मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सावजी चिकन

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्यः १ किलो चिकन साफ करुन, किंचित हळद, तिखट, लिंबू रस लावून मॅरिनेट करुन ठेवणे १ मोठा कांदा बारीक चिरलेला २ टेस्पून आले+लसूण पेस्ट ३ टेस्पून सावजी मसाला ( आवडीप्रमाणे कमी जास्तं) मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर . सावजी मसाला साहित्यः सावजी चिकन/ मटण हे झणझणीत, जहाल तिखट असते. मी तिखटाचे प्रमाण थोडे कमी, आमच्या चवीप्रमाणे बसवले आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी - जास्तं, तब्येतीला झेपेल असे प्रमाण बसवावे :) ३ टेस्पून सुके खोबरे ३ टेस्पून ज्वारीचे पीठ ६-७ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी - जास्तं) १/२ टीस्पून धणे १/२ टीस्पून बडीशेप १/२ टीस्पून शहाजिरे १/२ टीस्पून पेक्षा थोडी जास्तं टीस्पून खसखस ४ हिरवी वेलची २ मसला वेलची थोडे दगडफूल ४-५ लवंगा ९-१० काळीमिरी १ जायपत्री २-३ दालचिनीच्या काड्या तोडून . पाकृ: एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, शहाजिरे, खसखस, हिरवी वेलची, मसला वेलची, दगडफूल, लवंगा, काळीमिरी, जायपत्री व दालचिनी कोरडेच मंद आचेवर भाजायला घ्या. थोडे लालसर झाल्यावर त्यात सुके खोबरे व लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या. शेवटी ज्वारीचे पीठ घालून मंद आचेवर थोडे लालसर भाजून घ्या. गार झाले कि कोरडेच मिक्सरवर वाटून घ्या. . एका भांड्यात तेल गरम करुन आले+लसूण पेस्ट परतवून घ्या. (मी तेल कमी वापरले आहे) त्यात बारीक चिरलेला कांदा घालून थोडा गुलाबी रंगावर परतवून घ्या. त्यात सावजी मसला, मीठ व मॅरिनेट केलेले चिकन घालून चांगले परता. गरजेनुसार पाणी घाला व झाकून चिकन शिजू द्या. ज्वारीच्या पिठामुळे रस्सा दाट होतो, त्याप्रमाणे पाणी घाला. चिकन शिजले की वरुन बारीक चिरलेली कोथींबीर पेरावी. . काही जणं सावजी चिकनमध्ये वरुन दोन चमचे खोबरेल तेल सोडतात, मी तसे न करता दोन चमचे तेलात (रोजच्या वापरातले तेल) सावजी मसाल्याची फोडणी देऊन ती फोडणी चिकनवर ओतली त्यामुळे छान तरी आली. गरमा-गरम सावजी चिकन खाण्यासाठी तयार आहे :) . ह्या उकाड्यात खाणार असला तर सोबत सोलकढी ही होऊन जाऊ द्या ;)

वाचने 39907 वाचनखूण प्रतिक्रिया 51

नंदन Mon, 04/28/2014 - 07:31
मस्त पाकृ. शेवटचा फोटो तर काय कातिलाना आलाय!

अजया Mon, 04/28/2014 - 07:32
आमच्या कामाची नाही पा.कृ.! पण सुंदर सादरीकरण आणि फोटोसाठी प्रतिसाद!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्त विहारि Mon, 04/28/2014 - 14:57
फोटो सारख्याच उत्तम पा.क्रु. पण देतात, त्याबद्दल अजून एकदा क्षमा कर. (आपण तर "दाबेली" (http://misalpav.com/node/21507) पासूनच ह्यांच्या पा.क्रु. वर फिदा आहोत.)

In reply to by मुक्त विहारि

एस Mon, 04/28/2014 - 18:53
'नवे लेखन' या सदरात 'सानिकास्वप्निल' हे नाव दिसले की अजिबात लेख उघडायचा नाही असं खुद्द डॉकनीच बजावून ठेवले आहे. जळजळ आणि वजन वाढणे या दोन्ही गोष्टींवर तोच एक उपाय आहे. --------------------------------------------------------------- (मनातल्या मनात) कडक डाएटवर असलेला(आणि वजन खरोखरच कमी झाल्याची स्वप्ने पाहणारा) - येक स्वप्निल --------------------------------------------------------------- अवांतर - कधी 'फूड फोटोग्राफी' वर लेख लिहिलाच तर त्यात एकही प्रतिमा न देता फक्त यांच्या धाग्यांचे दुवे देईल. :-)

आयुर्हित Mon, 04/28/2014 - 10:10
नेहमीप्रमाणेच जबरदस्त फोटो व छान पाकृ! ताजा मसाला बनवला असल्याने त्याची एक वेगळीच छान चव येईल असे वाटते. खोबरेल तेलामुळेही एक छान चव नक्कीच येणार! धन्यवाद.

In reply to by दिपक.कुवेत

नीट भाजला आणी हवाबंद डब्यात भरुन ठेवला तर बराच टिकेल असे वाटते. ताजा करुन वापरला तर पदार्थांची चव जबराट लागते :) हो सावजी मटण ही असेच बनवतात. कोवळं मटण नाही मिळाले तर मटणाला टेंडर करायचे असल्यास थोडे पपईच्या सालाचा किस किंवा मीट टेंडराईझर लावून थोड्यावेळ ठेवावे म्हणजे ते लुसलुशीत होतं.

In reply to by सानिकास्वप्निल

दिपक.कुवेत Tue, 04/29/2014 - 11:16
एक काम करतो थोडासा ताजाच बनवुन बघतो. अनायसे चीकन ड्रमस्टिकचे ४-५ पिस उरलेत ते हि पाकृ करुन सत्कारणी लावतो. फक्त ईथे खसखस बॅन असल्यामुळे ती तेवढि वगळतो.

गणपा Mon, 04/28/2014 - 13:50
झक्कास. हे हाणताना नाका डोळ्यांना धार लागली नाही तर मज्जा नाही. :)

इरसाल Mon, 04/28/2014 - 14:08
शेवटचा फोटो पाहताना मी जिभेवर ती चव जाणवु शकतो.

समीरसूर Mon, 04/28/2014 - 14:45
सावजी चिकन काय दिसते आहे...वा वा वा. ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी हवी सोबत. आणि साधा भात. भरपूर पुण्य गाठी असले म्हणजे हे सुख देखील वाट्याला येते कधी कधी... असे चिकन असल्यावर मला मात्र भाकरी कुस्करल्याशिवाय चैन पडत नाही. भाकरीचे तुकडे मोडून त्याला चिकनचा स्पर्श करून खाणे नामंजूर! भाकरीच्या कुस्कर्‍यामध्ये चिकनचा रस्सा ओतावा, चिकनचे लुसलुशीत तुकडे त्यात कुस्करावेत आणि कपाळावर येत असलेला घाम पुसण्याचीही तसदी न घेता फक्त खात रहावे. शेवटी साध्या मोकळ्या भातासोबत चिकनचा हा झणझणीत रस्सा खूप सुरेख लागतो. मला आठवते कधी काळी कॉलेजला असतांना हाफ बटर चिकन किंवा हाफ चिकन हैदराबादी आणि ६-७ तंदुरी रोट्या मी एकटा फस्त करत असे. असे तुडुंब जेवण झाल्यावर दोन चटणी पानांचे तोबरे भरून वसतिगृहाच्या आमच्या खोलीमध्ये गप्पांचा आणि गाण्यांचा अड्डा जमत असे. पहाटे ३-४ पर्यंत तुफान गाणी म्हणून झाल्यावर आम्ही झोपत असू. पुण्यात सदाशिव पेठेत पेरु गेट पोलीस चौकीजवळ गोपी नावाचे एक मांसाहारी हॉटेल आहे. तिथे आम्ही बर्‍याचदा चिकन हादडायला जात असू. आता घराजवळ खांदेश नावाचे खांदेशी चिकनचे हॉटेल आहे. अगदी दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत तिथे अधून-मधून मी (एकटाच) जात असे. एक चिकन थाळी आणि एक चिकन सुक्क्याची प्लेट घ्यायची. दोन किंवा तीन भाकरी घ्यायच्या. दोन प्लेट लालभडक गरमागरम चिकन रस्सा मागवायचा आणि तिथे काम करणारे वेटर्स काय विचार करतायेत हा विचार न करता हा यज्ञ सुरू करायचा. नंतर दोन पाने चघळत चघळत घरी जायचे. वा वा वा... चिकनमध्ये मसाला आणि तेल कमी वापरून ते चवदार बनवणे ही कला आहे. अगदी साधे चिकन देखील चवीच्या बाबतीत शाही मुर्ग मुसल्लमच्या कानफडीत मारू शकते हा स्वानुभव आहे. मी २००८ मध्ये शिकागोमध्ये असतांना माझा खोलीमित्र साधे परंतु इतके चविष्ट चिकन बनवायचा की मी स्वखुशीने भांडी घासावयाचे काम माझ्याकडे घेतले होते. :-) अर्थात त्या चिकनची जातकुळी निराळी; खांदेशच्या चिकनची, कोल्हापुरी चिकनची, सावजी चिकनची, मालवणी चिकनची, अवधी चिकनची, केरळ चिकनची...प्रत्येक पाककृतीची जातकुळी अगदीच निराळी. प्रत्यकाची मजा निराळी...हे सगळं खाऊन मिळणारा आनंद मात्र एकच, परमानंद! अत्युच्च अशा प्रकारचे सुख! आता सावजी चिकन खाणे आलेच. किती किती लक्षात ठेवायचं प्रश्नच आहे. चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी...

In reply to by समीरसूर

मुक्त विहारि Mon, 04/28/2014 - 14:50
"चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी..." ह्या एका वाक्यावर तर मी पण जगतो आहे. है साल्ला...१००% सहमत....

In reply to by समीरसूर

मराठे Mon, 04/28/2014 - 22:09
चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी...
प्रचंड टाळ्या!

In reply to by समीरसूर

बॅटमॅन Tue, 04/29/2014 - 12:49
आईचा घो. प्रतिसाद वाचून कुक्कुटकुलाचा अजून एक प्रतिनिधी मोक्षास पाठवावासे वाटू लागले आहे. तुमचा कचकून निषेध असो असलं हपिसात बसून भावना चाळवल्याबद्दल.

In reply to by समीरसूर

मैत्र Tue, 04/29/2014 - 14:19
किती किती लक्षात ठेवायचं प्रश्नच आहे. चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी...
आत्ता पुण्यात असतो तर येत्या विकांताचा असा बेत ठरवला असता .. या एका वाक्यासाठी पार्टीच तुम्हाला.. एक असा कट्टा करता आला तर धमाल येईल..

In reply to by मैत्र

समीरसूर Tue, 04/29/2014 - 15:26
कट्टा नक्की करू; पुण्यात निवांत कधी आहात ते कळवा. :-) कट्टा कसा निवांत हवा; सायंकाळचा मंद मंद गारवा मनाला गुदगुल्या करत असतांना कट्टा सुरू व्हावा; संध्याकाळचा हळूहळू झिरपत जाणारा अंधार मग मनाचा कब्जा घ्यायला लागतो. नेहमीच हा गडद होत जाणारा अंधार एक विचित्र, काहीतरी सुटत असल्याच्या भावनांचा रंगीबेरंगी कल्लोळ घेऊन मनात शिरतो. नंतरचा दाट झालेला अंधार मग मनावर एक सुखद अशी साय आणतो. अशा या जरतारी वातावरणात मग कट्टा, गप्पा, खाणे, गाणे, पिणे (काय ते ज्याने त्याने ठरवावे, पन्हे, पाणी, की जॅक डॅनियल्स!) अशी आनंदाची कारंजी थुईथुई नाचावीत. तप्त मनोभूमीवर या कारंज्यांचे तुषार मनसोक्त झेलून रात्रीसकट आपणही सचैल भिजावे. क्या मजा है! जिंदगी तो युं सौ साल की भी होती हैं जिया तो चंद लम्हों में भी जाता है चांद कभी हाथ न आया तो क्या गम? हमारे दीदार को रोज आ ही जाता हैं

In reply to by तुषार काळभोर

दिपक.कुवेत Wed, 04/30/2014 - 11:32
अजीबात नॉट चॉलबे....त्यात चीकन किंवा मटणच हवं. हे म्हणजे पैलवानाने आट्यापाट्या खेळण्यासारखं आहे (ह.घ्या हो नाहितर खेचाल आखाड्यात!)

डाएट ला सुरुंग लावल्याबद्दल णिशेध!!!!!!! :)... बाकी रेसिपी आणि फोटु नेहेमीप्रमाणे उत्तम =)) !!!! (आज शिक्रण आणि मटारभातावर चैन करणारा) अनिरुद्ध

मैत्र Tue, 04/29/2014 - 14:19
काय तो रंग रश्श्याचा.. इथे कानडी आप्पांच्या नगरीत कुठे असली करामत .. नशीब जेवण झाल्यावर पाहिला धागा.. आणि ते शेवटच्या फोटोत कांद्याचं (बहुतेक) जे फूल सजवलं आहे तेही तितकंच कातिल आहे.. सानिकातैंच्या पदार्थांच्या यादीचे सुद्धा फोटो इतके देखणे कसे येतात हे मला कधीही न उलगडलेलं कोडं आहे.

कपिलमुनी Mon, 04/27/2015 - 15:54
सावजीची पाकृ छान आहे. पण रंग लाल आहे. बर्‍याच ठिकाणी काळा मसाला वापरत असल्याचे लिहिले आहे त्या मुळे रश्याचा रंग काळसर येतो असे वाटते .

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 09/17/2015 - 12:34
माझा मित्र आहे प्रॉपर सावजी समाजातला त्याची आई झकास बनवते हा प्रकार फ़क्त त्या काकू ह्यात ज्वारीच्या पीठा ऐवजी पंढरपुरी डाळव्याची बारीक पूड किंवा पीठ वापरतात