लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ४

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
20 Mar 2014 - 9:59 am

यापूर्वीचे लेखन

लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ३

प्रश्न क्रमांक १३

कराड (महाराष्ट्र) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघांमध्ये काय साम्य आहे?

अ. दोन्ही लोकसभा मतदारसंघातून दोन वेगळ्या निवडणुकांमध्ये पती आणि पत्नी निवडून गेले होते.
ब. लोकसभेचे अध्यक्ष या मतदारसंघांमधून निवडून गेले होते.
क. दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधून एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती विविध निवडणुकांमध्ये निवडून गेल्या होत्या.
ड. या मतदारसंघांमधून निवडून गेलेल्या खासदारांनी भविष्यात अनुक्रमे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले
इ. (अ) आणि (क) दोन्ही

प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच कळवावे ही विनंती. उत्तर २४ मार्च रोजी जाहिर केले जाईल.

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

24 Mar 2014 - 10:35 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १३ चे उत्तर आहे--(इ): अ आणि क दोन्ही

कराड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आनंदराव (दाजीसाहेब) चव्हाण १९५७, १९६२, १९६७ आणि १९७१ मध्ये निवडून गेले. कराडमधून त्यांच्या पत्नी प्रेमलाकाकी चव्हाण या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून १९७७, १९८४ आणि १९८९ मध्ये निवडून गेल्या.तर आनंदराव आणि प्रेमलाकाकी यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच मतदारसंघातून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये निवडून गेले.

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फिरोझ गांधी १९५२ आणि १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले.त्यांच्या पत्नी आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्या मतदारसंघातून १९६७,१९७१ आणि १९८० मध्ये निवडून गेल्या. इंदिरा आणि फिरोझ गांधी यांच्या सूनबाई आणि सध्याच्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्याच मतदारसंघातून २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर २००५ च्या पोटनिवडणुकीत निवडून गेल्या.

तेव्हा या मतदारसंघातून पती आणि पत्नी तसेच एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती विविध निवडणुकांमध्ये निवडून गेल्या होत्या.

१९८० मध्ये इंदिरा गांधी रायबरेली (उत्तर प्रदेश) बरोबरच मेडक (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातूनही लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. निवडून आल्यावर त्यांनी मेडकची जागा आपल्याकडे ठेवली आणि रायबरेलीच्या खासदारपदाचा राजीनामा दिला.त्यानंतर रायबरेलीमध्ये १९८० सालीच झालेल्या पोटनिवडणुकीत अरूण नेहरू (राजीव गांधींचे दूरचे मावसभाऊ) निवडून गेले.त्यांनी १९८४ मध्येही रायबरेलीमधून विजय मिळवला. तर १९८९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार म्हणून शीला कौल निवडून गेल्या. शीला कौल या इंदिरा गांधींच्या मातोश्री कमला नेहरू-कौल यांचे भाऊ कैलाशनाथ कौल यांच्या पत्नी. तेव्हा शीला कौल या इंदिरा गांधींच्या मामी आहेत. जर अरूण नेहरू आणि शीला कौल यांना विस्तारित कुटुंबाचे सदस्य म्हणून धरल्यास रायबरेली लोकसभा मतदारसंघातून एकाच विस्तारित कुटुंबाचे पाच सदस्य निवडून गेले.

या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधुत, नितिन थत्ते, खेडूत, ज्ञानोबाचे पैजार, रामज्या आणि मी सौरभ यांनी पाठवले.सगळ्यांचे उत्तर बरोबर होते.

प्रश्न क्रमांक १४ उद्या पोस्ट करायचा आधीचा बेत होता.पण उद्या अन्य कामात असल्यामुळे प्रश्न क्रमांक १४ शक्य झाल्यास आज किंवा वेळेत परतल्यास उद्या किंवा परवा पोस्ट करेन.

लाल टोपी's picture

26 Mar 2014 - 10:57 pm | लाल टोपी

फिरोज गांधी रायबरेली मतदारसंघातून पहिल्यांदा १९५७ मध्ये निवडून आले होते रायबरेलेतून १९५२ मध्ये शिव दयाल आणि विश्वंभर दयाल हे दोन प्रतिनिधी निवडून गेले होते असे वाचल्याचे स्मरते. कदाचित चुकीचेही असेल.

क्लिंटन's picture

29 Mar 2014 - 1:10 pm | क्लिंटन

अरे लाल टोपी यांचा हा प्रतिसाद आताच बघत आहे.

१९५२ मध्ये पहिल्या निवडणुकांसाठी मतदारसंघांच्या सीमा आखताना नक्की कोणत्या मुद्द्यांचा विचार केला होता याची कल्पना नाही पण काही मतदारसंघ बरेच मोठे होते. उत्तर प्रदेशातील पूर्ण उन्नाव जिल्हा, हरदोई जिल्हा आणि रायबरेली जिल्ह्याचा पश्चिम भाग असा एक मोठा मतदारसंघ होता. त्या मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वंभर दयाल आणि स्वामी रामानंद निवडून गेले. तर प्रतापगढ जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि रायबरेली जिल्ह्याचा पूर्व भाग हा दुसरा मतदारसंघ होता. त्यातून फिरोझ गांधी आणि बैजनाथ कुरिल निवडून गेले. याविषयी अधिक निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवरील http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/LS_1951/VOL_1_51_LS.PDF या पी.डी.फ फाईलमध्ये माहिती मिळेल.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

क्लिंटन's picture

25 Mar 2014 - 11:28 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १४

लातूर (महाराष्ट्र), सिकर (राजस्थान), फिरोझपूर (पंजाब), सासाराम (बिहार), तुरा (मेघालय), अमलापुरम (आंध्र प्रदेश), मुंबई उत्तर मध्य (महाराष्ट्र), बोलपूर (पश्चिम बंगाल) आणि केंद्रपाडा (ओरिसा) लोकसभा मतदारसंघांमध्ये काय साम्य आहे?

अ. या मतदारसंघांमधून त्या राज्यांचे आजी/माजी/भावी मुख्यमंत्री निवडून गेले होते.
ब. भारताच्या अर्थमंत्र्यांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते.
क. लोकसभा अध्यक्षांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते.
ड. भारताच्या गृहमंत्र्यांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते.
इ. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्या पदावर असताना या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले होते.

प्रश्नाचे उत्तर शनीवार २९ मार्च रोजी जाहिर केले जाईल. उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती.

क्लिंटन's picture

29 Mar 2014 - 1:05 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १४ चे बरोबर उत्तर आहे: (क): लोकसभा अध्यक्षांनी त्या पदावर असताना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

१० व्या लोकसभेचे (१९९१-९६) अध्यक्ष शिवराज पाटील हे लातूर (महाराष्ट्र) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते.

८ व्या लोकसभेचे (१९८४-८९) अध्यक्ष बलराम जाखड हे सिकर (राजस्थान) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते.

७ व्या लोकसभेचे (१९८०-८४) अध्यक्ष बलराम जाखड हे फिरोझपूर(पंजाब) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते.

१५ व्या लोकसभेच्या (२००९-१४) अध्यक्षा मीरा कुमार या सासाराम(बिहार) च्या खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष आहेत.

११ व्या लोकसभेचे (१९९६-९७) अध्यक्ष पी.ए.संगमा हे तुरा(मेघालय) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते.

१२ व्या लोकसभेचे (१९९८-९९) अध्यक्ष जी.एम.सी.बालयोगी हे अमलापुरम(आंध्र प्रदेश) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते. तेच १९९९ मध्ये अमलापुरम मधूनच निवडून गेले आणि पुढे १३ व्या लोकसभेचेही अध्यक्ष झाले.पण त्यांचे मार्च २००२ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतर मुंबई उत्तर मध्य (महाराष्ट्र) मतदारसंघाचे खासदार मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष झाले.

१४ व्या लोकसभेचे (२००४-०९) अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी हे बोलपूर(पश्चिम बंगाल) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते.

९ व्या लोकसभेचे (१९८९-९१) अध्यक्ष रवी रे हे केंद्रपाडा(ओरिसा) चे खासदार असताना लोकसभेचे अध्यक्ष होते.

या प्रश्नाचे उत्तर रामज्या, नितिन थत्ते, राघव८२, खेडूत, अनन्त अवधुत, विअर्ड विक्स आणि श्रीगुरूजी यांनी बरोबर पाठवले. अन्य दोन मिपाकरांची उत्तरे चुकली.

पुढचा प्रश्न उद्या--रविवार ३० मार्च रोजी पोस्ट करणार आहे.

धन्यवाद

राघवेंद्र's picture

25 Mar 2014 - 11:11 pm | राघवेंद्र

व्य.नि. मध्ये पाठविले आहे.
प्रतिसाद धागा वर राहण्याकरिता आहे.

क्लिंटन's picture

30 Mar 2014 - 10:34 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १५

पुढीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभा अध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी त्या पदावर असताना आणि राष्ट्रपतींनी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढविण्यापूर्वी केले होते? (म्हणजेच या मतदारसंघाने देशाला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष ही तीन पदे भूषविणारे नेते दिले आहेत)

अ. रायबरेली
ब. अलाहाबाद
क. लखनौ
ड. नंद्याल
इ. जांगीपूर

प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर ३ एप्रिल रोजी जाहिर केले जाईल.

अ.

क्लिंटन's picture

3 Apr 2014 - 7:18 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १५ चे उत्तर

बरोबर उत्तर आहे: नंद्याल (आंध्र प्रदेश).

१९७७ मध्ये काँग्रेस पक्षाचा उत्तर भारतात धुव्वा उडाला पण दक्षिण भारतात मात्र चांगलाच विजय झाला. आंध्र प्रदेशातील ४२ पैकी पक्षाने ४१ जागा जिंकल्या.जनता पक्षाने जिंकलेली एकमेव जागा होती नंद्याल. या मतदारसंघातून नीलम संजीव रेड्डी निवडून आले.ते एप्रिल १९७७ मध्ये सहाव्या लोकसभेचे अध्यक्ष झाले.त्यानंतर जुलै १९७७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून गेले (आतापर्यंत बिनविरोध निवडून जाणारे नीलम संजीव रेड्डी हे एकमेव राष्ट्रपती आहेत). (रेड्डी चौथ्या लोकसभेचेही १९६७ ते १९६९ या काळात अध्यक्ष होते.त्यांनी १९६९ मध्येही राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली होती.पण त्यांचा इंदिरा गांधींचे उमेदवार व्ही.व्ही.गिरी यांनी पराभव केला होता).

राजीव गांधींच्या मृत्यूनंतर जून १९९१ मध्ये पी.व्ही.नरसिंह राव पंतप्रधान झाले.१९८९ मध्ये ते रामटेक (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.सक्रीय राजकारणातून निवृत्त व्हायचे या उद्देशाने त्यांनी १९९१ ची लोकसभा निवडणुक लढवली नव्हती.पण राजीव गांधींच्या आकस्मिक मृत्यूनंतर बदललेल्या परिस्थितीत पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्षपद आणि नंतर भारताचे पंतप्रधानपद त्यांना सांभाळावे लागले. रावांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा ते लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य नव्हते.राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे त्यांना शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत संसदेच्या एका सभागृहाचे सदस्य होणे भाग होते.त्यांनी नोव्हेंबर १९९१ मध्ये नंद्याल (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातूनच पोटनिवडणुक लढवली. या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या बंगारू लक्ष्मण (तेहलका प्रकरणी बदनाम झालेले) यांचा ५ लाख ८२ हजार मतांनी पराभव केला आणि गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदविला.एक तेलुगु पंतप्रधान झाल्यामुळे त्यांच्याविरूध्द आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष तेलुगु देसमने उमेदवार उभा केला नव्हता.

या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधुत, रामज्या, विअर्ड विक्स आणि खेडूत यांनी बरोबर पाठविले.

पुढचा प्रश्न उद्या ४ एप्रिल रोजी प्रसिध्द करेन.

अनन्त अवधुत's picture

31 Mar 2014 - 6:38 am | अनन्त अवधुत

आधीचे प्रश्नोत्तरे नीट वाचली असतील तर त्यातच उत्तर दडलेले आहे

ramjya's picture

31 Mar 2014 - 7:09 pm | ramjya

व्य.नि केला

क्लिंटन's picture

4 Apr 2014 - 6:16 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १६

खालीलपैकी कोणते नेते लोकसभेवर सहा वेगळ्या पक्षांचे उमेदवार म्हणून वेगवेगळ्या वेळी निवडून गेले?

अ. जॉर्ज फर्नांडिस
ब. चंद्रशेखर
क. एस. बंगाराप्पा
ड. लालूप्रसाद यादव
इ. (अ) आणि (ब) दोन्ही

प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर मंगळवार ८ एप्रिल रोजी जाहीर केले जाईल.

क्लिंटन's picture

8 Apr 2014 - 1:59 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १६ चे उत्तर इ: जॉर्ज फर्नांडिस आणि चंद्रशेखर दोन्ही असे आहे.

जॉर्ज फर्नांडिस पुढील पक्षांचे उमेदवार म्हणून विविध वेळी लोकसभेवर निवडून गेले:
१९६७-- मुंबई दक्षिण (महाराष्ट्र)-- संयुक्त समाजवादी पक्ष
१९७७-- मुझफ्फरपूर (बिहार) -- भारतीय लोकदल
१९८०-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता पक्ष (सेक्युलर)
१९८९-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता दल
१९९१-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता दल
१९९६-- नालंदा (बिहार) -- समता पक्ष
१९९८-- नालंदा (बिहार) -- समता पक्ष
१९९९-- नालंदा (बिहार) -- जनता दल (युनायटेड)
२००४-- मुझफ्फरपूर (बिहार) -- जनता दल (युनायटेड)

चंद्रशेखर बलिया (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पुढील पक्षांचे उमेदवार म्हणून विविध वेळी लोकसभेवर निवडून गेले:

१९७७-- भारतीय लोकदल
१९८०-- जनता पक्ष
१९८९-- जनता दल
१९९१-- जनता दल (समाजवादी)
१९९६-- समता पक्ष
१९९८-- समाजवादी जनता पक्ष
१९९९-- समाजवादी जनता पक्ष
२००४ -- समाजवादी जनता पक्ष

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.बंगाराप्पा पुढील पक्षांचे उमेदवार म्हणून शिमोगा (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले--
१९९६-- कर्नाटक काँग्रेस पक्ष
१९९९-- काँग्रेस
२००४--भाजप
२००५-- समाजवादी पक्ष (२००४ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून निवडून गेल्यानंतर काही महिन्यातच बंगाराप्पांनी भाजप सदस्यत्व आणि खासदारपदाचा राजीनामा दिला आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. २००५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.)

याव्यतिरिक्त १९९८ मध्ये बंगाराप्पा स्वतःच्या कर्नाटक विकास पक्षाचे उमेदवार म्हणून शिमोगामधून पराभूत झाले. १९९६ नंतर त्यांनी आपला कर्नाटक काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि ते स्वगृही परतले.पण १९९८ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे त्यांनी परत स्वतःचा कर्नाटक विकास पक्ष स्थापन केला. भाजपच्या अयानूर मंजुनाथ यांनी ती निवडणुक जिंकली आणि बंगाराप्पा १९९८ मध्ये तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. १९९९ मध्ये बंगाराप्पा परत काँग्रेसमध्ये परतले आणि शिमोगातून जिंकले. नंतर भाजप आणि समाजवादी पक्ष असा प्रवास करून २००७-०८ मध्ये ते परत एकदा काँग्रेसमध्ये परतले. २००८ मध्ये त्यांचा कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या बी.एस.येडियुराप्पांनी शिकारीपुरामधून पराभव केला. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा येडियुराप्पा पुत्र राघवेन्द्र यांनी शिमोगामधून पराभव केला. २०११ मध्ये बंगाराप्पांचे निधन झाले.

लालू प्रसाद यादव छप्रा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून १९७७ मध्ये, जनता दलाचे उमेदवार म्हणून १९८९ मध्ये तर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार म्हणून २००४ मध्ये निवडून गेले. ते राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार म्हणून मधेपुरा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून १९९८ आणि २००४ मध्ये निवडून गेले होते.

अवांतर
१९७७ मध्ये निवडणुकांच्या वेळी जनता पक्ष स्थापन झाला नव्हता. निवडणुका सर्व नेत्यांनी भारतीय लोकदल पक्षाचे उमेदवार म्हणून लढविल्या. (अगदी वाजपेयी, जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा, मोरारजी इत्यादी सगळ्यांनी निवडणुका भारतीय लोक दलाचे उमेदवार म्हणूनच लढविल्या). निवडणुका झाल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि १ मे १९७७ रोजी जनता पक्षाची स्थापना झाली. निवडणुका जाहिर झाल्या १८ जानेवारी १९७७ रोजी. त्यानंतर विविध विरोधी पक्षांची एकजूट, एकत्र निवडणुका लढविण्यावर एकमत, जगजीवन राम मंत्रीमंडळातून बाहेर पडून काँग्रेस फॉर डेमॉक्रसी या पक्षाची स्थापना (त्यांना हेमवतीनंदन बहुगुणा, नंदिनी सत्पथी सामील झाले) आणि त्या पक्षानेही इतर विरोधी पक्षांबरोबर काँग्रेसविरूध्द निवडणुक लढवायचा घेतलेला निर्णय इत्यादी सगळ्या घडामोडी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर झाल्या. निवडणुका झाल्या २० मार्च १९७७ च्या आसपास. बरेचसे नेते आणीबाणीच्या काळात तुरूंगात होते. त्यांची सुटका झाली निवडणुकांची घोषणा झाल्यावर.तेव्हा या सगळ्या घडामोडींमध्ये नवा पक्ष स्थापन करून निवडणुक आयोगाकडे रजिस्ट्रेशन करणे आणि इतर गोष्टी निवडणुकांपूर्वी करणे यासाठी वेळ पुरेसा नव्हता.म्हणून सगळ्यांनी निवडणुक चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षाचे उमेदवार म्हणून लढवली आणि जनता पक्षाची स्थापना निवडणुकीनंतर झाली.

पुढे १९७९ मध्ये जनता पक्षात फूट पडली. चरणसिंग, जॉर्ज फर्नांडिस, हेमवतीनंदन बहुगुणा, श्यामनंदन मिश्रा इत्यादी पक्षाबाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला. तर मोरारजी, वाजपेयी,चंद्रशेखर्,जगजीवन राम इत्यादी जनता पक्षातच राहिले.

या प्रश्नाचे उत्तर रामज्या आणि खेडूत यांनी बरोबर पाठवले तर अनन्त अवधुत यांनी अंशतः बरोबर पाठवले (केवळ जॉर्ज फर्नांडिस).

प्रश्न क्रमांक १७ नव्या धाग्यात उद्या ९ एप्रिल रोजी प्रसिध्द करेन.

नितिन थत्ते's picture

8 Apr 2014 - 2:08 pm | नितिन थत्ते

चंद्रशेखर हे तरुण तुर्क म्हणून काँग्रेसमध्ये होते असे स्मरते. त्यावेळी ते लोकसभेचे सदस्य नव्हते का?

विकिपीडिया म्हणतो:
He joined Congress in 1964. From 1962 to 1967, he was a member of the Rajya Sabha. He first entered the Lok Sabha in 1967. तेव्हा ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार असावेत. हे खरे असेल तर चंद्रशेखर यांचा आबखी एक पक्ष होईल.

क्लिंटन's picture

8 Apr 2014 - 8:45 pm | क्लिंटन

चंद्रशेखर हे तरुण तुर्क म्हणून काँग्रेसमध्ये होते असे स्मरते. त्यावेळी ते लोकसभेचे सदस्य नव्हते का?

नाही. चंद्रशेखर यांनी सर्वप्रथम लोकसभेत प्रवेश केला १९७७ मध्ये.लोकसभेच्या संकेतस्थळावर या वेबपेजवर ८ टर्मच्या सदस्यांमध्ये चंद्रशेखर आहेत.त्यावरून ते ६ व्या लोकसभेचे सर्वप्रथम सदस्य झाले असे दिले आहे. सहावी लोकसभा १९७७-७९ या काळातील. तसेच चौथ्या आणि पाचव्या लोकसभा सदस्यांमध्येही चंद्रशेखर यांचे नाव नाही. तसेच राज्यसभेच्या संकेतस्थळावरील या वेबपेजवर चंद्रशेखर १९६२ ते १९६८ ही पहिली टर्म, १९६८ ते १९७४ ही दुसरी टर्म आणि १९७४ ते १९८० ही तिसरी टर्म असे दिले आहे.पण त्यांनी मार्च १९७७ मध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला (लोकसभेवर निवडून गेल्यावर). तेव्हा त्यावेळी चंद्रशेखर हे लोकसभेचे सदस्य नव्हते.

खेडूत's picture

8 Apr 2014 - 10:19 pm | खेडूत

टंकाळा न करता केवढं लिहिलंय त्याबद्दल धन्यवाद. :)

नितिन थत्ते's picture

8 Apr 2014 - 10:32 pm | नितिन थत्ते

माहितीबद्दल धन्यवाद. विकिपीडियावर सुधारणा सुचवतो.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2014 - 9:01 pm | श्रीगुरुजी

>>> १९७७ मध्ये निवडणुकांच्या वेळी जनता पक्ष स्थापन झाला नव्हता. निवडणुका सर्व नेत्यांनी भारतीय लोकदल पक्षाचे उमेदवार म्हणून लढविल्या. (अगदी वाजपेयी, जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा, मोरारजी इत्यादी सगळ्यांनी निवडणुका भारतीय लोक दलाचे उमेदवार म्हणूनच लढविल्या). निवडणुका झाल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि १ मे १९७७ रोजी जनता पक्षाची स्थापना झाली.

काहीतरी गोंधळ दिसतोय. मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष अस्तित्वात होता व अनेक नेत्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावरच निवडणुक लढविलेली होती. १९७७ च्या निवडणु़कीत जनता पक्षातर्फे पुण्यातून मोहन धारिया उभे होते. त्यावेळी जनता पक्षाचा झेंडा (वर केशरी व त्याला लागूनच खाली हिरवा पट्टा. भारताच्या राष्ट्रध्वजातील मधला पांढरा पट्टा व अशोकचक्र काढून टाकल्यावर जसा ध्वज दिसेल तसाच जनता पक्षाचा ध्वज होता) व त्यावर पक्षाचे निवडणुक चिन्ह असलेला नांगरधारी शेतकरी असे झेंडे अनेक ठिकाणी लागलेले होते. जनता पक्षाची पोस्टर्सही अनेक ठिकाणी होती. "नांगरधारी शेतकरी, लोकसभेचा मानकरी" अशी एक लोकप्रिय घोषणा दिली जात होती. या सर्व गोष्टी स्पष्ट आठवत आहेत. त्यामुळे १९७७ च्या निवडणुकीच्या वेळी जनता पक्ष स्थापन झालेला नव्हता हे विधान चुकीचे वाटते. माझ्या आठवणीप्रमाणे १८ जानेवारी १९७७ ला अधिकृतरित्या जनता पक्ष जन्माला आला. संघटना काँग्रेस, जनसंघ व लोकदल या तीन पक्षांनी एकत्र येऊन आपापले पक्ष विलीन करून जनता पक्ष नावाचा नवीन पक्ष जन्माला घातला. त्यात अजून एक चौथा पक्ष होता (त्याचे नाव आठवत नाही). जगजीवनराम यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून लोकशाही काँगेस नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणुका लढवून तब्बल २८ जागा जिंकल्या होत्या. हा पक्ष त्यांनी निकालानंतर लगेचच जनता पक्षात विलीन केला होता.

क्लिंटन's picture

8 Apr 2014 - 9:48 pm | क्लिंटन

काहीतरी गोंधळ दिसतोय. मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष अस्तित्वात होता व अनेक नेत्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावरच निवडणुक लढविलेली होती.

निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर या पी.डी.एफ फाईलमध्ये १९७७ चे निकाल दिले आहेत.त्या फाईलमध्ये पान क्रमांक ४ वर निवडणुकीत भाग घेणार्‍या राजकीय पक्षांची नावे दिली आहेत. त्यात जनता पक्षाचे नाव नाही. निवडणुकांच्या वेळी सर्व विरोधकांनी एकत्र यायचे, जनता पक्ष हे नाव घ्यायचे या सगळ्या गोष्टी ठरल्या असल्या तरी प्रत्यक्षात पक्षाची स्थापना निवडणुकांपर्यंत झाली नाही म्हणून सर्व उमेदवार भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून लढले.

याविषयी व्ही.आर.कृष्ण अनंत यांचे India Since Independence-Making Sense of Indian Politics या पुस्तकात पुढील उल्लेख आहे:

"The Janata Party, with that name, was launched on 30 January 1977. On that day, the various leaders addressed huge rallies in different cities: Morarji Desai and Atal Behari Vajpayee in the Delhi Ramlila grounds; JP at the Gandhi Maidan in Patna; Charan Singh in Kanpur; Chandra Shekhar in Jaipur; and N.G.Goray in Bombay. The CPI(M), the Akali Dal and the DMK did not agree for a merger but committed themselves for poll alliance with the Janata Party. In order to avoid any further complications, the Janata decided to opt for the Chakra Haldhar, the BLD's election symbol. The formalities of dissolving the old parties and drafting the constitution and programme of the new party was put off for another day."

तेव्हा लोकांच्या दृष्टीने जनता पक्षाची स्थापना ३० जानेवारी १९७७ रोजी झाली असली तरी निवडणुक आयोगाच्या दृष्टीने जनता पक्षाची स्थापना निवडणुका पूर्ण झाल्यानंतर झाली.त्यामुळे निवडणुक आयोगाच्या दृष्टीने हे सगळे उमेदवार भारतीय लोकदलाचे होते. पक्षस्थापनेची सगळी प्रक्रीया १ मे १९७७ रोजी पूर्ण झाली असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.

"नांगरधारी शेतकरी, लोकसभेचा मानकरी" अशी एक लोकप्रिय घोषणा दिली जात होती.

याचे कारण पक्षाने भारतीय लोकदलाचेच चिन्ह "नांगरधारी शेतकरी" घेतले होते. पण अर्थातच मला ते स्पष्ट आठवू शकत नाही (माझा जन्म तेव्हा झाला नव्हता :) )

पैसा's picture

10 Apr 2014 - 8:33 pm | पैसा

मी तेव्हा ७ वीत होते! त्या निवडणुका मला आठवत आहेत. पत्रके, बिल्ले सगळं जनता पक्षाच्या नावाने वाटलं होतं आणि जनता पक्षाचे कार्यकर्ते 'नोट आणि व्होट' द्या असं सांगत हे ही आठवतंय. नांगरधारी शेतकर्‍याचे चित्र असलेले हिरवे-भगवे झेंडे आठवतायत. पण मतपत्रिकेवर रत्नागिरीतले उमेदवार अ‍ॅड. बापूसाहेब परुळेकर कोणत्या पक्षाचे म्हणून दाखवले होते ते मात्र मला माहित नाही.

श्रीगुरुजी's picture

10 Apr 2014 - 8:49 pm | श्रीगुरुजी

मलाही हेच सांगायचं आहे. मोहन धारियांची भित्तिपत्रके, घरोघरी वाटली गेलेली पत्रके, मतदान स्लिपा इ. सर्वांवर जनता पक्षाचे नाव व चिन्ह छापलेले होते. त्यावेळी भालोद या पक्षाचे नाव सुद्धा ऐकलेले नव्हते. त्यामुळे जनता पक्षाची स्थापना १९७७ च्या निवडणुकीनंतर झाली व जनता पक्षाच्या नेत्यांनी भालोद पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती या क्लिंटन यांच्या दाव्यावर अजिबात विश्वास बसत नाही.

आंतरजालावर काही ठिकाणी शोधल्यावर असे वाचले की जनता पक्षाची अधिकृत स्थापना जानेवारी १९७७ मध्ये झाली होती. तुरूंगात झालेल्या विचारमंथनातून समाजवादी पक्ष, जनसंघ, संघटना काँग्रेस व भालोद हे चार पक्ष विलीन होऊन जनता पक्ष स्थापन झाला होता व निवडणुकी पूर्वी २ महिने त्या पक्षाची स्थापना झाली होती.

क्लिंटन's picture

10 Apr 2014 - 9:56 pm | क्लिंटन

त्यामुळे जनता पक्षाची स्थापना १९७७ च्या निवडणुकीनंतर झाली व जनता पक्षाच्या नेत्यांनी भालोद पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती या क्लिंटन यांच्या दाव्यावर अजिबात विश्वास बसत नाही.

निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील ती पीडीएफ फाईल बघितलीत का? अर्थातच निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती अधिकृत आहे यात शंका नाही.त्या पीडीएफ फाईलमध्ये जनता पक्षाचे नावही नाही. इतकेच काय तर सगळे महत्वाचे जनता पक्षाचे नेते--मोरारजी देसाई (सुरत), अटलबिहारी वाजपेयी (नवी दिल्ली),जगजीवन राम(सासाराम) इत्यादी सगळे नेते भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून निवडणुक आयोगाच्या पीडीएफ फाईलमध्ये दाखविले आहेत त्याचे नक्की काय?

परत एकदा--पक्षाचे नाव जनता पक्ष घेणे, पक्षात कोण सामील होणार इत्यादी सगळ्या गोष्टी जानेवारी १९७७ मध्येच ठरल्या होत्या.पण या नेत्यांनी निवडणुका मात्र भारतीय लोकदलाचे उमेदवार म्हणून लढविल्या. निदान निवडणुक आयोगाकडील माहिती तरी तेच सांगते.

जनता पक्षात नक्की कोणते पक्ष स्थापन होते हे बघण्यासाठी त्यापूर्वीच्या काही वर्षांचा इतिहास बघणे मनोरंजक ठरेल.

१९४८ (की १९४९?)-- जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी पक्ष स्थापन केला
१९५२-- पहिल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्ष आणि आचार्य कृपलानी यांच्या किसान मजदूर प्रजा पक्ष यांचे विलीनीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना
१९५५-- प्रजा समाजवादी पक्षातून राम मनोहर लोहिया बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा समाजवादी पक्ष स्थापन केला
१९६४--प्रजा समाजवादी पक्षातून जॉर्ज फर्नांडिस बाहेर पडले आणि संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना
१९६७--चरणसिंग कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा भारतीय क्रांती दल हा पक्ष स्थापन केला
१९६९--बिजू पटनाईक कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा उत्कल कॉंग्रेस पक्ष स्थापन केला
१९६९--कॉंग्रेस पक्षात फूट. इंदिरा गांधींचा गट आणि मोरारजी देसाईंचा कॉंग्रेस (संघटना) असे दोन पक्ष झाले.
१९७२--प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांचे विलीनीकरण होऊन परत एकदा समाजवादी पक्ष या नावाने पुनर्जन्म
१९७४--चरणसिंगांचा भारतीय क्रांती दल, बिजू पटनाईकांचा उत्कल कॉंग्रेस, १९७२ मध्ये प्रजा आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांच्या विलीनीकरणातून पुनर्जन्म झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला स्वतंत्र पक्ष, भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला पक्ष (नाव नक्की लक्षात नाही) आणि अन्य एक-दोन लहान पक्ष यांचे विलीनीकरण होऊन भारतीय लोकदल हा पक्ष स्थापन झाला
१९७५-७७--आणीबाणी
१८ जानेवारी १९७७-- सहाव्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा.
जानेवारी १९७७ च्या शेवटी-- जगजीवन राम कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी या पक्षाची स्थापना.

भारतीय लोकदल, जनसंघ, कॉंग्रेस (संघटना) आणि कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी या चार पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता पक्षाची स्थापना झाली.

>>>बलराज मधोक यांनी स्थापन केलेला पक्ष...

अखिल भारतीय जनसंघ! :)
पण तो काई चालला नाही.
याच धर्तीवर पुढे ''भारतीय'' जनता पार्टी नाव आलं

याशिवाय डीएमके आणि रिपब्लिकन(खोब्रागडे) गट पण होते

अविश्वसनीय होतं खरं- पण चिन्ह या गटाचा आयोजक म्हणून लोक दलाचं असल्याने निवडणूक आयोगाला निकाल तसे लावावे लागले. अधिकृत स्थापना २३ जानेवारीला झाली होती, प्रचार साहित्य जनता पक्ष नावाने आणि चिन्ह मात्र लोकदलाचं! यावेळी कोन्ग्रेस पण गाय वासरू चिन्हावर लढत होती.

भारताला आघाडी राजकारणाचा पूर्वानुभव नव्हता. सरकारी पद्धतीने ते बरोबर आहे. जे चिन्ह, तोच पक्ष! लोकांच्या दृष्टीने तो जनता पक्ष होता.आयोगाचं अधिकृत संस्थळ पाहिले तिथेही भा. लो. द. असेच दाखवले आहे.

क्लिंटन's picture

11 Apr 2014 - 1:47 pm | क्लिंटन

लोकांच्या दृष्टीने तो जनता पक्ष होता.आयोगाचं अधिकृत संस्थळ पाहिले तिथेही भा. लो. द. असेच दाखवले आहे.

हेच. लोकांसाठी फॉर ऑल प्रॅक्टिकल परपजेस तो जनता पक्ष होता पण निवडणुक आयोगासाठी भारतीय लोकदल कारण त्या पक्षाचे उमेदवार म्हणून सर्वांनी निवडणुक लढवली होती.

चौथा पक्ष बहुधा राजनारायण यांची समाजवादी पार्टी. राजनारायण यानी १९७१ च्या निवडणुकीत ल्या गैर प्रकारावरून इंदिरा गांधींवर खटला दाखल केला होता. आणि ते तो जिंकले होते.
आणीबाणी लागण्याचे ते निर्णायक कारण ठरले!
निवडणुकी आधी जनता पक्ष स्थापन झाला होता तरी तांत्रिक दृष्ट्या निवडणुकीत भारतीय लोक दल नावानेच सगळे लढले होते. निकाल लागेपर्यंत आणीबाणी पूर्णपणे उठली नव्हती.

जनता पक्षाचं चिन्ह
A

समीरसूर's picture

8 Apr 2014 - 2:50 pm | समीरसूर

खूप माहितीपूर्ण सदर आहे. आणि बरोबर उत्तरे देणार्‍यांना सलाम! राजकारण कोळून पिणे यालाच म्हणत असावेत. :-) क्लिंटन साहेब आणि बाकी सगळी अचूक उत्तरे देणारी मंडळी - तुम्ही सारे धन्य आहात.

मी थोडा ट्राय मारला, मला एकाही प्रश्नाचं संपूर्ण बरोबर उत्तर आलं नाही. :-(

लहानपणापासून राजकारणात रस येत गेला, राजकारण थेट घरात घुसते तेव्हा पर्यायच नसतो. वयाच्या सातव्या वर्षी आणीबाणी लागली, संघवाले असल्याने बाबां स्थानबद्ध झाले. अनिश्चित काळासाठी! असे का? असा प्रश्न पडला आणि अभ्यासा पेक्षा हाच अभ्यास अधिक सुरु झाला. :)
पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी!

गेली अनेक वर्षे भारताबाहेर असूनही कुठचचीही राजकीय बातमी नजरेतून चुकत नाही!

पैसा's picture

10 Apr 2014 - 8:37 pm | पैसा

प्रचंड माहितीपूर्ण लेख! मस्तच!

आतिवास's picture

10 Apr 2014 - 10:14 pm | आतिवास

एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही; पण धागा वाचते आहे; बरीच माहिती मिळतेय.