आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
26 Nov 2014 - 12:22 am

अश्याच एका आळसावलेल्या रविवारी घराच्या गॅलरीत अचानक एका अनाहूताची लगबग चालू आहे असे दिसले...

अनाहूत असला तरी त्याने पटकन भुर्रकन उडून जाऊ नये असे वाटण्याइतका तो आकर्षक होता. तरीसुद्धा या पाहुण्याची इतकी कसली गडबड चालली आहे याबद्दलही कुतूहल होतेच. म्हणून त्याला दिसणार नाही असा दरवाज्याआड उभा राहून त्याला पाहू लागलो आणि ध्यानात आले की गॅलरीतल्या टांगलेल्या एका कुंडीवर त्याने अगोदरच पथारी हक्क प्रस्थापित केला होता. त्या कुंडीतल्या रोपाच्या आधाराने त्याने बरेचसे "बिल्डिंग मटेरियल" साठवायला सुरुवातही केली होती...

.

मग घरातील सगळेच पाहुण्याला त्रास होणार नाही याची न सांगता ठरवता काळजी घेऊ लागले. जसे की, गॅलरीत जाताना दरवाजा हळुवारपणे उघडणे, चोरपावलांनी आणि अचानक हालचाली न करता आपले काम आटपून पटकन परतणे, वगैरे. पण आमचा पाहुणाही एका दिवसभरात इतका निर्ढावला होता की गॅलरीतल्या झाडांना पाणी घालणे, कपडे वाळत घालणे, इत्यादी कामे चालू असतानाही तो आमच्याकडे अजिबात लक्ष न देता आमच्या घरात, आमच्या पूर्वपरवानगीशिवाय बिल्डिंग मटेरियल जमा करणे आणि स्वतःचे बिनभाड्याचे घर बनवणे हे उद्योग चालू ठेवू लागला.

तीन-चार दिवसात बहुदा त्याच्या मनासारखे घर बांधून तयार झाले असावे. कारण त्याच्याबरोबर एक जोडीदारीण दिसू लागली. आता तुम्ही म्हणाल की जोडीदारीणच कशावरून ? कारण असे की, ती बांधकामात अजिबात सहभाग घेत नव्हती. उलट मान वाकडी करून करून ती घरट्याचे वेगवेगळ्या कोनातून बराच वेळ निरीक्षण करत असे आणि मग इथली काडी उपस, तिथली काडी उपस आणि बाहेर फेकून दे असे मात्र करत असे. आलं ध्यानात ? :)

असे अजून दोन-तीन दिवस झाल्यावर मात्र बाईसाहेबांच्या मनाप्रमाणे घर बांधून झाल्याचे दिसले...

मग दोघांचे येणे जाणे, गॅलरीचा पूर्ण ताबा आपल्याच मालकीचा आहे असा हक्क बजावणे चार-पाच दिवस चालू होते. आणि अचानक घरट्यात दोन अंडी असल्याची खबर आमच्या घरभर पसरली. कुतूहल न आवरल्याने पाहुणे आजूबाजूला नाहीत असे पाहून आम्ही शिडी लावून त्या नवागत अंड्यांचा फोटोसेशन केला...

अचानक डोक्याभोवती वेगात भिरभिर ऐकू येऊ लागली आणि अणुकुचीदार चोचींचा हल्ला होण्याअगोदर आम्ही काढता पाय घेतला !

दुसर्‍या दिवशी तसाच फोटोसेशनचा प्रयत्न केला आणि दिसले की दोन्ही अंडी गायब !...

पुढचे काही दिवस नुसती चुक् चुक् चालू होती. "नको काढायला हवे होते ते फोटो. गेले ना आता ते अंडी घेऊन." असेच वाटत राहिले. त्याबरोबरच, मनात "इतके दिवस होतो ना आम्ही आजूबाजूला. आताच कशाला इतकं घाबरायला हवं होतं?" असाही जळफळाट चालू होता. :(

चारपाच दिवसांनी अचानक कुंडीत हालचाल दिसली आणि ध्यानात आले की घरट्यात मादाम ठिय्या मांडून बसलेल्या आहेत!...

येथून पुढे आई-बाबांपैकी एक आलटून पालटून अंड्यांवर जवळ जवळ सतत बसून राहू लागले. अर्थात मागच्या अनुभवानंतर मीही फोटो काढायला घरट्याच्या जवळ जायची हिंमत करू शकलो नाही... कोण जाणे आमचे पाहुणे परत अंडी उचलून दुसरीकडे गेले तर काय ? त्यापेक्षा जरा अंतर ठेवून फोटो काढणेच बरे ! त्यासाठी मात्र त्यांनी मोठ्या आनंदाने पोझेस दिल्या...

.

असेच दहा-पंधरा दिवस गेले असतील. एकाएकी आमच्या पाहुण्यांची परत धावपळ सुरू झाली. दोघांपैकी एकजण खाणे आणून इवल्याश्या चोचीत भरवू लागले. आता कोणी जवळ आल्यास आमचे पाहुणे जरा जास्तच आक्रमक होत होते. आम्हीही घरट्याच्या फार जवळ न जाणेच पसंत केले. त्यामुळे चिमणे घास भरवण्याचे इथे देण्यासारखे फोटो मिळाले नाहीत. पण ते कौतुक बघण्याचा आनंद मात्र मनात भरून ठेवला आहे.

पुढच्या काही दिवसांत पिलांची वाढ आश्चर्यकारकरीत्या वेगात झाली. एकदा आई-वडील दोघेही एकाच वेळेस खाणे आणण्यास गेले असताना काढलेल्या खालील चित्रात ती दिसून येते...

दोन्ही पिलांनी एकमेकाच्या अंगावर अंग टाकून मस्त ताणून दिली होती. या अगोदर फक्त कोंबडीचीच पिले इतक्या जवळून पाहिली होती. पूर्वी कधीच आकाशात भरारी घेणार्‍या पक्षाच्या घरट्यातली इतकी लहान पिले पाहिली नसल्याने इवल्याश्या अंड्यांतून जन्मलेली पिले काही दिवसांतच इतकी मोठी झाल्याचे पाहणे मोठे रोमांचक होते !

दोन एक मिनिटेच हा आनंद टिकला असेल. जवळच्या झाडीतून आई-बाबा दोघेही माझ्या दिशेने झेपावले आणि मला डोक्याचा बचाव करत जलद गतीने यशस्वी माघार घ्यावी लागली. यानंतर मात्र परत असे करून पाहुण्यांना त्रास न देण्याची प्रतिज्ञा केली. परंतु पिलांना भरवण्याचा सोहळा पाहण्याचे रोजचेच व्यसन मात्र लागले होते.

अजून काही दिवस गेले असतील, एकाएकी "अरे, पिले घरट्यातून खाली उतरलीत." असा पुकारा झाला. दोन्ही पिले गॅलरीत खाली ठेवलेल्या कुंड्यातील झुडुपावर तोल सांभाळत डुलत होती...

एका झुडुपावर बसून एक पिलू डुगडुगतच आपले पंख साफ करत होते. तर आईबाबांपैकी एक गॅलरीच्या कठड्यावर बसून त्याच्यावर पहारा करत होते...

दुसरे पिलूही बाजूला वार्‍याने हलणार्‍या झुडुपावर बसून तोल सांभाळत होते...

आईबाबांपैकी दुसरा त्याच्यावर लक्ष ठेवून होता...

जरा वेळाने आईबाबांनी जवळ जाऊन पोरांना ढुशा देत उडायला भाग पाडायला सुरुवात केली...

अधून मधून मोठ्ठा आ वासून पोरे आईबाबांकडे "भूक लागलीय, खाऊ द्या" अशी मागणी करत होती आणि ती पुरीही केली जात होती...

असे बराच वेळ चालले होते. काही वेळाने जेवणासाठी गेलो आणि नंतर काही कामात गुंतून गेलो. दुपारी उशीरा परत बघायला आलो तेव्हा ते सर्व कुटुंब उडून गेले होते. त्यानंतर ते आजपर्यंत परत दिसले नाही.

अश्या तर्‍हेने आमचे हे अनाहूत पाहुणे जसे अचानक आले तसेच अचानकपणे निघून गेले. त्यांचे घरटे मात्र आम्ही तसेच ठेवले आहे... पुढच्या वर्षी आले तर ते अनाहूत नसतील. कारण आमच्या घरातली त्यांनी बांधलेली जागा सर्वानुमते त्यांच्यासाठी राखीव ठेवलेली आहे !

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Nov 2014 - 12:31 am | मुक्त विहारि

आवडला...

पुढच्यावेळी जमल्यास, वेबकॅम वापरून फोटो काढायचा प्रयत्न करून बघा.

(आयडिया गिव्हन बाय "गवि".)

अभिनंदन! छान लाईव वृत्तांत वाचल्यासारखा वाटला. घरटं तसचं ठेवायचा तुमची इच्छाही चांगली आहे. आमच्या दाराजवळच्या खोबणीत असचं घरटं केलेलं रॉबिन पक्ष्यांनी आणि नंतर ते कुंटुंब उडुन गेल्यावर कबुतरासारख्या पक्ष्यांनी त्यांच बस्तान तिथेच बसविलं होतं खूप दिवस लागले ही पिल्ल जगात यायला, ख-या अर्थाने रिसाकलिंग. पिल्लं खरचं पटकन मोठी होतात आणि त्यांना उडायला शिकताना बघायचा आनंद वेगळाच होता अगदी आपण सायकल शिकतो/शिकवतो तसे आईवडील आजुबाजुला होते :) आणि अवघ्या १-२ दिवसात ती पिल्ल उडुनही गेली :(

मधुरा देशपांडे's picture

26 Nov 2014 - 12:56 am | मधुरा देशपांडे

किती गोड आहे त्या पिल्लांचा हा प्रवास. मस्तच.

श्रीरंग_जोशी's picture

26 Nov 2014 - 1:02 am | श्रीरंग_जोशी

पुढील वर्षीच्या पाहुण्यांसाठी शुभेच्छा!!

जुइ's picture

26 Nov 2014 - 1:15 am | जुइ

वर्णन आणि छायाचित्रे!!

बहुगुणी's picture

26 Nov 2014 - 1:20 am | बहुगुणी

शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

बॅटमॅन's picture

26 Nov 2014 - 1:27 am | बॅटमॅन

आहा! एकच नंबर. :) लय आवडले.

तिथे कॅम ठेवून पाहिले तर त्यांनाही डिष्टर्ब होणार नाही आणि तुम्हीही बिनदिक्कतपणे पाहू शकाल सर्व काही.

रेवती's picture

26 Nov 2014 - 3:21 am | रेवती

वर्णन आणि फोटू आवडले.

खटपट्या's picture

26 Nov 2014 - 5:23 am | खटपट्या

मस्त फोटो आणि वर्णन !!
एकंदर तुमची गॅलेरी खूप हिरवीगार दिसतेय !!

स्वप्नज's picture

26 Nov 2014 - 7:25 am | स्वप्नज

लय भारी. पाहुणे, छोटे पाहुणे, फोटु आणि तुमचा वृत्तांत सगळेच फार आवडले आहे. आणि हो, तुमची बाग पण...

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2014 - 8:14 am | प्रभाकर पेठकर

सुंदर वर्णन आणि अप्रतिम छायाचित्र.
वाचता वाचता भावनिक गुंतणूक होऊन गेली. पक्षी उडून गेल्याने मनाला चुटपुट लागून राहिली.

प्रमोद देर्देकर's picture

26 Nov 2014 - 8:39 am | प्रमोद देर्देकर

मस्त खुप छान फोटोग्राफी. पाहुण्यांची वर्दळ लवकर आटोपली म्हाणायची. पण हा सुंदर पक्षी कोणता होता ते सांगाल काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2014 - 11:55 am | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या पाहुण्यांना बुलबुल या नावाने ओळखतात.

जयंत कुलकर्णी's picture

26 Nov 2014 - 8:49 am | जयंत कुलकर्णी

मस्त. बुलबुल फार आक्रमक असतात बर का !

पिलीयन रायडर's picture

26 Nov 2014 - 9:08 am | पिलीयन रायडर

तुमची गॅलरी फारच मस्त हिरवीगार आहे हो!!! अशा गॅलरीत पक्ष्यांनाही निवांत वाटत असेल...!
खुप छान फोटो आलेत...

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 9:14 am | टवाळ कार्टा

मस्त :)

नाखु's picture

26 Nov 2014 - 9:28 am | नाखु

घराच्या अंगणातील झाडावर सुगरणींची वसाहत वसली होती एकदा!

अजया's picture

26 Nov 2014 - 9:36 am | अजया

मस्त वर्णन!
बुलबुल माझ्याही घरचे पाहुणे आहेत.दरवर्षी एक तरी जोडी तेच घरटं वापरते.तुमच्याकडेही आता त्याच घरट्यात यायला लागतील बघा!

प्रचेतस's picture

26 Nov 2014 - 9:48 am | प्रचेतस

खूप छान लिहिलंय.
फोटोही अगदी सुस्पष्ट.

स्पंदना's picture

26 Nov 2014 - 9:58 am | स्पंदना

आम्ही बाळंतपण नाही, पण पाळणाघर चालवतो मॅगपायच्या पिल्लांसाठी.
मस्त लेख, वर्णन अन फोटो.

जेपी's picture

26 Nov 2014 - 9:59 am | जेपी

आवडल..

Madhavi_Bhave's picture

26 Nov 2014 - 10:53 am | Madhavi_Bhave

अप्रतिम!!!

अहो संगतीचा परिणाम. तुमच्यामुळे inspire होवून जग प्रदक्षिणेला गेली असणार.

बाकी !!

तीन-चार दिवसात बहुदा त्याच्या मनासारखे घर बांधून तयार झाले असावे. कारण त्याच्याबरोबर एक जोडीदारीण दिसू लागली. आता तुम्ही म्हणाल की जोडीदारीणच कशावरून ? कारण असे की, ती बांधकामात अजिबात सहभाग घेत नव्हती. उलट मान वाकडी करून करून ती घरट्याचे वेगवेगळ्या कोनातून बराच वेळ निरीक्षण करत असे आणि मग इथली काडी उपस, तिथली काडी उपस आणि बाहेर फेकून दे असे मात्र करत असे. आलं ध्यानात ?

- अगदी शालजोडीतली कोपरखळी

रुस्तम's picture

26 Nov 2014 - 11:34 am | रुस्तम

+१

सस्नेह's picture

26 Nov 2014 - 11:11 am | सस्नेह

गोड आहेत पाहुणे !
तुमची गॅलरी म्हणजे छोटंसं रानच दिसतय !

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2014 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या आवडत्या पाहुण्यांचे कौतूक केल्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांसाठी आणि वाचकांसाठी मनापासून धन्यवाद !

समीरसूर's picture

26 Nov 2014 - 11:40 am | समीरसूर

खूपच मस्त लिहिले आहे. फोटो तर एकदम झकास!!!

"भूक लागलीय, खाऊ द्या"

आपुलकीचा जो हळूवार आणि नाजूक स्पर्श आपण या अनुभवकथनाला दिला आहे तो केवळ लाजवाब!

सूड's picture

26 Nov 2014 - 11:52 am | सूड

मस्तच

राही's picture

26 Nov 2014 - 12:15 pm | राही

हिरव्यागार रंगाने खरंच डोळे निवले. वेगळाच हिरवा आहे हा रंग. वेगळ्या पर्यावरणामुळे तो इतका उठून दिसतोय का?(वायुपटल, धूळ नसणे वगैरे, कारण उदा.लद्दाख, तिबेट वगैरेच्या फोटोतला पिवळेपणा, राखाडीपणा वेगळाच दिसतो तसे. ). शिवाय 'बिल्डिंग मटीरिअल' सुद्धा 'फॉरीन'चं वाटतंय. म्हणजे पालापाचोळा, काड्या-काटक्या ओळखीच्या वाटत नाहीयेत.
फोटो जितके आवडले तितकेच वर्णनही.

जागु's picture

26 Nov 2014 - 12:15 pm | जागु

खुप छान.

आमच्या झुंबरावर वर्षातून २-३ वेळा तरी बुलबुल पिले घालतात. ह्यावर मी मागे लेखही लिहीला होता लोकसत्तामध्ये. इथेही आहे माझ्या लेखनात. बुलबुलचे नर्सिंगहोम आणि माहेरपण म्हणून.

रुस्तम's picture

26 Nov 2014 - 12:40 pm | रुस्तम

जागु आजी... सुन्दर लेख...

वेल्लाभट's picture

26 Nov 2014 - 12:23 pm | वेल्लाभट

सुंदर ! मस्त वर्णन, फोटो, दोन्ही.
मजा आली वाचायला....

पैसा's picture

26 Nov 2014 - 12:58 pm | पैसा

मस्तच!

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Nov 2014 - 1:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुम्ही, गवि, जागुताई भाग्यवान आहात बाबा.

माझ्या घरी टेरेस मधे पक्षी यावेत म्हणुन हर तर्‍हेचे उपाय करुन झाले (बुवा, बाबा, जादुटोणा, करणी, भानामती काही म्हणजे काही सोडले नाही. पण एकही पक्षी आमच्या (हिरव्यागार) टेरेस मधे फिरकत नाही.

पैजारबुवा,

कपिलमुनी's picture

26 Nov 2014 - 1:45 pm | कपिलमुनी

पाहुणे आवडले

बोका-ए-आझम's picture

26 Nov 2014 - 2:11 pm | बोका-ए-आझम

अगदी शेजारी उभं राहून सगळी स्टोरी ऐकल्यासारखं वाटलं. :)

दिपक.कुवेत's picture

26 Nov 2014 - 2:44 pm | दिपक.कुवेत

हा प्रवास आवडला आणि ते उडुन गेल्यामुळे चुट्पुट देखील लावुन गेला

स्वाती दिनेश's picture

26 Nov 2014 - 3:21 pm | स्वाती दिनेश

तुमचे पाहुणे आवडले,
स्वाती

सुधीर's picture

26 Nov 2014 - 3:34 pm | सुधीर

तुमचे पाहुणे आवडले. माझ्या खिडकीत चपातीचे तुकडे खाण्यास चिमणी, खार, बुलबुल आणि आजकाल (अधून मधून) पोपटही येतात. पण घरटं बांधण्याइतपत आडोसा नाही. चिमणीसाठी कृत्रिम घरटं करता येईल का याचा विचार करतोय. कारण काही चिमण्या बिलकूल घाबरत नाहीत. जणू रुळावल्यात आणि हक्काने चिवचिवाट करून खायला तांदूळ नाहीतर चपातीचे तुकडे टाकायला सांगतात.

मजा आली!

एस's picture

26 Nov 2014 - 3:38 pm | एस

आम्ही पक्षीछायाचित्रणात एक बंधन काटेकोरपणे, अगदी निक्षून पाळतो, तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आणि कितीही मोह झाला तरी 'नेस्ट फोटोग्राफी' टाळणे. कितीही मोठी एक्स्ट्रीम टेलिफोटो लेन्स असली, आणि घरट्यापासून आपण कितीही दूर असलो, पक्षी तिथे नाहीयेत असं वाटत असलं, तरी त्यांच्या घरट्यांचे छायाचित्रण करायचे नाही. विणीच्या हंगामात पक्ष्यांवर पिले वाढवण्याचा, जोपासण्याचा आणि त्यांचे रक्षण करण्याचा एवढा ताण असतो की त्यात आपल्या हौशीमुळे भर पडायला नको. त्यामुळेच बहुतांशी वन्यछायाचित्रण फोरम इ. हे बर्ड नेस्ट फोटोग्राफीवर त्यांच्या फोरमवर बंदी घालतात. उदा. 'सॅन्क्च्युअरी एशिया', 'इंडियन बर्ड्स्' इ. यावरील अधिक माहिती आंतरजालावर मिळू शकेल.

बर्ड नेस्ट फोटोग्राफी करण्यासाठी एक तर तुम्ही स्वतः त्यातील निष्णात छायाचित्रकार आणि पक्षितज्ञ असले पाहिजेत आणि दुसरे म्हणजे तुमच्या अभ्यासाचा नेस्ट फोटोग्राफी हा एक अत्यावश्यक भाग असायला हवा. या दोन निकषांवर बसत असेल तरच नेस्ट फोटोग्राफी करावी. त्यासाठी सुरक्षिततेचे वगैरे काही एथिक्स आहेत, ते पाळायला हवेत.

इए आणि गवि, आपण सर्व काळजी घेऊनच छायाचित्रण केले असणार हा विश्वास आहेच, तरीपण कुणा हौश्यागवश्याकडून अतिउत्साहाच्या भरात पक्ष्यांच्या विणीला अनभिज्ञपणे का होईना, नुकसान पोहोचू नये ही भीती आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नये (तुम्ही नाही घेणार, पण इतरांसाठी! ;-) ), आपुलकीने सांगतो आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Nov 2014 - 3:58 pm | अत्रुप्त आत्मा

@पुढच्या वर्षी आले तर ते अनाहूत नसतील. कारण आमच्या घरातली त्यांनी बांधलेली जागा सर्वानुमते त्यांच्यासाठी राखीव ठेवलेली आहे !>>> http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif

चिगो's picture

26 Nov 2014 - 4:56 pm | चिगो

हे असे अनाहुत पाहुणे घरात येणे, म्हणजे अत्यंत आनंदाची बाब.. खुपच सुंदर वर्णन आणि फोटोग्राफी..

मोहनराव's picture

26 Nov 2014 - 7:02 pm | मोहनराव

एकदम छान लेख..

प्रदीप's picture

26 Nov 2014 - 7:31 pm | प्रदीप

तुमच्या इतर सर्वच लेखनाप्रमाणे हा लेखही अप्रतिम. तो फोटोंसकट अतिशय आवडला.

गणेशा's picture

26 Nov 2014 - 7:46 pm | गणेशा

अतिशय सुंदर धागा.. वाचत अनुभवत रहावा असा..

आणि खालील वर्णन पण मस्त

जोडीदारीणच कशावरून ? कारण असे की, ती बांधकामात अजिबात सहभाग घेत नव्हती. उलट मान वाकडी करून करून ती घरट्याचे वेगवेगळ्या कोनातून बराच वेळ निरीक्षण करत असे आणि मग इथली काडी उपस, तिथली काडी उपस आणि बाहेर फेकून दे असे मात्र करत असे. आलं ध्यानात ?

अतिशय सुंदर लेख. फोटो पाहून डोळे निवले. बुलबुलला मकोयची फळं फार म्हंजे फार आवडतात. वाट्याण्याएवढी काळ्या द्राक्षा सारखी दिसतात. मकोय कुंडीत लावू शकता. आमच्याकडे गाणं गातगात फळं खातात. किसमीस सुद्धा त्यांचं लैच फेवरेट. हा लेख २०१४चा आहे. अजुनही येतात काहो बुलबुल?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2016 - 5:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

२०१५ साली एक जोडी फेरी मारून गेली, पण अंडी घातली नाही. २०१६ मध्ये तर कोणीच आले नाही :(

सानझरी's picture

11 Aug 2016 - 5:48 pm | सानझरी

ओह :( किसमीस टाकुन ठेवत जा. त्यांना पता लागतो बरोबर. येतील परत.

झेन's picture

11 Aug 2016 - 7:56 pm | झेन

फोटो आणि वर्णन मस्तच. आमच्याकडे बुलबुल आणि सनबर्ड नियमित घरटे करतात पण सर्व बाजूनी झाकले जाईल असे बघतात तस्मात त्यांना त्रास होऊ नये म्हणून नो फोटो सेशन, फक्त अनाहूत मांजरांना सारखे हाकलावे लागते.

शान्तिप्रिय's picture

16 Aug 2016 - 7:07 pm | शान्तिप्रिय

सुहास सर अतिशय सुन्दर फोटोज.
एक तर तुम्ही भाग्यवान आहात की अशा पक्षान्च्या पोज मिळाल्या.
शिवाय तुम्ही निष्णात अमेच्युअर फोटोग्राफर आहात.

पिशी अबोली's picture

24 Jul 2017 - 10:52 pm | पिशी अबोली

खूप सुंदर लेख. राहिला होता वाचायचा..