सावजी चिकन

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
28 Apr 2014 - 5:05 am

.

साहित्यः

१ किलो चिकन साफ करुन, किंचित हळद, तिखट, लिंबू रस लावून मॅरिनेट करुन ठेवणे
१ मोठा कांदा बारीक चिरलेला
२ टेस्पून आले+लसूण पेस्ट
३ टेस्पून सावजी मसाला ( आवडीप्रमाणे कमी जास्तं)
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर

.

सावजी मसाला साहित्यः

सावजी चिकन/ मटण हे झणझणीत, जहाल तिखट असते. मी तिखटाचे प्रमाण थोडे कमी, आमच्या चवीप्रमाणे बसवले आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी - जास्तं, तब्येतीला झेपेल असे प्रमाण बसवावे :)

३ टेस्पून सुके खोबरे
३ टेस्पून ज्वारीचे पीठ
६-७ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी - जास्तं)
१/२ टीस्पून धणे
१/२ टीस्पून बडीशेप
१/२ टीस्पून शहाजिरे
१/२ टीस्पून पेक्षा थोडी जास्तं टीस्पून खसखस
४ हिरवी वेलची
२ मसला वेलची
थोडे दगडफूल
४-५ लवंगा
९-१० काळीमिरी
१ जायपत्री
२-३ दालचिनीच्या काड्या तोडून

.

पाकृ:

एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, शहाजिरे, खसखस, हिरवी वेलची, मसला वेलची, दगडफूल, लवंगा, काळीमिरी, जायपत्री व दालचिनी कोरडेच मंद आचेवर भाजायला घ्या.
थोडे लालसर झाल्यावर त्यात सुके खोबरे व लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या.
शेवटी ज्वारीचे पीठ घालून मंद आचेवर थोडे लालसर भाजून घ्या.
गार झाले कि कोरडेच मिक्सरवर वाटून घ्या.

.

एका भांड्यात तेल गरम करुन आले+लसूण पेस्ट परतवून घ्या. (मी तेल कमी वापरले आहे)
त्यात बारीक चिरलेला कांदा घालून थोडा गुलाबी रंगावर परतवून घ्या.
त्यात सावजी मसला, मीठ व मॅरिनेट केलेले चिकन घालून चांगले परता.
गरजेनुसार पाणी घाला व झाकून चिकन शिजू द्या.
ज्वारीच्या पिठामुळे रस्सा दाट होतो, त्याप्रमाणे पाणी घाला.
चिकन शिजले की वरुन बारीक चिरलेली कोथींबीर पेरावी.

.

काही जणं सावजी चिकनमध्ये वरुन दोन चमचे खोबरेल तेल सोडतात, मी तसे न करता दोन चमचे तेलात (रोजच्या वापरातले तेल) सावजी मसाल्याची फोडणी देऊन ती फोडणी चिकनवर ओतली त्यामुळे छान तरी आली.

गरमा-गरम सावजी चिकन खाण्यासाठी तयार आहे :)

.

ह्या उकाड्यात खाणार असला तर सोबत सोलकढी ही होऊन जाऊ द्या ;)

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

28 Apr 2014 - 5:15 am | खटपट्या

मस्तय !!! करून बघतो

हे दगड्फुल मिळत नाही ग आमच्या येथे.
अन या आधीचा सावजी मसाला सपशेल गंडला माझा.
आता तुझ्या पद्धतिने करुन पहाते.

अर्धवटराव's picture

28 Apr 2014 - 6:57 am | अर्धवटराव

जोहार घ्यावा मॅड्डम.

नंदन's picture

28 Apr 2014 - 7:31 am | नंदन

मस्त पाकृ. शेवटचा फोटो तर काय कातिलाना आलाय!

अजया's picture

28 Apr 2014 - 7:32 am | अजया

आमच्या कामाची नाही पा.कृ.! पण सुंदर सादरीकरण आणि फोटोसाठी प्रतिसाद!!

आरोही's picture

29 Apr 2014 - 8:00 pm | आरोही

हेच म्हणते ...

खाण्याच्या नाही पण बघण्याच्या कामाची नक्कीच !
म्हणून डोळे भरून फोटोच पाहून घेतले !!

मुक्त विहारि's picture

28 Apr 2014 - 9:25 am | मुक्त विहारि

सावजी मसाल्याची पा.क्रु. दिल्याबद्दल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2014 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवा सानिकास्वप्निल यांना क्षमा कर.... त्या कसले कसले जीवघेणे फोटो टाकतात हे त्यांना कळत नाही.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

28 Apr 2014 - 2:57 pm | मुक्त विहारि

फोटो सारख्याच उत्तम पा.क्रु. पण देतात, त्याबद्दल अजून एकदा क्षमा कर.

(आपण तर "दाबेली" (http://misalpav.com/node/21507) पासूनच ह्यांच्या पा.क्रु. वर फिदा आहोत.)

एस's picture

28 Apr 2014 - 6:53 pm | एस

'नवे लेखन' या सदरात 'सानिकास्वप्निल' हे नाव दिसले की अजिबात लेख उघडायचा नाही असं खुद्द डॉकनीच बजावून ठेवले आहे. जळजळ आणि वजन वाढणे या दोन्ही गोष्टींवर तोच एक उपाय आहे.
---------------------------------------------------------------
(मनातल्या मनात) कडक डाएटवर असलेला(आणि वजन खरोखरच कमी झाल्याची स्वप्ने पाहणारा)
- येक स्वप्निल
---------------------------------------------------------------

अवांतर - कधी 'फूड फोटोग्राफी' वर लेख लिहिलाच तर त्यात एकही प्रतिमा न देता फक्त यांच्या धाग्यांचे दुवे देईल. :-)

आयुर्हित's picture

28 Apr 2014 - 10:10 am | आयुर्हित

नेहमीप्रमाणेच जबरदस्त फोटो व छान पाकृ!
ताजा मसाला बनवला असल्याने त्याची एक वेगळीच छान चव येईल असे वाटते.
खोबरेल तेलामुळेही एक छान चव नक्कीच येणार!

धन्यवाद.

दिपक.कुवेत's picture

28 Apr 2014 - 10:43 am | दिपक.कुवेत

हा सावजी मसाला किती दिवस टिकु शकतो म्हणजे जरा मोठ्या प्रमाणात केला तर? सावजी मटण एकलयं ते हि असचं असेल ना?

सानिकास्वप्निल's picture

28 Apr 2014 - 6:33 pm | सानिकास्वप्निल

नीट भाजला आणी हवाबंद डब्यात भरुन ठेवला तर बराच टिकेल असे वाटते. ताजा करुन वापरला तर पदार्थांची चव जबराट लागते :)
हो सावजी मटण ही असेच बनवतात. कोवळं मटण नाही मिळाले तर मटणाला टेंडर करायचे असल्यास थोडे पपईच्या सालाचा किस किंवा मीट टेंडराईझर लावून थोड्यावेळ ठेवावे म्हणजे ते लुसलुशीत होतं.

दिपक.कुवेत's picture

29 Apr 2014 - 11:16 am | दिपक.कुवेत

एक काम करतो थोडासा ताजाच बनवुन बघतो. अनायसे चीकन ड्रमस्टिकचे ४-५ पिस उरलेत ते हि पाकृ करुन सत्कारणी लावतो. फक्त ईथे खसखस बॅन असल्यामुळे ती तेवढि वगळतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2014 - 11:48 am | डॉ सुहास म्हात्रे

फर्मास ! फोटो बघूनच पोट भरले !

सुहास..'s picture

28 Apr 2014 - 1:25 pm | सुहास..

क आणि ल्ला पाकृ !!

हाहाहा!!! खरच कल्ला पाककृती.

गणपा's picture

28 Apr 2014 - 1:50 pm | गणपा

झक्कास.
हे हाणताना नाका डोळ्यांना धार लागली नाही तर मज्जा नाही. :)

सुहास झेले's picture

29 Apr 2014 - 12:40 am | सुहास झेले

यप्प... फाफू व्हायलाच हवी खाताना :)

इरसाल's picture

28 Apr 2014 - 2:08 pm | इरसाल

शेवटचा फोटो पाहताना मी जिभेवर ती चव जाणवु शकतो.

समीरसूर's picture

28 Apr 2014 - 2:45 pm | समीरसूर

सावजी चिकन काय दिसते आहे...वा वा वा. ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी हवी सोबत. आणि साधा भात. भरपूर पुण्य गाठी असले म्हणजे हे सुख देखील वाट्याला येते कधी कधी...

असे चिकन असल्यावर मला मात्र भाकरी कुस्करल्याशिवाय चैन पडत नाही. भाकरीचे तुकडे मोडून त्याला चिकनचा स्पर्श करून खाणे नामंजूर! भाकरीच्या कुस्कर्‍यामध्ये चिकनचा रस्सा ओतावा, चिकनचे लुसलुशीत तुकडे त्यात कुस्करावेत आणि कपाळावर येत असलेला घाम पुसण्याचीही तसदी न घेता फक्त खात रहावे. शेवटी साध्या मोकळ्या भातासोबत चिकनचा हा झणझणीत रस्सा खूप सुरेख लागतो. मला आठवते कधी काळी कॉलेजला असतांना हाफ बटर चिकन किंवा हाफ चिकन हैदराबादी आणि ६-७ तंदुरी रोट्या मी एकटा फस्त करत असे. असे तुडुंब जेवण झाल्यावर दोन चटणी पानांचे तोबरे भरून वसतिगृहाच्या आमच्या खोलीमध्ये गप्पांचा आणि गाण्यांचा अड्डा जमत असे. पहाटे ३-४ पर्यंत तुफान गाणी म्हणून झाल्यावर आम्ही झोपत असू.

पुण्यात सदाशिव पेठेत पेरु गेट पोलीस चौकीजवळ गोपी नावाचे एक मांसाहारी हॉटेल आहे. तिथे आम्ही बर्‍याचदा चिकन हादडायला जात असू. आता घराजवळ खांदेश नावाचे खांदेशी चिकनचे हॉटेल आहे. अगदी दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत तिथे अधून-मधून मी (एकटाच) जात असे. एक चिकन थाळी आणि एक चिकन सुक्क्याची प्लेट घ्यायची. दोन किंवा तीन भाकरी घ्यायच्या. दोन प्लेट लालभडक गरमागरम चिकन रस्सा मागवायचा आणि तिथे काम करणारे वेटर्स काय विचार करतायेत हा विचार न करता हा यज्ञ सुरू करायचा. नंतर दोन पाने चघळत चघळत घरी जायचे. वा वा वा...

चिकनमध्ये मसाला आणि तेल कमी वापरून ते चवदार बनवणे ही कला आहे. अगदी साधे चिकन देखील चवीच्या बाबतीत शाही मुर्ग मुसल्लमच्या कानफडीत मारू शकते हा स्वानुभव आहे. मी २००८ मध्ये शिकागोमध्ये असतांना माझा खोलीमित्र साधे परंतु इतके चविष्ट चिकन बनवायचा की मी स्वखुशीने भांडी घासावयाचे काम माझ्याकडे घेतले होते. :-) अर्थात त्या चिकनची जातकुळी निराळी; खांदेशच्या चिकनची, कोल्हापुरी चिकनची, सावजी चिकनची, मालवणी चिकनची, अवधी चिकनची, केरळ चिकनची...प्रत्येक पाककृतीची जातकुळी अगदीच निराळी. प्रत्यकाची मजा निराळी...हे सगळं खाऊन मिळणारा आनंद मात्र एकच, परमानंद! अत्युच्च अशा प्रकारचे सुख!

आता सावजी चिकन खाणे आलेच. किती किती लक्षात ठेवायचं प्रश्नच आहे. चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी...

मुक्त विहारि's picture

28 Apr 2014 - 2:50 pm | मुक्त विहारि

"चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी..."

ह्या एका वाक्यावर तर मी पण जगतो आहे.

है साल्ला...१००% सहमत....

चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी...

प्रचंड टाळ्या!

बॅटमॅन's picture

29 Apr 2014 - 12:49 pm | बॅटमॅन

आईचा घो.

प्रतिसाद वाचून कुक्कुटकुलाचा अजून एक प्रतिनिधी मोक्षास पाठवावासे वाटू लागले आहे. तुमचा कचकून निषेध असो असलं हपिसात बसून भावना चाळवल्याबद्दल.

मैत्र's picture

29 Apr 2014 - 2:19 pm | मैत्र

किती किती लक्षात ठेवायचं प्रश्नच आहे. चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी...

आत्ता पुण्यात असतो तर येत्या विकांताचा असा बेत ठरवला असता .. या एका वाक्यासाठी पार्टीच तुम्हाला..
एक असा कट्टा करता आला तर धमाल येईल..

समीरसूर's picture

29 Apr 2014 - 3:26 pm | समीरसूर

कट्टा नक्की करू; पुण्यात निवांत कधी आहात ते कळवा. :-) कट्टा कसा निवांत हवा; सायंकाळचा मंद मंद गारवा मनाला गुदगुल्या करत असतांना कट्टा सुरू व्हावा; संध्याकाळचा हळूहळू झिरपत जाणारा अंधार मग मनाचा कब्जा घ्यायला लागतो. नेहमीच हा गडद होत जाणारा अंधार एक विचित्र, काहीतरी सुटत असल्याच्या भावनांचा रंगीबेरंगी कल्लोळ घेऊन मनात शिरतो. नंतरचा दाट झालेला अंधार मग मनावर एक सुखद अशी साय आणतो. अशा या जरतारी वातावरणात मग कट्टा, गप्पा, खाणे, गाणे, पिणे (काय ते ज्याने त्याने ठरवावे, पन्हे, पाणी, की जॅक डॅनियल्स!) अशी आनंदाची कारंजी थुईथुई नाचावीत. तप्त मनोभूमीवर या कारंज्यांचे तुषार मनसोक्त झेलून रात्रीसकट आपणही सचैल भिजावे. क्या मजा है!

जिंदगी तो युं सौ साल की भी होती हैं
जिया तो चंद लम्हों में भी जाता है
चांद कभी हाथ न आया तो क्या गम?
हमारे दीदार को रोज आ ही जाता हैं

पैसा's picture

29 Apr 2014 - 8:11 pm | पैसा

समीरसूर हल्ली खूप छान लिहिताय!

मुक्त विहारि's picture

2 May 2014 - 3:21 pm | मुक्त विहारि

....मिसलपाव की किमया है.

अस्मी's picture

28 Apr 2014 - 2:50 pm | अस्मी

मस्त पाकृ...शेवटचा फोटो, त्यातील कांद्याच्या पाकळ्यांची सजावट सग्गळच भारी!!

यातील शाकाहारी कृती सांगावी ही विनंती.

प्यारे१'s picture

28 Apr 2014 - 6:57 pm | प्यारे१

+११११

तुषार काळभोर's picture

29 Apr 2014 - 4:30 pm | तुषार काळभोर

...

दिपक.कुवेत's picture

30 Apr 2014 - 11:32 am | दिपक.कुवेत

अजीबात नॉट चॉलबे....त्यात चीकन किंवा मटणच हवं. हे म्हणजे पैलवानाने आट्यापाट्या खेळण्यासारखं आहे (ह.घ्या हो नाहितर खेचाल आखाड्यात!)

तुषार काळभोर's picture

2 May 2014 - 2:36 pm | तुषार काळभोर

फुगडी नाही म्हणालात!!!

कवितानागेश's picture

2 May 2014 - 5:39 pm | कवितानागेश

सावजी बटाटा/ पनीर्/मशरुम/ टोफु/ सोयावडी/ डबल बीन्स/अंडी(?).... वगरै

संजय पाटिल's picture

18 Sep 2015 - 3:53 pm | संजय पाटिल

सुरण वापरुन बघा मटण, चिकन च्या ऐवजि मस्त लागतं!!

आयुर्हित's picture

2 May 2014 - 9:01 pm | आयुर्हित

ताजे मसाले दळून केली जाणारी शाकाहारी पाकृ उडुपी सांबार ही माझी अत्यंत आवडती पाकृ आहे.

अनन्या वर्तक's picture

28 Apr 2014 - 10:16 pm | अनन्या वर्तक

नेहमीप्रमाणेच मस्त फोटो व छान पाककृती. माझी सुरवात मसाल्याचे पदार्थ ओळखण्यपासून करावी लागेल असे वाटते आहे.....

तुमचा अभिषेक's picture

28 Apr 2014 - 10:34 pm | तुमचा अभिषेक

मस्तच !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2014 - 8:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

डाएट ला सुरुंग लावल्याबद्दल णिशेध!!!!!!! :)...
बाकी रेसिपी आणि फोटु नेहेमीप्रमाणे उत्तम =)) !!!!

(आज शिक्रण आणि मटारभातावर चैन करणारा) अनिरुद्ध

नानासाहेब नेफळे's picture

29 Apr 2014 - 2:04 pm | नानासाहेब नेफळे

मटारची उसळ आणि शिक्रण ही पुणेकरांच्या चंगळीची परिसीमा -इति पुलं

पैसा's picture

29 Apr 2014 - 2:09 pm | पैसा

पाकृ, फोटो सगळं मस्तच!

मैत्र's picture

29 Apr 2014 - 2:19 pm | मैत्र

काय तो रंग रश्श्याचा..
इथे कानडी आप्पांच्या नगरीत कुठे असली करामत ..
नशीब जेवण झाल्यावर पाहिला धागा..

आणि ते शेवटच्या फोटोत कांद्याचं (बहुतेक) जे फूल सजवलं आहे तेही तितकंच कातिल आहे..

सानिकातैंच्या पदार्थांच्या यादीचे सुद्धा फोटो इतके देखणे कसे येतात हे मला कधीही न उलगडलेलं कोडं आहे.

पियुशा's picture

29 Apr 2014 - 4:43 pm | पियुशा

भ न्ना ट !

बोबो's picture

29 Apr 2014 - 8:37 pm | बोबो

तों. पा. सु. - तोंडाला पाणी सुटले. एकदम झकास… :)

कपिलमुनी's picture

27 Apr 2015 - 3:54 pm | कपिलमुनी

सावजीची पाकृ छान आहे. पण रंग लाल आहे. बर्‍याच ठिकाणी काळा मसाला वापरत असल्याचे लिहिले आहे त्या मुळे रश्याचा रंग काळसर येतो असे वाटते .

कोंबडी प्रेमी's picture

27 Apr 2015 - 4:24 pm | कोंबडी प्रेमी

तरीही हि पाककृती आमच्या नजरेतून सुटल्यामुले स्वत:चाच निषेध !!!
तरीही हे आता करून खाणे आले ... खाऊन झाल्यावर कळवण्यात येईल ..

स्पंदना's picture

28 Apr 2015 - 6:49 am | स्पंदना

ए! मी दगड्फुल आणलय भारतातुन. आता करते तुझा मसाला.

बोका-ए-आझम's picture

17 Sep 2015 - 12:27 pm | बोका-ए-आझम

मस्तच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Sep 2015 - 12:34 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझा मित्र आहे प्रॉपर सावजी समाजातला त्याची आई झकास बनवते हा प्रकार फ़क्त त्या काकू ह्यात ज्वारीच्या पीठा ऐवजी पंढरपुरी डाळव्याची बारीक पूड किंवा पीठ वापरतात