हिशोब..

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
11 Dec 2014 - 4:29 pm

मी जन्मांचा विचार केला ,तुझी धाव पण वर्षांपुरती
कसे निभावू नाते अपुले ,परतुनी आले अर्ध्यावरती …

किती विनवण्या, किती अबोले, एका छोट्या पत्रासाठी
हट्ट पुरवी तू अखेरीस पण पत्ता दुसरा पत्रावरती…

शब्द असे तू उधळीत जाशी, जशी फुले वा माणिक मोती
फसवे तरीही वेचीत गेले, माया केली अर्थांवरती …

उगाच वेडा जीव लावला ,अशी कशी मी विसरून गेले ,
कितीही गुणले शून्याला तरी हाती अपुल्या शून्यच उरती...

मराठी गझलकविता

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

11 Dec 2014 - 5:17 pm | आयुर्हित

अरे व्वा! ! गज़ल छान जमली आहे.

पत्ता दुसरा पत्रावरती…
अरेरे, वाईट वाटले वाचून....

पण काही हि म्हणा, गणित पक्के आहे हो आपले!

छान आहे कविता,वाचायची राहुन गेलेली!

चुकलामाकला's picture

13 Dec 2014 - 5:26 pm | चुकलामाकला

धन्यवाद!!:):)

आतिवास's picture

13 Dec 2014 - 5:49 pm | आतिवास

कविता आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2014 - 12:55 am | अत्रुप्त आत्मा

@शब्द असे तू उधळीत जाशी, जशी फुले वा माणिक मोती
फसवे तरीही वेचीत गेले, माया केली अर्थांवरती … >>> मार डाला!

@उगाच वेडा जीव लावला ,अशी कशी मी विसरून गेले ,
कितीही गुणले शून्याला तरी हाती अपुल्या शून्यच उरती... >>> स्वाल्लिड!!!

चाणक्य's picture

14 Dec 2014 - 3:00 am | चाणक्य

भावना चांगल्या मांडल्या आहेत. अजून एक शेर लिहा म्हणजे गजल पूर्ण होईल. गजलेत किमान ५ शेर हवेत.

चुकलामाकला's picture

14 Dec 2014 - 2:26 pm | चुकलामाकला

धन्यवाद ! पाचवा शेर लिहिला होता ,
ओढ नभाची कधीच विरली, उंच उंच मी उडते तरिही
नको कुणा नजरेत यावया, जखमा माझ्या पंखावरती
पण ... नाही प्रकाशित केला .
अब्दुल अहद साज यांचा शेर आठवला ,
शेर अच्छे भी कहो, सच भी कहो, कम भी कहो
दर्द की दौलते नायब को रुसवा न करो

अजया's picture

14 Dec 2014 - 8:55 pm | अजया

वा!क्या बात!!
तुमचा शेरोशायरीवर लेख वाचायला आवडेल!

अनुप ढेरे's picture

19 Dec 2014 - 10:53 am | अनुप ढेरे

ओढ नभाची कधीच विरली, उंच उंच मी उडते तरिही
नको कुणा नजरेत यावया, जखमा माझ्या पंखावरती

भारी!!

संपादकांना सांगून मूळ धाग्यात टाकाना हा शेर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Dec 2014 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार

भावना शब्दांमधे अचुक पकडल्या आहेत.
कविता फार म्हणजे फारच आवडली.

पैजारबुवा,

खटपट्या's picture

14 Dec 2014 - 9:20 am | खटपट्या

खूप छान आणि हळवी !!

होकाका's picture

14 Dec 2014 - 10:56 pm | होकाका

कविता वाचायला आवडली पण नीटशी कळली नाही...
तशा कुठल्याच कविता कळत नाहीत - आणि त्यातही गझल म्हणजे अगदीच अनाकलनीय.
ही सुद्धा त्यापैकीच एक.

उदाहरणार्थ:
१) "परतुनी आले अर्ध्यावरती" यात कोण परतून आले? 'मी' की 'नाते'? आणि का?
२) "... एका छोट्या पत्रासाठी" यात कोणत्या पत्राचा उल्लेख आहे? कोणत्या संदर्भात? आणि का?
३) "हट्ट पुरवी तू अखेरीस पण पत्ता दुसरा पत्रावरती…" कसला हट्ट? आणि दुसरा पत्ता म्हणजे? पहिला पत्ता कोणता? आणि दुसरा कोणता?
४) "ओढ नभाची कधीच विरली, उंच उंच मी उडते तरिही" .. उंच उडत असल्यावर नभाची ओढ कशी राहील?
अजूनही काही प्रश्ण आहेत. पण राहून्दे...

चुकलामाकला's picture

19 Dec 2014 - 9:21 am | चुकलामाकला

हं ! कवितेचा अर्थ प्रत्येकाचा वेगळा असू शकतो . हा माझा अर्थ
ही गझल / कविता स्त्रीच्या मनातली आहे.
१ कुठल्याही नात्याकडे पाहण्याचा दोघांचा दृष्टीकोन जर वेगळा असेल तर ते नाते फुलू शकत नाही . म्हणून नाते कुजू देण्यापेक्षा मी अर्ध्यावरून परतायचे ठरविले .
२ तू मला पत्र लिहावे म्हणून मी कितीतरी वेळा तुला विनवण्या केल्या . शेवटी तू पत्र लिहिलेस खरे , पण मला नाही तर दुसऱ्याच कुणाला .
३ कधी जपून तरी कधी मुक्तपणे तू माझ्यावर शब्द उधळत गेलास मला जरी त्या मागचा तुझा खोटेपणा कळला तरी त्यात शब्दांची काय चूक? मी त्यांच्या अर्थावर नेहमीच माया केली .
४ ज्या नात्यांना नाव नाही ओळख नाही , अशी नातीही असतात, म्हटले तर शून्यासारखी . कधी कधी त्यातून हाती काहीच लागत नाही . हे माहित होते तरीही …
५ आकाशात उडायची इच्छा आता राहिली नाही तरीही मी उंच उडते कारण खाली उतरले तर माझ्या पंखावरच्या जखमा लोकांच्या नजरेत येतील . इतरांच्या मनातील माझी आनंदी, स्वच्छंदी ही प्रतिमा मला पुसायची नाही --

अजब's picture

19 Dec 2014 - 9:52 am | अजब

क्या बात!