ती मात्र ............

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
4 Mar 2015 - 1:31 pm

हल्ली ती कुणाशी बोलत नाही
गप्प असते घुम्यासारखी
बघत रहाते तिचं कोरडं आभाळ
मग बरसत जाते सरीसारखी

सोडवताना प्रश्नांच्या नाजुक गाठी
ती मात्र अडकत जाते...............गुंत्यासारखी

त्याच्या नजरेतली तिची ओळख
आता तिला गवसत नाही
काय्,कसे,कुठे बिनसले
छेडता मनाला उमगत नाही

चुकुन रेंगाळलेल्या त्याच्या प्रतिबिंबामागे
ती मात्र धावत रहाते.................वेड्यासारखी

त्याने नाकारलेली प्रत्येक आठवण
तिचा पदर काही सोडत नाही
त्याला घातलेली हरएक साद
फिरुनी माघारी कधी येत नाही

एकाकीपणाच्या या खोल दरीत
ती मात्र साचुन रहाते.................धुक्यासारखी

तिच्या स्वप्नांतली त्याची रात्र
आता तिच्यासवे जागत नाही
विरुनी गेल्या सार्‍या चांदण्या
परी ही रात्र वैरी उतरत नाही

त्याच्या परतीच्या दिवेलागणीसोबत
ती मात्र मालवत जाते.................सांजेसारखी

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Mar 2015 - 2:13 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बर्‍याच दिवसांनी मिपावर वाचण्यालायक कविता आलिये.
सुंदर रचना.

त्याच्या परतीच्या दिवेलागणीसोबत
ती मात्र मालवत जाते.................सांजेसारखी

वाह.. you made my day!!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Mar 2015 - 2:26 pm | अत्रुप्त आत्मा

छान !

सूड's picture

4 Mar 2015 - 2:39 pm | सूड

निव्वळ अप्रतिम!!

एस's picture

4 Mar 2015 - 3:39 pm | एस

वर मि.का. यांनी म्हटल्याप्रमाणे बर्‍याच दिवसांनी मिपावर वाचण्यालायक कविता आलीये.

एकेक ओळ, एकेक कडवे भयानकपणे अस्वस्थ करून सोडणारे आहे. प्रतिमांची निवड अजिबात नवीन नाही, या व अशा प्रतिमा, रूपके, उपमा आपल्याला याआधीही भेटलेल्या आहेत मराठी काव्यातून. या कवितेचे यश असे की, रूढ प्रतिमाच वापरूनही त्या अगदी चपखलपणे काव्यात बसवणे आणि त्यांच्या माध्यमातून कवितेला वाचकांच्या मनात बोलते करणे.

सुरूवातच होते कॉन्ट्राडिक्शन वापरून -

हल्ली ती कुणाशी बोलत नाही
गप्प असते घुम्यासारखी

इथूनच जाणवायला लागते हे काहीतरी वेगळेच आहे. खूप काही न सांगताही सांगितले जाणार आहे. बरेचसे अव्यक्त, धूसर असणार आहे आणि तरीही वाचकाला या धुक्याने लपेटलेल्या अनोळखी वाटेवर फार दूरपर्यंत भारावलेल्या अवस्थेत चालायला लावणार आहे.

बघत रहाते तिचं कोरडं आभाळ
मग बरसत जाते सरीसारखी

अत्यल्प शब्दांमध्ये कितीतरी सांगून टाकले आहे. तिची उद्ध्वस्त मनोवृत्ती, काहीतरी खूप जिव्हाळ्याचे कायमचे हरवले आहे ही भावना तिच्या कोरड्या आभाळाच्या रूपकाने व्यक्त होतेय आणि पुढच्याच क्षणी वाचकाला ठेच लागते 'मग बरसत जाते सरीसारखी' ह्या ओळींनी. काय उपमा आहे. तिच्या भावनांचा बांध फुटतो आणि तिचा आक्रोशही तीव्र, क्षणिक नाहीये तर पावसाच्या सरीप्रमाणे कदाचित नि:शब्द, आतल्याआत धुमसणारा असा तिचा वेदनाघोष आहे की काय अशा विचारात वाचक पडला आहे.

सोडवताना प्रश्नांच्या नाजुक गाठी
ती मात्र अडकत जाते...............गुंत्यासारखी

काही प्रश्न आहेत, अनुत्तरित. काही व्यथा आहेत, कायमच्या ठसठसणार्‍या. कोणत्या, ते माहित नाही. आणि त्यांचा उलगडा करण्याच्या तिच्या आर्त धडपडीत ती स्वतःच गुंतून गेलीये, स्वतःच एक कोडे बनली आहे बाहेरच्या जगासाठी आणि तिच्या स्वतःसाठीही.

त्याच्या नजरेतली तिची ओळख
आता तिला गवसत नाही
काय, कसे, कुठे बिनसले
छेडता मनाला उमगत नाही

चुकुन रेंगाळलेल्या त्याच्या प्रतिबिंबामागे
ती मात्र धावत रहाते.................वेड्यासारखी

इथेही एक धक्का बसतो. तो आता कोण? आणि तिला विसरण्याइतपत त्यांच्यामध्ये काय घडलेय? का घडलेय? कवी म्हणतो तसे कुठे बिनसलेय ह्या प्रश्नांचा गुंता मागच्या कडव्यातून तिला गुंतवणारा, आता वाचकांना अडकवून टाकतोय तिच्या प्रश्नांच्या जंजाळात. हळूहळू हे चित्र अजूनच धूसर होत चालले आहे, हातांच्या ओंजळीतून एकेक करून निसटून जाणार्‍या वाळूंच्या कणांप्रमाणे कवितेतली 'ती' वाचकांपासून दुरावत चालली आहे. तिचे एकाकी प्रतिबिंबच काय ते त्यांच्याही मनःपटलावर घुटमळते आहे.

त्याने नाकारलेली प्रत्येक आठवण
तिचा पदर काही सोडत नाही
त्याला घातलेली हरएक साद
फिरुनी माघारी कधी येत नाही

एकाकीपणाच्या या खोल दरीत
ती मात्र साचून राहते.................धुक्यासारखी

पदराच्या गाठींमध्ये लपविलेल्या असंख्य आठवणींचा गुंता तिच्याभोवती फेर धरतोय आणि तिला त्यातून बाहेर पडता हेत नाहीये. तिला विसरलेल्या त्याला कितीही आर्जवे केली तरी तो प्रतिसाद देत नाहीये. आणि यातून उरणार्‍या असह्य एकटेपणात तिचे अस्तित्त्वच काय ते उरले आहे. तेही इतके अनवट की दरीत दाटलेल्या धुक्याइतकेच तेही आभासी झालेय. धुके लांबून इतके दाट दिसते की पलिकडचे काही दिसू शकत नाही. पण म्हणून धुक्यात जावे तर जाणवते ती त्याची विरळता. जसजसे पुढे जावे तसतसे पुढे आणि मागे धुक्याचा पडदा आपल्याबरोबर चालू लागतो, पण फार जवळही येत नाही. वाचक या धुक्यात हरवतो आहे की वाचकाच्या मनावरील रेंगाळलेले तिचे प्रतिबिंब हरवते आहे?

तिच्या स्वप्नांतली त्याची रात्र
आता तिच्यासवे जागत नाही
विरुनी गेल्या सार्‍या चांदण्या
परी ही रात्र वैरी उतरत नाही

त्याच्या परतीच्या दिवेलागणीसोबत
ती मात्र मालवत जाते.................सांजेसारखी

स्वप्ने तिची आहेत, मात्र त्याची आहे. रात्रीत स्वप्न असते, इथे स्वप्नात रात्र आहे आणि तीही कशी, तर जागी ठेवणारी. त्याच्या आठवणीत असेल कदाचित. कधीकाळी सोबतीने केलेला तो प्रवास आता नाही. उरलीये ती फक्त एकाकी वाटचाल. तीही अशी की तेव्हाचे सुखाचे चांदणे आता कधीच विरले आहे, पुन्हा कधीच भेटणार नाही आणि शिल्लक आहे ती फक्त अंधारलेली भीतीदायक रात्र.

आणि शेवटची प्रतिमा - एकीकडे दिवेलागण आहे, सोडून जाणे आहे, नव्याने सोहळा बांधणे आहे तर दुसरीकडे तिच्या आर्त हाकेचा आवाज हळूहळू मंद होत चालला आहे. त्याला साद घालताना, न उलगडणार्‍या प्रश्नांचा गुंता सोडवताना तिच्या व्याकुळतेच्या हुंकाराचे प्रतिध्वनीही त्या एकाकीपणाच्या धुक्याच्या पडद्याआड लुप्त होत चालले आहेत.

... आणि तिची सांज मालवल्यानंतर पुढे उरणार आहे ती चांदणे विरलेली वैरी रात्र आणि अस्वस्थ वाचक.

नाखु's picture

4 Mar 2015 - 4:35 pm | नाखु

कवीता आणि भावानुवाद दोन्ही सरस ! _/\_

>>तिची सांज मालवल्यानंतर पुढे उरणार आहे ती चांदणे विरलेली वैरी रात्र आणि अस्वस्थ वाचक.

अगदी!!

दंडवत घ्या मालक!!

एक एकटा एकटाच's picture

4 Mar 2015 - 7:15 pm | एक एकटा एकटाच

धन्यवाद सर

एव्हढा सुरेख भावानुवाद, जर का कुणी मला करायला सांगितला असता तरी शपथेवर सांगतो मला जमला नसता.

Hat's off.......

नुसत्या एकटेपणापेक्षा कुणितरी "लादलेला एकाकीपणा" नेहमीच जिव्हारी लागतो.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Mar 2015 - 8:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

एव्हढा सुरेख भावानुवाद, जर का कुणी मला करायला सांगितला असता तरी शपथेवर सांगतो मला जमला नसता.

हा हा हा, आपल्याच कवितेचा इतका व्यवस्थित भावानुवाद करता येणे असही शक्य नसतचं. कारण तितकी विचारांची क्लॅरीटी असती तर अशी कविता उतरलीच नसती. ते थोड अ‍ॅबस्ट्रॅक्टच असाव लागतं.
कवितेला पुन्हा एकदा सलाम.. लिहीत रहा.

एक एकटा एकटाच's picture

4 Mar 2015 - 8:38 pm | एक एकटा एकटाच

मी माझ्या कवितेचा भावार्थ नक्कीच सांगु शकलो असतो.
पण स्वेप्स ह्यांनी तो भावानुवाद अत्यंत सुरेखरित्या मांडलाय. एकदम इफ़ेक्टिव्ह आणि इंप्रेसिव्ह.
त्यामुळे मी तसा अभिप्राय दिला होता. :-)

आणि मि.का साहेब तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनासाठी मनपुर्वक आभार. :-)

चुकलामाकला's picture

4 Mar 2015 - 8:07 pm | चुकलामाकला

कविता आणि भावानुवाद अगदी काळजाला भिडले.

खंडेराव's picture

7 Mar 2015 - 7:03 am | खंडेराव

मस्त भावानुवाद!

कविता आणि रसग्रहण दोन्ही आवडले.

राशी's picture

4 Mar 2015 - 4:24 pm | राशी

अप्रतिम!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2015 - 4:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम् !!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 4:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप आवडली.

एक एकटा एकटाच's picture

4 Mar 2015 - 7:16 pm | एक एकटा एकटाच

सगळ्या प्रतिसाददात्यांचे
मनपुर्वक आभार !!!!!!!!

पिंपातला उंदीर's picture

4 Mar 2015 - 7:19 pm | पिंपातला उंदीर

कसल जबरि. सलाम

जेम्स बॉन्ड ००७'s picture

4 Mar 2015 - 7:52 pm | जेम्स बॉन्ड ००७

निव्वळ अप्रतिम. पटकन त्याच मूड मद्ध्ये गेलो.

चुकुन रेंगाळलेल्या त्याच्या प्रतिबिंबामागे
ती मात्र धावत रहाते.................वेड्यासारखी

हे खुप खुप वाईट असतं.. अशीच माझी मनस्थिती होती २ वर्षांपुर्वी.. ते सगळं आठवलं.. आणि बाहेर पडण्याची प्रोसेस पण..

नेमका तिनेच आधार दिला बाहेर पडताना, एका छोट्या गैरसमजातुन घडलं होतं ते सगळं.. आता परत एकत्र आहोत. आत्ताच तिला वाचुन दाखवली हि कविता.. खुप मस्त वाटलं...

मनीषा's picture

4 Mar 2015 - 10:36 pm | मनीषा

नि:शब्दं करणारी ...सुरेख कविता!

इन्दुसुता's picture

5 Mar 2015 - 3:39 am | इन्दुसुता

अतिशय आवडली.

जयंत कुलकर्णी's picture

5 Mar 2015 - 9:04 am | जयंत कुलकर्णी

सुंदर .....
श्री. स्वॅप्सचा प्रतिसादही आवडला....

मित्रहो's picture

5 Mar 2015 - 1:43 pm | मित्रहो

वा! क्या बात है प्रत्येक ओळ न ओळ काहीतरी सांगून जाते.

एकाकीपणाच्या या खोल दरीत
ती मात्र साचुन रहाते.................धुक्यासारखी

सुंदर

क्रेझी's picture

5 Mar 2015 - 1:59 pm | क्रेझी

खुपच छान आहे कविता

एक एकटा एकटाच's picture

5 Mar 2015 - 8:26 pm | एक एकटा एकटाच

सगळ्यांचे मनपुर्वक आभार

चाणक्य's picture

5 Mar 2015 - 8:48 pm | चाणक्य

सुरेख रचना...

एक एकटा एकटाच's picture

6 Mar 2015 - 6:54 pm | एक एकटा एकटाच

मनपुर्वक आभार

शब्दबम्बाळ's picture

5 Mar 2015 - 9:46 pm | शब्दबम्बाळ

येणाऱ्या प्रत्येक कडव्याच्या चांदण्यासोबत,
कविता मात्र खुलत जाते…… चंद्रकोरीसारखी

एक एकटा एकटाच's picture

6 Mar 2015 - 6:53 pm | एक एकटा एकटाच

*THUMBS UP*

ज्योति अळवणी's picture

7 Mar 2015 - 8:52 am | ज्योति अळवणी

सुंदर कविता

सस्नेह's picture

7 Mar 2015 - 9:17 am | सस्नेह

'टोचक' कविता !
स्वॅप्स यांच्या रसभ-या टिपणीला भावानुवाद न म्हणता रसग्रहण म्हणत असावेत +)

सांजसंध्या's picture

7 Mar 2015 - 12:27 pm | सांजसंध्या

सुंदर काव्य
तिचं मन अगदी पुस्तकासारखं उलगडता आलंय...
तिची घालमेल व्यवस्थित उतरलीय, सोप्पं नाही हे.

एक एकटा एकटाच's picture

9 Mar 2015 - 1:18 pm | एक एकटा एकटाच

सर्वांचे मानपूर्वक आभार