माझ्या आईला बागकामाची आवड आहे. पण आम्ही तिस-या माळ्यावर राहात असल्याने, तळमजल्यावर जी मंडळी राहतात त्यांनीच बिल्डींगच्या आजुबाजुच्या परिसरात त्यांची(कसं आहे ना लोक झाडांवरही हक्क सांगतात) झाडं लावलेली आहेत. त्यामुळे आईला तिची हौस घरच्या घरीच खिडक्यांत कुंड्या लाऊन भागवावी लागते. किचनमधल्या ('स्वयंपाकघरात' असं म्हणणं आणि लिहीणं दोन्ही वेळखाऊ) खिडकीत एक लांबलचक मोठ्ठी चौकोनी कुंडी आहे. याला आम्ही खख म्हणतो (खताचा खड्डा). इथे भाज्या-फळांची सालं, बिया, उरलेला भात, शिळी पोळी, नासका पाव - थोडक्यात जे जे काही टाकाऊ आणि विघटनशील आहे ते इथल्या मातीत टाकतो. त्याने तीन गोष्टी साध्य होतात. ओला कचरा सुका कचरा आपोआप वेगळा होतो, मातीला पोषक घटक मिळतात, आणि त्या सगळ्यातलं जे काही खाण्यासारखं असतं ते खायला खारी नाहीतर बरेचसे पक्षी येतात (साळुंख्या/क्या(?), कावळे, एक छोटासा जाडा काळा-पांढरा पक्षी, शिंपी, चिमण्या, इ.) ते बघायला मजा येते. तर याच कुंडीत आपोआप जन्म घेतलेली(किंवा कदाचित आईनेही लावली असतील कुणास ठाऊक) आणि आपलं जीवनकार्य पूर्ण करून निघून गेलेली बरीच झाडं आम्ही पाहिली, वाढवली, जपली, इ. एकदा मिरची आली होती, त्यामुळे आमच्या खिडकीत पोपटांचं येणं-जाणं वाढलं होतं. तर एकदा पुदीना आला होता. आम्हाला बरेच महिने घरी पुदीना चटणी फ्री मध्ये मिळत होती. असो. तर अशाच एका रोपट्यामुळे माझ्या(सारख्या) पोपट्याला सुखाचे काही क्षण पुढे वेळोवेळी अनुभवता आले. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून सदर कथा.
ते रोपटं म्हणजे चवळी. चवळीचं रोपटं उगवलं, वाढलं, त्याला शेंगा आल्या. त्या आईने काढल्या, आणि मग ही चवळी आहे हे आम्हाला कळलं. हळूहळू चवळी वाढली. फोफावली. तिची व्याप्ती खिडकीबाहेर लोंबायला लागली. आणि एक दिवस भल्या पहाटे साडे दहा वाजता साखरझोपेतून उठवून आईने मला तिचा हात पोचत नाही म्हणून ओट्यावर चढून बसून शेंगा काढून द्यायला सांगितलं. आळोखे पिळोखे देत मी ओट्यावर चढलो, बाहेर लोंबणारी शेंग शोधली, आणि ती तोडायला हात बाहेर काढला. माझी बोटं त्या शेंगेच्या देठापर्यंत पोहोचलीच होती, एवढ्यात एका मिश्र रंगसंगतीतल्या आकृतीमुळे माझा फोकस ढळला. समोरच्या खिडकीत, स्लिवलेस टॉप आणि पाव चड्डी घालून, केस एका इलॅस्टिक बँडला बांधून खुर्चीवर एक युवती अभ्यास करत बसली होती. मी तिच्याकडे बघतच राहिलो. माझा हात देठावर, बूड खिडकीच्या काचा सरकवतात त्या ट्रॅकवर, आणि पाय ओट्यावर होते. मी तशाच अवस्थेत किती वेळ 'पॉज' होऊन तिच्याकडे बघत बसलो असेन कुणास ठाऊक. माझी उरली सुरली झोप खाडकन् उडाली. खरं तर मी द्विधा मनस्थितीत होतो. तिचा सुंदर मनमोहक चेहरा पाहू, की उघड्या पडलेल्या(ठेवलेल्या... धन्य तो शिंपी) त्या रोमहर्षक पाऊण पायांकडे बघू? माझी नजर स्थिर राहातच नव्हती. सतत वरखाली होत होती.
'सापडली का रे शेंग?'
'अं..? हो... पण हात पोचत नाहीये.'
पण बायकांना धीर नसतो हेच खरं. आई पुढे येऊन बघायला लागली. आता तिला माझा हात पोचलेला दिसेल हे लक्षात आलं आणि मी गपचूप शेंग काढून खाली उतरलो. आई 'थँक्यू' म्हणाली, आणि बाकीच्या सूचना द्यायला लागली. 'जा पटकन दात घासून घे' पासून सुरुवात... मी एरवी कधीही त्या ऐकायला थांबत नाही. मी काय घरातलं कुणीच थांबत नाही. तरी आई न थकता न चूकता त्या सूचना देत असते. बाबा तर तिला, 'कशाला ओट्याशी गप्पा मारत असतेस?' असं नेहमी चिडवतात. असो. तर मी आज तिच्या सूचना ऐकत थांबलो. म्हणजे, असं तिला वाटत होतं. मी माझ्या खिडकीबाहेरचं आणि समोरच्या खिडकीच्या आतलं निसर्गसौंदर्य न्याहाळण्यात दंग होतो. त्या समोरच्या बंगल्यात इतक्या वर्षांत कोणी राहात नव्हतं. गेला महिनाभर तिकडे ठाकठूक चालली होती. ती पूर्ण होऊन सगळं सामसूम झाल्याला आता एखाद आठवडा झाला असेल. म्हणजे ही मंडळी इकडे राहायला येऊन थोडेच दिवस झाले होते तर... चांगलंय.. शेजारच्या काकूंना अख्ख्या सोसायटीची खबर असते, आणि त्या आपणहून ही सगळी माहिती माझ्या आईला पुरवत असतात. आज संध्याकाळी लाँड्रीवाला कपडे न्यायला आला, की या दोघींच्या गप्पा सुरु होतीलच. लक्ष द्यायला हवं.
'काय रे... नुसता असा उभा काय राहिलायस ठोंब्यासारखा??? जा की दात घास आता आणि खायला ये पटकन... मला बाकीचं सुद्धा आवरायचंय.. तुझं ठीक आहे सुट्टी चालू आहे तू झोपतोस बारा वाजेपर्यंत, मी-(पुढचं ओट्याला)'
मग माझ्या किचनातल्या फे-या वाढल्या. माझी उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. त्यामुळे येताजाता पाणी पिण्याचं निमित्त करून मी किचनमध्ये येऊ शकायचो (साहजिकच माझ्या लघुशंकेच्या फे-यासुद्धा वाढल्या). आईला शंका यायची गरज नव्हती. सतत आपलं जरा काही झालं की फ्रीज उघडून बघायची सुद्धा मला सवय होती, तीही वाढली. अगदीच काही नाही तर नुसती लहर आली म्हणून चिमूटभर साखर तोंडात टाकायचं निमित्त करून मी किचनात जायला लागलो. टीव्ही सोडून आईशी गप्पा माराव्याशा वाटायला लागल्या.(आयला किती वेळ अभ्यास करते ही मुलगी. बरं वरचा टॉप रोज बदलायचा, पण पाव चड्डीची लांबी क्वचितच वाढली असेल... उलट मला ती दिवसेंदिवस खुंटत चाल्लीये असंच वाटत होतं.) सुट्टीत काय करावं, वेळ कसा घालवावा हे सुचेना म्हणून कूकिंग शिकायचं असंही मी ठरवलं. शिकलो सुद्धा. आईला किचनच्या ब-याच कामात मदत करायला मी उत्साह दाखवला. आई अर्थात याचा फायदा घेऊन मला नेमकं नको ती (म्हणजे किचनबाहेरची) कामं द्यायची. रात्री आईने आठवण करून द्यायच्या आधीच न चुकता च्यवनप्राश घ्यायलासुद्धा जायला लागलो मी.
शेजारच्या काकूंकडून त्या पावचड्डीवालीच्या अख्ख्या फॅमिलीची कुंडली मिळाली होती. 'मिस्टर सायंटिस्ट आहेत. बायको कोणत्या तरी कॉलेजात प्रिन्सीपॉल आहे. थोरला मुलगा (अरे बापरे!! म्हणजे लागली बूच!! राडा करायची तयारी ठेवा राव) आयआयटीचा स्टुडंट आहे(आयचा घो), तो चेन्नईला असतो (हात्तिच्या!! मग बिन्धास्त!!) आणि (फायनली, सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे,) मुलगी आहे धाकटी. इंजिनिअरिंग करते कुठल्याशा टॉपच्या कॉलेजात (तरीच ती अभ्यास करत असते. आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इंजिनिअरिंगवाल्यांच्या परिक्षा चालू असतात.) शिकते. टॉपर आहे म्हणे तिथली. पण मला तर बाई मुलगी जरा ज्यादाच वाटली. तुम्हाला सांगते हल्लीच्या मुली ना अशाच असतात. फॅशनच्या नावाखाली काय वाट्टेल ते करतात. तरी मी तिच्या आईला सांगितलं की आमच्या सोसायटीतली माणसं काही चांगली नाहीत. नजरा बेकार आहेत एकेकाच्या. तेव्हा मुलीला जरा जपा. ही फॅशन बिशन नंतर कर म्हणावं लग्न झाल्यावर.. तर म्हणते कशी की अहो हेच तर वय आहे ना तिचं फॅशन करायचं. लोक काय बघणारच... आई पण एकदम मॉड आहे बरं का... हा.... एकदम गॉगल बिगल लाऊन बॉबकट वगैरे आणि तुम्हाला गम्मत सांगू का -' पुढचं लॉड्रीवाल्यानं ऐकलं असेल. मला हवं होतं ते सगळं मिळालं.
असाच एकदा रात्री जेवण झाल्यावर मी मुद्दामून पाण्याचा हळूहळू घोट घेत किचनात खिडकीजवळ उभा होतो... ती अजून तिच्या खोलीत आली नव्हती. जेवत असेल. पाणी संपलं. मी पुन्हा घेतलं. पेला तोंडाला लावला, आणि ढँटाढॅण!! तिची एंट्री झाली. आजकाल पाऊण चड्डी घालून येत होती. शेजारच्या काकूंनी दिलेला ढोस तिच्या तथाकथित मॉड आईने मुलीच्या गळी उतरवला असावा. असो. चेहरा तर बुरख्याआड गेला नव्हता ना!! मग!! मी तसाच बघत उभा होतो. ती हातात पेन्सिल धरून तिचं पाठचं टोक तोंडात पकडून कसला तरी विचार करत होती. अचानक तिला काय झालं कुणास ठाऊक!! तिनं झटकन माझ्या दिशेनं बघितलं. मी गांगरलोच. पाणी गटागटा प्यायलो आणि दिवे मालवले. मी दिवे मालवेपर्यंत ती माझ्याच दिशेने बघत असावी असं वाटलं(डोळ्यांच्या कोप-यातून लक्ष ठेवलं होतं मी)... दिवे मालवल्यावर मी बिनधास्त तिच्याकडे बघायला लागलो. ती अजुनही माझ्याच दिशेने बघत होती. तिने तिच्या दोन्ही भुवया उडवल्या, मान हलवली आणि पुन्हा तिनं आपलं डोकं आणि नजर पुस्तकात खुपसली.
क्रमश:
प्रतिक्रिया
5 Dec 2013 - 9:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
पुढे काय झालं?
5 Dec 2013 - 11:04 pm | मुक्त विहारि
असो...
5 Dec 2013 - 11:15 pm | वडापाव
म्हणजे?
5 Dec 2013 - 11:49 pm | मुक्त विहारि
अहो
ते
"असो" तुम्हाला नाही आहे...
6 Dec 2013 - 1:00 pm | वडापाव
ओह... लेट पेटली!!! :D
6 Dec 2013 - 1:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
हे लिहायच्या ऐवजी पुढे काय झाले लिहिले
6 Dec 2013 - 5:59 pm | शिद
बाकी लेख एक्दम झकास आहे... पु.ले.शु... पु.भा.प्र.
5 Dec 2013 - 11:01 pm | भटक्य आणि उनाड
येऊ द्या लवकर..
5 Dec 2013 - 11:59 pm | खटपट्या
क्रमश: बघून जीव भांड्यात पडला हो भांड्यात पडला. काय लिवता राव. एकदम ठाण्याचा गजानन वडापाव.
दुसरा वडापाव लवकर येवूद्या.
6 Dec 2013 - 12:36 am | शशिकांत ओक
यावरून पडोसन सिनेमाची आठवण झाली....
6 Dec 2013 - 2:06 am | आदूबाळ
मला "एक दूजे के लिए" ची आठवण झाली. याचा शेवट सुखांत व्हावा ही इच्छा!
6 Dec 2013 - 4:27 pm | प्यारे१
आता जमलं.
मला पडोसन आठवला पण सायरा बानो आणि पावचड्डी, समीकरण जुळेना!
तुमच्या प्रतिसादामुळं रति आठवली. छानच!
6 Dec 2013 - 12:07 pm | मी_आहे_ना
चांगला जमलाय पहिला भाग, पुभाप्र...
6 Dec 2013 - 12:37 pm | अनिरुद्ध प
पु भा प्र
6 Dec 2013 - 2:11 pm | नगरीनिरंजन
लै भारी सुरुवात!
"रोमहर्षक पाय"!
(तुम्ही 'रोम' नक्की कशाला म्हणता?) :-)
7 Dec 2013 - 7:25 pm | मी पुणेरी
चवळीची शेंग हाताला लागली का?
7 Dec 2013 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर
वाचताय काय मग? त्यांनी लेखात म्हंटलेच आहे. >>>> माझा हात देठावर, बूड खिडकीच्या काचा सरकवतात त्या ट्रॅकवर, आणि पाय ओट्यावर होते.<<<<
8 Dec 2013 - 11:21 am | टवाळ कार्टा
=)) =)) =))
7 Dec 2013 - 7:51 pm | निमिष ध.
पु भा प्र
8 Dec 2013 - 12:24 pm | पैसा
पुढचा भाग कधी?
8 Dec 2013 - 8:36 pm | तुमचा अभिषेक
पावचड्डी चड्डीपाव वाली आली डोळ्यासमोर..
आजकाल बरेच सो कॉल्ड हाईयर मिडलक्लास मॉड आया आपल्या १२-१३ वर्षांच्या मुलींना अश्याच फॅशनमध्ये बघणे पसंद करतात..
असो, उगाच गंभीर वळण नको..
वाचतोय..
8 Dec 2013 - 9:32 pm | प्यारे१
मोठे कपडे धुण्याचा आळस हे एक महत्वाचं कारण 'असावं' =))
खरं खोटं त्यांनाच माहिती. ;)
8 Dec 2013 - 9:33 pm | प्यारे१
मुद्द्याचं राहिलं. चवळीच्या शेंगांचं काय झालं?
8 Dec 2013 - 10:00 pm | वडापाव
त्यातल्या चवळीच्या दाण्यांना दुस-या उसळींत मिसळून आम्ही खाल्लं.
8 Dec 2013 - 10:30 pm | प्यारे१
>>>रिकाम्या पोटी केला भुकेनेहो घाव
>>>जे येती समोरी त्यावरी मारु ताव
अग्रीड. =))