सारे तिचेच होते

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
21 Dec 2014 - 4:40 pm

उदंड रसिकता असलेल्या, जीवनावर रंगून जाऊन प्रेम करणार्‍या, एका साठीतल्या व्यक्तीच्या, आपण त्यांना रंगराव म्हणू , व त्यांच्या एका तरुण मित्राच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. बोलताबोलता रंगराव भूतकाळात गेले व आपण कसे धुंद होऊन प्रेम केले याची आठवण ते सांगू लागले.

साठीचा गज़ल

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो-- खोटे कशास बोला ---
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी !

उगवावयाची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन् मावळावयाची संध्या तिच्याच ओठी

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी !

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी !

प्रत्यक्ष भेटली कां ? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी !
विंदा करंदीकर १९६४

गझल म्हटली की अतिशयोक्ती आलीच. इथे तिची लज्जत कशी वाढत वाढत जाते आहे बघा. आपले सारे तिच्या साठीच होते इथून ते पार उडी मारतात व सर्व विश्वच, चंद्र, सूर्य, तारे हेही तिच्याच पाठी होते इथपर्यंत पोचतात ! संपूर्ण दिवस तिच्या ध्यानातच म्हटल्यावर सकाळच्या उषेचे तेज तिच्या नेत्रात व सायंकाळच्या संध्येची लाली तिच्या ओठावरच दिसणार. हे ठीक हो. पण " न था रकिब तो आखीर वो कौन था" या संशयाने वृद्ध ती दिसल्यवर आपणही तरुण वाटावे म्हणून काठी लपवत व मोक्षमार्गी छाटीला इस्त्री करत असे म्हणणे अंमळ जास्तच. तरुण मित्र हेही स्विकारावयास तयार होता पण रंगराव तिथेच थांबत नाहीत. त्यांना सजीवच काय पण निर्जीवसुद्धा वेठणीला धरावयाचे आहेत. ते सांगतात " अरे, ती मारुतीला प्रदक्षिणा घालावयाची, तेव्हा ती मूर्तीसुद्धा मागे वळून पहावयाची." बहुधा यांना मारुती हा शंकराचा अंशावतार व शंकराला पंचानन म्हणतात कारण तोही अशा प्रसंगीच तोंड फिरवून बघत होता याची आठवण झाली असावी. बाकी मारुतीही पंचानन (पांचमुखी) असतोच म्हणा. एवढे ऐकल्यावर तरुण मित्राला रहावत नाही. तो विचारतो "अहो, ही तुम्हाला भेटली तरी केव्हा ?" रंगराव तसे सत्यवचनी. ते कबुली देतात की " प्रत्यक्षात कधी भेटली नाही हे खरे पण त्याने काही बिघडले नाही, त्याची जरुरी नव्हती; स्वप्नात तसल्या भेटी होत होत्याच की ". आता तुम्हाला फुटले तसे हसूं मित्रालाही फुटले. रंगरावांना हे काही आवडले नाही. ते तावातावाने म्हणतात "हसतोस कसला, तू तरुणपणीच बुढ्ढा झाला आहेस, साठीतील कुणालाही विचार मी खरे बोलतो की नाही ."
या बोलण्यातही "ब"चा अनुप्रास मस्त जमला आहे की नाही ? आणि एक. "औदुंबर" या सुप्रसिद्ध कवितेत शेवटची ओळ आहे " पाय टाकुनि जळात बसला "असला" औदुंबर ". साठएक वर्षांपूर्वी या "असला" चा अर्थ काय यावर वाद रंगले होते. आपणही स्वप्नातली "तसल्या" भेटींमधल्या "तसल्या म्हणजे "कसल्या" ? यावर झकास कल्पना लढवू शकता.

शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

संचित's picture

21 Dec 2014 - 4:56 pm | संचित

सुंदर कविता.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2014 - 5:25 pm | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्स्स्त! *GOOD*

@दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी !>>> :-D

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 12:50 am | मुक्त विहारि

आवडले...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Dec 2014 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरदसर, असे रंगराव जागोजाग दिसू लागतात. देवळात, बागेत, बसमधे, यांचं सर्व लक्ष असं 'इकडे तिकडेच' असतं. रंगरावांचं तसं साठी आली की कठीन होऊन बसतं. सर, ओळखा तुमच्या काळातील कवीच्या अशाच चार ओळी डकवतो. - कवीचं नाव कानात सांगा.

''तसा आहे अजून यौवनातच मी
पण या पांढर्‍या केसांनी दगा दिला
म्हणतात पोरीबाळी आजोबा, बरे वाटते
पण या प्रौढा-
त्यांनी काका म्हणुन दगा दिला. "

क्ल्यु देतो-

मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले
इतक्या लिहिल्या गेल्या हातून हेच काय थोडे झाले.

-दिलीप बिरुटे
(शरदसरांच्या लेखनाचा पंखा)

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 11:00 am | मदनबाण

वाह्ह... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

सुनील's picture

22 Dec 2014 - 11:25 am | सुनील

ओळ न् ओळ मस्त!!

पाटणकरांचीही एक कविता आहे, ह्याच अंगाने जाणारी, पण आता आठवत नाही.