मोनार्क - अंतिम भाग

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
18 Oct 2013 - 8:54 am

मोनार्क - १
मोनार्क - २
मोनार्क - ३
मोनार्क - ४

https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png

केन आणि कॅथीला सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागात अचानक सापडलेली मोनार्क फुलपाखरांची वसाहत हे मोनार्क स्थलांतराच्या अभ्यासातील एक मोठं यश होतं. तरीही उत्तर अमेरिकेमधून हिवाळ्यात अचानक गायब होणारी मोनार्क्स नक्की हीच असावीत का याबद्द्ल प्रश्नचिन्ह कायम होतं. “You must keep searching for more colonies and you MUST find a tag to prove that they are our migrating butterflies from up North – search for a tag, we must find a tag” डॉ. फ्रेड यांच्या या सल्ल्यानुसार कॅथी व केन या परीसरातील मोनार्क्स टॅग करीत होते. सेरो पेलोनच्या आसपासच्या भागात फिरुन टॅग असलेलेली मोनार्क शोधण्याचं कामही जोमात चालू होतं. पण म्हणावं तसं यश अद्याप हाती आलं नव्हतं.

नॅशनल जिओग्राफी सोसायटीच्या मदतीने डॉ. फ्रेड, त्यांच्या पत्नी नोरा व फोटोग्राफर बियांका लाविएस ९ जानेवरी १९७६ ला मेक्सिकोला पोहोचले. सिएरा माद्रेजवळ एका मॉटेलमधे कॅथी व केनला भेटल्यावर स्थानिक वाटाड्याच्या मदतीने त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला. उतारवयात १०००० फूट उंचीवर पोचल्यावर डॉ. फ्रेड व नोरा यांना त्रास जाणवू लागला. परंतु जे स्वप्न दोघांनी संपूर्ण आयुष्य पाहिलं होतं, चाळीस वर्ष त्यासाठी अविरत कष्ट केले होते ते स्वप्न सत्यात पहाण्यासाठी काही पावलं उरली होती. देवदार वृक्षांनी वेढलेल्या घनदाट जंगलात एके ठिकाणी निसरड्या उतारावरुन घसरत खाली जाताच जमिनीवर शांतपणे पसरलेले नारींगी- काळ्या रंगाचे थवेच्या थवे त्यांना दिसले. झाडांवर हजारोंच्या संख्येने गुच्छासारखी बहरलेली, जमिनीवर गालिच्यासारखी पसरलेली, नजर जाईल तिथे मोनार्क पसरली होती. काही दिवसातच वसंत ऋतू सुरु होणार होता आणि हे थवे त्यासोबत उत्तरेकडे प्रयाण करणार होते.

https://lh6.googleusercontent.com/-dNiVmit1qho/UlIcApZet1I/AAAAAAAABh8/cG7DSWoIgfw/w673-h505-no/m4.jpg

आनंदाने सद्गदीत झालेले डॉ. फ्रेड जवळच पडलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर विसावले. मात्र समोर हजारोंच्या संख्येने मोनार्क्स पहात असतांनाच उत्तर अमेरीकेत लाखोंच्या संख्येने टॅग केलेल्या मोनार्क्सपैकी एकही मोनार्क फुलपाखरु या गर्दीत दिसत नव्हतं. त्याचक्षणी एका देवदार वृक्षाची साधारण तीनएक इंचाची, मोनार्क्सनी लगडलेली फांदी अचानक तुटून जमिनीवर कोसळली आणि त्याचबरोबर त्या फांदीवर लगडलेली मोनार्क्स जमिनीवर पसरली. कुतुहलाने डॉ. फ्रेड त्याजागेच्या आसपास असणार्‍या मोनार्क्सचं निरीक्षण करु लागले आणि काय आश्चर्य!! या पसरलेल्या मोनार्कमधे एक मोनार्क फुलपाखरु आपला पांढरा टॅग मिरवरत होतं. विस्मयित झालेल्या डॉ. फ्रेड यांनी लागलीच त्या मोनार्कला उचलून त्यावरील क्रमांक पाहिला. त्या टॅगवर क्रमांक होता - PS 397. दूरवर अमेरिकेतील मिनासोटा राज्यातील चास्का प्रांतातल्या डीन बोयेन व जिम स्ट्रिट या दोन शाळाकरी मुलांनी आपले शिक्षक जिम गिल्बर्ट यांच्या सहाय्याने टॅग केलेलं हे PS 397 या क्रमांकाचं मोनार्क फुलपाखरु किटकशास्त्राच्या इतिहासात अजरामर झालं होतं. वैज्ञानिक संशोधनात नशिबाने आपली खेळी योग्य वेळी खेळली होती.

https://lh6.googleusercontent.com/-p5NDA7RbTnc/UmCRzUW4qkI/AAAAAAAABi4/B-R8l2ATbhU/w539-h358-no/fredmonarch.jpg
(ज्यावेळी डॉ. फ्रेड यांना टॅग केलेलं मोनार्क सापडलं त्याचक्षणी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या छायाचित्रकार बियांका लाविएस यांनी काढलेला फोटो)

पुढील काही दिवस मेक्सिकोतील आपल्या वास्तव्यात डॉ. फ्रेड यांनी नोरा,कॅथी व केन यांच्या सहाय्याने जवळजवळ १०००० मोनार्क फुलपाखरं गुलाबी रंगाच्या लेबलने टॅग केली. कालांतराने उन्हाळा सुरु झाल्यावर एप्रिल महिन्यात यातली दोन फुलपाखरं अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात सापडली. यावरुन सिद्ध करता आलं की हिवाळ्यात उत्तर अमेरिका व कॅनडामधून मेक्सिकोत स्थलांतर करणारी मोनर्क्स उन्हाळा सुरु होताच पुन्हा उत्तरेचा रस्ता पकडतात.

डॉ. फ्रेड व नोरा यांची चाळीस वर्षांची मेहनत सफळ झाली होती. निसर्गाचं एक मोठं गुपित त्यांनी कॅथी व केनच्या सहाय्याने त्यांनी उकललं होतं. १९९८ साली कॅनेडीयन सरकारतर्फे मोनार्क स्थलांताराच्या शोधासाठी डॉ. फ्रेड व नोरा यांना Order of Canada या देशातला दुसर्‍या क्रमांकाच्या सन्मानाने गौरवण्यात आलं. तसचं या शोधाला सरकारकडून “One of the greatest natural history discoveries of our time.” असंही गौरवल गेलं. डॉ. फ्रेड यांच्याच शब्दात सांगायच तर -

“I do not know of any species of insect that has aroused a greater interest among the populace in many parts of the world than the monarch butterfly. One of the great pleasures Norah and I have had in our studies of the monarchs has been receiving letters from children and adults alike, expressing their delight at being introduced to the study of nature through our program of monarch butterfly tagging and research. Studying monarch butterflies has been a source of great happiness for us.” – Fred Urquhart, 1987

नोव्हेंबर २००२ साली डॉ. फ्रेड ऊर्कहट यांनी या जगाचा निरोप घेतला. मोनार्क स्थलांतर संशोधनासाठी काम करणार्‍यांपैकी कॅटलिना (कॅथी) आग्वादो या हयात असून सध्या त्या अमेरीकेतील टेक्सास राज्यात रहातात. २००८ साली युनेस्कोने सरकारने सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागत जिथे हिवाळयात मोनार्क्स वस्ती करतात त्या भागाला वर्ल्ड हेरीट्ज साईट म्हणून घोषित केलं. मेक्सिकन सरकारतर्फे या भागाला विशेष संरक्षण पुरवलं जातं.

मोनार्कचं स्थलांतर -

फुलपाखरांच्या अनेक जाती हिवाळ्यात स्थलांतर करतात. मोनार्क हा त्यातला एक लहान गट. फुलपाखरांच्या इतर जातींमधे एकच पिढी दुहेरी स्थलांतर करते म्हणजेच जी पिढी हिवाळा सुरु होताच स्थलांतर करते तिच पिढी उन्हाळा सुरु होताच परतते. मोनार्क मात्र याला अपवाद. मोनार्कची पहिली पिढी उत्तर अमेरीका खंडातून दक्षिणेला स्थलांतर करते परंतु परततांना त्यांची बहुतेकवेळा चौथी पिढी सुखरुप उत्तरेला पोहोचते. आता मधे तीन पिढ्यांचं अंतर असतानांही मोनार्कच्या पाचव्या पिढीला पुन्हा हिवाळा सुरु होताच दक्षिणेचा प्रवास कसा समजतो हे मात्र अद्याप कोडंच आहे. उत्तर अमेरीका व कॅनडापासून सुरू होणारा दक्षिणेला मेक्सिकोपर्यंतचा हा लांबाचा असा नेत्रदिपक प्रवास हे चिमुकले मोनार्क नक्की कसा करतात ते आता पाहू.

मेक्सिकोपर्यंत पोचणं या इवल्याश्या सोपं नाही. आणि मेक्सिकोला जाणं म्हणजे दक्षिणेच्या दिशेने उडणं नव्हे. मोनार्क्स जर उत्तरेकडून सरळ दक्षिणेला उडत राहिले तर मेक्सिकोला पोचण्याऐवजी थेट मेक्सिकोच्या आखातात पोहोचतील. उत्तरेकडून वेगवेगळ्या भागातून येणारी मोनार्क्स वेगवेगळे मार्ग अवलंबतात. वॉशिंग्टन डी.सी च्या बाजूने येणारी मोनर्क्स अटलंटाजवळ पश्चिमेकडून नैऋत्येला वळतात तर कानसास राज्यातून येणारी मोनार्क्स दक्षिणेकडून नैऋत्येकडे वळतात. स्थलांतराचा मार्ग मोनार्क कसा ठरवतात हे शास्त्रज्ञांना पडलेलं कोडंच आहे. परंतु प्राथमिक माहितीनुसार स्पर्शज्ञानासाठी फुलपाखरांच्या डोक्यावर असलेले दोन अँटेना या कामात मदत करतात. हे अँटेना मेंदूला संदेश पुरवण्याचं काम चोख बजावतात. पण त्याचबरोबर या दूरच्या प्रवासात नशिबाची साथही तितकीच महत्त्वाची असते.

स्थलांतराच्या मार्गातील बेसुमार जंगलतोड व शहरीकरणामुळे मोनार्क्सना अनेक अडथळे टाळावे लागतात. या अडथळ्याच्या शर्यतीत प्रमुख भूमिका बजवतात ती धूर ओकणारी वाहनं, यंत्रांच्या सहाय्याने फवारली जाणारी प्राणघातक रसायनं, जागोजागी दबा धरुन बसलेली कोळ्याची जाळी व पक्षांची हमखास शिकार मोनार्क होतात.

स्थलांतर करतांना मोनार्क्स नेहमीप्रमाणे पंख फडफड्वत उडण्याऐवजी हवेच्या झोताचा वापर करुन तरंगण्याचं तंत्र मोठ्या कौशल्याने वापरतात. सूर्य माथ्यावर येऊ लागल्यावर हवा तापायला लागते. तापलेल्या हवेचं वस्तुमान वाढतं. गरम हवेच्या पट्टयात शिरताच मोनार्क गरुडाप्रमाणे आपले पंख पसरतात व उर्ध्वगामी उडायला सुरवात करतात. एकदा का गरम हवेच्या पट्ट्यात एकदम वरती पोहचलं की मोनार्क्स तरंगायला सुरवात करतात. गरम हवेचा पट्टयाच्या मदतीने मोनार्क्स साधारणपणे १००० फूटपर्यंत प्रवास करु शकतात. दर २०-३० फूटावर २-३ वेळा पंख फडफडवले की पुढच्या गरम हवेच्या पट्टा येईपर्यंत प्रवास सुखकर होतो. अशा प्रकारच्या तरंगण्यामुळे मोनार्क्स उर्जा तर वाचवतातच तसंच त्यांच्या नाजूक पंखांचंही संरक्षण होतं. याचमुळे मेक्सिकोत सुखरुप पोचणार्‍या मोनार्क्सपैकी बरीचशी मोनार्क्स २००० मैलाचा प्रवास करुनही चांगल्या स्थितीत आढळतात.

उत्तर अमेरीका खंडातून दक्षिण अमेरीका खंडात शिरतांनाच क्षणी अचानक बदलेल्या वातावरणाचा व बदललेल्या भौगोलिक रचनेचा सामना मोनार्क्सना करावा लागतो. मैलोन् मैल पसरलेली जंगलं, शेतजमीन , मोठंमोठे तलाव यातून मार्ग काढण्यासाठी मोनर्क्स आपल्या तीक्ष्ण संवेदनांचा वापर करतात. स्थलांतराच्या मार्गात जर मोठा तलाव पार करायचा असेल व हवामान उडण्यासाठी योग्य नसेल तर मोनर्क्स हवामनात योग्य तो बदल होईपर्यंत वाट पहातात. एकदा का मोनार्क्स ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मेक्सिकोत पोहोचले की तेथील डोंगराळ भागातून मार्ग काढत सिएरा माद्रेच्या जंगलातील घनदाट वृक्षांवर येउन विसावतात. एकामागून एक फांदीला चिकटून बनलेल्या मोनार्क्सच्या समूहाला 'कॉलनी' असं संबोधतात. एका एकरात साधारणपणे २५ लाख मोनार्क्स विसावलेली असतात. नोव्हेंबर ते मार्च हिवाळा या ठिकाणी काढल्यावर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मोनार्क्स परतीच्या प्रवासाला लागतात.

मोनार्क्स साधारणणे दिवसाला ३-५ तास उडून ३०-५० मैलाचा प्रवास पूर्ण करतात. स्थलांतराच्या काळात मोनार्क्सचा दिवस काहीसा असा असतो -

  • सकाळी ९ - रात्रभर आराम केल्यावर सकाळच्या कोवळ्या उन्हात मोनार्क्स आसपासच्या फुलांवर मध गोळा करतात.
  • सकाळी १० - तासभर मध खाउन ताजंतवानं झाल्यावर मोनार्क्स पुढच्या प्रवासाला लागतात. थोड्याथोड्या वेळाने १०-१५ मिनीटं भूक लागल्यावर मध गोळा करण्यासाठी व विश्रांतीसाठी अधेमधे विराम घेतला जातो.
  • संध्याकाळी ४:३० - स्थलांतर थांबवून आसपासच्या फुलांवरचा मध गोळा केला जातो.
  • संध्याकाळी ५-५:३० - मोनार्क्स विश्रामासाठी जागा सुरक्षित अशी जागा शोधतात.
  • संध्याकाळी ५:३०- ६:३० - नुकताच गोळा केलेला मध पचवून उर्जा मिळण्यासाठी रक्तात साखर शोषली जाते.
  • संध्याकाळी ७ ते सकाळी ९ - झोप

१९९२ साली डॉ. फ्रेड यांनी निवृत्ती घेतांनाच आपल्या Insect Migration Association या संस्थेला पूर्णविराम दिला. युनिवर्सिटी ऑफ कानसास येथे चिप टायलर यांनी मोनार्क टॅग करण्याची प्रक्रिया आपल्या
MonarchWatch
या संस्थेतर्फे पुन्हा चालू केली. गेल्या वीस वर्षात दहा लाखांहून अधिक मोनार्क्स या संस्थेतर्फे टॅग केली गेली. त्यातली जवळजवळ सोळा हजार मोनार्क्स टॅग केल्यानंतर विविध ठिकाणी सापडली. दरवर्षी Monarch Watch दोन लाख टॅग्ज स्वयंसेवकांना वितरीत करतात. या टॅग्जचं नीट विश्लेषण केलं असता अनेक आश्चर्यजनक गोष्टी पुढे आल्या. शंभर वर्ष वयाची मिशिगनमधे रहाणारी एक बाई जिने डॉ. फ्रेड यांच्या Insect Migration Association या संस्थेसाठी १९५२ स्वयंसेवकाचं काम सुरु केलेलं ती आजही Monarch Watch या संस्थेसाठी काम करुन निरिक्षणं नोंदवते.

https://lh3.googleusercontent.com/-NVwn80-Zogo/UmCSXPDzuKI/AAAAAAAABjE/xau1O7FmhnM/w296-h429-no/natgeo.bmp

(१९७६ साली डॉ. फ्रेड यांनी 'At Last Found - The Monarch's Winter Home' या नावाने नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमधे लेख लिहून पहिल्यांदा मोनार्क स्थलांतराच्य शोधाची कहाणी जगासमोर मांडली. नॅशनल जिओग्रफिक मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील कॅट्लिना आग्वादो यांचं छायाचित्र)

२०१२ साली याच विषयावर अतिशय सुंदर तयार केलेली कॅनेडीयन डॉक्युमेंट्री Flight of the Butterflies न चुकवण्यासारखी आहे. ही एक झलक -

याच फिल्ममधला आधीच्या लेखात उल्लेख केलेला 'एल दिया दे लोस मुएर्तोस' या सणाचा प्रसंग इथे पहाता येईल.

मोनार्क माग्रेशनशी संबधित हा एक -दुवा

संदर्भ :

(१) Monarch Butterflies - Mysterious Travelers By Bianca Lavies
(२) The Incredible Journey of the Butterflies (DVD -2009)
(३) The Monarch Butterfly - International Traveler By Fred Urquhart

(संपूर्ण)
https://lh3.googleusercontent.com/-V5aZEmPOayk/UjfJaqwTZPI/AAAAAAAABeM/nBrR6d-pU-g/w567-h32-no/butterfly+line+divider+R.png

भूगोललेख

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

18 Oct 2013 - 9:29 am | किसन शिंदे

एका वेगळ्याच विषयावर माहीतीपुर्ण लेखमालिका लिहल्यामुळे आपले आभार. वाचनखूण साठवण्यात आली आहे.

_/\_

पद्माक्षी's picture

18 Oct 2013 - 10:48 am | पद्माक्षी

खूपच रन्जक माहिती आणि सूरे़ख ले़खन...

अर्धवटराव's picture

18 Oct 2013 - 9:56 am | अर्धवटराव

मती गुंग होऊन्स जाते. तर्क तोडके पडतात. हा सगळा खटाटोप कशासाठी ? हा प्रश्न अनुत्तरीत राहिल्याची सल मोनार्कच्या सौंदर्याने फार धुवुन निघते. उत्तर एकच... हा सगळा खटाटोप केवळ आनंदासाठी.
फार सुंदर झाली हि लेखमाला.

तुमच्या पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.

प्यारे१'s picture

18 Oct 2013 - 2:53 pm | प्यारे१

+१.
फार सुंदर झाली ही लेखमाला.

>>>हा सगळा खटाटोप केवळ आनंदासाठी.
कदाचित फुलपाखरांना ठाऊक देखील नसेल. पण आम्हाला मात्र निश्चितच आनंद मिळतो आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Oct 2013 - 11:00 am | डॉ सुहास म्हात्रे

एका चिमुकल्या पण वर्षानुवर्षे हजारो किमी प्रवास करणार्‍या सुंदर जीवाची भन्नाट कथा ! ती रोचकपणे प्र्स्तूत केल्याबद्दल तुमचे आभार !

अग्निकोल्हा's picture

18 Oct 2013 - 11:21 am | अग्निकोल्हा

.

विजुभाऊ's picture

18 Oct 2013 - 12:34 pm | विजुभाऊ

सुंदर लेखमाला.
खूप आनंद झाला वाचताना

मुक्त विहारि's picture

18 Oct 2013 - 2:59 pm | मुक्त विहारि

मस्तच

किलमाऊस्की's picture

19 Oct 2013 - 3:49 am | किलमाऊस्की

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!

सगळी लेखमालिका निवांतपणे वाचून काढली. अतिशय आवडली.
माहितीबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

19 Oct 2013 - 7:02 am | सुधीर कांदळकर

संपूर्ण मालिकेने. धन्यवाद.

जॅक डनियल्स's picture

19 Oct 2013 - 8:09 am | जॅक डनियल्स

खूप सुंदर लेखमाला आहे. परवाच माझ्या टेक्सास मधल्या एका मित्राने (अमोल खेडगीकर) त्याच्या बागेतला मोनार्क चा फोटो टाकला. तेंव्हा तुमच्या लेखाची आठवण आली.
मोनार्क

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 10:00 am | मुक्त विहारि

आणि तो मुद्दाम इथे टाकल्या मुळे धन्यवाद...

किलमाऊस्की's picture

20 Oct 2013 - 12:23 am | किलमाऊस्की

इथे आर्वजून टाकल्याबद्द्ल धन्यवाद! आंतरजालावर उपलब्ध असणारे मोनार्कचे बरेचसे फोटो प्रताधिकार्मुक्त नसल्याने लेखात वापरता आले नाहीत. तुमच्याकडे अजून फोटो असतील तर ऩ़क्की टाका इथे.

पैसा's picture

25 Oct 2013 - 7:13 pm | पैसा

इवल्याशा फुलपाखराचा एवढा मोठा प्रवास! थक्क करणारा आहे, आणि त्याचा मागोवा घेणार्‍यांची चिकाटीही! आमच्यापर्यंत आणल्याबद्दल हेमांगी, खूप धन्यवाद! आता पुढची लेखमालिका कधी? ;)

किलमाऊस्की's picture

26 Oct 2013 - 12:47 am | किलमाऊस्की

मन:पूर्वक धन्यवाद. पुढची मालिका पुढच्या वर्षी. :-)

प्यारे१'s picture

26 Oct 2013 - 4:12 am | प्यारे१

आँ????
का वो असं? :)

किलमाऊस्की's picture

27 Oct 2013 - 3:36 am | किलमाऊस्की

पुरेसा वेळ नाही.

एस's picture

26 Oct 2013 - 1:03 am | एस

फुलपाखरे बघितली की जगात अजून सौंदर्य बाकी आहे हे पटतं. तुमचे पुनश्च आभार आणि गूगलून न पाहिल्याबद्दल माझ्या संयमाला माझीच दाद... ;)

किलमाऊस्की's picture

27 Oct 2013 - 3:35 am | किलमाऊस्की

प्रतिसाद आणि न गूगलण्यासाठी :-)

राघवेंद्र's picture

10 Jan 2016 - 7:27 am | राघवेंद्र

आजचे Google Doodle धान्याची संदर्भीत !!!

किलमाऊस्की's picture

11 Jan 2016 - 8:39 pm | किलमाऊस्की

धन्यवाद राघव. Google ने Doodle छान बनवलेलं.

स्रुजा's picture

10 Jan 2016 - 8:11 am | स्रुजा

अरे वा !

पीबीएस वर काही वर्षांपूर्वी मोनार्क्स वर सीरीज पाहिली होती. कॅनडाच्या ग्रेट लेक्स ची सहल आम्ही खास ऑगस्ट महिन्यासाठी राखुन ठेवली आहे. तुझी लेखमाला आता नीट वाचते, सहलीसाठी उपयोग होईल. वाखु पण साठवली आहे.

अरिंजय's picture

11 Jan 2016 - 8:51 am | अरिंजय

मी सर्व भाग वाचले. अप्रतीम लेखन. खिळवुन ठेवलंत.

किलमाऊस्की's picture

11 Jan 2016 - 8:40 pm | किलमाऊस्की

थँक्यू!