हिरा १

साऊ's picture
साऊ in जनातलं, मनातलं
2 Oct 2013 - 9:23 am

दुपट्यातल्या तिला, पाळण्यात घालताना काय विचार करुन तिचं नाव ठेवल गेल असेल देव जाणे, पण त्या नावासारखे तिला अनेक पैलु होते, हे मात्र खरं आणि तो प्रत्येक पैलु पडताना होणार्‍या वेदनाही होत्या.
कधीतरी धुसर बाळपणात, पप्पांच्या माग लागुन शेतावर जाताना, पप्पांनी मध्येच गल्लित थांबुन "हिराबाई, जरा ताईंना बोलवा" अस हाकारलं आणि त्या दगडी जोत्याच्या घरातुन 'आऊ' बाहेर आली. तेंव्हा मी तिला फारस निरखलं नसाव, कारण आठवतय ते फक्त तिच्या अंधार्‍या घरातल्या खिडकीत बसुन खाल्लेला गुळ अन त्या चुलीच्या प्रकाशात चमकणारी तिच्या नाकातली मोरनी!
"या आऊ!" अस पप्पा तिला थोडस आदराने बोलवत. घरात आली की आई तिला पाटावर बसा, किंवा कॉटवर बसा म्हणुन सांगत.
बाई नावासारखी लखलखीत असे. स्वच्छ लुगड, कासोटा सुद्धा अगदी निट असे, उगा बाकिच्या बायकांसारखा पिरगळुन बांधलेला नसे. रंगान किंचित सावळी, पण तो सावळा रंग सुद्धा असा कळकट नव्हता, कोरडा छानसा सावळा. मोठं कपाळ, त्यावर मेणावर छानस रेखलेल कुंकुं. नाकात कायम मोरनी आणि नाकही अगदी बारिक चाफेकळी. पातळ ओठ, छोटीशी हनुवटी. गळ्यात डोरल अन एकसर असायचा. कमरेला केळ्याच्या खाली चांदीची पट्टी आणि पायात मोठ्या मोठ्या मासोळ्या आणि जोडवी.
माझ्या आई पप्पांपेक्षा ती वयान मोठी असावी. मला अगदी स्वच्छ आठवणारी अन मनात ठसलेली 'आऊ' मला नदीवर दिसली होती. प्रत्येक पावलाबरोबर ठेका देणार्‍या तिच्या मासोळ्या तेंव्हा मला खुप आवडल्या होत्या. एव्हढी मोठी असुनही ती अगदी सहज आमच्याशी बोलायची. " काय बाळ ? बर हाय न्हव्हं?" अस तिन विचारल की आपण कोणी तरी मोठ्ठे आहोत अस वाटुन जायच.
आऊ बद्दल लिहिण अतिशय अवघड आहे हे मला माहित आहे कारण निसर्गान दिलेल आणि समाजान लादलेल 'बाईपण' तिच्या इतक झगडुन जगलेली बाई मी पाहिली नाही. पण या सगळ्याच्या पलिकड आऊ एक माणुस होती. माझ्या शब्दांनी तिला कुठेही कमीपणा आलेला मला नको आहे आणि तरीही मला आऊ शब्दात बांधायची आहे, तिच्या प्रखर वास्तवासह!
तिच्या घरात आम्हाला जागा असायची कारण तिच 'घर' वेगळ होत. त्या सुबक बांधिव घरात ती 'वेगळी' रहायची. एकाच खोलीत तिची चुल आणि वावर असे. त्या घरात मुलं नव्हती आणि म्हणुनच आम्हाला तिथे मुभा असे.त्या खोलीतुन बाहेर पडुन दाराला कुलुप लावताना, आत अगदी खळखळुन हसणारी आऊ पूरी बदलायची. तिच्या कपाळाला सुक्ष्मशी आठी पडे. थोडासा राग किंवा तिरस्कार तिच्या नजरेत उतरे. तेव्हढा चार पावलांचा सोपा ओलांडुन बाहेर आल की दोनचार मिनीटात आऊ पुन्हा बदलायची. पुर्ववत व्हायची.
तिच्या त्या घरात मी कधी पुरुषही पाहिला नाही. तिच्या खोलीच्या पलिकडेच आणखी एक घर होत. दोन तिन खोल्या असाव्यात. तिथ एक कुटुंब रहायच. कुटुंब म्हणजे एक बाई अन एक दुपट्यातल बाळ.
असच एकदा कॉलेजला जात असताना नदिवर आऊ भेटली. त्यांचा मळा गावापासुन खुप दुर होता. माझ्या बसस्टॉपच्या निम्म्या वाटेवर तिचा रस्ता वेगळा व्हायचा त्या मुळे तिथवर सोबत ठरलेली. तर त्या दिवशी अशीच अवचित आऊ भेटली. निदान निम्म्या रस्ताभर सोबत म्हणुन मला जरा हायस झालेल. एव्हढ्या सकाळी माणस कामधंदा सोडुन कश्याला तिठ्ठ्याला जातील? बहुतेक मी एकटीच असायचे. तर त्या दिवशी आऊ नदिच्या अलिकडेच भेटली. आम्ही चार पावल चाललो असु नसु एव्हढ्यात धरणावरुन एक पांढर धोतर सदरा घातलेला, मध्यम वयाचा अन आजवर कधिही गावात न पाहिलेला माणुस येत असलेला मी पाहिला. आऊच्या चेहर्‍यावर तिरस्काराची दाट छाया मला अगदी स्पष्ट दिसली. आऊकडे तिरक्या नजरेन छद्मी पहात ती व्यक्ती त्या चिंचोळ्या धरणावरुन आम्हाला पास झाली. त्या सकाळच्या वातावरणात अगदी तुटेपर्यंत ताणलेला ताण अगदी स्पष्ट झणझणत होता. सारा रस्ताभर आऊ नुसती झपझप चालत होती. आजपर्यंत सामान्य, मायाळु आणि 'आऊ' म्हणुन पहात असलेल्या व्यक्तिचा एक नविनच चेहरा मी पहात होते. हळुहळु ती सामान्य नसावी याची जाणिव दाटली ती त्या दिवशी.

क्रमशः

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

2 Oct 2013 - 9:27 am | शिल्पा ब

खूप छोटा भाग झालाय पण छान सुरुवात आहे.

मुक्त विहारि's picture

2 Oct 2013 - 9:53 am | मुक्त विहारि

पु.भा.प्र.

पैसा's picture

2 Oct 2013 - 10:05 am | पैसा

तुमच्या कथा अगदी पकड घेणार्‍या असतात. ही कथा आहे की व्यक्तीचित्रण माहित नाही. पण अगदी मस्त जमलंय.

अनन्न्या's picture

2 Oct 2013 - 11:24 am | अनन्न्या

भाग थोडा मोठा असता तर आऊ आणखी कळली असती असे वाटले. आता पुढचा भाग लवकर येऊ दे.

अग्निकोल्हा's picture

2 Oct 2013 - 4:36 pm | अग्निकोल्हा

.

व्यक्तीचित्रणच आहे पैसाताई. लिहायला थोडा त्रास होतो आहे घरच्य सिस्टमवर म्हणुन छोटा भाग टाकलाय. आज टाक्ते दुसरा अन शेवटचा.
सर्व वाचकांचे आभार.

स्पंदना's picture

3 Oct 2013 - 4:45 am | स्पंदना

दोन्ही भाग वाचले. छान आहे व्यक्तीचित्रण.

पकड घेणारे व्यक्तिचित्रण.
पुढचा भाग वाचत आहे.