निंगे सासरी ...

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in जे न देखे रवी...
27 Jan 2015 - 7:36 am

निंगे सासरी नवरी
मनी फाटलं अभाय
नोता निंगता निंगत
कसा घरातुनं पाय १
भिरं भिरं लानं भाऊ
फिरे तिचया पाठी मांगं
घळी घळी पुसे तिले
आजं कुठी जातं सांगं २
केला साजं शिनगारं
जशी लक्षमी नटली
जाता माय बापा जोळं
घऴी डोयाची फुटली ३
टाके दमनीतं पायं
डोया पाये घराकळे
फुलं पानं तोरनाचे
आता सोकाउनं गेले ४
उभी आंगनात मायं
हाती डाबलं कुकाचं
टाके खुरावरं पानी
डोयातलया आसवाचं ५

कविता

प्रतिक्रिया

बरचसं समजलं नसलं तरी मस्त आहे. भारी।

यसवायजी's picture

27 Jan 2015 - 8:45 am | यसवायजी

अंदाजावरनं समजलं आता,छान लिहिलंय. कुठल्या भागातली आहे भाषा?

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jan 2015 - 9:51 am | कैलासवासी सोन्याबापु

ही वर्हाडी भाषा आहे , विदर्भात वर्हाड़ प्रांतात (अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ) ह्या पाच जिल्ह्यात बोलली जाते! विठ्ठल वाघ सरांचे "काया मातीत मातीत तिफ़न चालते" ह्याच भाषेतले! , गाडगे बाबांचू ओरिजिनल ग्रामोद्धाराची अख्याने ह्याच भाषेतली, रोजच्या वापरात सर्वाधिक संस्कृत शब्द असणारी भारतातल्या अनेक बोली पैकी एक, माझीही मायबोली!! :)

चार्‍याविना निघाली के काय लेक घरची?
का ह्या दु:काळान बाजार दावला तिला?

अजया's picture

27 Jan 2015 - 8:35 am | अजया

:(

श्रीरंग_जोशी's picture

27 Jan 2015 - 8:52 am | श्रीरंग_जोशी

कविता भावली.

विशाखा पाटील's picture

27 Jan 2015 - 9:42 am | विशाखा पाटील

आवडली. बहिणाबाई चौधरींच्या कवितेचा प्रभाव वाटला. कदाचित अहिराणी बोलीमुळे तसे वाटत असेल.
दमनी म्हणजे काय?

अजया's picture

27 Jan 2015 - 11:04 am | अजया

दमणी? बैलगाडी?

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jan 2015 - 3:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

होय आमच्याकडे वर्हाडात दमनी म्हणतात , पश्चिम महाराष्ट्रात बहुदा छकडा म्हणतात त्याला , बांबु च्या तट्ट्या ने बंद केलेली "पैसेंजर वर्शन बैलगाड़ी" ३ प्रकार असतात

१. मालवाहू असते ती "बंडी" किंवा "बैलबंडी"
२. प्रवासी वाहतुकीसाठी असते ती किंवा हलके सामान (सरपण, ओला चारा, थोड़ा बाजार माल इत्यादी) न्यायसाठी वापरतात ती "दमणी"
३. शंकरपट उर्फ़ बैलांच्या शर्यतीसाठी वापरात येते ती "रिंगी" , ही आकाराने फारच लहान असते, शंकरपटाचा सीजन नसता पेरणी च्या वेळी ही एखाद ख़त/बियाण्याचे पोते , फाळ, डवरे(कुळव) इत्यादी न्यायला पण वापरली जाते रिंगी

चिगो's picture

27 Jan 2015 - 11:44 pm | चिगो

रेंगी/रिंगी म्हणजे आमच्याकडे (नागपूर) अर्धगोलाकार छताची बैलगाडी. प्रवासी वाहतुकीसाठी, खासकरुन बायाकांकरीता वापरली जायची. जुन्या मराठी चित्रपटात दिसते ही..

विवेकपटाईत's picture

27 Jan 2015 - 7:47 pm | विवेकपटाईत

मस्त आवडली. कुठली बोली भाषा अवगत नसलेला....

कविता छान आहे. आवडली.

सौन्दर्य's picture

27 Jan 2015 - 8:29 pm | सौन्दर्य

खूप छान कविता, डोळ्यात उगाचच (?) पाणी. इतक्या कमी शब्दात सासरी निघालेल्या मुलीचे, तिच्या आईवडिलांचे, धाकट्या भावाचे भावविश्व फार सुंदर चीतारलेत. ही भाषा कानाला फार गोड वाटते. 'फुलं पानं तोरनाचे आता सोकाउनं गेले' ह्यातलं सोकाउन म्हणजे सुकून का ? 'आईच्या हातातली कुंकवाची करंडी आणि डोळ्यातील पाणी' लाजवाब. असेच लिहित रहा आणि आम्हाला आनंद देत रहा.

ऊध्दव गावंडे's picture

27 Jan 2015 - 9:08 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद !
मित्रानो...
माझ्या प्रथम पदार्पणा ला आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला त्या बद्दल आभारी आहे .
आणि सोन्या बापु...
तुमी तं राजे हो मायं वझं च हलकं केलं.
बरं केलं!
धन्यवाद !

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jan 2015 - 9:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

मंग गळ्या उद्धव राव! ना कराव का! तशेच त सारे म्हणते तुमच्या इकळे "सहकार" नसते! मंग म्हणले चाला बाप्पा असाच सहकार काराव सुरु! नाई सायाची साखरीची फैक्ट्री त कवितेचाच अर्थ समजावावा न बापा लोकाईलर!!

ऊध्दव गावंडे's picture

27 Jan 2015 - 10:00 pm | ऊध्दव गावंडे

लय मस्तं!
मस्तं काम करून रायले बरं तुमी हे.

श्रीरंग_जोशी's picture

27 Jan 2015 - 10:24 pm | श्रीरंग_जोशी

बाप्पा बाप्पा, कित्ती वर्षांनी वाचाले भेटली आपली बोलीभाषा. भल्लाच खूष झालो ना मी.
आयुष्याची पहिली २० वर्षे ही बोलीभाषा ऐकूनही आज मी सराइतपणे बोलू शकत नाही याचे वाईट वाटते.
गावाकडे सलग ८-१० दिवस राहिल्यास नक्की बोलू शकीन.

मागे लोकसत्तेत वाचलेला एक प्रसंग.

स्थळ: न्यु यॉर्क
प्रसंग: नोकरीची मुलाखत

मुलाखत घेणारा अधिकारी - Where are you from?
उमेदवार युवकः India. sir.
अधिकारी: अरे भाई, इंडिया में कहा से?
युवकः महाराष्ट्र, सर.
अधिकारी: अरे महाराष्ट्रात कुठून?
युवकः नागपूर, सर.
अधिकारी: बाप्पा.... बाप्पा... बम दूर आला नं बे तू...
युवकः हव ना सर.

मधुरा देशपांडे's picture

27 Jan 2015 - 10:32 pm | मधुरा देशपांडे

आयुष्याची पहिली २० वर्षे ही बोलीभाषा ऐकूनही आज मी सराइतपणे बोलू शकत नाही याचे वाईट वाटते.

अगदी हेच. :(

चिगो's picture

27 Jan 2015 - 11:47 pm | चिगो

लाखत घेणारा अधिकारी - Where are you from?
उमेदवार युवकः India. sir.
अधिकारी: अरे भाई, इंडिया में कहा से?
युवकः महाराष्ट्र, सर.
अधिकारी: अरे महाराष्ट्रात कुठून?
युवकः नागपूर, सर.
अधिकारी: अबे, खर्रा काढ ना बे मंग भडकन.. ;-)

यसवायजी's picture

28 Jan 2015 - 11:20 am | यसवायजी

अधिकारी: रां*च्या. लांब आलैस की..
(गाव सांगायला पायजे काय?) ;)

सस्नेह's picture

28 Jan 2015 - 5:20 pm | सस्नेह

*lol*

आदूबाळ's picture

28 Jan 2015 - 6:31 pm | आदूबाळ

अधिकारी: या, राजे! एवढ्या लांबवरून आमच्याकडेच आलात नेमके!
(गाव सांगायला पायजे काय?) ;)

चिगो - खर्रा म्हणजे सुकी सुपारी ना? की माव्यासारखा त्यात तंबाखूचा अंशही असतो?

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 6:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

खर्रा म्हणजे ज्याला पश्चिम महाराष्ट्रात मावा म्हणतात तो! खुप जास्त वैविध्य आहे विदर्भात अन नागपुरात ह्या प्रकाराचा , सुपारी कच्ची का शेकी (भाजकी), किवाम अथवा गुंजेचा पाला हवे का नको, पाण्याचा बिनपाण्याचा, नागपुरी खर्रा विशेष प्रसिद्ध, खर्रा अन घोटा वेगळे असतात, लाकडी खडबडीत पट्टी वर पातळ पॉलिथीन मधे मिक्स करुन रगडून बनवलेला असतो तो घोटा, अन त्या पॉलिथीन ची पुरचुंडी तळहातावर घासून बनवतात तो घोटा!!! मायला!! आठवणी जाग्या झाल्या!! :D

रेवती's picture

27 Jan 2015 - 9:49 pm | रेवती

कविता आवडली.

ऊध्दव गावंडे's picture

27 Jan 2015 - 9:57 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद !

ऊध्दव गावंडे's picture

27 Jan 2015 - 9:54 pm | ऊध्दव गावंडे

लय मस्तं!
मस्तं काम करून रायले बरं तुमी हे.

मधुरा देशपांडे's picture

27 Jan 2015 - 10:05 pm | मधुरा देशपांडे

कविता आवडली. काही विसरलेले शब्द अनेक वर्षांनी वाचले. :)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jan 2015 - 11:07 pm | अत्रुप्त आत्मा

छान.

चिगो's picture

27 Jan 2015 - 11:48 pm | चिगो

सुंदर कविता.. हृद्यस्पर्शी.. लिहीत रहा..

संदीप डांगे's picture

28 Jan 2015 - 1:23 am | संदीप डांगे

हारपली भाश्या अशी जशी माय जतरेत
हिथं भेटते तवा येते पानी माल्या नजरेत

रुपी's picture

28 Jan 2015 - 1:52 am | रुपी

छान!

इन्दुसुता's picture

28 Jan 2015 - 9:35 am | इन्दुसुता

इतक्या कमी शब्दात सासरी निघालेल्या मुलीचे, तिच्या आईवडिलांचे, धाकट्या भावाचे भावविश्व फार सुंदर चीतारलेत.

अगदी हेच.
कविता अतिशय आवडली.

जागु's picture

28 Jan 2015 - 11:24 am | जागु

छान वाटले वाचताना.

रायनची आई's picture

28 Jan 2015 - 3:43 pm | रायनची आई

गाव असो की शहर्..भावना सारख्याच असतात..आता २ दिवसान्पुर्वी आईकडून आले तेव्हाची आठवण आली..आई अशीच निरोप द्यायला उभी होती :-(

ऊध्दव गावंडे's picture

28 Jan 2015 - 10:46 pm | ऊध्दव गावंडे

ईरावती कर्वें यांचा पाठ्यपुस्तका मधला धडा आठवला
" परीपुर्ती"

माधुरी विनायक's picture

28 Jan 2015 - 5:17 pm | माधुरी विनायक

कवितेची भाषा आणि भावना... जास्त काय भावलं, हे सांगणं कठीण आहे...

शब्दबम्बाळ's picture

28 Jan 2015 - 6:03 pm | शब्दबम्बाळ

एक प्रश्न आहे, या भाषेमध्ये जोडशब्द नसतात का?

शब्दबम्बाळ's picture

28 Jan 2015 - 6:09 pm | शब्दबम्बाळ

माफ करा! जोडाक्षरे म्हणायचे होते…

ऊध्दव गावंडे's picture

28 Jan 2015 - 11:00 pm | ऊध्दव गावंडे

होय ! आहेत पण मला कदाचित् लिहिताना शक्य झाले नाहीत.उदा. "घळ्ळी "डोयाची फुटली, घळ्ळी म्हणजे मातीचे मोठे मडके.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jan 2015 - 11:03 pm | श्रीरंग_जोशी

भाषा मराठीच आहे, केवळ शैली वर्‍हाडी आहे.

ऊध्दव गावंडे's picture

28 Jan 2015 - 11:19 pm | ऊध्दव गावंडे

सिर्रंग भाऊ मी काय म्हनतो...

श्रीरंग दादा मला काय म्हणायचंय...

श्रीरंग_जोशी's picture

28 Jan 2015 - 11:30 pm | श्रीरंग_जोशी

लहानपणी शाळेतले अनेक मित्र मला सिर्रंग म्हणून हाक मारायचे. :-)

आज अनेक वर्षांनंतर असे कुणी म्हंटले असेल. मनःपूर्वक धन्यवाद.

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 6:10 pm | वेल्लाभट

ह्र्दयस्पर्शी

पैसा's picture

28 Jan 2015 - 6:12 pm | पैसा

खूप गोड कविता आहे!

चुकलामाकला's picture

29 Jan 2015 - 6:39 pm | चुकलामाकला

वा! किती हळवी, सुंदर कविता आहे, डोळ्यातून पाणी आले की भाऊ!

बबन ताम्बे's picture

30 Jan 2015 - 8:06 pm | बबन ताम्बे

जीव गलबलला !