पर्यावरणाची ऐशी तैशी!

मीराताई's picture
मीराताई in जनातलं, मनातलं
9 Jun 2014 - 4:15 pm

अखेर त्यांचं स्वप्न त्यांच्या मुठीत आलं होतं. घरातल्या जागेची अडचण, त्या पाठोपाठ येणाऱ्या अडचणी आणि बाहेरची गर्दी-गोंगाट यांच्यापासून सुटकेचा मार्ग त्यांना सापडला होता. नवीन वसणाऱ्या उपनगरातल्या एका मोठया गृहप्रकल्पात त्यांनी नाव नोंदवलं होतं. प्रख्यात अशा 'स्वप्नसिटी बिल्डर्स'नी या भागातल्या मध्यवर्ती अशा विस्तीर्ण भूखंडावरच्या स्वप्नराशि, स्वप्नमाला, स्वप्नकुटिर, स्वप्ननगरी, स्वप्नाली, स्वप्नील घरकुलांची मोठीच जाहिरात केली होती. प्रशस्त घरांच्या उंच उंच इमारती उभ्या राहूनही गाडयांसाठी, बाग-बगीचा, खेळण्यासाठी जागा आणि क्लब हाऊससाठीसुध्दा जागा उपलब्ध होईल येवढी ऐसपैस जागा होती ती. आजूबाजूला आधीच वस्ती झाल्याने वीज-पाणी आणि रस्तेसुध्दा तयारच होते. मुख्य म्हणजे सगळया इमारतींचं काम एकाचवेळी सुरू करून ठरल्याप्रमाणे वर्षभरात घरांचा ताबा देण्याइतका हा बिल्डर भक्कम होता. तशी ख्यातीच होती त्याची! त्यामुळे सगळेच होतकरू 'घरमालक' निश्चिंत होते आणि अर्थातच ते दोघे, नीरजा अन् कुमार हेसुध्दा तसेच निश्चिंत होते.
त्यातून विशेष म्हणजे या संकुलाच्या एका बाजूला चांगला मोठा, एक-दीड एकराचा भूखंड म्हणे राखीव होता. पर्यावरणाचा तोल सांभाळण्यासाठी आणि रहिवाशांच्या सोयीसाठी मध्यवर्ती भागात विस्तीर्ण वाटिका हवीच यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी जोर धरला होता. या जागेत पूर्वीपासूनची अशी कितीतरी झाडांची, झुडुपांची दाटी होती. ती छोटेखानी वनराईच शहराच्या मध्यात उभी राहिली होती. नीरजा तर ते पाहून हरखून गेली. कुमारपाशी हट्ट करून ती त्याच्यासह त्या झाडीमधून फेरफटकाही मारून आली. त्या दुपारच्या वेळीही तिथे शांत, थंड सावली होती. वेगवेगळे पक्षी आणि फुलपाखरंही होती. आपलं घरकुल होणार आणि शिवाय समोर अशी मस्त फिरण्यासारखी झाडीसुध्दा असणार या कल्पनेने नीरजा आनंदली होती. खुळयासारखी येवढया-तेवढयावर हसत खिदळत होती. तिचा तो आनंद पाहून कुमारसुध्दा खुळावला होता. त्या आनंदाच्या भरात एकमेकांच्या हाती हात गुंफून त्या हातांना जोरजोरात झोके देण्याचा पोरकटपणासुध्दा त्यांनी केला. नावनोंदणी, पैशांची तजवीज सगळंच मनाप्रमाणे जमून आल्याने दोघं स्वप्नातल्यासारखे तरंगतच घरी परतले.
भूखंडाला कुंपण तर आधीच घातलं गेलं होतं. तेव्हा लगोलग जमीन समतल करणं, पाया खोदणं, चौथरे बांधणं, पिलर्स उभारणं वगैरे कामांनी वेग घेतला. सिमेंटच्या गोणी, वाळूचे ढीग, लाकडी फळया, लोखंडी सळया असल्या मालाने आणि कामगारांच्या कोलाहलाबरोबरच मालट्रकय, क्रशर वगैरेंच्या घरघरीने परिसर गजबजून गेला. दर दहा-पंधरा दिवसांनी तिथे फेरी मारून कामाची प्रगती पाहाणं आणि मुख्य म्हणजे बाजूच्या त्या झाडीमधून स्वच्छंद फिरून येणं हा एक नवाच छंद दोघांना जडला. 'स्वप्नसिटी'चे मजले एकावर एक भराभर चढत होते. त्या दोघांच्या स्वप्नांचेही इमले हवेत उभे राहात होते.
आणखी एक चांगला योग जुळून आला. एका विशेष कामाच्या मोहिमेवर स्वीडनला जाण्याचं फर्मान कंपनीकडून कुमारला मिळालं. मग धोघांनी विचार-विनिमय केला आणि तो महिनाभर चक्क सुट्टी घेऊन नीरजानेही त्याच्यासोबत जाण्याचं ठरवलं. त्या तयारीतच दोघे इतके गुंतून पडले की 'स्वप्नसिटी'कडे फिरकायलासुध्दा त्या दीडएक महिन्यात वेळ मिळाला नाही. स्वीडनहून महिन्याभराने परततात तो दहा दिवसांतच नीरजाच्या आईचं पोटाच्या अल्सरचं दुखणं विकोपाला गेलं. मग ते वेगवेगळे डॉक्टर्स, सतराशे साठ तपासण्या, हॉस्पिटलातले फेरे, औषधं यातच दोघं व्यग्र राहिले. आईला ठीकठाक व्हायला आणखी एखादा महिना जावा लागला. आई घरात-बाहेर जरा वावरू लागली. तेव्हा नीरजाच्या जीवात जीव आला. पुन्हा एकदा स्वप्नसिटीचे वेध लागले. परंतु शनिवार-रविवार आईकडे जायचं असे. मग मधल्याच एका दिवशी सकाळी स्वप्नसिटीत फेरीत मारून, तिथूनच ऑफिसला जायचं असा बेत दोघांनी केला.
अजिबात कुरकुर न करता दोघंही पहाटेच उठली. पटापट उरकून प्रसन्न चित्ताने बाहेर पडली. उण्यापुऱ्या सहा महिन्यांनी त्या बाजूला जाताना नीरजाच्या अन् कुमारच्या डोळयांसमोर रंगरंगोटी करून तयार झालेल्या इमारती तरळत होत्या आणि त्याप्रमाणे लांबूनच त्या तशा दिसूही लागल्या. एकमेकांना त्या दाखवताना त्यांचा आनंद सोसंडून वाहात होता. जवळ जाताच लक्षात आलं, आता मोठं कमानदार प्रवेशद्वार स्वागत करत उभं होतं. रखवालदारांच्या सोयीसाठी एक छोटासा निवारा अन् दुसऱ्या बाजूला सोसायटीच्या कार्यालयासाठी आणि स्वागतकक्षासाठी म्हणून एक टुमदार बांधकामही करून दिलेलं होतं. सगळा परिसर स्वच्छ करून आता बागबगीचा तयार करणं चालू होतं तर इमारतींमधे इलेक्ट्रॉनिक वस्तुंसाठीची खास सोय, इंटरनेट, टीव्ही यांच्या केबल्स टाकणं वगैरे चालू होतं. हातात हात घालून दोघेही भराभर जिने चढत 'स्वप्नगंधा' मधल्या आपल्या सातव्या मजल्यावरच्या फ्लॅटकडे वळले. घराच्या प्रशस्त गॅलरीतून तिला 'त्या' झाडीचं दर्शन आधी घ्यायचं होतं ना?
गॅलरीत ती आली मात्र...
तिचा विश्वासच बसेना स्वत:च्या डोळयांवर! तिथे त्या वनराईचा मागूससुध्दा नव्हता. बरीचशी झाडं भुईसपाट झाली होती. अन् आता त्या जागी झोपडया उभ्या होत्या. झोपडया तरी कसल्या? लहानपणी खेडयातल्या शेतात पाहिलेली, शाकारलेली छोटीशी झोपडी किती सुबक होती! ही तर नुसतीच पालं होती. चार बांबूंच्या आधाराने निळया, पिवळया प्लॅस्टीकच्या ताग्यांनी केलेला तात्पुरता निवारा, नुसती सावली होती ती. बस्स, इतकंच! अवतीभवती कळकट स्त्री-पुरुष अन् उघडी वाघडी मुलं, बकऱ्या, म्हशी, डुकरं, कुत्री, मांजरं सगळी एकत्रच वावरताना दिसत होती. जागोजागी पसरलेल्या कचऱ्यावर कावळेच कावळे जमा झाले होते. जवळच्या रस्त्याकडेची पाण्याची पाइपलाइन फोडलेली होती. तिथल्या खड्डयात उतरून बाया-पोरी प्लॅस्टीकच्या कळशांमधून पाणी नेत होत्या. जागोजागी चुलीची धुरकांडी धूर ओकत होती. पूर्वी तिथे डोलणाऱ्या वृक्षांचं आता सरपण झालं होतं. तेच ओलं हिरवं सरपण तो काळा धूर ओकत होतं. ऍल्युमिनियमच्या हंडयांतून तापलेलं पाणी घेऊन आंघोळी आणि एकूणच सगळे प्रातर्विधी राजरोस चालले होते. सकाळच्या मंद वाऱ्याबरोबर येणारे धुराचे अन् घाणीचे उग्र दुर्गंध 'स्वप्नगंधा'च्या गॅलरीत उभ्या असणाऱ्या त्या दोघांच्या नाकाला झोंबले. त्याचबरोबर त्या माणसांचा कलकलाट, आरडा-ओरडा, हाकारे हेही ऐकू येत होतं. त्यांचे शब्द, ती भाषा कळत नव्हती, पण त्यातला विशिष्ट हेल जाणवत होता. त्यातल्या रांगडेपणाचा दर्प कानाला खटकत होता. अज्ञान, गरीबी, गलिच्छपणा यांच्याबरोबरच बेदरकारीची दलदल माजली होती.
पोटाची खळगी भरायला अन् जीव जगवायला कुठूनतरी, कुणाच्या तरी आधाराने ही माणसं इथे आली होती हे उघडच होतं. मात्र माणसांची मुळं जेव्हा कुठेतरी रुजतात तेव्हाच 'संस्कृती' नावाची गोष्ट आकार घेते. नाहीतर मग जिथे कोणत्याही प्रकारे अशी मुळं रुजत नाहीत अशा ठिकाणी वास करताना फक्त 'निर्वासितपणा' निर्माण होतो; अगदी जगभरातल्या माणसामध्ये हेच अनुभवाला येतं. तोच 'निर्वासितपणा' इथेही दिसून येत होता.
नीरजा आणि कुमार ते सारं दृश्य नि:स्तब्ध होऊन पाहात होते. उतरलेल्या, उद्ध्वस्त, उद्विग्न मुद्रेने त्यांनी एकमेकांच्या डोळयांत पाहिलं, खोलवर! नि:शब्दपणे पायऱ्या उतरून दोघं परत निघाले...
पण कुमार असा गप्प बसणाऱ्यातला नव्हता. रिक्षा, स्टेशनकडे घेण्याऐवजी त्याने जुन्या परिचयातल्या दांडगे पाटलांच्या निवासाकडे, या प्रभागातल्या नकारसेवकांच्या निवासाकडे वळवली. माननीय श्रीयुत अशोकरावजी दांडगे पाटीलसाहेब नुकतेच सुस्नात होऊन 'दरबारात' आसनस्थ झाले होते. त्यांनी मारलेल्या परदेशी, उंची सुगंधाचा फवारा त्यांच्या प्रशस्त कायेसह त्या प्रशस्त दालनालासुध्दा सुगंधित करत होता. तशाच प्रशस्त हास्यासह त्यांनी कुमारचं स्वागत केलं आणि येण्याचं कारण विचारलं. हो, नाहीतरी त्यांच्याकडे कारणाशिवाय कोण येणार?
कुमारने सगळा प्रकार वर्णन केला. बोलता बोलता त्याचा स्वर तीव्र, धारदार होत गेला. 'या ठिकाणी बगीचा उभा राहणार होता म्हणे. त्याचं काय झालं? पाच-एक महिन्यांपूर्वी इकडे आलो तेव्हा काहीजण झाडं तोडताना दिसले. आम्ही हटकलं तर म्हणाले, 'होय, बगीचासाठीच तर झाडं तोडतोय. मधे मधे मोकळी जागा नको का हरळी लावायला?' तेव्हा वाटलं, हो, तेही ठीकच आहे; पण आता ही पालं, ही झोपडपट्टी? हा धूर आणि कलकलाट?
माननीय श्रीयुत अशोकरावजी दांडगे पाटीलसाहेब सगळं काही शांतपणे ऐकत होते. त्यांच्या मुखावरची शांती बुध्दालासुध्दा लाजवेल अशीच होती. कुमारची कैफियत मांडून होताच ते दिलखुलास हास्य करून म्हणाले,
'असा उतावळेपणा करून चालत नाही राव या कामात! नागरिकांचं हित जपणं हेच आमच्या पक्षाचं ध्येय आणि धोरण आहे. त्यासाठीच बसलोय न आम्ही? बगीचा होणार म्हणजे होणारच! पर्यावरणाची काळजी आम्हालापण आहेच की! काळजी करू नका तुम्ही.'
जरा थांबून पुढे ते म्हणाले, 'त्याचं असं आहे, शहराबाहेरची वनं वेगळी. आलं लक्षात? आणि शहरातली उपवनं वेगळी आणि आता त्या जागेवर बगीचा, वाटिका तयार करायची तर त्याचे प्लॅन करावे लागतात. त्याचं कंत्राट द्यावं लागतं. मग मात्र ते पुढे त्या कंत्राटदाराच्या हातात जातं. आम्ही मग त्यात फार ढवळाढवळ करू शकत नाही. त्यातून हा कंत्राटदार दुसऱ्या लॉबीचा! हां, पक्ष आमचाच, ध्येय-धोरणं एकच, पऽऽण काही कामात जराऽऽऽ हेच होतं बघा! आता आम्ही प्रयत्न करू, आमच्या लॉबीच्या कंत्राटदाराला काम द्यायचा. आणि... होईल ते. बघाच मग कशी झक्कपैकी 'स्वप्नवाटिका' तयार होते ती! पर्यावरणाच्या बाबतीत तडजोड नाही म्हणजे नाही!'
चार महिन्यांनी 'स्वप्नगंधा'तल्या नवीन घरात नीरजा-कुमार राहायला गेले तेव्हा समोरच्या 'राखीव' जागेतली बरीचशी पालं आजूबाजूला हटवून कच्च्या बांधकामाच्या पत्र्याच्या छपरांच्या चाळी उभ्या राहिल्या होत्या. बाकी सारं वातावरण तसंच, दुर्गंध आणि कलकलाट वाढला होता. पालांच्या थोडयाच पुंजक्यांऐवजी, आता बराच भाग त्यांनी व्यापून गेला होता.
गॅलरीतल्या दोन्ही कोपऱ्यात मोठाल्या काचेच्या रांजणात नीरजाने मनीप्लँट लावलं होतं. आता लवकरच त्याच्या पानजाळीने संपूर्ण गॅलरी झाकून जाणार होती. त्या दोघांनी 'समोरच्या समस्येवर' आपल्यापुरता तोडगा काढला होता. समोरच्या वनराईऐवजी ते दोघे आपल्याच सज्जातल्या मनीप्लँटच्या पानजाळीवर, त्या छोटेखानी हिरवाईवर समाधान मानणार होते. याच एका उपायाने ते सैराट वाढणाऱ्या त्या वस्तीला डोळयाआड करणार होते. राजकारण्यांची लठ्ठालठ्ठी तर चालूच राहणार होती. त्यात अशा वस्तीत लोटणारे लोंढे 'उद्याचे मतदार' होणार असतात, तेही हुकमी मतदार! मग काय? पर्यावरण, नागरिकांच्या सोयी वगैरे गोष्टींचा विचार त्यानंतरच होत असतो, हा शहाणपणा नीरजा अन् कुमार यांनी त्या मानाने लवकरच आत्मसात केला होता.

(ज्येष्ठपर्व, एप्रिल 2010 येथे पूर्वप्रकाशित)

कथाजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

9 Jun 2014 - 6:11 pm | आयुर्हित

शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी बागेची व त्यात असलेल्या झाडांची नक्किच मदत होते.

शहरात एकुण किती जागा आहे?
पैकी किती जागा बागेसाठी मोकळी ठेवणे आवश्यक आहे?
शहरात एकुण किती झाडे असली पाहिजेत?

यासाठी काय नियमावली आहे का?
नियमावली कोणावर बंधनकारक असते का?
ही बंधने न पाळ्ल्यास काही शिक्षेची तरतुद आहे का?

मिपावर कोणी आर्किटेक्ट असतील तर हे स्पष्ट होण्यास मदत होईल.

ही बातमी या पार्श्वभूमीवर अधिकच रोचक वाटते

पैसा's picture

14 Jun 2014 - 9:35 am | पैसा

आणि आत्ताचं नव्हे. १९९२ साली आम्हाला दिलेल्या प्लॅनमधे बिल्डिंगला १+२ मजले असतील आणि प्लॉटमधे ३ बिल्डिंग असतील असं दाखवलं होतं. तिन्ही बिल्डिंगच्या मधल्या जागेत बाग दाखवली होती. प्रत्यक्षात सोसायटी झाली तेव्हा १+३ च्या ५ बिल्डिंग्ज झाल्या. आणि बाग सोडाच, मुलांनी काही खेळायचं तर गाड्या ठेवायला जागा नाही असा प्रकार.