थोडं समजून घ्या ना...!!!

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
14 Mar 2014 - 2:19 am

'साली कोणीतरी पाहिजे यार!!!!'
'हं...'
'हे असं एकटं बोर होतं. त्यात आपल्याहून फडतूस लोकांना एकसोएक मिळतात ते पाहिल्यावर तर असली हटते ना... मग अजूनच एकटं वाटायला लागतं.'
'नाही ते खरंय... पण हे सगळं तू बोलतोयस? काल एवढं मोठं प्रवचन देत होतास मला की -'
'नाही म्हणजे मला मान्य आहे की कालच मी असं म्हणालो की, काय गरज आहे मुलींची?? मुलींशिवाय दुसरं काही नाहीये का जगात? त्यांच्याहूनही सुंदर अशा ब-याच गोष्टी आहेत!!'
'फॉर एक्झाम्पल??'
'हा?? अं... अरे ते आपलं... अरे तेच ना... तेच तर म्हणायचंय मला... की मी हे सगळं काल परवापर्यंत म्हणत होतो. आता नाही... आता माझ्या लक्षात आलंय सगळं.'
'हो?? काय?'
'हेच की... एका मुलीने लटकावला, म्हणजे काय सगळीकडेच रॉंग नंबर लागेल असं नाही. अपने लिये भी कोई हिरोइन कास्ट हुई है लाले!!'
'अच्छा?? कास्ट झालीये? मग अजून आली नाही ती?'
'अरे... अभी तक शूटिंग शुरू नही हुई ना... एकदा का अ‍ॅक्शन म्हटलं, की ती येईलच बघ!! अश्शी एंट्री मारेल माझ्यासमोर!'

चार वर्षं एकनिष्ठपणे एकाच शालेय मैत्रीणीकडून डोळ्यात धूळफेक करून घेतली. एकदा अचानक 'गरज सरो वैद्य मरो' या म्हणीची प्रचीती आली आणि अखिल स्त्री-समाजाला स्वार्थी, आत्मकेंद्री, भावनाशून्य, इ इ सभ्य आणि इथे नमूद करू नयेत अशा काही असभ्य शिव्या साधारण एक आठवडाभर हासडल्यानंतर जाणवायला लागलेल्या एकटेपणामुळे मी पुनश्च मूळपदावर आलो होतो.

'रागाच्या भरात एकाच व्यक्तीवरचा जो रोष अख्ख्या समाजावर लादण्याचा वेडेपणा मी चालवलेला होता, तो रस्त्यातून संध्याकाळी तुझ्याबरोबर एक फेरफटका मारताना झालेल्या जैवविविधतेच्या साक्षात्कारामुळे बंद झाला रे... आता कसं, मनात एक आशेची पाल... नव्हे... वळणावळणावर ब-याच पाली चुकचुकायला लागल्यात.'
'मित्रा... आशेची पालवी, आणि शंकेची पाल, यांच्यात गफलत होत्येय का तुझी?'
'हो रे... पाहिलंस??? पाहिलंस?? माझी कशी अवस्था झालीये बघ... अरे साधे वाक्प्रचार नीट लक्षात राहत नाहीयेत माझ्या... पाहिजे पाहिजे कोणीतरी गवसलीच पाहिजे!!'
'वाक्प्रचार चुकण्यात आणि आयटम गवसण्यात कनेक्शन काय?? मरो... तुला आयटम हवीये ना? मिळेल!! नक्की मिळेल... पण त्यासाठी तुला... थोड्या अ‍ॅज्जस्टमेंट्स कराव्या लागतील...'
'हे बघ... पैशाचं मी मॅनेज करेन कसं तरी, तू त्याचं टेन्शन नको घेऊस!'
'पैसे नाही रे. सगळ्याच मुली पैशांचा विचार नाही करत'
'हो ते तुझ्या गर्लफ्रेंडच्या उदाहरणावरून कळतंच आहे!!'
'हा मग!! ए... साला शालजोडी देतो हरामखोर!! मी चांगली मदत करतोय तुझी ती करणार नाही हा आधीच सांगतोय. घरी जातो मी नाहीतर...'
'अरे बोल रे बोल!! काय उगाच मनाला लावून घेतोस.?? बोल, कसल्या अ‍ॅड्जस्टमेंट्स?'
'अ‍ॅज्जस्टमेंट म्हणजे जास्त काही नाही, तुला थोडं, ब्रॉड माइंडेड व्हावं लागेल.'
'हे बघ ए, मी वन वुमन मॅन आहे, कळलं ना? एकदा एकीला पकडली, की मग तिच्याशीच एकनिष्ठ राहणार मी कायम!! तेव्हा मला माझ्या तत्वांत बसणारीच मुलगी हवी. दारू-सिगरेट वगैरे फाल्तू सवयी असलेली नको. अशा सवयीच्या मुलांशी साधी मैत्रीही करत नाही मी आणि तू -'
'अरे दारू सिगरेट नाही रे, त्याच्या तर मी सुद्धा अगेंस्ट आहे! मी तुझ्या मराठीच्या प्रेमाबद्दल बोलतोय!!'
'त्याचं काय? माझं असं काही नाही की मुलगी मराठीच पाहिजे. कोणीही चालेल.'
'ते नाही रे. हे बघ एक तर तू स्वतः कोणत्याही मुलीशी बोलायला जात नाहीस. तुझ्या गांडीत अजून तेवढा दम यायचाय. त्यात तुझ्याशी कोणी स्वतःहून बोलायला आलं तर तू येता जाता लोकांच्या भाषेच्या चुका काढत बसतोस. एकदा-दोनदा ठीक आहे, पण असं सतत केल्याने पिपल गेट अ‍ॅनॉइड डूड... आणि त्यात ती मुलगी असली की मग तुझं इंप्रेशन अजूनच खराब पडतं. तू त्यांना नॅरो माइंडेड वाटतोस!'
'ए प्लीज हा त्याचं मी काही नाही करू शकत. मला अशी मुलगी नकोय जिच्या मी जन्मभर मराठीच्या चुका काढत बसेन. मुलगी मराठी असेल तर तिचं मराठी शुद्ध आणि स्वच्छ आणि स्पष्ट हवं. म्हणून प्रिफरेबली मराठी मिडियमची असलेली बरी. आणि तू असं म्हणतोयस तर आधी तर मी याहून नॅरो माइंडेड होतो. भाषेची शुद्धता एवढ्या एका कारणासाठी मला ब्राह्मण मुलगी हवी होती. पण दोन चार भुगोघा मुलींना मराठीचे धिंदवडे काढताना ऐकलं आणि काही अब्राह्मण मुलींना माझ्याहूनही शुद्ध आणि अस्खलित मराठी बोलताना सुद्धा ऐकलं, तेव्हा गैरसमज दूर झाला. आणि जैवविविधतेच्या सागरात स्वच्छंदपणे मुसंडी मारायला मी मोकळा झालो.'
'हो पण मोकळा होऊन फायदा काय? तुझा दुस-याच्या चुका काढण्याचा स्वभाव त्याचं काय करायचं?'
'अरे मिळेल रे माझ्याशी जुळवून घेणारी. एवढंच ना अ‍ॅड्जस्टमेंट्स म्हणजे?'
'सध्यातरी एवढंच सुचतंय!'
'अजून काही असेल तर क्लिअर करून टाक बाबा!! नंतर म्हणशील मी ऐकलं नाही तुझं म्हणून!'
'ते तसंही तू कधी ऐकतोस कोणाचं!! सोड. बसून कंटाळा आला रे! चल जरा पाय मोकळे करू. इथे डाससुद्धा चावतायत खूप!'

आम्ही दोघं त्या कट्ट्यावरून उठलो. इतका वेळ आमच्या गप्पा शांतपणे पण मन लावून ऐकत बसलेले मन जवान असलेले आजोबा सुद्धा उठले, आम्ही त्यांना बाय म्हटलं, त्यांनी आम्हाला बाय म्हटलं. हा रोजचाच शिरस्ता झाला होता. ते डावीकडे वळले, आम्ही उजवीकडे. इतक्यात ते थांबले, आणि त्यांनी मला हाक मारली.

'काय झालं उस्ताद?'
'तुला माझ्याच दिशेनं नाही का जाता येणार?'
'चालेल की. का हो आज तुमचा एकांत नकोसा झाला तुम्हाला?'
'नाही मला तुम्ही एकटंच सोडा रे... पण ज्या दिशेनं मी चाललोय, त्या दिशेकडे जरा नजर टाकून बघ तरी. कदाचित तुझी -'
'आयचा घो!!'
'काय रे?'
'अरे ती बघ. ती माझ्या शाळेत होती. दुपारच्या अधिवेशनात. तेव्हा कसली लुख्खी दिसायची. आता बघ भेंडी!'
'बाँब आहे रे!'
'ए, नीट बोल.'
'का? आता ती वहिनी झाली का माझी?'
'हा हा!! एवढं कुठे चांगलं नशीब आहे आमचं?'
'चल जाऊया इथूनच! आजोबा थँक्यू!!'
'अरे वेडा आहेस का? ओ आजोबा, मला नसत्या फंदात पाडू नका, आम्ही जातो नेहमीच्या रस्त्याने!'
'ए हट्टे!! चल इथूनच! आज तिच्याशी बोलणारच आहेस तू!'
'अरे पण का?'
'अरे तू ओळखतोस ना तिला?'
'अरे मग काय झालं? आणि ओळख ती कसली? प्रायमरीत माझ्या बाजूला बसायची ती. नंतर ब वर्गात गेली. आणि मी सेमी मध्ये! कित्ती वर्षांत बोललो नाहीये मी तिच्याशी!!'
'मग आज बोल. फक्त हाय-हेलो म्हण त्यात काय एवढं?'

त्यानं मला खेचत खेचतच त्या दिशेला वळवलं. आम्ही चालत चालत पुढे निघालो. ती तिच्या एका मैत्रीणीबरोबर आमच्या दिशेने चालत येत होती. ती जसजशी जवळ येत होती, तशी अधिकाधिक उठावदार दिसत होती. तिची सगळी कांती रस्त्यांवरच्या दिव्यांनी उजळून निघत होती. तिने केस मोकळे सोडलेले होते, मोरपिशी रंगाचा टॉप घातलेला होता, त्यावर स्कार्फ गुंडाळलेला, आणि डोळ्यांवर चष्मा! मस्त दिसत होती एकूण!! आमच्यातलं अंतर कमी व्हायला लागलं तशी छातीतली धडधड वाढायला लागली. इतक्या वर्षांत आज पहिल्यांदा मी हिला स्वत:हून ओळख दाखवायला निघालो होतो. शाळेत असताना स्वतःच्या वर्गातली एखादी मुलगी दिसली तरी तिला ओळख दाखवायला लाजायचो मी, तर हिला कुठून दाखवू!! बरं लाजतोय हे मुलीला कळता कामा नये, म्हणून नाक फेंदारून डोळ्यात एक खुनशी भाव ठेवून दुसरीकडे बघत जायचो, जेणेकरून त्या मुलीला आपल्या वाट्याला यावंसंच वाटू नये. असं केल्याने मला तेव्हा काय मिळायचं कोणास ठाऊक!! असो, आता कॉलेजात आल्यापासून ब-यापैकी निर्लज्ज आणि निर्धास्त झालो होतो म्हणा!! पण तरी... भिड साल्या भिड!!!

'हा-हाय!' मी मोठ्ठ्याने म्हटलं. ती दचकलीच.
'ओह... हाय!!!'
'कशी आहेस?' मी हात पुढे केला.
'मी मजेत. तू?' तिने थोडं संकोचूनच हात मिळवला.
'मी सुद्धा मजेत.' हसली. आणि हसताना काय दिसली यार!
'ओके... बाय!!' अरेच्चा, घाई काय आहे?
'बाय!!' पर्याय नव्हता.

त्या दोघी पुढे निघून गेल्या. जाता जाता मला कुजबुज ऐकायला आली - 'बोला ना मेरे स्कूल मे था ये!' छातीतली धडधड अजूनच वाढली. मी गार झालो होतो. एवढ्यात पाठीत एक थाप बसली.

'शाब्बास मेरे शेर. फायनली तू शिकलास. म्हंजे, अजून बरंच शिकायचंय म्हणा!! पण हे ही नसे थोडके. अशाच जुन्या आणि नव्या ओळखी वाढवत राहा. मिळेल त्यातलीच एखादी.'
'हो यार!! इतकं काही कठीण नाहीये नाही मुलींशी स्वतःहून बोलायला जाणं!? मला उगाचच आपली भिती वाटायची. शिट यार, हे सगळं थोडं आधी जमायला हवं होतं. शाळेत असतानाच सुचायला हवं होतं. चार वर्षं फुकट गेली नसती.'

आम्ही फिरत फिरत त्या रस्त्याच्या काही गल्ल्यांमध्ये घुसून एक गोलाकार चक्कर मारली. मग आम्ही जिथून एकमेकांना बाय म्हणून आपआपल्या घरच्या वाटेला लागतो, तिथल्या नाक्याजवळ आलो. पाहतो तर काय, रस्त्याच्या समोरच्या बाजुला उभ्या असलेल्या पाणी-पुरीवाल्याकडे मघाचच्या दोघी चाटची भूक शमवत उभ्या होत्या.

'ए ती बघ. चल पाणीपुरी खाऊया.'
'नको. मला घरी जायचंय. तू सुद्धा जा.'
'चल ना यार!! बरं ठीक आहे तू जा घरी. मला पाणीपुरी खायचीये.'
'अजिबात नाही! इतका उतावळेपणा बरा नाही साल्या!! मी नाही जाऊ देणार तुला!'
'अरे प्रॉब्लेम काय आहे तुझा? तूच म्हणालास ना ब्रॉड माइंडेड हो, ओळख वाढव म्हणून? आता मी ओळख वाढवायचा स्वतःहून प्रयत्न करतोय तर का अडवतोयस?'
'तू कॉलेजमध्ये बघ एखादी. हिचं तुला धड काही माहितीसुद्धा नाहीये. तुझ्या हाय ला हाय म्हणाली म्हणून लगेच शेफारू नकोस. जरा सबुरीने घे.'
'अरे?? तूच तिला हाय म्हणायला सांगितलंस ना? आता का थांबवतोयस? की तुला आवडली ती?'
'असं काही नाहीये. फक्त प्रॅक्टिस म्हणून तिच्याशी हातमिळवणी करायला सांगितली मी. म्हणून तू आता लगेच तिच्या हातात हात घालून बागेत बागडण्याची स्वप्नं बघू नकोस. चिल, रिलॅक्स!!'
'अरे बरं ठीक आहे पण माझा हात तरी सोड!'
'तिला जाऊदे आधी, मग सोडतो.'
'अरे ही काय फालतूगिरी आहे यार!!'

तिची पाणीपुरी खाऊन ती तिथून जाईपर्यंत त्याने मला अडवून धरलं होतं. तोवर मी बरीच झटापट केली सुटण्याची, पण एकतर त्याची पकड मजबूत होती, त्यात आम्ही रस्त्याच्या वळणावर उभे होतो, गाड्यांची वर्दळ होती. उगाच एका मुलीपायी मस्ती कशाला? शेवटी एकदाचा त्याने मला सोडला आणि मी धावत सुटलो. ती ज्या रस्त्याला लागली होती (सुदैवाने माझ्या घराकडे जाणारा रस्ता तोच होता) त्या रस्त्यावर मी पोचलो तर तिथून ती गायब! मला कळेना, एवढी कशी ती फास्ट चालेल? मी नीट पाहिलं. ती एका दुकानात दिसली. मी लगेच त्याच दुकानाच्या पुढून दुस-या दुकानात शिरलो. चार चॉकलेट्स घेतली(आठाण्याची). दुकानाच्या आतूनच तिची वाट बघायला लागलो. ती त्या दुकानातून बाहेर पडली, थोडी जवळ आली, आणि मी स्वतःच्याच धुंदीत असल्याचा आविर्भाव करत तिच्यासमोर येऊन उभा ठाकलो.

'अरे, हेल्लो अगेन!!'
'ओह हाय!!' ती पुन्हा हसली. माझ्या हातात चॉकलेट्स होतीच. मी दोघीनांही ऑफर केली. दोघींनी हसूनच मान हलवली.
त्या आता मला तिथेच टाकून पुढे निघायच्या तयारीत होत्या. मी सगळं अवसान एकटवून डेअरिंग केली -

'तू आता इथून घरी चाललीयस का??'
'अं... हो.. का?'
'नाही म्हंजे मी सुद्धा इथूनच घरी जातोय तर म्हटलं कंपनी होईल. चला!' आणि असं म्हणून मी त्यांच्याबरोबरच चालायला लागलो. त्या दोघी एकमेकींकडे बघून किंचित हसल्या. पण त्या हास्यामागे भावना काय होत्या ते मला कळेना. माझी थोडी फाटली. संशय तर आला नसेल? सांभाळून बेट्या!!

'आज ब-याच वर्षांनी.... नाही?' मी चाचरतच विचारलं.
'हो ना...'
'वर्ग बदलल्यापासून तसा फारसा काँटॅक्ट झालाच नाही नाई?'
'तुझ्या वर्गातल्या काही मुली दिसतात मला.'
'हो ब-याच जणी राहतात इथे या एरियात'
'त्यांना माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे काय माहित!!'
'म्हंजे?'
'म्हणजे विचित्र नजरेने बघतात मला, अ‍ॅस इफ मी कोणीतरी... आय डोंट नो... इन्फिरिअर असल्यागत!!!'
'अगं तू लक्ष नको देऊस गं त्यांच्याकडे! आमच्या वर्गातल्या मुलींना ना, 'अ' वर्गातल्या असल्याची खूप घमेंड आहे पहिल्यापासून! त्या सगळ्यांनाच अ‍ॅटिट्यूड दाखवतात.'
'तू सुद्धा दाखवायचास!!'
'ऑ!!! मी... मी अ‍ॅटिट्यूड दाखवायचो?'
'हो तू रस्त्यात कधी दिसलास की ओळख दाखवायचा नाहीस. आज खरं तर मला खूप आश्चर्य वाटलं तू ओळख दाखवल्यावर!!'
'अगं ते मी... (जाऊदे खरं सांगूया आता) मी लाजायचो.'
'काय?????'
'हो मी लाजायचो मुलींना ओळख दाखवायला! पण आपण लाजतोय हे कळू नये म्हणून-'
'म्हणून नाकावर राग घेऊन फिरायचास का?' असं म्हणून ती हसायला लागली. मला हायसं वाटलं.
'हो...' मी लाल झालो होतो.

थोडं पुढे चालत गेल्यानंतर ती थांबली, आणि माझ्याकडे वळली.

'आम्ही आता इथून जाणारोत!'
'चला ना मग!!'
'पण तू तर त्या कॉलनीत राहतोस ना?' तिने बोटाने आम्ही उभे होतो त्याच्या चार ढांगा पाठी असलेल्या एका कंपांऊडच्या गेटकडे बोट दाखवलं. आयला हिला माहित्यिये तर!!
'हो.. पण म्हटलं, मला काही टाईमपास नाहीये तर द्यावी तुम्हाला कंपनी!'
'नको तिथे तुला कोणी पाहिलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. आमच्या कॉलनीतली लोकं लगेच चालू होतील.' - अगं लोकं नाही लोक गं!! पण मी स्वतःला आवर घातला.
'अम्म... ओके!' आम्ही तिथेच तसेच थोडा वेळ घुटमळत उभे राहिलो होतो. तू कुठल्या कॉलेजला आहेस, मी कुठल्या कॉलेजात आहे वगैरे गप्पा झाल्या. ती खूप मोकळेपणे बोलत होती. मला तिचा नंबर विचारायचा होता. घाई झाली असती का? पण ही पुन्हा कधी अशी दिसेल रस्त्यात आणि तोवर मी काय करू, असा प्रश्न मनात आला आणि मी धीर करून तोंड उघडलं -

'अगं मला तुझा -'
'दादा आला!!!!'
'अं????'
'माझा दादा आला!!'
माझ्या पाठीमागून एक धडधाकट मुलगा आमच्या दिशेने चालत येत होता. तो चालत चालत जवळ आला तसा मी त्याला लगेच ओळखला. मी पाचवीत असताना याने उगाचच मस्तीमध्ये मला एकदा चोपून काढला होता. मी याला कधीच विसरणार नव्हतो. हा हिचा भाऊ निघाला?? मेलो!!

'इथे काय करत्येयस??'
'अरे हा भेटला ना!!' त्याने माझ्याकडे खुनशी नजरेनं पाहिलं. मी मनातला राग आणि भिती दिसू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत बळे बळे स्माईल दिली. त्यानेही बळेबळेच स्माईल दिली. आमची ओळख वगैरे करून झाली. मग तो पुढे निघाला. तिने माझ्याकडे वळून एकदा स्माईल दिली, आणि त्या दोघी त्या गेंड्याबरोबर निघून गेल्या. माझा नंबर घ्यायचा तेवढा राहून गेला... मी काहीसा उत्साहीत आणि काहीसा हताश होऊन माझ्या घराकडची वाट धरली.

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

14 Mar 2014 - 3:24 am | अर्धवटराव

लगे रहो हिरो

खटपट्या's picture

14 Mar 2014 - 4:48 am | खटपट्या

चांगलं चाल्लय

खूप छान आणि खूप ‘खरं’ लिखाण.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2014 - 11:20 am | मुक्त विहारि

झक्कास...

आत्मशून्य's picture

16 Mar 2014 - 4:26 am | आत्मशून्य

पुसि(cat) ची ढुशी ही मौ मौ उशी असते हाच या कथेचा मतितार्थ निघेल बघा.

मोठा होशिल (अंजाच्या उपमर्दकारक अर्थानं नाही) तसं अनुभवाचं विश्व विस्तारेल. पण तोपर्यंत लिहीत राहा. यू हॅव अ पोटेंशियल आणि असं मराठी लिहीणारे कमी आहेत.

स्पा's picture

14 Mar 2014 - 12:10 pm | स्पा

सरांशी शमत
लिखते रवो

बॅटमॅन's picture

14 Mar 2014 - 12:04 pm | बॅटमॅन

सहीच! वर संक्षी म्हणताहेत त्याच्याशीही सहमत.

होवु दे खर्च मोठ आहे घरच...

स्पंदना's picture

14 Mar 2014 - 12:55 pm | स्पंदना

हिरवळ....हिरवळ...!!

वैभव जाधव's picture

14 Mar 2014 - 5:47 pm | वैभव जाधव

रापचिक भारी लिवलय

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार!! :) संक्षीकाकांचे विशेष आभार!! थैंक्यू थैंक्यू :D

संजय क्षीरसागर's picture

15 Mar 2014 - 12:39 pm | संजय क्षीरसागर

सही मुळे गोंधळ होतोयं का?

चिगो's picture

15 Mar 2014 - 4:21 pm | चिगो

खुमासदार झालीय कथा.. (की अनुभवकथन? ;-) ) लिहीते रहा..

शैलेन्द्र's picture

15 Mar 2014 - 11:05 pm | शैलेन्द्र

लय्य भाअरी.. चालुद्या.. जमेल..

तुमचा अभिषेक's picture

16 Mar 2014 - 12:25 am | तुमचा अभिषेक

कधीमधी इथे चक्कर टाकली तर तुझी एखादी लवसटोरी चालू असतेच. कधीतरी मला पण भेटशील, थोडाफार कच्चा माल पुरवेल म्हणतो, स्साला मला स्वताला काही लिहिता येत नाही, लग्न झाले की बीअरसुद्धा फुंकून प्यावी लागते असे काहीसे समज.. लिखाण बाकी नेहमीप्रमाणेच घडला प्रसंग उभा करणारे.. लगे रहो.. !!

आत्मशून्य's picture

16 Mar 2014 - 4:28 am | आत्मशून्य

खरोखर तुला मिपा टिन चॉइस २०१४ अवार्ड द्यायला पाहिजे राव... (हा कधी सुरु होणार ?)

अक्शु's picture

17 Mar 2014 - 2:16 am | अक्शु

>>बरं लाजतोय हे मुलीला कळता कामा नये, म्हणून नाक फेंदारून डोळ्यात एक खुनशी भाव ठेवून दुसरीकडे बघत जायचो, जेणेकरून त्या मुलीला आपल्या वाट्याला यावंसंच वाटू नये. असं केल्याने मला तेव्हा काय मिळायचं कोणास ठाऊक!!>>

हे वाक्य वाचून शाळेतले दिवस आठवले. अगदी नेमका असाच अनुभव खुपदा आलाय.
तुमची लेखनशैली खूप भारी आहे.

लिखाण एकाच साच्यातलं होतंय असं वाटत नाही का? या आधी पण अशा धाटणीच्या कथा येऊन गेल्यात तुझ्या.