Autism - लक्षणे व Evaluation

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture
स्वमग्नता एकलकोंडेकर in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 10:10 pm

आधीचे लेख :

पहिला लेख : Autism.. स्वमग्नता..
दुसरा लेख : ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?

पहिल्या लेखात ओझरता उल्लेख येऊन गेलाच आहे पण या लेखात Autismची लक्षणे खोलात पाहू.

खालील चित्र हे दोन वेगळ्या चित्रांपासून एकत्र केलेले आहे. या लिखाणासाठी मी मराठीमध्ये भाषांतरीत केले आहे( यथाशक्ती).

(चित्रावर क्लिक केल्यास मोठे चित्र दिसेल)
वरील चित्रातून कल्पना येतच असली तरीही बरीच मोठी लिस्ट असते लक्षणांची. त्यातून ही स्पेक्ट्रम disorder, त्यामुळे प्रत्येक मुल वेगळे, त्याची लक्षणं वेगळी.  http://www.cdc.gov/ncbddd/autism/signs.html

पालकांनी वरील चित्राच्या आधारे आपले मुल हे कोणत्या गोष्टी करत आहे अथवा करत नाही ते पडताळून बघावे. कुठे शंकेची पाल चुकचुकत असेल तर नेटवरती प्रश्नमंजुषा मिळतात. त्याचे नाव : M-CHAT-R (Modified Checklist for Autism in Toddlers, Revised) 

वरील लिंकवर तुम्हाला प्रश्नमालिका मिळेल. मी माझा मुलगा दोन वर्षाचा असताना याच प्रश्नामालीकेवरून माझ्या मुलाचे डायग्नोसीस घरबसल्या  केले होते. डॉक्टरांच्या ऑफिशियल निदानाच्या वेळेस माझी मनाची तयारी होऊ शकली.

इथे मी डॉक्टर म्हणत आहे, पण हा नेहेमीचा लहान मुलांचा डॉक्टर नव्हे. याच्यासाठी शोधला पाहिजे Developmental Pediatrician. पहिल्या  तासा-दीड तासाच्या भेटीत मुलाबरोबर खेळून , आमच्याशी गप्पा मारून वरीलप्रमाणेच प्रश्न विचारले व पुढील भेट निश्चित केली. ही होती जवळजवळ ३ तासाची. यात, developmental pediatrician, clinical psychologist, speech therapist & occupational therapist  इत्यादी तज्ञ उपस्थित होते. सर्वांनी प्रश्न विचारून, मुलाशी खेळून टिप्पणी करून घेतली. एका आठवड्यात या सगळ्या तज्ञसमूहाची बैठक होऊन निदान निश्चित करण्यात आले व आम्हाला बोलावून घेऊन तो निर्णय आमच्याबरोबर डिस्कस करण्यात आला. निदान : "Autism Spectrum Disorder" (Moderate to Severe)

माझ्या मुलामध्ये तेव्हा असलेली व आत्तापर्यंत डेव्हलप झालेली लक्षणं मी इथे नमूद करते.

  1. १.५ वर्षे वयापर्यंत प्रत्येक डेव्हलपमेंटल माईलस्टोन व्यवस्थित , परंतु वृत्ती कायमच अस्थिर व हायपर.
  2. सव्वा वर्षापासून दीड वर्षापर्यंत आम्ही त्याच्या बोलण्याची बरीच वाट पाहिली. हळूहळू अडखळत का होईना प्रगती करत आहे असे वाटत असतानाच तिला अचानक खिळ बसला होता हे आमच्या तेव्हा लक्षात नाही आले. आम्ही कायमच डॉक्टरी सल्ल्यानुसार वाट पाहिली. 
  3. २४व्या महिन्यापर्यंतही बोलेना, तेव्हा श्रवणदोष नाही ना हे तपासून घेतले. (तो नव्हता.) 
  4. मग हळूहळू डेव्हलपमेंटला पिडियाट्रिशिअन वगैरे वगैरे रुतीनामध्ये जाऊन ४ महिन्यांनी निदान झाले. 
  5. हायपर - आपण मुलांसाठी खूप सहज शब्द वापरतो, पण याची हायपर असण्याची लेव्हल प्रचंड वर होती. दुपारी झोपायाचाही नाहे, आणि रात्रीपर्यंत याचा दंगा, सतत इकडून तिकडे पळापळ, सतत डेंजरस वाटेल अशा वागणूकीकडे लक्ष देऊन रात्रीपर्यंत शक्ती उरायची नाही. 
  6. आवडता कार्यक्रम पाहताना हातापायाचे स्नायू ताठरणे. 
  7. hands flapping. पेम्ग्विंस जसे करतात तसे हात सतत उडवणे( flap करणे.)
  8. खाणे : प्रचंड लढा. कारण तोंड अजिबात न उघडणे. कित्येक महिने या मुलाचे केवळ baby formula व Pediasureवर निघाले आहेत. या मुद्द्यासाठी मेन अडथळा होता तो म्हणजे Sensory Integration Disorder. (मी याबद्दल वेगळ्या लेखात लिहीन. खूप व्याप्ती असलेला विषय आहे हा.)
  9. ओळखीच्या लोकांनाही ओळख न दाखवणे.
  10. आई किंवा बाबाच्या एखाद्या कपड्याविषयी अतोनात जवळीक. 
  11. कारच्या चाकाशीच खेळत बसणे.
  12. हाताने एखादी गोष्ट point करून न दाखवणे.
  13. तसेच, आम्ही विमान वगैरे दाखवल्यास कधीच त्या दिशेला न बघणे. 
  14. Toe-walking. पायाच्या चवड्यांवर सतत चालणे/धावणे.
  15. cuddling न आवडणे
  16. इतर मुलांमध्ये न रमणे 
  17. अर्थातच नजरेला नजर नाही. त्यामुळे मोठ्यांचे 'पाहून' शिकणे हा मुद्दा बाद.  
  18. बर्यापैकी हिंसक वागणूक - चावणे, ओरबाडणे, केस ओढणे, डोके आपटणे. डोके कधी दुसर्या व्यक्तीला आपटेल तर क्वचित कधी भिंतीवर. 

इत्यादी.

नशीबाने वय वाढले म्हणून असेल किंवा खरंच ABA चा फायदा होतो म्हणून असेल, पण बिहेविअरल थेरपी चालू झाल्यावर हिंसक वागणूक तसेच इतर काही लक्षणं सौम्य झाली. Thanks to all the therapists!

- स्वमग्नता एकलकोंडेकर.

Without a doubt, this is all written just for the information purpose. It is just a journal of our journey of my son’s Autism. Some things could be wrong or incorrect as I am still learning, and basically because I am not the Medical Doctor. If by reading this blog makes you concerned about your child, you can talk to your doctor about it. If you are planning to try some of the methods or strategies mentioned in the blog, PLEASE keep in mind that it is completely your responsibility and you would always consult your Doctor before proceeding. 

जीवनमानअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

11 Feb 2014 - 10:14 pm | सस्नेह

ही सर्व नाही, पण यापैकी काही लक्षणे पाहिली आहेत आजूबाजूला काही मुलांमध्ये.

मुक्त विहारि's picture

11 Feb 2014 - 10:50 pm | मुक्त विहारि

आवडला...

जोशी 'ले''s picture

11 Feb 2014 - 11:06 pm | जोशी 'ले'

वाचतोय...

मदनबाण's picture

12 Feb 2014 - 1:42 am | मदनबाण

वाचतोय...

पैसा's picture

12 Feb 2014 - 2:23 pm | पैसा

१५ वर्षांपूर्वी ऑटिझमशी आमचा ओझरता संबंध आला होता त्याच्या आठवणी मनात गर्दी करत आहेत. तेव्हा माझा मुलगा २ वर्षांचा होता. इतर सगळ्या गोष्टीत सामान्य मुलांसारखा, पण फक्त ४/६ शब्दांपलिकडे बोलत नव्हता आणि हाक मारली तर लक्ष द्यायचा नाही. जे काय करत असेल ते करत रहायचा. गाड्यांनी खेळणे असो किंवा इतर काही उपद्व्याप. तसा चळवळ्या पण झोप, जेवण सगळं व्यवस्थित आणि स्वभावाने शांत. केवळ तो हाक मारली तर लक्ष देत नाही या एका मुद्द्यावरून आमच्या शेजारी रहाणार्‍या होमिओपाथनी म्हटलं की "हा मला ऑटिस्टिक वाटतोय." शेजार्‍यांमधेही पसरवून झालं की या मुलाला बहुधा कमी कळतंय.

आमच्यावर तर बॉम्बच पडला. मिळेल तेवढी तुटपुंजी माहिती गोळा केली आणि जरी सगळी लक्षणं त्याला लागू होत नव्हती तरी काही दिवस प्रचंड टेन्शनखाली काढले. आमच्या दृष्टीने होमिओपाथ म्हणजे डॉक्टरच. आमच्यापेक्षा त्यांना जास्त कळतं. तेव्हा आम्हाला गोव्यातले इतर डॉक्टर्स पण ओळखीचे नव्हते. एक पेडियाट्रिशियनचा काय तो आधार. सगळ्या आयुष्यातली चव निघून गेल्यासारखी वाटायला लागली. "Why me?" हा प्रश्न सतत छळत होता. अशातच एका रविवारी मुलांना घेऊन कोलवा बीचवर गेलो होतो. माझ्या मनात सतत हेच विचार की कुठे जाऊ, कोणाला भेटू, कोण मला नीट काय ते सांगेल.

दोघं मुलं वाळूत किल्ला करत होती, आणि हा मधेच कावळ्याच्या मागे धावत होता आणि तसा मजेत होता. अचानक त्याच्या पेडियाट्रिशियन बीचवर आलेल्या मला दिसल्या. त्यांनी जवळ येत हात केला. तिथे त्यांना काही विचारू की नको हा सारासार विचार पण माझ्या मनात राहिला नव्हता. त्या जवळ येताच मी धाडकन विचारून टाकलं, "डॉक्टर आमचा शेजारी म्हणतोय, हा मुलगा ऑटिस्टिक आहे." या पेडियाट्रिशियनची त्याला रेग्युलर ट्रीटमेंट चालू असायची त्यामुळे खरं तर काही अ‍ॅबनॉर्मल असतं तर त्यांनाच आधी कळलं असतं.

जरा त्यांच्या कपाळावर आठी आली. म्हणाल्या, "I do not think he is autistic. बघा किती मजेत बहिणीबरोबर आणि कावळ्या-कुत्र्यांबरोबर खेळतोय तो! काही मुलं उशीरा बोलतात. तो काही मोठासा प्रॉब्लेम नव्हे. त्यातून शंका असलीच तर सायकिअ‍ॅट्रिस्टला दाखवून या. पण मला ५% सुद्धा शक्यता वाटत नाही." झालं डोक्यावरचं बरचंसं ओझं उतरलं. नंतर त्याच्या व्हॅक्सिनेशन साठी दुसर्‍या एका पेडियाट्रिशियनकडे जायचो. पुढच्या व्हिजिटला त्यांनाही तेच विचारलं. ते तर भयंकर फटकळ. म्हणाले,"तुमचा शेजारी होमिओपाथ आहे ना? ते काय डॉक्टर्स असतात का?" आम्ही गारच.

नंतर रत्नागिरीला एका नावाजलेल्या सायकिअ‍ॅट्रिस्टकडे नेलं. त्यानी काही चाचण्या घेतल्या आणि रिपोर्ट दिला की तो व्यवस्थित नॉर्मल आहे. फक्त भाषेचं स्किल डेव्हलप झालेलं नाहीये. (त्याचा आयक्यु इतर मुलांपेक्षा जास्त आहे आणि अशी मुलं भाषेकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात असंही ते बोलले होते.) आता विचार केला तर वाटतं की त्याच्याशी कोणी दिवसभर बोलतच नव्हतं कारण आम्ही दिवसभर बाहेर, घरी आल्यावर कामात आणि दिवसभर हा असायचा मोलकरणीबरोबर. त्यामुळे हा न बोलण्याचा प्रॉब्लेम झाला असेल.

नंतर हळूहळू तो व्यवस्थित बोलायला लागला. बोबडं तर अजिबात कधी बोलला नाही. बाकी प्रगती नॉर्मल होतीच. आज तो त्याच्या मित्रांबरोबर बाहेर भटकतो, क्रिकेट-फूटबॉल खेळतो, आणि इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकतो आहे. ते शेजारी आता दुसरीकडे रहायला गेलेत. पण कधीतरी असं वाटतं की त्यांनी दिलेल्या टेन्शनचा बदला घ्यावा. आणि सांगावं की बघा. तुम्ही ज्याला write off केला होता त्या मुलाने प्रत्येक परीक्षेत, बोर्डात, JEE आणि CET मधे तुमच्या हुशार म्हणून कौतुकं केलेल्या मुलीपेक्षा जास्त मार्क्स मिळवले आहेत.

आज आठवतंय त्या ऑटिझम शब्दाने केवढी धडकी भरली होती ती. १५ वर्षांपूर्वी आताच्यासारखी माहिती पण पटकन मिळत नसे. अशी काही लक्षणे असतील तर योग्य तो डॉक्टर भेटणे हेही मला वाटतं फार महत्त्वाचं असावं. तुम्ही हे सगळं एवढं धीराने घेतलंय त्याबद्दल प्रचंड कौतुक वाटतंय. पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!

आदूबाळ's picture

12 Feb 2014 - 10:10 pm | आदूबाळ

काय सुंदर प्रतिसाद!

जेनी...'s picture

12 Feb 2014 - 11:41 pm | जेनी...

धन्यवाद सासुबै
अतिशय सुंदर प्रतिसाद ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2014 - 3:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

मला ४ महिन्यांपुर्वी असाच अनुभव आला. दुसरा वाढदिवस झाला तरी मुलगा बोलतचं नव्हता..नुस्ता हॅ हॅ करायचा आणि थोडं मनाविरुद्ध झालं कि डोके आपटुन घ्यायचा ...आम्हाला पण ऑटिझम ,स्पिच थेरेपि नि काय काय सांगितलं... शेवटी आम्ही आमच्या भारतातल्या पेडियाट्रिशियनच्या सल्याने २ महिने थांबायचे ठरवले...एके दिवशी त्याने स्वतःच बोलायला सुरुवात केली.आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याचा राग पण कमी झाला..आता आम्हि "गप रे" येवढच बोलतो..बाकी सगळं तोच बोलतो. पण पैसातै म्हणतात तसं ते दोन महिने प्रचंड टेन्शनखाली काढले.

स्पंदना's picture

4 Mar 2014 - 4:43 am | स्पंदना

शेजारी!
किती त्रास झाला असेल तुमच्या दोघांच्या मनाला याची कल्पनाच करवत नाही.
माझा एक भाचा सुद्धा सगळ खाणखुणांनीच सांगायचा. अगदी केस कापुन आल्यावर हाताने कात्री करुन केस कापल्याचे दाखवले होते. आज इंजीनिअरींगच्या लास्ट इयरला आहे.

आनन्दा's picture

12 Feb 2014 - 3:29 pm | आनन्दा

वाचत आहे.. बाकी माझे याबाबतीतील ज्ञान तोकडे, सबब केवळ वाचनमात्रच आहे.

वैनतेय's picture

12 Feb 2014 - 5:40 pm | वैनतेय

सा़डेसात वर्षांची लढाई हरलेला एक...

आनन्दिता's picture

12 Feb 2014 - 7:08 pm | आनन्दिता

वाचतेय..

वाचतोय .

(मिपामग्न ) जेपी

सूड's picture

12 Feb 2014 - 8:09 pm | सूड

वाचतोय.

अजया's picture

12 Feb 2014 - 10:17 pm | अजया

वाचतेय.पु.भा.प्र.

रेवती's picture

12 Feb 2014 - 11:03 pm | रेवती

वाचतिये.
पैसाताईने मोठा प्रतिसाद दिला म्हणून मीही देतीये. माझा मुलगा १८ महिन्यांचा असताना त्याची पहिली भारतवारी होणार होती. महिनाभर आधी लहान मुलांची वाढ होण्याबद्दलच्या एका मासिकात ऑटीझमबदल पहिल्यांदा वाचले आणि डोक्यात फारसे शिरले नाही. नंतर १५ दिवसांनी अचानक काहीतरी वाटले आणि याची खेळण्याची पद्धत येताजाता बघत राहिले. ते नंतरचे १५ दिवस विचित्र मन:स्थितीत घालवले. भारतात हा मजेत खेळला. पुन्हा तिसर्‍या वर्षीचा आवडता खेळ म्हणजे एका खुर्चीखाली (त्याने हट्ट करून करून आणलेल्या)हॉट व्हील्सच्य छोट्या कार्स सत्तर ऐंशी असतील त्या एका ओळीत लावत रहायच्या व कोणालाही त्यास हात लावू देत नसे. नंतर थॉमस द टँक इंजिन तेवढेच तासन तास खेळत राही. रोज रात्री (सलग ५ वर्षे) तो रात्री २ ते ३ वाजता झोपत असे. दिवसभर उत्साहाचे कारंजे असे, ज्याचे आधी कौतुक व्हायचे पण नंतर काळजी वाटू लागली. तो बोलायला मात्र वेळेवर लागला पण तरी बाकीच्या गोष्टींची काळजी असे. नवर्‍याला यातलं आधी काही सांगवेना पण फारच असह्य व्हायला लागल्यावर सांगितलं व मुलाच्या पिडियाट्रीशियनशी बोलले. त्यांना मात्र तसे काही वाटले नाही. नंतरच्या भारतवारीत आमच्या नेहमीच्या डॉ़क्टरांकडून तपासणी, त्यांच्या सांगण्यानुसार सायकॉलॉजिस्ट आणि काय काय तपासण्या झाल्या. हा तपासण्यांचा काळ म्हणजे मरण बरे! असे वाटायचे. त्यातून आम्ही जे काही समजत होतो तसे काही नव्हते ही चांगली गोष्ट झाली. पण तुमच्या या लेखमालेच्या पहिल्या भागाने परवा त्या आठवणी येऊन तुमच्या अवघड प्रवासाची कल्पना आली. आधी हे लिहिण्याचे धाडस होत नव्हते. तुम्ही ग्रेट आहात

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

12 Feb 2014 - 11:29 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

रेवती, पैसा ..

तुम्ही जो अनुभवला हा तर सगळ्यात अवघड भाग. अर्धवट मनस्थिती, तपासण्या, आपल्या मुलाला असे काही असेल का? मुलाची प्रत्येक गोष्ट पडताळून पाहणे.. वाईट काळ हाच असतो. एकदा सगळं निदान झाले कि मनाची तयारी होऊ लागते. जे आहे नशिबात ते झेलायची तयारी होऊ लागते. मग हळूहळू कुठूनतरी मानसिक बळही येते. (आणावेच लागते) पण तुम्ही जो काळ सांगितला आहे तेव्हा मी प्रचंड डिप्रेशन मध्ये होते.

मी अजूनही आशेत असतेच हे सगळे दु:स्वप्न असेल व एके दिवशी हा मुलगा बोलू लागेल, अचानक. तो बोलायला लागला की त्याचे बाकीचे थोडे क्वर्क्स मी सहन करायला तयार आहे. एक मोठे बॅरिअर संपेल. मी रोज हे चित्र रंगवते, तो येऊन म्हणतोय "आई, मला दुदु दे.. " :)

पैसा's picture

13 Feb 2014 - 8:32 am | पैसा

हॅट्स ऑफ टु यू! आणि हे पण खरं आहे की अशा कठीण काळात कुठूनतरी बळ येतं. कारण नाही आलं तर सगळयाच शक्यता संपून जातात....

कवितानागेश's picture

12 Feb 2014 - 11:47 pm | कवितानागेश

मला थेरेपिस्ट आणि डॉक्टर्स्कडून मिळालेली जी काही थोडीफार माहिती आहे त्यावरुन लिहितेय,
यातील काही लक्षणं 'नॉर्मल' मुलांमध्येही असतात. पण सगळ्या तपासण्या नीट केल्याशिवाय थोड्या लक्षणांवरुन निष्कर्ष काढले जातात काही वेळेस.
अगदी अडीच वर्षाची होईपर्य्ंत फक्त 'हूं' या एका अक्षरानी संवाद साधणारी मुले मी पाहिलीयेत. ती 'नॉर्मल' आहेत.
पण 'फरक' हा आहे की ती 'संवाद' सधतात. ती 'ऐकतात'. त्यांना चेहरादेखिल वाचता येतो.
ऑटिस्टिक मुले चेहर्‍याकडेच फारसे बघत नाहीत.
अशीच तन्द्रीत राहणारी मुलेदेखिल असतात. जरा हट्टी, हाकेला ओ न देणारी.
ही गोष्ट काही त्रासदायक कारणानी 'नॉर्मल' मुलाला दुर्मुखलेपणा येउनही होउ शकते. आश्या वेळेस ते जे काही करतायत त्यात इन्टरेस्ट घेतला, तर 'नॉर्मल' मुले बोलतात. लक्ष देतात.
ऑटिस्टिक मुलाना बहुतेक वेळेस ग्रास्पिन्ग/ अटेन्शन याचाच प्रॉब्लेम असतो. त्यांची तन्द्री सहजासहजी भंग करता येत नाही.
हाय फन्क्शन ऑटिसझममध्ये एकदा वाचून/ ऐकूनच सगळं काही लक्षात रहाते त्यामुले फार वेळ कुठेच लक्ष ठरत नाही. पण मग निरर्थक गोष्टी करण्यात, जसे एक छोटीशी कार हातात घेउन तिचेच चाक फिरवत बसणं, अश्या गोष्तीत मन रमतं.
हाय फन्क्शन ऑटिझम लक्शात यायला अजूनच जास्त वेळ लागू शकतो, कारण मूल अती ब्रिलियन्ट असतं. पण कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असतो.
सगळ्याच ऑटिस्टिक मुलांचे एक मुख्य लक्षण म्हणजे भाषेची समज जरा कमी. त्यामुळे बरेचवेळा कोट्या केलेल्या, जोक्स केलेले समजतच नाहीत.
या प्रॉब्लेम्स्वर उपाय करताना मात्र प्रत्येक मुलाचा एकंदरीत स्वभाव, रागरंग बघूनच त्याप्रमाणे वागावं लागतं.
माझी मैत्रीण एका ८ वर्षाच्या ऑटिस्टिक मुलाला शिकवायची, तो एरवी घरातल्यांसमोर अधूनमधून जरा हिंसक व्हायचा. अचानक खूप चिडायचा. त्याचे डोळे लालेलाल व्हायचे. आरडाओअरडा करायचा.
घरातले घाबरायचे, हताश व्हायचे...
एकदा ती शिकवत असताना तसेच झालं. त्याने चेहरा भयानक रागीट आणि डोळी लाल केले. तिनी शांतपणे त्याला आरशासमोर उभे केले. हा त्याला धक्का होता. त्याला ते बघवेना. स्वतःच घाबरला. पण तिनी शांतपणे पण ठासून सांगितलं, 'असं परत करायचं नाही. हे वाईट आहे.' त्यानंतर रागाच अटॅक असा टोकाला गेला नाही. तो आपोआपच कंट्रोल करायला लागला.
अर्थातच हे प्रत्येक ठीकाणी उपयोगी पडणार नाही. थेरॅपिस्ट/ टीचर विश्वासाची असल्यानी तो मुलगा त्या भितीतून आणि रागातून , दोन्हीतूनही बाहेर येउ शकला.
पण फार फापटपसारा न लावता, थेट आणि अ‍ॅफर्मेटीव्ह सूचना देणं, हे मात्र ही मुलं साम्भाळताना कायम लक्षात ठेवावं लागतं.

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

12 Feb 2014 - 11:53 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

चांगला प्रतिसाद. धन्यवाद. :)

जेनी...'s picture

12 Feb 2014 - 11:48 pm | जेनी...

एक प्रश्न विचारु का??

जर मुलाचं ऑटीस्टीक असणं लवकर कळलच नाहि तर ?? म्हणजे मला नाहि वाटत कि आई वडील ह्या गोष्टी सहजासहजी
अ‍ॅक्सेप्ट करत असतिल ..
करण मी बर्‍याच लोकांकडुन "हा एकदम एकलकोंड्या आहे , एकटाच खेळतो .. बाहेरच्या मुलांशी खेळायला
आवडत नाहि ... मग आम्हिहि नाहि जबरदस्ती करत त्याला " ही असली वाक्य ऐकलीत ..
म्हणुन प्रश्न पडला .

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

12 Feb 2014 - 11:58 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

आमची भारातातील स्पीच थेरपिस्ट म्हणायची ना, इकडे लहान गावांतून लोकं ५-५ वर्षे वाट पाहतात मुल आत्ता बोलेल मग बोलेल. मग किती वेळ निघून जातो, व त्या मुलाचे नुकसानच की.
मुलाच्या पहिल्या ५ वर्षात त्याचा मेंदू विकसित होत असतो तेव्हा तुम्ही जितके कष्ट घ्याल तेव्हढे त्याचे फळ मिळते.

जेनी, माझ्या लेख/ ब्लोग लिहिण्यामध्ये हा ही एक उद्देश आहेच. जागरूकता जितकी वाढवता येईल तितकी वाढवायची. पालकांनी जागरूक होणे फार गरजेचे आहे. तसेच आजूबाजूच्या लोकाम्नीदेखील. पालकांना कधी लक्षात नाही येऊ शकत आपले बाळ अमुक गोष्ट नाही करत, किंवा वरील लक्षणे. पण त्यांच्या मित्र मंडळींनी जर लक्षात आणून दिले तर एका मुलाच्या आख्ख्या आयुष्याच्या उभारणीलाच मदत होते.

जेनी...'s picture

13 Feb 2014 - 12:07 am | जेनी...

येस .
तुमच्या ब्लॉगची लिंक मी बर्याच जनाना दिलिय .
कुठेतरी कुणाला तरी फायदा व्हावा .. आणि एका स्वमग्न जीवाला आयुष्य जगायला मदत व्हावी ..

तुमचे लेख खरंच खूप माहिती पूर्ण आहेत… मला एक प्रश्न पडलेला आहे. कदाचित तुमच्या अभ्यासातून तुम्ही मदत करू शकाल.

माझ्या बहिणीला जुळी मुले आहेत. आता ६ वर्षाची आहेत. आणि दोघेही मुलगेच आहेत. पहिली ४ वर्षे फार काही वेगळं नाही वाटलं. पण अलीकडे त्यातला एक जण खूप हट्टी झाला आहे. एरवी तो छान खेळत असतो पण जरा काही मनविरुध्ह झाले मग ते कितीही क्षुल्लक असो , तो रुसून बसतो. कुणाशीही तासंतास बोलत नाही. तो रुसलाय हे खूप वेळ लक्षात ठेवतो. आणि त्यावेळी auotism ची लक्षणे दिसतात.

एरवी तो इतरांच्यात खूप मिसळत नाही पण त्याच्या जुळ्या भावाशी तो खूप जवळचा आहे. ते दोघे एकमेकांशी खूप खेळत असतात. पण खाण्याच्या तक्रारी आणि अभ्यासात थोडी कमतरता जाणवते. आम्ही इतके दिवस प्रत्येक मूल वेगळे असते आणि दोघांची तुलना करायची नाही असे म्हणून दुर्लक्ष करीत होतो पण हल्ली रुसून बसून आत्ममग्न होणे इतके वाढले आहे की आता काळजी वाटते. त्यात त्याला हल्ली जाणवतं की त्याचा जुळा भाऊ शाळेत कौतुक करून घेतो, घरी त्याचा अभ्यास पटकन होतो वगैरे. तो तसे बोलून पण दाखवतो. पण हा तेवढा एकाग्र होऊ शकत नाही.

माझी बहिण डॉक कडे जायला तयार नाही. असे काही असू शकते याची शंका असूनपण वाईट वाटून डॉक कडे जाणे टाळते. याबाबत तुम्ही काही सांगू शकाल काय? एरवी जर त्याच्याकडे खूप लक्ष दिले आणि बोलले तर छान रमणारा आणि प्रतिसाद देणारा मुलगा अधून मधून autistic होत असेल काय ? शिवाय मी माझ्या बहिणीला कसे समजावू की डॉक ला दाखवून ये म्हणून?

-जयंती

कवितानागेश's picture

3 Mar 2014 - 5:11 pm | कवितानागेश

फक्त एकटा आणि रुसुन बसतो म्हणून ऑटिस्टिक आहे असं म्हणता येणार नाही. शब्द, त्यांचे अर्थ, विभक्ती प्रत्यय, वस्तून्चा आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या शब्दांचा परस्परसंबंध या गोष्टी नीट कळत असतील, तर तसा प्रॉब्लेम असण्याची शक्यता फारच कमी आहे.
बरोबरीच्या किंवा जुळ्या भावंडांमध्ये नकळत होणार्‍या तुलनेमुळे एखादे हळवं मूल असं खंतावू शकतं..
दोन्ही मुलांना शक्यतो वेगवेगळ्या शाळेत किंवा निदान वेगवेगळ्या वर्गात बसवलं तरी कदाचित त्या खंतावणार्‍या मुलाला मोकळं व्हायला वाव मिळेल. मी काही शाळांमधून मुद्दमच जुळ्या भावंडांना अगदी प्ले ग्रुपपासूनच वेगळ्या वर्गात ठेवल्याचे पाहिले आहे. त्यात तोटा असा काहीही होत नाही.

माऊ ताई , बरं वाटलं प्रतिसाद वाचून :)
ते पिल्लू गुपचूप बसलेलं बघून थोडीशी शक्यता वाटते त्यामुळं उगाच घाबरायला होतं.
शिवाय जबडा कमकुवत असणे, खायला किर किर, जुळ्या भावाच्या मनानी अगदीच किरकोळ शरीर आणि अभ्यासात एकाग्रता जरा कमी असणे यामुळं जर जास्त चिंता वाटत राहाते.

सध्या तरी आशेवर आहेच की जर समज आली की अपोआप सुधारणा होईल नाहीतर मग एखाद्या लहान मुलांच्या कौन्सिलरशी बोलता येईल.

-जयंती

कवितानागेश's picture

3 Mar 2014 - 10:44 pm | कवितानागेश

वाटल्यास इथल्या मितानला कॉन्टॅक्ट करा. ती कौन्सिलिन्ग बाबत मदत करु शकेल.

स्पंदना's picture

4 Mar 2014 - 4:49 am | स्पंदना

खरच दोन्ही मुलांना वेगवेगळ्या शाळात घाला.
एकूण वर्णनावरुन ही आयडेंटिकल ट्विन्स नाही आहेत. त्यामुळे त्यांची व्यक्तीमत्वे वेगवेगळी आहेत. लहाण मुळ सांगु शकत नाहीत पण कंटीन्युअस कंपॅरिझम फार त्रासदायक ठरते. घरात अन शाळेत दोन्ही कडे होण्याऐवजी निदान दुसर्‍या शाळेत असल्याने तो त्रास कमी होइल.

हो अपर्णा तै… दोघे आयडेण्टिकल नाहीत. मी बहिणीला समजवायचा प्रयत्न करतेच आहे की वेगळ्या वर्गात तरी घाल म्हणून… जुळ्याची दुखणी निस्तरायचे प्रयत्न तर केलेच पाहिजेत :)

माऊ तै, मी मितान यांना नक्की व्य नि करेन.