ती मात्र ............
लेखनविषय:
हल्ली ती कुणाशी बोलत नाही
गप्प असते घुम्यासारखी
बघत रहाते तिचं कोरडं आभाळ
मग बरसत जाते सरीसारखी
सोडवताना प्रश्नांच्या नाजुक गाठी
ती मात्र अडकत जाते...............गुंत्यासारखी
त्याच्या नजरेतली तिची ओळख
आता तिला गवसत नाही
काय्,कसे,कुठे बिनसले
छेडता मनाला उमगत नाही
चुकुन रेंगाळलेल्या त्याच्या प्रतिबिंबामागे
ती मात्र धावत रहाते.................वेड्यासारखी
त्याने नाकारलेली प्रत्येक आठवण
तिचा पदर काही सोडत नाही
त्याला घातलेली हरएक साद
फिरुनी माघारी कधी येत नाही
एकाकीपणाच्या या खोल दरीत
ती मात्र साचुन रहाते.................धुक्यासारखी
तिच्या स्वप्नांतली त्याची रात्र
आता तिच्यासवे जागत नाही
विरुनी गेल्या सार्या चांदण्या
परी ही रात्र वैरी उतरत नाही
त्याच्या परतीच्या दिवेलागणीसोबत
ती मात्र मालवत जाते.................सांजेसारखी
वाचने
4511
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
बर्याच दिवसांनी मिपावर वाचण्यालायक कविता आलिये.
सुंदर रचना.
त्याच्या परतीच्या दिवेलागणीसोबत ती मात्र मालवत जाते.................सांजेसारखीवाह.. you made my day!!
छान !
निव्वळ अप्रतिम!!
वर मि.का. यांनी म्हटल्याप्रमाणे बर्याच दिवसांनी मिपावर वाचण्यालायक कविता आलीये.
एकेक ओळ, एकेक कडवे भयानकपणे अस्वस्थ करून सोडणारे आहे. प्रतिमांची निवड अजिबात नवीन नाही, या व अशा प्रतिमा, रूपके, उपमा आपल्याला याआधीही भेटलेल्या आहेत मराठी काव्यातून. या कवितेचे यश असे की, रूढ प्रतिमाच वापरूनही त्या अगदी चपखलपणे काव्यात बसवणे आणि त्यांच्या माध्यमातून कवितेला वाचकांच्या मनात बोलते करणे.
सुरूवातच होते कॉन्ट्राडिक्शन वापरून -
हल्ली ती कुणाशी बोलत नाही
गप्प असते घुम्यासारखी
इथूनच जाणवायला लागते हे काहीतरी वेगळेच आहे. खूप काही न सांगताही सांगितले जाणार आहे. बरेचसे अव्यक्त, धूसर असणार आहे आणि तरीही वाचकाला या धुक्याने लपेटलेल्या अनोळखी वाटेवर फार दूरपर्यंत भारावलेल्या अवस्थेत चालायला लावणार आहे.
बघत रहाते तिचं कोरडं आभाळ
मग बरसत जाते सरीसारखी
अत्यल्प शब्दांमध्ये कितीतरी सांगून टाकले आहे. तिची उद्ध्वस्त मनोवृत्ती, काहीतरी खूप जिव्हाळ्याचे कायमचे हरवले आहे ही भावना तिच्या कोरड्या आभाळाच्या रूपकाने व्यक्त होतेय आणि पुढच्याच क्षणी वाचकाला ठेच लागते 'मग बरसत जाते सरीसारखी' ह्या ओळींनी. काय उपमा आहे. तिच्या भावनांचा बांध फुटतो आणि तिचा आक्रोशही तीव्र, क्षणिक नाहीये तर पावसाच्या सरीप्रमाणे कदाचित नि:शब्द, आतल्याआत धुमसणारा असा तिचा वेदनाघोष आहे की काय अशा विचारात वाचक पडला आहे.
सोडवताना प्रश्नांच्या नाजुक गाठी
ती मात्र अडकत जाते...............गुंत्यासारखी
काही प्रश्न आहेत, अनुत्तरित. काही व्यथा आहेत, कायमच्या ठसठसणार्या. कोणत्या, ते माहित नाही. आणि त्यांचा उलगडा करण्याच्या तिच्या आर्त धडपडीत ती स्वतःच गुंतून गेलीये, स्वतःच एक कोडे बनली आहे बाहेरच्या जगासाठी आणि तिच्या स्वतःसाठीही.
त्याच्या नजरेतली तिची ओळख
आता तिला गवसत नाही
काय, कसे, कुठे बिनसले
छेडता मनाला उमगत नाही
चुकुन रेंगाळलेल्या त्याच्या प्रतिबिंबामागे
ती मात्र धावत रहाते.................वेड्यासारखी
इथेही एक धक्का बसतो. तो आता कोण? आणि तिला विसरण्याइतपत त्यांच्यामध्ये काय घडलेय? का घडलेय? कवी म्हणतो तसे कुठे बिनसलेय ह्या प्रश्नांचा गुंता मागच्या कडव्यातून तिला गुंतवणारा, आता वाचकांना अडकवून टाकतोय तिच्या प्रश्नांच्या जंजाळात. हळूहळू हे चित्र अजूनच धूसर होत चालले आहे, हातांच्या ओंजळीतून एकेक करून निसटून जाणार्या वाळूंच्या कणांप्रमाणे कवितेतली 'ती' वाचकांपासून दुरावत चालली आहे. तिचे एकाकी प्रतिबिंबच काय ते त्यांच्याही मनःपटलावर घुटमळते आहे.
त्याने नाकारलेली प्रत्येक आठवण
तिचा पदर काही सोडत नाही
त्याला घातलेली हरएक साद
फिरुनी माघारी कधी येत नाही
एकाकीपणाच्या या खोल दरीत
ती मात्र साचून राहते.................धुक्यासारखी
पदराच्या गाठींमध्ये लपविलेल्या असंख्य आठवणींचा गुंता तिच्याभोवती फेर धरतोय आणि तिला त्यातून बाहेर पडता हेत नाहीये. तिला विसरलेल्या त्याला कितीही आर्जवे केली तरी तो प्रतिसाद देत नाहीये. आणि यातून उरणार्या असह्य एकटेपणात तिचे अस्तित्त्वच काय ते उरले आहे. तेही इतके अनवट की दरीत दाटलेल्या धुक्याइतकेच तेही आभासी झालेय. धुके लांबून इतके दाट दिसते की पलिकडचे काही दिसू शकत नाही. पण म्हणून धुक्यात जावे तर जाणवते ती त्याची विरळता. जसजसे पुढे जावे तसतसे पुढे आणि मागे धुक्याचा पडदा आपल्याबरोबर चालू लागतो, पण फार जवळही येत नाही. वाचक या धुक्यात हरवतो आहे की वाचकाच्या मनावरील रेंगाळलेले तिचे प्रतिबिंब हरवते आहे?
तिच्या स्वप्नांतली त्याची रात्र
आता तिच्यासवे जागत नाही
विरुनी गेल्या सार्या चांदण्या
परी ही रात्र वैरी उतरत नाही
त्याच्या परतीच्या दिवेलागणीसोबत
ती मात्र मालवत जाते.................सांजेसारखी
स्वप्ने तिची आहेत, मात्र त्याची आहे. रात्रीत स्वप्न असते, इथे स्वप्नात रात्र आहे आणि तीही कशी, तर जागी ठेवणारी. त्याच्या आठवणीत असेल कदाचित. कधीकाळी सोबतीने केलेला तो प्रवास आता नाही. उरलीये ती फक्त एकाकी वाटचाल. तीही अशी की तेव्हाचे सुखाचे चांदणे आता कधीच विरले आहे, पुन्हा कधीच भेटणार नाही आणि शिल्लक आहे ती फक्त अंधारलेली भीतीदायक रात्र.
आणि शेवटची प्रतिमा - एकीकडे दिवेलागण आहे, सोडून जाणे आहे, नव्याने सोहळा बांधणे आहे तर दुसरीकडे तिच्या आर्त हाकेचा आवाज हळूहळू मंद होत चालला आहे. त्याला साद घालताना, न उलगडणार्या प्रश्नांचा गुंता सोडवताना तिच्या व्याकुळतेच्या हुंकाराचे प्रतिध्वनीही त्या एकाकीपणाच्या धुक्याच्या पडद्याआड लुप्त होत चालले आहेत.
... आणि तिची सांज मालवल्यानंतर पुढे उरणार आहे ती चांदणे विरलेली वैरी रात्र आणि अस्वस्थ वाचक.
In reply to अप्रतिम! by एस
कवीता आणि भावानुवाद दोन्ही सरस ! _/\_
In reply to अप्रतिम! by एस
>>तिची सांज मालवल्यानंतर पुढे उरणार आहे ती चांदणे विरलेली वैरी रात्र आणि अस्वस्थ वाचक.अगदी!! दंडवत घ्या मालक!!
In reply to अप्रतिम! by एस
धन्यवाद सर
एव्हढा सुरेख भावानुवाद, जर का कुणी मला करायला सांगितला असता तरी शपथेवर सांगतो मला जमला नसता.
Hat's off.......
नुसत्या एकटेपणापेक्षा कुणितरी "लादलेला एकाकीपणा" नेहमीच जिव्हारी लागतो.
In reply to एक नंबर !!!!!!!!!!! by एक एकटा एकटाच
एव्हढा सुरेख भावानुवाद, जर का कुणी मला करायला सांगितला असता तरी शपथेवर सांगतो मला जमला नसता.हा हा हा, आपल्याच कवितेचा इतका व्यवस्थित भावानुवाद करता येणे असही शक्य नसतचं. कारण तितकी विचारांची क्लॅरीटी असती तर अशी कविता उतरलीच नसती. ते थोड अॅबस्ट्रॅक्टच असाव लागतं. कवितेला पुन्हा एकदा सलाम.. लिहीत रहा.
In reply to हा हा हा by मिसळलेला काव्यप्रेमी
मी माझ्या कवितेचा भावार्थ नक्कीच सांगु शकलो असतो.
पण स्वेप्स ह्यांनी तो भावानुवाद अत्यंत सुरेखरित्या मांडलाय. एकदम इफ़ेक्टिव्ह आणि इंप्रेसिव्ह.
त्यामुळे मी तसा अभिप्राय दिला होता. :-)
आणि मि.का साहेब तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनासाठी मनपुर्वक आभार. :-)
In reply to अप्रतिम! by एस
कविता आणि भावानुवाद अगदी काळजाला भिडले.
In reply to अप्रतिम! by एस
मस्त भावानुवाद!
In reply to अप्रतिम! by एस
कविता आणि रसग्रहण दोन्ही आवडले.
अप्रतिम!!!!!
अप्रतिम् !!!
खुप आवडली.
सगळ्या प्रतिसाददात्यांचे
मनपुर्वक आभार !!!!!!!!
कसल जबरि. सलाम
निव्वळ अप्रतिम. पटकन त्याच मूड मद्ध्ये गेलो.
चुकुन रेंगाळलेल्या त्याच्या प्रतिबिंबामागे ती मात्र धावत रहाते.................वेड्यासारखीहे खुप खुप वाईट असतं.. अशीच माझी मनस्थिती होती २ वर्षांपुर्वी.. ते सगळं आठवलं.. आणि बाहेर पडण्याची प्रोसेस पण.. नेमका तिनेच आधार दिला बाहेर पडताना, एका छोट्या गैरसमजातुन घडलं होतं ते सगळं.. आता परत एकत्र आहोत. आत्ताच तिला वाचुन दाखवली हि कविता.. खुप मस्त वाटलं...
नि:शब्दं करणारी ...सुरेख कविता!
अतिशय आवडली.
सुंदर .....
श्री. स्वॅप्सचा प्रतिसादही आवडला....
वा! क्या बात है प्रत्येक ओळ न ओळ काहीतरी सांगून जाते.
एकाकीपणाच्या या खोल दरीत ती मात्र साचुन रहाते.................धुक्यासारखीसुंदर
खुपच छान आहे कविता
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
सुरेख रचना...
येणाऱ्या प्रत्येक कडव्याच्या चांदण्यासोबत,
कविता मात्र खुलत जाते…… चंद्रकोरीसारखी
In reply to खुप छान!! by शब्दबम्बाळ
*THUMBS UP*
सुंदर कविता
'टोचक' कविता !
स्वॅप्स यांच्या रसभ-या टिपणीला भावानुवाद न म्हणता रसग्रहण म्हणत असावेत +)
सुंदर काव्य
तिचं मन अगदी पुस्तकासारखं उलगडता आलंय...
तिची घालमेल व्यवस्थित उतरलीय, सोप्पं नाही हे.
सर्वांचे मानपूर्वक आभार
व्वाह