माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
13 Oct 2014 - 10:33 am

मराठी गाणी म्हटली की कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पड्तो. ढोबळमानाने ’पैल तो गे काऊ पासून सुरुवात करुन.. अंगनी माझ्या मनीच्या मोर नाचु लागला इथपर्यंत अनेक मराठी गाण्यांनी आपल्याला भरभरुन आनंद दिला आहे. संत,पंत आणि तंत (शाहिरी) काव्यात मराठी ओवी,अभंग, लावण्या आणि कवितांची गाणी कधी झाली हे आपल्या लक्षातही आलं नाही. मराठीतील ही सर्व गाणी अतिशय सुंदर अशी फुलली आहेत. कोणतं गाणं सुरेख असं म्हणायला गेलो की बोटाच्या चुटकीतून प्रत्येक सुंदर असं गाणं निसटून जातं. एकच एक गाणं आपल्याला आवडतं असं कधी म्हणता येत नाही. कधी अतिशय भावविभोर करणारी तर कधी मनातल्या मनात खुदकन हसवणारी अशी अनेक गाणी आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.

जानपद गीतांची मराठी कवितेत एक मोठी परंपरा आहे, ग्रामीण जीवनाचे विविध रंग ढंग या रचनेतून आपल्याला बघायला मिळतात. गणदल-गंदल-गोंदल-गोंधळ अशा नावाने आणि पुढे तमाशात लोकप्रिय झालेला गण गौळणाची आपल्याला ओळख आहेच. काही गाण्यांची मजा वाचण्यात नाही तर ती ऐकण्यातच असते अशाच शाहिरी परंपरेच्या एका रांगड्या मराठी माणसाचं अर्थात दादा कोंडके यांच एक सोंगाड्या चित्रपटातलं गाणं मला खुप आवडतं. माळ्याच्या मळ्यामदी कोण गं उभी.

''माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी
राखण करते मी रावजी
रावजी, हात नका लावूजी,पाहील कुणी तरी.

दादा कोंडके मला नेहमीच चतुर आणि रंगेल असा माणुस वाटला आहे. गाण्यातील रंग आणि ढंग या बाबतीत अतिशय साधा भोळा असा रंगेलपणा दादा कोंडकेंनी गीतातून व्यक्त केला आहे. मळ्यामधे शेतात उभी असलेली ही साधी भोळी मंजुळा शेतीची राखण करते आहे. एका मळ्यात मचाणावर प्रेयसी तर आपल्या शेतात राखण करणारा प्रियकर यांची अतिशय प्रेमाची तरल भावना ग्रामीण ढंगाने दादा कोंडके इथे व्यक्त करतात. प्रेयसी शेतात या बांधावरुन त्या बांधावर फिरत आहे आणि तीची स्वत:ची इच्छा आहे की प्रियकराने आपल्याला हात लावला पाहिजे, पण तीच म्हण्ते की 'रावजी, हात नका लावूजी पाहील कुणी तरी’ आरती प्रभुंच्या नाही कसं म्हणु तुला म्हणते रे... या गाण्यातला जो नकार म्हणजेच होकार आहे, तो इथेही आपल्या दिसून येतो.

'औंदाचा ग वरीस बाई मी सोळावं गाठलं गं
चोळी दाटली अंगाला बाई कापड ग फ़ाटलं गं.
काळीज माझं धडधड करी, उड्ते पापणी वरचेवरी
रावजी हात नका लावूजी, पाहील कुणी तरी'

औंदाच्या म्हणजे या वर्षी प्रेयसी सोळाव्या वर्षात पदार्पण करीत आहे, तारुण्याच्या एका नव्या युगात प्रवेश करतांना शृंगाराच्या बाबतीत लौकिक पातळीवरचं वर्णन करतांना दादा कोंडके 'चोळी दाटली अंगाला बाई कापड गं फाटलं यातून’ स्त्रीच्या रुपाचे जे वर्णन करु पाहतात त्यातून जे प्रणय भावनेचं अतिशय सुंदर वर्णन येतं. 'काळीज धडधड करणे, पापणी उडणे, हे जे अविष्करण आहे त्यांची अभिरुची अशी उच्च दर्जाची उंची आपल्याला या गाण्यातुन आपल्याला दिसून येते. एका शाहिराची मला अशीच एक रचना आठवते.

''चुडा लकाकित जडाव अगदी कोंदण केले मधी रवा
तंग चोळीवर रंग कुसुंबी गोरे गाल जसा नरम खवा
उर पदराने झांकुन ठाकुन किती चालशी नटून जिवा
उदी शाल आंत साज भरजरी तंग काचोळी तडातडी”

त्याच पद्धतीची रचना इथेही आपल्याला दिसते-

''नार गोमटी तू देखणी ठुसका बांधा धसला मनी
फुलराणी जीव माझा सजनी ग जडला तुझ्यावरी''

शाहिरांना 'चोळी' 'चोळी तडतडणे' 'गोरे गाल कसे तर कसा नरम खवा' 'अटकर बांधा' 'सुबक ठेंगणी' 'ठुसका बांधा' 'शरीर पातळ मी जशी नाजुक साय दुधाची' ही आणि अशा या स्त्री सौंदर्याची कल्पना खास म-हाटीची वळणाची दिसून येते. विविध उपमाही मराठीत आपल्याला दिसून येतात. दादा कोंडकेंनी अशा शब्दांचा जो चटकदारपणा निवडलाय त्या शब्दामधून ऐटदार शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि म्हणुनच त्या वर्णनाला एक गहिरेपण आलेलं दिसतं.

मला व्यक्तिगत मळ्याच्या मळ्यामधे ती उभी असतांना मधेच हे 'वांगे तोडणे' आवडलेलं नाही. पण गाण्यांमधे कधी कधी ग्रामजीवनांचं चित्र रेखाटतांना अधिक जीवंतपणा त्या प्रेमात आणि वास्तव चित्रणात यावा म्हणुन कदाचित अशी शब्दयोजना केली असावी, असे वाटते. निसर्ग प्रतिमांचा वापर करुन ते गाणं लोकप्रिय करावं हाच तो उद्देश त्या गाण्यांमागे असावा असाही एक विचार त्यातून डोकावून जातो.

शेतीवाड्यातल्या माणसांना जरा विरंगुळा हवा म्हणुन तारुण्यांच्या बहराचे वर्णन अशा गीतांमधून खटकेबाजपणाने यायलाच हवी अशी श्रोत्यांची अपेक्षाही असावी म्हणुन 'ज्वानीचा कहर' अशा गाण्यांमधुन आपल्याला दिसून येतो. 'गोरे गाल आणि प्रियकराची आठवण झाल्यावर ते लाल होणे' 'प्रेयसीला आंघोळीला बसल्यावर हसु येणं’ ’खांद्यावरचा पदर सतत घसरणे’ हे सर्व प्रेमात घसरल्याची लक्षणं या गीतातून प्रेमाची एक तरल भावना अतिशय तरलपणे व्यक्त झालेली दिसते.

प्रेयसीला चंद्र, चांदण्याची उपमा देणे ही परंपरा इथेही आपल्याला दिसून येते. आणि म्हणुनच मला हे गाणं खुप आवडतं. आकाशवाणी मुंबई केंद्रावर हे गाणं लागलं की तेव्हाही आतुन आनंदाचे उमाळे फुटायचे आजही हे गाणं ऐकतांना पाहतांना असेच उमाळे फुटतात.

आपल्याला जर रसग्रहण आवडलं तर पुढंच गाणं निवड्लं आहे, 'काल रातीला सपान पडलं आन सपनात आला तुम्ही अन बै मी बडबडले’ तो पर्यंत मळ्याच्या मळ्यामधी हे गाणं ऐका. आणि काय चुक भुल असेल ते जरुर लिहा.

मुक्तकविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

13 Oct 2014 - 10:45 am | खटपट्या

जबरी परीक्षण झाले आहे सर !!

खटपट्या's picture

13 Oct 2014 - 10:47 am | खटपट्या

संपूर्ण लेख वाचून, मी पयला !!

पैसा's picture

13 Oct 2014 - 10:48 am | पैसा

काय मस्त रसग्रहण केलंत सर! दादा कोंडकेंच्या साध्या सुध्या जुन्या गाण्यांबद्दल काय बोलावं! जरासा चावटपणा, गावरान ठसका! आणि त्याचं अगदी तरल भावविभोर वर्णन. ओहोहो! मजा आला! हाऊर आन्दो!

शेखर काळे's picture

13 Oct 2014 - 10:54 am | शेखर काळे

>>दादा कोंडके मला नेहमीच चतुर आणि रंगेल असा माणुस वाटला आहे.

१०० % सहमत ..

- शेखर काळे

पैसा's picture

13 Oct 2014 - 11:01 am | पैसा

आगामी आकर्षण म्हणून हे पुढचं गाणं ऐका, आणि मग रसग्रहण वाचा ही आयड्या कल्पनेच्याबाहेर आवल्डी आहे.

सतिश गावडे's picture

13 Oct 2014 - 11:20 am | सतिश गावडे

शाहिर दादा कोंडके या अवलियाने एकापेक्षा एक अशी सरस गाणी लिहीली. बर्याचदा द्व्यर्थी असल्यामुळे श्लील-अश्लीलतेच्या सीमारेषेवर घुटमळणार्या या गाण्यांनी मनाला भुरळ घातली हे बाकी खरे.

सर, रसग्रहण मस्त जमले आहे. आता तुम्ही प्रा. डॉ. शोभता. :)

विनायक प्रभू's picture

13 Oct 2014 - 11:20 am | विनायक प्रभू

'रस' ग्रहण

नाखु's picture

13 Oct 2014 - 11:26 am | नाखु

आणी "रस" दार परिक्षण
म्हणूनच दादा "दादा" आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

13 Oct 2014 - 1:03 pm | प्रभाकर पेठकर

दादा कोंडके ह्यांचा सेन्सॉर बोर्डाबरोबर चालणारा वाद त्यांच्या मराठी भाषेविषयी असलेल्या ज्ञानाची ग्वाहीच देतो.
त्यांचं सोंगाड्या हे आत्मचरीत्र वाचण्यासारखं आहे. त्यात असे अनेक किस्से आहेत.

एस's picture

13 Oct 2014 - 1:44 pm | एस

माळ्याच्या मळ्यामधी ह्ये रसगिर्हान कराय्चं गानं नसून त्येच्या रसामंदी डूबूक्ककन बुडून जायाचं गानं हाय ह्ये आमचं पर्मानिक मत हाय.

तरीबी तुमचं लेखन आक्शी ब्येस झालंया आसं नमूद कर्तो वो प्रा. डॉ. सायेब!

प्यारे१'s picture

13 Oct 2014 - 1:59 pm | प्यारे१

म हा न!

प्रा डॉ न्ना प्यार्टी लागू.

आणि ही आमची जाहिरात. http://misalpav.com/node/17636
रसग्रहण आम्ही पण केलं आहे म्हटलं. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा

हमने ये परिक्शान..बहुत जब्बरदस्त वेंजॉय किया है। http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif
तथा...हम आप से बिनती करते है की अगले गाने का भी ऐसाइच परिक्शान लवकरात लवकर करे। :)

समांतरः- ''चुडा लकाकित जडाव अगदी कोंदण केले मधी रवा
तंग चोळीवर रंग कुसुंबी गोरे गाल जसा नरम खवा >> http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif मार डाला.....हल्ला मार डाला!
पन सदर काव्याच्या चारच वळी मंजी ताटाला लावल्याल्या निव्दाच्या खिरीवानी वाटत्यात.तेच्यामुळं याची पन फुल्लडिश पायजेन! :D

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Oct 2014 - 2:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रा. डॉ.

परीक्षण अतिशय आवडले हेवेसांन

मला व्यक्तीशः वांगी तोडणे ही उपमा म्हणजे दादांच्या उच्च प्रतिभेचा एक आविश्र्कार वाटला. इतक्या सार्‍या भाज्या असताना दादांनी वांगेच का बरं निवडले असेल असा प्रश्र्ण मला पडला होता. त्याचे उत्तर शोधताना मला भारतिय ग्राम्य जीवनाचे एक अनोखे दर्शन झाले.

संदिप खरेंनी जेव्हा "रानी माझ्या मळ्या मंदी हे" गाणे लिहिले होते तेव्हा टमाटे, भेंडी अशा भाज्या निवडल्या. पण वांगे निवडण्याचे धाडस केवळ दादांकडेच होते. वांगे हे महाराष्ट्राच्या मर्दानी बाण्याच प्रतिक म्हणून दादांनी वापरले आहे. महाराष्ट्रात जशी विविधता आहे तशीच विविधता वांग्या मधे पण आढळते. म्हणजे बघा छोट वांग, मोठं वांग, त्याहून मोठं भरताच वांग, हिरवी वांगी, लांबट वांगे, त्यातही पुण्यात मिळणारी वांगी वेगळी, सांगलीची वेगळी, विदर्भातली वेगळी आणि मराठवाड्यातली त्याहून वेगळी.

जसे कोकणातला मर्द हा कोल्लापुरी मर्दापेक्षा, वेगळा असतो. किंवा मराठवाडी गडी आणखीच निराळा असतो. पण या अशा महाराष्ट्रातल्या मर्दानी बाण्या मधे असलेल्या विविधतेला एकाच प्रतिकाने घट्ट बांधायचे अवघड काम दादांसारख्या प्रतिभावंताने चुटकी सरशी सोपे करुन टाकले आहे.

वांगे म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येते?..... वांगे.

मग आता डोळे बंद करुन डोळ्यासमोर एक चांगले भरलेले ताजे ताजे रसरशीत वांगे आण. बघ तोंडाला पाणी सुटते की नाही ते. मग मुंगळ्या सारखे लहान होउन त्या वांग्याच्या आजुबाजुने फिरुन त्याचे निरिक्षण कर. त्या वांग्यावर हात फिरव. त्याचा स्पर्श अनुभव. मग त्या वांग्यावर चढ आणि त्याच्या देठावरुन टुणकन खाली उडी मार. .......... बघ माझी आठवण येते का?

वांगे किंवा वांग्याच्या आकाराची इतर कोणतीही वस्तु आपल्या समोर आली तरी आपल्याला असाच आनंदच होतो ना? वांग्याच आणि आपल नातं असे वेगळेच आहे. आपला प्रियकर जास्तिजास्त काळ आपल्या जवळ रहावा अशी नायिकेची तीव्र इच्छा आहे. म्हणून ती सूचक पणे नायकाला सांगते आहे की "बघ आता मी वांगी तोडते आहे. मग मी त्या वांग्यांची तूला आवडते तशी चमचमीत भाजी करणार आहे. तेव्हा हे माझ्या दिलबरा, प्राणसख्या तो पर्यंत तू इकडेच थांब." असे एक लाडिक अर्जव दादांना "वांगी तोडते मी रावजी" या शब्दातुन सूचीत करायचे आहे.

आपण वर पाहिलेच आहे की वांगे हे मर्दानी बाण्याचे प्रतिक म्हणुन दादांनी वापरले आहे. यालाच जरा दुसर्‍या एका बाजूने पाहा. प्रियकराला प्रेयसी श्रीकृष्णाच्या रुपात पहाते आहे. तो कान्हा जसा निळा जांभळा होता तसेच वांगेही जांभळे असते. कान्ह्या सारखा प्रियकर मला लाभला याचा प्रेयसीला जो अहंकार झाला आहे त्या अहंकाराचे प्रतिक म्हणजे वांगे. तो अहंकार झटकून साक्षीभावाने समर्पण करायला तयार असलेल्या प्रेयसीची भावविभोर अवस्था दादांनी "वांगी तोडते मी रावजी" या शब्दांमधे मोठ्या खुबीने सांगीतली आहे.

दादांच्या या अफाट प्रतिभेला माझ्या कडुन एक कडक सलाम.

पैजारबुवा

योगी९००'s picture

13 Oct 2014 - 3:13 pm | योगी९००

रसग्रहण सुरेख आणि या प्रतिसादाने तर या रसग्रहणाला चार चांदच लावलेत...

बाकी शिवशाहीर दादा कोंडकेच्या अफाट प्रतिभेचा जबरदस्त प्रभाव पैजारबुवांवर पडलाय हे या प्रतिसादामुळे दिसून येतेच...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2014 - 3:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रियकराला प्रेयसी श्रीकृष्णाच्या रुपात पहाते आहे. तो कान्हा जसा निळा जांभळा होता तसेच वांगेही जांभळे असते. कान्ह्या सारखा प्रियकर मला लाभला याचा प्रेयसीला जो अहंकार झाला आहे त्या अहंकाराचे प्रतिक म्हणजे वांगे. तो अहंकार झटकून साक्षीभावाने समर्पण करायला तयार असलेल्या प्रेयसीची भावविभोर अवस्था दादांनी "वांगी तोडते मी रावजी" या शब्दांमधे मोठ्या खुबीने सांगीतली आहे.

आपल्या पायांचा फोटो प्लीज पाठवा मोबाइल वर वालपेपर म्हणून लावतो. पण वांगीफोड़ सॉरी वांगीतोड़ प्रतिमा आपण चांगली विस्कटून दाखवली ते प्रचंड आवडले आहे.

प्यारे१'s picture

13 Oct 2014 - 3:48 pm | प्यारे१

___/\___

साती's picture

13 Oct 2014 - 4:01 pm | साती

वांगे म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येते?..... वांगे.

अहाहा, इतकं आशयगर्भ वाक्यं दुसरं कुठलं नसेल.
मराठी साहित्यातले 'वांगे' असा छोटेखानी प्रबंधच लिहा ना!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2014 - 4:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैजारबुवा आपल्या कल्पकतेला मी दाद देतो. पण...

शेतकर्‍यांची गाणी त्यांच्याच सभोवतालचा बाज घेऊन आली पाहिजेत म्हणुन वांगी तोडण्याचा संबंध या गाण्यात आला आहे असे मला वाटते. बहुजन समाज हा निरक्षर आहे पण तो उत्तम श्रोता असतो तेव्हा त्याच्या भावनांशी समरस होणारे शब्द आले की तो त्याच्याशी एकरुप होतो ही नाडी दादा कोंडकेंनी ओळखली होती. शेतीजीवनाचं वर्णन करतोय तर त्यात पटकन समरस होणारं उदाहरण आलं पाहिजे म्हणुन ते आलं आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोलीत टीकणारे शब्द कोणते तेव्हा ग्रामीण भाषेतल्या शब्दांनी त्यात एक परिणामकारकता येईल हाच शुद्ध हेतु वाटतो. खेड्यातला बहुजनसमाज नगरभाषेशी किती समरस होईल असे वाटल्यामुळे जितके खेड्याशी एकरुप होऊ तितके चांगले असा तो भाग मला वाटतो.

म्हणजे वांगीच नव्हे तर 'ऊस तोडते' मी रावजी हेही चाललं असतं. पण आपला प्रतिसाद आवडला म्हणुन ही नसती उठाठेव.

-दिलीप बिरुटे

एस's picture

13 Oct 2014 - 5:18 pm | एस

हेच म्हणायला आलो होतो. बाकी पैजारबुवांचाही प्रतिसाद स्वतंत्र अर्थाने भन्नाट आहे.

शरद's picture

14 Oct 2014 - 7:14 am | शरद

सुर्रेख रसग्रहण आणि प्रतिसाद. दोघाही रसिकांनी वांगे आणि सोळाव वरस यांतील एका साम्याकडे का बरे दुर्लक्ष केले?
शरद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Oct 2014 - 7:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कशाकडे दुर्लक्ष झालं ते सांगा. मला माहिती आहे, आपलीही प्रतिभा अशावेळी बहरून येते प्लीज लिहा सर..

-दिलीप बिरुटे

सूड's picture

14 Oct 2014 - 7:18 pm | सूड

पैजारबुवा __/\__

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा

@मग आता डोळे बंद करुन डोळ्यासमोर एक चांगले भरलेले ताजे ताजे रसरशीत वांगे आण. बघ तोंडाला पाणी सुटते की नाही ते. मग मुंगळ्या सारखे लहान होउन त्या वांग्याच्या आजुबाजुने फिरुन त्याचे निरिक्षण कर. त्या वांग्यावर हात फिरव. त्याचा स्पर्श अनुभव. मग त्या वांग्यावर चढ आणि त्याच्या देठावरुन टुणकन खाली उडी मार. .......... बघ माझी आठवण येते का?>>> =)) __/\__ गारव्याचा पार पारवा झाला कि वो! =))

योगी९००'s picture

13 Oct 2014 - 3:42 pm | योगी९००

रसग्रहण सुरेखच...बर्‍याच दिवसांनी शिवशाहीर दादा कोंडके यांची आठवण झाली.

एक किस्सा आठवला : या गाण्याचा आमच्यावर एवढा प्रभाव होता की लहानपणी शेत किंवा बुजगावणे दिसले की हमखास हे गाणे तोंडात यायचे. एकदा शाळेत गॅदरींगला एक सुरेख गोरीगोमटी मुलगी "माळ्याच्या मळयामंदी" हे गाणे म्हणणार आहे असे कळल्याने खूप उत्सुकतेने मुलांनी तिच्या गाण्याची वाट पाहीली. पण तिने "माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी वाहतं....गुलाब जाई जुई मोगरा फुलवीतं" हे साधी माणसे या चित्रपटाचे गाणे सुरू केल्याने असला काही गोंधळ झाला की बस.. नंतर ती मुलगी गॅदरींगला कदाचित कोठलेच गाणे म्हणायच्या फंदात पडली नसावी.

पैसा's picture

13 Oct 2014 - 3:51 pm | पैसा

दादांची किंमत करणारे, त्यांच्या सिनेमांची नावे ऐकून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, दादांना गावठी म्हणणारे आणि दादांचे सिनेमे बघणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम!

एखादी गोष्ट न समजणं सहाजिक आहे, तसं म्हणणं आणि सोडून देणं यात सुद्धा काही वावगं नाही पण अर्थाचा अनर्थ करुन तिचा उपहास करणं, (विशेषतः ती गौरवप्राप्त असतांना); स्वतःची अनुभव कक्षा सिमित करतं. जर हे रसग्रहण प्रकाशित झालं नसतं तर दादांच्या प्रतिभेला समजावून घेण्याची अनेकांची संधी हुकली असती. खरं तर या निमित्तानं मला दादा कोंडके आणखी थोडे उलगडले आणि त्याबद्दल प्रा.डॉ. यांची अत्यंत आभारी आहे.

मदनबाण's picture

13 Oct 2014 - 4:01 pm | मदनबाण

मस्त "रस ग्रहण " आणि जबदस्त प्रतिसाद ! ;)

जाता जाता :- ढगाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं{ रिमिक्स } ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

दादा कोंडके नंतर नंतर चावटपणाला चटावले !नाहेीतरअजुनहेी त्यांना मान कायम मिळाला असता.आणि सोंगाड्या तर उत्कृष्टच होता यात शंकानाहेी.
जुन्अआटठवणेी जाग्या केल्याबद्दलदधन्यवाद !

वावावा .इकडे तिकडे गोफणीतून तणाणा हाणलेले धोंडे अजून एक दिवस चुकवतोय इतक्यात हे छान पाखरू अवतरले.येऊ द्यात आणखी.मनात कणसे डोलताहेत .एक माळीदादा भरलेले वांगे काटे न बोचता कसे काढायचे ते दाखवताहेत.

प्रचेतस's picture

13 Oct 2014 - 9:54 pm | प्रचेतस

भन्नाट 'रस'ग्रहण.
'काल रातीला सपान पडलं' येऊ द्यात आता लवकर.

मुक्त विहारि's picture

13 Oct 2014 - 10:50 pm | मुक्त विहारि

पुढच्या गाण्याच्या परीक्षणाच्या प्रतिक्षेत...

दादा ते दादाच...

स्पंदना's picture

14 Oct 2014 - 4:40 am | स्पंदना

डीबी यु टू???

:))

पैजारबुवांना मातर (च्च मात्र) सदगदित नमस्कार!

पाषाणभेद's picture

14 Oct 2014 - 5:13 am | पाषाणभेद

शाहीर दादा कोंडके यांना मानाचा मुजरा!

अनुप ढेरे's picture

14 Oct 2014 - 9:01 am | अनुप ढेरे

हा हा हा. भारी! आता 'ढगाला लागली'च ही येऊद्या रसग्रहण. 'घागर नळाला लाव'चं अजरामर रसग्रहण आठवलं. लिंक डकवा राव मिळाल्यास.

अर्धवटराव's picture

14 Oct 2014 - 9:09 am | अर्धवटराव

आमच्या 'कॅटॅगरीच्या' लोकांना समजेल आणि आवडेल असं भन्नाट रसग्रहण.

आता ऊसाला लागलेल्या कोल्ह्यावर एक र.ग्र. येऊ देत.

सुहास..'s picture

14 Oct 2014 - 8:37 pm | सुहास..

सर, आप भी ...मान गये आपकी गाणे की चॉईस और आपको ....भन्नाट !!

प्रियकराला प्रेयसी श्रीकृष्णाच्या रुपात पहाते आहे. तो कान्हा जसा निळा जांभळा होता तसेच वांगेही जांभळे असते. कान्ह्या सारखा प्रियकर मला लाभला याचा प्रेयसीला जो अहंकार झाला आहे त्या अहंकाराचे प्रतिक म्हणजे वांगे. तो अहंकार झटकून साक्षीभावाने समर्पण करायला तयार असलेल्या प्रेयसीची भावविभोर अवस्था दादांनी "वांगी तोडते मी रावजी" या शब्दांमधे मोठ्या खुबीने सांगीतली आहे. >>>

बुवांच्या प्रतिसादांचा फॅन उगाच नाही, हा तर नेहले पे दहेला ! वरचढ नव्हे , एकापेक्षा एक सरस अश्या अर्थाने, की बडे मास्तर तर बडे मास्तर , छोटे बुवा भी सुभान अल्ला !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Oct 2014 - 1:35 am | डॉ सुहास म्हात्रे

जबरा रसग्रहण !

वांगीपुराणाची जोड पण अप्रतिम !