एक शाम ऋजुता के नाम

अमित खोजे's picture
अमित खोजे in जनातलं, मनातलं
24 Sep 2014 - 2:49 am

२१ सप्टेंबर २०१४: प्रसिद्ध आहारतज्ञ 'ऋजुता दिवेकर' यांचे न्यूयॉर्कमध्ये सेन्ट्रल पार्क मध्ये एक छोटेसे सत्र होते. सेन्ट्रल पार्क हे सुद्धा न्यूयॉर्क मधील आश्चर्यच म्हणायला हवे. जगातल्या सर्वात महाग शहरांपैकी एक अशा या न्यूयॉर्कमध्ये ७०० एकर एवढा मोठा भूभाग बागेसाठी राखवून ठेवला आहे याचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे.

Central Park 1

Central Park 2

(छायाचित्र जालावरून साभार)

बायकोने आठवडाभर अगोदरच इमेल वगैरे पाठवून नोंदणी करून ठेवलेली असल्यामुळे अस्मादिकांना जाण्याशिवाय पर्याय नव्हता. नाहीतर पुढचा एक आठवडा तरी 'तुमचे वाढलेले पोट' यावरती बोलणी खाणे निश्चित होते. त्यामुळे चुपचाप रविवार दुपार टी व्ही समोर तंगड्या पसरून एखादा मस्त इंग्लिश पिक्चर पाहण्याऐवजी भरभर आवरून घरातून निघून सेन्ट्रल पार्क ला पोहोचण्यात घालवली. खुद्द न्यूयॉर्क आमच्या घरापासून तसे दूर असल्याने ट्रेनने प्रवास करणे आले. साधारणपणे एक तासाभरात ३:१५ ला आम्ही पार्क मध्ये पोहोचलो. सत्र ४ ला सुरु होणार असल्याने बागेमध्येच हिंडण्याचे ठरवले.

Building

Tale

बागेतल्या तळ्यामध्ये 'छान' जोडपी नौकानयनाचा आनंद लुटत होती. ते पाहून बायकोकडून लगेच फर्माईश झालीच. 'आम्हालापण बोटिंग करायचे!' पण थोड्याच वेळात सत्र सुरु होणार असल्याने वेळेचे कारण सांगून बोटिंगची इच्छा आम्ही आईस्क्रीम वर भागवण्यात आम्हाला यश आले आणि आम्ही आईस्क्रीम खात खात रस्त्यावरची 'प्रेक्षणीय' स्थळे पहात सत्राच्या जागेवर जाऊ लागलो.
इमेलमध्ये स्ट्रौबेरी फिल्ड अशी जागा सांगितली होती परंतु ते फिल्ड फारच मोठे होते. आणि आजूबाजूला कुठे कोणी कार्यकारी किंवा एखादे पोस्टर पण दिसत नव्हते. मनात म्हटले एवढ्या लांब आलोय तर आता लेक्चर मिस नको करायला. त्यामुळे ती येई पर्यंत तिथल्याच एका बाकावर बसकण मारली.
पार्श्वभाग टेकवतो न टेकवतो तोच आजूबाजूची सगळी मंडळी गडबडीने उठायला लागली. मला कळेना नक्की काय झाले ते आणि बेंचवरचे किडे पँट मध्ये जाऊ नये म्हणून जेवढ्या झटकन उठता येईल तेवढा उठलो. दोन्ही हात अर्थातच पार्श्वभाग झटकण्यात व्यस्त होते अन तेवढ्यात माझे समोर लक्ष गेले आणि सगळेजण का उठले त्याचे कारण कळाले. ऋजुता तिकडून येतच होती. तिला येताना पाहून मनात म्हटले बरे झाले! कार्यक्रम कुठे आहे ते शोधण्याचे कष्ट वाचले.

मीच समोर असल्याने पार्श्वभागावरून हात सरळ हस्तांदोलनासाठी पुढे केला. "I am Amit , Welcome To New York" असे म्हणून स्वागत केले. त्यावर "Nice to meet you Amit!" असे हसून म्हणत फिल्डकडे चालायला सुरुवात केली. आम्हीही हात चोळत तीच्या मागे चालायला सुरुवात केली. सर्वांनी लगेच तिच्याभोवती घोळका घातला आणि आम्ही सर्व बागेतल्याच एका झाडाखाली जाऊन बसलो. सर्वांची ओळख करून घेऊन मग तीने सत्राला सुरुवात केली. बहुदा सर्व जन न्यूयॉर्क न्यूजर्सीचेच होते. पण एक उत्साही महिला तर बाल्टिमोरवरून ४ तास गाडी चालवत आली होती. सर्वांनी तिचे कौतुक केले.

Group1

आम्ही पुढची शिट पकडली.

RD2
===================================================================================

संपूर्ण सत्र काही मला इथे सांगणे शक्य होणार नाही. त्याऐवजी तिचे 'don't lose your mind lose your weight' हे पुस्तक वाचणे फायदेशीर ठरेल. तिने तिचे बोलणे मुख्यतः उत्तर अमेरिकेतील लोकांना भेडसावणारे प्रश्न यावर केंद्रित केले होते आणि त्यापासून बरीच माहिती मिळाली. पहिला एक तास तिने तिचे विचार मांडले आणि नंतर प्रश्नांसाठी मंच खुला केला. तेव्हा लोकांनी जे प्रश्न विचारले ते ऐकून लेक्चर पेक्षा हि प्रश्नावलीच मला जास्त महत्वाची वाटली.

इथे परत एकदा मला नमूद करावेसे वाटते कि भारतात राहणार्यांपेक्षा येथील अमेरिकेतील भारतीयांचे प्रश्न वेगळे असल्याने प्रश्नोत्तराचा रोख त्या अनुषंगानेच होता. नक्कीच हे सर्व भारतातील मित्रांना देखील वापरता येऊ शकते. सत्राचे सार मी काहीश्या मुद्द्यांच्या आणि काही प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असे दोन्ही मध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील मिपा मित्रांना त्याचा उपयोग होईल अशी आशा. मिपावरील आहारतज्ञ, डॉक्टर आणि जाणकारांच्या प्रतिक्रिया अपेक्षित!

अमेरिकेतील लोकांच्या शरीरावर (आता यात भारतीयसुद्धा आले. आपणही काही मागे नाही!) सुखवस्तू जीवनशैलीमुळे बरेच नको ते परिणाम होतात आणि त्याचे पर्यवसान सुरुवातीला शरीराचा आकार आणि वजन वाढण्यात तर नंतर जीवावर बळावणारे आजार होण्यात होतो. त्यात तिने वापरलेली एक संज्ञा म्हणजे Metabolic Syndrome. हि संज्ञा म्हणजे सगळे जोखीम घटक जे तुमच्या हृदयाच्या आणि एकूणच शरीराच्या आजारांचे निमंत्रक असतात. उदाहरणार्थ पोटावरील साचलेला मेद, ट्रायग्लीसराइड ची पातळी, low HDL (good cholesterol), जास्त रक्त दाब, इत्यादी. पोटावरील आणि नितंबावर साचलेला मेद (Apple Shape) हे सर्वात सोपे डोळ्यांना दिसणारे परिमाण. यावरून आपला आपणच अंदाज लावू शकतो कि आपण किती सुदृढ शरीराचे आहोत. हा मेद हृदयरोगांचा बोलविता धनी. याच्या जोडीला low HDL (High-density lipoprotein) ज्याला चांगले कॉलेस्टरॉल सुद्धा म्हणतात. हे तुमच्या धमन्यांमधून वाईट कॉलेस्टरॉल घालवतात आणि तेथे साचू देत नाहीत.

ह्या मुलभुत माहितीवरून ऋजुताने पुढे वरील रोग हे आहाराने कसे नियंत्रणात आणता येतात आणि लोकांच्या अति माहितीमुळे कशा समजुती गैरसमजुती तयार झाल्या आहेत त्यावर भर दिला. त्यातील एक मुद्दा मला मनापासून पटला. Food Science हे फार फार तर गेल्या ५० वर्षात विकसित झाले आहे. आणि त्याचा उपयोग लोकांना जास्त होण्यापेक्षा Food Industry ला जास्त होतोय किंवा ते व्यावसायिक लोक जास्त करून घेत आहेत. पहिले Cannola Oil, नंतर Soya चा मारा, नंतर Olive Oil आणि आता Coconut Oil हे तुमच्या तब्येतीला कसे चांगले आहे हे जाहिरातबाजी करून लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे. आता यातील नारळाचे तेल दक्षिण भारतामध्ये आणि आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये पुरातन काळापासून वापरतात. पण सध्या अमेरिकेत या नारळाच्या तेलाची चलती आहे. असो.

खाली ऋजुताने काही सांगितलेले मुद्दे माहिती आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मांडले आहेत.

दूध: अमेरिकेत आल्यानंतर सर्वात पहिले प्रश्न भेडसावतो तो दूधाचा. इथे पाश्चराइज्ड दूध कॅनमध्ये मिळते. त्यातही दोन तीन प्रकारचे. १%, २%, fat वाले आणि Full Fat, Fat Free वाले.

Milk
(छायाचित्र जालावरून साभार)

ते घरी आणून तापवायची गरज नाही. एक कॅन साधारण आठवडाभर किंवा ४-५ दिवस जातो. ऋजुताच्या म्हणण्याप्रमाणे वरील प्रकारामधील Full Fat वाले दूध घेणे चांगले. बाकीचे नुसते पांढरे पाणी. एकजण म्हणाले कि ते तर कच्चे दूध (RAW MILK) घेतात आणि त्यापासून दही तूप वगैरे सर्व घरी बनवतात. सर्वांनी आश्चर्याने त्यांना विचारले कि तुम्हाला कच्चे दूध कोठे मिळते? तर 'Whole Foods' मध्ये बाटलीमध्ये RAW MILK मिळू शकते. शिवाय अजून एक माहिती कळली कि http://www.realmilk.com/ वर तुमच्या राज्याचे नाव टाकून कच्चे दूध विकणाऱ्या गवळ्यांची माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही अगदी आपल्या भारतासारखे घारोष्ण दूध रोज घरी नेऊ शकता.

ताजे: दुसरा महत्वाचा मुद्दा ऋजुताने सांगितला कि जेवढे ताजे आणि स्थानिक तुम्हाला शक्य आहे तेवढे ताजे फक्त विकत घ्यायचे नाही तर खायचेसुद्धा. मग तो भाजीपाला असो किंवा फळे. ताजी फळे विकत घेऊन फ्रीजमध्ये ठेऊन १० दिवसांनी खाण्यात काही अर्थ नसतो. ताजी फळे/भाजी जास्तीत जास्त ३ दिवसांमध्ये संपवावी. स्वयंपाक रोजच्या रोज घरी करायचा.
अवांतर: आठवड्याभराची भाजी रविवारी करून ठेऊन आठवडाभर ती डब्याला नेण्याचा शहाणपणा करणारे मला (लेखकाला) स्वतःला माहित आहेत. जरी भारतामध्ये हा किळसवाणा प्रकार असला तरीही इथे आल्यानंतर वेळेच्या अभावाखाली अनेक भारतीय असे करताना दिसतात.

आठवड्यातून दोनदा तुमचा फ्रीज साफ करा. फ्रीजमध्ये कित्येक अशा गोष्टी असतात कि त्या तिथे आहेत हे आपल्याला माहीतच नसते. ऑर् गॅनिक कि नॉन ऑर् गॅनिक याविषयी बोलताना ऋजुता म्हणते कि ऑर् गॅनिक जरी नाव लिहिले असेल तरी त्यामध्ये बरेच अमेरिकन कायदे असल्याने त्यांना गुंडाळून किंवा फसवून एखादा पदार्थ ऑर् गॅनिक लेबलचा बनवता येतो. आणि असे लेबल मिळवणे बर्याच शेतकर्यांना शक्य होत नाही. त्यामुळे लेबल नसले तरीही 'farmers market' मधील बर्याच भाज्या ह्या ऑर् गॅनिक असतात. त्यामुळे असा भेद करण्यापेक्षा ताजे खा तेवढे पुरेसे आहे.

पॅकेज केलेले अन्न नेहमी टाळा. 'जितने पॅकेज खोलोगे उतना फुलोगे' असा मूलमंत्रच तिने पंजाबमधील एका शाळेत दिला होता.

स्थानिक अन्न: तुमच्या जेवणाच्या ताटामधील अन्न हे किती मैलाचा प्रवास करून आले आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? उदाहरणार्थ Subway. बाहेर सहलीला गेले कि शाकाहारी असल्याने मी पहिले subway शोधतो. (Chipotle सर्व राज्यात नसते पण subway सर्व ठिकाणी असते म्हणून). तर तुमच्या 'सब' मधील सॅलड हे मध्यअमेरिकेतून आलेले असते. ते स्थानिक नसते. फूड मैल (Food Mile) हि संज्ञा इथे परिमाण म्हणून आपण वापरू शकतो कि फळाचे अथवा भाजीचे बी ते तुमचे ताट यातील अंतर हे कमीत कमी असावे. (म्हणूनच अगदी देवगडचा हापूस आंबा जरी इथे मागवला तरीही तो इथे येईपर्यंत त्याची चव हरवून बसतो.)

प्रश्न: गोठवलेले फळ - अमेरिकेत बरीच ऋतुतली नसलेली फळे हि गोठवलेल्या स्वरुपात मिळतात. ती खावी का?
उत्तर: हि ताज्या फळांच्या अर्धीसुद्धा पोषक नसतात. फळे विकत घेताना ती जेवढी ताजी तेवढी घ्यावी आणि घेतल्यानंतर ३ दिवसाच्या आत संपवावीत.

Frozen Fruits
(छायाचित्र जालावरून साभार)

तूप: ऋजुताने तुपाच्या वापरावर बराच भर दिला. अगदी तेलापेक्षा तुपामध्ये भाज्या बनवणे कसे चांगले आहे येथून ते तूप खाऊन वजन कसे कमी करायचे यापर्यंत सर्व मार्ग सांगितले.

प्रश्न: भात खावा कि नाही? भात खाल्ल्याने जाड होते असा समज आहे तो बरोबर कि चूक? ब्राऊन राइस कि व्हाईट राइस?
उत्तर: भात, पोळी हे सर्व कर्बोदकांचे (carbohydrates) स्त्रोत आहेत. आता दक्षिणात्य भारतीयांचे जेवणंच भातावर सुरु होऊन भातावरच संपते मग त्यांनी भात खाऊच नये का? तर याला उत्तर आहे 'genetic medicine'. आपले शरीर, आपले जीनस यांना ज्या अन्नाची सवय आहे किंवा जे प्रादेशिक अन्न आहे ते आपण खावे. तुम्ही जर पश्चिम भारतातून असाल तर पोळी हा आपला एक मुख्य घटक आहे. त्यामुळे आपल्याला वरण भात भाजी पोळी सर्व काही प्रमाणामध्ये खाणे जरुरी आहे. भले तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा. कारण आपल्या शरीराला त्याच अन्नाची सवय आहे. नक्कीच प्रादेशिक अन्नाचा ताटामध्ये समावेश करणे आवश्यक आहेच परंतु आपला मुख्य आहार अगदीच फाट्यावर मारणे बरोबर नाही.
हातसडीच्या भातामध्ये (ब्राऊन राइस) तंतू (Fibre) असतात. जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. तेच पण जरा कमी फायबर सफेद भातामध्ये पण असतात. ब्राउन राइस खाउन फायबरचे शरीरातील प्रमाण फार जर वाढले तर zinc (जस्त) याचे शरीरामध्ये शोषण कमी होते आणि त्याऐवजी aluminium जास्त शोषला जाउन अल्झायमर (Alzheimer)चा धोका वाढतो. त्यामुळे ब्राउन राइस अधून मधून खायला हरकत नाही परंतु रोज खाणे हा कदाचित चांगला सल्ला नसेल.

मायक्रोवेव्हचा वापर: मायक्रोवेव्हचा वापर रेसिपी बनवण्यापेक्षा मुख्यतः फ्रीज मधले अन्न गरम करण्यासाठी केला जातो. या प्रकारात 'दीप'/'स्वाद' चे रेडी टू इट बॉक्सेस फ्रीजरमधून काढून सुरीने वरच्या प्लास्टिकवर दोन चार छेद मारून मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिट गरम करण्यास ठेवले जातात. दोन मिनिटामध्ये फक्त वरचा थर खूप गरम होतो आणि खालचा थर तसाच बर्फाचा राहतो. मग आपण तो बॉक्स बाहेर काढून चमच्याने ढवळून त्याचे तापमान एक समान करतो.
Swad
(छायाचित्र जालावरून साभार)

अन्नावरील अत्याचाराचे हे उत्तम उदाहरण. अशा अन्नापासून किती पोषण मुल्य मिळते ते बिचार्या पोटुरावांनाच ठाऊक. मुळात ताजे अन्न या संकल्पनेलाच फाट्यावर मारले जाते. अन्न हे नेहमी सगळीकडून एकसमान आणि सावकाश गरम करावे. स्वयंपाकाचा गॅस हा उत्तम. सावकाश ढवळत आपली भाजी गरम करावी. मायक्रोवेव्हमुळे ते एकसमान गरम होत नाही. त्यातील पोषणमुल्य कमी होते ते वेगळेच. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर शक्य तेवढा टाळलेला बरा. जर करायचाच असेल तर भाजी काचेच्या भांड्यात प्रथम काढून मग मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. मायक्रोवेव्हसेफ प्लास्टिक वगैरे असे काहीही नसते. जे काही मायक्रोवेव्हमध्ये जाते त्याची अणू रेणू च्या लेव्हलला जर प्रक्रिया होणार असेल तर कसले आले आहे मायक्रोवेव्हसेफ प्लास्टिक? ते सुद्धा भांड्यातल्या अन्नामध्ये त्याची रसायने सोडणारच.

प्लास्टिक: पाणी आणि अन्न हे सर्व आजकाल प्लास्टिकच्या माध्यमातूनच आपल्या समोर येते. पिण्याचे पाणी कुठेही पहिले तर तुम्हाला प्लास्टिक मध्येच दिसेल. अन्न भले ताजेही विकत घेतले तरीही ते प्लास्टिक मधूनच घरी येते. नव्या माहितीनुसार सगळे प्लास्टिक इस्ट्रोजेन (estrogen - similar to female sex hormone) नावाचे संप्रेरक संपर्कात येणाऱ्या अन्नपदार्थात सोडतात. त्याचा शरीरावर होणारा परिणाम अजून माहिती नसला तरीही हे संप्रेरक अन्नामध्ये सोडले जाते हि बातमी संशोधकांना पुढचे संशोधन करायला पुरेशी आहे. (लिंक खाली दिलेली आहे.) तसेच कलिंगड, टरबूज, पपई आणि तत्सम फळे अर्धी खायची आणि त्यावर प्लास्टिकची बारीक फिल्म झाकून फ्रीज मध्ये ठेवायचे. हि पण एक वाईट सवय. संपवून टाका लगेच ते फळ. नसेल संपत लगेच तर स्टीलची ताटली झाका पण प्लास्टिक वापरू नका. झिप लॉक वगैरे प्रकार तर सरळ फाट्यावरच.

शौचास बसण्याची पद्धत:
अमेरिकेतील बर्याच प्रौढांना गुदद्वाराचे बरेच आजार होतात. कॅन्सरहि होतात. ५० वर्षांनतर कॉलोनोस्कॉपी करून घ्यावी असे डॉक्टर्स सांगतात. बाळाचे दुधाचे दात पडणे जसे नॉर्मल तशी इथे कॉलोनोस्कॉपी आता नॉर्मल झाली आहे. बर्याच संशोधनाअंती शास्त्रज्ञांच्या लक्षात आले कि याचे मूळ शौचास बसण्याच्या "मॉडर्न" आधुनिक पद्धतीमध्ये आहे. इथे शौचास कमोड वापरतात. आतिशय आरामात खुर्चीवर बसल्यासारखे शी करायला बसायचे. परंतु त्यामुळे शरीरातील आतल्या भागावर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास कमोड बनवणार्या कंपन्यांनी केला नाही. याचे परिणाम अमेरिकेतील आजची म्हातारी पिढी भोगती आहे. आणि आता आपण ती पद्धती अवलंबली आहे. वर्षानुवर्षे शौचास खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसल्याने त्यांना आता कॅन्सरसारख्या रोगाला तोंड द्यावे लागते आहे. मग त्यांनी रिसर्च केला आणि काय शोधून काढले ते पहा.

squattypotty

ऋजुतानेही तिच्या सत्रात शौचास बसण्याची आपली भारतीय बैठक कशी बरोबर आहे हे न लाजता सर्वांसमोर बसून दाखवले. मी देखील न लाजता इथे नमूद करू इच्छितो कि (अमेरिकेत सगळीकडेच कमोड असल्याने दुसरा मार्ग नसल्याने शेवटी कमोडवर चढून बसून) भारतीय बैठकीप्रमाणे शौचास बसतो. त्याशिवाय होतच नाही राव आपला कोठा खाली. त्याचबरोबर ऋजुताने सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे कसे चांगले हे सांगितले. गार पाणी पिले जात नसेल तर थोडेसे कोमट करून प्या पण कमीत कमी एक ग्लास पाणी प्या. माझे ७० वर्षांचे बाबा अजूनही नित्यनियमाने पितात. त्यांचे बघून मी हि पिऊ लागलो. सगळ्यांचे आजी आजोबा बाबा पीत असतील. पण आजचे किती पालक स्वतः सकाळी पाणी पितात आणि आपल्या मुलांना सकाळी पाणी पिण्याची सवय लावतात?

झोप: (लेखकाचा आवडता प्रकार) झोपेची वेळ हि रोज ठरलेली असली पाहिजे. आज ११, उद्या १२, किंवा १ असे जर केले तरी तुमचे शारीरिक घड्याळाची घडी (body clock) व्यवस्थित बसत नाही. रोज एका ठराविक वेळेला झोपणे आणि सकाळी बिनागजराचे उठणे हे तुमचे साध्य असले पाहिजे. २५ ते ३५ वयोगटाला साधारण ८ तास झोप आवश्यक आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर कमीत कमी २ तास झोपू नये. झोपताना सर्व इलेक्ट्रोनिक वस्तू बाहेरच्या खोलीत ठेवा. बेडरूममधून टी व्ही, फोन, आय पॅड, आय फोन यांची हकालपट्टी झालीच पाहिजे.

हालचाल आणि व्यायाम (Activity and Exercise): या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हालचाल म्हणजे आपण दिवसभर वेगवेगळ्या कामांसाठी जी हालचाल करतो ती आणि व्यायाम म्हणजे सलग एकसाथ तीव्र गतीने केलेली हालचाल थोडक्यात जिम. दोन्ही वाढले पाहिजे. मग तुम्ही कार्यालयात पाण्याची बाटली मेजावर (जास्त मराठी झाले का? टेबल म्हणतो हवं तर!) आणून ठेवण्यापेक्षा नळावर जाउन पाणी प्यायला जागेवरून वारंवार उठा. सलग एका जागी ४-५ तास बसण्यापेक्षा दर एक-दीड तासाने एक चक्कर मारून या. बसल्या बसल्या खाली वाका. काही पण हालचाल करा पण करा. संध्याकाळी जिम मध्ये गेलात तर अति उत्तम. ऋजुता म्हणते साधारण १५० मिनिटे (२ ते अडीच तास) कमीतकमी एका आठवड्यात तुम्ही व्यायाम केला पाहिजे. माझे लक्ष्य आहे आठवड्यातून फक्त ३ वेळा जिमला जाणे. बघुयात केवढे साध्य होते ते.

===================================================================================

हे सर्व झाल्यावर मग नेहमीसारखे फोटो वगैरे घेणे सुरु झाले.

RD1

सगळ्या घोळक्यामध्ये मग आमचा फोटू. सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देणे आणि फोटो काढणे यामध्ये ऋजुताची कसरत होत होती. मग त्यामध्ये काही फोटोंमध्ये तोंड वेडेवाकडे येणे झाले. कोणाचा xxx हात मध्ये आला.
मग त्याच पोज मध्ये ४-४ फोटो काढून झाले. आणि मग मनासारखा फोटो मिळाल्यावर आमचे कुटुंब आणि आम्ही रविवार संध्याकाळ चांगली गेली या आनंदात घरी यायला निघालो.

Photo2

संदर्भ:
१) ऋजुता दिवेकर न्यूयॉर्क सत्र - २१ सप्टेंबर २०१४
२) प्लास्टिक लिंक : http://www.npr.org/2011/03/02/134196209/study-most-plastics-leach-hormon...

जीवनमानसंदर्भ

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

24 Sep 2014 - 3:06 am | श्रीरंग_जोशी

या विषयावरची माहिती जालावर ओसंडून वाहत असली तरी ती ज्या पद्धतीने सोपी करून सांगितली आहे त्याबद्दल तुमचे आभार.

फोटोज उत्तम आले आहेत.

अमित खोजे's picture

24 Sep 2014 - 8:20 am | अमित खोजे

धन्यवाद श्रीरंग! :)

चित्रगुप्त's picture

24 Sep 2014 - 3:16 am | चित्रगुप्त

छान.
अमेरिकेत 'ऑनेस्ट वेट' दुकानांमधे अतिशय उत्कृष्ट दूध, भाज्या, फळे, आणि सर्व प्रकारचे ऑर्गॅनिक खाद्यपदार्थ मिळतात.
http://www.honestweight.coop/

अमित खोजे's picture

24 Sep 2014 - 8:30 am | अमित खोजे

बघतोच एकदा हे दुकान. जवळपास असेल तर अतिउत्तम !
बाकी तुमच्या डीसी आणि एन वाय च्या कट्ट्याला प्रतिसाद दिलाय तेवढा बघा बरं का ! (कुठली जाहिरात कुठे)

तुम्ही लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मला सध्या मिपावर टंकता येत नसल्यान्/वेळ लागत असल्याने अनाहितामध्ये हेच सगळे कसे लिहायचे हा प्रश्न पडला होता. तुमचा फोटू पाहण्याआधीच वाचताना ते तुम्हीच असणार हे ओळखले. तुमच्या पत्नीचे हसू तिथेही लक्षात रहिले होते. स्ट्रॉबेरी फिल्डस मध्ये मिपाकर असल्यबाद्दल समजले असते तर आपलाही क्विक कट्टा तिथेच पार पडला असता. लेख उत्तम झालाय. मी गेले दीड दिवस मनातल्यामनात तिचेच सल्ले आठवतीये. मायक्रोवेव्ह वापर थांबवण्याचा प्रयत्न करताना कळतेय की आपण किती त्याच्या आधीन झालो आहोत .. आता हळूहळू सगळे झिपलॉक बाहेर काढून टाकणार. आमचा फोटू आला नसल्याने त्यातील आम्ही कोण हे सांगता येणार नाही. एवढे टंकायला अर्धा तास लागलाय. काय करावे?

अमित खोजे's picture

24 Sep 2014 - 7:53 am | अमित खोजे

अर्रे? काय सांगता? मिपाकरसुद्धा या कार्यक्रमाला होते? धत. . मिस झाले कि हो. छोटासा क़्विक कट्टा नक्कीच झाला असता आपला.
पुढच्या अशा एखाद्या कार्यक्रमाला आता आरोळीच ठोकतो "मिपाकरांनी इथे जमा व्हावे हो S S S" :)
बाकी असा कुठला एखादा कार्यक्रम न्यूयॉर्क मध्ये किंवा बॉस्टन मध्ये असेल आणि तुम्ही येणार जाणार असाल तर सांगा. आम्ही यायचा प्रयत्न नक्की करू. घ्या! कार्यक्रमाची कशाला वाट बघायची? आमंत्रणच देतो कि घरी यायचे. नक्की या. :)

तसे तुम्ही लिखाण वाचून फोटू न बघताच आम्हाला ओळखले म्हणजे आम्ही फ़ेमस झालो कि हो! तसं आमच्या व्यक्तिमत्वात काही फारसे विशेष नाही!
(तो फोटो मध्ये वाढलेला पोटाचा आकार लेन्स एफ़्फ़ेक्ट आहे बरं का!) बाकी बायकोला तीचे स्माईल फ़ेमस झाले हे सांगताच काय लाजली अहाहा. दिन बना दिया आपने! तुमचा फोटू वाटल्यास व्यनि करा. नावामागाचा चेहरा दिसला म्हणजे जरा ओळख वाढते ना !

बाकी मिपाच्या लिखाण वहीवर (म्हणजे text editor हो) आपण सुद्धा नाराज आहोत बरं का! आम्हाला तर बुवा अजिबातच टंकता येत नाही मिपाच्या वेब साईटवर. आम्ही आपले गुगल मधून कॉपी पेस्ट करतो. लय सोप्पं हाय. अख्खा लेख तसाच लिहिलाय. हि घ्या लींक
http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

तसे आम्ही ऋजुता निघेपर्यंत थांबलो होतो. लीमाऊसाठी थोडेसे आमचे रेकॉर्डींग कामी आले तर बघा.
https://www.youtube.com/watch?v=lEli7a6t8Vw&feature=youtu.be

आमंत्रणाबद्दल धन्यवाद. गूगल ट्राय करते.
बॉस्टनास कट्ट्याला किंवा नुसते फिरायला आलात तरी आमच्याकडेच या.
सध्या अन्न गरम करायला मावेमध्ये ठेवले की आम्ही लगेच बाहेर काढतोय.
अर्रर्र! हे ग्यासवर गरम करायचेय नाही का? असे चालले आहे.

परवा तिकडे क्लायमेट मार्च असल्याने म्यानहट्टनमधून येताना अर्धा तासाच्या रस्त्याला २ तास लागले त्यामुळे आम्ही तब्बल सहा मिनिटे उशिरा आलो. सत्र संपल्यावर जेवण करून गर्दीतून निघायलाही वेळ लागला. रात्री बॉस्ट्नास पोहोचेपर्यंत साडेबारा झाले. वाईट गर्दी होती!
माझ्याकडील पुस्तकावर ऋजुताची सही घेतली व फोटू काढला. मिपाकर लीमाऊसाठी छोटं क्लिपिंग आणलय. तिने तशी इच्छा व्यक्त केली होती. ऋजुता तेथून निघेपर्यंत थाम्बावेसे वाटत होते पण निघावे लागले. तुम्ही (मिपाकर) तिथे असून आपण भेटलो नाही याचे वाईट वाटतेय.

विटेकर's picture

24 Sep 2014 - 9:57 am | विटेकर

लेखन विषय आणि लेखन शैली आवडली.
वास्तविक ॠजुता सांगते तेच आमची आई पण सांगते , पण तिचे ऐकते कोण ?
तूप खायला परवानगी आहे हे ऐकून मूठभर मास चढले आहे !
बाकी जग खरोखरच जवळ आले आहे ! भारतातील ( पुणे - मुंबई ) आणि अमेरिकेतील जीवनशैलीमध्ये फारसा फरक नाही ! (.....आणि कदाचित आण खी काही वर्षात त्यात मंगळाची भर पड्णार !)
असो , इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद !

मृत्युन्जय's picture

24 Sep 2014 - 10:46 am | मृत्युन्जय

मस्तच.

उमा @ मिपा's picture

24 Sep 2014 - 10:53 am | उमा @ मिपा

छान लिहिलंय, अगदी सोपं करून! धन्यवाद. तुमचं अभिनंदन ऋजुताला भेटायला मिळाल्याबद्दल.

उदाहरणार्थ पोटावरील साचलेला मेद, ट्रायग्लीसराइड ची पातळी
बहुतेक हीच पातळी माझ्या रिपोर्ट मधे प्रचंड आढळली होती होती अस माझ्या मध्यंतरी काढलेल्या रिपोर्ट मधे होते असे वाटते. :(

अन्नावरील अत्याचाराचे हे उत्तम उदाहरण. अशा अन्नापासून किती पोषण मुल्य मिळते ते बिचार्या पोटुरावांनाच ठाऊक. मुळात ताजे अन्न या संकल्पनेलाच फाट्यावर मारले जाते. अन्न हे नेहमी सगळीकडून एकसमान आणि सावकाश गरम करावे. स्वयंपाकाचा गॅस हा उत्तम. सावकाश ढवळत आपली भाजी गरम करावी. मायक्रोवेव्हमुळे ते एकसमान गरम होत नाही. त्यातील पोषणमुल्य कमी होते ते वेगळेच. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर शक्य तेवढा टाळलेला बरा.
हे सर्व वाचुन मलाच माझा मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ? या धाग्यावरील हा प्रतिसाद आठवला ! मायक्रोवेव्ह वापरनेवालो जागे हो जाओ भाई. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

अमित खोजे's picture

25 Sep 2014 - 1:17 am | अमित खोजे

कोणती पातळी किती वाढल्याने काय होईल ते तुम्ही डॉक्टरांकडून समजावून घ्या पण तब्येतीची काळजी मात्र जरूर घ्या हो.
दवाखान्यात जाउन औषधपाणी करण्यापेक्षा कैक पटीने स्वस्त असते ते. *shok*

ओक्के, धन्यवाद ! आहार पद्धती बर्‍याच प्रमाणात बदलली आहे,पण व्यायामाचे मनावर घ्यायला हवे आहे अजुन.कामाचा ताण आणि कोणत्याही वेळी काम करण्यामुळे परिस्थीती जरा खराब झाली होती. उदा. संध्याकाळी ७ वाजता ऑफिस मधे पोहचुन युएस शिफ्ट करुन {कारण त्यांची माणसे सुट्टीवर} सकाळी ७ वाजता घरी यायचे मग ३ तास नावा पुरती झोप घेउन परत घरुन लॅपटॉपवरुन सपोरर्ट द्यायचा संध्याकाळी ५ वाजे पर्यंत {कारण या दिवसाचे बिलींग बुडता कामा नये ! }
कधी कधी नक्की काय आणि कसा जगतोय त्याचाच पत्ता लागत नाही...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

दिवेकर होय, लेखाच्या नावावरुन मला वाटले देशमुख.
असो
लेख, सेंट्रल पार्कचे फोटु मस्त

कवितानागेश's picture

24 Sep 2014 - 12:00 pm | कवितानागेश

उपयोगी धागा. :)
क्लिपिन्ग बद्दल थॅन्क्स.

स्पा's picture

24 Sep 2014 - 12:17 pm | स्पा

असेच बोलतो :)

आवडली. व्ह्डिओ क्लीप अगदि ओझरती पाहिली आहे (ऑफिसात असल्यामुळे). घरी जाउन आता निवांत पाहिन. बाय द वे तीने क्लीप मधे सांगीतल्याप्रमाणे "पनीर" ईज बेस्ट चीज सोर्स. तेव्हा मंडळी पनीर ला नाकं मुरडू नका.

दिपक.कुवेत's picture

24 Sep 2014 - 12:07 pm | दिपक.कुवेत

असं वाचावे.

Maharani's picture

24 Sep 2014 - 12:09 pm | Maharani

अरे वाह..छान माहिती..

शिद's picture

24 Sep 2014 - 1:44 pm | शिद

माहितीपूर्ण लेख.

सगळं पटतं पण व्यायाम करण्याचा प्रचंड कंटाळा येतो. :(

दिपक.कुवेत's picture

24 Sep 2014 - 1:59 pm | दिपक.कुवेत

मग आवडेल असा व्यायाम करत जा :D कॅलरीज बर्न झाल्याशी मतलब!!!

शिद's picture

24 Sep 2014 - 2:14 pm | शिद

*biggrin*

ह्या बाईंचे आपण तर फ्यान आहोत. ते डोन्ट लूज युअर माइंड पुस्तक एकदा वाचलं की आपलं आपल्यालाच कधी, काय, कसं खावं हे आपलं आपल्यालाच व्यवस्थित लक्षात येतं.

ह्या बाईंचे आपण तर फ्यान आहोत

आणि आम्ही तुमचे . :D

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2014 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा

@आणि आम्ही तुमचे.>> =))
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे(च) म्हंन्तो! =))

प्यारे१'s picture

24 Sep 2014 - 4:05 pm | प्यारे१

आम्ही पन आशेच म्हन्तो.
- नवपुणेकर सूडचा फॅन.

बाकी गुर्जी ठिपक्याच्या पण रांगोळ्या काढता काय? उभे १० आडवे ८ वगैरे?

हँगओव्हर उतरला नाय का प्यारेकाका? अचानक गोग्गोड बोलताय म्हणून म्हटलं!!

आणि हो या नादात सल्ले बिल्ले देऊ नका बरं का!! चोरुन पोळीवर तूप वाढाल आणि गावभर बोंबलून सांगाल. ;)

स्पा's picture

24 Sep 2014 - 4:14 pm | स्पा

अर्र लैच =))

प्यारे१'s picture

24 Sep 2014 - 4:21 pm | प्यारे१

तुझ्या ह्या कुत्सित बोलण्याचाच फॅन आहे रे! :)

आम्हाला नाही जमत असं बोलायला.

सूड's picture

24 Sep 2014 - 4:41 pm | सूड

आवरा!!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2014 - 4:48 pm | अत्रुप्त आत्मा

@बाकी गुर्जी ठिपक्याच्या पण रांगोळ्या काढता काय?>>> त्या काय फक्त आम्हीच-काढतो का? :p

अनन्न्या's picture

24 Sep 2014 - 4:39 pm | अनन्न्या

ऋजुताने तुपाच्या वापरावर बराच भर दिला. अगदी तेलापेक्षा तुपामध्ये भाज्या बनवणे कसे चांगले आहे येथून ते तूप खाऊन वजन कसे कमी करायचे यापर्यंत सर्व मार्ग सांगितले........
याबद्दल जरा सविस्तर लिहा, तुपातल्या चमच्यासारखा हात आखडता घेतलायत लिहीताना पण!

अमित खोजे's picture

24 Sep 2014 - 8:47 pm | अमित खोजे

पण अहो ती एवढ्या भराभर माहिती सांगत होती कि मला एक मुद्दा नोंद करून घेण्यास जेवढा वेळ लागत होता त्यात ती तिसर्या मुद्द्यावर पोहोचत होती.
तुपाची माहिती तिने एकाच वेळी अशी नाही तर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक वेळा दिली. ती सर्व माहिती मला संकलित नाही करता आली.
मला सर्व सेशन रेकॉर्ड करायची आयडिया अगोदर आली असती तर संपूर्ण दोन तासाचे रेकॉर्डिंग मी नक्की केले असते. घरी आल्यावर लेख लिहिताना कितीतरी वेळा बायकोला मी हे बोलून दाखवले. सत्र संपल्यावर गर्दीमध्ये लोकं तिला प्रश्न विचारायला येतच होते तेव्हा मी हे मोबाइल वर रेकॉर्डिंग केले. १० मिनिटाचे रेकॉर्डिंग १.५ जी बी झाले.

आता पुढच्या वेळेला छानसा चांगला कॅमेरा घेऊन जाईन.

प्यारे१'s picture

24 Sep 2014 - 4:48 pm | प्यारे१

ऋजुता मॅडमचे सल्ले कॉमन मेसमध्ये खाणारांना कितपत जमतील ते चेक करायला हवं.
जमवायला पाहिजे पण.

बाकी ते ७०० एकरचं पार्क खूपच देखणं दिसतंय. आवडलंच.

अमित खोजे's picture

24 Sep 2014 - 8:53 pm | अमित खोजे

मेस मधील खाणे परवडले कारण ते रोज ताजे बनवलेले असते असे मला वाटते. मान्य त्यामध्ये आपण काय खातो त्यात आपल्याला फारसा पर्याय नसतो. पण आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा रोज रोज घरी बनवणे थोडेसे कष्टदायक ठरू शकते. मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते. त्यामुळे अशा लोकांपेक्षा तुम्ही सुखी आहात असे मी म्हणेन.

आमच्या मागच्या जन्माच्या पुण्याईने रोज घरी ताजा स्वयंपाक बनवणारी बायको आम्हाला मिळाली आहे. :)

प्रभाकर पेठकर's picture

12 Oct 2014 - 2:46 am | प्रभाकर पेठकर

मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते.

बापरे! असे कांही स्वप्नात जरी आले तरी दचकून जागा होईन. देवाच्या दयेने वेळ आणि आवड दोन्ही असल्याने रोजचे जेवण रोज करतो. हां, कधी उरले तर दूसर्‍या काय तिसर्‍या दिवशीही खातो. पण सहसा उरतच नाही...

रायनची आई's picture

24 Sep 2014 - 4:49 pm | रायनची आई

छान लिहिलय हो तुम्ही..ही माहिती ईथे भारतात राहणार्‍याना पण खूप उपयोगी आहे..आजच घरी जाऊन नवर्‍याला हा लेख दाखवते :-)

रेवती's picture

24 Sep 2014 - 6:41 pm | रेवती

माझा फोटू व्य.नि. करीन पण अगदीच मोहरीवढा वर आलाय.
त्यावेळी नवरा व मुलगा गाडीत विसरलेले पुस्तक आणायला गेले होते. एक पिवळा शर्टधारी महिला पांढरी पाटलोण घातलेली उभी आहे. तिच्या एका पायाशी एक मुलगी आहे (मोठे केसवाली) व दुसर्या पायाशी मी बसलीये (वितभर केसवाली). हाताला गुढग्याचा आधार घेतल्याने हात मात्र दिसतोय. असं जमिनीवर इतकावेळ बसायची सवय कुठे राहिलीये.

अमित खोजे's picture

24 Sep 2014 - 8:39 pm | अमित खोजे

पहिल्या दीड तास तसं बसून पायाची वाट लागली होती. शेवटचा अर्धा तास मी वज्रासनात बसलो मग.

सुबोध खरे's picture

24 Sep 2014 - 8:21 pm | सुबोध खरे

ऋजुता ताई आणी काही असहमती
ऋजुता ताई नवीन वाचले कि लगेच त्याची भरमसाट स्तुती करायला लागतात. यात साजूक तूप आल्याचे आढळते.
मागे त्यांचा एक व्हीडीओ पहिला होता त्यात त्यांनी तूप वर्ज्य करा असे सांगितल्याचे आठवते.
१)कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. या प्रमाणेच प्रत्येक गोष्ट साजूक तुपातच शिजवा हे म्हणणे हि बरोबर नाही. आपण रोजच्या जेवणात वापरतो ते गोडे तेल किंवा तिळाचे हे तुपापेक्षा जास्त आरोग्यदायक आहे. सूर्यफुलाचे तेल किंवा तांदुळाचे तेल सुद्धा जास्त आरोग्यदायक आहे.
ज्या गोष्टी तेलात तळायच्या त्या तेलातच तळाव्या आणि ज्याला तूप लागते त्याला तुपच वापरावे. सर्व गीष्टी प्रमाणात असाव्यात.

२)फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे? स्किम्ड मिल्क मध्ये फक्त लोणी काढून टाकलेले असते. त्यातील प्रथिने, साखर, कॅल्शियम आणि अ ड ई आणि के जीवनसत्त्वे आहेतच कि. गायीच्या दुधात ३. २ ते ३.५ % आणि म्हशीच्या दुधात ५-६ % प्रथिने असतात. म्हणजे रोज दोन ग्लास दुध प्यायलात तर आपल्याला १४ ( गायीचे दुध) ते २४ ग्रॅम ( म्हशीचे) उत्तम दर्ज्याची प्रथिने मिळतात. मग ते पांढरे पाणी कसे?

३) ब्राऊन राइस मध्ये फक्त ३.५ टक्के फायबर( चोथा) असतो त्याने शरीरात फायबरचे प्रमाण कसे कमी होईल सध्या गाजरात किंवा फरसबी मध्येही २. ८ टक्के चोथा असतो मग त्या भातानेच काय घोडे मारले? ठाणे जिल्ह्यात किंवा तामिळनाडू मध्ये ग्रामीण लोक शतकानुशतके न सडलेला किंवा हातसडीचा तांदूळ खात आले आहेत त्यांचे कुठे काय वाईट झाले?
शिवाय आपण जर अल्युमिनियम ची भांडी शिजवायला वापरतच नसाल तर अल्युमिनियम शरीरात शोषले जाईल च कसे? शिवाय जस्त( झिंक) भरपूर असलेल्या पदार्थात भात हा पहिल्या वीसातही येत नाही मग त्याची चिंता कशाला. त्याचे उत्तम सोर्स म्हणजे तिसर्या ,मासे, मटण , गहू , पालक , काजू आणि मुग मटकी सारखी कडधान्ये.
४) मायक्रो वेव्ह ओव्हन मध्येअन्न गरम केल्याने त्यातील पोषण मुल्ये कमी होतात याला अजून तरी कोणताही शास्त्राधार सापडलेला नाही. आपण प्लास्टिक मध्ये ते गरम न करता काचेच्या भांड्यात गरम करा आणि दर १५ ते २० सेकंदाने बाहेर काढून ढवळा म्हणजे सर्वत्र सारखे गरम होईल
माओचा पदार्थतल्या जीवनसत्वांवर विपरीत परिणाम
खरं तर मा वे ओ ने अन्नद्रव्यांचा र्हास सर्वात कमी होतो
खालील दुवे पहा
http://www.health.harvard.edu/fhg/updates/Microwave-cooking-and-nutritio...
http://www.arimifoods.com/microwave-oven-kills-nutrients-%E2%80%93-who-s...

५) शक्य असेल तर रोज ताज्या भाज्या खाव्यात या बद्दल शंकाच नाही. सोय म्हणून आठवड्याच्या भाज्या फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा रोज किंवा एक दिवसाआड भाज्या आणून शक्य तितक्या ताज्या खाव्यात पण दोन चार दिवसांनी भाजी खाल्ल्यामुळे त्यातील पोषणमूल्ये खूप कमी होतात हे सत्य नाही. उलट काही भाज्या शेता जवळ ताबडतोब गोठवल्याने त्यांची पोषणमूल्ये जास्त टिकून राहतात हे आढळून आलेले आहे. उदा. मटार.

६) भारतात तरी ऑर्गनिक गोष्टी खरोखरच तशा आहेत हे सिद्ध करणे कठीण आहे त्या दृष्टीने कोणतेही नियामक सूत्र किंवा नियमवाली नाही. आपल्याला मिळणारा ब्राऊन ब्रेड हा ब्राऊन रंग घातलेला असतो. उदा
http://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/diet/5-food...
अमेरिकेचे मला सांगता येणार नाही.
७) स्थानिक अन्न खावे हे ठीक आहे पण संत्री खायची असतील तर ती नागपूरचीच मग नागपूर महाराष्ट्रात असेल तरी ८५० किमी आहे मग एकतर रायगड किंवा ठाणे जिल्ह्यातीलच अन्न खावे हे शक्य आहे काय ?.

८) देवगडचा हापूस काही आपण झाडावर पिकलेला खात नाही. मग तो आढीत घालून मुंबईला न्या किंवा अमेरिकेला तो पिकला कि चांगला लागेल जास्त पिकला तर नाही. झाडावर पिकलेल्या फळांची/ भाज्यांची गोष्ट वेगळी आहे.
बाकी त्यांनी सांगितलेल्या व्यायाम किंवा इतर गोष्टी स्वागतार्ह आहेतच.

आजानुकर्ण's picture

24 Sep 2014 - 8:56 pm | आजानुकर्ण

सहमत. सुरुवातीला दिवेकर यांच्या लेखनाने मी बराच प्रभावित झालो होतो. पण त्यांच्या लेखनात आशय कमी आणि मार्केटिंग जास्त आहे असं नंतर लक्षात आलं.

रामपुरी's picture

24 Sep 2014 - 10:24 pm | रामपुरी

बहुतांश आहारतज्ञांची बहुतांश मते ही वाचून सोडून देण्यासारखीच असतात. ब्राऊन राईस, ब्राऊन ब्रेड, ऑरगॅनिक फूड, इत्यादी बद्दलची मते वाचून हहपुवा. खालील संकेतस्थळ यासंदर्भात थोडी माहीती देईल.
http://www.nongmoproject.org/

रच्याकने.. कोण ऋजुता दिवेकर?

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2014 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

बहुतेक आहारतज्ञ (विशेषतः ज्यांच्या नावे पुस्तक आहे किंवा खास आहार (डाएट प्लॅन) आहे ते) आपल्या बाजूचा मुद्दा जरा जास्तच ताणून सांगतात असे दिसते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Oct 2014 - 11:32 am | विश्वनाथ मेहेंदळे

फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे?

अमेरिकेत मिळणारे दुध खरेच तसे असते हो. मी शास्त्रीय प्रयोग केले नाहीत, फक्त पिउन पाहिले. लई बेचव असते राव.

क्र. ३ मध्ये आपण म्हणताय तेच तिने मुख्य व्याख्यानात सांगितले. पूर्वीपासून तीच रित चालत आल्याचे सांगताना वारली चित्रकलेचा आधार घेतलाय. तांदूळ सडल्यावर जेवढा आहे तेवढा चोथा पुरेसा आहे. अगदी चकाचक पॉलीशवाला नको. तसेच ब्राऊन तांदळाचे प्रकार मी इथे तरी बगितलेत ते फिकट ब्राऊन ते गर्द ब्राऊन होते. उग्गीच खूप काही स्पेशल करू नका. जे आसपास बरं मिळतय ते खावा. एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा.

>>एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा.

करेक्ट!! मी फक्त पुस्तक वाचलंय पण त्यातही तिने जे काही लिहीलंय ते विचार करण्यासारखं आहे. उदाहरणार्थ कसं खावं, आणि काय कधी खावं..तिच्या म्हणण्यानुसार बकाबका खाण्याने तुम्ही अन्नाची चव तर घेतच नाही पण अन्न पोत्यात भरल्यासारखं नुसतं भरत जाता. तसं न करता एकेक घास चव घेऊन नीट चावून खा (लोक म्हणतील आमची आजी वैगरे काय वेगळं सांगत होती, पण काही गोष्टी आठवून देण्याची गरज पडते). एकदा खाण्याचा वेग कमी झाला की खाण्याचं प्रमाणही कमी होईल.

दुसरं म्हणजे गोड खायचंच असेल तर सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खा. दिवसभर कार्यरत राहिल्यामुळे ह्या क्यालरीज शरीर वापरु शकेल.

*ह्या पुस्तक वाचल्यानंतर मला समजलेल्या गोष्टी तज्ञ व इतर लोकांच्या मतांचा आदर आहेच!!

॥इति लेखनसीमा॥

रेवती's picture

24 Sep 2014 - 9:40 pm | रेवती

ग्रामीण भागात लोक ज्याप्रकारचे अन्न वर्षानुवर्ष्रे खातायत ते त्यांना खाऊ द्या, ते त्यांना पचणार आहे. आजकाल लोक लहानपणापासून जे सधं खात आलेत ते सोडून एकदम ब्राऊन राईस खातायत त्याबद्दल तसे तिचे म्हणणे आहे. त्यासाठे किन्वा या धान्यावर ती काहीवेळ बोलली.
क्र.५ दोन दिवसाबद्दल तिचे म्हणणे नाही. ३ दिवसात सगळे संपवा असे म्हणणे आहे. फ्रीज स्वच्छ ठेवा, शिलेपाके काढून टाका, त्याने चांगले पदार्थ दुषित होणार नाहीत.

रेवती's picture

24 Sep 2014 - 9:52 pm | रेवती

६. ऑरग्यानिक फूड, ब्राऊन ब्रेडबद्दलही तेच! ताजे खावा, मग ते ऑरग्यानिक नसले तरी चालेल.
७. त्याबद्दल तिचे काही म्हणणे नाही. संत्री नागपूरहून येऊ द्या, फक्त सिझनल असू द्या, जास्तीची औषधे टिकवण्यासाठी वापरू नका वगैरे.
८. भारतातून निघालेला हापूस हामेरिकेत येइपर्यंत एकतर तो नासतो (कच्चा, आढीत घातलेला) किंवा औषधे लावून टिकवल्यावर न्यूट्रीशनवर परिणाम होतो. तसे नको. आम्ही इथे मेक्सिकन आंबा खातो. चाम्गला असतो.
पूर्वी केळ्यांचे कच्चे घड भरून ट्रक निघाला की त्यात लवंगा टाकत असत. त्यने केळी बाजारात येइपर्यंत दोनेक दिवसात पिकायची. आता कसल्याशा पावडरी लावतात असे ऐकून आहे. नैसर्गिक पिकलेली केळी खाणे चांगलेच पण तसे मिळत नसल्यास लवंगांनी पिकवलेली चांगली की पावडारीने?

अमित खोजे's picture

24 Sep 2014 - 10:14 pm | अमित खोजे

डॉक्टरसाहेब,

ज्या प्रतिक्रियेची मी आवर्जून वाट पाहत होतो ती टाकल्या बद्दल खरंच मनापासून धन्यवाद. या निमित्ताने आपल्याशी चर्चा करावयास मिळेल असे वाटते. बाकी आपल्या सर्व लेखांचा आणि इतरांच्या लेखांवरील प्रतिक्रियांचा आपण तर बाबा पंखा आहोत.

कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी.
ह्या वाक्याला कोणी आक्षेप घेईल असे मला वाटत नाही. प्रतिक्रियांमध्ये पोस्ट केलेल्या त्या व्हिडीओ मध्ये मी ऋजुताला साबुदाण्याबद्दल प्रश्न विचारला होता. कि साबुदाणा खाल्लेलं चांगलं का? साबुदाण्याची खिचडी खाल्ली कि मला पोटात जड झाल्यासारखे वाटते. त्यावर तिने सांगितलेच कि साबुदाणा खिचडी खाऊ शकता परंतु प्रमाणात खा. जास्त खाल्लं कि त्रास हा होणारच.

तसेच तिने तुपाबद्दल पण सांगितले. तुपाचा वापर मर्यादितच करावा. भाजीत तळण्यासाठी रोज नाही पण करू शकता असा मानस होता. आजकालच्या शाळेतील मुली 'फिगर सांभाळायची म्हणून' अजिबात तूप खायचे नाही, अजिबात तेलकट खायचे नाही असे करतात. त्यामुळे त्या स्निग्ध पदार्थांपासून मिळणारे पोषणतत्वे त्यांना मिळत नाही. त्या विषयावर बोलताना (आणि अशा इतर अनेक विषयांवर बोलताना) तिने तुपाचे उदाहरण दिले. तूप खाणे चांगले आणि ते खा असा तिचा मंत्र आहे.

बाकी तुमचे दुधाबद्दलचे/ मायक्रोवेव्हबद्दलचे विचार शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असतील हि. परंतु हे सर्व शास्त्र नवीन आहे. गेल्या ५० - ७० वर्षातील प्रगती आहे. ते पूर्णपणे नाकारायची चूक मी करणार नाही. परंतु त्यात नवीन नवीन भर रोज होत असते. व्हिडीओमध्ये तिने सांगितल्या प्रमाणे अन्नाला आणि त्यातील पोषण मूल्याला या Food Science आणि Food Industry ने जे ठराविक भागांमध्ये (प्रोटीन, कर्बोदके, मेद, इत्यादी) विभागले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक अन्नाच्या पोषणमूल्याबद्दल समजणे अजून बाकी आहे जे शास्त्राला आणि पर्यायाने आपल्याला अजूनही माहित नाही. रोज नवीन नवीन माहिती समोर येत असल्याने अगोदरच्या अर्धवट माहिती मध्ये भर पडली जाते आणि काही अंशी ती चुकीचीहि ठरवली जाते. (कृपया विदा मागू नये)

आपल्या ज्ञानाच्या विस्तारासाठी आपण विदा वगैरे शोधतो. हार्वर्डने ते संशोधन केले आहे म्हणून ते परिपूर्ण समजायचे का? तुम्ही दिलेल्या विदामध्येसुद्धा स्पेन मधील ज्या शास्त्रज्ञांनी २००३ मध्ये प्रयोग केला होता त्यातील चुका दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माओ कसा चांगला हे दाखवून दिले आहे. कशावरून असे रिसर्च हे माओ कंपनी पुरस्कृत नसतात?

मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार.

मला एवढेच म्हणायचे कि शास्त्राने जी काही प्रगती केलेली असते ती कालसापेक्ष असते किंवा ती त्या काळापर्यंत मिळालेल्या ज्ञानानुसार बरोबर असते असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
आपल्या सुदैवाने आपल्याला आयुर्वेदाची देणगी आहे. हा अन्नावरील रिसर्च अगोदरच आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे. नक्कीच तो आंधळेपणाने जरी स्वीकारायचा नाही म्हटला तरीही आजचे शास्त्र वापरून आपण तो कन्फर्म करून वापरू शकतो.
मग शास्त्राचे तात्कालिक शोध - तेच सत्य म्हणून स्वीकारून, आपली आपण आपली जीवन पद्धती लाक्षणिकरित्या बदलून भविष्यामध्ये येणाऱ्या परिणामांना सामोरे जायचे का?

उदाहरण एक खाली देतो. नक्कीच डॉक्टर असल्याने हे तुम्हाला माहिती असेल. बाकी वाचकांसाठी हि माहिती. हा मुद्दा खरंतर संपादकांना विनंती करून मूळ लेखात टाकण्याचा विचार होता परंतु आता इथेच लिहितो.

शौचास बसण्याची पद्धत:
अमेरिकेतील बर्याच प्रौढांना गुदद्वाराचे बरेच आजार होतात. कॅन्सरहि होतात. ५० वर्षांनतर कॉलोनोस्कॉपी करून घ्यावी असे डॉक्टर्स सांगतात. बाळाचे दुधाचे दात पडणे जसे नॉर्मल तशी इथे कॉलोनोस्कॉपी आता नॉर्मल झाली आहे. बर्याच संशोधनाअंती शास्त्रज्ञांच्या लक्षात आले कि याचे मूळ शौचास बसण्याच्या "मॉडर्न" आधुनिक पद्धतीमध्ये आहे. इथे शौचास कमोड वापरतात. आतिशय आरामात खुर्चीवर बसल्यासारखे शी करायला बसायचे. परंतु त्यामुळे शरीरातील आतल्या भागावर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास कमोड बनवणार्या कंपन्यांनी केला नाही. याचे परिणाम अमेरिकेतील आजची म्हातारी पिढी भोगती आहे. आणि आता आपण ती पद्धती अवलंबली आहे. वर्षानुवर्षे शौचास खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसल्याने त्यांना आता कॅन्सरसारख्या रोगाला तोंड द्यावे लागते आहे. मग त्यांनी रिसर्च केला आणि काय शोधून काढले ते पहा.

squattypotty

ऋजुतानेही तिच्या सत्रात शौचास बसण्याची आपली भारतीय बैठक कशी बरोबर आहे हे न लाजता सर्वांसमोर बसून दाखवले. मी देखील न लाजता इथे नमूद करू इच्छितो कि (अमेरिकेत सगळीकडेच कमोड असल्याने दुसरा मार्ग नसल्याने शेवटी कमोडवर चढून बसून) भारतीय बैठकीप्रमाणे शौचास बसतो. त्याशिवाय होतच नाही राव आपला कोठा खाली. त्याचबरोबर ऋजुताने सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे कसे चांगले हे सांगितले. गार पाणी पिले जात नसेल तर थोडेसे कोमट करून प्या पण कमीत कमी एक ग्लास पाणी प्या. माझे ७० वर्षांचे बाबा अजूनही नित्यनियमाने पितात. त्यांचे बघून मी हि पिऊ लागलो. सगळ्यांचे आजी आजोबा बाबा पीत असतील. पण आजचे किती पालक स्वतः सकाळी पाणी पितात आणि आपल्या मुलांना सकाळी पाणी पिण्याची सवय लावतात?

आजानुकर्ण's picture

24 Sep 2014 - 10:36 pm | आजानुकर्ण

अमेरिकेतील शौचाचे आजार हे कमोडमुळे नसून, मैद्याचे (कमी फायबरवाले) पदार्थ खाल्याने झाले असावेत.

रामपुरी's picture

24 Sep 2014 - 10:58 pm | रामपुरी

मांसाहाराचा जास्तीत जास्त समावेश, कमीत कमी भाज्या फळे, कमी शारिरीक श्रम/चालणे (जर शक्य झालं तर हे लोक शौचकूपात सुद्धा गाडीतून जातील) ही प्रमुख कारणे असावीत असं वाटतं.

मदनबाण's picture

25 Sep 2014 - 10:35 am | मदनबाण

मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार.
च्यामारी या मायक्रोवेव्हमुळे मी अजुन कणफ्युज झालो आहे... खरचं त्रास होउ शकतो की नाही ? जालावर अनेक दावे प्रतिदावे वाचावयास मिळत आहेत ! पण त्यामुळे अजुन गोंधळ उडतो आहे.
असाच एक अजुन दुवा उघडुन वाचला :- http://www.health101.org/art_microwaving.htm
अजुनही कळत नाही की मायक्रोवेव्ह सेफ आहे की नाही ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

सुबोध खरे's picture

25 Sep 2014 - 1:01 pm | सुबोध खरे

बाण साहेब
जोपर्यंत संशय आहे तोवर मायक्रो वेव्ह मध्ये किंवा साठवणी साठी काचेच्या बाटल्याच वापराव्या. एक टप्पर वेअर नावाचे फॅड बायकांमध्ये फार आहे. ते सुद्धा एक प्लास्टीकच आहे आणि भरपूर महागही आहे. तेंव्हा ते वापरण्यापेक्षा चांगल्या कंपनीची ( बोरोसील/ कॉर्निंग) काचेची भांडी साठवणीसाठी वापरावीत असे मला वाटते. ( बर्याच अनाहिता माझ्या अंगावर धावून येण्याची शक्यता आहे).
पण मायक्रो वेव्ह मध्ये पदार्थात विषे मिसळली जातात म्हणून ते वापरायचे नाही आणि विविध प्रकारची शीतपेये (कोक इ ) किंवा मदिरेचे प्रकार प्यायचे यात काय साध्य होणार आहे.
निखार्यावर शिजवलेले मांस यामुळे पण कर्करोग होतो असे आता दिसून आले आहे http://www.slate.com/articles/health_and_science/medical_examiner/2014/0...
मग आता खावे काय आणि कसे ?
अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा.

अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा.
ओक्के. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

टपरवेअरबाबत अगदी सहमत. वापरूच नये असे नाही पण प्रमाणात! तसेही काचेचे कंटेनर वापरणे जास्त योग्य!
अ‍ॅल्युमिनिअम फॉईममध्ये पदार्थ गुंडाळून नेणे, पदार्थांवर झाकण म्हणून फॉईलचा उपयोगही टाळायला सांगितले आहे. या सगळ्याचा अर्थ कोणताच अतिरेक नको इतपत घेतला की बरेचसे नियम ताण न येता पाळले जातील असे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

12 Oct 2014 - 3:10 am | प्रभाकर पेठकर

सर्वसाधारण तापमानाला फूड सेफ प्लॅस्टीक कंटेनर्सचा अन्नावर विपरीत परिणाम होत नाही. पण अतिउष्ण आणि अतिशीत तापमानाला प्लॅस्टीक मधील धोकादायक रसायनं अन्नात मिसळतात. त्यामुळे पाण्याच्या बाटल्याही डिपफ्रिज मध्ये ठेवू नये. (पाणी लवकर थंड करण्यासाठी) आणि पाण्याची बाटली चुकून गाडीत राहिली असेल आणि बाहेरील तापमान ३५-४० सेंटी असेल तर ते पाणी पिऊ नये.
हल्ली वॉट्स अप, फेसबुक आणि आंतरजालावरील इतर संस्थळावरून एव्हढी परस्पर विरोधी माहिती वाचनात येते की मन गोंधळून जाते.
ताजे अन्न खा, प्रोसेस्ड आणि कॅन्ड फुट टाळा. मैदा टाळा, पॉलीश्ड बासमती भात टाळा, फळे धुवून घ्या, रोज कमीत कमी २० मिनिटे जलद चालण्याचा व्यायाम करा, कमीत कमी ७ तास झोप घ्या. सुट्टीच्या दिवशी दुपारी एक तासाहून जास्त झोपू नका. सॉफ्ट ड्रिंक्स, केक्स, आइस्क्रिम, बर्गर, हॉट डॉग, अंड्यातील पिवळे टाळा, पांढरा बलक कितीही खा.
सकाळी मोठा नाश्ता करा, दुपारी मध्यम जेवण घ्या, रात्री अत्यल्प जेवण घ्या.

पहाटवारा's picture

25 Sep 2014 - 2:03 am | पहाटवारा

डॉ.मालती कारवारकर बाईंची पण या विषयावर अनेक ऊत्तम पुस्तके आहेत.

-पहाटवारा

सुबोध खरे's picture

25 Sep 2014 - 10:32 am | सुबोध खरे

आहारतज्ञ बर्याच वेळेस सल्ला तांत्रिकदृष्ट्या बरोबर देतात परंतु तो व्यवहार्य असतोच असे नाही.
एखाद्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला तुम्ही संपूर्णपणे पोळी वर्ज्य करा सांगणे कितपत व्यवहार्य आहे?

आँ? असं ती कुठं म्हणातीये? साऊथींडयनांना जर सवय नसेल तर ते खात नाहीत. प्रत्येकाने ज्या त्या प्रदेशात पिकणारे मुख्य अन्न खावे. एखाद्या गोष्टीचा खाल्ल्याने त्रास होत असेल तर टाळावे.

अत्रन्गि पाउस's picture

25 Sep 2014 - 11:18 am | अत्रन्गि पाउस

खरे तर ते जेनेटिक सवयी .. आहार वगैरे पटते ...पण हल्ली वेगवेगळे रस ब्रोकोली, झुकीनी, दुधी भोपळा आणि आणखीन काय काय...कसे काय करायचे ?
२ पिढ्यांपासून ज्या खाण्याच्या सवयी लागल्यात त्यात फार बदल करू नये आणि तसे ते फार जमतही नाही ... कुठीलीही गोष्ट वर्ज्य नको आणि अति तर नकोच नको...
शरीराच्या बारीक सारीक सिग्नल्स कडे अजिबात दुर्लक्ष नको आणि ४८ तासांपेक्षा जास्त काही त्रास झाला तर तडक डॉक्टर गाठणे
ह्ये आपले सध्या चालू आहे ...

पाषाणभेद's picture

12 Oct 2014 - 5:32 am | पाषाणभेद

फारच उत्तम माहिती सोपी करून सांगितली आपण.

कालपरवाच ऋजुताने एकाला डाएट दिला असल्याची बातमी:
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Rujuta-Romio/art...

मारवा's picture

12 Oct 2014 - 3:07 pm | मारवा

लेख माहीतीपुर्ण आहे फार आवडला.
रुजुता चे फोटो पहील्यांदा च बघितले
देहस्वीनी ची देहयष्टी आवडली
चेहरा सुंदर असता तर ?
असो आणि ते टॉयलेट च्या फोटु ने फार च रसभंग केला हो आणि काय ते सारख सारख
बाकी लेख आवडला

रेवती's picture

12 Oct 2014 - 5:54 pm | रेवती

देहयष्टी वगैरे ठीक आहे मारावाजी, पण चेहऱ्याबद्दल, दिसण्याबद्दल कोणीही बोलूच नये. दिसणे आपल्या हातात नसते, असणे मात्र असते. तुमचे असणे प्रतीसादातून कळतेच आहे. नसेल बघवत चेहरा तर नका बघू! कोणीही आमंत्रण दिलेले नाही. तिने केल्या कामाच्या १ टक्का तरी करता आलेय का तुम्हाला?

अजया's picture

12 Oct 2014 - 6:08 pm | अजया

परत एकदा स्त्रीविषयक,सौंदर्यविषयक, सडका दृष्टिकोन दाखवुन दिल्याबद्दल अाभार.गेट वेल सुन.

दाखवल्याबद्दल तीव्र निषेध!!

(खरंतर मनात असं येतंय की असल्या मनोवृत्तीच्या लोकांना चाबकाने फोडून काढायला हवे!!)

(संतप्त) चतुरंग

>>चेहरा सुंदर असता तर ?

या ओळीनं माती केलीत!! अशाच लोकांच्या दिसण्यावर (कुणी शष्प विचारत नसतानाही) मिपावर आणि बाहेरही कमेंटी मारणार्‍या एक स्वघोषित समीक्षिका आठवल्या. त्यांच्या प्रतिक्रियांना आताशा कोणी हिंग लावूनही विचारत नाही, तुमची तशी गत होऊ देऊ नका.

अगदी असेच म्हणतो.

स्पंदना's picture

16 Oct 2014 - 6:51 am | स्पंदना

काय हो? दिसणं आपल्या हातात असत का? पण असणं आपल्याला हवं तस असू शकत. दिसण हातात असत तर सगळेच बागडू बच्चन अन सगऴ्याच रुपसुंदर्‍या झाल्या असत्या. अन तसेही नुसत दिसण्यावर नशिब ठरल असत तर लेडी डायना सारखी परी आयुष्यात इतकी सफर झाली नसती.
दुसरं म्हणजे टॉयलेटचा फोटो पाहुन तुमचा रसभंग झाला म्हणे. अस करा त्या निषेधार्थ दोन दिवस जाउ नका तिकडे. पाहू कसा रसभंग होतोय तो.
काय माणस तरी असतात एकेक. जाइल तिकडे दिसणं, शरीर या पलिकडे नजर पोहोचतच नाही यांची. इतकी सगळी माणस जमुन काही ऐकतात, विचार करतात ते राहिलं बाजुला. देहयष्टी आवडली म्हणे.

अब बस्स भी करो, रुलायेगी क्या ?

बॅटमॅन's picture

24 Oct 2014 - 3:32 pm | बॅटमॅन

काय कटकटे, देहयष्टी आवडली म्हटले तर लगेच शेरेमार केलाच पाहिजे का? असो, असते हौस एकेकाची/एकेकीची. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Oct 2014 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या नेहमीच्या लेखनाकडे पाहता इतका खालच्या स्तराचा शेरा माराल असे वाटले नव्हते. पण असो. इतकेच पुरे आहे !

प्रभाकर पेठकर's picture

12 Oct 2014 - 8:19 pm | प्रभाकर पेठकर

'बाह्य सौंदर्य' ज्याला शारीरिक सौंदर्य म्हणता येईल आणि 'आंतरीक सौंदर्य' ज्यात ज्ञान, स्वभाव, वृत्ती थोडक्यात 'व्यक्तीमत्व' हे सुद्धा सौंदर्यच आहे. पहिले अशास्वत आणि वयोमानानुसार र्‍हास पावणारे तर दुसरे शास्वत आणि वयोमानानुसार वृद्धींगत होणारे आहे. आता प्रत्येकाने ठरवायचे आहे की अशास्वताला महत्त्व द्यायचे की शास्वताला.
शुभेच्छा..

प्रभाकर पेठकर's picture

13 Oct 2014 - 12:46 pm | प्रभाकर पेठकर

वरील शब्द 'अशाश्वत' आणि 'शाश्वत' असे वाचावेत. चुकी बद्दल क्षमस्व.

अहो जरा सबुरीन घ्या
मी त्यांच्या लेखनाचा चाहता आहे. मी पहील्यांदा च त्यांचे फोटो बघितले मला कुतुहुल होत की करीना ला झिरो फिगर देणारयांची स्वतःची फिगर त्या कशी मेंटेन ठेवत असेल कशी असेल. फोटो बघितल्यावर मला त्यांचे प्रमाणबद्ध शरीरयष्टी आवडली. त्यांचा विषय च फिटनेस आहे शरीरासंदर्भात आरोग्या संदर्भात आहे चांगली फिगर मेंटेन करण्यासाठी शिस्त संयम अनेक गुण लागतात. ते त्यांच्यात आहेत व आरोग्याचा त्या अतिशय सकारात्मक असा प्रचार प्रसार करतात. व विषय च शरीर संदर्भात असल्याने कौतुकाने मी तसे बोललो
आता त्यानंतर चेहरा सुंदर असता तर असे जे म्हणालो त्यात अधिक सुंदर असता तर छान योग जुळुन आला असता इतकेच सुचवायचे होते. ते नसल्याने काहीही फरक पडत नसतो हे मला समजते हो लगेच आंतरीक बाह्य सौंदर्य काय सडकी मनोवृत्ती काय कमाल आहे ?
सहज लाइटली तुम्ही कधी म्हणत नाही का नविन कोणी हिरो हिरोइन आली तर तिच्या सौंदर्यावर एकुण टीप्पणी तुम्ही कधीच करत नाही का ?
असो

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Oct 2014 - 1:06 am | निनाद मुक्काम प...

ऋतुजा दिवेकर
तिच्याशी मराठीतून स्व ताशी ओळख करून दिली असती तर ,
आपण आपल्या लोकांशी आपल्या भाषेत सुरवातीला संवाद साधायला संकोचतो किंवा राणीच्या भाषेचा आपल्यावर पगडा असतो , कुणास ठाऊक
लेखातील माहिती रंजक करून सांगितली त्या बद्दल धन्यवाद
ऋजुता व तिचे घरचे एकदम मराठमोळे आहेत. आयुर्वेद योग ह्यांना आधुनिक काळात वेगळे परिमाण तिने दिले आहे
करीना च्या शून्यकटी मागे हि हिरकणी आहे त्यामुळे तिचा पंचतारांकित दुनियेत खूपच बोलबाला झाला आहे,
तूप भरपूर खा असे ती जेव्हा तार्किक दृष्ट्या पटवून देते तेव्हा वर्षोवर्ष आहारातील अश्या किती अंध श्रद्धा बालपणापासून जोपासत आलो आहे प्रश्न पडतो.

ती एक व्यावसायिक आहे. विविध भाषिक तेथे होते त्यामुळे सगळ्यांना समजेल अशी भाषा वापरण्याचा संकेत तिने पाळला. सगळे मिळून दीड तासात काय नि किती करणार?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Oct 2014 - 2:53 am | निनाद मुक्काम प...

@रेवती ताई
माझा प्रतिसाद धागाकर्त्यास उद्देशून होता. त्याने स्वतःहून ओळख मराठीतून केली असती तर तिने मराठीतून उत्तर दिले असते हे स्वानुभवाने सांगू शकतो.

प्रभाकर पेठकर's picture

16 Oct 2014 - 2:09 pm | प्रभाकर पेठकर

ऋजुता दिवेकर ह्या दिसतात कशा आणि त्यांची देहयष्टी कशी आहे, त्या मराठी असून कुठल्या भाषेत बोलतात ह्या पेक्षा त्यांच्या भाषणात 'आशय' काय आहे आणि किती महत्त्वाचा आहे ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Oct 2014 - 2:46 am | विश्वनाथ मेहेंदळे

बाईंचा व्यवसाय बघता देहयष्टि बद्दल चा शेरा समजू शकतो.

बॅटमॅन's picture

24 Oct 2014 - 3:30 pm | बॅटमॅन

सहमत!

आजानुकर्ण's picture

24 Oct 2014 - 10:56 pm | आजानुकर्ण

लोकांच्या देहयष्टीवर कमेंटा करतच ऋजुता बाईंनी पैशे कमावलेयंत. मारवा यांनी त्यांच्याच औषधाचा ढोस त्यांना दिला असे वाटले. (बाकी प्रतिक्रिया वाचून माफक मनोरंजन झाले.)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Oct 2014 - 12:40 am | निनाद मुक्काम प...

मी येथे सोप्या मराठीत लिहिले, तिच्याशी मराठी भाषेत स्वतःची ओळख ...
येथे दिवे कर ह्यांना उद्देशून अजिबात लिहिले नाही आहे.
आमच्या पंचतारांकित विश्वात ते एक मानाचे नाव आहे. त्यांचे सल्ले अनेक कुबेरपती मुंबईत घेतात ह्याचा मला अभिमान वाटतो,
चाकोरीबद्ध पांढरपेशा समाजात असे वेगळे शेत्र निवडून त्यात अव्वल होणे आणि औद्योगिक शेत्रात ट्रेंड सेटर बनणे

पैसा's picture

17 Oct 2014 - 2:07 pm | पैसा

माहितीपूर्ण धागा.

कपिलमुनी's picture

22 Oct 2014 - 5:22 pm | कपिलमुनी

वर मुलाखत पाहिली . छान मराठी मधून बोलत सर्व प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली.

"तुमच्या शरीररचनेला समजून घ्या " .. सरसकट पुस्तक / डायट फॉलो करू नका हे वाक्य खूप महत्वाच वाटला