भारताची अर्थव्यवस्था: च्यायला, नक्की झालंय तरी काय?

चाणक्य's picture
चाणक्य in जनातलं, मनातलं
8 Sep 2013 - 10:37 pm

गेले काही महिने आपण रोज ढासळणारा रूपया, निर्देशांकात होणारी घट, कमकुवत होत चाललेली भारतीय अर्थव्यवस्था याबद्द्लच्या बातम्या ऐकतो, पाहतो, वाचतो आहोत. त्यातच पंतप्रधानांनी येणारा काळ आपल्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण असेल असे स्पष्टपणे राज्यसभेत सांगितले. अगदी काल परवा पर्यंत 'भारत उद्याची महासत्ता आहे' , 'भारताचे भविष्य कसे उज्वल आहे', 'भारत गुंतवणूकीसाठी कसा योग्य देश आहे' हे जो तो सांगत होता. (अर्थात, देशांतर्गत घडामोडींवर नजर ठेवून असणा-यांना यातला फोलपणा लक्षात आला होता म्हणा) पण मग अचानक आपली अर्थव्यवस्था ईतकी आजारी कशी पडली? बरं याची कारणंही रोज वेगवेगळी ऐकायला येतायत. विरोधक सरकारला दोष देतायत, कॉंग्रेस कधी भाजपला दोष देतीये तर कधी अमेरीकेचे 'QE tapering' (म्हणजे काय ते पुढे बघू) रूपयाच्या घसरणीला कारणीभूत आहे असे म्हणतीये. मधेच चिदंबरम प्रणव मुखर्जींकडे बोट दाखवतायत. काही तज्ञ रुपया अजून खाली जाईल अशी भिती व्यक्त करतायत, काहींच्या मते रुपया त्याच्या मूल्यापेक्षा जास्त खाली घसरलेला आहे, तर काहीजणं म्हणतायत की रूपया ही खरी समस्या नाहीचे. तर मग हे सगळं नक्की काय चालू आहे, काय लफडं आहे, कुठल्या बाबी यामागे असाव्यात आणि मुख्य म्हणजे ईथून पुढे काय करायला हवं हे जरा सोप्या भाषेत मांडण्याचा हा प्रयत्न. वारंवार कानावर पडणा-या काही संज्ञा मुद्दामूनच ईंग्लिश मधे ठेवल्या आहेत म्हणजे समजायला सोपे जाईल. मी काही अर्थतज्ञ नाही त्यामुळे या लिखाणात, विचारात त्रुटी असतीलही; जाणकारांनी आवश्यक त्या सुधारणा केल्या तर आनंद वाटेल. मध्यंतरी चौरांनी यावर एक का.कू. काढला होता तिथेच प्रतिसाद देणार होतो, पण प्रतिसाद बराच लांब व्हायला लागला म्हणून मग वेगळा धागा काढला.

तर या सगळ्याची सुरुवात कधी झाली?
दॄष्य स्वरूपात पहिला हादरा अर्थव्यवस्थेला बसला तो मे महिन्यात अमेरीकेच्या फेडरल बँकेने त्यांचा 'Quantitative Easing Program' हळूहळू आटोपता घेतला जाऊ शकतो असे सांगितले तेव्हा. पण हे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ति कमी झालेल्या एखद्या माणासाला स्वाईन फ्लू च्या साथीत फ्लू व्हावा असे झाले. कारण २००५ पासून आपली अर्थव्यवस्था आजारी पडू लागली होतीच. दरवर्षी वाढणारे Current Account Deficit (CAD) बघितले तर हे सहज लक्षात येइल. (ग्राफ आला नाही तर हे आकडे: २००२: +०.७%, २००३: +१.२%, २००४: +२.३%, २००५: -०.४%, २००६: -१.२%, २००७: -१%, २००८: -१.३%, २००९: -२%, २०१०: - २.९%, २०११: -२.६%, २०१२: -३.६%)

India's CAD

जे Current Account Deficit च्या बाबतीत होत होतं, तेच Fiscal Deficit च्या बाबतीतही होत होतं. पण चर्चा सुरू झाली ती मे महिन्यापासून रुपया घसरू लागला तेव्हा. याची कारणं बघण्याआधी आपण हे 'Quantitative Easing' किंवा 'tapering' काय भानगड आहे ते बघू.

कुठल्याही देशाच्या सरकारला देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास आणि महागाई नियंत्रण ही तारेवरची कसरत करावी लागते. सर्वसाधारणपणे देशाची मध्यवर्ती बँक व्याजदर कमी जास्त करून यातला समतोल साधत असते. कर्जाचे दर कमी केले की बाजारात भांडवलाची उचल वाढते, लोकांना पतपुरवठा होतो, ऊद्योगधंद्याना चालना मिळते आणि विकासाचा दर वाढतो. पण व्याजदर जर फार कमी असेतील तर बाजारात गरजेपेक्षा जास्त पैसा जातो. अश्या वेळी मागणी जास्त आणि हातात खेळणारा पैसाही जास्त यामुळे वस्तूंचे भाव वाढत जातात, म्हणजेच महागाई वाढते. महागाईवर नियंत्रण ठेवायला दर वाढवले की विकासाला खीळ बसते. सन २००८ मधे अमेरीकन अर्थव्यवस्था आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्था मंदीमधे होती. अमेरीकेच्या फेडरल बँकेने दर अत्यंत कमी केले होते तरी अमेरीकन अर्थव्यवस्था जैसे थे होती. बेरोजगारी ही वाढली होती. विकासाला गती देण्याचे पारंपारीक मार्ग जणू संपले होते. मग फेडरल बँकेने (फेड) अपारंपारीक मार्ग अवलंबला. लोकं पैसे खर्च करत नाहीयेत काय? ठीक आहे, आपण त्यांना जास्त पैसे देऊ. हे द्यायचे कसे? तर फेड ने ईतर अमेरीकन बँक व वित्तीय संस्थांकडून अमेरीकन Bonds (रोखे) विकत घ्यायला सुरूवात केली. हे म्हणजे नवीन नोटा छापण्याचाच एक प्रकार आहे. या अपारंपारीक मार्गालाच 'Quantitative Easing' म्हणतात. सन २००-२००१ मधे जपान ने सर्वप्रथम या मार्गाचा अवलंब केला होता. या मार्गामधे, अर्थव्यवस्थेत अपेक्षित गती दिसायला लागली की मध्यवर्ती बँक पूर्वी विकत घेतलेले सरकारी रोखे परत बाजारात विकते आणि मग मिळालेले पैसे write off करते. म्हणजेच पूर्वी अर्थव्यवस्थेचा गाडा ढकलण्यासाठी बाजारात टाकलेले अतिरीक्त चलन परत स्वत:कडे घेऊन नष्ट करते. पण हे वाचायला जितके सोपे वाटते तितके सोपे नसते. कारण गरजेपेक्षा जास्त पैसा बाजारात गेला तर बेसुमार महागाई वाढण्याची शक्यता असते. म्हणजे हे शस्त्र बूमरँग होण्याची शक्यता असते. त्यामुळे किती वेळ हा QE Program चालू ठेवायचा हा कळीचा प्रश्न असतो आणि त्याचे काही नियम असे नाहीत. आता अमेरीकेने २००८ पासून QE चालू केले आणि या वर्षी, म्हणाजे २०१३ ला पहिल्या तिमाहीचे निकाल अर्थव्यवस्थेत जरा हालचाल दाखवू लागले. त्यामुळे हा विकासाचा दर जर असाच चालू राहिला आणि बेरोजगारीचा दरही कमी झाला तर आपण आपला QE Program हळूहळू कमी करत करत पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत बंद करू असे मे महिन्यात मधे फेड ने सांगितले. हे हळूहळू Bonds ची खरेदी कमी करत जाणे म्हणजेच tapering.

पण या सगळ्या गदारोळात झालं काय की अमेरिकन वित्तीय संस्थांकडे मुबलक पैसा आला आणि हा पैसा ०% दरावर होता. त्यातून अमेरीका नुकतीच सब-प्राईम क्रायसिस मधून बाहेर पडत होती, त्यामुळे नागरीक खिसा ढीला करायला तयार नव्हते. साहजिकच वित्तीय संस्थांनी फुकट मिळालेला मुबलक पैसा ईतर विकसीत देशांत गुंतवायला सुरुवात केला. यामुळे २००८ नंतर भारतासारख्या विकसीत देशांमधे डॉलर चा ओघ वाढला. दुस-या विकसीत देशांमधे पैसा गुंतवून जास्त परतावा मिळवणे याला 'Dollar Carry Trade' असे म्हणतात. जोपर्यंत अमेरीका आणि ईतर विकसीत देश यांच्या देशांतर्गत दरांमधे तफावत राहते तोपर्यंत हा Dollar Carry Trade फायद्याचा असतो. आता जर अमेरीकेची अर्थव्यवस्था सुधरू लागली आणि फेड ने त्यांचा QE Program बंद केला तर तिथल्या संस्थांना फुकट मिळणारा पैसा बंद होईल आणि मग साहजिकच तिथले दर वाढतील. फेडचा tapering करण्याचा ईरादा बघता तिथले दर वाढण्याची अटकळ गुंतवणूकदारांनी बांघली आणि पटापट विकसीत देशांमधे गुंतवलेला पैसा काढून घ्यायला सुरुवात केली. आता या संस्थांना मिळणारा परतावा हा 'रुपया' मधे असतो आणि तो त्यांना डॉलर मधे करून घ्यावा लागतो. साहजिकच त्यांनी मिळणारा 'रूपया' विकायला सुरुवात केली. ईतर देशांतही असेच झाले आणि त्यामुळे जागतिक पातळीवर डॉलरची मागणी अचानक वाढली आणि डॉलर वधारू लागला. रूपयाची किंमत घसरू लागली. डॉलरचा हा बाहेर जाणारा ओघ कमी व्हावा म्हणून सरकारने घाईघाईत काही 'reactive measures' घेतले. उदा.- व्यक्तिगत गुंतवणूकदारांनी किती पैसा देशाबाहेर न्यावा यावर मर्यादा आणण्यात आली. पण त्यामुळे झालं काय की गुंतवणूकदार संस्थांमधे 'ऊद्या आपल्यावरही अशी बंधनं लादली जाऊ शकतील' अशी घबराहट पसरली. त्यामुळे त्यांनी अजुन जोराने आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली. परिणामी रुपया अजून घसरला. भारत आपली अर्थव्यवस्था मुक्त करण्याच्या वाटेवरून मागे फिरतोय की काय अशी शंकाही या गुंतवणूकदारांना येऊ लागली. जगभरातल्या गुंतवणूकदारंद्वारे वाचल्या जाणा-या 'Financial Times' सारख्या प्रकाशनांमधे याबद्द्ल छापून आलं आणि मग ही अफवा म्हणा किंवा शंका म्हणा वणव्यासारखी पसरली. चिदंबरम यांना शेवटी निवेदन द्यावं लागलं की भारत जागतिकीकरणाच्या मार्गावरून मागे हटणार नाही. पण हा विश्वास गुंतवणूकदारांना द्यायला त्यांनी ४ आठवडे घेतले.

नक्की समस्या काय आहे? ढासळणारा रुपया की अजून काही?
आपलं खरं दुखणं ढासळणारा रुपया नाही तर कमकुवत होत जाणारी अर्थव्यवस्था आणि त्याहूनही चिंताजनक म्हणजे नेतॄत्त्वाचा अभाव हे आहे. वाढत जाणारे Current Account Deficit, Fiscal Deficit आणि गुंतवणूकदारांचा घटत चाललेला विश्वास याने आपले कंबरडे मोडले आहे. Fiscal Deficit म्हणजे देशाचे उत्त्पन्न आणि खर्च यातला फरक; आणि Current Account Deficit मधे उत्त्पन्न आणि खर्च याबरोबरच देशाने घेतलेली कर्जे, त्यावर द्यावे लागणारे व्याज यांचाही सामावेश होतो. प्रमाणबाहेर असणारे Current Account Deficit आणि Fiscal Deficit, तुम्हाला तुमचे अर्थनियोजन नीट करता येत नाही हे दर्शवतात. आपलं मार्च-२०१२ अखेरीस Current Account Deficit $87.8 Bn (4.8% of GDP) ईतकं होतं. ढोबळमानाने हे 1.5-2% of GDP ईतकं असलं पाहिजे. CAD जर वाढत गेलं तर गुंतवणूकीचा ओघ मंदावतो, सरकारला त्यांच्या खर्चाला कात्री लावावी लागते, पर्यायाने उद्योगधंद्यांचा वेग मंदावतो, बेरोजगारी वाढत जाते आणि हे जर असेच चालू राहिले तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडते. सध्या ग्रीक, स्पेन या देशांवर हीच नामुष्की आलीये आणि जर्मनीच्या एंजेला मर्केल यांनी या देशांना अनावश्यक खर्च बंद केल्याशिवाय आर्थिक मदत मिळणार नाही असा ईशारा दिलाय.
आपलं CAD सन २००४-०५ मधे $2.5 Bn (0.04 % of GDP) ईतकं होतं ते २०१२-१३ ला $87.8 Bn (4.8% of GDP) ईतकं झालं. या वाढीचं एक प्रमुख कारण म्हणजे भारताची सातत्याने होणारी व्यापारी तूट ( Merchandising Trade Deficit). सन २००४-०५ ला ही व्यापारी तूट होती $33.7 Bn (5.5% of GDP) आणि ती २०१२-१३ ला झाली $190 Bn (10.6 % of GDP). सोने आणि तेल (पेट्रोल, डिझेल, गॅस) यांच्या आयातीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ही तूट वाढत गेली. दोन महिन्यांपूर्वी चिदंबरम यांनी भारतीयांनी सोन्याचा मोह टाळा असे आवाहन केले, सोन्यावरील आयतशुल्क वाढवले, सोन्याच्या दागिन्यांवर मिळणारे कर्ज बंद केले ते सोन्याची आयात कमी व्हावी म्हणूनच. नशीब सरकारने पेट्रोल वरील सबसिडी काढली आधीच होती पण हा ही निर्णय फार लवकर घ्यायला हवा होता. कारण भारताच्या आयातबिलात तेलाचा वाटा ३२% ईतका असतो. अजूनही डिझेल deregulate करयचा अवघड निर्णय घ्यायचा आहेच आणि आता निवडणुकींच्या तोंडावर सरकारला तो घ्यावा लागणार आहे. परवा G-20 देशांच्या परिषदेत मनमोहन सिंग यांनी तसे सूतोवाच केले आहे. डिझेल वाढल्यामुळे थोडीफार महागाई वाढणार आहेच पण त्याला काही पर्याय नाही. देशाची अर्थव्यवस्था सावरायला ते करावेच लागणार आहे. रिझर्व बँकेने महागाई आटोक्यात रहावी म्हणून गेल्या काही महिन्यात वेळोवेळी बाजारात हस्तक्षेप केला आहे पण रिझर्व बँकेचीही महागाई च्या बाबतीत जराशी गल्लत झाली आहे. कशी ते पाहू-

साधारणपणे महागाई दर्शविण्यासाठी Consumer Price Index (CPI) हे परिमाण वापरतात. या CPI मधे प्रातिनिधीक अश्या जीवनावश्यक वस्तू व सेवा यांचा सामावेश असतो. CPI प्रमाणेच महागाईचे अजून एक परिमाण असते ते म्हणजे - GDP Deflator. भारताच्या १९८०-२००७ या २८ वर्षांसाठी CPI नुसार महागाई दर ७.६% असा आहे तर GDP Deflator नुसार हाच दर ७.२% आहे. म्हणजे फार फरक नाही, दोन्हीही समप्रमाणात वाढले आहेत. २००७ नंतर मात्र CPI जोमाने वाढलाय. २००७-१२ या ५ वर्षांसाठी CPI नुसार महागाई दर ९.६% आहे पण GDP Deflator नुसार मात्र हा दर ६.८% आहे. Wholesale Price Index (WPI) नुसारही महागाई दर GDP Deflator च्या आसपास आहे. CPI आणि GDP Deflator मधला हा फरक आलाय तो अन्नधान्यांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे. २००७ पासून आपल्या मायबाप सरकारने अन्नधान्यांच्या किमान आधारभूत किमतीत (Minimum Support Price- MSP) भरमसाठ वाढ केलीये, त्याचा परिणाम म्हणजे अन्नधान्यांच्या किमती ३३% पर्यंत वाढल्या आहेत. CPI मधे अन्नधान्य आणि ईतर खाद्यपदार्थां चे ४०-५०% ईतके weightage आहे. आता तर अन्नधान्य सुरक्षा विधेयकामुळे यात अजून वाढ होणार आहे. कारण यासाठी लागणारे धान्य सरकारने खरेदी केल्यावर खुल्या बाजारातली उपलब्धता कमी होणार आहे. आपली सामाजिक वितरण व्यवस्था अत्यंत कुचकामी आहे. २००९-१० मधे सरकारने 42.4 Mn Ton ईतकं धान्य शेतक-यांकडून खरेदी केलं होतं परंतू सामजिक वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्यक्षात नागरिकांना 25.3 Mn Ton ईतकंच धान्य मिळाले. म्हणजेच ४०% पर्यंत गळती. साहजिकच खुल्या बाजारात अन्नधान्यांच्या किमती वाढणार. याचा अजून एक परिणाम (unintended effect) म्हणजे सरकार धान्य विकत घेणार याची खात्री असल्यामुळे शेतकरीही हमीभाव मिळाणारी पिके घेण्यावर भर देणार. परिणामी भाजीपाल्याचे उत्त्पन्न काही अंशी घटण्याची आणि त्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. पण ही केवळ एक शक्यता आहे. (कारण भाजीपाला पिकवणा-या शेतक-याचा profile हा ईतर भरड धान्य पिकवणा-या शेतक-यापेक्षा जरा वेगळा असतो. त्यांची जोखीम घेण्याची क्षमता - risk appetite- जरा जास्त असते.) तर या सगळ्यामुळे असाही एक मतप्रवाह आहे की रिझर्व बँक उगाचच व्याजदर वाढवत चाललीये. सध्या दिसणारा महागाई दर हा सरकारकॄत असून त्याचा बाजारातील घडामोडींशी फारसा संबंध नाही. उलट रिझर्व बँकेच्या या धोरणामुळे विकासाचा दर मंदावलाय.

बर आता झालं ते झालं, पुढे काय?
सरकारचे या सगळ्यावर सध्याचे उपाय बघितले तर साधारण पणे डॉलरचा बाहेर जाणारा ओघ थांबवणे यावर जास्त भर दिसतोय. कारण रुपया सावरायचाय आणि या परकीय गंगाजळीतून CAD भरून काढायचय. परंतू भारताने आपले चलन जागतिक बाजारात मुक्त केले आहे, त्यामुळे त्याला बाजारभावाप्रमाणे वागू द्यायला हवे. त्यातून परकीय गंगाजळीसाठी फक्त संस्थात्मक गुंतवणूकीवर अवलंबून राहता कामा नये कारण त्यांना व्याजही द्यावे लागते. शिवाय आज ना ऊद्या QE बंद होणारच, त्यामुळे हा पैसा CAD भरून काढायला कायमस्वरूपी वापरता येणार नाहिये. ऊद्या काही कारणाने डॉलरचा ओघ परत बाहेर जाऊ लागला तर अवघड होऊन बसेल. त्याऐवजी ऊद्योजकांचा विश्वास वाढेल, ऊद्योगधंद्याला चालना मिळेल असे दीर्घकालीन ऊपाय योजायला हवेत. काय काय करता येइल? यादी पुष्कळ मोठी आहे. उदहरणादाखल विविध अर्थतज्ञांनी सुचवलेले काही उपाय सांगतो - सर्वात आधी म्हणजे अनावश्यक खर्च कमी करणे. सोनिया गांधींच्या हट्टापायी येऊ घातलेल्या अन्नसुरक्षा विधेयकामुळे सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडणार आहे. आधीच वाढलेले Fiscal Deficit यामुळे १-१.५% ने वाढणार आहे. (चिदंबरम म्हणत आहेत की यावर्षी Fiscal Deficit ते वाढू देणार नाहीत. नक्कीच. कारण यावर्षी तरी अन्नधान्य विधेयकाची अमलबजावणी होणार नाही. काँग्रेसचा मुख्य हेतू हे विधायक मंजूर करून घेणे होता आणि ते त्यांनी केले आहे. त्यातून काही राज्यांत अमलबजावणी केली तरी मुळातच यावर्षीच्या अर्थसंकल्पात धान्यानुदानासाठी जास्तीची तरतूद करून ठेवली आहेच. त्यामुळे ईतर काही खर्च कमी करून चिदंबरम नक्कीच Fiscal Deficit आटोक्यात आल्याचे दाखवतील) तसेच तेल, वायु, खते यावरील अनुदाने बंद करणे; रस्ते, वीज, दळणवळण, पाणी-पुरवठा यात क्रांतिकारी सुधारणा घडवून आणणे; परदेशी थेट गुंतवणुकीसाठी प्रतिक्षेत असणारी क्षेत्रे खुली करणे; नवीन धंदा चालू करण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करणे; रेल्वे, खाणकाम यासारखी क्षेत्रे खासगी गुंतवणूकीसाठी खुली करणे; कामगार कायद्यात सुधारणा करणे; GST सारखा सर्व राज्यांना समान असा कर आणणे; न्यायप्रविष्ट असणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे वेगाने निकालात काढणे; निर्यातकर कमी करणे यासारखे बरेच उपाय अपेक्षित आहेत. केंद्राचे उत्त्पन्न वाढावे यासाठी कर प्रणालीत सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे. सध्या भारतातील फक्त ३% जनता कर भरते. हे प्रमाण वाढायला हवे. तसेच अन्नधान्य सुरक्षा कायदा अमलात आणायचा असेल तर आधी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून होणारी गळती थांबवायला हवी. ऊत्तम दर्जाची धान्यगोदामं तयार करून धान्याचे खराब होऊन वाया जाण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे.

मनमोहन सिंग आणि चिदंबरम यासारखे हुशार अर्थतज्ञ महत्त्वाच्या पदांवर असतानाही देशाच्या अर्थव्यवस्थेची ही अवस्था व्हावी हे खरोखर देशाचे दुर्दैव आहे. पण अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. मे महिन्यापासून आत्तापर्यंत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या $200 Bn पैकी फक्त $3 Mn ईतकी गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांचा आणि एकूणच देशी-विदेशी ऊद्योजकांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहिला पाहिजे. केवळ मतांवर डोळा ठेवून पैश्यांची उधळपट्टी करणारे निर्णय घ्यायची ही वेळ नाही. अर्थव्यवस्थेसाठी मुलभूत आणि दीर्घकालीन योग्य असे निर्णय घ्यायची ही वेळ आहे.

अर्थकारणमाहिती

प्रतिक्रिया

जर पेट्रोल, डिजेल, घरगुती वापरायच्या गॅसवरील सबसिडीमुळे अरबोचा तोटा होत होता, तर त्या काढून घेतल्यानंतर नवीन "फुकटच्या" योजना का राबवल्या गेला?

फुकट लॅपटॉप, फुकट टॅबलेट, फुकट मोबाईल, फुकट खाद्य! हे सगळे फुकट देण्यासाठी लागणरा पैसा कोठून येणार ? आधीच अरबो-खरबोची कर्जमाफी देऊन झाली आहे, ५-१०% लोकांनी भरलेल्या टॅक्स मधून हे सगळे निघणार आहे का? आपण म्हणजे देश... याला कुठेतरी सुरक्षेतेची पण गरज आहे. सैन्य आहे, पोलिस व इतर यंत्रणा याला लागणार पैसा? इत्यादि इत्यादी.

सग्ळ्यात महत्वाचे... २००४ नंतर रस्ते व वाहतूक योजनेवरील सर्व काम हळूहळू करत बंद का केले गेले? २००४ नंतर भारतात किती हायवे व रोड याचे नव्याने निर्माण केले गेले?

आजच स्टार न्युजवर दिल्ली शहरावर कार्यक्रम होता, दिल्ली किती ग्रेट शहर झाले आहे यावर.... त्यात सर्वात मोठाभर हा स्थानिक वाहतुक व त्याची सेवा यावर होता... मग तो इतर भारतात का लागू होत नाही?

सोने खरेदी करु नका हे सांगण्यासाठी सोने ७-८ हजारवरून ३० हजार वर येण्याची का वाट पहावी लागली?

अनेक प्रश्न फक्त प्रश्न..

आनंदी गोपाळ's picture

8 Sep 2013 - 11:24 pm | आनंदी गोपाळ

माझ्यावर अवलंबून असलेली १ बायको अन २ पोरे, घरी धुणिभांडी करणारी १ नोकराणी, एक धोबी, एक दूधवाल, एक पेपरवाला, एक किराणा दुकानदार्,प्लस माझा नोकरी धन्दा सांभाळताना चाड्डी सुट्णार्‍यांनी प्रश्न विचारताना १३० कोटीचा देश चालवणारे किती बिनडोक, असा अविर्भाव आणून बोलणे कितपत हुशारीचे?

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Sep 2013 - 10:33 am | llपुण्याचे पेशवेll

अरबो?? का अब्जावधी?
नोकराणी? का मोलकरीण?
मराठीत कामवाल्या बाईला कामवाली बाई, मोलकरीण असेच म्हणतात. मराठी शब्द असतील तर शक्यतो वापरावे. आपल्या वापरानेच टिकतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Sep 2013 - 10:51 am | llपुण्याचे पेशवेll

अवांतर आपला नोकरीधंदा चालवताना चड्डी सुटत असेल तरीही १३० कोटींचा देश चालवणारे मूर्ख बिनडोक असू शकतात. दशाननाशी सहमत आहे. आपल्या देशाच्या इतिहासात १३० कोटीचा नसला तरी ५०-६० कोटीचा देश चालवणार्‍यानी पराकोटीचे चुकीचे निर्णय घेतले आहेत आणि त्याचे दुष्परीणाम देशा आजही भोगतो. असो. मत व्यक्त करणे हा लोकशाहीतला हक्क का काय म्हणतात तो आहे त्यामुळे माझी नाडी सुटत असली तरी समोरचा बिनडोक असू शकतो आणि तो १३० कोटींचा देश चालवणाराही बिनडोक असू शकतो.

आनंदी गोपाळ's picture

14 Sep 2013 - 1:49 pm | आनंदी गोपाळ

ते लक्षात आले.
कारण मी देखिल प्रश्नच विचारला, अन तो माझादेखिल हक्कच आहे. तो हक्क तुमच्याकडून मागितलेला नाही.
दुसरे,
पुण्यात नोकराणी म्हणत नसतील अशी तुमची गैरसमजूत असू शकते, तरीही, अमुकच शब्द शुद्ध मराठी, हे कशावरून, व मराठीचा ठेका तुम्हाला कुणी दिला? हा एक नवा प्रश्न.
धन्यवाद.

आनंदी गोपाळ's picture

14 Sep 2013 - 2:05 pm | आनंदी गोपाळ

अरबो हा शब्द मी कुठे वापरलाय? :-/

प्यारे१'s picture

15 Sep 2013 - 7:22 pm | प्यारे१

गोपाळ साहेब, पु पे नि प्रतिसाद आपल्याला नव्हे तर दशानन ला दिला होता. प्रतिसाद वाकड्या मार्गाने खालखाली येत असतात.

बघा ब्वा!

विजुभाऊ's picture

18 Sep 2013 - 8:39 pm | विजुभाऊ

आजच स्टार न्युजवर दिल्ली शहरावर कार्यक्रम होता, दिल्ली किती ग्रेट शहर झाले आहे यावर.... त्यात सर्वात मोठाभर हा स्थानिक वाहतुक व त्याची सेवा यावर होता... मग तो इतर भारतात का लागू होत नाही?

दशानन काका. दिल्ली ला मिळणारा निधी हा बहुतेक इतर राज्यांनी गोळा करून दिलेला असतो.
दिल्ली जेंव्हा केम्द्रशासीत होते त्यावेळे दिल्लीतील उद्योगाना उत्पादन कर नव्हता. आजही तो अत्यल्प आहे.
सेल्स्टॅक्स नव्हता. देशाची राजधानी म्हणून दिल्लीतील इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च व्हायचा हा तेथील नागरीकानी दिलेल्या पैशातुन नाही तर मुम्बई कलकत्ता , मद्रास , बंगलोर , लुधियाणा या शहरातील / राज्यातील नागरीकानी कष्टकरून सरकारला दिलेल्या टॅक्स मधून मिळवलेल्या पैशातुन होतो. यात गैर काही नाही मात्र दिल्लीच्या विकासाचा ठेंबा मिरवु नये.

आनंदी गोपाळ's picture

8 Sep 2013 - 11:30 pm | आनंदी गोपाळ

केवळ मतांवर डोळा ठेवून पैश्यांची उधळपट्टी करणारे निर्णय घ्यायची ही वेळ नाही. अर्थव्यवस्थेसाठी मुलभूत आणि दीर्घकालीन योग्य असे निर्णय घ्यायची ही वेळ आहे.
<<
चूक.
लाँग टर्म डिसिजन्स सीम स्टुपीड, इन शॉर्ट साईट.
अत्ता इलेक्शन जिंकायचा टाइम आहे. मूलभूत निर्णय बहुमत आल्यानंतर घेतात.
राजकारण अन अर्थ कारण अल्लग आहेत.

राजकारण अन अर्थ कारण अल्लग आहेत.

नक्कीच. अन्नधान्य सुरक्षा विधेयकः राजकारणदॄष्ट्या बरोबर निर्णय. अर्थकारणदॄष्ट्या चूकीचा निर्णय. राजकारण जोपर्यंत अर्थव्यवस्थेला घातक ठरत नाही तोपर्यंत ठीक आहे. पण एरवी कधी न बोलणारे पंतप्रधान बोलू लागलेत, अर्थमंत्र्यांना सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी टाळा असे सांगावे लागते आहे, ऐन निवडणुकींच्या तोंडावर अवघड धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत असे पंतप्रधान म्हणू लागलेत म्हणजे वेळाच्यावेळी अर्थकारण न केल्याने काय वेळ आलीये ते बघा. (ईथे हे स्पष्ट करतो की तुम्ही दशानन यांना म्हणल्याप्रमाणे १३० कोटींचा देश चालवणा-यांना नावे ठेवत नाहीये. सरकारने काही चांगली कामेही केली आहेत, नक्कीच केली आहेत. पण काही निर्णय जेव्हा घ्यायला पाहिजे होते तेव्हा या राजकरणापयीच घेतले गेले नाहीत)

अत्ता इलेक्शन जिंकायचा टाइम आहे. मूलभूत निर्णय बहुमत आल्यानंतर घेतात.

ठीक आहे. पण नवीन सरकार बहुमतातले असो वा आघाडीचे, आत्ता नाही केले तरी नंतर करावेच लागणार आहे हे.

>>पण काही निर्णय जेव्हा घ्यायला पाहिजे होते तेव्हा या राजकरणापयीच घेतले गेले नाहीत

हे सत्य आहे.
विरोधक, किंवा आघडीतले इतर घटक पक्ष यांची समजूत काढता काढताच भरपूर वेळ जात असतो. तरी ही अनेक निर्णय घेतले गेलेत. त्या निर्णयांच्या शहाणपणावर अनेक शंकाही उपस्थित केल्या गेल्यात.

मी म्हटलो, शॉर्ट साईट मधे असे निर्णय चुकीचे दिसतात. उदा. आधार कार्ड.

याचा उपयोग काय? अशा अनेक चर्चा झडून गेल्यात.

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी हे कार्ड आधीच वापरात आलेय, तर कालच DBTL scheme (लिंक : http://www.petroleum.nic.in/dbtl/ ) लागू होण्याबद्दल बातमी आली.

नागपूर, गोंदिया, धुळे व जळगांव जिल्ह्यांत हा पायलट प्रोजेक्ट १.१०.२०१३ पासून सुरू होतोय.
आधार कार्डाच्या बेसिसवर तुमचे बॅंक अकाउंट व गॅसचे खाते एकमेकांशी जोडले जाऊन अपेक्षित सबसिडीची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर जमा होईल, बाजारात गॅस फ़क्त अनसबसिडाईज्ड भावात मिळेल अशी ही स्कीम आहे.
यामुळे चोरून मारून हॉटेलवाले वा ग्यासोट्या गाड्यांसाठी सबसिडीचा ग्यास वापरणे आपोआप बंद होईल, कारण बाजारात स्वस्त/सबसिडाईज्ड गॅस मिळणारच नाही.
बायोमेट्रिकली लिंक्ड अकाउंट्स असल्याने खोटी खाती बनवणे देखिल कठीण जाईल..

आता या डिसिजन्स गुड पॉलिटिक्स आहेत, की बॅड अर्थकारण, की टायमिंग चुकलेय?

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 12:43 pm | अनिरुद्ध प

फक्त कागदावर असते मला स्वताला आलेला अनुभव फार बोलका आहे,जर मला सब्सिडीच्या नऊ बाटल्या मिळावयास हव्या होत्या तेव्हा मला सातच मिळाल्या उर्लेल्या दोन बाटल्या बद्दल विचारले असता त्या मला दिल्यागेल्या अशी माझ्या नावावर नोन्द होती प्रत्यक्षात मी त्याच्यासाठी मागणी सुद्धा केली नव्हती.नाईलाजाने अनसबसिडाईझ बाटल्या (गेस च्या) घ्याव्या लागल्या.

आनंदी गोपाळ's picture

14 Sep 2013 - 2:03 pm | आनंदी गोपाळ

लोकल ग्यास एजंटाने तुमच्या नावाची सब्सिडाईज्ड सिलिंडरे कुणाला तरी ब्लॅकमधे विकलीत असा संशय इथे येण्यास वाव आहे. यात सरकारचा दोष कुठे?
दुसरे म्हणजे या नव्या योजनेतून तो एजंट कुणालाच सब्सिडाईज्ड भावात विकू शकणार नाही. सब्सिडीचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँकेत जमा होणार आहेत. थोडक्यात सरकार भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे चांगले की वाईट?

अनिरुद्ध प's picture

16 Sep 2013 - 8:02 pm | अनिरुद्ध प

सब्सिडाईज्ड भावात विकू शकणार नाही. मी तेच सान्गतोय तो घेताना सब्सिडाईज्ड भावात घेतो पण विकताना मात्र काळ्याबाजारात विकतो,असो हे एक उदाहरण आहे,तसेच सि एन जी नामक गेस जोडणी मात्र मुद्दाम टाळली जात आहे अथवा लाम्बणीवर टाकली जात आहे त्याचे काय?

काळा पहाड's picture

8 Sep 2013 - 11:55 pm | काळा पहाड

रिझर्व बँक उगाचच व्याजदर वाढवत चाललीये

म्हणजे रिझर्व बँकेचं डोकं फिरलंय असं तुमचं मत आहे का? फुकटच्या वाढलेल्या जागांच्या किंमतींचा व स्वस्तात मिळणार्या बँकेंचे कर्जाचा फायदा घेवून तीन चार घरे घेणार्‍या, विकणार्‍या आणि सर्व सामान्यांचे घराचे स्वप्न उधळणार्‍या, फालतू वेळ घालवणार्‍या निकृष्ट दर्जाच्या देशाच्या नालायक नागरीकांच्या गळ्याला फास लावण्यासाठी हे गरजेचं आहे. गरज नसताना मोठ्या मोठ्या गाड्या भर रस्त्याकडेला पार्क करणार्‍या व त्यामुळे ट्रॅफिक जाम करणार्‍या, नदीत गणेश विसर्जन करून प्रदूषण करणार्‍या, काम नसल्यामुळे ढोल वाजवून ध्वनी प्रदूषण करणार्‍या भारतीय नागरीकांची लायकी भीक मागण्याचीच आहे. आणि लवकरच त्यांच्या खर्‍या जागी म्हणजे १९९१ पूर्व स्थितीला भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष घेवून जाईलच. कामचुकार, निर्बुद्ध, जातीयवादी मद्दड भारतीयांना त्यांची खरी किंमत कळणे ही काळाची गरज आहेच.

चाणक्य's picture

9 Sep 2013 - 12:09 am | चाणक्य

असाही एक मतप्रवाह आहे की रिझर्व बँक उगाचच व्याजदर वाढवत चाललीये

चेतनकुलकर्णी_85's picture

9 Sep 2013 - 12:09 am | चेतनकुलकर्णी_85

चायला ,ह्या अर्थशास्त्रात आणि इंजिनीरिंग मध्येच हाच फरक आहे…. ह्या अर्थशास्त्रात काही पक्का असा फोर्मुलाच नसतो म्हणूनच डोक्यावरून जाते………।

इष्टुर फाकडा's picture

9 Sep 2013 - 12:18 am | इष्टुर फाकडा

इष्टुर फाकडा's picture

9 Sep 2013 - 12:20 am | इष्टुर फाकडा

आयला दुवा राहिलाच ! हे बघा

http://www.misalpav.com/node/25494

चौकटराजा's picture

10 Sep 2013 - 9:31 am | चौकटराजा

एक पहिल्यांदाच कबूल करतो मी बी कॉम आहे तो ही बाहेरून परीक्षेला बसलेला. त्यामुळे अमर्त्य सेन यांच्या सारखी माझ्या मागे नोबेलची उपाधी नाही की नरेंद्र जाधव यांच्या सारखी वा मनमोहन यांच्या सारखी डॉ. ही पदवी नाही, पण हे तिघे असूनही " उपेग " काय ? शून्य !
कोणत्याही देशाला आपली अर्थव्यवस्था जागतिक प्रवाहाला संलग्न काही प्रमाणात तरी करावीच लागते. पण ती किती करायची याचे भान नेत्याला असावे लागते. त्यासाठी देशांतर्गत संशीधन व नैसर्गिक साधन सामग्री यांना बरोबर घेऊन उद्योगजकांशी संपर्क साधावा लागतो. उत्पादन ,सेवा व शेती यांच्या अर्थ्व्यवस्थेतील प्रमाणाला काबूत ठेवावे लागते.आपल्या देशात ज्या केमिकल , फिजिकल, लॅब आहेत त्यात किती प्रमाणात मौलिक संशीधन चालते.? आपण जी टूथपिक वापरतो ती देखील आपल्या शास्त्रज्ञानी विकसित केलेली नाही. मग निर्यातीचे सोडाच. पेटंटचे बाजूलाच राहू द्या ! परदेशातून आलेलेच तंत्रज्ञान वापरून इथे उत्पादन होते.त्यात बर्‍याचशा कंपन्या तिकडीलच आहेत. वेनूगोपाल धूत यांच्या सारक्या काहींचा अपवाद आहे. बाकी स्कूटरी मोटारी यात डिझाईनची किती पेटंटस आज भारतीय उद्योजकांकडे आहेत बरे ? हे सारे मूलभूत प्रशन आहेत. सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर अमिताभ बच्चन ई लोकांचे उखळ त्यांच्या कलेने पांढरे झालेले आहे. त्यांचा सामान्य लोकांच्या स्वास्थ्यासाठी काय उपयोग ? कुशल व वेल्पेड कामगार, कल्पक उद्योजक व बुद्धीमान संशीधक हे राष्ट्राला निर्मांण करतात . बाकी संगीत साहित्य ई मधे लाखानी पी एच डी करणारे भारतात काय कमी आहेत ?

चाणक्य's picture

11 Sep 2013 - 5:10 pm | चाणक्य

चौरा, संशोधनाचा मुद्दा बरोबर आहे पण ते अर्थव्यवस्था बिघडायचं मुख्य कारण होऊ शकत नाही.
आणि कलाकारांचा मुद्दा जरा अवांतर आणि अतिशयोक्तीचा वाटला हो. मुळात योग्य मार्गाने पैसा मिळवणा-या , समाजात काही उपद्रव न देणा-या माणसाला 'तुझा सामाजिक स्वास्थ्यासाठी उपयोग काय?' हे का विचारायचं? हा आता टॅक्स चुकवेगिरी वगैरे म्हणत असाल तर ते चुक आहेच. पण आपलं घोडं पेंड खातय ते धोरणात्मक निर्णय घेण्यात दिरंगाई आणि अंमलबजावणीत कुचराई होते तिथे. आता त्याला कारण आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता म्हणा, नेतृत्वाचा अभाव म्हणा किंवा कमकुवत विरोधी पक्ष म्हणा.

दादा कोंडके's picture

11 Sep 2013 - 5:43 pm | दादा कोंडके

मुळात योग्य मार्गाने पैसा मिळवणा-या , समाजात काही उपद्रव न देणा-या माणसाला 'तुझा सामाजिक स्वास्थ्यासाठी उपयोग काय?'

मुळात, माणसांच्या गरजांमध्ये कलेचा नंबर खूप वरती आहे. समाज भौतिकरित्या सूदृढ आहे त्या समाजात कलेला स्थान आहे. तिथेच कलाकाराची कला अप्रिशिएट केली जाते. पण ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे अशी लोकं 'शारूक' च्या पिक्चरसाठी किंवा क्रिकेटसाठी तासन् तास घालवत असतील तर त्यांचे काही शहाण्या माणसांनी कान उपटलेच पाहिजेत. वर "दिवसभर झोपडपरट्ट्यात गटारी शेजारी रहाणार्‍या, कचरा वेचणार्‍या लोकांना करमणूक म्हणून वर्चुअल जगात तरी हिरो-हिरोइन म्हणून स्विझर्लंड मध्ये जाणं ही त्यांची मानसिक गरज आहे" असं म्हणणं म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे.

त्यामुळे वर चौरा म्हणतात त्याप्रमाणे, या शहाण्या नेत्रुत्वाने आत्ता, या घडीला सामाजिक हीत बघत कुण्या सोम्यागोम्याला पद्मश्री किंवा भारतरत्न वाटण्यापेक्षा बदल करून एक उदाहरण म्हणून कचरा विस्थापनाचं काम करणार्‍या, लोकसंख्या नियंत्रणाचं काम करणार्‍या, उपेक्षीत (वेश्यांची मुलं, आदिवासी वगैरे) घटकांसाठी काम करणार्‍या लोकांना वेचून त्यांना भरघोस मदत केली पाहिजे. अश्या पुरस्कारांना मिडिया मध्ये जागा दिली गेली पाहिजे.

अनिरुद्ध प's picture

11 Sep 2013 - 5:52 pm | अनिरुद्ध प

+१

खबो जाप's picture

11 Sep 2013 - 6:15 pm | खबो जाप

+१

चौकटराजा's picture

11 Sep 2013 - 6:08 pm | चौकटराजा

मूलभूत समस्या म्हणून घसरणार्‍याअर्थव्यवस्थेशी संशीधनाचा संबंध लांबूनच आहे पण पेटंटस चा संबंध
अर्थव्यवस्थेशी अगदी खोलवर आहे. कलावंत , खेळाडू, चित्रकार, ई चे महत्व समाजात आहेच पण ते रस्ते, आरोग्य, शिक्षण,
अन्न वस्त्र निवारा, पर्यावरण यांच्या इतके नक्कीच नाही. अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या शेवटच्या टप्प्यात , गाणे बजावणे, क्रीडा
सामने,व्यसने, नाईट क्लब, मोटारींच्या शर्यती सोन्या चांदीचा खच,फटाक्यांची आतशबाजी ई यावयास आमची काहीच हरकत नाही राव !

चौकटराजा's picture

15 Sep 2013 - 4:28 pm | चौकटराजा

कमकुवत नव्हे तर सताधार्‍यानाच सामील झालेला विरोधी पक्ष ! आता भाजप म्हणेल की निवडणुका आल्या म्हणून काही सवंग लोकप्रिय विधेयकांची लाईन लागली आहे. पण राजकीय चाल म्हणून गेल्या ९ वर्षात हीच विधेयके आणंण्याची कल्पकता भाजपाने का दाखविली नाही. त्याना अनेकांची पंचाईत करता आली असती की नाही ? आता सरकारचे शिक्के
वापरून त्याचे श्रेय लाटण्याचा उद्योग मनमोहन सिंग व सोनिया गांधी करीत आहेतच ना ?

ऋषिकेश's picture

12 Sep 2013 - 9:54 am | ऋषिकेश

लेखन आवडले.
अतिशय माहितीपूर्ण आहे.

क्लिंटन's picture

14 Sep 2013 - 6:43 pm | क्लिंटन

लेख आवडला.खूपच चांगला आहे. विशेषत: QE विषयी इतकी मुद्देसूद माहिती मराठीतून तरी मी इतर कुठे वाचली नव्हती.

बाकी मनमोहन सिंह सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये अर्थव्यवस्थेत ना भूतो ना भविष्यति असा गोंधळ घातला आहे हे अगदी समोरच दिसत आहे. याविषयी चौकटराजांच्या चर्चेतील या प्रतिसादात लिहिले आहेच.तेव्हा तेच परत लिहित नाही.

गुंतवणुकदारांचा विश्वास वाढवायची गरज आहे यात काही शंकाच नाही.पण जोपर्यंत व्होडाफोन retroactive taxation केस, निर्णय घेताना होणारी दिरंगाई इत्यादी महत्वाच्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत तसे होणे जरा कठिणच आहे.विशेषत: कोळसा मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालय यांच्यातील रस्सीखेच, NHAI ने रस्ते प्रकल्पांच्या अंमलबजावणी करताना घातलेला घोळ इत्यादी गोष्टी खरोखरच अडचणीच्या आहेत.

मे महिन्यापासून आत्तापर्यंत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या $200 Bn पैकी फक्त $3 Mn ईतकी गुंतवणूक काढून घेतली आहे.

जून महिन्यात FII नी ७ बिलिअन डॉलर काढून घेतले होते. (संदर्भ: http://www.livemint.com/Money/vEVnxqYazq84GVuOc8sJAJ/FIIs-withdraw-72-bn...)

अजून चर्चा रंगल्यास भाग घेईनच.

उपास's picture

15 Sep 2013 - 9:32 am | उपास

नुसते ३ मिलियन काढले असते तर काहीच फरक नाही पण प्रत्यक्षात बरेच पैसे बाहेर पडले, मला वाटतं तो आकडा ७ पेक्षा नक्कीच जास्त आहे. येऊ घातलेली निवडणूक, राजकीय अस्थैर्य, सरकारी इच्छाशक्तिचा अभाव, अन्नसुरक्षा विधेयकाचा सरकारी तिजोरीवर बोजा अशा त्याचवेळी सावरणारी अमेरिकी अर्थव्यवस्था, टेपरींग करत मूळ पदावर यायची फेडची सावध धडपड आणि त्यातून गुंतवणूकदारांना दिलेला विश्वास ह्यामूळे भारताकडून गुंतवणूकीचा ओघ अमेरिकेच्या दिशेने जातोय की काय असं वाटायला लागलय. मला वाटतं ह्याची जाणीव भारताला होतेच आहे त्यामुळेच ओबामाबरोबर अर्थविषयक बोलणी करायला मिटींग आहे मनमोहनसिंगाची येत्या पंधरवड्यात व्हाईट हाऊसवर! भारताने इंटर्नल कंझम्शनवर लक्ष द्यायलाच हवे आता, निर्यातीवर फार विसंबता येणार नाही यापुढे, सगळ्या जगातले लेबर रेटस खालती येतायत विशेषतः विकसित देशांमधले.

सुधीर's picture

15 Sep 2013 - 4:08 pm | सुधीर

गणपतीच्या आठ दिवसांच्या सुट्टीनंतर आवडत्या विषयावर मिपावर चांगला लेख वाचायला मिळाला.

रुपयाच्या घसरणीच्या सुरुवाती नंतर सरकारने आणि आरबीआयने क्विक फिक्स म्हणून काही उपाय केले (बातम्या वाचल्या/ऐकल्या होत्या, स्रोत देणं कठीण आहे). त्यात CAD कमी होण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क वाढवले. २ बिलियन डॉलरची बाँड/ट्रेजरी बिल्स विक्रिस काढायचं ठरवलं (पण त्यासाठी लावलेली बोली फारशी उस्ताहवर्धक नव्हती). चलनाच्य वायदेबाजारात काही कडक अटी आणल्या. FDI साठी सरकारने मध्यंतरी काही नियम शिथिल केले होते. पण नियम शिथील केल्याने FDI ही काही दिवसात वा महिन्यात येणारी गुंतवणूक नव्हे. एकंदर क्विक फिक्सने फारशी मदत झाली नाही.

जीडीपीचे आणि आयआयपीचे आकडे खरचं निराशाजनक आहेत त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला बांधलेली जीडीपीची अटकळ दोघांनीही, सरकार आणि रेटींग एजन्सीजने कमी केली आहे. याला काही जण आरबीआयच्या लिक्विडीटी टायटनींग पॉलिसिला (व्याजाचे दर वाढवण्याला) जबाबदार धरतात. पण आरबीआयने ही स्टेप्स वाढत्या इन्फ्लेशन मुळे घेतली होती. (ज्याचं विवेचन या लेखात चांगलं केलं आहे). पण वाढलेल्या दराने काही प्रमाणात ग्रोथचा बळी शेवटी घेतलाच.

दीर्घकालीन प्रगतीसाठी निर्यातीला चालना देणारे उद्योगधंदे वाढविले गेले पाहिजेत (एक्स्पोर्ट ओरिएंटेड ग्रोथ) असा एक सूर बर्‍याच तज्ञांकडून ऐकायला मिळतो.

येत्या सोमवारी QE tapering वर फेडचा निर्णय कळेलच. शिवाय भविष्यात होवू घातलेल्या निवडणूका आणि पुन्हा त्रिशंकू वा दोलायमान/कमकुवत सरकार स्थापन झालं तर? गुंतवणू़कदार म्हणून सध्याचा आणि येणारा कालावधी बिकट वाटतो. डॉ. रघुराम राजन यांनी कारभार पाहायला सुरुवात केल्यावर आपल्या पहिल्या वाहिल्या भाषणातून काही आशेचा किरण दाखवला खरा पण तो कितपत खरा ठरतो हे काळाच्या उदरात दडलं आहे. काही तज्ञांच्या मते आपण तळ गाठला आहे तर काहींच्या मते तळ अजून गाठला नाही. एकंदरीत मला वाटतं, दिर्घकालीन इक्विटी मार्केट मधल्या सिस्टिमॅटीक गुंतवणूकीच्या संधीची ही चांगली सुरुवात आहे.

ज्ञानव's picture

15 Sep 2013 - 6:14 pm | ज्ञानव

आपण अतिशय उत्तम विवेचन केले आहे.
सोने ३०००० पर्यंत आले कुणामुळे?....सरकार कि नागरिक...
थोडक्यात सरकार किती मूर्ख आणि मी किती बेजबाबदार हा विचारहि करायला हवा इतर देशात नागरिकही जबाबदारीने वागतात हे विसरून चालणार नाही. ३०००० रुपयाला सुद्धा घेणारे आहेत आणि ३२००० झाले तरी घेणारे आहेत...१९२५-३० पर्यंत १००००० होतंय सोने तेव्हाही घेणारे असतीलच कारण १९७९ साली १५० रुपयात मिळत होते तेव्हाही घेणारे होतेच.
उपाय नुसते चिदंबरम किंवा मनमोहन सिंग ह्यांनी नाही आपणही करू शकतो का?
वडील कमावतात उधळतात आणि मी घरात नुसता बसून खातो आणि बाप दारू पितो उधळतो मग घरात पैसा येणार कसा म्हणून आईला (म्हणजेच अर्थव्यवस्थेला) बोल लावण्यात पुरुषार्थ मानतो हे हि लक्षात घ्यायला हवे.
पेट्रोल महाग कोणाला ज्याची गाडी आहे त्याला, सोने महाग कुणाला जो घेण्याची इच्छा आहे पण ऐपत नाही त्याला. माझी गरज गाडी आहे का? सोने का हवे आहे मला गुंतवणूक म्हणून कि मिरवणार म्हणून वगैरे प्रश्न प्रश्न प्रश्न येतात डोक्यात....पण लक्षात कोण घेतो..????

...१९२५-३० ....नाही २०२५-३० वाचावे..

चाणक्य's picture

20 Sep 2013 - 6:50 am | चाणक्य

परवा फेड ने QE Program अजून चालू राहिल असे सांगितले. त्यामुळे सध्याचं गडांतर तरी टळलं असं म्हणायला हरकत नाही. कदाचित तिस-या तिमाहिचे निकाल उत्साहवर्धक मिळाले की फेड tapering चा विचार करेल. बेरोजगारीचा दर Ben Bernake ने म्हणल्याप्रमाणे 6.5% व्हायला निदान 8-10 महिने तरी नक्कीच लागतील...ते ही अमेरिकेचा सध्याचा GDP विकासदर चालू राहिला तर. बाकी चिदंबरमने सुटकेचा निःश्वास टाकला असेल काल.

चाणक्य's picture

19 Dec 2013 - 12:49 pm | चाणक्य

कालच फेड ने घोषणा केलीये की जानेवारी २०१४ पासून टेपरींग सुरु होईल म्हणून. चिंदंबरम म्हणतायत की आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि विशेष काही परीणाम होणार नाही म्हणून. फेड ने २०१४ डिसंबर पर्यंत त्यांचा क्यू.ई. कार्यक्रम पूर्णपणे थांबवणार असे सांगितले आहे . वर्षभराचा कालावधी आहे, त्यामुळे एकदम धक्का बसणार नाही असे वाटते. आज सेन्सेक्स पडलाय पण ते अपेक्षित असावं.