Four ducks in a pond
आपल्या आयुष्यात, तसे बघावयास गेले तर अगदी किरकोळ म्हणावीत, अशा काही घटना घडतात, अशी काही वाक्ये कानावर पडतात / वाचनात येतात,, काही दृष्ये बघावयास मिळतात की, जी आपल्या संपूर्ण आयुष्यात खोलवर रुतून बसतात. किरकोळ का म्हणावयाचे तर त्यांचा आपल्या नेहमीच्या जगण्याशी तसा काही संबंध नसतो. (इतर कोणी ते सगळे विसरून जाण्याचीही शक्यता असते. त्यांचे सोडा.पण) भावनाशील व्यक्तीच्या बाबतीत असे घडणे नैसर्गिक असू शकते. इथे तर्काला, विवेकाला, विचाराला वाव नसतो. कशावरून निघाले ......
१९७७ च्या ललितच्या दिवाळी अंकात माधव मनोहर यांचा एक लेख होता "एका सामुदायिक काव्यानुदाची कहाणी". एका ज्येष्ठ, अभ्यासू काव्यप्रेमीचा लेख. आमच्या सारख्यांना दिवाळीची मेजवानीच. त्यांच्या लेखातील इतर भाग सोडून मी आज "कहाणी " बद्दल सांगणार आहे. त्यांनी कुठल्यातरी एका इन्ग्रजी नाटकातील एक कविता घेतली, Four ducks in a pond. आणि आपल्या कामथ नावाच्या एका मित्राच्या सहाय्याने या कवितेचे अनुवाद मराठीतील नामवंत कवींकडून करून घेतले. कोण होते कवी ? यशवंत, गिरीश, मर्ढेकर, माडगुळकर, कांत, पु.शि. रेगे, सुर्यकांत खांडेकर, बोरकर व पोवळे. घ्या. आणखीन काय पाहिजे ? मनोहरांनी प्रत्येक कवीचा अनुवाद त्याच्या व्यक्तित्वाचे सुस्पष्ट आविष्करण कसे असते, प्रत्येक कवी आपल्या स्वभावधर्मास अनुसरून इन्ग्रजी कविता कशी वाचतो (किंवा वाचत नाही !) याचे सुरेख विवेचन केले होते. यशवंतांच्या कवितेत बदके नाहीतच पण शिवारातील गोफणवाली आहे. बोरकरांना बदकांऐवजी "राजहंस" दिसले (मनोहरांची टीप,: रोमॅंटिक कवीला बदके कोठून दिसणार, राजहंसच दिसणार !) रेग्यांना एक सारस जोडी दिसली, कांतांना दोन सारस जोड्या. सोबत कमळे आलीच. तर लेखाच्या शेवटी मूळ कविता व या कवींचे अनुवाद दिले.
झाले काय , परवा हा अंक सहज हातात आला. तुम्हाला लागली असेल अशी उत्सुकता मलाही लागली व मी लेख वाचत वाचत शेवटच्या पानावर आलो आणि लक्षात आले की अंकाची शेवटची पाने गहाळ झाली आहेत ! मूळ कविता व अनुवाद कालार्पण झाले आहेत. हळुहळु मनाशी गुणगुणावयाला लागल्यावर इन्ग्रजी कविता पूर्णपणे आठवली. अनुवाद... अर्थातच नाहीत.
आज तुमच्या समोर ही कविता आणि वहीत सापडलेला त्यावेळी एका कवीयत्रीने केलेला अनुवाद देत आहे. मिपावर अनेक कवी/कवीयत्री. आहेत माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण या सुरेख कवितेचा अनुवाद करून आमचा आनंद वाढवा.
( मी कवितेवर काहीही लिहणार नाही, त्याची गरजच नाही. येथील कवी लिहतीलच. पण तुमच्या मनात वाचतांना दाटून आलेला भाव हीच ":तुमची कविता")
Four ducks in a pond
Green grass beyond
Flowers in spring
Birds on wings
Wee little thing
To remember
With tears
For years
With tears
चार बदकांचा तळ्यातील विहार ! पलिकडला गवताळ तसा तीर !
पंख पसरून खग उडती हे भरारा ! अहा वासंतिक फुले हा फुलोरा !
बाब साधी गहिवरुनी ती स्मरावी ! साश्रुनयने चिरकाल आठवावी !
शरद
.
. .
प्रतिक्रिया
28 Nov 2014 - 12:27 pm | गवि
चार बदकांचा कालवा
दहिवराचा रंग हिरवा
अन लखलखता पारवा
उरी प्राणांत साठवा
श्वासागणिक आठवा
28 Nov 2014 - 1:48 pm | राजाभाउ
वा: फारच सुन्द्र !!
28 Nov 2014 - 2:47 pm | कवितानागेश
वाचतेय..
28 Nov 2014 - 3:46 pm | विटेकर
बदकांची पिले सुरेख | होती मिळून चार |
बगळ्यांची माळ सु-रेख | फुलली फुले अपार |
ही क्षण मौक्तिकेच चार | आणि मुक्त वन-विहार |
उगा नाही भारंभार | मजसाठी जीवन-सार |
जमलयं का ... प्राची च्या शेजारी गच्ची ?
28 Nov 2014 - 5:55 pm | तिमा
चार जण शून्यावर बाद झाले
हिरव्या गवती पीचवर
वसंतातली फुले वा
आकाशातला पक्षीविहारही
नाही रिझवु शकले
अमुचे दु:ख
अश्रुभरल्या नयनांनी
लक्षांत राहील
हा दु:खान्त
30 Nov 2014 - 10:54 am | विअर्ड विक्स
चातुर्वण्याने रंगलेली हि दुनिया
परी निसर्ग देई सर्वांस समान हि किमया
जरी आयुष्यभर दळे जातीचे दळण
अंतानंतर सारे घेती फक्त मृदेशीच शरण
30 Nov 2014 - 11:25 am | मुक्त विहारि
मला कविता करायला जमणार नाही.त्यामुळे रसग्रहण करतो...
शैशव्,ब्रह्म, प्रौढ आणि वार्धक्य हे जीवनाचे ४ टप्पे.त्यापुढे आहे तो फक्त स्वर्ग.पण तो कुणासाठी?
तर त्याच्या साठी की ज्याने आपल्या समाजासाठी आयुष्यभर अविरत आणि हसतमुखाने खस्ता खाल्ल्या आहेत.
30 Nov 2014 - 9:43 pm | राजेश घासकडवी
मर्ढेकरांनी या कवितेचं भाषांतर केलेलं होतं. सापडलं की देतो.
30 Nov 2014 - 11:22 pm | संजय क्षीरसागर
Four ducks on a pond,
A grass-bank beyond,
A blue sky of spring,
White clouds on the wing;
What a little thing
To remember for years-
To remember with tears!
1 Dec 2014 - 11:36 am | स्पंदना
चिमुकले घरटे चौघांचे
तारुण्याच्या काठावरती
निवांत पहूडल्या बाल्यांचे.
नजरेत क्षितिज रेघ
डोइवर पसरले मेघ.
प्रिती, ममत्वाचा तो पूर
आज कुठे हरवला दूर??
उरती काड्या दोघांसाठी
पिलांनी घेतली भरारी मोठी.
रित्या दिनांना भार आठवणी
सहजच तरळे डोळा पाणी
सहजच तरळे डोळा पाणी
1 Dec 2014 - 2:54 pm | पैसा
सुंदर धागा कल्पना आणि प्रतिसादातून आलेल्या कविताही! श्री संजय क्षीरसागर यांना मूळ कवितेसाठी धन्यवाद! शरद यांनी दिलेली कविता आणि ही कविता यातही सूक्ष्मसा फरक जाणवतो आहे.
1 Dec 2014 - 10:36 pm | संजय क्षीरसागर
Four ducks on a pond,
A grass-bank beyond,
शब्द साधेच आहेत पण त्यात एक रायमिंग आहे
A blue sky of spring,
White clouds on the wing;
इथे आकाश आणि अभ्रांचा सुरेख मेळ आहे.
What a little thing
या शब्दात, त्या चित्रदर्शी वर्णनाचा साधेपणा आणि तरीही त्या सहज दिसणार्या दृष्याकडे (रोजच्या धकाधकीत) होणारं (नेहेमीचं) दुर्लक्ष आहे.
आणि हा शेवट :
To remember for years-
To remember with tears!
केवळ लाजवाब आहे!
2 Dec 2014 - 11:39 am | संजय क्षीरसागर
एकटं तळं, बदकं चार,
काठ पलिकडे हिरवागार,
वसंतातले निळे आभाळ,
शुभ्र मेघ पंखावर स्वार.
गोष्ट तशी साधीशी पण :
आठव यावा सालोसाल
ओल्या पापण्या, आठवभार !
2 Dec 2014 - 12:46 pm | विअर्ड विक्स
अनुवाद आवडला… मूळ कवितेपेक्षा कंकण भरही कमी नाही .
2 Dec 2014 - 1:03 pm | संजय क्षीरसागर
वरकरणी सोपं दिसलं तरी अवघड काम आहे!