गुटेनबर्ग

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
7 Mar 2015 - 5:31 pm

.

पुस्तकं वाचायला सर्वांनाच आवडतात पण आपल्याला ही पुस्तके कोणामुळे वाचता येणे शक्य झाले आहे हे मात्र बर्याच जणांना माहित नसते. त्याच कलंदर अवलियाची ही ओळख!
१५व्या शतकाचा सुरुवातीचा काळ! र्‍हाइन आणि माइन नद्यांच्या संगमावर वसलेलं छोटंसं टुमदार गाव, 'माइन्झ'! फ्रिडरिश ( फ्रिलं) ग्लेन्सफ्लाइश आणि एल्स वायरीश हे सोनारकाम करणारे दांपत्य तिथं सुखानं नांदत होते. त्यांना तीन मुले फ्रिलं (ज्यु), एल्स (ज्यु) आणि सगळ्यात धाकटा योहानेस (योहान)! त्या काळी सार्‍यांनाच लिहावाचायला शिकणे परवडत नसे, पण माइन्झच्या बिशपचे सोनार असल्याने ग्लेन्सफ्लाइश मंडळी गावातल्या सधन प्रतिष्ठितांपैकीच होती. नुसतेच सोनारकाम नव्हे तर वेगवेगळ्या आकारातील नाणी तयार करण्यामध्ये ग्लेन्सफ्लाइश मंडळींची उस्तादी होती आणि त्यांना तो अधिकारही होता, इतकेच नव्हे तर खोट्या नाण्यांच्या वरच्या फोर्जरी केसेस करिताच्या अझिझ कोर्टामध्ये त्यांना मानाची जागा होती. त्या काळी माइन्झ मध्ये आपापली सरंजामी बिरुदे मोठ्या अभिमानाने मिरवण्याची पध्दत होती. ग्लेन्स्फ्लाइश मंडळी त्यामुळेच गुटेनबर्ग अशी ओळखली जाऊ लागली. १४२७ च्या सुमाराला त्यांनी हे नाव कागदोपत्री स्वीकारले. म्हणजेच योहानेस गुटेनबर्गचे पूर्ण नाव खरे तर योहानेस ग्लेन्सफ्लाइश झुअर लाडन झुम गुटेनबर्ग असे लावले गेले.

जरा कळत्या वयाची झाल्यावर फ्रिलं, एल्स आणि योहानेस ही तिन्ही मुले लिहावाचायला शिकू लागली. इतकेच नव्हे तर त्यांच्यासाठी अनेक पुस्तके आणवली गेली. छोट्या योहानेसला तर हा खजिनाच मिळाल्यासारखे होते. कारण त्या काळी फक्त हस्तलिखित पुस्तके उपलब्ध असत. हाताने पुस्तक लिहायला खूप वेळ लागत तर असेच पण मग फक्त मर्यादितच प्रती बाजारात येत आणि त्याही खूप महाग ! त्यात ही पुस्तके हाताळतानाही खूप काळजीपूर्वक वापरावी लागत. रोजची भाकरी मिळवायची भ्रांत असलेल्यांना पुस्तकेच काय लिहिणे, वाचणे ही सुध्दा चैनच होती म्हणायची..

जरा कळत्या वयात आल्यावर योहानेसला जाणवू लागले की आपल्याकडे असलेली ही पुस्तके खूपच किमती आहेत, सामान्यांच्या तर ती आवाक्याच्या बाहेरचीच आहेत. कोमल मनाच्या योहानेसला हे फारच खटकू लागले. सार्‍यांनाच परवडणारी पुस्तके कशी बरं तयार करता येतील? ह्यावर त्याचा विचार चालू झाला. एकीकडे आपल्या पिढीजात सोनारकामाचे प्रशिक्षणही चालू होतेच. साधारण १४११ च्या सुमारास माइन्झमध्ये अ‍ॅरिस्टोक्रॅटांविरुध्द मोठी आंदोलने झाली आणि परिणाम म्हणजे शेकड्याहून अधिक कुटुंबे माइन्झ सोडून इतरत्र स्थलांतरित झाली. एल्सच्या माहेरची काही इस्टेट र्‍हाइनकाठच्या अल्टाव्हिला येथे होती. गुटेनबुर्ग मंडळी मग तेथे गेली. एरफुर्टच्या युनिवर्सिटीमध्ये योहानेसचे शिक्षण झाले.

सध्या फ्रान्समध्ये असलेल्या स्ट्रासबुर्गमध्ये सुध्दा एल्सच्या माहेरचे नातेवाईक होते. स्ट्रासबुर्ग मध्ये आपली नावनोंदणी करुन सोनारकामाची सुरुवात योहानेसने तेथे केली, पण डोक्यात मात्र सतत छपाईचेच विचार ! एका पडक्या गढीतल्या खोलीत जुजबी दुरुस्त्या करुन तेथे त्याने आपले काम सुरू केले. सोनारकाम आणि आपला छपाईचा ध्यास यात तो इतका बुडून गेला होता की पहा़टे जे तो घर सोडे ते रात्री उशीरा परतत असे. इतर कोणात विशेष मिसळत नसे, सतत त्याच विचारात मग्न असे. साहजिकच शेजार्‍यापाजार्‍यांना दिवसचे दिवस त्याचे दर्शन नसे. लोकांना कुतुहल होते हा एवढा वेळ घराबाहेर करतो तरी काय? हळूहळू तर्ककुतर्क सुरू झाले, त्या पडक्या वाड्यात तो बहुदा चेटूक, करणी, जादूटोणा असलं काहीतरी करत असणार.. पण ह्या असल्या अफवांकडे लक्ष द्यायला सुध्दा गुटेनबर्गकडे वेळ नव्हता. तो आपले काम चिकाटीने करत राहिला.

हळूहळू तुरळक प्रमाणात का होईना बाजारात छापील पुस्तके दिसू लागली. ब्लॉक प्रिंटिंगच्या तंत्राने ही छपाई केली जात असे. सर्वात आधी जे पुस्तक छापायचे आहे त्या पुस्तकाच्या पानाच्या आकाराचा एक कठीण लाकडाचा ब्लॉक बनवला जाई. मग त्या पानावरचा शब्द न शब्द ब्लॉकच्या गुळगुळीत पॄष्ठभागावर अत्यंत काळजीपूर्वक कोरला जाई. त्यानंतर प्रत्येक अक्षराच्या आजूबाजूचे लाकूड बाजूला केले जाई. असे केल्याने ती अक्षरे वर उचलली जात. आता हा ब्लॉक शाईत बुडवून त्याचा दाब कागदावर दिला की एक पान छापले जाई. एकेका पानासाठी ५ ते ६ तास लागत असत, तरीसुध्दा हाताने पुस्तक लिहिण्यापेक्षा हे कितीतरी जलद होते. पण प्रत्येक पानाचा ब्लॉक बनवणे हे मात्र किचकट आणि वेळखाऊ काम होते. हे सगळे माहिती झाल्यावर योहानेसला पुस्तके छापणे याहून सोपे कसे करता येईल ह्याचा विचार करण्याचा जणू छंदच लागला. अनेक प्रयोग तो करत होता पण यश काही येत नव्हते.
जवळची पुंजी ही आता संपत आली होती.

अत्यंत निराश होऊन शेवटी तो माइन्झला परत आला. पण अशा निष्कांचन अवस्थेतही त्याचा ध्यास मात्र कायम होता. अशातच त्याला फाउस्ट भेटला. सोपी आणि स्वस्त छपाई करण्याचे आपले स्ट्रासबुर्गमधले फसलेले प्रयत्न त्याने फाउस्टला सांगितले. तो फारच प्रभावित झाला आणि पैशाची तजवीज करायची तयारी त्याने दर्शवली. योहानेसला परत उभारी आली. परत नव्या जोमाने, नव्या उत्साहाने त्याने आता अथक प्रयत्न सुरु केले. एकीकडे जुन्याच पध्दतीने लॅटिन व्याकरण पुस्तकांची छपाई करण्याचे घाटत होते. एक छापखाना अशा पुस्तकांसाठी आणि एक बायबलसाठी करायचा असेही ठरत आले, पण म्हणावे तसे यश मात्र हातात येत नव्हते. सुलभ छपाई आणि स्वस्त पुस्तकांचे स्वप्न काही खरे होत नव्हते. आता फाउस्टला तो आपला पैसा वाया घालवतो आहे, त्याचा गैरवापर करतो आहे असे वाटू लागले आणि त्याने आर्चबिशपकोर्टात गुटेनबर्ग विरुध्द दावा ठोकला. निकाल फाउस्टच्या बाजूने लागला आणि छपाईची सगळी सामग्री जप्त झाली. गुटेनबर्ग दिवाळखोर झाला.त्याच्याकडे उरली ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती, ध्यास आणि जीवाला जीव देणारे काही सवंगडी! त्यातल्याच एकाने छापखान्यासाठीचे भांडवल पुरवले आणि एक लहानशी जागा भाड्याने घेतली. परत एकदा हा फिनिक्स राखेतून उठला आणि परत एकदा प्रयोगांचे सत्र अथक, अविरत चालू झाले.

'ब्लॉकप्रिंटींग ' हाच गाभा ठेऊन काही नवे करता येईल का? याचा विचार तो करु लागला. आतापर्यंत एकेका पानाचे ब्लॉक तयार करुन छपाई होत असे. ह्याला वाटले, आपण एकेका अक्षराचाच ब्लॉक का करु नये? मग त्याने लाकडाचे एकेका अक्षराचे टाइप तयार केले. हे तर झकासच काम झाले! कारण आता ही अक्षरे कोणत्याही शब्दाकरता वापरता येण्यासारखी होती. पूर्वीसारखा एका पानाकरता एक ब्लॉक आता लागणार नव्हता. A to Z ही अक्षरे सगळे पुस्तक छापायला पुरेशी आहेत हे एकदा लक्षात आल्यावर तर क्रांतीच घडली! लाकडाचे ब्लॉक्स कालांतराने छपाई साठी कुचकामी ठरतात आणि परत नवे ब्लॉक बनवावे लागतात हे लक्षात आल्यावर गुटेनबर्ग लाकडाहून कठीण असे काय वापरता येईल? ह्यावर विचार करु लागला. जन्मजात सोनार असल्याने धातूंच्या गुणांची त्याला उत्तम कल्पना होतीच , म्हणून मग त्याने लाकडी टाइप ऐवजी मेटल टाइप वापरायचे ठरवले. शिसे, टिन आणि अँटिमनीच्या संयोगातून मिश्रधातू तयार करुन त्याने अक्षरांचे टाइप्स बनवले आणि क्रांतीचा नवा अध्यायच लिहिला नव्हे ,नव्हे छापला गेला. त्याच्या ह्या मिश्रधातूने बनवलेल्या टाइप बॉक्स मध्ये सर्व मुळाक्षरे, विरामचिन्हे सगळे धरुन २९० कॅरेक्टर्स होती. त्या काळी पाण्यातली शाई वापरुन लिहिलेली किवा छापलेली पुस्तके असत आणि ती लवकर खराब होत असत. त्यावर उपाय म्हणून तेलातली शाई वापरुन गुटेनबर्गने टिकाऊपणा आणखी वाढवला.

.

'42 Line Bible' हे लॅटिन भाषेतले पहिले पुस्तक इस १४५२ मध्ये जन्माला आले. दोन खंडातल्या ३०० पानी पुस्तकाच्या प्रत्येक पानावर ४२ ओळी होत्या. सुस्पष्ट आणि रेखीव! कागद आणि वेलम् (एक प्रकारचे चामडे) अशा दोन्ही प्रकारात ह्या बायबलच्या साधारण १८० प्रती छापल्या. आजही त्यातील सुमारे ५० प्रती उपलब्ध आहेत. हे करतानाच थोड्या प्रतींमध्ये पानांवरील काही शीर्षके रंगीत छापण्याचा प्रयोगही त्याने केला. पुढे इस. १४५३ मध्ये फाउस्ट आणि शॉफरने छापलेल्या ‘माइन्झ पीसाल्टर’मध्ये लाल आणि निळ्या रंगात शीर्षके छापली गेली. ही बातमी सार्‍या युरोपभर पसरली आणि लवकरच युरोपातल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये छापखाने सुरु झाले. सत्तरीला आलेल्या गुटेनबर्गची महती नासावच्या अर्चबिशपना समजली आणि ' होफमान ' म्हणजे ' जंटलमन ऑफ द कोर्ट ' असा त्याचा सन्मान केला गेला. ३ फेब्रुवारी १४६८ रोजी हा कलंदर प्रतिभावंत कलाकार माइन्झ येथेच अनंतात विलिन झाला आणि माइन्झ येथील फ्रांसिस्कन चर्च येथे त्याला चिरविश्रांती देण्यात आली. 'गुटेनबर्ग उनिवर्सिटेट- माइन्झ', असा माइन्झ युनिवर्सिटीच्या नावात मात्र तो चिरकाल जाऊन बसला.

.

अनेक शतकांनी त्याच्या ५०० व्या, ६०० व्या जयंतीचे निमित्ताने जर्मनी, इंग्लड, अमेरिका, कंबोडिया,हंगेरी अशा अनेक देशांनी त्याच्या नावचे फर्स्ट डे कव्हर ,पोस्ट तिकिटे काढून त्याला मानवंदना दिली तर काही देशांनी आपल्या करन्सीमध्ये स्थान देऊन गौरवले. 'मॅन ऑफ द मिलेनियम' किताबाने गुटेनबर्ग पूर्ण जगतात अमर झाला आहे.

. .

.

(सर्व फोटो जालावरून साभार.)

तंत्रविज्ञानलेख

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

7 Mar 2015 - 5:54 pm | पिशी अबोली

मस्त माहिती!

जयराज's picture

7 Mar 2015 - 5:57 pm | जयराज

छान माहिती .

अजो's picture

7 Mar 2015 - 6:30 pm | अजो

छान ंमाहीती

माहितीपूर्ण तरीही रंजक लेख.आवडला.

भावना कल्लोळ's picture

7 Mar 2015 - 7:07 pm | भावना कल्लोळ

+१

एस's picture

7 Mar 2015 - 8:23 pm | एस

+२

एक एकटा एकटाच's picture

7 Mar 2015 - 9:12 pm | एक एकटा एकटाच

१+

खंडेराव's picture

7 Mar 2015 - 7:54 pm | खंडेराव

Aaj Project Gutenberg var hazaro pustake free download saathi uplabdh aahet.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Mar 2015 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती !

सानिकास्वप्निल's picture

7 Mar 2015 - 8:27 pm | सानिकास्वप्निल

खूप छान, माहितीपूर्ण लेख. प्रोजेक्ट गुटेनबर्गवरून अनेक पुस्तकं डाऊनलोड करून वाचली आहेत.

एक एकटा एकटाच's picture

7 Mar 2015 - 9:13 pm | एक एकटा एकटाच

लेख मस्त आहे

आवडेश

खेडूत's picture

7 Mar 2015 - 10:21 pm | खेडूत

माहितीपूर्ण लेख - आवडला.
या निमित्ताने Augsburg ला प्राचीन मुद्रणयंत्राचं संग्रहालय आहे ते आठवलं.

पॉइंट ब्लँक's picture

7 Mar 2015 - 11:09 pm | पॉइंट ब्लँक

छान माहिती आहे. एखाद्या वर्तमान्पत्रात लहान मुलांच्या कॉलममध्ये टाकता येइल का? जास्ती लोकांपर्यंन्त पोहचेल.

एक एकटा एकटाच's picture

7 Mar 2015 - 11:40 pm | एक एकटा एकटाच

लेखिकेने खरच विचार करायला हवा
ह्या सुचनेचा

विशाखा पाटील's picture

7 Mar 2015 - 11:35 pm | विशाखा पाटील

उत्तम माहिती!

जुइ's picture

7 Mar 2015 - 11:52 pm | जुइ

अतिशय माहितीपूर्ण!!

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 9:19 am | श्रीरंग_जोशी

छपाई तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारी संशोधकाची ओळख आवडली.