कलियुग..... एक लघूकथा.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Feb 2015 - 1:22 pm

कलियुग.......

रस्त्याच्या पलिकडचा डोंगर बघताच सगळे खुष झाले. दाट गर्ड झाडी व आकाशात उंच उठणारे झाडांचे शेंडे, त्याच्यावर कापूस पिंजल्यासारखे ढग व त्यावर पडणारे सोनेरी किरण.....मस्तच. थोड्याच वेळात डोंगरावरुन अंधार खाली उतरला व गावात दिवे लागले. आमचा गाव म्हणजे कोकणातील निसर्गाचा व माणसांचा एक उत्कृष्ट नमुना! शहरातील गोंगाटाला कंटाळून आम्ही मित्रांनी महिनाभर गावी मुक्काम टाकण्याचा निश्च्य केला होता व पारही पाडला होता. त्याचेच फळ आम्ही आत्ता चाखत होतो. ठरलेल्या नियमानुसार सगळ्यांनी आपापले सेलफोन बंद ठेवले होते. रात्र गप्पांमधे कशी सरली ते कळलेच नाही.

पहाटे उठून मी नेहमीप्रमाण कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. तास दोन तास रपेट मारुन्, घामाघूम होत मी घराच्या उघड्या फाटकातून आत शिरलो. तेवढ्यात एक धनेश दिसला. त्याल टिपून मी खिडकीखाली असलेल्या अनेक पादत्रांणांकडे नजर टाकत मी आत शिरणार तेवढ्यात कानावर आलेले वाक्य ऐकून मी थबकलो.
‘दाजी मी सांगतो तुम्हाला एकदोन जणांना टपकावल्याशिवाय हे आपल्याला जगू देणार नाहीत.’
‘अरे पण कायद्याने तो गुन्हा आहे’
‘सरकार काय आपल्याला नुकसान भरपाई देत नाही मग काय करणार !
‘चायला काय चाललय तरी काय ?’ मी मनात म्हटले व आत आत शिरलो.

बरीच मंडळी जमली होती गावातील. भिलाऱ्यांचा नितीन तावातावाने आपले म्हणणे ठासून मांडत होता. समोरच दाजी हातात त्यांची जूनी ठासणीची बंदुक घेऊन आपल्या दाढीवरुन हात फिरवत चिंताग्रस्त चेहऱ्याने ऐकत होते. नंदू हातात चहाचा कप आहे हे विसरुन ऐकत होता. चहाची वाफ त्याच्या चष्म्यावर जमा झाली तेव्हा त्याने तो चष्मा काढून पुसायला घेतला. खाली सतरंजीवर गावातील एक शेतकरी गणेश सावंत क्रूद्ध चेहऱ्याने सतरंजीचे दोरे ओढत आपला राग व्यक्त करत होते.
‘ओ गणेशराव सतरंजी फाडाल आमची’ नितीन म्हणाला. ते ऐकताच ते त्यांच्या तंद्रीतून जागे झाले.

सात आठ उंबरठ्यांचे गाव आमचे. गावातील जवळजवळ सगळे तरुण नोकरी निमित्त पुण्या-मुंबईकडे असल्यामुळे गावात आता फक्त म्हातारेच राहिले होते. आता आज चहा आणि गप्पांचा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांनी झाडून हजेरी लावली होती. मीही वर्षातून एकदाच गावाकडे येतो.
नमस्कार चमत्कार झाल्यावर मी चहाचा कप घेतला व सतरंजीवर बैठक जमविली.

‘काय आज सकाळी सकाळीच ?’ मी विचारले.

‘नितीनच्या चिक्कूच्या बागेचा वानरांनी फडशा पाडलाय. काय करावे यावर चर्चा चाललिये’ दाजी म्हणाले.

‘पण मला कळत नाही ही वानरे डोंगरावरुन खाली कशी येऊ लागली ? त्यांना वर काय खायला मिळत नाही की काय ? आपण तर डोंगरावरचे एकही झाड कापत नाही ना त्यांना त्रास देत’

‘त्यांची संख्या वाढली आहे ! दुसरे काही नाही !’ नितीन.

‘मग काय करायचे ? वानरमाऱ्यांना बोलवा !’

‘त्यांनी वानर मारायचे काम सोडले ! माजलेत साले ! आता एक वानर मारायला पाचशे मागतात. परत रात्रीची...’

आमच्या गावात वानरमाऱ्यांचे एक कुटूंब होते. पाटील आडणाव सांगायचे ते. पण मला वाटते त्यांना आडणावच नाही. मुळची आदिवासी जमात. यांच्या अवतारावरुन ते सहज ओळखू येतात अस्ताव्यस्त कपडे, पिंजारलेले केस, तारवटलेले डोळे व जेव्हा झिंगलेले नसतात तेव्हा कायम जागमूद. काहीच दिवसांपूर्वी दाजींशी गप्पा मारताना त्यांनी वानरमाऱ्यांबद्दल बरीच गंमतशीर माहिती सांगितली होती. ते कधीच घरात रहात नाहीत. व त्यांना जंगलाची खडानखडा माहिती असते. ते कायम फिरतीवर असतात व एखादे विकण्यायोग्य जनावर मिळाले तरच डोंगर उतरतात. उदा. घोरपड, ससा, रानडुक्कर.

फार पूर्वी म्हणजे दाजींच्या लहानपणी हे लोक वानरं मारुन खायचे म्हणून त्यांना नाव पडले वानरमारे. अर्थात त्यांना आता या नावाने हाक मारलेली चालत नाही व कोणी त्यांना तोंडावर तसे म्हणतही नाहीत. पण एकंदरीत निरुपद्रवी जमात.

‘दाजी तुम्ही यांना वानराची शिकार करताना कधी पाहिले आहे का ?’ मी त्यांना त्या गप्पांच्या ओघात विचारले होते.

‘हो लहानपणी अनेक वेळा. ते तिरकमठ्याने त्याची शिकार करत. त्यांच्याकडे तीन बाण असत. समजा पहिले दोन हुकले तर ते शेवट्चा त्या वानराला मारत नाहीत. ते त्याच जागेवरुन शेवटचा बाण सोडतात व तो नीट बघतात. तो जेथे पडेल तेथे जातात. मग सगळे बाण शोधून परत वानराचा माग काढतात.’ मला ही माहिती ऐकताना फारच मजा आली होती.
पण आता प्रश्न होता वानरांच्या टोळीचा बंदोबस्त कसा करायचा !

‘कुत्री काय करतात आपली ? राम्या बांदलने विचारले.

‘कसली कुत्रीन कसली काय ! एक एक वानर सत्तर किलोचा. ते ऐकतात होय आपल्या मरतुकड्या कुत्र्यांना. रम्या तू लेका कुत्र्यांना खायला तरी घालतोस का ?’ नितीन.

‘मागच्या वेळी एका वानराने आमच्या गोठ्याच्या छपरावर उडी मारली तर तो पत्रा फाडून सरळ आमच्या म्हशीच्या पाठीवर पडला. तुमचे हल्लीचे सिमेंटचे पत्रे हों तें.... म्हैस उधळली व जखमी झाली. तर हे बेणं दात विचकत तेथेच झाडावर चिक्कूचा फडशा पाडत बसल्ं होतऽऽऽ.’ गणेशराव.

‘आणि चिक्कू तरी साले खातात काय ते ! सगळे दात लाऊन फेकून देतात.’

‘हंऽऽऽऽऽऽऽ’ दाजी...

सगळे जण चहा संपल्यावर वानरांना शिव्या देत आपापल्या घराकडे गेले आणि त्याच संध्याकाळी नितीनच्या बागेत मोठा गलका उडाला. एका वानराला त्याच्या कुत्र्यांनी घेरला होता. एकजण दाजींची बंदूक आणायला धावला. मधे जखमी वानर, त्याच्या भोवती कुत्रे व त्याच्या बाहेर गावकऱ्यांचे रिंगण असा सगळा मामला बघून माझ्या पोटात ढवळायला लागले. त्या वानराचा पाय कुत्र्यांनी फाडला होता. त्यातून रक्ताची धार लागली होती व कुत्रे अवसान आणून त्याच्या भोवती घिरट्या घालत होते. दाजींनी बंदूक खांद्याला लावली तेवढ्यात कोणीतरी किंचाळले, ‘थांबा दाजी. पडतोय तो’
दाजींचाही त्या वानरावर गोळी चालवायचे मन होईना.

‘काय करु मग ?’

शेवटी त्या वानरावर उपचार करुन त्याला जंगलात सोडण्याचे ठरले. राम्या पुढे होणार तेवढ्यात त्याला त्याच्या घरातून त्याच्या आईने मोठ्याने हाळी दिली, ‘राम्या मेल्या आता जातोस का शेतावर ? बंद कर तुझे ते माकड चाळे.’ ते ऐकताच राम्या घराकडे पळाला, ‘आलोच रे मी !’.

जसे त्या वानराचे दात विचकणे बंद झाले तसे दाजींनी त्याला ढोसले. त्याने मान किंचितशी वर केली व परत निपचित पडला. तेवढ्यात कोणी तरी पळत जाऊन पाणी आणले. मग त्याला पाणी पाजण्याचा कार्यक्रम झाला. बेवड्या आप्पाने तेवढ्यात एक बांबूचा पिंजरा तयार केला व त्या वानरावर रोवला. दारुच्या नशेत आप्पा त्या वानरालाच राम्या म्हणून हाक मारत होता. त्याच क्षणी आमच्या गावात दोन राम्या झाले. एक बांदलांचा व एक वानरांचा.

एक दोन तासांनी राम्याने हालचाल करण्यास सुरुवात केली. पोराटोरांनी कुठून तरी जूने कपडे पैदा केले व त्या वानरावर चढविले. त्याच्या गळ्यात एक घंटाही बांधली. दुसऱ्यादिवशी उजाडल्यावर सगळे त्या वानराकडे धावले. पण तो तकलादू पिंजरा मोडून पडला होता व राम्या गायब होता.

बरेच दिवस हा विषय गप्पांना पुरला. एक आठवडा झाला असेल तेवढ्यात गणेशराव ओरडत आले, ‘ राम्या आलाय! राम्या आलाय!’

‘कुठे ? कुठेय !

‘बाळाच्या घरावर गाडी चालवतोय’

सगळे बाळाच्या घराकडे धावले तर हा पठ्या टि.व्हिची डिश गाडीच्या स्टिअरिंग सारखे धरुन बसला होता. आम्हाला बघताच त्याने एक उंच उडी मारली व शेजारच्या झाडावर जाऊन बसला. त्याच्या हालचालींमुळे त्याच्या गळ्यातील घंटा वाजत होती. तो आवाज आल्यावर त्या झाडावरची वानरे उठून निघून गेली. पुढचे काही दिवस आमच्या बागेतील वानरांचा वावर कमी होत गेला. इतर वानरांबरोबर राम्या आला की त्या घंटेच्या आवाजाने ती पळून जात. व हाही त्यांच्या मागून पळत असे.

‘चायला त्या राम्याला इतर वानरे त्यांच्यात घेत नाहीत. तो काय करीत असेल रे आता ? अवि म्हणाला.

‘जाऊदे रे बाबा चिक्कू तर वाचले आता.’

त्या दिवसापासून गावात राम्या दिसला का ?

‘कोणाचा ?’

"वानराचा रे’
असे संवाद ऐकू येऊ लागले. बरेच दिवस घंटेचा आवाज कानी पडला नाही तर आता गावाकऱ्यांना चुकल्यासारखे हो़ऊ लागले.

एक दोन महिने रम्या दिसला नाही ना त्याच्या घंटेचा आवाज ऐकू आला. कोणी म्हणे त्याला जंगलात कपडे फाडून टाकलेले दिसले तर कोणी म्हणे त्याला पाणवठ्यावर घंटेचा आवाज ऐकू आला. कोणी म्हणे तो आता लंगडा व थोटा झालाय. कोणी म्हणे त्याने ते जंगल सोडले.!

काळाच्या ओघात आम्ही ही गोष्ट विसरुनही गेलो. शहरातील सगळी मंडळी पुण्यामुंबईला परतली. गणपतीला जेव्हा गावाकडे गेलो तेव्हा मी प्रथम दाजींची गाठ घेतली.

‘राम्या दिसला का हो परत ?’

‘कोणाचा?’

‘वानराचा हो !’

‘हंऽऽऽऽऽ. गेला तो. एक दिवस रानडुक्कर उठला म्हणून आम्ही शिकारीला बाहेर पडलो. आता माझ्याकडे बंदूक नाहीना म्हणून मालवणच्या भोसलेला आमंत्रण दिले होते. डुक्कराच्या मागावर असताना त्याला झाडीत काळे काहितरी हालताना दिसल्यावर त्याने गोळी घातली. हल्लीची बंदुक ती. नेम धरायचा आणि बार टाकायचा. ठासणीची भानगड नाही. शिकारीला पळून जायला संधीच मिळत नाही. पण त्यामुळे माग काढायची मजाच गेली. जवळ जाऊन बघतो तर आपला राम्या ! त्याच्या अंगावर बांदलांच्या राम्याचा काळा टि शर्ट होता पण बिचाऱ्याच्या गळ्यात घंटा नव्हती. ती असती तर वाचला असता कदाचित. वानराला रामाचे नाव देऊन माणसाने त्याचा काटा काढला.....कलियुग रे बाबा कलियुग....’

त्या रात्री झोप आली नाही हे खरे... जेव्हा डोळे मिटेनात तेव्हा मी बाहेर आलो. मस्त चंद्रप्रकाश पसरला होता. मी सिगरेट ओठात ठेवली व पेटवणार तेवढ्यात मला डोंगरावर आकाशाला भिडलेल्या झाडांच्या फांदीवरुन एक काळी आकृती उडी मारताना दिसली आणि मी दचकलो. का भास होता तो ?..........

जयंत कुलकर्णी
सत्य कथेवर आधारित. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

25 Feb 2015 - 1:38 pm | एस

अप्रतिम!

मिपावर आलेल्या नवीन जिल्बीपाडूंना -
घ्या, असं काहीतरी लिहित जा की. शिका जरा.

लॉरी टांगटूंगकर's picture

25 Feb 2015 - 3:05 pm | लॉरी टांगटूंगकर

खूप अप्रतिम!

ब़जरबट्टू's picture

2 Mar 2015 - 10:51 am | ब़जरबट्टू

मस्तच... वळू आठवला...

विनिता००२'s picture

25 Feb 2015 - 1:46 pm | विनिता००२

हम्म. काय म्हणावे?
प्राणी वाचवावेत की शेती? कुठेतरी काहीतरी सोडावेच लागते.

कथा आवडली.

मदनबाण's picture

25 Feb 2015 - 3:06 pm | मदनबाण

मस्त !
आमच्या कॉलनीत आलं होत एक माकड मध्यंतरी ! एका लहान मुलीच्या पायाला चावुन पळुन गेलं !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

आदूबाळ's picture

25 Feb 2015 - 4:26 pm | आदूबाळ

जबरदस्त कथा!

अस्ताव्यस्त कपडे, पिंजारलेले केस, तारवटलेले डोळे व जेव्हा झिंगलेले नसतात तेव्हा कायम जागमूद.

जागमूद म्हणजे काय?

प्रचेतस's picture

25 Feb 2015 - 4:31 pm | प्रचेतस

खूपच छान.
वानरांच्या थीममुळे गोनीदांची तांबडफुटी आठवली.

जयंत कुलकर्णी's picture

25 Feb 2015 - 4:32 pm | जयंत कुलकर्णी

जागमूद : सावध किंवा सावधपेक्षा काहीतरी जास्त

अनुप ढेरे's picture

25 Feb 2015 - 4:37 pm | अनुप ढेरे

मस्तं!!

राशी's picture

25 Feb 2015 - 4:56 pm | राशी

छान वर्‍णन केलय...सगळे द्रुश्य डोळ्यासमोर उभे राहीले...

वर्‍णन

कसे लिहायचे कोणी सांगेल का?

जयंत कुलकर्णी's picture

25 Feb 2015 - 4:59 pm | जयंत कुलकर्णी

वर्णन : varNana

राशी's picture

25 Feb 2015 - 5:12 pm | राशी

धन्यवाद!

योगी९००'s picture

25 Feb 2015 - 5:04 pm | योगी९००

वर्णन आवडले....

राम्याविषयी खूप वाईट वाटले.

अर्धवटराव's picture

25 Feb 2015 - 8:07 pm | अर्धवटराव

मेक इन इंडीयाचं काय होणार???

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2015 - 9:59 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

कपिलमुनी's picture

26 Feb 2015 - 3:46 pm | कपिलमुनी

कथा आवडली!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Feb 2015 - 9:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आवडली कथा.
तुमचे लेखन सहसा चुकवत नाही मी.

मी-सौरभ's picture

1 Mar 2015 - 9:44 pm | मी-सौरभ

मस्त

तुमचा पंखा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2015 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त आहे कथा !

पैसा's picture

1 Mar 2015 - 4:43 pm | पैसा

अप्रतिम कथा!

एक एकटा एकटाच's picture

15 Mar 2015 - 11:16 pm | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलीय

कौशिकी०२५'s picture

26 Feb 2016 - 5:36 pm | कौशिकी०२५

आवडली..मस्तच..

रातराणी's picture

27 Feb 2016 - 12:09 am | रातराणी

कथा आवडली!

अभय म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 9:31 am | अभय म्हात्रे

खूप अप्रतिम!

बोका-ए-आझम's picture

27 Feb 2016 - 1:15 pm | बोका-ए-आझम

.

तिमा's picture

27 Feb 2016 - 1:29 pm | तिमा

उत्तम कथा आणि सुबोध शैली. अशा अजून गावरान कथा लिहा हो.

विवेकपटाईत's picture

27 Feb 2016 - 5:29 pm | विवेकपटाईत

रायसीना पहाडीवर तर वानरांचे राज्य आहे, त्यांच्यात भांडणे हि होतात. अगदी नेत्यांसारखे.

सविता००१'s picture

2 Mar 2016 - 1:50 pm | सविता००१

सुरेख कथा. फार आवडली