मनमोहक बाली : ०६ : गालुंगन, बालीचा सर्वात मोठा उत्सव

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
27 Jun 2014 - 11:34 pm

===================================================================

मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...

===================================================================

...प्रदर्शनातून बाहेर पडलो तरी पावसाचा जोर कमी होण्याचे लक्षण दिसत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने चेलूकला जाण्याचा विचार सोडून हॉटेलवर परतलो.

आजची सकाळ जराशी आळसावलेली होती. कारण आज बालीतला गालुंगन नावाचा एक मुख्य सण होता आणि त्यानिमित्त कार्तिकला देवळात जायचे होते. त्यासाठी सकाळी अकरा-साडेअकरा वाजेपर्यंत सुट्टी मागितली होती. बालीतल्या सर्वात मोठ्या सणासाठी मागितलेल्या दोनतीन तासांच्या मोकळिकेला नाही म्हणणे कठीण होते. त्यानेही उरलेल्या वेळाचे नीट नियोजन करून ठरवलेली सगळी आकर्षणे पुरी करण्याचे आश्वासन दिले होते.

तरीसुद्धा सहलीवर असताना सकाळी उशीरापर्यंत नुसते झोपून राहणे जरा कठीणच होते. जराशी उशीराच न्याहारी केली तरी दोन एक तास जमेला होते. त्यामुळे रिसॉर्टच्या आवारात आणि आजूबाजूला फेरी मारायला बाहेर पडलो.

तेव्हा केलेल्या कॅमेऱ्याच्या क्लिकक्लिकाटीपैकी काही...


रिसॉर्ट : ०१

.


रिसॉर्ट : ०२

.


रिसॉर्ट : ०३

.


रिसॉर्ट : ०४

.


रिसॉर्ट : ०५

.


रिसॉर्ट : ०६

.


रिसॉर्ट : ०७ : रक्षक

.


रिसॉर्ट : ०८ : जवळच्या रस्त्यावर आम्हाला धनुष्यबाण विकत घेण्याची गळ घालणारा एक फेरीवाला

.

फिरायला निघण्या अगोदर आपण जरा गालुंगन या बालीच्या सर्वात मोठ्या सणाची माहिती घेऊया.

गालुंगन

बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे. गालुंगन हा बालीचा सर्वात महत्त्वाचा सण अर्थातच दर २१० दिवसांनी येतो. या सणात धर्माचा अधर्माविरुद्ध झालेला विजय साजरा केला जातो. तसेच या सणात पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर भेटीस येतात असा समज आहे. या सणात मुख्य देव अचिंत्य याची आणि पूर्वजांच्या आत्म्यांची यथासांग पूजा करून त्यांना प्रसाद अर्पण केला जातो. संपूर्ण बालीमध्ये हा सण आपल्याकडच्या दिवाळीसारखा मोठ्या थाटामाटाने साजरा जातो. मुख्य दिवसाच्या तीन दिवस अगोदरपासून ते अकरा दिवस नंतरपर्यंत काहीना काही समारंभ साजरे केले जातात. त्यांचे वेळापत्रक असे असते:

३ दिवस अगोदर : पेन्येकेबान : केळ्याच्या खास पदार्थांचा नैवेद्य
२ दिवस अगोदर : पेन्याजान : जाजा नावाच्या केकसारख्या दिसणार्‍या तळलेल्या भाताच्या पदार्थाचा नैवेद्य
आणि धार्मिक पठण
१ दिवस अगोदर : पेनांपहान : डुक्कर आणि कासवांचा बळी देऊन त्यांच्या मांसाची मेजवानी
मुख्य दिवस : गालुंगन : वाजतगाजत फुले व प्रसाद घेऊन देवळात जाऊन पूजा आणि प्रार्थना
१ दिवस नंतर : मानिस गालुंगन : नातेवाइकांच्या भेटीगाठी
१० दिवस नंतर : कुनिंगन : प्रार्थना आणि पुजा. या दिवशी पितरे स्वर्गात परततात.
११ दिवस नंतर : मानिस कुनिंगन : मौजमजा आणि करमणूकीचे कार्यक्रम

लोक गटागटाने आणि काही वेळेस मोठ्या समारंभाने देवळांत जाताना दिसतात. काहीजण त्यांचे खास ठेवीतले पारंपरिक पोशाख घालून फिरत असतात. एकंदरीत सर्व बालीभर आनंदाचे वातावरण असते.

या सणाचा एक भाग म्हणून आपल्याकडे दसर्‍याला उभारल्या जातात तश्या पण त्यापेक्षा बर्‍याच वेगळ्या आणि खूपच जास्त कलाकुसर असलेल्या "पेंजोर" नावाच्या बांबूच्या गुढ्या घरोघरी चढाओढीने उभारल्या जातात. पेंजोरमध्ये देव व पितरांसाठी प्रसाद व फुले ठेवण्यासाठी खास व्यवस्था असते. श्री जय कुसुनु या बाली धर्मग्रंथाप्रमाणे पेंजोर हे पवित्र अगुंग पर्वताचे प्रतीक आहे. जंगलाने झाकलेले पर्वत पाणी साठवतात आणि ते नद्यांच्या रूपाने वर्षभर मानवाला देतात. म्हणून पेंजोर हे पर्वतांप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे प्रतीकही समजले जाते.

असा हा काहीसा आपल्याकडच्या गुढीपाडवा आणि पितृपक्षाचा संगम असलेला बालीचा सण आम्हाला अनपेक्षितपणे बंपर बोनस म्हणून पाहायला मिळाला !

===================================================================

चला, इतक्यात साडेअकरा वाजले देखील, कार्तिक पण आला आणि आपली फिरायला जायची वेळ झाली...

बाहेर पडल्या पडल्या या पहिल्या पेंजोरने दर्शन दिले... आणि असे दर्शन दिले म्हणून सांगू... गाडी थांबवून फोटो काढावाच लागला...


पेंजोर : गुढी हा शब्द खूप तोकडा आहे हे वाटायला लावणारी बालीची गुढी

.

सगळी बाली गालुंगन साजरी करत होती. सगळीकडे सोहळ्याचे वातावरण होते. दारोदारी पेंजोर... वेगवेगळ्या कलाकुसरीने सजलेल्या... सगळ्या एकमेकांशी स्पर्धा करत होत्या... कोणतीही एक पेंजोर दुसरीसारखी नव्हती...

 ......

.

 ......

.

 ......

.

.

.

शहराबाहेर पडल्यावर दिसणार्‍या निखळ निसर्गसौंदर्याला अजून जास्त झळाळी देणे शक्य आहे का ?...

खरेच शक्य आहे का ?...

हा प्रश्न मनात येण्याअगोदरच मधून मधून समोर आलेल्या गावांच्या दर्शनाने त्याचे उत्तर आपोआप मिळाले...

.

घरांशेजारी असणारी देवळेही आज रंगीबेरंगी कपड्यांनी आणि सरोंगनी सजवलेली दिसत होती...

.

काही घरांसमोर कुटुंबातले सदस्य कोंडाळे करून बहुतेक, "आपली पेंजोर शेजार्‍यांच्या पेंजोरपेक्षा वरचढ दिसायला अजून काय करायला पाहिजे बरे?" असे खलबत करत होते...

.

डोक्यावर प्रसाद व पूजेच्या साहित्याच्या टोपल्या घेऊन महिलावर्ग लगबगीने देवळांकडे निघाला होता...

.

पुरुषही मजेत गप्पा मारत देवळाच्या दिशेने रमतगमत निघाले होते. वाटेतले फुलाफळांचे दुकानदार त्यांना अडवून व्यवसायाची पर्वणी साधून घेत होते...

.

स्थानिक सांस्कृतिक मंडळांचे सदस्य त्यांचे पारंपरिक गणवेश पेहरून, छत्रचामरांसह, वाद्ये वाजवत मिरवणुकीने देवळाकडे निघाले होते...

.

साहजिकपणे या सगळ्या सोहळ्यात मुलांचा उत्साह ओसंडून चाललेला होता...

.

एक आजोबा कडेवर घेतलेल्या नातवाला व्हरांड्यात उभे राहून कौतूकाने हा सगळा सोहळा दाखवत होते...

.

बालीमध्ये देवांना आणि पितरांना बांबूच्या आणि केळीच्या पानांच्या बनवलेल्या पसरट परड्यांमध्ये ठेऊन प्रसाद आणि फुले वाहतात...

.

अनपेक्षितपणे पुढे आलेल्या या सर्वात मोठ्या सणाने बालीची आठवण सुंदर कोरीवकामासारखी मनावर कायमची कोरून ठेवली आहे.

अश्या सोहळ्याची हवा पर्यटकांना लागणार नाही तर मग अजून काय होणार? वाटेत एका ठिकाणी थांबून आम्हीही स्थानिक टोप्या खरेदी केल्या आणि त्या घालून अस्सल बालीकर बनून गालुंगनच्या सोहळ्यात सामील झालो...


श्री इस्पीकचा एक्का बालीकर ;)

(क्रमश: )

===================================================================

मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

विलासराव's picture

27 Jun 2014 - 11:54 pm | विलासराव

घरबसल्या बाली अनुभवतोय.

बॅटमॅन's picture

27 Jun 2014 - 11:56 pm | बॅटमॅन

मी पयला!!!!!!

च्यामारी मी, इतकेसे बाली बेट पण साला सौंदर्य किती कुटून कुटून भरावे त्याला कै लिमिट???? अफाट प्रकार आहे सगळा. _/\_

च्यायला थोडक्यात पयला नंबर गेला.

खटपट्या's picture

28 Jun 2014 - 12:11 am | खटपट्या

जबरी !! कोकण,केरळ्,मुन्नार... सगळच सामावलेले दिसतय !!

जंगलाने झाकलेले पर्वत पाणी साठवतात आणि ते नद्यांच्या रूपाने वर्षभर मानवाला देतात.

आपल्याकडे उलटे आहे. वरील वाक्य कंठशोष करत कितीतरी दशके पर्यावरणवादी सांगत आले आहेत. आपण आधी जंगले उजाड करतो आणि मग डोंगरांनाही फोडून तिथे गुंठेवारी काढतो.

लक्ष्मीरस्त्यावर दोन्हीं बाजूंनी असे पेंजोर लावायचा इरादा आहे. कसे दिसेल बरे! गेलाबाजार शनिवारवाड्याच्या बुरुजांवर लावून पाहूया. बुरुज अर्ध्यापर्यंत असे पीतांबर सरोंग नेसले आहेत आणि वर पेंजोर झुलत आहेत. वाह! :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2014 - 11:06 am | डॉ सुहास म्हात्रे

आपल्या पर्वत-जंगलांच्या काळजीबद्दल म्हणावे तितके थोडेच आहे !

लक्ष्मीरस्त्यावर दोन्हीं बाजूंनी असे पेंजोर लावायचा इरादा आहे. कसे दिसेल बरे! गेलाबाजार शनिवारवाड्याच्या बुरुजांवर लावून पाहूया. बुरुज अर्ध्यापर्यंत असे पीतांबर सरोंग नेसले आहेत आणि वर पेंजोर झुलत आहेत. वाह! भन्नाट कल्पना. प्रयोग करून पाहण्यासारखा आहे :)

प्यारे१'s picture

28 Jun 2014 - 12:42 am | प्यारे१

अ‍ॅज युज्वल बेष्ट!

पर्यट्क आकर्षित करण्यासाठी बालीकडुन भारताला खुप बोध घेण्यासारखा आहे!
१)रिसोर्ट जंगलात आहे की जंगल रिसोर्ट मध्ये असा प्रश्न पडण्याइतपत घनदाट झाडी आहेत.
२)पायवाटा आणि रस्ते सोडले की सर्वीकडे हिरवळ्च हिरवळ आहे. जमीन कोठेही दिसत नाहि.
३)निसर्गरम्य वातावरणासोबत मानवनिर्मीत उत्क्रुष्ट कोरिवकाम असलेले पुतळे व मंदिरे डोळ्याचे पारणे फिटते
४)देवळात पुजेच्या साहित्यासाठी कागद वा प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरता बांबूच्या आणि केळीच्या पानांचा वापर करणे.

प्रत्येक पेंजोरची कलात्मक नक्षी फारच सुंदर आहे.

बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे, ह्याचा ज्योतिषिय आधार काय आहे? (शुक्राचा सुर्याभोवती फिरण्याचा काल २२४.७ दिवसाचा आहे. पहाटे शुक्राची चांदणी दिसण्याचा काही संबंध आहे का?)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2014 - 11:01 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या मतांशी सहमत आहे.

बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे, ह्याचा ज्योतिषिय आधार काय आहे? (शुक्राचा सुर्याभोवती फिरण्याचा काल २२४.७ दिवसाचा आहे. पहाटे शुक्राची चांदणी दिसण्याचा काही संबंध आहे का?)

ती दिनदर्शिका हिंदू धर्माशी निगडीत आहे असं म्हणतात. पण वर वर पाहता मला तरी ते फारच गुंतागुंतीचे प्रकरण आहे असे वाटले. इथे सविस्तर माहिती आहे.

त्यातल्या काही विशेष गोष्टी अश्या:
१. आठवड्यांच्या दिवसांना 'वार' असेच म्हणतात.
२. आठवड्यात एका पासून १० पर्यंत दिवस असू शकतात (एकवारा ते दशवारा आठवडा).
३. आठवड्यात काही वार अनेकदा येऊ शकतात आणि ते एकमेकाशी सलगही असू शकतात.

आयुर्हित's picture

28 Jun 2014 - 12:23 pm | आयुर्हित

पावुकोण दिनदर्शिकात दाखविल्या प्रमाणे सप्तवार पद्ध्ती हि आपल्या शक किंवा ग्रेगोरियन दिनदर्शिकेप्रमाणे ३० आठवड्याचा एक वर्ष हे कळले.

फक्त वर्ष केव्हा सुरु होते हे़ कळले नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2014 - 4:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

दर २१० दिवसांचा कालखंड संपला की पुढच्या वर्षाचा पहिला दिवस येतो. त्यामुळे ग्रोगॉरियन दिनदर्शिकेशी, सुर्याच्या भ्रमणाशी अथवा ऋतुंशी बाली वर्षांचा काही ताळमेळ नसतो.

त्यामुळे एका ग्रेगॉरियन वर्षात(३६५ दिवसांत) एकापेक्षा जास्त बाली वर्षे (प्रत्येकी २१० दिवस) येत असल्याने एका ग्रेगॉरियन वर्षात बालीचे वार्षिक सण दोनदोनदा येतात. उदाहरणार्थ, खाली दिलेल्या गालुंगन आणि कुनिंगनच्या ग्रेगॉरियन तारखा पहा:

Year(G)...Galungan.........Kuningan
2013.........March 27...........April 6
2013.........October 23.........November 2

2014.........May 21..............May 31
2014.........December 17......December 27

2015.........July 15..............July 25

आयुर्हित's picture

29 Jun 2014 - 12:16 pm | आयुर्हित

दिलेल्या तारखांची ग्रहस्थिती ही भिन्न आहे. काहीहि सारखे नाही.त्यामूळे ग्रोगॉरियन दिनदर्शिकेशी, सुर्याच्या भ्रमणाशी अथवा ऋतुंशी बाली वर्षांचा काही ताळमेळ नसतो, हेच खरे!

रेवती's picture

28 Jun 2014 - 3:10 am | रेवती

सुरेख गुढ्या आहेत, अपल्याकडच्या फिक्या पडल्या असं वाटतय. शेताचे हिरवे फोटू खोटे आहेत की काय इतके चांगले दिसतायत.
अवांतर- बाली प्रवासवर्णनाचा ५ वा भाग (आणखीही काही धगे) मला उघडता आला नाही. ते वाचल्यावर तिकडे प्रतिसाद देईन.

यशोधरा's picture

28 Jun 2014 - 6:49 am | यशोधरा

सुरेख! हिरवाई पाहून डोळे निवले. आपल्याकडे असे दृश्य कधी दिसणार? इथे तर असलेले डोंगर, पर्वत सपाट करायची अहमहमिका लागलेली आहे! :( असलेले सौंदर्य मातीमोल करत आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2014 - 11:08 am | डॉ सुहास म्हात्रे

विलासराव, बॅटमॅन, खटपट्या, प्रशांत आवले, रेवती आणि यशोधरा : अनेक धन्यवाद !

चौकटराजा's picture

29 Jun 2014 - 7:20 am | चौकटराजा

देशीदेशी का जावे ....केल्याने देशाटन ...हे का म्हटले आहे हे आपल्या लेखांवरून कळते. भारतीय व एक्दम पाश्चात्य या खेरीज मध्यपूर्व मगोलियन, अग्नेय आशियन अशा विविध संस्कतीत किती नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. आता यातीलच पहा त्या गुढ्या , तोरणे, फुलांच्या परड्या देखील आपण कधी न पाहिलेल्या. आपण मिपाचे सदस्य नसतो तर .
असा एक निबंध लिहायला हवा.
आपण पुणेकर आहात हे आमचे कवढे भाग्य की वरचेवर भेट होऊन माहितीत भर पडते. जुग जुग जियो साहब !

जाता जाता - पेठकर काका व मी एकाच वयाचे.त्यानी दुसर्या एका धाग्यात रंग उजळला ज्या ऐवजी रंग उधळला असे वाचले. वयामुळे माझी ही समस्या तीच ...हा गालूंगन शब्द वाचताना मी एकदम 'गाल चुम्बन अलिंगन' असे काही वाचून गेलो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2014 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या सारखे रसिक वाचक आहेत म्हणूनच तर ही प्रवासवर्णने लिहायला मजा येत आहे. त्यात कट्ट्यात होणारी प्रत्यक्ष भेट ही तर दुधात साखर !!

पेठकर काका व मी एकाच वयाचे.त्यानी दुसर्या एका धाग्यात रंग उजळला ज्या ऐवजी रंग उधळला असे वाचले. वयामुळे माझी ही समस्या तीच ...हा गालूंगन शब्द वाचताना मी एकदम 'गाल चुम्बन अलिंगन' असे काही वाचून गेलो. :)

प्रचेतस's picture

29 Jun 2014 - 10:57 am | प्रचेतस

सुंदर.
अफाट हिरवाई आणि रंगीबेरंगी उत्सव. डोळे निवले.

तुमचा अभिषेक's picture

29 Jun 2014 - 12:28 pm | तुमचा अभिषेक

रिसॉर्टचे फोटो अप्रतिम, त्या हिरवाईत कुठेही कृत्रिमता वाटत नाहीये
बालीकरांची रंगीबेरंगी टोपी आपल्या लहान पोरांना दिली तर जाम खूश होतील.. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2014 - 8:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

सबंध बालीचे निसर्गाशी इतके घट्ट आणि एकसंध नाते आहे की दोघांना वेगळे करणे शक्यच होत नाही. कोठेही कृत्रिमपणे निसर्गाला घासूनपुसून अट्टाहासाने शिस्तीत बसवायचा प्रयत्न दिसत नाही. बालीमध्ये नागरिक, संस्कृती आणि निसर्ग हे एकाच एकत्र कुटुंबाचे सहृदय घटक असल्याचे सारखे जाणवते.

टोपीचं म्हणाल तर लहान पोरंच का म्हणून... हा मोठा पोरगाही (अस्मादिक) ती टोपी घालून जाम खूष होताच की !

दिपक.कुवेत's picture

29 Jun 2014 - 1:37 pm | दिपक.कुवेत

भाग ५ आणि ६ मेहमीप्रमाणेच मनमोहक. हिरवाई अगदि दृष्ट लागण्यासारखी आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2014 - 2:02 pm | अत्रुप्त आत्मा

वाहह..............................अप्रतीम!

कवितानागेश's picture

29 Jun 2014 - 7:34 pm | कवितानागेश

आत्ताचे फोटो बघून तिथेच कायमचं रहायला जावंसं वाटायला लागलय.
फोटो दाखवतेच नवर्‍याला. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2014 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

"बालीच्या प्रेमात न पडणारा माणूस विरळाच" असे म्हणतात यात अजिबात अतिशयोक्ती नाही याची मी खात्री देतो :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2014 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिपक.कुवेत आणि अत्रुप्त आत्मा : धन्यवाद !

नेहमीप्रमाणेच छान!! पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2014 - 1:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2014 - 7:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रवासवर्णन आणि फोटो दोन्ही सुरेख चालु आहेत. एक से एक फोटो बघुन कधी ना कधी बालीला जायचा विचार पक्का होत आहे.
तो आजोबा आणि नातू फोटो आपल्याला फार आवडला राव..घरोघरी..आपले देशोदेशी प्रेमळ आजोबा :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jul 2014 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

ती आजोबा-नातू जोडगोळी पाहिली आणि हा प्रसंग कोकणातला म्हणूनही खपून जाईल असे वाटले. गाडीतून गडबडीत काढल्याने तंत्रदृष्ट्या चांगला आला नाही पण तो प्रसंग मनात भरल्याने इथे टाकावाच लागला :)