पारंपारिक प्रतिस्पर्धी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
10 Feb 2015 - 2:27 pm

तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर अजुन बरोब्बर ५ दिवसांनी, रविवार, १५ फेब्रुवारी २०१५ रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासुन बघा, २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे.

२ देशांमधले वैर स्वातंत्र्यापासुन अबाधित असले आणि खेळात वैरभावना असु नये अशी काही लोकांची पांचट प्रतिक्रिया असली तरी जेव्हापासुन दोन्ही देशांनी स्वतंत्र्यरीत्या क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासुन दोघांचे मैदानावरचे वैर टिकुन आहे. दर स्पर्धेगणिक वाढते आहे. विश्वचषक म्हटल्यावर तर त्याला युद्धाचेच स्वरुप प्राप्त होते. दोन्ही देशांकडच्या खेळाडुंच्या सुदैवाने पहिले ४ विश्वचषक हे २ देश समोरासमोर आले नाहीत. पहिल्या विश्वचषकात दोघेही साखळी सामन्यातच गारद झाले. १९७९ मध्ये पाकडे उपांत्य फेरीत पोचले पण भारत साखळीतच गारद झाला. १९८३ मध्ये दोघेही उपांत्य फेरीत पोचले पण दोघेही वेगवेगळ्या प्रतिस्पर्द्यांविरुद्ध खेळले आणि पाक उपांत्य फेरीत गारद झाले तर भारताने इतिहास घडवला. १९८७ मध्येदेखील या द्वंद्वाने क्रिकेटरसिकांना हुलकावणी दिली. मात्र १९९२ मधले संघ एवढे सुदैवी नव्हते. त्यांनी या थराराचा अनुभव घेतलाच.

१९९२ मध्ये स्पर्धेचे स्वरुप थोडे वेगळे होते. त्या आधी प्रत्येकवेळेस भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात विभागले गेले होती. पण १९९२ च्या विश्वचषकात मात्र सर्व संघ एकमेकांशी झुंजले. अर्थात भारत - पाकिस्तान लढतीचा देखील नंबर लागला. दोन्ही संघ किमान कागदावर तगडे होते. भारताकडे फलंदाजीला जडेजा, श्रीकांत, सचिन, अझहर, कांबळी, कपिल, मांजरेकर, किरण मोरे आणि मनोज प्रभाकर अशी तगडी फौज होती तर पाकिस्तानची फलंदाजी देखील आमिर सोहैल, इंझी, मियांदाद, सलीम मलिक, इम्रान खान, मोइन खान, अक्रम अशी झुंजार होती. गोलंदाजीतही दोन्ही संघ समसमान होते आपल्याकडे कपिल, श्रीनाथ, प्रभाकर होते तर त्याच्याकडे अक्रम, आकिब जावेद, इम्रान खान अणि मुश्ताक महमद अशी चांडाळ चौकडी होती. क्षेत्ररक्षणात देखील दोन्ही समानप्रमाणात गचा़ळ होते. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१७ धावा काढल्या. यात जडेजाच्या ४६ आणि सचिनच्या ५४ तर होत्याच त्याचबरोबर कपिलने देखील त्याची तलवार वेगात फिरवली आणि २६ चेंडुत ३४ धावा ठोकल्या. ३४ धावांवर जाउ नका. त्या काळात १००+ धावगतीने धावा काढणे ही काही येरागबाळ्याची बात नव्हती. नंतर कपिलने सुरुवातीलाच पाकड्यांना धक्का देत इंझमामला घरी पाठवले. पाठोपाठ प्रभाकरने फैजलला बाद केले. नंतर या दोघांचा नापाक फलंदाजांनी धसका घेतला आणि दोघांच्या २० षटकात मिळुन अवघ्या ५२ धावा केल्या आणि ४ बळी फेकले. सचिनने गोलंदाजीतही चुणुक दाखवत फेविकोल लावुन खेळणार्या सोहेलला ६२ धावांवर परतवले. आणि मग ठराविक अंतराने पाक फलंदाज परतत राहिले. १७३ धावांवर पाकला गुंडाळुन भारताने सामना जिंकला. नंतर पाकिस्तानने रडतखडत का होइना विश्वचषक जिंकला. भारतीयांसाठी भारताने पाकिस्तानला धुतला हेच महत्वाचे होते. शिवाय या सामन्यात भारतियांनी पाकिस्तानला फ्रस्ट्रेट केले होते हे महत्वाचे. समोरच्याला किती वैताग तरी आणावा याचे उत्कृष्ट उदाहरण होते किरण मोरेसमोर जावेद मियांदादने मारलेल्या ३ माकड उड्या. कोणी माकड उड्या म्हटले कोणी कांगारु उड्या. पण आजही मियांदाद म्हटले की मला त्याच्या ८०००+ धावा आठवत नाहीत. त्या माकड उड्या आठवतात. त्या बघुन किरण मोरेसारखा निधड्या छातीचा माणूसदेखील २ मिनिटे ब्लँक झाला होता.

Miandan Monkey Jump

१९९६ चा सामना तर संस्मरणीय होता. त्या सामन्याने भारतीय फलंदाजांची विजिगुषु वृत्ती दाखवुन दिली. सामना जिंकण्यापेक्षा समोरच्याला ठेचणे हे जास्त महत्वाचे असते. समोर पाकिस्तान असले की खुपच जास्त. ९६ च्या विशवचषकात जडेजा आणि प्रसादने तेच केले. तो उपउपांत्य फेरीचा सामना होता. मार्च महिनाच होता. टु बी मोर प्रिसाइज ९ मार्च १९९६. भारताने प्रथम फलंदाजी घेतली. सिक्सर सिद्धु ने आपल्या षटकार मारण्याच्या उर्मीवर ताबा ठेवुन संयमी ९३ धावा काढल्या. तेंडुलकर, अझहर, कांबळी, मांजरेकर या सगळ्यांनीचा उपयुक्त २०-३० धावा केल्या. आणि मग जडेजा मैदानावर आला. त्याने मुळावरच घाव घातला. वकार युनुसला एका षटकात त्याने अक्षरश: तुडवला. १९९६ मध्ये २६० ही जिंकणेबल धावसंख्या मानली जायची. त्याकाळात फलंदाज साधारण तेवढीच धुवाधुवी करायचे. तेव्हा जडेजाने २५ चेंडुत ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने तब्बल ४५ धावा कुटल्या. या मारामारी मुळे युनुस आणि आकिब जावेद दोघेही १० षटकांमध्ये ६७ धावांना धुतले गेले. शेवटी युनुसने जडेजाचा बळी घेत बदला घेतला पण तोपर्यंत जडेजाने सामना पुर्ण एंजॉय केला आणि चिन्नास्वामी वरच्या ४००००+ लोकांनी सुद्धा. त्यांच्या एंजॉयमेंट मध्ये कुठेही खंड पडु नये याची पुर्ण काळजी नंतर आमिर सोहेल आणि वेंकटेश प्रसादने घेतली. २८७ धावांचा पाठलाग करताना आमिर सोहैल - सईद अन्वर द्वयीने भारतीयांच्या तोंडचे पाणी पळवले. ३२ चेंडुत ४८ धावा काढुन अन्वर परतला. पण सोहैलचा धडाका कायम होता. समोर वेंकटेश प्रसादसारखा गोलंदाज असेल तर क्या कहने. त्याने प्रसादला धुतला. एक चेंडु सीमापार धुडकवुन त्याने प्रसादला त्याची जागा दाखवली. आणि नंतर न भूतो न भविष्यति घटना घडली. एरवी ज्याच्या चेहेर्यावरची माशी कधी हलायची नाही अश्या प्रसादने पुढच्याच चेंडुवर सोहैलच्या यष्ट्या वाकवल्या आणि पॅविलियनकडे बोट दाखवुन तो चिन्नास्वामीवरच्या आनंदाने वेड्यापिश्या झालेल्या क्राउडसमोर सोहैलवर बरसला "Go home, you f****** bastard". शिव्या देणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे हे विसरुन तमाम भारतीयांनी त्या क्षणी बहुधा प्रसादला स्टँडिंग ओव्हेशन दिले असावे. मी स्वत: तर जवळजवळ उड्याच मारत होतो. प्रसाद बहुधा त्या एका क्षणासाठी आयुष्य जगला असावा. सोहैल - अन्वर नंतर पाक फलंदाज ठराविक क्रमाने बाद होत गेले. सलिम मलिक - जावेद मियांदादने थोडा प्रतिकार केला खरा. मात्र वाढत्या धावगतीने त्यांना निष्प्रभ केले. सोहैलच्या बळीने आत्मविश्वासाच्या डोगरावर चढलेल्या प्रसादने नंतर इंझमाम आणी इजाझ अहमद हे खंदे फलंदाज परतवले. सामना भारताने ४० धावांनी जिंकला. सामन्याचा मानकरी सिद्धु होता पण सामन्याचा हीरो प्रसाद ठरला. Venkatesh Prasad had his moment of success supported by unparrallal bliss. या विश्वचषकानंतर जावेद मियांदाद या महान फलंदाजाचा अस्त झाला.

prasad sohail

१९९९ च्या विश्वचषकाच्या वेळेस वैरभाव परमोच्च शिखरावर होता. भारताने नुकतेच पाकिस्तानला कारगिलमध्ये धुवुन काढले होते. हुतात्म्यांच्या चितेची राख अजुन गरम होती. तो सामना जिंकणे दोन्ही संघासाठी विश्वचषक जिंकण्यापेक्षा जास्त महत्वाचे होते. तो हाय टेंन्शन सामना भारताने जिंकला. साखळीमध्ये प्रथमच भारत पाकिस्तान एकाच गटात होते. शोएब अख्तरचा तो बहुधा पहिला विश्वचषक होता. आधीच्या २ लढतींप्रमाणे भारताने प्रथम फलंदाजी घेतली आणि २२७ धावा केल्या. त्यात सचिनच्या ४५ आणि द्रविड - अझहरची अर्धशतके होती. अझहर प्रचंड अडखळत खेळला पण त्याच्या ५९ धावा शेवटी निर्णायक ठरल्या. प्रत्युत्तरादाखल पाकडे केवळ १८० धावा करु शकले. आणि यावेळेस मात्र सामन्याचा मानकरी होता वेंकटेश प्रसाद. त्याने त्याच्या गोलंदाजीचा प्रसाद देत ५ बळी मिळवले आणि ते सगळे तगडे फलंदाज होते. सईद अन्वर, इंझमाम, सलीम मलिक, मोइन खान आणि वासिम अक्रम. श्रीनाथनेदेखील ३ बळी घेत त्याची कामगिरी पार पाडली. भारताने त्याव्यतिरिक्त या विश्वचषकात काहीही कमावले नाही. But who cares? आम्ही पाकिस्तानला हरवले. त्यानंतर स्टेडियम मध्ये बहुसंख्येने असलेल्या पाकड्यांनी (सामना इंग्लंडमध्ये होता आणि मॅचेस्टर मध्ये पाकिस्तानी लोकसंख्या बरीच आहे) हुल्लडबाजी केली. तिरंगा जाळला. पाकिस्तानी प्रेक्षकांनी टीव्ही फोडले. आत्महत्या केल्या. यावरुन या सामन्यात स्टेक्स किती जास्त होते हे लक्षात येइल.

२००३ मध्ये मार्चच्या पहिल्या दिवशी भारत पाक परत एकदा लढले. सईद अन्वरच्या घणाघाती शतकाच्या जोरावर पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने २७३ धावा कुटल्या. त्यातल्या ७४ धावांचे आंदण आपल्या चेहेरापाड नेहेराने दिले. अर्थात अन्वर आणि अब्दुर रझ्झाक हे २ बहुमुल्य बळी देखील मिळवले. आणि त्यानंतर समस्त भारतीयांनी विश्वचषकातील भारतीयांच्या सर्वोत्तम खेळ्यांपैकी एक खेळी पाहिली. शोएब अख्तर विरुद्ध सचिन तेंडुलकर हा हाय प्रोफाइल सामना सचिनने अवघ्या चौथ्या चेंडुवर शोएबच्या बाउन्सरवर थर्ड मॅनला षटकार ठोकुन संपवला. नंतरचे २ चेंडुदेखील सीमेपार गेले. सचिनने त्या दिवशी समस्त क्रिकेटजगताला प्रतिहल्ल्याचे धडे दिले. त्याचा एकेक चौकार अनमोल मोत्याप्रमाणे होता. सचिन सेहवाग जोडीने पाकिस्तानी क्रिकेट इतिहासातील एका सर्वोत्तम गोलंदाजीचे अक्षरशः धिंडवडे काढले. वकार, वासिम अक्रम, अफ्रिदी, रझ्झाक आणि शोएब अख्तर सगळे फेल गेले. सेहवागने वकारला एक सोन्यासारखा चौकार मारला. त्याला वकारनेच परतवले. सचिनही शोएबचा कचरा करुन त्याच्याच गोलंदाजीवर ९८ धावांवर परतला. पण द्रविड आणि युवराजने (नाबाद ५०) कार्य सिद्धीस नेले. भारताने सामना ४६व्या षटकातच खिशात घातला. सचिनचे शतक नाही झाले. पण त्या ९८ धावा द्विशतकाएवढ्या मौल्यवान होत्या. सामनावीर तेंडुलकरच ठरला.

Sachin Third Man Six

२०११ चा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्याव महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा होता. त्याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नव्हते. त्याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती. त्यामुळे तो सामना न भूतो न भविष्यति महत्वाचा झाला होता. पाचव्यांदा पाकिस्तानला पाणी पाजुन धोनी ब्रिगेडने परंपरा खंडित होउ दिली नाही.

भारत ५-० असा व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने पाकिस्तानशी ३० मार्च २०११ रोजी उपांत्य फेरीच्या सामन्यात पाचव्यांदा झुंजला. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे राजनैतिक संबंध बरेच बिघडले होते. ते सुधारण्यासाठी म्हणा किंवा अतिरेकी हल्ल्याची शक्यता धूसर करण्यासाठी म्हणा, मनमोहन सिंगांनी पाकिस्तानी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सामना पाहण्याचे आमंत्रण दिले. ते स्वीकारुन पाक पंतप्रधान गिलानी स्वतः सामन्याला हजर सुद्धा राहिले. या सामन्याच्या निमित्ताने अनेक आंतरजालीय विनोदांना तोंड फुटले होते. मोहाली पाकिस्तानी बॉर्डरपासुन जवळ असल्यामुळे हारल्यानंतर पाकड्यांना घरी जायला जास्त तगतग करायला लागणार नाही असा एक विनोद जोरात होता. गिलानींना स्वत:च्या देशात स्तुती ऐकण्याची फारशी सवय नव्हती. पण त्या निमित्ताने भारतीय आंतरजालाने त्यांची खुपच स्तुती केली. पाकिस्तानी खेळाडुंवर प्रेम करणारा त्यांची काळजी घेणारा माणूस म्हणुन त्यांची प्रतिमा रंगवली गेली. अर्थात विनोदाने. गिलानी खेळाडुंची इतकी काळजी घेतात की त्यांना घेउन जाण्यासाठी ते स्वतः आले आहेत असा विनोद खुप प्रसिद्ध झाला होता. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्यामुळे ११ कागारुंना मारल्यामुळे वन खाते भारतीय खेळाडुंच्या मागावर आहे पण ११ अतिरेक्यांचा वध केल्याशिवाय भारतीय संघ शरणागती पत्करणार नाही असे धोनीने जाहीर केले आहे असाही एक विनोद सांगितला जात होता. एकुण मीडिया हाइप प्रचंड होती. हार पत्करणे कोणालाही परवडण्यासारखे नव्हते. सामन्याच्या दिवशी अखेरच्या क्षणी फॉर्मात असलेल्या अश्विनला वगळुन अफ्रिकेविरुद्ध गचाळ गोलंदाजी करणार्या चेहेरापाड नेहेराची निवड जेव्हा धोनीने केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

इतिहासाची आठवण ठेवुन धोनीने टॉस जिंकुन प्रथम फलंदाजी घेतली (त्याआधीचे ४ पैकी ३ विजय प्रथम फलंदाजी घेउन मिळवले होते). सुरुवात तर झक्कास झाली. सेहवागने उमर गुलच्या एका षटकात ५ चौकार मारुन त्याचा आत्मविश्वास गुल केला. पहिली जोडी अर्धशतकी भागिदारी करेल असे वाटत असतानाच सेहवाग आउट झाला. पण तगडी फलंदाजी असल्याने आणि मुख्य म्हणजे सचिन मैदानावर असल्यामुळे फारशी चिंता नव्हती. पण नंतरची ३० षटके सचिनने चिंता चितेसमान असते याचा वारंवार प्रत्यय आणुन दिला. सामन्याआधी सचिनला शतक करु देणार नाही अशी डरकाळी अफ्रिदीने फोडली होती. कर्णधाराचे मनसुबे फोल ठरवण्याची प्रतिज्ञा करुन बहुधा पाक क्षेत्ररक्षक मैदानावर उतरले होते तर शतक करुन भारताच्या पराभवाला जबाबदार ठरण्यापेक्षा (त्याआधीच्या २०११ च्या विश्वचषकातल्या ज्या २ सामन्यात सचिनने शतक ठोकले होते ते दोन्ही सामने भारत जिंकु शकला नव्हता) आउट होउन अफ्रिदीचे समाधान करावे या इराद्याने सचिन खेळत होता. त्याला तब्बल ६ जीवदाने मिळाली. त्याआधी कधीही एवढी जीवदाने एकाच खेळीत मिळाली नव्हती अशी कबुली खुद्द सचिनने दिली होती. अखेर ८५ धावांची सुरेख फटक्यांनी नटलेली आणी तरीसुद्धा ६ जीवदानांमुळे अनाकर्ष़क ठरलेली सचिनची खेळी ८५ धावांवर संपुष्टात आली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अफ्रिदीने, सचिनच्या वि़केटवर डोळा असणार्या पाकड्यांनी आणि हा आत्ता जातो का मग या काळजीने पोखरल्या गेलेल्या भारतीयांनी सुद्धा. ३७ व्या षटकाच्या अखेरीस १८७ धावसंख्या असताना सचिन परतला त्या पुर्वी वहाब रियाझ या तोपर्यंत फारसा यशस्वी न ठरलेल्या गोलंदाजाने भारताची मधली फळी कापुन काढली होती. त्याने सेहवाग, कोहली आणि स्पर्धेत प्रचंड फॉर्मात असणार्या युवराज सिंगला परतवले होते. युवराज तर पहिल्याच बॉलवर एका सुरेख चेंडुवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर स्पर्धेतल्या आपल्या फॉर्मला जागुन धोनीने २५ धावा केल्या आणि वहाबलाच आपली विकेट बहाल केली. रैना नसला असता तर भारताची त्या सामन्यात पार दैना झाली असती. पण सुरेश रैनाने कोसळणार्या खालच्या फळीला हाताशी धरुन स्वतः ३६ धावा काढल्या. पोवरप्ले मध्ये त्याच्या कृपेने त्या स्पर्धेत भारताने प्रथमच थोड्या बर्या धावा काढल्या. भारताने ५० षटकात २६० धावा काढल्या.

पाकिस्तानची फलंदाजी देखील बलाढ्य होती. भारतीय गोलंदाजीसमोर तर अशीही बांग्लादेशची फलंदाजीदेखील बलाढ्य वाटली होती. पाकिस्तान हळुहळु लक्ष्याकडे वाटचाल करत होता. पण फलंदाजीत साफ निराशा केलेल्या युवराजने गोलंदाजीत मात्र कमाल केली. त्याने लागोपाठच्या २ षटकात असद शफीक आणि धोकादायक युनुस खानला परतवले. त्यानंतर आलेला उमर अकमल धावगती वाढवत होता आणि मिसबाह उल हक संथगतीने खेळुन ती कमी करत होता. अखेर हरभजन सिंगचा एक चेंडु चक्क वळला असे वाटत वाटत वळलाच नाही आणि अकमलच्या यष्ट्या उध्वस्त करुन गेला. हरभजननेच नंतर अफ्रिदीची मोस्ट प्रेशियस विकेट मिळवली. जोवर अफ्रिदी होता तोवर सामना पाकिस्तानच्या हातात होता. नंतर मात्र धावगती वाढत राहिली आणि विकेट्स पडत राहिल्या.

Afridi Out

शेवटपर्यंत टिकलेल्या मिस्बाह ने अखेर काही सुंदर फटके मारले पण तोवर खुप उशीर झाला होता. ९ विकेट्स पडल्यामुळे मिसबाह उल हकला एकेरी धावा काढता येत नव्हत्या. अखेर शेवटचा बळी तोच ठरला. नेहेराने सामन्यात चक्क उत्कृष्ट गोलंदाजी करत ३३ धावांच्या मोबदल्यात शेपटाचे का होइना पण २ बळी मिळवले. भारताने अखेर ५-० चा वाईटवॉश दिलाच. भारताच्या सगळ्याच गोलंदाजांना २ -२ बळी मिळाले. हा विजय खर्या अर्थाने सांघिक होता. विजयात सगळ्यांचे योगदान लागले. इतर कोणीच नेत्रदीपक कामगिरी केली नसल्यामुळे असेल कदाचित पण ६ जीवदाने मिळुन सुद्धा सचिनलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

या यशाने प्रेरीत झालेल्या भारताने नंतर विश्वचषकाला गवसणी घातलीच. रावणाला हरवण्यासाठी रामाने इंद्राचा रथ वापरला होता. इथेदेखील महेंद्रच्या रथावर स्वार होउन रामरुपी सचिनने अखेर लंकेला चीत करुन भारताला दुसरा विश्वचषक मिळवुन दिला.

Dhoni Look

२०११ च्या विश्वचषकासंदर्भात भारत पाकिस्तान मॅच च्या बरोबरीने लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे शेवटचा षटकार ठोकुन जिंकत असताना सीमेपार जाणार्‍या त्या चेंडुवरची न हलणारी धोनीची भेदक नजर. (या फोटोत नीट दिसत नाही एवढी).

तर आता हे दोन संघ विश्वचषकामध्ये सहाव्यांदा एकमेकांशी झुंजतील. तो सामना भारताने जिंकावा आणि परंपरा पुढे चालु ठेवावी मग नंतर विश्वचषकाचे काय बी होउ द्यात.

क्रीडालेख

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

10 Feb 2015 - 2:30 pm | मृत्युन्जय

हा रुढार्थाने नविन लेख नाही. एका जुन्या लेखातच काही अ‍ॅडिशन करुन इथे देत आहे. मागचा लेख २०११ च्या विश्वचषकाच्या आधी लिहिला होता. त्यात २०११ ची भर घालुन हा लेख पाडला आहे. जुन्या लेखातच बदल करणे उचित ठरले असते पण मिपावर स्वसंपादनाची सोय नाही आणि थोडेफार बदल होते जे कदाचित संमंला सांगुन करता आले असते पण ३- ४ ठिकाणी थोडेफार बदल असल्याने त्यांना त्रास देणे योग्य वाटले नाही. तरीही हा धागा अयोग्य वाटत असल्यास उडवण्यात आला तर माझी काही हरकत नाही.

अजुन एकः सर्व छायाचित्रे जालावरुन साभार

थॉर माणूस's picture

10 Feb 2015 - 2:32 pm | थॉर माणूस

या पार्श्वभूमीवरच स्टार स्पोर्ट्सने बनवलेली "कब फोडेंगे यार" जाहिरातपण भारी आहे... :)

असंका's picture

10 Feb 2015 - 2:56 pm | असंका

+१

याला म्हणतात मिडिया हाईप...
पण जाहिरात खरंच भारी आहे!!

अशीच एक विडीओकॉनची पण होती...वॉशिंग मशिन मधून पाकिस्तानची हिरवी जर्सी बाहेर पडलेली दाखवली होती आणि खाली दोनच शब्द- "धो डाला!!"

ह्या जाहिराती पाकिस्तानात दिस्ल्यावर तिकडे या कंपन्यांची उत्पादन कोण विकत घेत असेल असा प्रश्न पडतो.....

मृत्युन्जय's picture

10 Feb 2015 - 3:02 pm | मृत्युन्जय

विडीओकॉन भारतीय कंपनी आहे. असेही त्यांचे पाकिस्तानात काही उत्पादन / विक्री असेल असे वाटत नाही. :)

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Feb 2015 - 3:16 pm | लॉरी टांगटूंगकर

लै आवडला !!!!

मागच्या ५ लढतीतील सचिनची उणीव नक्कीच जाणवणार, पण नवीन टीम नक्कीच रक्ताचं पाणी करून भिडेल हा विश्वास पण आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 3:17 pm | श्रीगुरुजी

फारच सुंदर लेख. वाचताना मजा आली. खूप जुन्या आठवणी जागृत झाल्या.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 3:19 pm | श्रीगुरुजी

>>> १९९९ च्या विश्वचषकाच्या वेळेस वैरभाव परमोच्च शिखरावर होता. . . . भारताने त्याव्यतिरिक्त या विश्वचषकात काहीही कमावले नाही. But who cares? आम्ही पाकिस्तानला हरवले.

एक दुरूस्ती. १९९९ मध्ये भारताने इंग्लंडला सुद्धा हरविले होते (केनयाला सुद्धा). परंतु भारत ऑस्ट्रेलिया, झिंबाब्वे, द. आफ्रिका व न्यूझीलँडकडून पराजित झाला होता. झिंबाब्वेविरूद्धच्या अनपेक्षित पराभवाने भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.

फारएन्ड's picture

10 Feb 2015 - 3:30 pm | फारएन्ड

मस्त उजळणी झाली! मीही लिहायचा विचार करत होतो पण बरेचसे येथे ऑलरेडी आलेले आहे. मजा आली वाचून. प्रत्येक मॅचची आठवण आली. अजून काही मुद्दे रिलेव्हंट आहेत, जमेल तसे लिहीतो.

एक करेक्शन - मियाँदाद १९९६ च्या २-३ वर्षे आधीच संपला होता. त्याला बळंच आणला होता वर्ल्ड कप साठी. त्यातही त्याने विशेष काही केले नाही. भारताविरूध्दही अत्यंत स्लो खेळला होता तो, किंबहुना आपले बोलर त्याला मुद्दामच आउट करत नाहीयेत असे पाकिस्तानी खेळाडू म्हणत असतील असे तेव्हा लोक म्हणाले होते :). त्याने १९८६ मधे शारजात भारताला दिलेल्या धक्क्याची परतफेड भारताने २ वर्ल्ड कप मधे त्याचा पोपट करून व नंतर २००४ मधे तो कोच असताना त्याच्या संघाला त्यांच्याच घरी पहिल्यांदा हरवून केली आहे.

आठवणी जागवणारा लेख. सुंदर!!

" २०११ च्या विश्वचषकातल्या ज्या २ सामन्यात सचिनने शतक ठोकले होते ते दोन्ही सामने भारत जिंकु शकला नव्हता"
हा उल्लेख आवडला नाही. प्रत्यक्षात दोन्ही सामने धोनीच्या कचखाऊ धोरणामुळे घालवले होते. आफ्रिकेविरुद्ध सचिन बाद झाला तेव्हा ४०वे षटक सुरु होते आणि २ बाद २६७ धावा झाल्या होत्या. तिथून जर २९६ पर्यंतच मजल मारू शकत असाल तर सचिनच्या शतकामुळे हरले म्हणण्यात काय अर्थ आहे?

थॉर माणूस's picture

10 Feb 2015 - 5:11 pm | थॉर माणूस

सहमत, सचिनला दोष देणे निव्वळ पळवाट आहे...

भारत वि. द. आफ्रिका... अत्यंत वाईट आठवण आहे ती माझ्यासाठी... स्टेडीअम मधून पाहीलेला सामना. पहील्या २० षटकांमधे प्रोजेक्टेड स्कोर ४००+ दाखवत होता... सचिन बाद झाला तेव्हाही प्रोजेक्टेड स्कोर ३५० च्या आसपास होता... नंतरची पडझड असह्य होती.

त्यापेक्षा जास्त चिडचिड मुनाफ आणि नेहरामुळे झाली. शेवटच्या षटकात १३ धावा हव्या होत्या... नेहरा नावाच्या माकडाने ४ चेंडूत दिल्या. या माणसाच्या हातात बॉल दिला तेव्हाच लोक स्टँडसमधून ऊठून जायला लागले यावरून काय ते समजा.
मॅचभर स्टँडमधले लोक या दोघांच्या नावाने जे काही शिव्याशाप देत होते (नेमके हेच आमच्या इथे यायचे फिल्डींगला) त्यातले १०% जरी त्यांना ऐकू गेले असते तर फेफरे येऊन पडले असते. :)

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 5:50 pm | श्रीगुरुजी

>>> त्यापेक्षा जास्त चिडचिड मुनाफ आणि नेहरामुळे झाली. शेवटच्या षटकात १३ धावा हव्या होत्या... नेहरा नावाच्या माकडाने ४ चेंडूत दिल्या. या माणसाच्या हातात बॉल दिला तेव्हाच लोक स्टँडसमधून ऊठून जायला लागले यावरून काय ते समजा.

नेहराच्या हातात चेंडू देणे चूक नव्हती. २००४ मध्ये पाकिस्तानातल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून ३४९ धावा कुटल्या होत्या. पाकड्यांनी चोख प्रत्युत्तर देऊन ४९ षटकात २४१ धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकात फक्त ९ धावा हव्या असताना नेहराने फक्त ३ धावा देऊन सामना ५ धावांनी जिंकायला मदत केली होती.

हा अनुभव लक्षात घेता नेहराच्या हातात चेंडू देणे चूक नव्हते.

२०११ च्या विश्वचषकात पाकड्यांना शेवटच्या २ षटकात ३२ धावा हव्या होत्या. नेहराने ४९ वे षटक अत्यंत उत्कृष्ट टाकून फक्त २ धावा देऊन उमर गुलला बाद केले होते.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2015 - 5:51 pm | श्रीगुरुजी

पाकड्यांनी चोख प्रत्युत्तर देऊन ४९ षटकात ३४१ धावा केल्या होत्या.

रंगोजी's picture

10 Feb 2015 - 10:24 pm | रंगोजी

>>> हा अनुभव लक्षात घेता नेहराच्या हातात चेंडू देणे चूक नव्हते.

अहो पण २००४ चा नेहरा आणि २०११ चा यात जमीन अस्मानाचा फरक होता. २००३ मध्ये नेहरा जगातील सर्वोत्तम पैकी होता (आठवा इंग्लंड- डरबन). त्यावेळी १५० च्या जवळ जाणारा दुसरा कोणीच भारताकडे नव्हता. पण हाच नेहरा २०११ पर्यंत १३५ च्या खाली आला होता. त्या दिवशी नागपुरात खेळपट्टी संथ होती. हरभजनने सुंदर गोलंदाजी करून सामना आपल्या बाजूला वळवला होता. ४०व्या षटकानंतर त्याचे आकडे ४-०-२०-२ होते. अशा वेळी धोनीने त्याची एक ओवर राखून ठेवली जी कधीच वापरली नाही. 'संसाधनाचा अपव्यय'. अर्थात तो जुगार खेळला आणि हरला. पण शेवटी जबाबदारी त्याचीच.

सौंदाळा's picture

10 Feb 2015 - 4:30 pm | सौंदाळा

सहीच, प्रत्येक सामना लेख वाचता वाचता परत अनुभवला.
१५ फेब ची आतुरतेने वाट पाहत आहे.
या स्पर्धेत भारताकडुन माझ्या तरी फारश्या अपेक्षा नाहीत. पाकड्यांना कुटले की भरुन पावलो.

स्पंदना's picture

10 Feb 2015 - 5:37 pm | स्पंदना

ऑस्ट्रेलियात आल्यापासून भारतिय संघ नुसता हरणे एव्हढ एकच काम करतोय :( किती वाईट वाटावं काय सांगू.
म्हणुन मी तरी ही मॅच बघायच धाडस ठेवत नाही ब्वा< काय विश्वासच नाही उअरला संघावर. स्पोर्टस्मन्स स्पिरीट..स्पोर्टस्मन्स स्पिरीट.. स्पोर्टस्मन्स स्पिरीट.. कितीदा ते स्पोर्टस्मन्स स्पिरीट दाखवायच आम्ही?
परवा MCG वर ऑस्ट्रेलिया भारत मॅच होती तर पाकडी उगा त्यांचा टीशर्ट घालून भारताविरुद्ध ऑस्सीज्ञा चिअर करत होती. लय राग आला. कवटी तडकते का काय अस्सा!

त्यात राग काय यायचा? शेवटी पाकडे करायचे ते करणारच. श्वानपुच्छचिरवक्रतान्याय विसरलात वाटते.

योगी९००'s picture

10 Feb 2015 - 4:41 pm | योगी९००

प्रत्येक सामना लेख वाचता वाचता परत अनुभवला.
+१

सुदैवाने हे सर्व सामने मी पाहिलेत. त्यातल्या त्यात २००३ चा सामना तर माझा सर्वात आवडता. या सामन्याआधी भारत जिंकावा म्हणून मी चक्क अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केली होती. (नंतर फायनला कांगारूंनी झोडपल्यावर एका मित्राने स्पेशल फोन करून फायनच्या आधी का परत आवर्तने केली नाहीत म्हणून मला सॉलीड झाडले होते). ह्या २००३ च्या सामन्याची मी चक्क व्हीडीओ सीडी विकत घेतली होती.

बाकी यावेळी क्रिकेटचा तेवढा काही उत्साह नाही. गेल्या तीन वर्षात एकही सामना पाहीला नाही आणि तितका इंटरेस्ट पण राहीला नाही. पेपरातून येणार्‍याबातम्यांनीच क्रिकेटचे अपडेटस घेतो. आपली टीम आणि त्यांचा परफॉर्मन्स बघता यावेळी "कब फोडेंगे यार" ला उत्तर मिळेल असे वाटते.

वेल्लाभट's picture

10 Feb 2015 - 5:04 pm | वेल्लाभट

"Go home, you f****** bastard"

हे ते शब्द नव्हेत जर मी चुकत नसेन तर.
एक अस्सल देशी शिवी होती ती. अनेकदा रिपीट बघितलाय तो विडियो त्यामुळे विसरणार नाही.

प्रचेतस's picture

10 Feb 2015 - 5:25 pm | प्रचेतस

जबरी रे मृत्युन्जया.
सुरेख लेख.

गणेशा's picture

10 Feb 2015 - 7:32 pm | गणेशा

नेहमीप्रमाणे सुंदर.
कालच तुमच्या त्या ११ का काय खेळाडुंच्या धाग्यांची आठवण झाली आणि नेमके वाचन्खुन आठवली नाही असे वाटले होते.

आणि आज निवडनुकीच्या धाग्यामुळे वाचणाला काही वेळ मिळालाच नाही.

बहुदा याच एका क्षणासाठी तो भारतीय संघात असावा.

अर्धवटराव's picture

10 Feb 2015 - 9:50 pm | अर्धवटराव

यातले अनेक सामने फिक्स होते म्हणतात.

निमिष ध.'s picture

10 Feb 2015 - 10:14 pm | निमिष ध.

आधीही वाचला होता आणि आताची नविन भर पण आवडली. काही म्हणा तो १९९६ चा प्रसाद खूप डोक्यात बसला आहे. कळणार्‍या वयात पाहिलेला तो पहिला विश्वचषक असेल त्यामुळे म्हणा की उपखंडात होता म्हणून.

आता पाहूच २०१५ मध्ये काय होतयं ते!

ईंद्रनिल's picture

11 Feb 2015 - 1:46 am | ईंद्रनिल

सचिनचे शतक झाल्यामुळे भारत मॅच हरतो असे म्हणणारे लोक क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे विसरतात.सचिनचे शतक झाले की इतर दहा खेळाडु मुद्दाम खेळत नसत असाही कुणी निष्कर्ष काढु शकेल.ज्या ज्या वेळी भारत हरला त्या त्या वेळी बहुसंख्य खेळाडुंनी आपापली कामगिरी योग्य बजावली नाही हे एकमेव कारण पराभवाला असते,काहिच सामन्यात एखादा खेळाडु एकहाती सामना खेचुन आणत असतो.पण सचिनवर टिका करुन काही लोक स्वतःला प्रकाशात आणु इच्छितात त्याला त्यांची मत्सरग्रस्त मानसिकता कारण आहे याऊप्पर काही नाही.

श्रीरंग_जोशी's picture

11 Feb 2015 - 2:55 am | श्रीरंग_जोशी

हा लेख म्हणजे पर्वणी आहे.

अनेक धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

11 Feb 2015 - 3:25 am | श्रीरंग_जोशी

समान विषय व घटनाक्रम असल्यामुळे असे वाटू शकते.
मृत्युन्जय यांचा हाच लेख गेल्या विश्वचषकाच्या भारत - पाक उपांत्य सामन्यापूर्वी प्रकाशित झाला होता.

मृत्युन्जय's picture

11 Feb 2015 - 1:10 pm | मृत्युन्जय

धन्यवाद जोशी साहेब.

झक्कास लिहिले आहेस! लई आवडला लेख.
जरा नियमित लिहित जायचे मनावर घ्या.

खटपट्या's picture

11 Feb 2015 - 8:13 am | खटपट्या

खूप छान लेख !!

पैसा's picture

11 Feb 2015 - 10:40 am | पैसा

यावेळेला पाकिस्तान आपल्या टीमला हरवेल का काय असे वाटते आहे मात्र! :(

पगला गजोधर's picture

11 Feb 2015 - 1:53 pm | पगला गजोधर

.

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 11:30 am | कपिलमुनी

सईद अजमल ची बॉलींग हा फार मोठा प्रश्न आहे !

बाळ सप्रे's picture

13 Feb 2015 - 12:11 pm | बाळ सप्रे

तो सामना भारताने जिंकावा आणि परंपरा पुढे चालु ठेवावी मग नंतर विश्वचषकाचे काय बी होउ द्यात.

बेक्कार अ‍ॅटिट्युड !

क्लिंटन's picture

13 Feb 2015 - 12:53 pm | क्लिंटन

सुंदर लेख. हे सगळे सामने मी बघितले आहेत.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

१९९६ च्या सामन्यात पाकिस्तानच्या रशीद लतीफने बर्‍यापैकी फटकेबाजी करून भारतीय गोटात चिंता निर्माण केली होती.पण वेंकटपथी राजूने एका सुरेख चेंडूवर फटका मारायला क्रिझच्या बाहेर यायला भाग पाडले आणि त्या प्रयत्नात त्याला मोंगियाकरवी यष्टीचित करून घेतले. काही प्रमाणात १९९२ च्या सामन्यात वसीम अक्रमही असाच यष्टीचित झाला होता (गोलंदाज कोण होता हे लक्षात नाही). तसेच १९९६ मध्ये अनील कुंबळेने सलीम मलिकला (?) स्वतःच्याच गोलंदाजीवर बाद केले होते तो झेल खरोखरच होता की चेंडू जमीनीला लागला होता यावर आम्हा मित्रमंडळींमध्ये बरीच चर्चा रंगली होती हे आठवते.

एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद

(एकेकाळी क्रिकेटमध्ये राजकारणाइतकाच इंटरेस्ट असलेला आणि त्याच्या ०.०१% ही इंटरेस्ट क्रिकेटमध्ये न राहिलेला आणि आधी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे १५ फेब्रुवारीला मॅच चालू असताना क्लास शिकवायला जाणार असलेला) क्लिंटन

असंका's picture

15 Feb 2015 - 8:37 pm | असंका

कब फोडोगे यार!!!

प्रास's picture

15 Feb 2015 - 9:02 pm | प्रास

६ - ०

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2015 - 9:46 pm | श्रीरंग_जोशी

पुढच्या विश्वचषकासाठी आत्ताच लेख लिहून ठेवा, मृत्युन्जयराव.

:-)

मृत्युन्जय's picture

16 Feb 2015 - 10:36 am | मृत्युन्जय

हाहाहा. नक्की. जर हा विश्वचषक संपु देत. :)

मृत्युन्जय's picture

16 Feb 2015 - 10:36 am | मृत्युन्जय

सर्व वाचक प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद आणि विश्वचषकासाठी शुभेच्छा.