अर्धांग

तिमा's picture
तिमा in जे न देखे रवी...
5 Sep 2013 - 8:11 pm

नोकरीने शोषलेले,
प्रवासाने शिणलेले
ते आमचे अर्धांग,
न्याहाळत असतो मी,
पैलतीरावरुन !

अधुन मधुन ओळख दाखवतं,
सटीसहामाशी,
कधी वाट्याला येतं
चिपाड बनून!

तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत
शोधू लागतो मी काजळमाया
आणि शुष्क ओठांतली
उरली सुरली थरथर
प्रयत्न करुन!

मग जाणवतात
यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे
एक उरकून टाकण्याची भावना
बहुतकरुन!

मुक्तकजीवनमानरेखाटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Sep 2013 - 9:29 pm | पैसा

नोकरी, घरकाम सगळ्याच्या ताणामुळे सगळ्यांचंच असं होत असेल. पण हे ताण कसे दूर करायचे यावर जास्त विचार करायचा! कविता/मुक्तक सुंदरच जमलं आहे!

संजय क्षीरसागर's picture

5 Sep 2013 - 11:50 pm | संजय क्षीरसागर

बायको सुखात तर जिंदगी मजेत. फेक म्हणावं उद्या राजीनामा. हे दिवस पुन्हा येत नाहीत.

तिमा's picture

6 Sep 2013 - 5:23 pm | तिमा

अहो, हे व्यक्तिगत घेऊ नका. नुसता कल्पनाविलास आहे.

संजय क्षीरसागर's picture

6 Sep 2013 - 5:55 pm | संजय क्षीरसागर

माझा एक मस्त प्रतिसाद निष्कारण डिलीट झालयं त्यामुळे डबल दु:ख!

अग्निकोल्हा's picture

15 Sep 2013 - 4:11 pm | अग्निकोल्हा

हे दिवस पुन्हा येत नाहीत.

दिवस येत नाहित मान्य आहे, पण यातुन भलतेच दिवस जातिल त्याचे काय ? तसही बाची, कुटुंबाची वा भारताचि इकॉनॉमी ड्ब्यात घालायला आसुसलेले आपले तत्वज्ञान नेहमीच वाचनारोचक असते.

सुर्व्यांच्या कवितेची आठवण झाली!

संजय क्षीरसागर's picture

6 Sep 2013 - 9:22 am | संजय क्षीरसागर

द्याल का इथे.

जनरल बाज संक्षी. तरी एक दोन नमुने टंकेन वेळ झाला की.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Sep 2013 - 11:05 am | मिसळलेला काव्यप्रेमी

वाह तिमा...

तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत
शोधू लागतो मी काजळमाया
आणि शुष्क ओठांतली
उरली सुरली थरथर
प्रयत्न करुन!

हा कवितेचा कळस आहे... सुंदर शब्दात व्यक्त झालेली व्यथा अजुनच बोचते..

रुमानी's picture

6 Sep 2013 - 12:42 pm | रुमानी

नोकरी आणि संसार अगदी तारेवरचि कसरत अस्ते बायकांन करीता.:(

आतिवास's picture

6 Sep 2013 - 1:11 pm | आतिवास

वाचनीय आणि अर्थपूर्ण.

भावना कल्लोळ's picture

6 Sep 2013 - 5:36 pm | भावना कल्लोळ

वास्तव आहे, पण सध्या काळाची गरज झाली आहे, पण कविता छान जमली आहे.

स्पंदना's picture

12 Sep 2013 - 6:55 am | स्पंदना

नोकरीने शोषलेले,
प्रवासाने शिणलेले
ते आमचे अर्धांग,
न्याहाळत असतो मी,
पैलतीरावरुन !
पहिल्या कडव्यातच केव्हढा तो विरोधाभास तिमा? एकीकडे अर्धांग म्हणता अन पैलतीरावरुन पहाता? (अर्थात कवी) म्हणजे अर्धांग या शब्दाला अर्थच नाही उरला. तुम्ही तुमचा हात पैलतीरावरुन पाहु शकता? पाय? शरीराचा कोणताही अवयव? अगदी डोक्यावरचे केस? पहा बघु पैलतीरावरुन? नाही जमत ना? मग ....जे पुरं तुमच अर्धांग आहे ते तुम्ही जर पैलतीरावरुन पहात असाल तर मग ..ते कवितेते पुढे येणार्‍या शब्दांसारख...उदास..चिपाड...अन व्यवहार साधकच असणार.
अर्धांग...काय सांगाव या शब्दाबद्दल? बोलायची सुद्धा गरज नसणारं ते अर्धांग...मना शरीराची वेदना समजणार ते अर्धांग..आपसुक फुलणार...सोबतीने खुलणार..घासात अडकणार..श्वासात फुलणार...नजरेत भरणार..ते अर्धांग. ते असं पैलतीरावरुन पहाणार्‍यांच्या नशिबात थोडच येणार आहे..जास्तीते जास्त जनाची लाज म्हणुन..समाजाची चौकट म्हणुन तुमच्या घरात एक मोलकरीण म्हणुन राहील ते, वर आणि नोकरी करुन पैसा कमवुन आणुन तुमची आर्थीक गरजही भागवील ते..पण जर तुम्ही पैलतीरावर...तर ते तुमच अर्धांग नाही.

तिमा's picture

12 Sep 2013 - 8:40 pm | तिमा

पैलतीरावरुन चा जो अर्थ तुम्ही लावला आहे तो मला अभिप्रेत नव्हता. जवळ राहूनही, नोकरी करणार्‍या अनेक जोडप्यांना हल्ली रोज बोलायलाही वेळ मिळत नाही. एकाच घरांत राहूनही ती दोघं वेगवेगळ्या ऑर्बिट मधे फिरत असतात. अर्धांगाकडे कोणी फक्त वासनेच्या भावनेतून पहात नाही. पण जवळ राहूनही, जर चार सुखदु:खाच्या गोष्टीही बोलायला मिळत नसतील तर या व्यवस्थेमुळे, फ्रस्ट्रेशन येऊ शकते. ती भावना मांडण्याचा फक्त प्रयत्न केला.घरातील कामे, आर्थिक गरज यापलिकडेही काही अपेक्षा असतात.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

12 Sep 2013 - 7:56 am | चित्रगुप्त

'पैलतीरावरून' हा शब्द मलापण 'आखरला' (इन्दौरी भाषा) होता पण अपर्णाताईंनी त्यातलं नेमक आखरणीयत्व उलगडून दाखवलंय.
कवी वार्धक्यामुळे, वा तथाकथित अध्यात्मिक साधनेमुळे 'पैलतीराला' पहुचला आहे का?

टोकदार वास्तवाची धारदार जाणीव !