लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ३

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
26 Feb 2014 - 9:43 am

यापूर्वीचे लेखन

लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २

प्रश्न क्रमांक ९

खालीलपैकी कोणते विद्यमान मुख्यमंत्री दुसर्‍या राज्यातून लोकसभा निवडणुक लढवून निवडून आले? (अधिक स्पष्ट करायला-- समजा पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राबाहेरील लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवून जिंकून आले तर ते या गटात बसतील)

अ. मुलायमसिंग यादव
ब. उमा भारती
क. देवीलाल
ड. लालूप्रसाद यादव
इ. कल्याण सिंग

नेहमीप्रमाणे प्रश्नाचे उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर रविवार १ मार्च रोजी जाहिर केले जाईल.

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

26 Feb 2014 - 9:59 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणे हा प्रश्नही रोचक आहे.

उत्तर व्यसंद्वारे पाठवले आहे.

तुषार काळभोर's picture

26 Feb 2014 - 10:52 am | तुषार काळभोर

अ. मुलायमसिंग यादव
ब. उमा भारती
क. देवीलाल
ड. लालूप्रसाद यादव
इ. कल्याण सिंग

यांपैकी कोणीही विद्यमान मुख्यमंत्री नाहीत.
दुवा

अनन्त अवधुत's picture

1 Mar 2014 - 3:21 am | अनन्त अवधुत

अधिक स्पष्ट करायला-- समजा पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राबाहेरील लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवून जिंकून आले तर ते या गटात बसतील

हा भाग वाचला तर क्लिंटन यान्ना काय म्हणायचे आहे ते लक्षात येइल.
जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्या अर्थाने 'विद्यमान' हा शब्द आला आहे
दुसऱ्या शब्दात प्रश्न असा सुद्धा विचारता येईल:
खालील पैकी कोणी मुख्यमंत्री असताना दुसऱ्या राज्यातून (दुसरे राज्य: ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्य सोडून) लोकसभेची निवडणूक लढवून निवडून आले?
अपेक्षा करतो कि तुमच्या शंकेचे उत्तर मिळाले आहे.

क्लिंटन's picture

1 Mar 2014 - 9:58 am | क्लिंटन

धन्यवाद पैलवान आणि अनत अवधुत. हा प्रश्न पुढीलप्रमाणे लिहिला असता तर तो अधिक स्पष्ट झाला असता--

"खालीलपैकी कोणत्या नेत्याने एका राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना दुसर्‍या राज्यातील लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवून विजय मिळवला". हे सगळे प्रश्न मी इंग्रजीत तयार केले आहेत.भाषांतर करताना थोडी गफलत झाली. असो. अनन्त अवधुत यांनी ते स्पष्ट केले आहेच.

आतापर्यंत ६-७ उत्तरे आली आहेत.सर्वांना व्य.नि करून अ‍ॅकनॉलेजमेन्ट दिलेली नाही.ते आज रात्री किंवा उद्या सकाळी करेन.

धन्यवाद.

क्लिंटन

क्लिंटन's picture

2 Mar 2014 - 3:08 pm | क्लिंटन

या प्रश्नाचे उत्तर आहे: (क)- देवीलाल

देवीलाल १९८७ मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री झाले (जून १९८७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये देवीलालांचे लोकदल-भाजप युतीने राज्यातील ९० पैकी ८५ जागा जिंकल्या. बोफोर्स प्रकरण उघडकीला आल्यानंतर राजीव गांधींची पडझड झाली त्यात १९८७ च्या हरियाणा विधानसभा निवडणुका हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा होता).१९८९ मध्ये देवीलालांनी दोन लोकसभा मतदारसंघांमधून निवडणुका लढविल्या.पहिला मतदारसंघ होता--रोहतक (हरियाणा) आणि दुसरा मतदारसंघ होता--सिकर (राजस्थान). देवीलालांनी दोन्ही मतदारसंघांमधून विजय मिळवला.त्यांनी रोहतक मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आणि सिकर मतदारसंघ स्वतःकडे ठेवला. देवीलालांनी १९८९ मध्ये विजय मिळवला तो शेवटचाच.त्यानंतर त्यांचा १९९१,१९९६ आणि १९९८ मध्ये भुपिंदरसिंग हुडा (हरियाणाचे सध्याचे मुख्यमंत्री) यांनी पराभव केला.

मुलायमसिंग यादव १९९६ मध्ये मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून, १९९८ मध्ये संभाल लोकसभा मतदारसंघातून, १९९९ मध्ये संभाल आणि कन्नोज लोकसभा मतदारसंघातून, २००४ आणि २००९ मध्ये परत एकदा मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.हे तीनही मतदारसंघ उत्तर प्रदेशातीलच आहेत. तसेच मुलायमसिंगांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना एकदाच--२००४ मध्ये लोकसभा निवडणुक लढवली.इतर वेळी ते मुख्यमंत्रीपदी नव्हते.

उमा भारतींनी खजुराहो (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९८९,१९९१,१९९६ आणि १९९८ मध्ये तर भोपाळ (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून १९९९ मध्ये विजय मिळवला.त्या या निवडणुकांच्या वेळी अर्थातच मुख्यमंत्री नव्हत्या.त्या डिसेंबर २००३ मध्ये मुख्यमंत्री झाल्या आणि त्या पदावर ऑगस्ट २००४ पर्यंत होत्या.२०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील चरखारी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. तसेच त्या २०१४ मध्ये झाशी (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवतील अशी शक्यता आहे अशा बातम्या वाचल्या आहेत.

लालूप्रसाद यादव १९७७ आणि १९८९ मध्ये छाप्रा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते मार्च १९९० ते जुलै १९९७ पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते.ते १९९८ आणि २००४ मध्ये मधेपुरा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून तसेच २००४ मध्येच परत एकदा छाप्रा (बिहार) लोकसभा मतदारसंघातून आणि २००९ मध्ये सारण (बिहार) लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.त्यांचा १९९९ मध्ये मधेपुरा (बिहार) आणि २००९ मध्ये पाटलीपुत्र (बिहार) लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. अर्थातच लालूप्रसाद यादव यांनी लोकसभा निवडणुक लढवली त्यावेळी ते बिहारचे मुख्यमंत्री नव्हते.

कल्याणसिंग २००४ मध्ये बुलंदशहर आणि २००९ मध्ये एटा (दोन्ही उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. ते १९९१ ते १९९२ आणि १९९७ ते १९९९ या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

या प्रश्नाचे उत्तर पैलवान,ज्ञानोबाचे पैजार, श्रीरंग जोशी,टिवटिव,अनन्त अवधुत, विअर्ड विक्स, मन१ आणि ramjya या आठ मिपाकरांनी बरोबर पाठवले तर अन्य दोन मिपाकरांचे उत्तर बरोबर नव्हते.

यापुढील प्रश्न बुधवार ५ मार्च रोजी पोस्ट करेन.

धन्यवाद

आशु जोग's picture

2 Mar 2014 - 3:31 pm | आशु जोग

धन्स

दोन प्रश्न हुकले माझे :-( पुढे प्रयत्न करेन

क्लिंटन's picture

5 Mar 2014 - 4:02 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १०

भाजपचे चंदुपाटला जंगा रेड्डी आणि काँग्रेसचे माधवराव शिंदे यांना जोडणारा एक समान दुवा आहे.पुढीलपैकी कोणाला तोच दुवा जोडतो?

अ. राजनारायण
ब. राममनोहर लोहिया
क. विजयकुमार मल्होत्रा
ड. सुभद्रा जोशी
इ. (क) आणि (ड) दोन्ही

पर्यायात न दिलेल्या अन्य दोन नेत्यांनाही हाच समान दुवा जोडतो.त्या नेत्यांचीही नावे सांगता येतील का?

उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर रविवार ९ मार्च रोजी जाहिर केले जाईल. आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे.मतमोजणी १६ मे रोजी आहे.त्यापूर्वी किमान दोन आठवडे ही प्रश्नमंजुषा पूर्ण करायची आहे.तेव्हा प्रश्न आणि उत्तरे यांचा कार्यक्रम थोडा बदलायची गरज लागेल.नवीन कार्यक्रम उद्यापर्यंत जाहिर करेन.

क्लिंटन

क्लिंटन's picture

9 Mar 2014 - 11:14 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १० चे उत्तर
सर्वप्रथम भाजपचे चंदुपाटला जंगा रेड्डी आणि कॉंग्रेसचे माधवराव शिंदे यांना जोडणारा समान दुवा कोणता ते बघू. चंदुपाटला जंगा रेड्डी यांनी १९८४ मध्ये हणमकोंडा (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पी.व्ही.नरसिंह राव यांचा पराभव केला. नरसिंह राव त्यानंतर १९९१ ते १९९६ या काळात देशाचे पंतप्रधान होते. माधवराव शिंदे यांनी १९८४ मध्येच ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून अटलबिहारी वाजपेयी यांचा प्राभव केला.अटलजी त्यानंतर १९९६ तसेच १९९८ ते २००४ या काळात देशाचे पंतप्रधान होते.तेव्हा चंदुपाटला जंगा रेड्डी आणि माधवराव शिंदे या दोघांनीही भावी पंतप्रधानांचा पराभव केला.

प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे: इ: विजयकुमार मल्होत्रा आणि सुभद्रा जोशी दोन्ही. विजयकुमार मल्होत्रा यांनी १९९९ मध्ये दक्षिण दिल्ली (दिल्ली) लोकसभा मतदारसंघातून मनमोहनसिंग यांचा पराभव केला.मनमोहन सिंग २००४ पासून आजपर्यंत देशाचे पंतप्रधान आहेत. सुभद्रा जोशी यांनी १९६२ मध्ये अटलबिहारी वाजपेयींचा बलरामपूर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पराभव केला.

पर्यायांमध्ये दिलेल्यांमध्ये राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा १९७७ मध्ये रायबरेली (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून पराभव केला पण त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर होत्या. (कोणी असेही म्हणू शकेल की १९८० मध्ये त्या परत पंतप्रधान झाल्या त्या अर्थी त्या भावी पंतप्रधानही होत्या. पण दिलेल्या पर्यायांमध्ये इतर अधिक योग्य पर्याय असताना हे उत्तर सयुक्तिक ठरणार नाही).

राममनोहर लोहियांनी १९६२ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंविरूध्द फूलपूर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली.पण अर्थातच त्यांनी नेहरूंचा पराभव केला नव्हता.

या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधुत आणि पैजारबुवा यांनी बरोबर दिले तर श्रीगुरूजी यांनी अंशत: बरोबर दिले. तर अन्य मिपाकरांची उत्तरे चुकली.

पर्यायात नसलेले नेते:
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भविष्यकाळात पंतप्रधान झालेले नेते पुढीलप्रमाणे:

१. विश्वनाथ प्रताप सिंग: यांचा १९७७ मध्ये अलाहाबाद (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून भारतीय लोकदलाच्या (जनता पक्ष) जनेश्वर मिश्रांनी पराभव केला. वि.प्र.सिंग पुढे १९८९-९० या काळात पंतप्रधान होते.

२. अटलबिहारी वाजपेयी: अटलजींनी १९५७ मध्ये बलरामपूर, लखनौ आणि मथुरा (सर्व उत्तर प्रदेश) या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.त्यात त्यांचा बलरामपूरमध्ये विजय झाला तर लखनौ आणि मथुरा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.लखनौमध्ये त्यांचा कॉंग्रेसच्या पुलीनबिहारी बॅनर्जी यांनी पराभव केला. लखनौमध्ये वाजपेयी दुसऱ्या क्रमांकावर होते. मथुरा मतदारसंघात वाजपेयी चौथ्या क्रमांकावर होते तेव्हा त्यांचा पराभव झाला असला तरी विजयी अपक्ष उमेदवार राजा महेन्द्र प्रताप प्रश्नात आणि पर्यायात दिलेल्या अन्य नेत्यांना जोडणाऱ्या दुव्यात बसणार नाहीत असे मला वाटते. १९६२ मध्ये बलरामपूर मतदारसंघाप्रमाणेच वाजपेयींचा लखनौमध्येही पराभव झाला.लखनौमध्ये परत एकदा वाजपेयींनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.त्यांचा पराभव कॉंग्रेसच्या बी.के.धवन यांनी केला.

३. चंद्रशेखर: चंद्रशेखर यांचा १९८४ मध्ये बलिया (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या विश्वंभर चौधरींनी पराभव केला. चंद्रशेखर १९९०-९१ मध्ये पंतप्रधान होते. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची जबरदस्त लाट आली होती.त्यावेळी राज्यात ८५ जागा होत्या (२००० मध्ये उत्तराखंड वेगळा झाल्यानंतर ५ जागा नव्या राज्यात गेल्या).त्यापैकी तब्बल ८३ जागा कॉंग्रेसनी जिंकल्या. उरलेल्या दोन जागा लोकदलाने जिंकल्या.त्यातील एक जागा होती बागपत. या मतदारसंघातून माजी पंतप्रधान चरणसिंग निवडून गेले.तर एटा मतदारसंघातून पक्षाचे महंमद मेहफूज अली खान निवडून गेले. या निवडणुकीत उत्तर प्रदेशात माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांचा अमिताभ बच्चन यांनी अलाहाबादमध्ये पराभव केला हे आपण मागच्या प्रश्नात बघितलेच आहे.अलमोडा (आता उत्तराखंड) लोकसभा मतदारसंघात मुरली मनोहर जोशींची अनामत रक्कम जप्त झाली.

४. चरणसिंग: चरणसिंग यांचा १९७१ मध्ये मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या विजयपाल सिंग यांनी पराभव केला. चरणसिंग १९७९-८० मध्ये पंतप्रधान होते.

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2014 - 12:36 pm | श्रीगुरुजी

>>> १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची जबरदस्त लाट आली होती.त्यावेळी राज्यात ८५ जागा होत्या (२००० मध्ये उत्तराखंड वेगळा झाल्यानंतर ५ जागा नव्या राज्यात गेल्या).त्यापैकी तब्बल ८३ जागा कॉंग्रेसनी जिंकल्या. उरलेल्या दोन जागा लोकदलाने जिंकल्या.त्यातील एक जागा होती बागपत. या मतदारसंघातून माजी पंतप्रधान चरणसिंग निवडून गेले.तर एटा मतदारसंघातून पक्षाचे महंमद मेहफूज अली खान निवडून गेले.

१९८४ मध्ये चरणसिंगांच्या लोकदलाचे उ.प्र.मधून एकूण ३ उमेदवार निवडून आले होते. बागपत मधून चरणसिंग, सोनपतमधून त्यांची पत्नी गायत्रीदेवी व एटामधून वर लिहिलेला ३ रा उमेदवार निवडून आला होता. उरलेले ८२ खासदार काँग्रेसचे होते.

१९८४ मध्ये चरणसिंगांच्या लोकदलाचे उ.प्र.मधून एकूण ३ उमेदवार निवडून आले होते. बागपत मधून चरणसिंग, सोनपतमधून त्यांची पत्नी गायत्रीदेवी व एटामधून वर लिहिलेला ३ रा उमेदवार निवडून आला होता. उरलेले ८२ खासदार काँग्रेसचे होते.

गायत्री देवींचा १९८४ मध्ये मथुरा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. या पीडीएफ फाईलमध्ये पान २२९ वर बघायला मिळेल.

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2014 - 3:09 pm | श्रीगुरुजी

माझ्या आठवणीप्रमाणे १९८४ च्या निवडणुकीत भाजपचे २, समाजवादी काँग्रेसचे २, चरणसिंगांच्या लोकदलाचे ३ व जनता पक्षाचे १० खासदार निवडून आले होते. मग लोकदलाचा तिसरा खासदार कोण?

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2014 - 3:12 pm | श्रीगुरुजी

प्रत्यक्षात लोकदलाचे ३ खासदार होते. तिसरा खासदार गायत्रीदेवी नसून बिहारमधील दरभंगामधून विजय कुमार मिश्रा लोकदलाच्या तिकिटावर निवडून आले होते.

क्लिंटन's picture

10 Mar 2014 - 10:44 am | क्लिंटन

तिसरा खासदार गायत्रीदेवी नसून बिहारमधील दरभंगामधून विजय कुमार मिश्रा लोकदलाच्या तिकिटावर निवडून आले होते.

हो बरोबर. पक्षाचे उत्तर प्रदेशातून २ तर बिहारमधून १ असे तीन खासदार निवडून आले होते.काँग्रेसला उत्तर प्रदेशात ८५ पैकी तब्बल ८३ जागा आणि ५१% मते मिळाली होती.आजच्या काळात हे अगदी स्वप्नवत वाटेल. पक्षाचे ज्येष्ठ नेते खुर्शीद अलम खान (सलमान खुर्शीद यांचे वडिल), महावीर प्रसाद, आरिफ मोहंमद खान, शीला दिक्षित, रामधन, शीला कौल, बलरामसिंग यादव, मोहसिना किडवाई, अरूण नेहरू आणि जितेन्द्र प्रसाद हे उत्तर प्रदेशातून अगदी सहज निवडून आले होते.

१९८४ मध्ये काँग्रेसचा झंझावात पूर्ण देशभर होता--अपवाद फक्त आंध्र प्रदेश (आणि काही अंशी पश्चिम बंगालचा). आंध्र प्रदेशात जुलै १९८४ मध्ये राज्यपाल रामलाल यांना हाताशी धरून एन.टी.रामाराव यांचे सरकार खाली खेचून मुख्यमंत्रीपदी हनुमंतराव यांना बसविले होते.राज्यपालांनी हा उद्योग रामारावांना बहुमत सिध्द करायची संधी न देताच केला होता (असाच प्रयोग फेब्रुवारी १९९८ मध्ये उत्तर प्रदेशात राज्यपाल रोमेश भंडारी यांनी कल्याणसिंग यांना बहुमत सिध्द करायची संधी न देताच त्यांचे सरकार खाली खेचून जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्रीपदी बसवून केला होता). पुढे रामारावांनी राष्ट्रपती भवनात आपल्याला समर्थन देत असलेल्या आमदारांना थेट राष्ट्रपती झैलसिंग यांच्यापुढे उभे केले आणि बहुमताची परिक्षा राज्य विधानसभेत नाही तर राष्ट्रपती भवनात झाली.त्यानंतर राज्यपालांना एन.टी.रामाराव यांना परत मुख्यमंत्रीपदी बसविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.या उद्योगात काँग्रेसविरोधी भावना आंध्र प्रदेशात झाली.इतर देशात असलेली काँग्रेसची लाट आंध्रमध्ये मात्र परिणाम करू शकली नाही. राज्यातील ४२ पैकी ३० जागा तेलुगु देसमने तर १ जागा तेलुगु देसमचा मित्रपक्ष भाजपने (चंदुपाटला जंगा रेड्डींची हणमकोंडा) तर १ जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकली. काँग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या. तेलुगु देसम हा लोकसभेत काँग्रेसनंतर दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष झाला आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून तेलुगु देसम नेते पी.उपेन्द्र यांची निवड झाली.लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद एका राज्यपातळीवरील पक्षाला मिळायची ही पहिलीच वेळ. नजिकच्या भविष्यात तरी अशी वेळ परत येईल असे वाटत नाही.

१९८४ मध्ये काँग्रेसच्या झंझावातात विरोधी पक्ष अगदी पालापाचोळ्यासारखे उडून गेले. लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्यायचे असा संकेत असतो.पण विरोधी पक्षांची इतकी दयनीय अवस्था झाली होती त्यामुळे राजीव गांधींनी तो संकेत पाळायला नकार दिला (माझ्या मते तसे करणे चुकीचे होते). काँग्रेसचा मित्रपक्ष अण्णा द्रमुकचे नेते आणी तामिळनाडूमधील कारूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले एम.थंबीदुराई (पुढे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारमध्ये हेच कायदामंत्री होते) यांची लोकसभा उपाध्यक्षपदी निवड झाली.

निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे आणि १६ मे रोजी मतमोजणी आहे.सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे ही प्रश्नमंजुषा १८ मे रोजी संपेल.मतमोजणी जशी जवळ येईल त्याप्रमाणे इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा वाढेल.तेव्हा ही प्रश्नमंजुषा एप्रिलच्या शेवटीच मला संपवायची आहे. नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

प्रश्न ११: पोस्ट करणार: १० मार्च, उत्तर: १४ मार्च
प्रश्न १२: पोस्ट करणार: १५ मार्च, उत्तर: १९ मार्च
प्रश्न १३: पोस्ट करणार: २० मार्च, उत्तर: २४ मार्च
प्रश्न १४: पोस्ट करणार: २५ मार्च, उत्तर: २९ मार्च
प्रश्न १५: पोस्ट करणार: ३० मार्च, उत्तर: ३ एप्रिल
प्रश्न १६: पोस्ट करणार: ४ एप्रिल, उत्तर: ८ एप्रिल
प्रश्न १७: पोस्ट करणार: ९ एप्रिल, उत्तर: १३ एप्रिल
प्रश्न १८: पोस्ट करणार: १४ एप्रिल, उत्तर: १८ एप्रिल
प्रश्न १९: पोस्ट करणार: १९ एप्रिल, उत्तर: २३ एप्रिल
प्रश्न २०: पोस्ट करणार: २४ एप्रिल, उत्तर: २८ एप्रिल

काही कारणाने (बाहेरगावी गेल्यामुळे किंवा अन्य काही कारणाने) एक-दोन दिवस मागेपुढे होऊ शकतील.तसेच आणखी काही प्रश्न तयार करायचाही प्रयत्न करत आहे.ते सगळे प्रश्न (जर तयार झाल्यास) २९ एप्रिल ते ३ मे या दरम्यान.

धन्यवाद
क्लिंटन

क्लिंटन's picture

10 Mar 2014 - 10:25 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ११

खाली पर्यायांमध्ये पाच नेत्यांची नावे दिली आहेत.त्यापैकी चार नेत्यांमध्ये काहीतरी साम्य आहे तर पाचवा नेता 'गटात न बसणारा' आहे. त्या गटात न बसणार्‍या नेत्याचे नाव काय? चार नेत्यांमध्ये अपेक्षित असलेले साम्य लोकसभा निवडणुकांच्या संदर्भातील आहे.

अ. पी.रंगराजन कुमारमंगलम
ब. जॉर्ज फर्नांडिस
क. फूलसिंग बरय्या
ड. भुपिंदरसिंग हुडा
इ. अयानूर मंजुनाथ

नेहमीप्रमाणे प्रश्नाचे उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर १४ मार्च रोजी जाहिर केले जाईल.

क्लिंटन's picture

12 Mar 2014 - 10:32 am | क्लिंटन

पर्यायात दुरूस्ती हवी आहे. अनन्त अवधुत यांनी ती चूक निदर्शनास आणून दिली.त्याबद्दल त्यांचे आभार.

पर्याय (क): सुखलाल कुशवाह असा हवा फूलसिंग बरय्या नव्हे.

धन्यवाद
क्लिंटन

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2014 - 5:39 pm | श्रीगुरुजी

यावेळी माझा पास! गुगलून माहीती काढता येईल. पण उसनी माहिती मिळविण्याची इच्छा नाही. त्यामुळे माघार!

क्लिंटन's picture

14 Mar 2014 - 11:04 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक ११ चे उत्तर

हा प्रश्न बराच चकविणारा होता. मी प्रश्न तयार केला त्यावेळी एका बाजूचा विचार केला होता. पण तो प्रश्न फूलप्रूफ नव्हता.म्हणजे वेगळ्या बाजूने विचार केला तर त्याच प्रश्नाचे उत्तर वेगळे येऊ शकते.तसेच ही 'वेगळी बाजू' चुकीची आहे असे म्हणायचे तरी काही कारण नाही.तेव्हा या प्रश्नाची उत्तरे एकापेक्षापेक्षा जास्त आहेत.या संदर्भात श्री. अनन्त अवधुत यांच्याशी व्य.नि वर संपर्क झाला.त्यांनी माझ्या लक्षात न आलेल्या इतर काही गोष्टी लक्षात आणून दिल्या.त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

सर्वप्रथम मी प्रश्न तयार करताना नक्की कोणता मुद्दा विचारात घेतला होता हे लिहितो.पी.रंगराजन कुमारमंगलम वगळता इतर सगळ्या नेत्यांनी पहिली लोकसभा निवडणुक जिंकली तेव्हा हे नेते फारसे प्रसिध्द नव्हते पण कुणा ज्येष्ठ नेत्याला पराभूत करून ते 'जाइंट किलर' झाले होते. १९६७ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी दक्षिण मुंबई (महाराष्ट्र) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स.का.पाटिल यांना पराभूत केले होते. १९९१ मध्ये काँग्रेसच्या भुपिंदरसिंग हुडा यांनी रोहतक (हरियाणा) लोकसभा मतदारसंघातून वि.प्र.सिंग, चंद्रशेखर सरकारमधील उपपंतप्रधान आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री देवीलाल यांचा पराभव केला होता. १९९८ मध्ये भाजपच्या अयानुर मंजुनाथ यांनी शिमोगा (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.बंगाराप्पा यांचा पराभव केला. १९९६ मध्ये बसपच्या सुखलाल कुशवाह यांनी सतना (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रिय मंत्री, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि नरसिंह रावांबरोबर मतभेद झाल्यानंतर तिवारी काँग्रेसची स्थापना करणारे अर्जुन सिंग यांचा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि १९७८ ते १९८० या काळात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले विरेन्द्रकुमार सखलेचा यांचा पराभव केला. (सुरवातीला फूलसिंग बरय्या हा पर्याय (क) होता. फूलसिंग बरय्यांनी १९९६ मध्ये बसपचे उमेदवार म्हणून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून माधवराव शिंदे यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. माधवराव शिंदे यांच्यावर हवालाप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली.त्यानंतर त्यांनी स्वतःचा मध्य प्रदेश विकास काँग्रेस पक्ष स्थापन केला.माधवराव काँग्रेसविरूध्द लढणार म्हणून भाजपने आपला उमेदवार तिथे उभा केला नव्हता.माझा फूलसिंग बरय्या आणि सुखलाल कुशवाह यांच्यात गोंधळ झाला त्यामुळे पर्यायात फूलसिंग बरय्या असे लिहिले होते).पी.रंगराजन कुमारमंगलम यांनी १९८४ मध्ये सेलम (तामिळनाडू) लोकसभा मतदारसंघातून जनता पक्षाच्या एम.कंडास्वामी यांचा पराभव केला होता.अर्थातच कंडास्वामी हे त्या अर्थी 'जाएंट' नक्कीच नव्हते. त्यामुळे माझे उत्तर (अ): पी.रंगराजन कुमारमंगलम हे होते.

मुळात जाएंट म्हणजे नक्की कोण हा प्रकार बराच सब्जेक्टिव्ह आहे. देवीलाल, बंगाराप्पा, अर्जुनसिंग हे नक्की जाएंट होते का? देवीलाल १९९१ मध्ये लोकसभा आणि हरियाणा विधानसभा या दोन्ही निवडणुका हरले होते.तेव्हा ते जाएंट होते का?१९९६ मध्ये अर्जुनसिंग सतनामध्ये तिसर्‍या क्रमांकावर होते.मग ते खरोखरच जाएंट होते का? सुखलाल कुशवाह यांनी १९९६ मध्ये सतनामध्ये भाजपाचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री विरेन्द्रकुमार सखलेचा यांचा पराभव केला.पण सखलेचा हे १९७८ ते १९८० ही दोन वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असले तरी १९९६ पर्यंत ते जाएंट राहिले होते असे म्हणायला मात्र नक्कीच जड जाईल. म्हणजेच जाएंट कोणाला म्हणावे आणि कोणाला नाही हा थोडा सब्जेक्टिव्ह प्रकार झाला.

या प्रश्नाकडे इतर बाजूंनी बघता येईलः

१. जॉर्ज फर्नांडिस हे दोन राज्यांमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत तर इतर नेते एकाच राज्यातून निवडून गेले आहेत. तेव्हा उत्तर (ब): जॉर्ज फर्नांडिस असे म्हटले तरी त्यात काहीच चूक नाही.

२. भुपिंदरसिंग हुडा हे नंतर मुख्यमंत्री झाले पण इतर नेते मुख्यमंत्री झाले नाहीत. तेव्हा उत्तर (ड): भुपिंदरसिंग हुडा असे म्हटले तरी त्यात चूक काय?

३. अयानुर मंजुनाथ यांनी बंगाराप्पांना एकदाच हरविले--१९९८ मध्ये.पण बंगाराप्पांनी अयानुर मंजुनाथ यांना १९९६,१९९९ आणि २००४ असे तीन वेळा हरविले. १९९६ ते १९९९ या तीन निवडणुकांमध्ये अयानुर मंजुनाथ भाजपचे उमेदवार होते तर २००४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार होते. बंगाराप्पा १९९६ मध्ये स्वतःच्या कर्नाटक काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते, १९९८ मध्ये कर्नाटक जनता पक्षाचे उमेदवार होते, १९९९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार होते तर २००४ मध्ये भाजपचे उमेदवार होते. इतर नेत्यांच्या बाबतीत हे लागू नाही. तेव्हा त्या दृष्टीने विचार केला तर उत्तर (इ): अयानुर मंजुनाथ हे आहे.

या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधुत आणि रामज्या यांनी पाठविले.

पुढचा प्रश्न उद्या-- शनीवार १५ मार्च रोजी प्रसिध्द करेन.

क्लिंटन's picture

14 Mar 2014 - 1:53 pm | क्लिंटन

या प्रश्नाच्या उत्तरात जाएंट किलर्सचा उल्लेख आहे.तेव्हा त्या निमित्ताने इतर काही जाएंट किलर्सविषयी लिहित आहे:

१. रत्नमाला सावनूरः यांनी १९९६ मध्ये चिक्कोडी (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.शंकरानंद यांचा पराभव केला. शंकरानंद १९६७ ते १९९१ अशा ७ लोकसभा निवडणुकांमध्ये चिक्कोडीतून निवडून गेले होते. बोफोर्स प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे ते अध्यक्ष होते.तसेच नरसिंह रावांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते.

२. तेजस्विनी श्रीरमेशः यांनी २००४ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार म्हणून माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा कनकपुरा (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून पराभव केला. त्या निवडणुकीत देवेगौडा तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. देवेगौडांनी हसन (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला त्यामुळे त्यांना लोकसभेत पोहोचता आले. १९९९ मध्ये त्यांनी हसन याच एका मतदारसंघातून निवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांचा पराभव झाला होता.

३. के.वेंकटगिरी गौडा: भाजपचे उमेदवार म्हणून यांनी १९९१ मध्ये दक्षिण बंगलोर (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री गुंडुराव यांचा पराभव केला.१९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटकात भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. १९८९ मध्ये पक्षाला कर्नाटकात अवघी २.६% मते मिळाली होती.ती १९९१ मध्ये २७% ने वाढून २९.६% झाली.त्यावेळी के.वेंकटगिरी गौडा हे नावही फारसे कुणाला माहित नव्हते.तरीही त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या राज्यात काँग्रेसच्याच माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव केला.

४.व्ही.धनंजय कुमारः यांनी भाजपचे उमेदवार म्हणून १९९१ मध्ये मंगलोर (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन पुजारी यांचा पराभव केला.त्यावेळेपासून कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग (२०१३ च्या विधानसभा निवडणुका वगळता) भाजपचा गड राहिला आहे.

५. चंदुपाटला जंगा रेड्डी: मागच्या प्रश्नांमध्ये बघितल्याप्रमाणे भाजपच्या चंदुपाटला जंगा रेड्डींनी १९८४ मध्ये हणमकोंडा (आंध्र प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.व्ही.नरसिंह राव यांचा पराभव केला.

६. सिदाप्पा न्यामगौडारः यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून १९९१ मध्ये बागलकोट (कर्नाटक) लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचा पराभव केला. १९८० च्या दशकात "भविष्यात पंतप्रधान होऊ शकतील अशा नेत्यांच्या" यादीमध्ये रामकृष्ण हेगडे कायम असत.

अजून काही जाएंट किलर्स लक्षात आल्यास ते लिहेनच.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2014 - 4:59 pm | श्रीगुरुजी

विधानसभा निवडणुकीतील सध्याचा जायंट किलर म्हणजे सलग १५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दिक्षितांना हरविणारे केजरीवाल आणि १९९५ मध्ये सलग २ वेळा निवडून आलेल्या भुजबळांना हरविणारे बाळा नांदगावकर!

बरीच मनोरंजक माहिती मिळते आहे!

क्लिंटन, अवांतर पण राहवत नाही म्हणुन विचारतोय.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अंदाजाचे एक मॉडेल तुम्ही करणार होतात ते झाले का?
लोकसभा निवडणुकी दरम्यान प्रश्नमंजुषेबरोबरच तुमचे अंदाजदेखिल आम्हाला वाचायला मिळणार का?
(तुमच्या शैलीत लोकसभा निवडणुकांचे अंदाज वाचायची इच्छा असलेला) सौंदाळा

क्लिंटन's picture

11 Mar 2014 - 10:09 am | क्लिंटन

नमस्कार सौंदाळा,

मॉडेल नाही पण सध्या लेखमालेवर काम सुरू आहे.आठवड्याभरात लेखमाला सुरू व्हायला हवी. वेळ मिळेल त्याप्रमाणे माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आणखी काही लिहिता येते का हे बघतोच.

धन्यवाद
क्लिंटन

क्लिंटन's picture

15 Mar 2014 - 9:56 am | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १२

१९९६ आणि १९९८ च्या निवडणुकांमध्ये एक गोष्ट समान घडली होती. १९९९ मध्ये काँग्रेसचे पी.एम.सईद लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि त्या समान गोष्टीची हॅट-ट्रीक टाळली गेली.पुढे २००४ मध्ये पी.एम.सईद यांचा लक्षद्विपमधूनच पराभव झाला.त्यामुळे १९९६ आणि १९९८ मध्ये घडलेली गोष्ट २००४ मध्ये परत एकदा घडली. इथे नक्की कोणती गोष्ट अभिप्रेत आहे?

अ. या निवडणुकांनंतर केंद्रात सरकार स्थापन करणार्‍या पक्षाचा/आघाडीचा सर्व केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभा मतदारसंघांमधून पराभव
ब. मावळत्या लोकसभेच्या उपाध्यक्षांचा पराभव
क. एकाच मतदारसंघातून ५ पेक्षा जास्त वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ लोकसभा सदस्याचा पराभव
ड. केंद्रिय उर्जामंत्र्यांचा पराभव
इ. पक्षांतर करून निवडणूक लढविलेल्यांचा पराभव

नेहमीप्रमाणे प्रश्नाचे उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर बुधवार १९ मार्च रोजी जाहिर केले जाईल.

क्लिंटन's picture

19 Mar 2014 - 3:36 pm | क्लिंटन

प्रश्न क्रमांक १२ चे उत्तर

बरोबर उत्तर आहे (ब): मावळत्या लोकसभेच्या उपाध्यक्षांचा पराभव.

१९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने कर्नाटकात ४ जागा जिंकून खळबळ माजवली होती.पक्षाचे तुमकूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार एस.मल्लिकार्जुनय्या दहाव्या लोकसभेचे उपाध्यक्ष झाले. त्यांचा १९९६ मध्ये जनता दलाच्या सी.एन.भास्करप्पा यांनी पराभव केला.

१९९६ मध्ये अंबाला (हरियाणा) लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते सुरज भान निवडून गेले. ते वाजपेयींच्या १३ दिवसांच्या सरकारमध्ये मंत्री होते.सरकार पडल्यानंतर ते अकराव्या लोकसभेचे उपाध्यक्ष झाले.त्यांचा १९९८ मध्ये बहुजन समाज पक्षाच्या अमनकुमार नागरा यांनी पराभव केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लक्षद्विप लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले पी.एम.सईद बाराव्या लोकसभेचे उपाध्यक्ष होते.त्यांनी १९९९ मध्ये लक्षद्विपमधून विजय मिळवला आणि मावळत्या लोकसभेच्या उपाध्यक्षांचा पराभव व्हायची हॅट-ट्रिक टाळली गेली.तेच तेराव्या लोकसभेचेही उपाध्यक्ष होते. पण त्यांचा २००४ मध्ये जनता दल (संयुक्त) च्या पी.पुनाकोया यांनी पराभव केला.

या प्रश्नाचे उत्तर अनन्त अवधुत आणि रामज्या यांनी बरोबर पाठवले. इतर मिपाकरांची उत्तरे चुकली.

पुढचा प्रश्न नवीन भागात उद्या प्रसिध्द करेन.

समीरसूर's picture

8 Apr 2014 - 2:55 pm | समीरसूर

प्रश्नांच्या पर्यायांमध्ये अ, ब, क, ड बघून जीवनसत्वांची आठवण येत आहे; प्रश्नांची उत्तरे मात्र काही येत नाहीत. :-(