मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनमोहक बाली : ०६ : गालुंगन, बालीचा सर्वात मोठा उत्सव

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)... =================================================================== ...प्रदर्शनातून बाहेर पडलो तरी पावसाचा जोर कमी होण्याचे लक्षण दिसत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने चेलूकला जाण्याचा विचार सोडून हॉटेलवर परतलो. आजची सकाळ जराशी आळसावलेली होती. कारण आज बालीतला गालुंगन नावाचा एक मुख्य सण होता आणि त्यानिमित्त कार्तिकला देवळात जायचे होते. त्यासाठी सकाळी अकरा-साडेअकरा वाजेपर्यंत सुट्टी मागितली होती. बालीतल्या सर्वात मोठ्या सणासाठी मागितलेल्या दोनतीन तासांच्या मोकळिकेला नाही म्हणणे कठीण होते. त्यानेही उरलेल्या वेळाचे नीट नियोजन करून ठरवलेली सगळी आकर्षणे पुरी करण्याचे आश्वासन दिले होते. तरीसुद्धा सहलीवर असताना सकाळी उशीरापर्यंत नुसते झोपून राहणे जरा कठीणच होते. जराशी उशीराच न्याहारी केली तरी दोन एक तास जमेला होते. त्यामुळे रिसॉर्टच्या आवारात आणि आजूबाजूला फेरी मारायला बाहेर पडलो. तेव्हा केलेल्या कॅमेऱ्याच्या क्लिकक्लिकाटीपैकी काही...

 रिसॉर्ट : ०१

.

 रिसॉर्ट : ०२

.

 रिसॉर्ट : ०३

.

 रिसॉर्ट : ०४

.

 रिसॉर्ट : ०५

.

 रिसॉर्ट : ०६

.

 रिसॉर्ट : ०७ : रक्षक

.

 रिसॉर्ट : ०८ : जवळच्या रस्त्यावर आम्हाला धनुष्यबाण विकत घेण्याची गळ घालणारा एक फेरीवाला

. फिरायला निघण्या अगोदर आपण जरा गालुंगन या बालीच्या सर्वात मोठ्या सणाची माहिती घेऊया.

गालुंगन

बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे. गालुंगन हा बालीचा सर्वात महत्त्वाचा सण अर्थातच दर २१० दिवसांनी येतो. या सणात धर्माचा अधर्माविरुद्ध झालेला विजय साजरा केला जातो. तसेच या सणात पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर भेटीस येतात असा समज आहे. या सणात मुख्य देव अचिंत्य याची आणि पूर्वजांच्या आत्म्यांची यथासांग पूजा करून त्यांना प्रसाद अर्पण केला जातो. संपूर्ण बालीमध्ये हा सण आपल्याकडच्या दिवाळीसारखा मोठ्या थाटामाटाने साजरा जातो. मुख्य दिवसाच्या तीन दिवस अगोदरपासून ते अकरा दिवस नंतरपर्यंत काहीना काही समारंभ साजरे केले जातात. त्यांचे वेळापत्रक असे असते: ३ दिवस अगोदर : पेन्येकेबान : केळ्याच्या खास पदार्थांचा नैवेद्य २ दिवस अगोदर : पेन्याजान : जाजा नावाच्या केकसारख्या दिसणार्‍या तळलेल्या भाताच्या पदार्थाचा नैवेद्य आणि धार्मिक पठण १ दिवस अगोदर : पेनांपहान : डुक्कर आणि कासवांचा बळी देऊन त्यांच्या मांसाची मेजवानी मुख्य दिवस : गालुंगन : वाजतगाजत फुले व प्रसाद घेऊन देवळात जाऊन पूजा आणि प्रार्थना १ दिवस नंतर : मानिस गालुंगन : नातेवाइकांच्या भेटीगाठी १० दिवस नंतर : कुनिंगन : प्रार्थना आणि पुजा. या दिवशी पितरे स्वर्गात परततात. ११ दिवस नंतर : मानिस कुनिंगन : मौजमजा आणि करमणूकीचे कार्यक्रम लोक गटागटाने आणि काही वेळेस मोठ्या समारंभाने देवळांत जाताना दिसतात. काहीजण त्यांचे खास ठेवीतले पारंपरिक पोशाख घालून फिरत असतात. एकंदरीत सर्व बालीभर आनंदाचे वातावरण असते. या सणाचा एक भाग म्हणून आपल्याकडे दसर्‍याला उभारल्या जातात तश्या पण त्यापेक्षा बर्‍याच वेगळ्या आणि खूपच जास्त कलाकुसर असलेल्या "पेंजोर" नावाच्या बांबूच्या गुढ्या घरोघरी चढाओढीने उभारल्या जातात. पेंजोरमध्ये देव व पितरांसाठी प्रसाद व फुले ठेवण्यासाठी खास व्यवस्था असते. श्री जय कुसुनु या बाली धर्मग्रंथाप्रमाणे पेंजोर हे पवित्र अगुंग पर्वताचे प्रतीक आहे. जंगलाने झाकलेले पर्वत पाणी साठवतात आणि ते नद्यांच्या रूपाने वर्षभर मानवाला देतात. म्हणून पेंजोर हे पर्वतांप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे प्रतीकही समजले जाते. असा हा काहीसा आपल्याकडच्या गुढीपाडवा आणि पितृपक्षाचा संगम असलेला बालीचा सण आम्हाला अनपेक्षितपणे बंपर बोनस म्हणून पाहायला मिळाला ! =================================================================== चला, इतक्यात साडेअकरा वाजले देखील, कार्तिक पण आला आणि आपली फिरायला जायची वेळ झाली... बाहेर पडल्या पडल्या या पहिल्या पेंजोरने दर्शन दिले... आणि असे दर्शन दिले म्हणून सांगू... गाडी थांबवून फोटो काढावाच लागला...

 पेंजोर : गुढी हा शब्द खूप तोकडा आहे हे वाटायला लावणारी बालीची गुढी

. सगळी बाली गालुंगन साजरी करत होती. सगळीकडे सोहळ्याचे वातावरण होते. दारोदारी पेंजोर... वेगवेगळ्या कलाकुसरीने सजलेल्या... सगळ्या एकमेकांशी स्पर्धा करत होत्या... कोणतीही एक पेंजोर दुसरीसारखी नव्हती...

 ......

.

 ......

.

 ......

.

.

. शहराबाहेर पडल्यावर दिसणार्‍या निखळ निसर्गसौंदर्याला अजून जास्त झळाळी देणे शक्य आहे का ?...

खरेच शक्य आहे का ?...

हा प्रश्न मनात येण्याअगोदरच मधून मधून समोर आलेल्या गावांच्या दर्शनाने त्याचे उत्तर आपोआप मिळाले...

. घरांशेजारी असणारी देवळेही आज रंगीबेरंगी कपड्यांनी आणि सरोंगनी सजवलेली दिसत होती...

. काही घरांसमोर कुटुंबातले सदस्य कोंडाळे करून बहुतेक, "आपली पेंजोर शेजार्‍यांच्या पेंजोरपेक्षा वरचढ दिसायला अजून काय करायला पाहिजे बरे?" असे खलबत करत होते...

. डोक्यावर प्रसाद व पूजेच्या साहित्याच्या टोपल्या घेऊन महिलावर्ग लगबगीने देवळांकडे निघाला होता...

. पुरुषही मजेत गप्पा मारत देवळाच्या दिशेने रमतगमत निघाले होते. वाटेतले फुलाफळांचे दुकानदार त्यांना अडवून व्यवसायाची पर्वणी साधून घेत होते...

. स्थानिक सांस्कृतिक मंडळांचे सदस्य त्यांचे पारंपरिक गणवेश पेहरून, छत्रचामरांसह, वाद्ये वाजवत मिरवणुकीने देवळाकडे निघाले होते...

. साहजिकपणे या सगळ्या सोहळ्यात मुलांचा उत्साह ओसंडून चाललेला होता...

. एक आजोबा कडेवर घेतलेल्या नातवाला व्हरांड्यात उभे राहून कौतूकाने हा सगळा सोहळा दाखवत होते...

. बालीमध्ये देवांना आणि पितरांना बांबूच्या आणि केळीच्या पानांच्या बनवलेल्या पसरट परड्यांमध्ये ठेऊन प्रसाद आणि फुले वाहतात...

. अनपेक्षितपणे पुढे आलेल्या या सर्वात मोठ्या सणाने बालीची आठवण सुंदर कोरीवकामासारखी मनावर कायमची कोरून ठेवली आहे. अश्या सोहळ्याची हवा पर्यटकांना लागणार नाही तर मग अजून काय होणार? वाटेत एका ठिकाणी थांबून आम्हीही स्थानिक टोप्या खरेदी केल्या आणि त्या घालून अस्सल बालीकर बनून गालुंगनच्या सोहळ्यात सामील झालो...

 श्री इस्पीकचा एक्का बालीकर ;)

(क्रमश: ) =================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)... ===================================================================

वाचन 10705 प्रतिक्रिया 0