मांडवाखालून !!

सूड's picture
सूड in जनातलं, मनातलं
18 Nov 2013 - 1:09 am

हातातल्या बेसनाच्या लाडवाचा एक घास घेतला असेल तो फोन वाजला. उचलला खरा पण एरवी आपण होऊन कधी फोन न करणार्‍या व्यक्तीचा फोन बघून जरा आश्चर्यानेच कॉल अटेंड केला...
तो,"हं, बोल मामी. काय म्हणत्येस."
पलिकडून, " मी मजेत तुझं कसं काय चाल्लंय. कशी काय झाली टूर."
"झाली बर्‍यापैकी, बाकी काय चाल्लंय."
"बाकी रोजचंच, बरं मी काय म्हणत्ये नोकरीचं तुझं व्यवस्थित चाललंच आहे आता पुढचा काय प्लान?"
"म्हणजे?"
"म्हणजे लग्नाचं वैगरे कसं काय?"
"अजून तरी काहीच विचार नाही, बघू कसं काय होतं ते"
"बरं बघ हं, माझ्या भाचीसाठी..म्हणजे मोठी बहीण आहे कनई तिच्या मुलीसाठी स्थळ शोधणं चाललंय. माझ्या बहिणीनं मागच्या वेळी गणपतीत तू आला होतास तेव्हा तुला पाह्यलं होतं, म्हणली विचारुन बघ काय म्हणतोय. विचार कर जरा. मुलीला मी अगदी तिच्या लहानपणापासनं बघतेय. सगळं नीट सांभाळेलशी आहे"

आता प्रश्न असा होता की या मामीनं मोठ्या मामीसारखा कधी तुसडेपणा केला नव्हता की फटकून वागली नव्हती. एरवी त्याच्या उत्तरासमोर भलेभले गार होत. पण आता काय करावं हे त्याला कळत नव्हतं. हिला दुखवायचंही नाहीये आणि येवढ्यात लग्नाला हो म्हणावं की नाही तोही प्रश्न आहे. फोनवर मामीची कॅसेट चालू असताना हे सगळं गरगर डोळ्यासमोर फिरत होतं. मग लख्ख उजेड पडल्यासारखं झालं!! पत्रिका!! ही जुळली नाही तर नकारही देता येईल आणि कोणाला दुखवल्यासारखंही होणार नाही. पाव्हण्याच्या जोड्यानं विंचू मारल्यासारखं होईल.
त्याचं उत्तर, "बरं, एक काम कर मामी. मुलीची जन्मवेळ, जन्मतारिख आणि जन्मस्थळ पाठव. मी इथं ऑनलाईन पत्रिका चेक करतो."
"आत्ता फोन ठेवते आणि मेसेज पाठवते सगळ्या डिटेल्ससहित. पण मावशीला वैगरे यातलं काही सांगू नको फायनलाईझ झाल्याशिवाय"

फोन डिस्कनेक्ट झाला पण डोक्यात चक्र सुरु झालं होतं. मावशीला का नाही सांगायचं!! आणि येऊन जाऊन ठरवूनच करायचं तर मग ही लपवाछपवी का? ते काही नाही जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना सांगायचा. होकार असो वा नकार घरातल्या मोठ्या माणसांच्या कानावर ही बातमी असायलाच हवी. मेसेजच्या रिंगने हे विचारचक्र थांबलं. मेसेजमधले सगळे डिटेल्स एका साईटवरच्या रिकाम्या जागांमध्ये टाकले आणि 'Show Horoscope' वर क्लिक केलं.

आता हा दुसरा धक्का होता. नक्षत्र मघा, प्रथम चरण इत्यादि इत्यादि...आयला!! म्हणजे पाचेक मिनीटापूर्वी जिथे नकाराला वाव आहे असं वाटत होतं तिथे चक्क छत्तीस गुण जुळतायेत? अष्टमात मंगळ होता, पण मुलगी खरंच चांगली असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला काय हरकत आहे. आता सरळ पुढच्या बोलाचालींसाठी ग्रीन सिग्नल द्यायचा. सगळंच बघत बसलं तर आता जे रखडून राह्यलेत त्यांच्यासारखी आपली गत व्हायची.

सगळे विचार चालू असतानाच फोन लावला.."हं मामी, मी आताच सगळे डिटेल्स चेक केले ऑनलाईन. छत्तीस गुण जुळतायेत. मंगळ आहे मुलीला, पण मुलगी खरंच चांगली असेल तर मी हे सगळं इग्नोर करायला तयार आहे. पन्नास टक्के तरी होकार आहे माझा. बाकी मुलीशी भेटून वैगरे काय ते ठरवेन. तुम्ही मोठी माणसं काय ते बघून घ्या."
"बरं झालं कॉल केलास ते. मी आत्ता बहीणीला कळवते."
"हो, पण माझं स्वतःचं घर वैगरे नाहीये हे माहितीये ना त्यांना? ते सगळं मान्य असेल तरच पुढे बोला म्हणाव."
"ते त्यांना माहित असल्याशिवाय का मी तुला विचारलं?? मुलगीही नोकरी करतेच आहे त्यामुळे तू फार काळजी करू नकोस. सगळं नीट होईल."

आता मात्र खरंच टेंशन आलं होतं. ज्या गोष्टीला अजून अवकाश आहे असं वाटत होतं ती अगदी जवळ येऊन ठेपली होती. सगळ्याच गोष्टी पसंतीप्रमाणे झाल्या तर त्याच्या भाषेत यावर्षीच सगळा 'निक्काल' लागणार होता. दोन तीन मित्रांना फोनाफोनी झाली. अजून मुलीचा फोटो पाह्यला नव्हता. त्यामुळे पुढच्या कॉल्स कडे लक्ष लावून राहणं होतं.

तीनेक दिवसांनी पुन्हा फोन..
"तुझ्या पत्रिकेची स्कॅन कॉपी आणि तुझा फोटो मेल करतोस का?"
"अगं मामी, पण सगळे डिटेल्स तर मी दिले होते. ऑनलाईन पत्रिका बघू शकतात की!! मी नाही का पाह्यली?"
"हो, पण त्यांना स्कॅन्ड कॉपीच हवीये आणि तुझा फोटोही. मुलगी तिचा फोटो नंतर पाठवील. त्यांच्या घरचं नेट गंडलंय."
"ठिकाय, मी उद्या सकाळपर्यंत पाठवतो."

सगळे डिटेल्स त्याने पाठवले. आता पुढला कॉल येईस्तवर निश्चिंती होती. पण त्यांचा होकार आला तर ?? अजून कोणालाच माहिती नाहीये. ते काही नाही, घरात आणखी कोणाला तरी हे माहित असायलाच हवं असं मन ओरडून सांगत होतं.
.
.
.
.
.
.
गुरुवारी सगळे डिटेल्स पाठवलेत, आज रविवार. काही बातमी आलेली नाहीच, पण आता स्वस्थ बसता उपयोगी नाही. आता मात्र सरळ मावशीचं घर गाठलं. अथपासून इतिपर्यंत जे काही घडलं ते सगळं सांगून जरा डोकं आणि मन दोन्ही शांत झाल्यासारखं झालं.चहा वैगरे उरकलाच असेल, तो पुन्हा फोन आला.
"बोल मामी"
"आताच बहिणीचा कॉल आला होता. त्यांनी दाखवली म्हणे एका ज्योतिषाला पत्रिका तुझी. काय तर म्हणे मुलाचा शनि दुर्बळ आहे, हे लग्न तितकंसं चांगलं ठरणार नाही."
"ओक्के, हरकत नाही. बरं झालं लवकर कळवलंस."

मावशी शेजारीच उभी राहून ऐकत होती. त्यामुळे ती समजून गेली. त्याला मात्र नकाराचा शोक मानावा की पुढल्या सगळ्या खर्चाचं आलेलं टेंशन चुटकीसरशी सुटलं याचा आनंद मानावा ते कळत नव्हतं. शेवटी मन म्हणालं अरे आनंदच हा!! मागचा सलग आठवडाभर पुढच्या खर्चाचं प्लानिंग, विचार याच्या बेरीज वजाबाकीत घालवलास त्यातून आता निदान पुढलं स्थळ येईस्तवर सुटका झाली आहे. या सगळ्या विचाराने कुठेतरी त्याचा जीव भांड्यात पडल्यागत झालं. त्याच्या चेहर्‍यावर हसू बघून मावशीच्या कपाळावरच्या आठ्याही गेल्या.

गाडी पुन्हा रुळावर आली होती. दोन तीन दिवस गेले. ऑफिसला जायची तयारी चालूच होती तो पुन्हा मामीच. आता काय नवीन म्हणून कपाळावर आठ्या आणत कॉल अटेंड केला.
"थोडा घोळ झालाय अरे."
"काय झालं?"
"तेच रे मी माझ्या भाचीचं म्हणलं नव्हतं का?"
"ह्म्म, मग?? नक्की काय झालंय?"
"त्याचं काय झालं, त्या लोकांनी ज्या ज्योतिषाकडे पत्रिका दाखवली त्याचे प्रेडिक्शन्स नीट नव्हते रे. ते लोक आता म्हणतायेत. तुमच्या इथं कुणाकडे तरी पत्रिका दाखवून बघा."
"कशाला, मामी?? आता एकदा आलाय ना नकार. मग पुन्हा काय? बरं त्यांना जे काही आधी कोणी सांगितलंय ते त्यांच्या डोक्यातून जाणार आहे का? त्यांच्या मनात या गोष्टी राहणारच ना कुठेतरी. नकार आलाय ना, मग जरा थांबूच. निवांत होऊ दे सगळं."
"तू फारच मनाला लावून घेतलंससं दिसतंय. नकार नव्हताच रे तसा त्यांचा. मी मुलीला फोटो पाठवायला सांगते तुझ्या इमेल आयडीवर आत्ताच. पत्रिकाही दाखवून घ्या तुम्ही लोक."
त्याने काहीही प्रत्युत्तर न करता फोन ठेवला.
नक्की काय चाल्लंय कळत नव्हतं. विचारलं त्यांनी, नकार दिला त्यांनी आणि आता परत होकारही देतायेत?? नक्की माणसं काय म्हणायची ही? आता इतकी डळमळीत आहेत तर नंतर काय करतील हे लोक. आपण शांत बसावं. फॉलो अप करुन वैतागून विषय सोडून देतील.

आठवडाभरानं पुन्हा कॉल.
"काय ठरलं मग?"
"कशाबद्दल?"
"फोटो पाठवला होता की तिनं, पाह्यला नाहीस का?"
"नाही. मी मेल आल्या आल्या ताबडतोब डिलीट केला."
"असं का केलंस?"
"का म्हणजे? मी काय खेळणं आहे का? विचारलं तुम्ही, नकार तुम्ही दिलात, परत होकार देताय. एका दगडावर पाय आहे का नाही? इतके दिवस मान राखायचा म्हणून गप्प बसलो होतो, पण आता हे अति होतंय असं नाही का वाटत? मी नुसत्या बर्थ डिटेल्सवर सगळं शोधलं. मुलीला मंगळ आहे तोही इग्नोर करायची तयारी दाखवली. त्यांचा मात्र माझ्या पत्रिकेच्या स्कॅन्ड कॉपीसाठी, फोटोसाठी आग्रह? कुठल्या युगात वावरताय? मुलीचा फोटो मी मागितला नाही ठीकै, पण घरचं नेट बंद आहे हे कारण कोणाला सांगता? सायबर कॅफे ओस पडलेत का? हे बघ, आता त्यांना म्हणाव आम्हाला घाई नाहीये. निवांत बघू आणि तेवढ्यात जर कोणतं स्थळ आलं मुलीसाठी तर खुश्शाल पुढे जा म्हणाव."
"असं कसं बोलतोस तू? माझ्या भाचीला काय मुलं मिळणार नाहीत की काय?"
"ठीकाय ना!! मला पण हिच्याशिवाय दुसरी मुलगी मिळणार नसल्यासारखं तुमचं वागणं का चाल्लंय?"
पलिकडून फोन डिस्कनेक्ट.
.
.
.
.
.

तीन महिन्यांनी.....
"काय गं? काही कॉल केलेलास का त्याला?"
"मी का करु? माझा अपमान केलाय त्याने?"
"हो, पण लहान आहे. सांभाळून घे ना!"
"वन्सं, तुम्हाला म्हणून सांगत्ये. इतकं चांगलं स्थळ आणलं मी. पण हा माजोरडेपणा म्हणावा की काय? माझी भाच्ची अगदी सोन्यासारखी आहे हो. म्हणे दुसरं स्थळ मिळालं तर शोधा. माझ्या भाच्चीला मुलं मिळणार नाहीत की काय!"
"हो, अगदी गुणाचीच आहे हो तुझी भाची. मला माहित आहेच की सगळं. नकार कळवायला तू त्या रविवारी फोन केलास ना त्याला तेव्हा त्याच्या शेजारीच उभी होते मी."
भावजय तोंडात मारल्यासारखी गप्प बसली.

मौजमजारेखाटनप्रकटन

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

22 Nov 2013 - 11:08 pm | जेनी...

ननि काका तुम्ही जर असा प्रतिसाद दिलात तर धाग्याची शंभरी होइल का सांगा बरं :-/

स्पा's picture

23 Nov 2013 - 7:52 am | स्पा

10 to go

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Nov 2013 - 2:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे

माजल्या आहेत हल्ली मुली....

आता १०९ to go :-)

'हल्ली' ह्या शब्दावर आक्षेप!

आता ???? ;)

जोशी 'ले''s picture

23 Nov 2013 - 3:21 pm | जोशी 'ले'

ये लगा सिक्सर...

परिंदा's picture

23 Nov 2013 - 5:03 pm | परिंदा

पुढचा भाग कधी येणार?