मनमोहक बाली : ०५ : गोआ गजा, मास आणि उबुद

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
25 Jun 2014 - 10:34 pm

===================================================================

मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...

===================================================================

...निसर्गरम्य परिसरातून आमचा रस्ता कधी छोट्या गावातून जात होता... तर कधी केवळ काही शाकारलेली घरे आणि भाताची खाचरे असलेल्या ग्रामीण भागातून जात होता...

गोआ गजा

उबुद नावाच्या गावाजवळ एक ९ व्या शतकात खोदलेली गोआ गजा (गजगुहा; गोआ = गुहा, गजा = गज) नावाची गुहा आहे. ही जागा पूर्वी ऋषिमुनी तपश्चर्येसाठी वापरत असत. या गुहेच्या मुखाभोवतीच्या खडकांत असुर आणि भयानक प्राण्यांचे मुखवटे कोरलेले आहेत. त्यातले मुख्य शिल्प हत्तीसारखे दिसते अश्या कल्पनेवरून या गुहेचे नाव पडले आहे. देशवर्णन नावाच्या इ स १३६५ मध्ये लिहिलेल्या एका जावानीज कवितेत या जागेचे वर्णन केलेले आहे. १९५० साली केलेल्या उत्खननात येथे अनेक धार्मिक स्नानकुंडे सापडली आहेत. १९९५ मध्ये या जागेला UNESCO World Heritage च्या यादीत समाविष्ट केले गेले आहे.

चला तर, मारूया चक्कर या सांस्कृतिक महत्त्व असलेल्या अजून एका निसर्गरम्य ठिकाणाची...


भाविकांना आराम करण्यासाठी मंडप

.


एक स्नानाचे कुंड

.


गजगुहेचे मुख

.


गुहेतली गणेशमूर्ती

.


गुहेतली तीन शिवलिंगे

अशी गणेशमूर्ती आणि शिवलिंगे हे बालीतील प्रार्थनास्थळांमध्ये अपवादात्मक आहे. कदाचित ही गुहा मंदिर नसून ध्यानधारणेचे ठिकाण असल्यामुळे तसे असावे.

.


उत्खनन केलेली पण वापरात नसलेली काही कुंडे आणि पलीकडे दिसणारा मंडप

.


एका मंदिराचे शिखर

.

गुहेपलीकडे असलेल्या एका उतारावर आणि त्यावरुन उतरून उतरलेल्या दरीत सुंदर बाग तयार केली आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिक स्थळ न राहता फिरायला जाण्यासाठीचे पर्यटन स्थळही बनले आहे...

.

बागेतला एक वृक्षराज त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मुळांच्या जाळ्यासकट...

.

अजून एक सरोंग नेसलेला वृक्षराज...

.

एका काळी या जागेवर बौद्धमंदिर बांधण्याचे प्रयत्न केले गेले, पण दर वेळेस ते मंदिर बांधत असतानाच कोसळल्यामुळे ते प्रयत्न सोडून देण्यात आले. त्या प्रयत्नांची खूण असलेले भग्नावशेष आजही तेथे दिसतात...


भग्न बौद्धमंदिराचे अवशेष

.

बाहेर पडताना बालीनीज कलाकुसरीची झलक दाखविणारे हे दुकान दिसले...

.

बालीच्या अंतर्भागातली, विशेषतः: उबुद आणि आजूबाजूच्या डोंगराळ भागातली, सफर म्हणजे डोळ्यांना केवळ मेजवानीच... कोंकणाची हमखास आठवण करून देणारी...

.

.


वाटेतल्या एका चौकातले शिल्प

.

बालीतील निसर्ग व समाजजीवन एकमेकाला इतके पूरक आहेत आणि एकमेकात अकृत्रिमरीत्या इतके बेमालूम मिसळून गेलेले आहेत की एकदा शहरी भागांच्या बाहेर पडलो की त्यांना वेगळे करणे शक्य होत नाही... लोक जंगलात-निसर्गात राहतात की जंगलाने-निसर्गाने लोकवस्त्यांत शिरकाव केला आहे हा प्रश्न पडावा अशीच काहीशी अवस्था आहे.

याचाच प्रत्यय देणारे हे रेस्तराँ...


रेस्तराँचे प्रवेशव्दार

.


रेस्तराँचा परिसर

.

 ......
स्वागतकक्ष

.

आणि ही जेवणाच्या खोलीची जिवंत नैसर्गिक पार्श्वभूमी !...

अश्या ठिकाणी जेवायचे विसरायला होईल, तर जेवणाचे फोटो काढायला विसरलो (खरोखरच विसरलो !) तर त्यात आश्चर्य वाटू नये !
.

जेवणानंतरचा सगळा वेळ बालीच्या मानवनिर्मित कलाकुसरींसाठी प्रसिद्ध असलेल्या काही गावांना भेट देण्यासाठी राखून ठेवलेला होता. यातली तीन जरा जास्त प्रसिद्ध आहेत. उबुद चित्रकारांचे; मास लाकडावरचे कोरीवकाम करणार्‍या कलाकारांचे; तर चेलुक धातूकाम करणार्‍या (विशेषतः: चांदी आणि सोन्याचे दागिने घडविणार्‍या) कलाकारांचे गाव आहे. या प्रत्येक गावात त्या त्या प्रकारच्या कलाकारांची दुकाने आणि प्रदर्शने आहेतच, पण त्यांच्या कार्यशाळांत जाऊन त्यांचे चाललेले कामही जवळून पाहता येते.

मास येथील एका प्रदर्शनातल्या काही कलाकृती...


मुखवटे

.


बाहुल्या

.

 ......
गरूडावर बसलेला विष्णू आणि ड्रॅगन

.

 ......
गणेश आणि सरस्वती

.

 ......

.

या प्रदर्शनातून बाहेर पडता पडताच पावूस सुरू झाला होता आणि पुढे त्याचा जोर वाढतच राहिला. उबुदमधिल एका चित्रप्रदर्शनापर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस धो धो पडायला सुरुवात झाली होती. खूप पावसाने वीजही गेली होती (भारताची आठवण झाली !). "आता काय पर्यटक येणार?" असा विचार करून प्रदर्शनाचा व्यवस्थापक त्याला कुलूप लावून निघून गेला होता. पण कार्तिकने त्याचे कौशल्य वापरून शेजारच्या घरातून व्यवस्थापकाला शोधून आणून प्रदर्शन उघडायला लावले. विजेच्या येण्या-जाण्याच्या खेळात हे चित्रांचे प्रदर्शन आम्ही बघितले.

ही त्याची थोडीशी झलक...

.

 ......

.

 ......

.

प्रदर्शनातून बाहेर पडलो तरी पावसाचा जोर कमी होण्याचे लक्षण दिसत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने चेलूकला जाण्याचा विचार सोडून हॉटेलवर परतलो.

(क्रमश: )

===================================================================

मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...

=================================================================== 

प्रतिक्रिया

सूड's picture

25 Jun 2014 - 11:10 pm | सूड

पुभाप्र..

मधुरा देशपांडे's picture

25 Jun 2014 - 11:18 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम छायाचित्रे आणि माहितीपूर्ण वर्णन.

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 12:28 am | बॅटमॅन

अप्रतिम!!! खरेच निव्वळ अप्रतिम. प्रत्येक फटू बालीच्या चित्रमयतेला नव्याने अधोरेखित करतोय. फाऽर भारी.

बालीतील निसर्ग व समाजजीवन एकमेकाला इतके पूरक आहेत आणि एकमेकात अकृत्रिमरीत्या इतके बेमालूम मिसळून गेलेले आहेत की एकदा शहरी भागांच्या बाहेर पडलो की त्यांना वेगळे करणे शक्य होत नाही... लोक जंगलात-निसर्गात राहतात की जंगलाने-निसर्गाने लोकवस्त्यांत शिरकाव केला आहे हा प्रश्न पडावा अशीच काहीशी अवस्था आहे.

भारतीय कधी याचा आदर्श घेतील?

मास मधील मुखवटे तर अगदी जीवंतच वाटतात.
अगदी खरे आहे ही सफर म्हणजे डोळ्यांना केवळ मेजवानीच!

यशोधरा's picture

26 Jun 2014 - 5:29 am | यशोधरा

बालीची उत्तम चित्रसफर.
शेतीच्या दुसर्‍या फोटोचा अ‍ॅंगल खूप आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2014 - 12:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

सूड, मधुरा देशपांडे, बॅटमॅन, आयुर्हित आणि यशोधरा : धन्यवाद !

खटपट्या's picture

26 Jun 2014 - 12:30 pm | खटपट्या

सर्व चित्रे जबरदस्त !!!

गजगुहेचे मुख तर अंगावर काटा आणतंय

झाडाच्या मुळांवर काढलेला फोटो अप्रतिम

गणपतीला नेसवलेले वस्त्र लुंगी किंवा चादरी सदृष्य वाटतेय :)

वाचतोय

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2014 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

ती लुंगीच असते. इंडोनेशिया आणि मलेशियात त्याला सरोंग म्हणतात. मुर्ती, पवित्र समजले जाणारी झाडे आणि इतर गोष्टी या सगळ्यांना ह्या नेसवल्या जाण्यार्‍या सरोंगमध्ये पांढर्‍या, काळ्या आणि कधी कधी तांबड्या रंगाच्या चौकडी असतात.

प्रचेतस's picture

26 Jun 2014 - 4:10 pm | प्रचेतस

अफाट सुंदर आहे हे सर्व.
गोआ गजा तर लै भारी.

वृक्षाची पसरत गेलेली मूळं पाहून लॉर्ड ऑफ द रिंग्सः द टू टॉवर्स मधल्या फॅन्गॉर्न जंगलाची आठवण झाली.

एस's picture

26 Jun 2014 - 4:34 pm | एस

हेच म्हणणार होतो. फक्त त्या झाडाचे फोटो काढण्यासाठी बालीला जावेसे वाटतंय. तिथे एकदा ह्या कोनाने, एकदा त्या कोनाने, कधी वाकून, झोपून, आडवातिडवा पडून मी चिखल-शेवाळाने भरलोय आणि मग एकदाचा उठून युरेका युरेका असं ओरडतोय असं दृश्य डोळ्यांसमोर आले. :-D

प्रचेतस's picture

26 Jun 2014 - 4:39 pm | प्रचेतस

पिपीन पिपीन =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2014 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

ते झाड विशेष होते हे नक्कीच. आजही त्याचे फोटो पाहिले की वाटते अजून काही फोटो काढायला हवे होते. पण गडबडीत राहून गेले. :(

बॅटमॅन's picture

26 Jun 2014 - 5:41 pm | बॅटमॅन

अगदी अगदी. ट्रीबेअर्ड आणि त्याचे एंटदळ आठवले. कालच पुनरेकवार पाहत होतो. :)

सस्नेह's picture

26 Jun 2014 - 8:37 pm | सस्नेह

तुम्ही या सफरी स्वतःच्या आनंदासाठी करण्याऐवजी आमच्या नेत्रसुखासाठीच करता असे वाटते. अन्यथा इतके निगुतीने सर्व बारकावे टिपणारे फोटो कोण कुणासाठी काढते ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2014 - 10:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे भटकंतीचे फोटो निवृत्त झाल्यावर वारंवार नजरेखाली घालता येणारा खजिना म्हणून साठवतो आहे (कंजूस बनिया त्याचा खजिना वारंवार मोजत बसला आहे असे दृश्य नजरेसमोर आणा :) ).

अचानक मिपावर लिहायला लागलो आणि खर्‍या प्रयोगाची रंगीत तालिम सुरू झाली :)

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 8:48 pm | प्यारे१

सुपरलाईक. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2014 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

वल्ली आणि प्रशांत आवले : अनेक धन्यवाद !

पैसा's picture

29 Jun 2014 - 9:04 pm | पैसा

या गुहेच्या द्वातावरील कलाकुसर जबरदस्तच आहे! आतले गणोबा पण जाम आवडले. हिरवी भातखाचरेही फार आवडली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2014 - 7:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि काय नको असे होतेय ही लेखमाला वाचताना..अप्रतिम फोटो.मला तर एक चित्र डकवायचे तर १ तास लागतो मिपावर

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jul 2014 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

पैसा आणि राजेंद्र मेहेंदळे : अनेक धन्यवाद !