नसलेल्या बाईचं असणं.

इनिगोय's picture
इनिगोय in जे न देखे रवी...
25 Jul 2014 - 2:12 pm

आटपाटनगरात नसते एक बाई.
तिला नसतं तिचं नाव.
तिचं नसतं एक घर.
तिचं नसतं एक कुटुंब.
नसतो तिचा एक नवरा.
तिची मुलं तर नसतातच तिची.
नसतात तिची भांडीकुंडी. कपडेलत्ते. फर्निचर वगैरेही.

तिचा नसतो तिचा वेळ.
तिचा दिवस.
तिचे श्रम तिचे नसतात.
इतकंच कशाला.. तिची विश्रांतीही तिची नसते.

तिचं शरीर. तिचं मन.
तिची ओळख. तिचं जगणं.
अहेवपणी नाहीच आलं तर म्हणे मरणही..
...नसतं काहीसुद्धा तिचं.

पण नाही म्हणायला तिचा असतो एक गाव.
नदीकाठी असतं एक... अगदी ऎसपैस चिमुकलं घर!

तिथे असतो तिचा एक मोकळा स्वच्छ श्वास.
असतात सुंदर संध्याकाळी तिच्या.
आणि पहाटेची निवांत वेळ? तीही असतेच.
एखादा झोका.. फुलांनी ओसंडणार्या फांदीला झुलणारा.
असतं एखादं चंदेरी पाखरू.. तिच्या खांद्यावर बसून मोकळे सूर लावणारं.

मुख्य म्हणजे असतं तिचं हसू.

तिच्या नसलेल्यातून या असलेल्यात पोचायची वाट?
ती मात्र नसते.

की असते खरं तर...?

(- ही वाट शोधायसाठी धडपडत असलेल्या एका मैत्रिणीला सस्नेह.)

मुक्तक

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

25 Jul 2014 - 2:20 pm | भिंगरी

खुप छान!

सूड's picture

25 Jul 2014 - 2:23 pm | सूड

एकच नंबर!!

अजया's picture

25 Jul 2014 - 2:26 pm | अजया

वाट असते,आहे, तिला दिसत नाहिये फक्त.जरासा स्वत:वर विश्वास ठेवेल तर नक्की दिसेल.

प्यारे१'s picture

25 Jul 2014 - 2:48 pm | प्यारे१

ती जिथं जशी उभी आहे तिथून नसेल दिसत कदाचित.
स्वतःवर विश्वास तरी कसा असायचा? जिथं कशावरच विसंबू /विश्वास ठेवू शकत नाही ती तिथं?

अर्थात तुम्ही म्हणता तसा सकारात्मक दृष्टीकोन हवाच.

कविता की मुक्तक आवडली/लं हो!

ऋतुराज चित्रे's picture

25 Jul 2014 - 2:33 pm | ऋतुराज चित्रे

बरे झाले, वाटमारीपासून वाचली.

सूड's picture

25 Jul 2014 - 2:36 pm | सूड

>>वाट नाही

वाट नाही असं आपण समजतो तोपर्यंत ती नसते. शोधायला लागते फक्त, आपसूक सापडते. फक्त शोधायला वेळ आणि थोडे प्रयत्न खर्च करावे लागतात. येवढं करुनही नाहीच सापडली, तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.

स्पा's picture

25 Jul 2014 - 3:05 pm | स्पा

तर आपण हातावर हात ठेवून न बसता शोधण्याचे निदान प्रयत्न तरी केले याचं समाधान असतं.

येस, आपल्याकडून प्रयत्न केलेच नाहीत असं व्हायला नको, बाकी सुख मिळेल नाही मिले, आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतील नाही मिळणार, पण प्रयत्न केल्याचे सुख आणि समाधान मात्र कोणीच हिरावू शकणार नाही हे नक्की

बाकी कविता म्हणणार नाही, पण मुक्तक खूप आवडलं

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2014 - 4:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

आपलं पण एक गाव आहे या जाणिवेने मनाला एक दिलासा मिळत रहातो. पण कदाचीत प्रत्यक्ष गाव सापडल्यावर अपेक्षा भंगाचे दु:ख पदरात पडायचे आणि आहे तेवढा आधार पण जायचा. म्हणुन कदाचीत ती वाट शोधायची टाळाटाळ सुरु असेल.

कविता आवडली हेवेसांन.

पैजारबुवा,

पद्मश्री चित्रे's picture

25 Jul 2014 - 10:04 pm | पद्मश्री चित्रे

अगदी खरं. वाट नसेल तर शोधावी लागते ,कधी कधी बनवावी पण लागते. आपल्या मनाची ती तयारी हवी. मुक्तक सुरेख.

psajid's picture

25 Jul 2014 - 2:39 pm | psajid

खुप सुन्दर

वेल्लाभट's picture

25 Jul 2014 - 2:54 pm | वेल्लाभट

अप्रतिम ! ती वाट लवकरच सापडो

कवितानागेश's picture

25 Jul 2014 - 3:07 pm | कवितानागेश

सुंदर. अर्थपूर्ण.

पिलीयन रायडर's picture

25 Jul 2014 - 3:08 pm | पिलीयन रायडर

मुक्तक आवडलं..

पण तिचे हे प्रश्न नक्की ति "ती"* आहे म्हणुनच आहेत का? आणि नक्की ते कुणी निर्माण केलेत? तिनेच की दुसर्‍या कुणी?

विचारायचं कारण असं की अनेकदा स्त्रिया स्वतःहुन परंपरांचे.. पुरुषप्रधान मानसिकतेचे जोखड वागवताना दिसतात..
"मला हे शक्यच नाही..माझ्यावाचुन हे घर कसं चालणार.. हे माझ्या हातुन झालं तरच नीट होतं.. ह्यांना जमतच नाही गार पोळ्या.. तव्यावरुन ताटात हवी.."...."बायकांचा जन्मच हा असा.. चुल न मुलासाठी झालेला.."....."स्त्री जन्मा... तुझी कहाणी.." म्हणत सुस्कारे सोडणार्‍या बायका अनेक आहेत.. असं नाही की त्या परंपरांमध्ये अडकलेल्या / अडकवलेल्या नाहीत.. पण त्यातुन मुक्त होणं वाटतं तितकं अवघडही नाहीये आणि आजकाल तर "पाथब्रेकिंग" म्हणावं असंही नाहीये.. शिवाय तुम्हाला तुमचं आयुष्य एक सजा वाटत असेल.. कुणाला तुमची कदर नाही असं वाटत असेल.. गृहिणी होणं लादल्या सारखं वाटत असेल तर त्यातुन बाहेर पडायचा प्रयत्नही तुम्हालाच करायला हवा..

दुसर्‍यांच्या कष्टाची जाणिव असणारे फार थोडे असतात.. अनेक वर्ष (म्हणजे जोवर दुनियेचे लत्ताप्रहार बसत नाहीत तोवर) आपणही आपल्या सख्ख्या आईलासुद्धा गृहीतच धरत असतो.. जाणिव ही करुन देण्याची सुद्धा गोष्ट असते.. कुणाला तरी कधीतरी माझी आठवण होईल आणि मग मी "नसलेल्या" स्त्री कडुन "असलेल्या" स्त्री कडे वाटचाल करेन ही अपेक्षाच फोल आहे..

आपण ज्या घरात राबतो.. ते आपलं मालकीचं.. हक्काचं.. न वाटणं ह्यात चुक नक्की कुणाची? माझ्यामते फार मोठ्या प्रमाणात स्वतःचीच.. स्वतःला दुय्यम समजत आपण स्वतःवर सर्वप्रथम अन्याय सुरु करतो.. दुसरे फक्त त्याचा फायदा घेत रहातात.. शेवटी सगळी दुनिया स्वार्थी आहे.. स्त्रीनेच परोपकाराचा मक्ता का घ्यावा?

गुलामगिरी लादणं गुन्हा आहे.. लादुन घेणं त्याहुन मोठा गुन्हा...

तुमच्या मैत्रिणीची मला काहीच माहिती नाही.. तिला हे लागु पडेलच असंही नाही.. पण कदाचित शक्यता अशीही असु शकेल की केवळ मानसिकता बदलण्याची गरज आहे.. स्वतःला प्राधान्य देण्याची.. किंमत देण्याची गरज आहे.. परिस्थिती आपोआप बदलुन जाईल...

* - हे अशासाठी विचारलं की अनेकदा स्वतःला दोष देण्याची.. "मीच कमनशिबी.. कुण्णा कुण्णाचं माझ्यावर प्रेम नाही" असा सतत निराशावादी विचार करण्याची प्रवृत्ती अनेकांमध्ये असते.. तिचा स्त्री / पुरुष असण्याशी संबंध नाही.. अर्थात मुक्तक वाचुन मला ही शक्यता कमी वाटते.. आणि टिपीकल घरांमध्ये स्त्रीयांना जी वागणुक मिळते त्यातुन आलेलं नैराश्य असावं असं वाटतं... चु.भु.द्या.घ्या...

कवितानागेश's picture

25 Jul 2014 - 4:48 pm | कवितानागेश

मला वाटतं की हे मुक्तक 'बाई'च्या दृष्टीतून लिहिल्यानी 'बाईचं नसणं-असणं' आहे.
सगळीच माणसं कुठेतरी 'नसतात'... आणि कुठेतरी हरवलेल्या ठिकाणी 'असतात'!

पिलीयन रायडर's picture

25 Jul 2014 - 5:05 pm | पिलीयन रायडर

हो.. बरोबर आहे..
पण सगळीच माणसं एका क्षणी अशी निराश होतात.. हरवुन जातात..
हे स्पेसिफिकली बाई म्हणुन होणार्‍या घुसमटीबद्दल लिहीलं आहे.. आणि बायकांना अनेकदा चटकन "मला किंमत नाही" मोड मध्ये जायची सवय असते.. म्हणुन मग त्यांना हे घर आपलं नाही.. वेळ आपला नाही.. असं वाटायला लागतं (अनेकदा तशीच परिस्थिती असतेही)...

मला इतकंच म्हणायचं आहे की.. मानसिक चक्रात अडकु नका.. हक्क गाजवा.. जाणिवा करुन द्या...!

अर्थात.. मी खुप जनरल लिहीलय..

तिला ह्या सर्वातुन बाहेर पडण्यासाठी.. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शुभेच्छा!

>>सगळीच माणसं कुठेतरी 'नसतात'... आणि कुठेतरी हरवलेल्या ठिकाणी 'असतात'!

लाख बोललीस !!

इनिगोय's picture

25 Jul 2014 - 5:21 pm | इनिगोय

सहमत.
मोजक्या शब्दात सगळं आलंय.

सस्नेह's picture

25 Jul 2014 - 3:20 pm | सस्नेह

'तिला' नसण्याकडून असण्याकडे जाण्यासाठी शुभेच्छा !

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Jul 2014 - 3:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुमच्या मैत्रिणीला ती वाट लवकरच दिसु दे अशी शुभेच्छा...मात्र ती अशी वाट नक्की शोधतेय ना?कारण ते सर्वात जास्त महत्वाचे आहे.

मला जॉर्ज वॉशिग्टन कार्वरचे एक वाक्य फार आवडते(तोच "एक होता कार्व्हर" वाला
"स्टार्ट व्हेअर यु आर,विथ व्हॉट यु हॅव्,मेक समथिंग ऑफ ईट,नेव्हर बी सॅटीस्फाईड"

बाकी वर सूड,स्पा,अजया शी सहमत

मधुरा देशपांडे's picture

25 Jul 2014 - 3:26 pm | मधुरा देशपांडे

सुंदर.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Jul 2014 - 3:30 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तु चेपुवर वाचायला दिली होतीस तेव्हा इथे सकाळचे ८ वाजले होते...
आता दिवस मस्त जाणार.. काहीतरी छान वाचल्याचा आनंद मिळाला
नियमित लिहीत जा गं...

इनिगोय's picture

25 Jul 2014 - 6:07 pm | इनिगोय

:-) :-)

रेवती's picture

25 Jul 2014 - 3:57 pm | रेवती

कविता आवडली.

आयुर्हित's picture

25 Jul 2014 - 4:00 pm | आयुर्हित

तीला म्हणावे,
आपल्याला हवी तीच वाट बंद होत असेल तर त्याच वेळी अगणित वाटा, आपली वाट पहात असतात.
पण आपले सर्व लक्ष त्या बंद होणार्‍या वाटेकडेच लागुन रहाते, हे ही तेव्हढेच खरे.

अश्याच एका उदाहरणात, वाट बंद झाल्यावर देखिल आपल्या शत्रूच्या म्हणजे औरंगजेब बादशाहाच्या तावडीतून आपले "छ्त्रपती शिवाजी महाराज" बरोबर नेलेल्या सर्व मावळ्यांसकट सहीसलामत स्वराज्यात परतले होतेच ना!

अगदी आजकालचेच उदाहरण द्यायचे झाल्यास "सिंधूताई सपकाळ" यांची ग्रेट भेट घ्या म्हणावे.

इनिगोय's picture

25 Jul 2014 - 5:53 pm | इनिगोय

अगदी अगदी!

भावना कल्लोळ's picture

25 Jul 2014 - 4:11 pm | भावना कल्लोळ

सुंदर ……

कवितानागेश's picture

25 Jul 2014 - 4:24 pm | कवितानागेश

सुंदर मुक्तक. :)

आतिवास's picture

25 Jul 2014 - 4:25 pm | आतिवास

'नसलेल्या बाईचं असणं' ही 'असलेल्या बाईच्या नसण्या'तली एक महत्त्वाची वाट आहे - त्याचा राजमार्ग होईलही :-)

किसन शिंदे's picture

25 Jul 2014 - 4:30 pm | किसन शिंदे

स्वत्वाचा शोध घेणारं सुंदर मुक्तक. तुझी लेखणी पुन्हा नव्याने बहरतेय जणू..

स्वाती दिनेश's picture

25 Jul 2014 - 5:29 pm | स्वाती दिनेश

मुक्तक फार आवडले,
स्वाती

तिमा's picture

25 Jul 2014 - 5:33 pm | तिमा

कविता आवडली. हे स्वप्नातील गांव जर, प्रत्येक नसलेल्या स्त्रीला, मिळायला हवं असेल तर सर्वप्रथम पुरुषी दृष्टीकोन बदलला पाहिजे. तरच तिला आस्तित्व येईल.
नेहमी लिहित जा.

पुरुषी दृष्टीकोन बदलायला हवा हे खरं आहेच. पण दरवेळी ते बाईच्या हातात असेलच असं नाही. पण निदान स्वतःचा आदर स्वतः करणं एवढंतरी करता यायला हवंच. नाहीतर तुम्हीच स्वतःला कमी लेखणं ही इतरांना तसंच वागण्याची मुभा वाटायला लागते.

या कवितेसोबत आता या सगळ्या प्रतिक्रियाही देते मैत्रिणीला वाचायला..

 

अशा नसलेल्या बाईला सहसा आपण यात नाहीच आहोत हे समजण्याइतकीही उसंत मिळत नाही. हे नको तर नेमकं काय हवं याचा विचार स्वत:हून होणं कठीणच असतं. तेच तिचंही झालं आहे. त्यामुळे त्या मैत्रिणीला तिच्या वाटेच्या दिशेने न्यायचे आमचे प्रयत्न सुरु आहेतच.

 

निदान परिस्थिती बदलायला हवीय एवढं तरी तिला जाणवतंय हेही आत्ता खूप आहे..

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2014 - 7:19 pm | अत्रुप्त आत्मा

खूपच छान!

नंदन's picture

25 Jul 2014 - 11:24 pm | नंदन

मुक्तक आवडलं.

पाषाणभेद's picture

26 Jul 2014 - 1:22 am | पाषाणभेद

सुंदर मनाला भावली.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jul 2014 - 1:35 am | प्रभाकर पेठकर

नकारात्मक दृष्टीकोन दुर्दैवाच्या गर्तेत खोल खोल नेतो. त्यातून बाहेर पडणं दुरापास्त होतं.

कित्येकांच्या संसासात स्त्रीला दुय्यम दर्जा आणि गृहीत धरण्याची वृत्ती दिसून येते. ह्या विरुद्ध स्त्रीलाच लढा द्यावा लागतो. आत्मविश्वास, धाडस आणि अंगीभूत गुण असतील तर आपली असलेली वाट शोधणं कठीण नसतं. निकराचा लढा आवश्यक असतो.

अंतरा आनंद's picture

26 Jul 2014 - 9:34 am | अंतरा आनंद

खुप छान कविता आहे. खरं तर आपल्या नसलेल्या या गोष्टींनाच आपली ओळख बनवून आपण त्याचा एक कोष बनवलेला असतो. तो कोष म्हणजेच आपण आहोत असं वाटून घेण्याची सवय असते. या कोषातून "स्वत:" बाहेर पडताना त्रास होणारच तो गृहीत धरायचा. बाजूच्यांचंही चुकत नसतं. त्यांच्या लॉजिकप्रमाणे तेही बरोबर असतात. ते समजून घ्यायचं फक्त. वाटा असतात पण आपल्याला त्यांच्यावरून चालताना सुरक्षितपणाची हमी हवी असते त्यामुळे हसू हरवतं.
गौरी देशपांडेंची एक नायिका म्हणते " कुठलीही गोष्ट विचारपूर्वकच कर. सगळा विचार केलास आणि वाटलं की हे पाऊल टाकावं तरीसुद्धा कळत नकळत कोणाच्या पायावर पाय देत नाहीयेस ना, कोणाच्या तोंडचा घास काढून घेत नाहीयेस ना याची खातरजमा कर आणि जरूर पाऊल टाक. एवढं सगळं केलस तरी लोकं तुला नावं ठेवतीलच तेव्हा म्हणायला शिक की जग गेलं खड्ड्यात."

चाणक्य's picture

28 Jul 2014 - 6:39 pm | चाणक्य

मांडलं आहे. तुमच्या मैत्रिणीला यश मिळो

सुरेख मुक्तक! मैत्रिणिला ती वाट लवकर सापडो यासाठी शुभेच्छा.

एस's picture

28 Jul 2014 - 7:34 pm | एस

वाट कुणी दाखवली, वा सापडली तरी त्या वाटेवर पाऊल टाकायचं तिचं धाडस होईल काय याबाबत साशंक.

(वाटा दाखवणे थांबवलेला)...