अर्थक्षेत्र भाग १ - (शेअर मार्केट मधला पहिला लॉस!)

Primary tabs

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
18 Dec 2013 - 2:10 pm

आमचे एक स्नेही बापट फटाफट जे आज बरीच वर्षे माझे क्लायंट आहेत.फटाफट हे नाव त्यांनि स्वतःच ठेवले आहे. ते आता उत्कृष्ट ट्रेडिंग करतात, पण मला त्यांचा पहिला दिवस आठवतो जेव्हा ते माझ्याकडे आले जरासे चिडून, वैतागून त्यांनी खालील प्रमाणे माझ्याकडे तक्रार दिली

मी सप्टेंबरपासून (२००४ साल) xxx ब्रोकिंगमध्ये ट्रेडिंग सुरु केले, मला ट्रेडिंग बद्दल काहीही माहिती नव्हते, xxxचे मार्केटिंग पर्सनने मला पूर्ण ट्रेनिंग देण्यात येईल असे सांगितले, तसेच त्यांच्याकडील डीलर ट्रेड सांगतील, डीलरने सांगितलेले सुरवातीचे ट्रेडिंग अगदी सुरवातीचे २ आठवडे फायदा झाला नंतर तोटाच होत गेला, आपण कव्हर करू असे म्हणून डीलर ट्रेड करत होता, परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे कि मी गुंतवलेले सर्व पैसे लॉस मध्ये गेलेले आहेत.

  • मी ५००००/- गुंतवले होते, आता फक्त ८०००/- शिल्लक राहिलेले आहेत.
  • मला फार नुकसान झालेले आहे,
  • ह्या संदर्भात काही करता येईल का?
  • तसेच थोडे थोडे करून ट्रेडिंग मधून वसूल करता येईल का?
  • ट्रेडिंग संदर्भातील xxxवर काही कारवाही करता येईल का?

कुणीतरी तुझे नाव सुचवले म्हणून आलोय पण "एक न्हावी दुसर्या न्हाव्याकडून पैसे घेत नाही म्हणतात" ह्या पु.लंच्या उक्ती नुसार तूही शेअर ब्रोकरच पण बघू काय दिवे लावतोस ते ? असे आपल्या कोकणस्थी अनुनासिक आवाजात आणि चष्मा नाकावर ठेऊन चष्म्याच्या फ्रेमच्या वरून मान खाली घालून मला फटाफट विचारते झाले.

वास्तविक हा अनुभव आज तागयात येतोच आहे. वास्तविक त्यांचे कुठे चुकले तर जो विषय अजिबात माहित नाही तिथे संपूर्ण अनोळखी अशा ब्रोकेरच्या मार्केटिंग पर्सनवर संपूर्ण विश्वास ठेऊन त्याच बरोबर त्या डीलरवर सगळी भिस्त ठेऊन ट्रेडिंग सुरु केले.
आता ह्या मंडळींची ओळख करून घेऊ.

१)डीलर्स : जे तुमची ऑर्डर फोनद्वारे स्वीकारतात आणि संगणकाद्वारे एक्झिक्युट करतात. सामान्य भाषेत दुकानदाराकडे असलेले काउंटर सेल्स बॉय किंवा गर्ल्स जी कामे करतात तीच कामे ते करतात.
मी आजपर्यंत कुणीही डिलर (योग्य जाऊ देत सामान्यदेखील)मार्गदर्शन करू शकेल असा पहिला नाही. डीलरला, त्यांचा "माल" विकणे हेच ध्येय असते जेव्हढा जास्त माल विकला जाईल तेव्ह्ढेच जास्त कमिशन ब्रोकरला आणि पगाराच्या किंवा कमिशनमधल्या थोड्या हिश्श्याच्या रुपात, डीलरला स्वतःला पैसे मिळतात. आता तो तुम्हाला कशाला सांगेल हे करू नका हे करा कारण मग कुठलाच ब्रोकर ब्रोकरेज कमवू शकणार नाही.

२) मार्केटिंग पर्सन : हाय-वे वर धाब्याच्या बाहेर जे रखवालदाराच्या वेशात उभे असतात ती लोक आठवून पाहा. त्यांना तुम्हाला आत मिळणारे पदार्थ कोणत्या क़्वालिटीचे मिळतील त्याची खात्री देण्याची जबाबदारी नसते. तो फक्त गाड्याना हात दाखवून थांबवणे एवढेच काम जाणतो. तसेच मार्केटिंग पर्सन तुम्हाला ब्रोकरकडे ढकलतो >तुम्ही वेटर कम डीलरला ऑर्डर देता > तो काहीतरी आणून देतो जे वाईट असू शकते. (इथे तुमचे जे नियम धाब्याला तेच ब्रोकरला लागत नाहीत...वसुलीच्या बाबतीत.)तर हे एक उदाहरण आहे.

मला इथे एक सांगावेसे वाटते की ब्रोकर म्हणून विचार करा. कोणता ब्रोकर हे घेऊ नका ते घेऊ नका सांगेल. रु. २०००/- ला ४०० सुझलोन घेतलेले बरेच आहेत मार्केटमध्ये. आज सुझलोन ९-१० रुपये इतका आहे. (२००८ जानेवारीमध्ये रु.२००० असलेला डिसेम्बरमध्ये ६२/- झाला) तरी ब्रोकरने लोकांना घ्यायला लावला. (ब्रोकरकडून तुम्ही नैतिकता वगैरे अपेक्षित असाल तर मग तुम्ही धंद्यात पडू नये.....पुन्हा ह्याचा अर्थ धंदा म्हंटला कि अनैतीकतेनेच होतो हा कुणीही काढू नये)

पण मुळात ब्रोकर काय करतो ?
तो स्टोक एक्स्चेंजकडून घाऊकमध्ये शेअर्स विकत घेतो आणि तुम्हाला किरकोळ रुपात विकतो असे आपण ढोबळपणाने म्हणू. हा जो माल त्याने घेतला आहे त्याला त्याचे पैसे लगेचच भरावे लागतात आणि ते तुम्हाला त्याच्याकडून माल घेतल्यापासून तिसर्या दिवसापर्यंत अदा करावे लागतात. ह्यावर त्याला ब्रोकरेज तुमच्याकडून मिळते. पण ब्रोकरेज जे कमाल २% पर्यंत अलाउड आहे. (२% कुणीच घेत नाही कारण स्पर्धा)आणि किमान जे ब्रोकरेज(.०३% ते ०.५५%) त्याला मिळते त्यातूनच त्याला स्टाफचा पगार, दिवाळीचा बोनस, गिफ्ट्स,जागेचे भाडे आणि इतर अनेक खर्च तसेच स्वतःचे प्रोफिट मार्जिन एवढ्याचे गणित बसवायचे असते.
तो तुमचा विचार करेल आणि हे नको ते नको करेल तर तो कसा कमवेल. पण त्याचा तुम्हाला लुटण्याचा इरादा नसतो कारण मग तुमचे पैसे संपतील आणि त्याचे रेप्यूटेशन धोक्यात येऊन धंदा बसेल मग इथून पुढे ज्या उचापत्या तो करतो त्या सर्व परत कधी तरी मी मांडीनच.
पण थोडक्यात काय ब्रोकर हा मध्यस्थ आहे तो शेअर मार्केटमधला असुदेत की विवाह जुळवणारा. माहिती तुम्ही काढलीच पाहिजे त्याला पर्याय नाही.

मग शेअर ब्रोकरकडे असणारे चार्टीस्ट काय करतात ? त्यांना ब्रोकर पगार देतात (आणि डिलर, मार्केटिंग पर्सन ह्यांनाही ) त्यामुळे तेही ब्रोकर्चीच टिमकी वाजवतात. जिथे जिथे तुम्हाला घ्यायचा सल्ला दिला जातो तिथे तिथे कुणीतरी तो माल विकत का असतो हा विचारही तुम्ही करत नाही का?
ह्यावर उपाय हा की घ्या-घ्या सांगितल्यावर तुम्ही स्वतः एक निर्णय घेण्या इतपत निष्णात असणे आवश्यक आहे किंवा तुमच्या ओळखीत एखादा (आत्मप्रौढीची संधी साधून म्हणीन की माझ्यासारखा कडक "मास्तरच")योग्य माणूस असला पाहिजे.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

जेपी's picture

18 Dec 2013 - 3:45 pm | जेपी

छान . उपयुक्त माहिती .

विअर्ड विक्स's picture

18 Dec 2013 - 3:46 pm | विअर्ड विक्स

वाचतो आहे... पुलेशु

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Dec 2013 - 1:21 am | लॉरी टांगटूंगकर

पुभाप्र,
वाचत आहे.

ज्ञानव's picture

19 Dec 2013 - 11:01 am | ज्ञानव

तथास्तु, विवी, मंद्या धन्यवाद

साती's picture

21 Dec 2013 - 2:13 pm | साती

लेखमाला मस्तं आहे.
तुमची भाषा छान चुरचुरीत आहे.

गुंतवणूक 'मनीची' मस्तं.

सांश्रय's picture

22 Dec 2013 - 9:19 pm | सांश्रय

छान उपयुक्त असा ट्रेडिंग संदर्भातील लेख, वाचत आहे.

बन्डु's picture

24 Dec 2013 - 2:29 pm | बन्डु

एच डी एफ सी लाईफ ची यंग स्टार पॉलीसी इत्क्यात च बन्द केली. रू. २४०००/- नुकसानीत. :-(
क्रुपया कुणीही यात पडू नका.

एच डी एफ सी लाईफ ची यंग स्टार पॉलीसी इत्क्यात च बन्द केली. रू. २४०००/- नुकसानीत.
कशामुळे ? सविस्तर सान्गा .

प्रसाद१९७१'s picture

24 Dec 2013 - 3:39 pm | प्रसाद१९७१

हे फार बेसिक होते आहे असे नाही का वाटत? ब्रोकर काय करतो, डीपी म्हणजे काय? मला वाटते हे बर्‍याच लोकांना चांगले माहीती असते. गेल्या १० वर्षात सर्व च individual investers ऑनलाईन व्यवहार करतात ( जर करत नसतील तर करावे ).
ज्ञानव जी - ह्याच्या पेक्षा काहीतरी जास्तीची अपेक्षा आहे. तुम्ही दर आठवड्याला एक पोझिशन का नाही सांगत, त्या मागच्या लॉजिक सकट आणि ती कसे करते आहे ते पण बघु. असे केले तर कळेल.

ज्ञानव's picture

24 Dec 2013 - 10:56 pm | ज्ञानव

इथे अपेक्षित नाही. कारण मी स्वतःच म्हंटले आहे की इथे अर्थक्षेत्रातील घडामोडी, माहिती अपेक्षित आहे. तुम्ही म्हणताय की वरील सर्व बर्याच लोकांना माहित आहे पण मला वाटते अजूनही काही जण डीपी मध्ये किती पैसे ठेवावे लागतात किंवा डीपी आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म एकच समजणारे हि आजही आजूबाजूला दिसतात मला. (हा रोजचा अनुभव आहे.) पण एकवेळ ते परवडले काही अर्धवट शहाणे आम्हालाच मूर्ख ठरवतही फिरत असतात हा अनुभव जास्त त्रासदायक असतो.
आणि मी एक ट्रेडिंग लोजीक मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत.... इथे मांडले आहेच.

इथे बर्याच जणांनी आर्थिक विषयांवर काहीतरी सोप्या भाषेत लिहावे असे अपेक्षित आहे. त्यामुळे मी तांत्रिक विश्लेषण किंवा फंडामेंटलबाबत लिहित नाहीये.

ज्ञानव's picture

24 Dec 2013 - 10:59 pm | ज्ञानव

माझ्या ब्लॉग वर मी १ जानेवारी पासून पोझिशन्स द्यायला सुरु करणार आहे.