वख्तने किया क्या हसीं सितम

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
28 Feb 2015 - 10:42 am

वख्तने किया क्या हसीं सितम

भातुकलीच्या खेळातील राजाराणींची ताटातुट काही नवीन नाही. या विश्वातील व्यापार इतका अतर्क्य, अनाकलनीय, असतो की जे घडत असते ते हताशपणे पहाणे एवढेच माणसाच्या हातात असते. भातुकलीतील लाकडी बाहुल्यांप्रमाणे ! कवी ही घटना कशी हाताळतो हे त्याच्या तरल कल्पनाशक्तीवर, शब्दप्रभुत्वावर, त्याने योजलेल्या कवितेच्या घाटावर, वापरलेल्या शब्दांवर, त्यांच्या चपखलपणावर, अचुकतेवर, काय सांगितले यांपेक्षा काय सांगितले नाही -फक्त सुचवले आहे यांवर अवलंबून असते. तुमचा आक्षेप, " हे तर सर्व कवितांमध्येही अधोरेखितच असते", मान्य आहे. पण असल्या कवितांमध्ये, जिथे कवीला "काय" सांगावयाचे आहे हे तुम्हाला आधीच माहीत असते, तेथे जास्त महत्वाचे होते. आता "कसे" सांगतो आहे ह्यालाच मोल येते. कठोर वर्णांचा त्याग, लयीत म्हटले कीं करुण रसाला पोषक वातवरण निर्मिती, हे आलेच. कवी एक क्लुप्ती नेहमी वापरतात, लक्षात आली आहे ? अशी गीते नेहमी प्रथम पुरुषी असतात. कळत न कळत तुम्ही गीतातील पात्रांशी एकरूप होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक पात्रांची कोठलीच वैयक्तिक माहिती देणे टाळलेले असते. कशाकरितां ? या संदिग्धतेचा फायदा म्हणजे वाचक स्वत:च ती माहिती आपल्याला पाहिजे तशी भरतो. वाचकाची ही गुंतवणुक गीत लोकप्रिय करण्यास मोलाची मदत करते. असो. प्रास्ताविक थांबवून आजच्या गीताकडॆच वळू. गीत आहे कैफ़ी आझमी यांचे.

वख्तने किया क्या हसीं सितम !
तुम रहे न तुम, हम रहे न हम !!
बेकरार दिल इस तरह मिले !
जिस तरह कभी हम जुदा न थे !!
तुमभी खो गये, हमभी खो गये !
एक राहपर चलके दो कदम !!
जायेंगे कहां सुझता नही !
चल पडे मगर रास्ता नही !!
क्या तलाश है कुछ पता नही !
बुन रहे है दिन, ख्वाब दम-ब-दम !!

सितम-- जुलुम, अत्याचार, हसिन --सुंदर, बेकरार--व्याकुळ, आतुर, सुझना -- लक्षात येणे,
तलाश --शोध, , बुनना -- बुझाना, थंड करणे, भावना शांत करणे,, ख्वाब --स्वप्न, दम --श्वास, पळ, क्षण, दम-ब-दम -- क्षणोक्षणी, प्रत्येक श्वासाबरोबर.

ती कैफियत सांगते आहे; पण नक्की तीच कां ? तो ही असेल ! दोघे इतके एकजीव आहेत कीं तो ? ती ? काय फरक पडतो ? काळाने घाव घातला दोघांवरच. आणि "अति झालं, हसूं आलं " या न्यायाने ती म्हणते आहे " हा अत्याचार, हा जुलुम, काळजाला इतका भिडला आहे कीं तो जुलुमही आता सुंदर वाटू लागला आहे. त्या वेळचा तूं, आता तसा राहिला नाहीस रे, पण तुला दोष कसा देऊ ? मी तरी थोडीच तशी उरले आहे !
गतकाळात गेल्यावर आता तिला आठवत आहे आपली पहिली भेट. दोन व्याकुळ जीव एकमेकांना भेटल्यावर इतके आत्कृष्ठ झाले की त्यांना वाटले की ही आपली जन्मोजन्मींचीच भेट आहे, कधीही न तुटलेली. व्याकुळ कां ? जर तुम्हाला जीवाला जीव लावणारे कोणी भेटलेच नसेल तर तुम्ही व्याकुळच झालेले असणार ! तर असे हे व्याकुळ दोघे एका वाटेवर भेटले, दोन पावले बरोबर चालले. थोडे इथले सौंदर्य पहा. राहपर---वाटेवर. लोकल आल्यावर स्टेशनच्या बाहेरच्या गर्दीच्या लोंढ्यात, रस्त्यावर कोणाबरोबर तरी चार पावले चालणे आणि माथेरानच्या गर्द सावलीच्या वाटेवर, दोघांनीच, दोन पावले चालणे, किती फरक आहे ! आणि काळाचा आघात इथेच, दोघेही हरवले, दोघांनाही कळत नाही कीं आपण कोठे व आपला साथीदार कोठे ?
आता या वाटेवर तिला पार गोंधळून टाकले आहे. बिचारी एकटी... . कळत नाही की जायचे ..पण कुठे ? चार पावले टाकावयची तर पायाखाली मार्गच नाही. या संभ्रहावस्थेतील पुढचा यक्षप्रश्न म्हणजे पुढे शोध घ्यावयाचा पण कुणाचा ? कसा ? कुठे ? काळ हेच एक औषध आहे, प्रत्येक दिवस भावनांचा कढ कमी करेल पण ते पुढचे; आज क्षणोक्षनी दिसणारी स्वप्ने, पुढच्या क्षणी चुराडा होणारी स्वप्ने. त्यांचे काय ?
व्याकुळ कां ? जर तुम्हाला जीवाला जीव लावणारे कोणी भेटलेच नसेल तर तुम्ही व्याकुळच झालेले असणार ! तर असे हे व्याकुळ दोघे एका वाटेवर भेटले, दोन पावले बरोबर चालले. थोडे इथले सौंदर्य पहा. राहपर---वाटेवर. लोकल आल्यावर स्टेशनच्या बाहेरच्या गर्दीच्या लोंढ्यात, रस्त्यावर कोणाबरोबर तरी चार पावले चालणे आणि माथेरानच्या गर्द सावलीच्या वाटेवर, दोघांनीच, दोन पावले चालणे, किती फरक आहे ! आणि काळाचा आघात इथेच, दोघेही हरवले, दोघांनाही कळत नाही कीं आपण कोठे व आपला साथीदार कोठे ?
आता या वाटेवर तिला पार गोंधळून टाकले आहे. बिचारी एकटी... . कळत नाही की जायचे ..पण कुठे ? चार पावले टाकावयची तर पायाखाली मार्गच नाही. या संभ्रहावस्थेतील पुढचा यक्षप्रश्न म्हणजे पुढे शोध घ्यावयाचा पण कुणाचा ? कसा ? कुठे ? काळ हेच एक औषध आहे, प्रत्येक दिवस भावनांचा कढ कमी करेल पण ते पुढचे; आज क्षणोक्षनी दिसणारी स्वप्ने, पुढच्या क्षणी चुराडा होणारी स्वप्ने. त्यांचे काय ?

आपल्याला आठवणारे एखादे, उदा." भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी " हे गीत घ्या व दोन कवींनी मांडणी कशी केला आहे ते ताडून पहा. एक मिनिट, मी दोन गीतांची तुलना करावयास सांगत नाही. दोन्हीही सुंदर फुले आहेत एक गुलाबाचे तर दुसरे मोगर्‍याचे. सुरवातीला पाहिले त्या प्रंमाणे त्यांतेल सौंदर्यस्थळे शोधून काढा.

कैफ़ी आझमींचे हे गीत "कागझके फूल" या गुरुदत्ताच्या अवीट सुंदर चित्रपटात गीता दत्तने गायले आहे. संगीत सचिनदांचे. चित्रपट सुरवातीला आपटलाच. गीता गुरूची पत्नी व सिनेमात वहिदा रहमान नायिका. सिनेमातल्या प्रमाणेच प्रत्यक्षातील गुरु-वहिदाच्या प्रेम प्रकरणाने तिघांनाही फक्त मनस्ताप मिळाला. जाउ द्या. गीताने या गाण्याचे सोने केले. पुढे लतादिदींनी Tribute to Geeta Dutt" या नावाखाली हे गाणे म्हटले. जगजीतने ही म्हटले अनेक नवीन गायिकांनी म्हटले. मी तीन दुवे देत आहे. एकच विनंती. जरा वेळ असेल तेव्हा शांतपणे ऐका.

http://in.yhs4.search.yahoo.com/yhs/search?hspart=iry&hsimp=yhs-fullyhos... गीता दत्त

http://in.yhs4.search.yahoo.com/yhs/search;_ylt=A2oKmMqmR_FUaS4AeVLnHgx.... लता

https://www.youtube.com/watch?v=YEBBlRWRwYo जगजित

शरद

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

28 Feb 2015 - 11:52 am | सर्वसाक्षी

सुंदर रसग्रहण.

कागझके फूल म्हणजे श्वेत श्यामल चित्रणाची मेजवानी.

या गाण्याला जोड आहे ती अप्रतिम श्वेत श्यामल चित्रणाची. गुरुदत्त - वे के मूर्ती यांच्या संयोगातुन साकारलेलं एक अप्रतिम प्रकाशचित्रण. प्रकाशयोजना केवळ अप्रतिम. गीतातले शब्द व गीताची चाल याइतकेच प्रभावी चित्रण आहे. नपेक्षा अनेक गाणी केवळ श्रवणीय असतात पण प्रेक्षणीय नसतत.

एस's picture

28 Feb 2015 - 12:11 pm | एस

शेवटचा परिच्छेद जसाच्या तसा म्हणायचाय असे समजा.

शरद's picture

28 Feb 2015 - 2:38 pm | शरद

मी लेख लिहला तेव्हा शेवट असा होता
"कागझ के फूल बर्‍याच जणांनी पाहिला नसेल त्याचे शूटिन्ग अप्रतिम होते. आज आपण यु-ट्युबवर गाणे ऐकतांना जरा काळजीपूर्वक पहाल तर गाण्याला दोघा श्रेष्ठ कलावंतांनीच न्याय दिला आहे असे नाही तर छायाचित्रकाराने केवळ फिक्या व गर्द कृष्णधवल रंगांत एक स्वप्ननगरीच उभी केली आहे."
पण हे जरा जास्तच अवांतर होत आहे असे वाटले, गाळले. पण श्री.सर्वसाक्षी यांच्या रुपाने पहिल्याच प्रतिसादात एक समानधर्मा भेटला. खराखरा आनंद झाला.

( पहिल्या लिंकमध्ये गोंधळ झालेला दिसतो. कोणी सन्मित्र गीता दत्तच्या युट्युबची लिंक देईल काय?)

शरद

स्वाती२'s picture

28 Feb 2015 - 5:12 pm | स्वाती२

लेख आवडला आणि सर्वसाक्षी यांचा प्रतिसादही!
ही घ्या लिंक https://www.youtube.com/watch?v=MZ3S4-bm70s

चौकटराजा's picture

28 Feb 2015 - 6:06 pm | चौकटराजा

सचिन्दा खरेव तर अवखळ गाण्यांचे बादशहा पण वेळ आली तेंव्हा त्यानी गंभीराहून गंभीर अशा चाली बांधल्या. प्यासा, कागजके फूल अशातील गीते त्याची साक्ष. अशापैकीच हे एक गीत. अवखळ आवाजाची मलिका गीता दत्त हिने गायलेले
हे आणखी विशेष. अतिशय संथ लय आणि इंटर लूड मधील घन गंभीर संगीत त्यात भर म्हणजे उत्तम काव्य. असे हे सर्व गुणसंपन्न गीत आजही त्यासाठीच लोकप्रिय आहे.

मला का कुणास ठाऊक पण असं वाटतं की हे गाणं गीताजींनी इतकं अप्रतिम गाण्याचं कारण म्हणजे हे गाणं त्यांची स्वतःची कथा आहे. एवढी प्रतिभावान गायिका - पण लताची समकालीन असल्यामुळे सतत तुलना झाली. घरातही बेबनाव झाला. त्यामुळे आयुष्याचं होत्याचं नव्हतं झालं - वक्त ने किया क्या हसीं सितम - आणि आयुष्यातनं प्रेम दुरावलं आणि गुरुदत्त आणि गीता वेगळे झाले - तुम रहे न तुम, हम रहे ना हम!
ही वेदना गीताजींच्या आवाजामुळे अजरामर झाली आहे.शब्द, अर्थ, आवाज आणि चित्र यांचा असा संगम फार कमी बघायला मिळतो.

ह्या गाण्यामागची कथा काही दिवसांपूर्वी रेदिओ च्या कोणत्यातरी कार्यक्रमात ऐकली होति।

ह्या गाण्याचा सिनेमातील प्रसंग - एकीकडे दुहेरी प्रेमात सर्वस्व गमावून निराशेच्या गर्तेत बुडालेला एक दिग्दर्शक , आणि दुसरीकडे त्याच्यावरील प्रेमापायी त्याला देऊ केलेली मदत त्याने नाकारल्याने हतबल झालेली त्याची प्रेयसी … आणि गुरुदत्त साहेबांना इथेच एका गाण्याने चित्रपटाचा शेवट करण्याची इच्छा होती … कैफी आझमी साहेबांनी दोन महिन्याच्या कालावधीत ९ वेगवेगळी गाणी दत्त साहेबांना ऐकवली पण त्यांना त्यातले एकही भावले नाही … पण होणारा विलंब आणि त्याने वाढणारे budget यामुळे शेवटी त्यातलेच एखादे गाणे final करण्याची तयारी त्यांनी कैफी साहेबांना दाखवली पण कैफी साहेबांना हे मान्य नव्ह्ते। त्यांनी गुरुदत्त साहेबांना एका आठवड्याचा कालावधी मागितला … यावेळेत जर दत्त साहेबांच्या हृदयाला भिडणारे गाणे लिहू शकलो नाही तर पुन्हा लेखणी हातात धरणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करून ते तेथून बाहेर पडले … पण तरी सहा दिवसात त्यांना गाणे सुचू शकले नाही … शेवटच्या सातव्या दिवशी निराशेने झोप लागत नाही म्हणून रात्री दोन च्या सुमारास सागर किनारी (बहुतेक जुहु बीच ) ते उदास भटकत असताना त्याच्या मनात निराशेच्या ओळी आल्या

जायेंगे कहा, सूझता नहीं
चल पड़े मगर रास्ता नहीं
क्या तलाश हैं, कुछ पता नहीं
बुन रहे हैं दिन ख्वाब दम-ब-दम

आणि पुढे या ओळींच्या साथीने हे अजरामर गीत पूर्ण झाले

"वक्त ने किया क्या हसी सितम …. "

भीडस्त's picture

2 Mar 2015 - 5:59 pm | भीडस्त

सर नेहमीप्रमाणेच 'सुभानल्ला' रसग्रहण.
काही सांगावसं वाटतंय

सुझना -- लक्षात येणे ठीक आहे पण 'सुचणे' अधिक apt आहे.

आणि

बुनना -- बुझाना, थंड करणे, भावना शांत करणे,,
बुनना- to knit, to weave असं आहे. अर्थात 'विणणे'.

तुम्ही दिलेला अर्थाचा संदर्भ देऊ शकाल का प्लीज??

'आओ की कोई ख्वाब बुने' ही साहिरची अप्रतिम नज्म यानिमित्ताने पुन:श्च आठवली.

शरद's picture

3 Mar 2015 - 10:50 am | शरद

चुक मान्य. क्षमस्व. काय झाले, "हिन्दी शब्दसागर" या कोशाचा टाईप लहान आहे "बुनना" ऐवजी "बुतना" वाचले. (वयाचा परिणाम!) तो अर्थ लिहला. ओळीचा सुसंगत अर्थ लागत असल्याने तसे लिहले. " कंदील कळकट " चाही अर्थ देणार्‍याला काय अवघड हो ? पण बुनने = विनणे या योग्य अर्थाने शेवटची ओळ जास्त सुसंगत मिळते. ओळ अशी वाचावयाची " दिन दम ब दम (के) ख्वाब बुन रहे है " काळ हा विणकर आहे ही कल्पना तशी जूनीच. इथे तो तो क्षणोक्षणीं पडणार्‍या स्वप्नांची; आता आयुष्य स्वप्ने बघण्यातच घालवावयाचे आहे; वस्त्रे विणणार ही रचना जास्त रम्य आहे. धन्यवाद, श्री. भिडस्त.
शरद

संदीप डांगे's picture

4 Mar 2015 - 12:03 am | संदीप डांगे

लेख वर आणन्याची गरज आहे.

रुपी's picture

4 Mar 2015 - 5:38 am | रुपी

इतका सुंदर लेख वाचायचा राहून गेला होता!

गीता दत्तने खरच खूप जीव लावून म्हटलं आहे हे गाणं. बाकी कुणाच्या आवाजात न ऐकलेलंच बरं...

अजरामर गाणे. शब्द, चाल, आवाज, चित्रीकरण सर्वच एकसे एक.

आवडीचे जुलूम, किती काळे ढाळिले
तू न राहिलास तू, मी न मीही राहिले

मने अधीर पहा, कशी भेटली अशी
जणू कधी न ती, जाहली विलग

तूही हरवलास, मीही हरवले
क्रमून एक वाट, दोन पावले

जायचे कुठे, ते न मुळी सुचे
चाललो पुढे, न ती वाट सापडे

काय शोधतो, माहिती नसे
स्वप्न विणत दिस, रोज चालले

शरद's picture

8 Mar 2015 - 10:19 am | शरद

आवडले.
शरद