्याचं निष्पन्न व्हायचं कुठंतरी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

.

hitesh
Fri, 05/01/2015 - 16:59 नवीन
माइ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे सगळे देव

सामान्यनागरिक
गुरुवार, 06/11/2015 - 12:40 नवीन
हे सगळे देव पण क्लासेस चालवायचे की काय ? म्हणजे क्लासेस प्रकरण यवढं जुनं आहे तर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कदाचित. इतक्या साधनसमृद्ध

arunjoshi123
Fri, 05/01/2015 - 18:48 नवीन
कदाचित. इतक्या साधनसमृद्ध देशाचे असे तीन तेरा वाजायचं कारण सुकाणू सांभाळणारे कमी मानसिक वाढ झालेले आहेत हे असू शकतं. ============================================================================== तुम्ही अशा उच्चपदस्थांच्या प्रत्यक्ष संपर्कात असाल तर हा विचार जास्त बळावतो असं निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

ते काय पण असु दे सूड राव पण

हाडक्या
गुरुवार, 04/30/2015 - 15:39 नवीन
ते काय पण असु दे सूड राव पण असे निरिक्षण आहे की माईं बहुतेकदा पाँईटाचे बोलत असते (चूक की बरोबर तो वेगळाअ मुद्दा), बहुतेकदा कोणाहीबद्दल व्यक्तिगत, जहाल अशी वक्तव्ये करत नाही (कोणी कितीही ती आणि तिच्या (असलाच तर) नानाबद्दल अश्लाघ्य बोलू दे). एका आयडीला (जरी डु आयडी असला तरी) जर तो आता तसा उपद्रवी नसेल तर जगण्याचा, वावरण्याचा हक्क नाही का ? की त्यांना कायम अशीच वंचना सहन करावी लागणार ?? (खासकरुन गिरिजा-प्रगोच्या प्रसंगामुळे हे डोक्यात आलंय. ) (सिरीअस स्माईली कल्पावी)
  • Log in or register to post comments

जरी डु आयडी असला तरी) जर तो

सूड
गुरुवार, 04/30/2015 - 16:02 नवीन
जरी डु आयडी असला तरी) जर तो आता तसा उपद्रवी नसेल तर जगण्याचा, वावरण्याचा हक्क नाही का ? की त्यांना कायम अशीच वंचना सहन करावी लागणार ??
ते ठीकाय, पण असला उपद्व्याप कशासाठी? फार पोक्त भाव आणून बोलणं, अनुभवाचे शब्द, उपदेशाचे डोस हे कशासाठी?
>>(खासकरुन गिरिजा-प्रगोच्या प्रसंगामुळे हे डोक्यात आलंय.)
गिरिजा प्रगो आणि माईसाहेब मध्ये गल्लत करताय. त्याने तो माझाच आयडी आहे हे सांगण्याचे गट्स दाखवले होते. त्यामुळे आमच्यासाठी तो प्रश्न तिथेच संपला. त्यातूनही नंतर ज्यांनी काही धुमाकुळ घातला असेल, त्यांचं त्यांच्यापाशी!! हा माईसाहेब ज्या कोणाचा आयडी आहे त्याने येऊन सांगू देत हा माझा आयडी आहे, त्यानंतर मी चिडवलं तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून

हाडक्या
गुरुवार, 04/30/2015 - 16:35 नवीन
अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून सापडले म्हणून त्यांनी सांगितलं रे, नै तर तसाही ते तो पर्सोना चांगलाच निभावून नेत होते तसे. तसेही प्रगोबद्दल काही प्रश्न नाहीच्च आहे. माझे म्हणणे ते पर्सोना घेऊन लिहिण्याबद्दल आहे.
फार पोक्त भाव आणून बोलणं, अनुभवाचे शब्द, उपदेशाचे डोस हे कशासाठी?
माई असा कोणी पर्सोना घेऊन जर काही लिहू पहात असेल तर जोवर ते आक्षेपार्ह अथवा उपद्रवी असे नसेल तोवर कोणाला इतकीही हरकत नसावी की त्या आयडीची इतकी टर उडवली जावी. म्हणजे असे की इथे सगळेच आयडी आहेत (व्यक्ती नव्हेत) आणि बरेचजण उपदेशाचे डोस पाजणे वगैरे करतातच की. तेव्हा माईला टार्गेट करुनही जर तो आयडी अद्वा-तद्वा बोलणे वगैरे देखील करत नसेल तर त्याला सारखेच टार्गेट करणे बरोबर नै वाटत. इतकंच.
हा माईसाहेब ज्या कोणाचा आयडी आहे त्याने येऊन सांगू देत हा माझा आयडी आहे, त्यानंतर मी चिडवलं तर सांगा.
अर्रे पण त्यादिवशीच तर बरेच जण हेच म्हणत होते ना, की इथे आयडी हे वेरिफाईड नाहीत तेव्हा "वेरिफाय केले तरच चिडवणर नाही" हे सगळ्यांनाच लागू होते ना ( तसाही मला सूड कोण आहे हे माहित नाही म्हणून मी त्यालाच माईचा नाना म्हणावे का ? ;) ) . म्हणजे असे की इथे व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कोण आहात हे मॅटर करुच नये. तुम्ही काय बोलताय एवढेच मॅटर करावे असे वाटते. मग आता आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्‍या आयडीस वेगळा हे काही मान्य नाही (ते क्रोनी कॅपिटॅलिझ्म झालं.). (कोण बोलतोय यापेक्षा काय बोलतोय यास महत्त्व देणारा..) (कसली पण एक गंभीर स्माईली कल्पावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आपण ओळखतो म्हणून एका आयडीस

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/30/2015 - 16:47 नवीन
आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्‍या आयडीस वेगळा
ऐसा और मिप्पापे...कब्बी नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

तू गप्राव.. वशाड मेलो..!

हाडक्या
गुरुवार, 04/30/2015 - 16:52 नवीन
तू गप्राव.. वशाड मेलो..! (शिरेस चर्चा चल्लीय नव्हं!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तेच म्हणतोय...मिपावर "कोणी"

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/30/2015 - 17:08 नवीन
तेच म्हणतोय...मिपावर "कोणी" लिहिले आहे हे बघून प्रतिसाद लिहिले जातात हे स्वच्छ दिसते..."काय" लिहिले आहे हे नंतर बघितले जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

चला...कोणीतरी हे मान्य केले..

स्वप्नांची राणी
गुरुवार, 04/30/2015 - 20:55 नवीन
चला...कोणीतरी हे मान्य केले..! ट्क्या, सगळं लिंगभेदविरहीत मिपा तुझ्याकडे मोठ्या अपेक्षेनी बघतय रे..!! हो बघू पुढे आणी बदलून टाक ही किडलेली व्यवस्था!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/30/2015 - 22:53 नवीन
खिक्क... आमाला पावर नाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

व्हर्चुअल लाइफ

कपिलमुनी
गुरुवार, 04/30/2015 - 16:59 नवीन
एखाद्याला हवे तसे व्हर्चुअल लाइफ (अवतार) घेउन आभासी जगात जगण्याचे स्वातंत्र्य आहे. कदाचित ही मानसिक गरज असू शकते. एखाद्याला हवे तसे प्रत्यक्षात जगता येत नसेल तर त्यासाठी ही सोय असेल. आणि जोवर हे अवतार उपद्रवी ठरत नाहीत तोवर त्यांना सुखनैव जगू द्यावे. उगा कावळ्याच्या गँगसारखे उठसूट टोच्चे मारू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून

सूड
गुरुवार, 04/30/2015 - 17:07 नवीन
अर्रे भौ.. गिरिजा काका चुकून सापडले म्हणून त्यांनी सांगितलं रे
पण मान्य केलं ना? राह्यला प्रश्न पर्सोना घेऊन लिहीण्याचा, माईसाहेब हा आयडी ज्या पद्धतीचे प्रतिसाद देत असतो तसे उपप्रतिसाद मिळतायेत.
तसाही मला सूड कोण आहे हे माहित नाही म्हणून मी त्यालाच माईचा नाना म्हणावे का
म्हणालात तरी मला काही विशेष फरक पडत नाही.
म्हणजे असे की इथे व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कोण आहात हे मॅटर करुच नये. तुम्ही काय बोलताय एवढेच मॅटर करावे असे वाटते.
नक्की? आता गिर्जाकाकाचा विषय काढलाच आहात म्हणून सांगतो, मागच्या आठवड्यात त्याने लिहीलेली कविता जुन्या लोकांना 'विनायक प्रभू' या आयडीने वाचायला द्या. दहातले चार प्रतिसाद 'मास्तर फारच क्रिप्टिक लिहितात बुवा' असे असतील. "काय बोलताय हे मॅटर करावं" हा आदर्शवाद झाला, वास्तविक कोण बोललंय हेही आपण बघत असतोच!!
मग आता आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्‍या आयडीस वेगळा हे काही मान्य नाही (ते क्रोनी कॅपिटॅलिझ्म झालं.).
हो, पण आहे हे असं आहे!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

सहमत..

संदीप डांगे
गुरुवार, 04/30/2015 - 17:36 नवीन
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सहमत

तुषार काळभोर
Sun, 05/03/2015 - 08:31 नवीन
विशेषतः याच्यशी:
मग आता आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्‍या आयडीस वेगळा हे काही मान्य नाही (ते क्रोनी कॅपिटॅलिझ्म झालं.).
आणि याच्याशी: (कोण बोलतोय यापेक्षा काय बोलतोय यास महत्त्व देणारा..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

+१

नाखु
Sun, 05/03/2015 - 09:38 नवीन
आम्ही या विषयावरेची आमचा प्रतिसाद पुनर्मुद्रीत करीत आहोत.

धागा गिरेजा इन वंडरलँड

गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे प्राची अश्विनी - Fri, 24/04/2015 - 10:44 गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे वाटते.:) उत्तर द्या चला नाद खुळा - Fri, 24/04/2015 - 16:17 दोस्तहो या विषयावर बोलू काही. "काय लिहिलय यापेक्षा कुणी लिहिलयं यालाच जास्त महत्व दिलं की असं होणारच"
ज्याच्याशी काही विषयांवर तीव्र मतभेद असूनही तोच जर काही योग्य आणि समतोल विचार मांडत असेल तर पाठिंबा+सहमती द्यायला अजिबात न कचरणारा.
चांगल्याला चांगले म्हणण्याची अति वैट्ट खोड असलेला. जुनाट ना़खु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

पूर्ण सहमत.

राही
Mon, 05/04/2015 - 12:44 नवीन
कोणी काय आय्डी घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोणी कोणता अभिनिवेश घ्यावा अथवा बुरखा पांघरावा हाही त्या आयडीचा वैयक्तिक प्रश्न. जोपर्यंत इतरांसाठी अश्लील, उद्धट, अपमानकारक भाषा त्या आय्डीकडून वापरली जात नाहीय, तोपर्यंत आक्षेप घेण्याचे काही कारण दिसत नाही. म्हणजे असे की इथे व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कोण आहात हे मॅटर करुच नये. तुम्ही काय बोलताय एवढेच मॅटर करावे असे वाटते. अगदी. अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

हे महत्वाचे

खंडेराव
Tue, 05/05/2015 - 17:51 नवीन
व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही कोण आहात हे मॅटर करुच नये. तुम्ही काय बोलताय एवढेच मॅटर करावे असे वाटते. मग आता आपण ओळखतो म्हणून एका आयडीस वेगळा नियम आणि ओळखत नाही दुसर्‍या आयडीस वेगळा हे काही मान्य नाही (ते क्रोनी कॅपिटॅलिझ्म झालं.).
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

अर्थातच मातृभाषा.

नूतन सावंत
गुरुवार, 04/30/2015 - 15:49 नवीन
अर्थातच मातृभाषा.
  • Log in or register to post comments

हाडक्यासाहेबांशी पूर्णच सहमत

बॅटमॅन
गुरुवार, 04/30/2015 - 17:13 नवीन
हाडक्यासाहेबांशी पूर्णच सहमत आहे. माई काय सांगते हे कुणी बघतच नाही. शिवाय ती सरसकट लागट कमेंटही करत नाही. असे असताना उगा कशाला धारेवर धरावं? किमान मी मला माझे वगैरे पाढा तरी वाचत नाही ना? आणि 'हा आयडी माझा आहे' वगैरे कबुली अपेक्षिण्याचा अधिकार इथे कुणालाही नाही. संबंधच काय?
  • Log in or register to post comments

शांत गदाधारी भीम शांत!! ;)

सूड
गुरुवार, 04/30/2015 - 17:28 नवीन
शांत गदाधारी भीम शांत!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अंहं

बॅटमॅन
गुरुवार, 04/30/2015 - 17:41 नवीन
शांत वेनधारी वाल्गुद, शांत! असं पायजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शिवाय ती सरसकट लागट कमेंटही

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/30/2015 - 17:32 नवीन
शिवाय ती सरसकट लागट कमेंटही करत नाही.
माईंचे वय लक्षात घेता असे करणे शोभणार पण नै...अश्या सुध्धा प्रतिक्रिया येतील मग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(ळोळणारी स्माईली कल्पावी)

हाडक्या
गुरुवार, 04/30/2015 - 17:37 नवीन
(ळोळणारी स्माईली कल्पावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

प्रतिक्रिया काय ओ, कशापण

बॅटमॅन
गुरुवार, 04/30/2015 - 17:40 नवीन
प्रतिक्रिया काय ओ, कशापण येतील. त्याचं काय इशेश? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ही चर्चा नक्की कशावर आहे?

क्लिंटन
गुरुवार, 04/30/2015 - 17:59 नवीन
ही चर्चा नक्की शिक्षण मातृभाषेत असावे की इंग्रजीत यावर आहे की माईसाहेबांवर (आणि तथाकथित प्रत्यक्ष/कल्पित ड्यू.आय.डी) वर आहे हा प्रश्न पडला आहे. कारण आतापर्यंतच्या २६ पैकी (हा धरून) २१ प्रतिसाद माईसाहेबांवर (आणि तथाकथित प्रत्यक्ष/कल्पित ड्यू.आय.डी) वर आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सद्या तरी "माईसाहेब प्रतिसाद

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/30/2015 - 18:19 नवीन
सद्या तरी "माईसाहेब प्रतिसाद कोणत्या भाषेत देतात ?" आणि "त्यांना प्रति-प्रतिसाद कोणत्या भाषेत द्यावा ?" यावरच चर्चा चाललेली दिसत आहे =)) "मातृभाषा आणि इंग्लिशची जुगलबंदी" हा विषय लै जुना झाल्याने त्याला एक वेगळी फोडणी देऊन चटकदार बनवायचा प्रयत्न चालू आहे, भौतेक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

माई मोड ऑन-अरे क्लिंटना,जरा

जेपी
गुरुवार, 04/30/2015 - 19:01 नवीन
माई मोड ऑन-अरे क्लिंटना,जरा या चर्चा वैगेरे बाजुला ठेव.आणी हिलरी सोबत ये जरा चहापाण्याला घरी.असे 'हे' म्हणतात.बाई बाई किती ती निखळ मयतरी म्हणायची ही.-माई मोड ऑफ. हघ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

:)

क्लिंटन
गुरुवार, 04/30/2015 - 19:19 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

काय ते बेअरींग ....माई म्हणजे

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/30/2015 - 19:53 नवीन
काय ते बेअरींग ....माई म्हणजे तूच तर नै ना???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

खिक्क... =))

जेपी
Fri, 05/01/2015 - 10:32 नवीन
खिक्क... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जेपीची मोडकला बघुन मलाही शंसय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/01/2015 - 17:25 नवीन
जेपीची मोडकला बघुन मलाही शंसय येतोय ;) माई मोड ऑन काय रे जेप्या, ह्या बाकीच्या ठगांच्या नादाला लागुन माझी खिल्ली उडवतोस होय रे. तुझ्यापे़क्षा किमान ३५० पावसाळे जास्तं पाहिलेल्या लोकांचा मान ठेवावा बाळा काय समज्लास? \ मोडॉफ (माईंचा पंखा) कॅजॅस्पॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सहमत. माई ह्या आयडीचे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/01/2015 - 17:27 नवीन
सहमत. माई ह्या आयडीचे प्रतिसाद वाचायला मज्जा येते. कोणावरही राळ उडवलेली नसते. एका म्हातारीचं बेअरिंग असं सांभाळणं म्हणजे चेष्टा नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हेच बोलतो. मलाही आवडतात

अनुप ढेरे
Fri, 05/01/2015 - 19:24 नवीन
हेच बोलतो. मलाही आवडतात त्यांचे प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत

खंडेराव
Tue, 05/05/2015 - 17:55 नवीन
प्रतिसाद मुद्दयाला धरुन असतात. म्हतारीच बेअरिंग मस्तच संभाळतात माई. अवांतर - बेअरिंग विषयी http://www.esakal.com/esakal/20140723/5735781973895244590.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

जी भाषा रोजगाराशी निगडीत असते

विवेकपटाईत
गुरुवार, 04/30/2015 - 19:48 नवीन
जी भाषा रोजगाराशी निगडीत असते, ती भाषा आपण शिकतो. मराठी बोलणार्यांची संख्या जवळपास ८ कोटी तरी निश्चित आहे. जर महाराष्ट्र सरकारने मराठीत मेडिकल, इंजीनीरिंग, इत्यादी शिक्षण सुरु तर लोक मराठीत शिकू लागतील. अन्यथा आंग्ल भाषा शिकण्याशी मजबुरी आहे. त्या साठी पैसा (गुंतवणूक- नौकरी साठी) मोजायला लोक तैयार असतात. त्या साठी कष्ट ही करायला तैयार असतात. असो.
  • Log in or register to post comments

खरे

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/30/2015 - 21:00 नवीन
जर महाराष्ट्र सरकारने मराठीत मेडिकल, इंजीनीरिंग, इत्यादी शिक्षण सुरु तर लोक मराठीत शिकू लागतील
ही कल्पना चांगली आहे रे विवेक पण आपल्या भाषा ईतर-इंग्रजी,जर्मन्,जपानी भाषांच्या तुलनेत मागे आहेत असे नाही वाटत का?खालीला शब्दांना मराठी शब्द सापड्तात का पहा. browser adapter gear clutch गेल्या दीडशे वर्षात ज्या काही उलाढाली झाल्या जगभर त्यात असंख्य शब्द तयार झाले.त्यांना पर्यायी मराठी शब्द शोधायचे कुणी? मराठीच्या नावाने राजकारण करणे सोपे पण असे काही काम करायचे तर सावरकर,डॉ. केतकरांसारखे लोक हवेत समाजात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

माई

होबासराव
गुरुवार, 04/30/2015 - 21:06 नवीन
सोवळ्यात ले पापड :- कर ईतर-इंग्रजी,जर्मन्,जपानी भाषेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा