पिंपळ (रहस्य कथा) - भाग २

खोंड's picture
खोंड in जनातलं, मनातलं
26 Oct 2014 - 3:46 pm

pimpal

मगिल भागः
पिंपळ (रहस्य कथा) - भाग १

"कोण पाव्हणं म्हणायचा … " जड आवाजात पहिला प्रश्न पडला.
"मी …. " एवढं बोलून तो थांबला.

आलेल्या व्यक्ती कडे निरखून पाहू लागला
६ फुट उंच. वजनदार. पहिलवानाला साजेल अशी शरीरयष्टी. पिळदार मिशा. अंगात बंडी. गूढग्या पर्यंत धोतर. हातात काठी.
"काय नाव … ?" यशवंत उर्फ येशा म्हणाला.
ताम्भाखुचा बार भरला. हातावरचा कचरा झटकत म्हणाला …
"आप्पा… आप्पा बारवकर !!"
"आप्पा बारवकर !!! कुणाकड"
"मी … नवीन मास्तर आहे … ह्या गावात … "
"हं … म्हंजी सरकारला शेवटी माणूस घावला म्हणायचा… "
"शेवटी म्हणजे … "
"५ वर्ष झाली शाळा बंद पडून … "
"मागचे मास्तर ?"
"ते गेले … रंभा उर्वशी ची शिकवणी घ्यायला … " वर डोळे करत येशा बोलला
मास्तर गप्प बसले. "आपण ?"
"मी येशा …अण्णा पाटलांचा गडी" ट्रंक उचलत येशा बोलला. "मुक्काम कुठ ?"
"चव्हाण वाडा … "
"आं … व्हय व्हय … आधीचे सगळे मास्तर तिकडच रहायचे … "
"गावात कुणी दिसत नाही ?"
येशा गप्प.
ह्यो पाटलाचा वाडा. हितून उजवीकड शाळा. चला डावीकडं.
ह्यो रंभा नर्तकीचा वाडा. आमचा आजा सांगायचा काय देखणी बाई होती. उंच. गोरी पान. अंगावारचा प्रत्येक घाट आन वळण आखीव रेखीव. लांब नाक. महीरपि व्हाट. रुपया येवढ मोठं डोळ अन त्यात काळ्या सागारगोटया. कपाळावर चंद्रकोर. पोशाख नेहमी खानदानी. रसत्यानी चालली कि तिच्या गोऱ्या पाठीकड बघत राहायचे लोक. आजा सांगायचा. "आवंढा गिळत येशा बोलला. पण अज्यानी ह्या वाड्याकड कधी येऊ दिलं नाय. एकदाच आलो होतो तर आज्यांनी चांगलीच कातडी सोल्टावली. काय माहित पण नंतर एकदा बी गेलो न्हाय तिकडं.
"आप्पा मास्तर !! तुम्हीबी रंभीच्या वाड्याकड कधी जाऊ नका ". येशा गूढ आणि वाजवीपेक्षा जास्त जड आवाजात म्हणाला. मास्तर काहीच बोलले नाहीत.
अन समोर ह्यो चव्हाण वाडा.
"उद्या शाळेत जायच्या आधी अण्णाना भेटीन म्हणतो " कुलूप उघडत मास्तर म्हणाले.
मागे वळून पहिल तर कुणीच नवत. मास्तर परत दरवाजाकडे वळाले ट्रंक उचलायला वाकले. ट्रंक उचलून उभे राहिले तर येशा समोर. "वाईच धार मारत होतो… निघतो " म्हणून येशा अंधारातून गडप झाला.
उजाडलं तसं गावात किलकिलाट सुरु झाला.
'देवपिंपळे' गाव तसं डोंगराच्या पायथ्याशी. दक्षिण म्हणजे पिंपळाकडची बाजू सोडली तर तिन्ही बाजूला डोंगर. गावात यायला दक्षिणेकडून रस्ता.
सगळीकडे धुक्याची दुलई.
पूर्वेकड डोंगर असल्या मूळ सुर्य देवाचे दर्शन व्हायला ८ वाजायचे.
हळू हळू सुर्य वर येऊ लागला कि धुक्याचं पांघरून पाण्यात मीठ विरघळाव तस विरघळायच. पिंपळाची सोनेरी पानं सूर्यकिरणांनी अजूनच सोनेरी दिसत. त्याच पिंपळावर पिढ्या अन पिढ्या वस्तीला असलेल्या विविध पक्ष्यांची घर होती. गाव डोंगरात जरी असलं तरी रचनात्मक होतं. पिंपळापासून जाणारा रस्ता एखाद्या विळ्याच्या वळणाप्रमाणे वळण घेऊन गावात लागायचा तेवढंच काय ते वळण . बाकी सगळे काटकोनी रस्ते.
सरळ गेलं कि मध्य भागी चावड. चावडीवर एक खुजा वड. त्याभोवती चौरस पार. चावड म्हणजे गावाचा मुख्य चौक होता. प्रशस्त चौक. गावातले लहान मोठे सगळे कार्यक्रम इथेच व्हायचे. चावडीच्या मागच्या अंगाला चौकातच एक छोटं पण अतिशय सुंदर 'पिंपळेश्वर' शंकराचं मंदिर होतं. दगडी बांधकाम आणि रेखीवकाम. नंदी पर्यंत जायला ३० पायऱ्या. नंदी जवळ उभं राहिलं कि एखाद्या मंचा प्रमाणे वाटत असे. मंदिराला सोन्याचा कळस होता. सूर्यकिरणे पडली कि त्याचं पिवळसर प्रतिबिंब चावडीवर पडे.
चौकात एक मारुती कुदळ्याचं चहाचं दुकान. दुकान त्याचा पोरगा नवनाथ चालवत असे. अंगाने एकदम कृश. अंगात पिवळसर सदर आणि काळी विजार. सदरयाच्या बाह्या कोपरा पर्यंत दुमडलेल्या. चेहरा अमसुलासारखा लालसर काळा. आणि नाकाखाली छोटीशी मिशी. सिनेमात चिटकवावी अशी. तोंडात कायम मावा आणि शिव्या कायम. नवनाथ तसा बी ए पास. तालुक्याला कॉलेजात शिकलेला पण बेरोजगार म्हणून मग बापाने
पिढीजात धंदा त्याच्या गळ्यात मारला. त्याच्या दुकानावर नाही तर चावडीवर रमेश सुतार,बबन पवार आणि कुशल माने हे सुशिक्षित बेरोजगार सदैव पडीत असत. नवनाथ उर्फ नाथा आणि हे तिघं जिगरी दोस्त. नाथाच्या दुकानाशेजारी जगन्नाथ न्हाव्ह्याचं दुकान.
नाथाच्या दुकानच्या समोरच्या बाजूला अण्णा पाटलाचा लाकडी वाडा होता. वाड्याला माडी होती. वाड्याशेजरून एक कच्चा रस्ता सरळ एका टेकडीवर जात असे. तिथे २ खोल्यांची शाळा होती.
चावडीवरून डावीकड गेलं कि बामन वाडा. तिथ कुलकर्णी बामन आणि त्याची पोर पार्वती राहत असे. कुलकर्णी भट 'पिंपळेश्वराची' देखरेख करायचा. आणि नाथा त्याच्या पोरीची म्हणजे पार्वतीची देखरेख करीत असे. दोघं तालुक्याला एकाचं कॉलेजात होते.
तिथूनच थोडं पुढे चव्हाण वाडा आणि त्या समोर रम्भीचा वाडा.

गावाच्या उत्तरेकडील टोकाला गावाचे सरपंच "रंगराव इनामदार" राहत होते. रंगराव आणि अण्णा पाटलांची पारंपारिक दुष्मनी होती. त्यामुळे गावात दोन गट पडले होते.
नाथा, त्याचा बाप, रमेश सुतार, बबन पवार हे पाटलांच्या गटातले.
सरपंचांचा गट निराळा होता. मारुती कुदळेचा चुलतभाऊ गणपत कुदळे हा सरपंचाच्या गटातला. दोघं चुलत भावांमध्ये नेहमी ठिणग्या पडायच्या. दोघांची शेतं शेजारी शेजारी.
विहिरीवर आळीपाळीने पाणी धरायचा हक्क त्यावरूनही यांच्यात नेहमीच वाद होत असे.

"नाथ्या !! … " येशा हाका मारीत आला.
नाथ्यान पिचकारी मारली "बोल कि … भाड्या "
"आप्पा मास्तर आलं होतं का ? …. चा प्यायला "
"आं … कोण मास्तर ?" त्रासिक चेहऱ्याने नाथा बोलला
"म्हंजी नाय आलं वाटत । आर गावात नवीन मास्तर आलाय… वाड्याव येणार होते सकाळी… आले नाय… म्हटलं तुझ्या हितच चा मारला का काय ?"
"न्हाय बा… गेलं आसल बेणं … त्या रंग्या कड " जोरात पिचकारी मारत तो बोलला.
"च्यायला ह्या रंगरावाच्या … जाऊदे चल चा पाज एक कडक … "
"रामराम । !! नाथ्या चहा पाठव दुकानावर… " जग्या न्हावी दुकान उघडायला आला.
"कुठ आई घालत होता रं … चल लौकर दाढी मार… तालुक्याला जायचय… सामान आणायला … "
"सामान आणायला जायचंय का सामानाला घेऊन जायचंय " जग्या खवचटपणा करत म्हणाला
"हळू बोल … सासरा मंदिरात असाल … "
"च्यायला हे भटूरडं रातच्याला घरी जातं का न्हाय " येशा
"जातं कि … कव्हा कव्हा इथंच रहातं " नाथा
"लेका बरं हाय कि तुला… त्यो हिथ शंकराची पूजा करत आसल … आणि तू तिथ पार्वती … "
"जग्या … लायकीत राहून बोलायचा … माजला काय भेन्चोद …"
एकंदरीतच जग्या नाथा वर जळत असावा असा अंदाज येशाला आला
"चल निघतो म्या… शाळेतच गाठ घेईन मास्तरांची … "
नाथा दाढीला बसला.
समोर तीन मोठे आरसे एका शेजारी एक असे फोटो लावतात तसे भिंतीला तिरपे टांगलेले.
लाकडाची लांबलचक टेबले कम फळी. त्या समोर ३ लाकडी खुर्च्या.
खुर्च्यान मागे दोन लाकडी बाकं.
त्याचा रेडीअम चा जोड धंदा असल्यान सगळ्या बाकांवर आणि टेबलावर रेडीअम चे रंगीबेरंगी तुकडे चिकटवलेले.
उजव्या कोपऱ्यात वर शंकराचा फोटो. त्या शेजारी नवनाथ म्हणजे देव नवनाथ. धुपाचा सुगंध दरवळत होता. रेडीओ वर मराठी भावगीतं हळू आवाजात वाजत होती.
सकाळच्या सूर्याची किरण दरवाजावरील गजांमधून कवडसे पाडत होती.
रम्या, बब्या आणि कुशा बाकावर येऊन बसले.
"३ चहा पाठव रे " नाथा खुर्चीतूनच आरडला.
"गावात नवीन मास्तर आलाय म्हण " कुश्या
"तुला कोण बोलला? … म्हंजी सरपंचाकडच गेलं होतं म्हणायचं बेणं " नाथा
कुशा तसा सरपंचाच्या गटातला पण चौघं लहान पणा पासून चे मैतर. नाथाचा चुलता आणि कुशाचा बा दोघं पण जिगरीचे दोस्त. मांडीला मांडी लाऊन घरं दोघांची.
"अरं येशा भेटला. त्यो विचारात होता. चव्हाण वाड्यावर उतरलाय वाटतं"
"केली का काशी !!" नाथा
"काय झालं रं " रम्या
"गोची झाली ना … वहिनींना कसा भेटणार आपला दोस्त… इतका दिवस तिन्ही वाडे दिवसभर खाली असायचे "
फटफटीचा आवाज आला. फटफट करीत सरपंचानी गाडी थांबवली. पिवळसर सोनेरी रेशिमचा सदरा. पायात सफेद सलवार, डोक्यावर सफेद लोकरी टोपी. "ए नाथ्या… तुझ्या बा ला सांग … संध्याकाळी मीटिंग हाये … काय एकदाच्या काय ते वाटण्या होऊन दे . कुशा दोस्ताला समजाव जरा आण गणपत ला बी सांग "
वाटन्यांची भांडणं घेऊन गणपत सरपंचाकड गेला होता. गणपत कुदळे तसा स्वभावानं गरीब. त्याच्या भावानं म्हणजे मारत्यान चौकातला दुकान आणि घर बळकावल होत आणि आता शेतीच्या वाटण्यामध्ये हरामखोरी करत होता. विहीर संपूर्ण बळकावण्याचा त्याचा डाव होता जेणे करून गणपत ला शेतीला पाणी मिळू नये.

"विहीर न्हाय मिळणार. " मारुती ओरडला.
"विहिरीवर आधी प्रमाने अर्धा हक्क गणपतचा राहणारच" पाटील
"सरपंच, ह्यांना सांगा … म्हनाव दिली न्हाय तर ओरबाडून घेऊ" मारुती
"विहीर गणपत च्या नावावर आहे कुणाच्या …त येवढा दम आहे तेच बघतो" सरपंच
"रंगराव … हे लय महागात जाईल तुम्हाला … " नाथा
"ए नाथ्या… गप जरा … आर कुण्हा म्होर बोलतोय काय कळता का … " कुशाने डाफरल
"ते काय कळत न्हाय मला… आता त्या वावरात विहिरीचं पाणी तरी सांडल नाही तर रक्त तरी सांडल "
"जीव गेला तरी विहीर सोडणार न्हाय … " गणपत
बोलणी फिस्कटली.
शेवटी आता जशा पाळ्या चालू आहेत तशा चालू द्याव्या हा तोडगा निघाला. गणपतला ४ तर मारुतीला ३ दिवस.
मारुती आणि नाथा रागात निघून गेले. रंगराव आणि मंडळी पण गेली.
कुणाची तरी नजर बाजूला गेली दगडावर बसून कुणी तरी अंधारात बिडी मारत होतं
"कोण मास्तर … जवळ जात येशा बोलला … तिकडं का अंधारात बसलाय … "
"नाही इथेच बरा आहे मी… भांडण तंटा सहन नाही होत … "
"कोण आहे, मास्तर ?" पाटील
"सकाळी वाड्यावर यायला पाय तुटल होत का तुमचं ?"
मास्तर उठून उभे राहिले थोडे पुढे सरकले. बत्तीचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडला.
"ते ते … जरा … "
"त त प प काय करता ?" डोळे वटारत पाटील बोलले.
"ते … ऊशीर होतोय … " आप्पा मास्तर सटकले.

सोमवारचा दिवस असाच गेला. मंगळवारी संध्याकाळी गणपत मारुतीच्या घरी गेला.
"आज तुझी पाळी आहे तर पाणी देऊन घे. उद्या मला गव्हाला पाणी सोडायचंय.
"मी मला पायजे तव्हा पाणी देईन… तू कोण अडवणार … "
"ते मला माहित नाही… उद्या माझी बारी हाये एवढंच सांगायला आलतो" अस म्हणून तो मागं फिरला.

दुसऱ्या दिवशी गणपत संध्याकाळ पासून चावडीवर बसून होता. दिवसभर लाईट गेलेली असल्यानं त्याची चलबिचल होत होती.
एवढ्यात नाथा त्य्याच्या दुचाकीवरून आला. गणपत ला चावडीवर बघून मुद्दाम मोठ्यानं बोलला "बा !! तालुक्यावरून काय आणलाय बघ "
"हत्यार हाये …" म्हणत पिशवीतून एक कोयता बाहेर काढला. "एक घाव टाकला कि माणूस खल्लास."
गणपतने कानाडोळा केला.
लाईट येईपर्यंत जेऊन याव म्हणून गणपत परत घरी गेला.
रात्री ११ च्या सुमाराला लाईट आली.
गणपत शेतावर निघाला. गावातल्या सगळ्यांच्या शेतावर जायचा रस्ता पिंपळा वरून जात होता. पिंपळ ओलांडला कि ५ वं शेत गणपत च.
गणपतला जाऊन तास झाला नसेल तोच भटजी देवळात आले. बहुतेक आज मुक्काम असावा.
त्याबरोबर नाथा घराबाहेर पडला. सगळ्यांची नजर चुकवून अंधारात मांजराच्या पावलांनी चव्हाण वाड्याच्या दिशेने निघाला. चव्हाण वाड्या जवळ पोचताच त्याने दिशा बदलली आणि मधल्या रसत्याने पिंपळाकड निघाला… १-२ तासांनी तो घामाघूम होऊन परत आला आणि गुपचूप दाराला कडी लावत घरात गेला.

सकाळ झाली. ६ वाजले असतील. अंधुक प्रकाश पडला होता. गावात बम्बाच्या धुराचे लोट निघत होते. धूर आणि धुकं यांचा आपापला करडा रंग मिसळून एक नवीन करडा रंग बनत होता .
सकाळी सुतारकामाच सामान आणायला तालुक्याला जायचं म्हणून रमेश निघाला होता. सकाळच्या अंधुक प्रकाशात आणि धुक्यात पिंपळ भयावह दिसत होता. थंडीचे दिवस असल्या मुळ हवेत गारवाही खूप होता. धुक्यामध्ये पिंपळाला पारंब्या फुटल्याचा भास होत होता. जसा पिंपळ जवळ येत गेला तशी रमेश च्या पायाखालची जमीन सरकली. पिंपळाला लटकणारी ती पारंबी न्हवती तर.
अंगातून वीज जावी तशी रमेशची अवस्था झाली. पाय लटपट कापू लागले. तसाच धावत पळत तो चावडीवर गेला.
चावडीवर एव्हाना जग्या येशा आणि नाथा होते. रमेश रडत रडतच आला. "आर … आर … " त्याच्या तोंडातून शब्द फुटना.
"आर …गणपत कुदळे नि पिंपळाला फास घेतला रं …" रमेश जमिनीवर गुढगे टेकून बसला.

कथा

प्रतिक्रिया

जेपी's picture

26 Oct 2014 - 3:53 pm | जेपी

हम्म....
पुभाप्र

तुषार काळभोर's picture

26 Oct 2014 - 4:05 pm | तुषार काळभोर

इंट्रेश्टिंग आहे.

कवितानागेश's picture

26 Oct 2014 - 4:53 pm | कवितानागेश

अरे बापरे

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2014 - 8:28 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र.

एस's picture

26 Oct 2014 - 10:33 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

सस्नेह's picture

27 Oct 2014 - 12:30 pm | सस्नेह

ग्रामीण बाज अगदी तंतोतंत उतरला आहे.

इनिगोय's picture

27 Oct 2014 - 2:21 pm | इनिगोय

त्ये क्रमशा हाय न्हवं?

हाय कि … जरा टाईम लागंल

अजया's picture

27 Oct 2014 - 2:22 pm | अजया

पुभाप्र!वाचते आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Oct 2014 - 4:35 pm | लॉरी टांगटूंगकर

मस्त जमतंय, लवकर लिहा..

Maharani's picture

28 Oct 2014 - 10:29 am | Maharani

पुभाप्र..वाचतेय

प्रमोद देर्देकर's picture

28 Oct 2014 - 11:05 am | प्रमोद देर्देकर

बाब्बो मस्तच. तुमची सुप्तावस्था संपली म्हणायची.

देवांग's picture

28 Oct 2014 - 7:53 pm | देवांग

बकवास

खोंड's picture

28 Oct 2014 - 8:37 pm | खोंड

धीर धर

क्रमशः न लिहिण्यामागे सुद्धा काही रहस्य आहे का ?

पैसा's picture

2 Nov 2014 - 10:37 am | पैसा

ग्रामीण ढंग आणि मोठ्ठा कॅनव्हास! मस्त चालू आहे कथा.