देढ इश्कीयां अर्थात दोन बायकांचा दादला अजून कुंवारा!

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
13 Nov 2014 - 9:13 am

पाच अंकी आधारित राजकीय नाटक
अंक १ प्रवेश १

फ़्लॆश फ़ॊरवर्ड...
वाड्यामधील दिवाणखान्यात, डुगडुगत्या खुर्चीवर देवाजी एकटाच बसला आहे. लग्नाचे व-हाड घेऊन इथे आलो होतो. आणि दोन बायांचा तमाशा पहावा लागला. माझी आज ना...ती, ना...ही अशी स्थिती झाली आहे.......... देवाजीच्या नजरेसमोर घटनापट उलगडत होता....

मुंबईतील वाड्यामधे नरुभाऊंच्या कुटुंबातील कोणी निवास करून एकोणीस वर्षे होऊन गेली. देवाजी आता खरे तर घोडनवरा झाला होता. आज इतक्या वर्षांनी मुंबईमधल्या आलीशान वाड्यात घर बसवायचा चानस आला होता. नरुभाऊंना हर्षाच्या उकळ्या फ़ुटत होत्या. इतके वर्षांच्या आशा पूर्ण होणार, मुलगा मुंबईत राज करणार.. नरुभाऊंची मुंबईच्या ठकूशी चांगली मैत्री होती. तिलाच देवाजीची नवरी बनवू आणि दोघे जण सुखी संसार थाटतील अशी स्वप्ने नरुभाऊ पाहू लागले होते. त्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांनी ठकूच्या मातोश्रींबरोबर लग्नाची बोलणी केली. पण मातोश्री कसल्या खट! त्यांनी नरुभाऊंना शेवटपर्यंत टोलावितच ठेवले. आपल्या मनाचा थांगपत्ता देखील लागू न देता ठकूचे लग्न नरुभाऊंच्या कुटुंबात होण्यासाठी एक एक हुच्च अटी मातोश्री घालू लागल्या. काय तर म्हणे मुंबईतल्या वाड्यात निदान दहा खोल्या तरी ठकूच्या नातेवाईकांना दिल्या पाहिजेत, खेरीज नरुभाऊंच्या दिल्लीतल्या वाड्यात देखील तीन चार खोल्या ठेवल्या पाहिजेत. एक ना दोन. आणि नरुभाऊंच्या नात्यातल्या एकोजींशी ठकूची सोयरिक व्हावी असेही मातोश्रींच्या मनात होते. त्या सगळ्या अटी ऐकूनच नरुभाऊंचा पारा चढला. पण नरुभाऊ संयमी होते. मातोश्रींबरोबर नाही म्हटले तरी गेले वीस पंचवीस वर्षे चांगले कौटुंबिक नाते तयार झाले होते. त्यामुळे लग्नातील बोलण्यांमधे मातोश्रींना कोणीही दुखाऊ नये असा हुकूमच त्यांनी मुलाकडच्या व-हाडाला दिला. त्याचबरोबर मातोश्रींच्या अवास्तव मागण्यांना काही न बोलूनच बाहेरचा रस्ता दाखविण्याचा सुज्ञपणा नरुभाऊंनी दाखविला.

पण संयमी नरुभाऊंना मनातून मात्र मातोश्रींचा रागच आला होता. इतके वर्षांचे घट्ट नाते विसरून आज मातोश्री एखाद्या बाजारू कोठेवालीसारखी वागत होती. ठकूला नरुभाऊंच्या कुटुंबात विकायला निघाली होती. अरे, काही न मागता मुलगी दिली असती तर ठकूला आम्ही काहीच कमी पडू दिले नसते. पण विश्वास ठेवायला हवा ना या बाईने! अजून लग्न झालेही नाही आणि हिच्या मागण्या सुरू! आणि नाथाला बाशिंग बांधायचे की देवाजीला, ते आमचे आम्ही ठरवू नां! ही कोण लागून गेलीय? स्वत:ला मुंबईची राणीच समजते की काय? नरुभाऊंनी मनातल्या मनात सगळा बेत रचला. त्यांनी देवाजीला सांगितले, ते लग्नाबिग्नाचे नंतर पाहू. तू आधी मुंबईच्या वाड्यात रहायला जा कसा!

देवाजीने मुंबईच्या वाड्यात मुक्काम हलविला. ठकूचा पारा एकदम ११० पर्यंत चढला. ताप चढल्यासारखी ती बरळू लागली. हा नागपूरचा देवाजी मुंबईत काय टिकतोय! एक दिवस मुंबईचा आलिशान वाडा विकून नक्कीच तो स्वतंत्र घर नागपुरात बांधेल. आणि ह्या नरुभाऊच्या बापामधे तरी एकट्याच्या जीवावर मुंबईत वस्ती करण्याची ताकद होती कां? मातोश्रींचा पाठिंबा नसता, तर ह्या न-याला विचारतोय कोण मुंबईत! ठकूने असे आकांडतांडव चालविले. पण नरुभाऊंनी एकही अपशब्द ठकू विरुद्ध उच्चारला नाही की व-हाडाला उच्चारू दिला. आपल्याला जे करायचे ते ते शांतपणे करत राहिले.

नविन वाडा सजून तयार होता. नरुभाऊंनी देवाजीला सांगितले, आज लग्न लावूनच टाक. तुझ्या सारख्या देखण्या वराने मुलींचे नखरे मुळीच चालवून घेऊ नये! मातोश्री अजूनही नरुभाऊ आपल्याच घराण्याशी सोयरिक करतील ह्या भ्रमात होत्या. पण जसेजसे दिवस निष्फ़ळ जाऊ लागले, तशी ठकू उताविळ होत चालली. मग, मुंबईतल्या वाड्यात खोली नाही दिली तरी, निदान दिल्लीत दोन खोल्या द्याव्या इतपर्यंत खाली उतरली. नरुभाऊ कसले खट! उद्धट ठकूला धडा शिकवायचाच त्यांनी निर्धार केला होता. मुंबईतल्या वाड्यात एकही खोली त्यांनी ठकूला दिली नाहीच, पण मातोश्रींच्या परभारेच दिल्लीत मातोश्रींच्या जाऊबाई प्रभाताईंना एक आलिशान बंगलाच देऊन टाकला. आधीच मातोश्रींचे जाऊबाई प्रभाताईंशी वाकडे होतेच. आता वर नरुभाऊंनी मातोश्रींच्या ठेचल्या नाकावर मिरच्याच वाटून लावल्यासारखे झाले. ठकूने जाहीरच करून टाकले, मी काही झाले तरी व-हाडाच्या देवाजीशी सोयरिक करणार नाही!

हा सगळा खेळ पाहून शारदाबाई पुढे सरसारवल्या. एक वाईट चालीची बाई म्हणून नरुभाऊंनीच मागे एकदा त्यांना हिणाविले होते. आता त्या अपमानाचा बदला घेण्याची संधी होती. शारदाबाईंनी मानभावीपणे सांगितले, मी तर बाई देवाजीला साथ द्यायला तयार आहे. वाईट चालीची बायको कशी करायची ह्याची त्याला भिती असेल तर बाहेरची म्हणून रहायला देखील मी तयार आहे. देवाजीच्या आधी मुंबईच्या वाड्यात वस्तीला असलेल्या माणिकबाई ठकार आता ह्या दोन्ही बायका देवाजीला कशा नाचिवणार ह्याची आतुरतेने वाट पाहू लागली.

लोक सगळा तमाशा पहात होते. देवाजीचे लग्न संधीसाधू ठकूशी होते, की बाहेरवालीशी संबंध ठेवून तो वाड्यात रहाणार?

नात्यांचा असा विचित्र तमाशा लग्नाच्या दिवशी जगाने पाहिला. आज बाहेरवालीने तिच्या कलंकित पदराचा बोळा डुगडुगत्या खुर्चीला टेकू म्हणून लावला आणि स्थिर वाटणा-या खुर्चीत देवाजी बाशिंग बांधून एकटाच बसला होता.........

..........................

अंक १ प्रवेश २

ठकू आणि शारदाबाई एकमेकींना बिलगून बसल्या आहेत. पानाचा विडा ठकूच्या तोंडात घालीत शारदाबाई म्हणाली.. “मारे देवाजी फ़ड अन विस चाळीस व-हाडाबरोबर बाशिंग बांधून आला होता! फ़ाटक्या तोंडाने मला वाईट चालीची म्हणत होता! आता बघ म्हणा कसा नाचविते त्याला!”
पचकन पानाची पिंक टाकीत ठकू चिडचिडली.. “मला पाहिजे असलेली एकही भेट न देता फ़ुकटातच बायको करून घ्यायला निघाला होता बत्ताशा.. आता बघ म्हणा विदर्भी मिरचीचा ठेचा करून तोंडात कोंबते की नाय त्याच्या!”
“तू ठ्येचा कोंब, वरून मी धरणात साठविलेले पेशल पानी ओततो तेच्या तोंडात....” शारदाबाई डोळा मारीत म्हणल्या.
“वाह! ती युती नाही झाली तरी आपली जंम्माडी जंमत युती रंगणार तर!” शारदाबाईला जवळ ओढीत ठकू म्हणाली....

पडदा.........

राजकारणमाध्यमवेध

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

13 Nov 2014 - 9:25 am | श्रीरंग_जोशी

काय लिवलंय, काय लिवलंय.

शीघ्रनाट्य जबरी जमलंय.

पुभाप्र.

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2014 - 9:52 am | बोका-ए-आझम

इमानदारीत जमलेला प्रकार आहे! मातोश्रीचा २४ वर्षांचा पोरगा नाही दिसून राहिला कुठे! पुढे येऊन राहणार का?

अरुण मनोहर's picture

13 Nov 2014 - 10:11 am | अरुण मनोहर

बोका महाराज, प्रवेश ३ तुमीच लिहून पोराला बी मलाई खाऊ घाला की!

जेपी's picture

13 Nov 2014 - 10:09 am | जेपी

=))

आनन्दा's picture

13 Nov 2014 - 10:57 am | आनन्दा

मस्त मस्त

चिगो's picture

13 Nov 2014 - 3:45 pm | चिगो

अरेच्चा.. डायरेक्ट पडदा? अहो, रंगवा की वग जरा..

पडदा नाहीतर काय ? तुमाला अजून काय कांय पहायचे होते हां ? ;)

दुसरा प्रवेश लैच आवडला !! =))))

स्पंदना's picture

14 Nov 2014 - 5:01 am | स्पंदना

मुक्त विहारि's picture

14 Nov 2014 - 6:28 am | मुक्त विहारि

शरदाच्या चांदण्यांत सगळेच न्हावून निघाले...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Nov 2014 - 8:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=)) एवढेचं म्हणतो.

स्वामी संकेतानंद's picture

14 Nov 2014 - 9:02 am | स्वामी संकेतानंद

=))

पगला गजोधर's picture

14 Nov 2014 - 9:22 am | पगला गजोधर

गोष्ट लिहिण्याच्या पद्धतीमुळे (रूपकांचा वापर), गोष्ट आवडली.

प्रीत-मोहर's picture

14 Nov 2014 - 9:45 am | प्रीत-मोहर

मस्त मस्त अरुण काका. अजुन येउद्यात की.

वाईट चालीची बायको कशी करायची ह्याची त्याला भिती असेल तर बाहेरची म्हणून रहायला देखील मी तयार आहे.
आरारा... *LOL*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }

अत्रुप्त आत्मा's picture

15 Nov 2014 - 6:11 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

पैसा's picture

14 Nov 2014 - 10:05 am | पैसा

दोन बैका फजिती ऐका!

बर्‍याच दिवसांनी कालपरवा एका काकांकडून ऐकलेली ही म्हण आठवली भाजपचं वागणं पाहून. ;)

अजया's picture

15 Nov 2014 - 5:23 pm | अजया

=))