दुर्योधन

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
5 Feb 2014 - 2:59 pm

अतिदानात बलिर्बद्धो , अतिमानात सुयोधन:|
विनष्टो रावणो लौल्यात , अति सर्वत्र वर्जयेत ||

अतिरेकी दानशूरते पायी बळीराजा पाताळात गेला, अतिगर्विष्टपणाने दुर्योधन आणि अति स्त्रीलोभाने रावण नष्ट झाला. कोणत्याच गोष्टीमध्ये अतिरेक करू नये हेच खरे.

एक अतिरेकी अहंकार सोडला तर दुर्योधनाने त्याचे आयुष्य अतिशय सूत्रबद्ध रीत्या जगले आणि उपभोगले. पण दुर्दैवाने श्लील - अश्लीलतेची एक पुसटशी रेखा आणि अभिमान - अहंकार यातील फरक ओळखु न शकल्याने किंवा ओळखुनही आचरणात न आणु शकल्याने धृतराष्ट्राच्या या पोराने कमावलेले सगळे गमावले.

आंधळा बाप, डोळे असुन बघु न शकणारी आई, सतत द्वेष करणारा आणि फालतु कारणे पुढे करुन जन्मताक्षणी त्याला मारु पाहणारा सावत्र काका, नि:स्पृह चुलत आज्जा आणि महाकारस्थानी मामा या सगळ्यांमध्ये राहुनही स्वतःचे एक वेगळेच व्यक्तिमत्व तयार करणारा दुर्योधन "रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा" ठेवण्यात यशस्वी झाला मात्र गुंतुन गुंत्यात सार्या त्याचा पाय मोकळा नाही राहु शकला.

रामायणातली सग्ळी पात्रे आदर्शतेचा पुतळा आहेत. महाभारत मात्र करड्या रंगात रंगले आहे. भीष्म आणि गांधारी वगळता प्रमुख पात्रांपैकी कुणीही आदर्शवत नाही. भीष्माचा आदर्श देखील अंबा, अंबिका, अंबालिका प्रकरणात कसाला लागतो तर गांधारीचे वस्त्रहरणातले मौन डोळ्यात खुपते. तरीही महाभारतातली बहुतेक सगळी पात्रे कुठल्या ना कुठली बाबतीत एकतर समोर आदर्श ठेवुन जातात किंवा अवगुणांची उदाहरणे बनुन राहतात. कर्णार्जुन तर सगळीकडेच भाव खातात. हजार पापं करुनही युधिष्ठीर धर्मराज म्हणुन मिरवतो तर सर्व प्रकारचे कपट करुनही कृष्ण देवपदाला पोचतो. दु:शासनादी इतर कौरव तात्पुरते वगळुयात. या सगळ्यात अखेरपर्यंत दुर्योधन एक माणुस म्हणुन जगला. He was more humane than any other character in Mahabharata. तो अखेरपर्यंत माणुसच राहिला. तिरस्कार, ईर्षा, द्वेष, राग, लोभ सगळे त्याने एक माणूस म्हणुन निभावले. कधी संतपदाचा आव आणला नाही की कसोटीच्या प्रसंगी आदर्शांमुळे त्याचे मन दोलायमान झाले नाही.

धृतराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या मुलाची ही अशी शोकांतिका का झाली ते प्रथम समजुन घेणे महत्वाचे आहे. दुर्योधन म्हणजे दु: युधम अर्थात युध्दात जिंकता येण्यास दुर्धर / अवघड असणारा. त्याचा अर्थ न समजुन घेता इतिहासकारांनी नंतर दु: या शब्दाचा अर्थ वाईटाशी जोडला. महाभारतात दुर्योधन आणि सुयोधन ही दोन्ही नावे आलटुन पालटुन येतात. बहुतेक वेळेस पांडव आणी खासकरुन युधिष्ठीर त्याला सुयोधन म्हणतो. सुयोधन म्हणजे युद्धात सरस असा. दुर्योधनाचे नाते हे असे जन्मापासुन आणि नावापासुन युद्धाशी जोडले गेलेले.

सलग २ वर्षे गर्भ धारण करुनही जेव्हा मूल झाले नाही तेव्हा गांधारीने स्वत:चे पोट फाडले त्यातुन केवळ एक मांसाचा गोळा बाहेर पडला. व्यासांनी स्वप्रतिभेने त्या गोळ्याचे १०१ तुकडे केले आणी माठांमध्ये भरुन ठेवले. त्या १०१ मधला सर्वात मोठा हा दुर्योधन. इतर सगळे एकेक महिन्याच्या अंतराने जन्मले. योगायोगाने भीम आणि दुर्योधन एकाच दिवसाचे. त्यातही दुर्योधन मोठा.

लहानपणापासुन हा वाढला तेच मुळी राजा होण्यासाठी. राजाचा मोठा मुलगा तोच होणार राजा. चुलता तर राज्य त्यजुन हिमालयात गेलेला. मुले होण्याची शक्याता नसताना तिथे मुले झाली तीही स्वत:ची नव्हेत तर स्वतः जिवंत असताना नियोगातुन झालेली. ती मुलेही हिमालयातच वाढणारी. राज्याशी संबंध त्यांनी तोडलेलाच आणि अश्यातच चुलत्याची विधवा त्या पाच पोरांना घेउन येते आणी त्यांच्या दैवी संबंधांमुळे त्यांच्या भोवती असलेल्या वलयाने आणि हिमालयातल्या निकोप वातावरणात राहुन कमावलेल्या तेजाने ती मुले बघता बघता सर्वप्रिय होतात. त्यातला एक आडदांड सांड विनाकारण सगळ्या कौरवांचा छळ करतो, त्यांची डोकी फोडतो, हातपाय तोडतो, कौरवांना बळाने एकमेकांशी लढुन जखमी होण्यास भाग पाडतो. लहान वयातली ही अवहेलना हा अपमान दुर्योधन आयुष्यभर विसरला नाही. बळाला श्रेष्ठ मानुन त्याने आयुष्यभर त्याची उपासना केली ती लहानपणी बळाअभावी स्वसंरक्षण न करता आल्याने. हे सगळे चालु असताना राज्यकारभार खर्या अर्थाने हाती असलेला सावत्र चुलता सतत कौरवांचा द्वेष करणारा आणि पांडवांची बाजु घेणारा, सगळ्यांची सहानुभुती मिळवणारी काकु स्वतःच्या पोराचा जीव जायचा वेळ येइतो सर्वांकडे दुर्लक्ष करणारी, आंधळे आईबाप असहाय्य आणी विदुराच्या सल्ल्याने चालणारे. या सर्वातुन तो तरला ते केवळे मामाच्या सल्ल्याने आणि अंगभूत अहंकाराने. या दोन गोष्टी त्याने आयुष्यभर वागवल्या आणि त्यांनीच त्याचा घात घडवुन आणला.

दुर्योधनाच्या र्‍हासाला, अधःपाताला आणि विनाशा ला कारणीभूत ठरल्याबद्दल बर्याचदा शकुनी आणि कर्णाला दोष दिला जातो. दुर्योधनाची भिस्त मुख्यत्वेकरुन या दोघांवरच होती हे खरेच परंतु हे ही मान्य केले पाहिजे की दुर्योधन त्यांच्या बोळ्याने दूध पिणार्यातला नव्हता. त्याला जे योग्य वाटेल तेच तो करायचा. द्युतप्रसंगी कर्णाने त्याला द्युततापासुन परावृत्त करण्याचा आणि सरळसरळ युद्ध करण्याचा सल्ला दिला होता पण दुर्योधनाने द्युताचा सोपा मार्ग निवडला तर घोषयात्रेत चित्रसेनाकडुन हारल्यावर आणि अर्जुनाने त्याला लुटुपुटीच्या लढाईनंतर सोडवल्यानंतर शकुनीने त्याला पांडवांबरोबर तह करण्याचा सल्ला दिला होता त्याला दुर्योधनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पराकोटीचा द्वेष आणि पराकोटीचा अहंकार यातुन कधी दुर्योधन स्वतःची सुटका करुन घेउ शकला नाही. याबाबतीत तो भीमाचा भाऊ शोभतो. पण भीम स्वतःच्या द्वेषावर अर्जुन आणि युधिष्ठिरामुळे संयम ठेउ शकला तर आजुबाजुला सगळे तोंडपुजे भरलेले असल्याने (आणि तोंडपुजे नसलेले अप्रिय किंवा अविश्वासार्ह असल्याने) दुर्योधनाला हे कधीच जमले नाही.

प्रजाहितपालक दुर्योधनाचा अधःपात सुरु झाला द्रौपदी वस्त्रहरण प्रकारात. त्याचेही मूळ आहे आत्यंतिक द्वेषात. अगदी द्रौपदीने त्याला "आंधळ्याचा पुत्र आंधळाच" म्हटले असे मान्य केले तरीही (मूळ समजले जाणार्या महाभारतात हा उल्लेख नाही. द्रौपदी आणि भीम कुत्स्तितपणे हसल्याचा उल्लेख केवळ येतो.) वस्त्रहरणाचे कृत्य त्याकाळीही अश्लाघ्यच मानले गेले होते. अश्लाघ्य असले तरीही त्याला तो अधिकारच नाही असे म्हणायला अगदी भीष्म द्रोणादी कुरुंचीही जीभ चाचरते ते बघता धर्म कर्माचा सूक्ष्म अभ्यास करता सगळ्या प्रकरणात ते दुर्योधनाचा द्रौपदीवरचा एक दासी म्हणुन हक्क मान्य करतात असे दिसते. पणात धाकट्या भावाने जिंकलेल्या स्त्रीची आशा बाळगणारा, एका स्रीला ५ जणांशी संग करण्यास प्रवृत्त करणारा आणि द्युतात पत्नीला उपभोग्य वस्तु म्हणुन डावाला लावणारा युधिष्ठीर आणि त्या स्त्रीला भोगवस्तु मानुन तिच्या वस्त्रहरणाचा आदेश देणारा दुर्योधन यांमध्ये अर्थाअर्थी फारसा फरक नाही. दोघांचेही वर्तन समान दर्जाचे अपरिपक्व किंवा नैतिक / अनैतिक आहे. त्यामुळेच युधिष्ठिराला धर्माचा पुतळा मानलेले असताना दुर्योधनाला खलनायक म्हणणे हे दुटप्पीपणाचे ठरते.

महाभारत हे धर्मयुद्ध म्हटले जाते तेव्हाही ते धर्मयुद्ध द्रौपदीच्या विटंबनेचा न्याय करण्यासाठी झाले असे म्हणताच येत नाही. कारण एक भीम वगळता त्या कारणासाठी युद्ध करण्यासाठी कोणीच तयार नव्हते. होता होइता युद्ध टाळण्याकडेच् इतर पांडवांचा कल होता. स्वतः कृष्ण पाच गावांच्या बदल्यात सगळे विसरण्याची शिष्टाई करतो त्यालाही द्रौपदीच्या विटंबनेशी काही घेणेदेणे नाही. त्यामुळे झालेले युद्ध हे दुर्योधनाच्या त्या अधर्माचा नायनाट करण्यासाठी झालेच नाही. ते लढले गेले सत्तेसाठी आणि भूमीसाठीच.

या सत्तासंघर्षात प्रथमपासून अंतापर्यंत ज्या खेळ्या झाल्या ते बघता हा ३ राजकारण्यांमधला एक अतिशय नाट्यपुर्ण राजकारणाचा खेळ होता असे लक्षात येइल. ते तिघे होते युधिष्ठिर, कृष्ण आणि दुर्योधन. शकुनीही होता पण त्याचे राजकारण हे वेगळ्याच कलाने चालले होते तर कृष्ण + युधिश्ठीर विरुद्ध दुर्योधन हे एक वेगळ्याच प्रतीचे राजकारण होते हे कळून येइल. यात दुर्योधन किंचित कमी पडला. मात्र माणसे जोडण्याची कला दुर्योधनाला उत्तम प्रकारे ज्ञात होती. भीष्म द्रोणांशी त्याचे फारसे सख्य नव्हते तरीही ते त्याला सोडु शकले नाहित. कर्ण हा तर दुर्योधनाच्या हातातला हुकुमी एक्काच होता. युद्धप्रसंगीही दुर्योधनाने कुरुवंशातल्या बहुतेक सगळ्या सदस्यांना आपल्या बाजुने ओढले. योग्य राजकीय खेळ्या खेळुन याद्वांची सेनाच काय तर कृष्णाची चतुरंग सेनाही स्वतःकडे जमा केली. शल्यासारख्या पांडवांच्या आप्तालाही आपल्या बाजुने ओढले.

अर्थात हे सर्व करताना दुर्योधनाने केवळ संख्याबळावर जोर दिला. अखेर लढाईत एक अश्वत्थामा (आणी कृतवर्मा) सोडला तर त्याच्या बाजुने मनापासुन कोणीच लढले नाही. इथे युधिष्ठिर आणि कृष्णाची राजकारणी कला पणास लागली आणि त्यात ते दुर्योधनाला वरचढ ठरले. दुर्योधनाच्या बाजुने लढले ते सर्व युद्धात अमर होण्यासाठी आतुर झालेले दोलायमान मनाचे काही रथी / महारथी तर पांडवांकडचे सगळे जिंकण्याच्या इर्ष्येने. राजकारणाच्या या शेवटच्या खेळीत दुर्योधन हारला आणि जीत वीरांची मानखंडना त्याच्या नशिबी आली. सगळे वीर कामी आल्यावर तळ्यात लपुन बसुन दुर्योधनाने स्वतःची उरली सुरली प्रतिष्ठाही गमावली असेच म्हणायला लागेल. अर्थात विझण्यापुर्वी एकदा त्याच्यातल्या राजकारण्याने आणि वीराने एक शेवटचे तेज मात्र अपुर्व साधले. अखेर दुर्योधनालाही पांडवांना कपटानेच मारावे लागले.

एका कसलेल्या राजकारण्याप्रमाणे दुर्योधन कपटी होता, निष्ठुर होता, चतुरही होता. पण त्याच्या अहंकाराने आणि द्वेषाने त्याचा घात केला. भावांच्या म्रूत्युवर तो हळहळला, संतापला पण कर्णाच्या मृत्युवर तो पहिल्यांदा उन्मळुन पडला, खचुन गेला, रडला. त्या अश्रुंमागे कर्णासाठीचे प्रेम होते की स्वतःचा समोर दिसणारा पराभव याचे उत्तर महाभारताने दिलेले नाही. पण इतके मात्र खरे की जितके प्रेम त्याने त्याच्या मित्रावर केले तितकाच पराकोटीचा द्वेष चुलत्यांच्या पोरांचा केला नसता तर कदाचित महाभारताची कथा वेगळी लिहिली गेली असती. कदाचित दुर्योधनाला एक माणूस म्हणुन मरता आले असते पण त्याच्या नशिबी खलनायकाचा मृत्युच लिहिला होता.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Feb 2014 - 3:08 pm | यशोधरा

मस्त लिहिले आहेस!

सस्नेह's picture

5 Feb 2014 - 10:34 pm | सस्नेह

दुर्योधनाचे परखड चित्रण.

सानिकास्वप्निल's picture

5 Feb 2014 - 3:19 pm | सानिकास्वप्निल

लेखन आवडले :)

जेपी's picture

5 Feb 2014 - 3:25 pm | जेपी

आवडल .

सुज्ञ माणुस's picture

5 Feb 2014 - 3:28 pm | सुज्ञ माणुस

मस्त ! कर्णाने मनात घर केलेलं असल्याने बाकीच्यांचा कधीच विचार केला नव्हता.

प्रचेतस's picture

5 Feb 2014 - 3:31 pm | प्रचेतस

छानच.
किती दिवस वाट पाहायला लावलीस रे या लेखासाठी.

प्यारे१'s picture

5 Feb 2014 - 3:31 pm | प्यारे१

लेख म्हणून अभ्यासू. बरीचशी मतं पटली नाहीत पण म्हणून मतं पटावीत असं थोडंच्च आहे?

अनिरुद्ध प's picture

5 Feb 2014 - 7:44 pm | अनिरुद्ध प

+१

भुमन्यु's picture

5 Feb 2014 - 3:31 pm | भुमन्यु

झकासच मस्त लिहिले आहे.

लहानपणापासुन हा वाढला तेच मुळी .....

कायम हेच वाटत आले आहे.

विटेकर's picture

5 Feb 2014 - 3:39 pm | विटेकर

फार्च छान लिहिले आहे.
सगळेच पटले असे नाही पण महाभारत असेच आहे , त्यात काळा- पांढरा असे दोन रंग नसून करड्या रंगाच्या अनेक विविध छ्टा आहेत.
अहंकार आणि द्वेष तर पांडवांच्याकडेही होताच की , पण मला वाटते अधर्मामुळे दुर्योधनाचा पराभव झाला. आणि कदाचित व्यासांनाही हेच दाखवायचे होते , नीती - अनीती सापेक्ष असून प्रत्येक कर्म हे धर्माच्याच कक्षेत केले पाहिजे आणि मगच पाप-पुण्याचा निवाडा केला पाहीजे.गीतेत तर क्षत्रियाने युद्धात दुसर्‍याचा जीव घेणे हाच धर्म आहे हे सांगितले आहे... मति गुंग होते विचार करु लागलो तर !

व्यासाच्या प्रतिभेला सलाम !

मोहन's picture

5 Feb 2014 - 3:44 pm | मोहन

आवडले. महाभारतातल्या इतर पात्रांवर सुद्धा लिहाच.

आदिजोशी's picture

5 Feb 2014 - 4:07 pm | आदिजोशी

क्रमशः टाकायचे राहिले का?

अत्रन्गि पाउस's picture

5 Feb 2014 - 4:45 pm | अत्रन्गि पाउस

अभ्यासू विवेचन...
जेत्यांचे अवगुण आणि पराजीतांचे गुण ...आपल्याकडे साकल्याने चर्चील्याचे फार होत नही..
कृष्ण नसता तर महायुद्धाचा शेवट काय झाला असत हे सांगावयास नको...
थोडे अवांतर...: देवदत्त पटनायक ह्यांचे ह्यावरचे विवेचन अत्यंत उद्बोधक आहे....तू नळी वर पहिले होते...सापडल्यास इथे टाकतो...

प्रसाद गोडबोले's picture

5 Feb 2014 - 6:02 pm | प्रसाद गोडबोले

खुपचं सुंदर लिहिलं आहे !

इरावती कर्वेंच्या युगांतची आठवण झाली !!

तुषार काळभोर's picture

5 Feb 2014 - 7:33 pm | तुषार काळभोर

_/\_

अर्धवटराव's picture

5 Feb 2014 - 7:36 pm | अर्धवटराव

दुर्योधन व्यवस्थीत उभा केलात.

अवांतरः विदुराने दुर्योधनाचा द्वेष केला याचं कारण आज जरी पटत नसलं तरी तत्कालीन परिस्थितीत ते सहाजीक होतं. दुर्योधनाची जन्मकुंडली सांगत होती कि हा कुलक्षय घडवुन आणणार. पण कितीही द्वेष केला तरी विदुराने दुर्योधनाचे अहित करण्याचा प्रयत्न केला नाहि.

पांडवांपैकी सर्वात जास्त टिकेचा धनी ठरला तो युधिष्ठीर. पण थोडं निरखुन पाहिलं तर ते सर्वात सशक्त पात्र आहे. कुठेतरी एक कथा वाचली होती. द्रोणाचार्यांकडे कौरव पांडवांचे शिक्षण सुरु होते. सर्वजण प्रामुख्याने शस्त्रविद्या व राजकारणाचे धडे गिरवत होते. अर्जुन तर नेहमी धनुर्विद्येत स्वाध्यायात मग्न असायचा. एकदा गुरुंनी सत्याचरणावर लेक्चर दिलं. नेहमी खरं बोलावं वगैरे फंडे पाजले. क्लास संपला. सर्वजण आपापल्या उद्योगाला लागले. पण युधिष्ठीर तिथेच विचारात पडला...सत्य म्हणजे काय. त्याची फिलॉसॉफीवर चिकित्सा तिथेच सुरु झाली...काहिशा कोवळ्या वयात. पुढे देखील ऋषीमुनींसोबत तात्वीक चर्चा करण्याचा त्याला छंदच होता. क्षत्रीयांची बलोपासना, किलींग इन्स्टींक्ट, आईचं स्वप्न, आपली गमावलेली पत पुन्हा प्राप्त करण्याची जबाबदारी, मोठा मुलगा असल्यामुळे सर्वांच्या अपेक्षांचं शहाण्या मुलासारखं वागण्याचं ओझं, कटकारस्थानं, विदुरासंगे विवेकविचार व धर्माचा काथ्याकुट, व हे सगळं क्षणभंगुर असल्याची आंतरीक जाणिव. या सर्व घटकांमुळे युधिष्ठीर काहिसा धरसोड वृत्तीचा झाला असावा, किंवा सामान्य माणसाला तसा तो वाटत असावा. पण त्याच्या क्षमतेवर कुंतीने कधी डाऊट केला नाहि. द्रौपदीबद्दल त्याला आकर्षण वाटलेच असावे कारण ति होतीच तशी. युधिष्ठीराने तत्वज्ञानाचा कितीही उहापोह केला असला तरी योग्यांची विरक्त वृत्ती बाणवायला त्याला तपःचर्येला वेळच मिळाला नाहि. जर द्रौपदीने पाच विवाह केले नसते तरी युधिष्ठीराने संयम मात्र गमावला नसता व अर्जुनाकडुन द्रौपदीला हिसकावुन घेण्याचा प्रयत्न देखील केला नसता. युधिष्ठीराची कसोटी लागली ति यक्षप्रश्न प्रसंगात ( ते प्रक्षीप्त आहे काय माहित नाहि). आणि त्या कसोटीत तो उत्तम उत्तीर्ण झाला. आपली तपःचर्येची हौस म्हणा, गरज म्हणा, त्याने वनवासाच्या १२ वर्षात भागवली. त्याच्याकरता तोच वेळेचा सदुपयोग होता.
सज्जन आणि दुर्जनांमधला मुख्य फरक काय? सज्जन व्यक्ती देखील दुर्जनाइतक्याच चुका करु शकतो. पण तो झालेल्या चुका स्विकारतो. धडे गिरवतो. व परत तशी चुक होणार नाहि याची काळजी घेतो. शक्य असल्यास प्रायश्चित्त घेतो. युधिष्ठीराला धर्मराज हि पदवी लावताना हिच कसोटी वापरावी लागते.

प्रचेतस's picture

5 Feb 2014 - 10:57 pm | प्रचेतस

एकदा गुरुंनी सत्याचरणावर लेक्चर दिलं.

ही कथा महाभारतात नाही.

बाकी वनपर्वातील द्रौपदीचे युधिष्ठिराला सतत घालूनपाडून बोलणे आणि युधिष्ठिराचे तिच्याबरोबर धर्मविषयक संवाद हे मूळातून वाचणे हा जबरी अनुभव आहे.

युधिष्ठीराची कसोटी लागली ति यक्षप्रश्न प्रसंगात ( ते प्रक्षीप्त आहे काय माहित नाहि).

यक्षकथा बहुधा प्रक्षिप्तच असावी. वैदिक काळी यक्षांची संकल्पना बहुधा नव्हती. बहुधा ग्रीकांकडून ही कल्पना आली असावी तरी नक्की माहित नाही.

अर्धवटराव's picture

5 Feb 2014 - 11:13 pm | अर्धवटराव

बाकी वनपर्वातील द्रौपदीचे युधिष्ठिराला सतत घालूनपाडून बोलणे आणि युधिष्ठिराचे तिच्याबरोबर धर्मविषयक संवाद हे मूळातून वाचणे हा जबरी अनुभव आहे.

यावर तुम्ही धागा काढला तर आम्हाला कशाला गरज पडतेय काहि मूळातुन वाचायची? घ्या मनावर. आणि होउन जाऊ दे एक फर्मास लेख.

प्यारे१'s picture

6 Feb 2014 - 1:20 am | प्यारे१

+११११ अगदी अगदी.

-वल्ल्यानं महाभारताची पीडीएफ देऊनही न वाचलेला :( प्यारे

प्रीत-मोहर's picture

6 Feb 2014 - 10:17 am | प्रीत-मोहर

मला हवीये ती पीडीएफ. देशील?

प्रसाद गोडबोले's picture

6 Feb 2014 - 12:31 pm | प्रसाद गोडबोले

मलाही द्या पीडीएफ .

अवांतर : ह्यावरुन एक आयडीया सुचली .... हे पुस्तक कॉपीराईट फ्री आहे का ? तसे असल्यास लिन्क शेयर करा येईल ... आपल्यातले कित्येक जणांकडे अशी पुस्तके असतील ...एखादा अशा लिन्क शेयर करण्या साठी धागा काढता येईल .

इरसाल's picture

6 Feb 2014 - 1:21 pm | इरसाल

काय घोडं मारलय आम्हाला पण हवी ती पीडीएफ.
दियर वल्स सेन्द इत तो मि अल्सो.

खटपट्या's picture

10 Feb 2014 - 3:34 am | खटपट्या

मलापण पायजेलाय

मृत्युन्जय's picture

6 Feb 2014 - 10:33 am | मृत्युन्जय

येस. एक लेख होउनच जाउ द्यात वल्ली शेठ आणि एक लेख सुवर्ण मुंगुसावर सुद्धा. :)

प्रचेतस's picture

6 Feb 2014 - 11:22 am | प्रचेतस

ललित लिहिता आले असते तर काय रे. :(

तूच यांवर एक चांगला लेख लिहू शकशील. मी प्रतिसादांद्वारे भर घालेनच. :)

अतिअवांतरः दुर्योधन, दु:शासन, इ. लोकांच्या पोरांची नावे कधीच ऐकली नाहीत. धृतराष्ट्राच्या कोणकोणत्या नातवांची नावे महाभारतात आलेली आहेत?

अर्धवटराव's picture

6 Feb 2014 - 11:34 am | अर्धवटराव

दुर्योधनाचा मुलगा. अभिमन्युला मारण्यात याचाही हात होता.

बॅटमॅन's picture

6 Feb 2014 - 11:38 am | बॅटमॅन

ओह अच्छा, धन्यवाद!

दुर्योधनपुत्र लक्ष्मणाचा वध अभिमन्यूनेच केला. मात्र अभिमन्यूचा वध आहे दौश्शा:सनी (दु:शासनपुत्र) ह्याच्या हातून गदेच्या प्रहाराने झाला.

बॅटमॅन's picture

6 Feb 2014 - 11:48 am | बॅटमॅन

अर्रे हो!!!! आत्ता आठवलं. 'कथा-महाभारत' नामक लहानपणी वाचलेल्या पुस्तकातलं चित्रच डोळ्यासमोर उभं राहिलं. :) अभिमन्यू जमिनीवर पडलाय आणि मिशाळ दौ:शासनी त्याच्या छातीवर गदेचे आघात करण्याच्या बेतात आहे. साला काय मस्त शब्दयोजना होती राव त्यातली, घरी कुठं पडलंय पुस्तक काय माहिती. मिरजेला गेलो की पाहतोच आता.

पण हे दोघे सोडून अजून कुणाचाच उल्लेख कसा काय नाही?

प्रचेतस's picture

6 Feb 2014 - 12:00 pm | प्रचेतस

=))
रच्याकने गदाप्रहार मस्तकी करतो.

बाकी आधीच १०० कौरव. त्यात सर्वांच्या पुत्राची नावे म्हणजे......प्रत्यक्ष व्यास जरी झाले तरी अशक्यच ना :)
तसा महाभारतात कही कौरवांच्या पुत्रांचा उल्लेख आहे म्हणजे विकर्ण पुत्र, दुर्मुख पुत्र वैग्रे. पण नावांनिशी नाही.

अवांतरः दुर्योधन, दु:शासन, विकर्ण, दु:सह, दुर्मुख, आदी ७/८ कौरवच धृतराष्ट्राचे गांधारीपासून झालेले अस्सल पुत्र असावेत बाकीचे सर्व दासीपासून झालेले असावेत. पण महाभारतात मात्र १०० कौरवांचा उल्लेख गांधारीपुत्र असाच येतो. एकमात्र दासीपुत्र युयुत्सु, जो युद्ध सुरु व्हायच्या आधी पांडवांना मिळतो.
आणि १०० कौरवांबरोबर एक पुत्री जी दु:शला. हिचा विवाह जयद्रथाशी होतो.

मृत्युन्जय's picture

6 Feb 2014 - 12:11 pm | मृत्युन्जय

७/८ कौरवच धृतराष्ट्राचे गांधारीपासून झालेले अस्सल पुत्र

बहुधा १४. तेच १४ ज्यांची नावे दु पासुन सुरु होतात:
१. दुर्योधन
२. दु:शासन
३. दु:सहा
४. दु:शाल
५. दुर्मुख
६. दुर्धर्षा
७. दुश्प्रधर्शना
८. दुर्मषण
९. दु:ष्कर्ण
१०. दुर्मद
११. दुश्प्रधर्शा
१२. दुर्विरोचन
१३. दुराधर

आणि चौदावी मुलगी दु:शला.

अर्थात ही फक्त एक थियरी आहे. महाभारताप्रमाणे सगळेच १०१ धृतराष्ट्र आणि गांधारीचेच. :)

बॅटमॅन's picture

6 Feb 2014 - 12:19 pm | बॅटमॅन

अरे हो बरोबर. :)

सर्वांच्या पुत्रांची नावे येणे अशक्य हे पटते पण लक्ष्मण आणि दौ:शासनी वगळता कुणाचा उल्लेख न दिसल्याने म्हटले इतकेच.

अन दु:शलेचा पती जयद्रथ हीही माहिती नवीनच.

साला आता तर वाटू लागलंय महाभारताचा फक्त युद्धवाला पार्ट १८ बुकांत विभागून एखादी 'kouridomachia' किंवा
'Mega-Bharataid' लिहायला कसली मजा येईल ;)

मृत्युन्जय's picture

6 Feb 2014 - 12:33 pm | मृत्युन्जय

होमर किंवा इलियाड मध्ये जी युध्दाची वर्णने आहेत ती कशी आहेत? म्हणजे तपशीलवार आहेत की सरळ सरळ मारामारी आहे? म्हणजे घेतला भाला की खुपसला, मग तलवार टाळक्यात अशी की महाभारतात वर्णने येतात की बाण कसा होता, यौद्धे काय म्हणाले, मग कुठल्या क्रमाने यौद्ध्याला नामोहरम केले. म्हणजे पहिल्यांदा घोडे मारले मग सारथी मग ध्वज उडवला मग मुकुट, मग शे दीडशे बाण वेगवेगळ्या यौद्ध्यांनी एकमेकांना मारले मग अखेर वातावरणात घडुन आलेले बदल आणि मग अखेरचा वर्मी लागलेला बाण. इतके तपशीलवार वर्णन इलियाड मध्ये येते काय?

शिवाय तुझे ट्रॉय वरचे लेख वाचताना जाणवले की त्यातले वर्णन खुप ग्राफिक आहे. त्यामानाने महाभारतातले वर्णन बरेच सोबर वाटते. एक १८ व्या रात्रीची अश्वत्थामाची कापाकापी सोडली तर इतके बिभ्त्स वर्णन महाभारतात सर्रास सापडत नाही. काही वेळेसच आहे.

तपशीलवार आहेत. म्हणजे योद्धे चिलखत घालून तयार होतात, त्यातही आगामेम्नॉन, अकिलीस, हेक्टर, इ. मेन लोकांच्या शस्त्रास्त्रांचे जरा तपशीलवार वर्णन असते. मग युद्धभूमीवर जाताना एकगठ्ठा समुदाय कसा दिसतो त्याचे विविध उपमा देऊन वर्णन. मग सैन्य एकमेकांना भिडते त्याचे वर्णन-उपमांसहित. त्यात आधी दोन्ही बाजूंचे लीडर आपापल्या बाजूला चेतवतात भाषणे देऊन. अन एकदा सैन्याला सैन्य भिडले, की मग कापाकापीचे जेनेरिक वर्णन, दाणे तुडवल्यागत मृतदेह तुडवू लागणे इ.इ. अन मेन मेन योद्धे एकमेकांना भिडले की त्यांचे जाबसाल अन मग मारामारी. अधूनमधून देवही आहेत काड्या करायला बरेच. मी वर्णने लिहिताना अ‍ॅडिशनल भाग बराच काटछाट करून लिहिलाय.

अन वर्णन खूप ग्राफिक आहे इतके मात्र खरे. याचे कारण मला वाटते कल्चरल फरकामध्ये आहे. दोन्ही युद्धे तितक्याच चिरडीने झालेली असणार, पण ग्रीसमध्ये 'संस्कृतायझेशन' हा प्रकार तितका दिसत नाही. आपल्याकडेही पहिल्यांदाचे मौखिक महाभारत असेच असावे. नंतर त्याचे संस्करण करता करता ब्राह्मणीकरण जास्त झाले असावे. किंवा हेही असेल की मुळातूनच इतके ग्राफिक वर्णन नसावे. याचे अजून एक कारण सांगता येईल की ट्रोजन युद्ध सगळेच्या सगळे एकदम जवळून घडलेले आहे. महाभारतातले मुख्य पराक्रमी वीर भीमादि काही अपवाद वगळता सगळे धनुर्धारी होते त्यामुळे लढाई तशी 'gory' वाटत नाही हाही एक मुद्दा आहेच. भीमासारखे राउंडात उतरून हाणाहाणी करणारे कौरव वीर क्वचितच दिसतात, त्यामुळे हातघाई त्या प्रकारची दिसत नाही. याउलट आपल्याकडे शस्त्रे, युद्धपद्धती, इ. चे जितके सोफिस्टिकेशन दिसते तितके होमरमध्ये दिसत नाही. अंमळ जास्त प्रिमिटिव्ह आणि रासवट प्रकार आहे तो.

मृत्युन्जय's picture

6 Feb 2014 - 12:03 pm | मृत्युन्जय

बॅट्ञा शेवटी महाभारत म्हणजे काय तर वैशंपायन ऋषींनी जन्मेन्जयाला सांगितलेल्या कथेचे दुसर्‍या कोणीतरी केलेले लेखन. मुळात वैशपायनांनी जन्मेन्जयाला तेवढेच सांगितले जे त्याच्या आज्याच्या, पणज्याच्या आणि पणज्याच्या भावांच्या अनुषंगाने येते. इथे लक्ष्मण आणि दौशासनीचा उल्लेख येतो कारण एकाला अभिमन्युने मारले (लक्ष्मण) तर त्याच युद्धात दुसर्‍याने (दौशासनी) अभिमन्युला मारले. जर तसे नसते तर त्यांचाही उल्लेख कदाचित आला नसता. बाकी शंभर कौरवांपैकी ८९ लोकांचा उल्लेख केवळ मरण्यापुरता (आणि इतर १-२ परिच्छेदापुरता) येतो. तिथे बाकीच्यांचा काय पाड?

हो, तेही आहेच म्हणा. बहुतेक कौरव तसे मायनर क्यारेक्टरच आहेत.

अर्धवटराव's picture

6 Feb 2014 - 11:58 am | अर्धवटराव

उलटच झालं म्हणा कि... =))
आपल्या मुलीचा विवाह लक्ष्मणाशी करावा अशी बलरामाची इच्छा होती, पण अभिमन्युने तिला पळवलं. त्याचा बदला लक्ष्मणाने घेतला अशी ष्टोरी ऐकली होती.

प्रचेतस's picture

6 Feb 2014 - 12:13 pm | प्रचेतस

=))

नाय नाय.
सुभद्रेचा विवाह हा दुर्योधनाशी व्हावा अशी बलरामाची इच्छा होती असा सर्वसाधारण समज आहे पण प्रत्यक्ष महाभारतात असे नाही. बाकी अभिमन्यूने कुणालाही पळवले नाही. त्याचा विवाह विराटकन्या उत्तरेशी होतो.

मृत्युन्जय's picture

6 Feb 2014 - 12:15 pm | मृत्युन्जय

महाभारतात नाही. पण हा उल्लेख की बलरामाला त्याच्या मुलीचे लग्न लक्ष्मणाबरोबर करायचे होते आणि तिला अभिमन्यु पळवुन नेतो हा उल्लेख हरिवंशात आहे बहुधा. ही कथा नक्की वाचली आहे. कुठे ते अगदी नक्की नाही आठवत ब्वॉ.

हरिवंश बघायला लागेल पण निदान अभिमन्यूला तरी एकच पत्नी होती आणि ती म्हणजे विराटकन्या उत्तरा हे अगदी नक्की.

अमोल मेंढे's picture

6 Feb 2014 - 2:17 pm | अमोल मेंढे

दुर्योधन नाव आहे आणि आड्नाव सुद्धा..

किसन शिंदे's picture

5 Feb 2014 - 8:03 pm | किसन शिंदे

अतिशय आवडलंय. तू लिही रे अजून, तुझे महाभारतावरचे लेख वाचताना गुंग होवून जायला होतं.

तिमा's picture

5 Feb 2014 - 10:24 pm | तिमा

किसनरावांप्रमाणेच म्हणतो की महाभारतावर आणखी लिहा. वाचायला खूप आवडेल.

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2014 - 10:38 pm | पिवळा डांबिस

मस्त लिहिलंय!!!
दुर्योधनाचं व्यक्तिचित्रण आवडलं!!

कौरव आयुष्यभर अनीतीने जगले तेंव्हा जिंकले; पण नीतीने लढले तेंव्हा हरले...
पांडव आयुष्यभर नीतीने जगले तेंव्हा हरले; पण अनीतीने लढले तेंव्हा जिंकले...
सारांश काय, नीती सर्वत्र वर्ज्ययेत!!!!
:)

प्रचेतस's picture

5 Feb 2014 - 10:48 pm | प्रचेतस

कौरव आयुष्यभर अनीतीने जगले तेंव्हा जिंकले; पण नीतीने लढले तेंव्हा हरले...

भीष्ममृत्युपर्यंत युद्ध नियमांना धरून चालू होते पण नंतर नीती सर्वांनीच सोडून दिली.

बॅटमॅन's picture

5 Feb 2014 - 10:45 pm | बॅटमॅन

दुर्योधनाचीही बाजू!!!

मस्त आवडली. त्याच्या संदर्भात हा श्लोक फेमस आहे तो आठवला.

"जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति:
जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति:
केनापि देवेन हृदि स्थितेन
यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि || "

आयुर्हित's picture

5 Feb 2014 - 10:51 pm | आयुर्हित

सलग २ वर्षे गर्भ धारण करुनही जेव्हा मूल झाले नाही तेव्हा गांधारीने स्वत:चे पोट फाडले त्यातुन केवळ एक मांसाचा गोळा बाहेर पडला. व्यासांनी स्वप्रतिभेने त्या गोळ्याचे १०१ तुकडे केले आणी माठांमध्ये भरुन ठेवले. त्या १०१ मधला सर्वात मोठा हा दुर्योधन. इतर सगळे एकेक महिन्याच्या अंतराने जन्मले.

हे test tube baby चे उदाहरण आहे की काय?

पिवळा डांबिस's picture

5 Feb 2014 - 11:01 pm | पिवळा डांबिस

हे टेस्टट्यूब-बेबी वगैरे हे सगळं आपल्याकडे पुराणकाळापासून होतंच!
फक्त त्या काळी टेस्ट्-ट्यूब्ज नसल्यामुळे हे मांसाचे तुकडे चिनीमातीच्या बरणीत भरून ठेवत असत.
आणि त्या मुलाना "बरणी-बेबीज" म्हणत असत!!!!
;)

चिनीमाती वैग्रे महाभारतकाळी नव्हतं हो. तेव्हा चीनवालेच आपल्याकडून भारतमाती घ्यायचे ;)

अन बरणीबेबीज असल्यानेच स'त्पात्र' असे म्हटले जायचे ;)

प्यारे१'s picture

6 Feb 2014 - 1:25 am | प्यारे१

आयला!
१०१ महिने म्हणजे ८ वर्षं ५ महिने!

म्हणजे दर महिन्याला ....

जो बाळा जो रे जो!
पयल्या दिवशी पयला...

जल्ला साऊन्ड शिष्टीम, मांडाव, जेवनाची भांडी 'इकात' आनली आस्ती तर परवाडली आस्ती ना! =))

निमिष ध.'s picture

5 Feb 2014 - 11:10 pm | निमिष ध.

महाभारत मात्र करड्या रंगात रंगले आहे.

अतिशय नेमके वर्णन केले आहे महाभारताचे आणि दुर्योधनाचे!!

मदनबाण's picture

5 Feb 2014 - 11:26 pm | मदनबाण

मस्त !

अवतार's picture

5 Feb 2014 - 11:31 pm | अवतार

मुद्देसूद विवेचन आहे.

काही मुद्द्यांबाबत वेगळी मते आहेत.

१. दुर्योधन हे जरी महाभारताच्या रंगमंचावरील प्रमुख पात्र असले तरी त्याला सतत पाठीशी घालणारा आणि स्वत:च्या महत्त्वाकांक्षेचे तेल ओतून त्याच्या मनातील द्वेषाग्नी भडकत ठेवणारा धृतराष्ट्र हा सर्वांत अट्टल राजकारणी होता. जेव्हा कधी पांडवांशी थेट भिडण्याचा प्रसंग आला तेव्हा धृतराष्ट्रानेच युक्ती-प्रयुक्तीने पांडवांना समेट करण्यास भाग पाडले. श्रीकृष्णाने देखील शेवटची निर्वाणीची बोलणी धृतराष्ट्राशीच केली. कारण त्याचे मन वळवल्याखेरीज युद्ध टळत नाही हे श्रीकृष्णाला पक्के ठाऊक असावे. दुर्योधनाने मध्येच तोंड खुपसून "सुईच्या अग्राइतकी देखील जमीन" न देण्याची धमकी दिली नसती तर कदाचित युद्धाचा सर्व दोष पांडवांच्या माथी मारण्यात देखील धृतराष्ट्र यशस्वी होऊ शकला असता.

२. युद्ध झाले ते मुळात हस्तिनापूरच्या वारसा हक्कावरून. हस्तिनापूरच्या गादीवर खरा हक्क कोणाचा होता ह्या प्रश्नाचे सरळ उत्तर म्हणजे दुर्योधनाचा होता असे आहे.
धृतराष्ट्र हा ज्येष्ठ पुत्र. तो केवळ अंध म्हणून पांडू हा धृतराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून सिंहासनावर बसला. पांडू वनात गेल्यावर परत धृतराष्ट्र राजा झाला. कुंतीला पुत्र झाले हे खरे आहे पण त्यांचा सिंहासनावर मुळात अधिकारच सिद्ध होत नाही. पांडू आणि धृतराष्ट्र हे देखील अंबिका आणि अंबालिका यांना नियोग पद्धतीने झालेलेच पुत्र होते. पण नियोग पद्धत ही घराण्यातील ज्येष्ठांच्या संमतीने त्यांना विश्वासात घेऊन अमंलात आणली जायची. पांडवांच्या बाबतीत असे काही घडलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांना नियोग पुत्र म्हणणे हे वास्तवाला धरून नाही. याचाच सरळ अर्थ असा की दुर्योधन गर्विष्ठ अहंकारी असला तरी राज्यावर खरा हक्क त्याचाच सिद्ध होत होता. शिवाय पांडवांच्या तेरा वर्षांच्या वनवासात दुर्योधनाविषयी प्रजेची विशेष तक्रार नाही. तेव्हा त्याला वाईट राजा देखील म्हणता येत नाही.

कौरवांच्या प्रत्येक सेनापतीला कपटाने ठार मारणाऱ्या पांडवांना मुळात नैतिकतेच्या आधारावर हस्तीनापुरवर राज्य करण्याचा हक्कच राहत नाही. कपटाच्या आधारावर हस्तिनापुर मिळवणाऱ्या पांडवांचे राज्य जर न्यायाचे आणि धर्माचे असू शकते तर त्याच कपटाचा आधार घेणाऱ्या दुर्योधनाचे राज्य मात्र अन्यायाचे आणि अधर्माचे कसे?

अर्धवटराव's picture

6 Feb 2014 - 12:06 am | अर्धवटराव

अगदी सुरुवातीला हस्तिनापुरच्या वारसा हक्काचा वाद होता. तो डाव पांडवांच्या बाजुने पडला. पुढे लाखेच्या घराचं अग्नीकांड वगैरे झाल्यानंतर राज्याचे दोन तुकडे पडले. पांडवांनी स्वकष्टाने इंद्रप्रस्थ वसवलं व ते हस्तिनापुरपेक्षा काकाणभर सरस ठरलं कारण इंद्रप्रस्थ सम्राटाची राजधानी बनली. इंद्रप्रस्थापुढे पांडवांना हस्तिनापुरची फार काहि किंमत नसावी. त्यांच्या दृष्टीने स्वकष्टाने नावारुपाला आणलेल्या व नादानीने घालवलेल्या राज्याचा मान हस्तिनापुरपेक्षा निश्चित जास्त असावा. प्रॅक्टीकली सुद्धा हस्तिनापुर आपल्या हातात येणार नाहि याची जाणिव पांडवांना होतीच. फायनल युद्ध झालं ते इंद्रप्रस्थाकरता. पांडवांना पाच गावं दिले तरी त्यांचं अधिष्ठीत सिंहासन तयार होईल व द्रुपद, यादव वगैरे मंडळींच्या मदतीने पांडव परत कधि न कधि शिरजोर बनतील याची खात्री दुर्योधनाला असावी.

झालं गेलं गंगेला मिळालं. आता पांडवांना नवीन सुरुवात करु द्या हि कृष्णाची भुमीका. क्षत्रीयाचा, समर्थ पुरुषाचा कर्तुत्व गाजवायचा हक्क हिरावुन घेणे हा अधर्म. त्याकरता ५ गावांछी निम्नतम तडजोड पांडवांनी स्विकारली. तिलाही नकार मिळाला तेंव्हा जगाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात जाऊन फ्रेश सुरुवात करावी हा ऑप्शन असणार. पण त्यामुळे "पांडव"पण गमवावं लागलं असतं ने नामंजुर होतं.

मृत्युन्जय's picture

6 Feb 2014 - 11:07 am | मृत्युन्जय

क्षत्रीयाचा, समर्थ पुरुषाचा कर्तुत्व गाजवायचा हक्क हिरावुन घेणे हा अधर्म.

या दृष्टीकोनातुन कधी विचार केला नव्हता. असा विचार केल्यास महाभारत धर्मयुद्ध बनते खरे आणि इतर बर्‍ञाच शंकांची देखील उत्तरे मिळतात.

तसेच पांडवांना दुसरीकडे जाउन राज्य मिळवणे सोपे असताना त्यांनी याच राज्यावर डोळा का ठेवला याचाही विचार तुमच्या खुलाश्याने होतो. पटतय पण विचारही करतोय यावर. धन्यवाद.

आदूबाळ's picture

6 Feb 2014 - 12:22 am | आदूबाळ

मस्तच लेख! आवडला.

आत्मशून्य's picture

6 Feb 2014 - 12:22 am | आत्मशून्य

धुम ४ मधे दुर्योधनाला ब्रेक द्यावा म्हणतो कारण तसा तो गुणी आहे पण त्याच्या नशिबी खलनायकाचाच मृत्यु आहे ना ;)

विटेकर's picture

6 Feb 2014 - 6:15 am | विटेकर

आत्म शून्य जी!
वेल्कम महाराज....

विटेकर's picture

6 Feb 2014 - 6:17 am | विटेकर

फ्लेक्स.बनव रे बाबा.....

खटपट्या's picture

6 Feb 2014 - 1:54 am | खटपट्या

आवडला लेख

स्वाती दिनेश's picture

6 Feb 2014 - 2:03 am | स्वाती दिनेश

लेख आवडला,
स्वाती

आनन्दिता's picture

6 Feb 2014 - 6:58 am | आनन्दिता

लेख खुप खुप आवडला...

हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तीमत्व सुद्धा अहंकाराने पछाडलं गेलं की मातीमोल होतं याचं उदाहरण म्हणजे दुर्योधन..

तसं बघायला गेलं तर महाभारत म्हणजे एक चकवा आहे... प्रत्येक पात्र अनेक वेळा कोड्यात पाडतं.
त्यांना योग्य अयोग्याच्या कसोटीत बसवायचं म्हटलं तर दमछाक होते.

महाभारताने रंगवलेल्या "नायकांच्या "सत् -शीलतेवर खरंच विश्वास ठेवायचा आणि दुर्योधन कर्णाला दुराचारी समजुन रिकामं व्हायचं ?.
की युद्धातल्या जेत्यांच्या बाजुनेच इतिहास लिहीला जातो हे मानायचं.??
महाभारतातल्या घटनांना आत्ताच्या धारणांनी तपासुन पाहणं हे तरी चुक की बरोबर?.
सगळे प्रश्न अन्नुत्तरीत राहतात.
त्यामुळे या सगळ्यावरची निरुपणं परिपुर्ण वाटत नाहीत.. अगदी ती कितीही पटली तरी!!

जोशी 'ले''s picture

6 Feb 2014 - 7:12 am | जोशी 'ले'

लेख आवडला !!!

इशा१२३'s picture

6 Feb 2014 - 9:18 am | इशा१२३

दुर्योधन दुर्दैवी खराच.ज्येष्ठ मुलाचा ज्येष्ठ मुलगा असूनही तोच अन्यायी ठरवला गेला अर्थात त्याने वारणावत ते द्यूतापर्यंत अन नंतरही केलेल्या कपटामुळेच.
बाकी इतर पात्रांवरही लेखन होउन जाउ दे!

प्रीत-मोहर's picture

6 Feb 2014 - 10:39 am | प्रीत-मोहर

तसं बघायला गेलं तर महाभारत म्हणजे एक चकवा आहे... प्रत्येक पात्र अनेक वेळा कोड्यात पाडतं.
त्यांना योग्य अयोग्याच्या कसोटीत बसवायचं म्हटलं तर दमछाक होते.

+१०००

मृत्युंजय

बाकीच्या पात्रांवर ही लेख येउद्यात.
द्रौपदीवर लिहिलेली सौ. स्मिता पोतनीस यांनी लिहीलेली कादंबरी नीलांगिनी ही वाचनीयच आहे अस एक निरीक्षण नोंदवते.

मृत्युन्जय's picture

6 Feb 2014 - 11:03 am | मृत्युन्जय

सर्व वाचक आणि प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद.

बर्‍याच जणांना महाभारतातल्या इतर पात्रांवर लिहिलेले वाचण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. आधीच अश्वत्थाम्यावर लिहिलेला एक लेख असीर इथे देत आहे.

http://misalpav.com/node/21275

मधुरा देशपांडे's picture

6 Feb 2014 - 4:55 pm | मधुरा देशपांडे

लेख आवडला

पैसा's picture

8 Feb 2014 - 6:49 pm | पैसा

लेख आवडला रे. मात्र दुर्योधन लहान असताना फक्त भीम खोड्या काढत होता असे नव्हे, तर भीमाला बेशुद्ध करून हातपाय बांधून नदीत टाकायचा उपद्व्याप दुर्योधनाने केलाच होता. म्हणजे भीमाने ताकदीच्या जोरावर खोड्या काढल्या असतील पण दुर्योधनाने स्वभावगत दुष्टपणाने त्याला ठार मारायचा प्रयत्न केला होता. तसेच पांडु हा अभिषिक्त राजा असल्याने त्याच्या मुलांचा गादीवर पहिला हक्क होता असे वाटते. धृतराष्ट्र हा अभिषिक्त राजा होता का विश्वस्त होता याबद्दल कुतुहल आहे.

वर संगळ्यांनी म्हटलच आहे ...लिहीत जा आणि लिंक व्यनी करत जा रे !!

काही विचारवंताना लेखन व्हायचे थांबेना अन मग दर्जेदार धाग्यांकडे दुर्लक्ष नको व्हायला !! ;)

जॅक डनियल्स's picture

10 Feb 2014 - 6:39 am | जॅक डनियल्स

खूप सुंदर आणि मुद्देसूद लिहिले आहे. दुर्योधन जरी काही चांगले केलेले असले तरी "हिस्टरी इज व्रिटन बाय विनर" मुळे ते सगळे झाकोळले गेले असेल.

मृत्युन्जय's picture

11 Feb 2014 - 11:29 am | मृत्युन्जय

आपणा सर्वाच्या वाचन - प्रतिसादांबद्दल अत्यंत आभारी आहे.