स्वातंत्र्यदिनाची ही कविता लवकरात लवकर शिळी होवो...

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
15 Aug 2008 - 4:34 pm

मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली तेव्हा मी 'स्वातंत्र्य पन्नाशीचा अभंग' नावाची कविता लिहिली.
स्वातंत्र्यास वर्षे| जाहली पन्नास
केला सत्यानास| भामट्यांनी
अशी तिची सुरवात होती. स्वातंत्र्याची साठी पूर्ण झाली तेव्हा पहिल्या दोन ओळी बदलल्या. अन्य काही किरकोळ बदल केले. आशयाच्या दृष्टीने दहा वर्षात फारसा फरक पडला नव्हता. ती कविता खाली देत आहे.

आज स्वातंत्र्याला एकसष्ट वर्षे पूर्ण होत आहेत. परिस्थितीत काहीच फरक नाही. म्हणून पहिल्या दोन ओळी अशा बदलत आहे...
स्वातंत्र्यास वर्षे | झाली एकसष्ट
सरेनात कष्ट| सामान्यांचे
ही कविता फक्त वर्षाचा आकडा बदलून स्वातंत्र्याला अडुसष्ट वर्षे पूर्ण होईपर्यत चालू शकेल.
परमेश्वरा, परिस्थिती बदलो आणि ही कविता लवकरात लवकर शिळी होवो हीच प्रार्थना...

स्वातंत्र्य-साठीचा अभंग

स्वातंत्र्याची वर्षे। उलटली साठ
होईना रे पाठ। राष्ट्रगीत
पापाची पताका। फडकते नभी
पुण्यदेवी उभी। कोप‍र्यात
पुढा‍र्‍यांच्या खाती। लाख आणि कोटी
रिकामी नरोटी। पामराची
सत्य, निष्ठा शब्द। झाले वांझ वाया
तोंड लपवाया। जागा नाही
किती बॉम्बस्फोट। किती या दंगली
देशाची भंगली। एकात्मता
ओर्बाडून खाती। स्वातंत्र्याच्या झाडा
उन्नतीचा गाडा। चिखलात
सत्तेला झोंबते। आधाशांची टोळी
महात्म्याच्या डोळी। पाणी दाटे
हजारे, आमटे। मेधा नि कलाम
घ्यावा जी सलाम। सज्जनांचा
तुम्हासारख्यांनी। सांभाळली आज
स्वातंत्र्याची लाज। थोडकीशी

-अविनाश ओगले

कवितासद्भावना

प्रतिक्रिया

मैत्र's picture

15 Aug 2008 - 4:48 pm | मैत्र

सलाम कवितेला आणि स्वातंत्र्य मिळवून ते टिकवून ठेवणार्‍यांना...
हजारे आमटे मेधा आणि कलाम... या सगळ्या अनागोंदी आणि चिड आणणार्‍या परिस्थितीत असे लोक आपलं काम नेटाने करत आहेत. हा विचार न करता की यातून काही घडेल किंवा नाही... सर्व भ्रष्टाचार गुंडगिरी फुटीर वृत्ती ला नजरेआड करून आपलं काम करत राहतात.. या कवितेत सगळ्या निराश करणार्‍या गोष्टींबरोबर हे उत्तमही तुम्ही दाखवलं आहे... धन्यवाद...
जय हिंद...

केशवसुमार's picture

15 Aug 2008 - 4:54 pm | केशवसुमार

ओगलेशेठ,
साद्य परिस्थिती दर्शवणारे जळजळीत अभंग..
(निरुत्तर)केशवसुमार

प्राजु's picture

15 Aug 2008 - 6:53 pm | प्राजु

अतिशय प्रखर अभंग..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्वसाक्षी's picture

15 Aug 2008 - 7:52 pm | सर्वसाक्षी

आवडली. अगदी मनापासून लिहिलेली वाटते.

अजिंक्य's picture

16 Aug 2008 - 5:36 pm | अजिंक्य

कवितेत आशय एवढा ठासून भरलेला आहे, की ओळीओळीतून अक्षरश: ठिणग्या पडतायत.
तुमच्यासारखीच आशा मीही करतो - ही कविता लवकरात लवकर शिळी होवो.

(एक शंका होती - नरोटी म्हणजे काय? झोळी का?)
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

अविनाश ओगले's picture

16 Aug 2008 - 9:50 pm | अविनाश ओगले

नरोटी म्हणजे नारळाची करवंटी... खोबरे काढून घेतल्यावर राहते ते नारळाचे कवच... स्वातंत्र्याचे खोबरे नेते मंडळींनी खाल्ल्यावर सामान्यांच्या हातात जे उरते ते..

चतुरंग's picture

16 Aug 2008 - 8:05 pm | चतुरंग

दिवसेंदिवस हे विदारक सत्य पेलणे अवघड होत आहे! :S :(

चतुरंग

बबलु's picture

17 Aug 2008 - 12:04 pm | बबलु

हो तुम्हा कवी लोकांना ? आपल्याला तर बुवा नाही जमत.

असो... जब्राट कविता !! धगधगती मशाल आहे.

सत्तेला झोंबते। आधाशांची टोळी
महात्म्याच्या डोळी। पाणी दाटे

हे खासच.

(मिपा वरील कविता वाचून अचंबीत होणारा )....बबलु-अमेरिकन

विसोबा खेचर's picture

17 Aug 2008 - 7:27 pm | विसोबा खेचर

लै भारी अन् प्रखर काव्य!

तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

17 Aug 2008 - 7:58 pm | सखाराम_गटणे™

जबरा कविता आहे, नुसत्या ठिणग्या पडत आहेत शब्दामधुन.
आम्ही आता असा मनाला त्रास करुन घ्यायचे सोडुन दिले आहे. काही फायदा होत नाही.

सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.

हर्षद आनंदी's picture

18 Aug 2008 - 7:17 am | हर्षद आनंदी

मनापासुन केलेले लिखाण!!

स्वगत : अमंळ लिखाणे बहुत जाहली, क्रीयेची आस उरी दाटली

आम्ही आता असा मनाला त्रास करुन घ्यायचे सोडुन दिले आहे. काही फायदा होत नाही.

ही मानसिकता बदलणे ही काळाची नितांत गरज.
शिवाजी स्वतःच्या घरी जन्माला घालणे गरजेचे

अनिल हटेला's picture

18 Aug 2008 - 7:27 am | अनिल हटेला

एकदम जळ्जळीत कविता....

अगदी मनापासुन लिहीलेली...

आणी मनापासुन आवडली....

हजारे, आमटे। मेधा नि कलाम
घ्यावा जी सलाम। सज्जनांचा

आमचाही सलाम घ्यावा....

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मदनबाण's picture

18 Aug 2008 - 7:40 am | मदनबाण

फारच सुंदर...
पुढा‍र्‍यांच्या खाती। लाख आणि कोटी
रिकामी नरोटी। पामराची

अगदी खरं आहे..
भारतातील राजकारणी पैसे खाऊन खाऊन माजलेत साले ..
आणि सामान्य जनतेच्या हाती मात्र करवंटीच येते !!

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda