वेरूळः भाग ४ (कैलास लेणी २)

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
16 Jun 2013 - 11:25 pm

वेरूळः भाग ४ (कैलास लेणी २)

वेरूळः भाग १ (जैन लेणी)
वेरूळः भाग २ (ब्राह्मणी लेणी)
वेरुळः भाग ३ (कैलास लेणी १)

मागच्या भागात आपण कैलास लेणीमधल्या बाह्यभागातील भित्तीशिल्पे, लंकेश्वर गुहा तसेच यज्ञशाळा आदी भागाची सफर केली आता चला मुख्य कैलास मंदिरात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मंदिर रचना

कैलासाची मांडणी द्राविड पद्धतीची असून बांधीव मंदिरासारखी आहे. मध्यभागी मंदिराचा मंदिराचा चौथरा ठेऊन त्याभोवतालचे पटांगण चारही बाजूंनी खोदून काढले आहे. याच्य पटांगणाच्या बाजूच्या भिंतींवर असलेली लंकेश्वर आणि यज्ञशाळा ही दोन लेणी तसेच प्रवेशद्वारानजीकच्या भिंतीवर कोरलेली शिल्पे आपण मागच्या भागात पाहिली आहेतच.

कैलास एकाश्म मंदिर मध्यभागी असलेल्या उंच जोत्यावर कोरून काढलेले आहे किंबहुना ते वरूनच खोदत आणल्याने आधी कळस सर्वात शेवटी त्याचा जोता अथवा चौथरा खोदला गेला हे म्हणणे जास्त सयुक्तिक व्हावे.

नंदीमंडप, सभामंडप, गूढमंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना. नंदीमंडप हा स्वतंत्र असून तो सभामंडपाला एका सेतूने जोडलेला आहे. सभामंडपात चढून येण्यासाठी सेतूच्या दोन्ही बाजूंनी सोपान आहेत. सभामंडपातूनच गर्भगृहात प्रवेश करता येतो. गाभार्‍याच्या बाजूलाच त्याला फेरी मारण्यासाठी प्रदक्षिणापथ खोदलेला आहेत या प्रदक्षिणापथावरच पाच उपमंदिरे असून सर्वच सालंकृत आहेत. जणू शिवपंचायतनाचीच ही रचना. पण इथे मुख्य मंदिर आणि बाजूची ५ उपमंदिरे अशी एकूण ६ मंदिरे असल्याने ह्याला पंचायतन म्हणता येत नाही. शिवाय ह्या उपमंदिरात एकही मूर्ती दिसत नाहीत अर्थात पूर्वीच्या काळात असलेल्या मूर्ती मूर्तीभंजकांच्या हल्ल्यात नष्ट झाल्या असाव्यात.

कैलासाच्या जोत्यावर सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. जणूकाही अनेक हत्तींनी कैलासाचा हा भव्य डोलारा आपल्या पाठीवर तोलून धरला आहे. हत्तीच्या बरोबर मध्ये मध्ये वाघ, सिंह, सर्प असे अनेक पशूही कोरलेले आहेत. काही वेळा हे पशू हत्तींवर हल्ला करत आहेत तर हत्ती मंदिर तोलून धरलेल्या अवस्थेतसुद्धा त्यांना हुसकावून लावत आहेत. तर या हत्तींच्या मध्येच काही मैथुन शिल्पे, नागराज, काही देवतांच्या मूर्ती सुद्धा कोरलेल्या दिसून येतात.

१. कैलासाची रचना (त्यावरील डोंगरावरून)

a

ही झाली कैलासाची थोडक्यात रचना. त्याचे सविस्तर वर्णन करणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे त्यामुळे इथे थांबून आपण आता कैलासाच्या मुख्य अश्ममंदिरावरील काही प्रमुख शिल्पे पाहूयात.

महायोगी शिव

हे शिल्प नंदीमंडप आणि सभामंडप यांना जोडणार्‍या सेतूच्या खालील दालनात आहे.

कमलासनावर बसलेली योगमुद्रेतील ही भव्य शिवप्रतिमा. हे कमलासन तीन सिंह कोरलेल्या एका सिंहासनावर अधिष्ठित आहे. अष्टभुज शिवाच्या एका हाती कमळ असून मांडीवरील एक हात अभयमुद्रेत आहे. शिवाच्या दोन्ही बाजूंना वादक कोरलेले असून शिवगण बसलेले दाखवले आहेत तर वरील बाजूस इंद्र, यम, वायु, वरूणादिक अष्टदिक्पाल आपल्या हत्ती, रेडा, हरीण, एडका अशा वाहनांवर महायोगी शिवाच्या दर्शनास आलेले आहेत.
महायोगी शिवाची ही प्रतिमा बरीचशी कमलासनावर बसलेल्या बुद्धप्रतिमेसारखीच आहे. बौद्ध लेण्यांकडून ब्राह्मणी लेण्यांकडे स्थित्यंतर होत असताही मूळ शैली तशीच कायम राहिली असल्याचे हे उदाहरणच.

२. महायोगी शिव

ह्या सौम्य मूर्तीच्या अगदी समोरच आहे एक शिवाचे रौद्र स्वरूप दाखवणारे एक भव्य शिल्प, गजासुरवध.

गजासुरवध

दशभुज शिवाच्या उजव्या कोपर्‍यात एक हत्ती दाखवला आहे. एक शिवाने त्याचा एक दात उपटून आपल्या हाती घेतला आहे. तर त्याला संपूर्ण आडवा फाडून त्याच्या कातड्याचेच गजपृष्ठाकार छत शिवाने मस्तकी लावले आहे. गळ्यात नागबंध आणि नरमुंडमाला धारण करणारा शिव एक पाय जमिनीवर तर दुसरा पाय असुरांच्या मस्तकी ठेवून उभा आहे. शिवाच्या पायांच्या बाजूलाच सप्तमातृका बसलेल्या आहेत. त्यांची मस्तके जरी भग्न झालेली असली तरी शेवटची चामुंडा तिच्या भयप्रद चेहर्‍यामुळे सहजच ओळखू येते आहे. शिवाच्या दोन पायांच्या मध्ये भृंगी शिवगणांसह नृत्य करत आहे. तर बाजूलच एक भेदरलेला शिवगण शिवाच्या शेल्याखाली लपून बसला आहे. तर शिवाच्या डाव्या कोपर्‍यात कमलासनावर बसलेल्या पार्वतीच्या हनुवटीवर शिव आपला एक हात टेकवून तिला धीर देत आहे. पार्वतीच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला असलेल्या एका हातावर शिवाने वाडगा धारण केला आहे. जणू काही गजासुरवधानंतर तो आता अंधकासुराच्या वधाची तयारी करत आहे.

३. गजासुरवध

आता ह्या दालनातून बाहेर पडून आम्ही मंदिराच्या डाव्या बाजूस फेरी मारण्यासाठी निघालो. त्याआधी तिथे सभामंडपाकडे जाणार्‍या जिन्याच्या अगदी शेजारीच आहे रावणानुग्रहशिवमूर्ती
ह्या मूर्तीचे वर्णन आपण आधीही पाहिलेले आहेच शिवाय परत पुढे अजून एक सर्वांगसुंदर रावणानुग्रहमूर्तीचे वर्णन येणारच आहे त्यामुळे इथे त्याची माहिती न देता फक्त चित्र देतो.
मूर्तीच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल कोरलेले आहेत.

४. रावणानुग्रहशिवमूर्ती

नंदीमंडपाला लागून असलेल्या डाव्या बाजूच्या भिंतीवर आहे नटराज शिवाची मूर्ती

नटराज शिव

हाती त्रिशूळ, अग्नीज्वाळा, डमरू, वाडगा, नाग आदी धारण केलेला दशभुज शिव नृत्यमुद्रेत आहे. शिवाचे हे दिलखेचच नृत्य पार्वती अगदी मन लावून पाहात आहे. दोन्ही बाजूंना गंधर्वयुगुले हे नृत्य बघायला आलेली आहेत.

५. नटराज शिव

आता मंदिराच्या डावीकडून फेरी मारताना येतो एक भव्य शिल्पपट, महाभारत शिल्पपट

महाभारत शिल्पपट

ह्या शिल्पपटावर विविध थरांत महाभारतातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. ह्या शिल्पपटात एकून सात पट असून प्रत्येक थरांत वेगवेगळे प्रसंग कोरलेले आहेत.

६. संपूर्ण महाभारत शिल्पपट

सर्वात खालच्या दोन पट्ट्यांवरर कृष्णाच्या जीवनातले प्रसंग कोरलेले आहेत. गोकुळातील कृष्ण त्याच्या दोस्तांबरोबर गुरांसहित वृक्षांवर क्रिडा करताना दाखवला आहे, दह्याची टांगलेली हंडी फोडताना, शकटासूर, कंसवध असे विविध प्रसंग येथे कोरलेले आहेत.

७. कृष्णचरित्रातले प्रसंग

नंतरच्या काही थरांमध्ये महाभारतातील काही प्रसंग आहेत. यातील बरेचसे प्रसंग भारतीय युद्धावरचे आहेत. यातील प्रत्येक पटाचे वर्णन करणे खरोखर अशक्य आहे.

६. महाभारतीय युद्धातील प्रसंग

एका थरात अभिमन्युवधाचे दृश्य कोरलेले आहे.
सहा महारथ्यांकडून रथहीन, शस्त्रहीन झालेला अभिमन्यु आता रथाचे चाकच उचलून हल्ला करण्याच्या पवित्र्यात आहे. त्याच्या शरीरात सर्व बाजूंनी बाण घुसलेले आहेत. त्याच्या अगदी शेजारीच खङग आणि ढाल घेऊन दौश्शासनी त्याच्यासवे द्वंद्व करत आहे.

७. अभिमन्युवध

मार्कंडेयानुग्रह

ह्याच्या अगदी जवळच मार्कंडेयानुग्रहाचे भव्य शिल्प आहे. मागच्या भागात हे शिल्प एकदा भेटीस आलेच होते. हे पण जवळपास तसेच पण त्यापेक्षा मोठ्या आकाराचे आणि किंचित वेगळे असे आहे.

पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. शिवलिंगाला कवटाळून बसलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. आपल्या लाडक्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो, तसेच एका हाताने आपला त्रिशुळ त्याच्या छातीत खुपसतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव असेही म्हटले जाते. ह्या शिल्पातला शंकराचा चेहरा किंचित बायकी वळणाचा वाटतो. कदाचित शिवपार्वतीचे एकत्र प्रतिक म्हणून अशी मूर्ती कोरली असावी.

८. मार्कंडेयानुग्रह
a

गजपट्ट

यानंतर आता मंदिराला फेरी मारताना मंदिराच्या सर्व बाजूंना हत्ती, शिंह आदि पशू कोरलेले दिसतात इथून दिसणारी कळसांची रचना अतिशय लक्षवेधी दिसते तसेच मधून मधून काही आगळ्या मूर्ती भेटीस येतात.

९. गजपट्ट

१०. सिंहाचा प्रतिकार करणारे हत्ती

११. शिखरांची मनोवेधी रचना

१२. भव्य शिखरे

१३. छत तोलून धरणार्‍या भारवाहक यक्ष प्रतिमा

आता मंदिराला फेरी मारत आपण पलीकडच्या बाजूला येतो. ही बाजू म्हणजे यज्ञशाळा अथवा सप्तमातॄकागुहेसमोरील मंदिराची बाजू. इथे एक सर्वांगसुंदर आणि तितकेच भव्य असे शिल्प आहे ते म्हणजे रावणानुग्रहाचे.

रावणानुग्रहशिवमूर्ती

रावणानुग्रहशिवमूर्ती वेरूळच्या इतरही बर्‍याच लेणींत खोदलेली आहे. खुद्द इथल्या कैलास एकाश्ममंदिरातही ह्या एकापेक्षा अधिक मूर्ती आहेत. पण इथली मूर्ती सर्वात देखणी आहे.

कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास आला आहे. शिवपार्वतीची क्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो आहे. कैलासाच्या तळास जाऊन आपल्या दहा हातांनी कैलास त्याने उचललेला आहे तर शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरत आहेत. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो.
शिल्पपटात कैलास पर्वत उठावात कोरलेला आहे तर त्याच्या खालच्या भागात खोबणी करून त्यात रावणाचे शिल्प कोरलेले आहे. रावणाची मस्तके सुटी आहेत. कैलास उचलताना रावणाने एक पाय गुडघ्यात मुडपून दुसरा पाय जमिनीवर घट्ट रोविला आहे. आपल्या वीस हातांनी सर्व शक्ती पणास लावून त्याने कैलास अर्धवट उचललेला आहे. इतकी प्रचंड ताकत पणास लावताना साहजिकच रावणाची मान तिरकी झालेली असून कानातले एक कुंडल खांद्यावर टेकलेले आहे तर दुसरे कुंडल हवेत झुलत आहे. कैलास पर्वतावरील घनदाट वनराजी त्यावर झाडे आणि त्यावरील भयभीत मर्कटे कोरून दाखवली आहे. वृक्षराजीच्या वर भयभीत शिवगण तर शेजारी दोन द्वारपाल कोरलेले आहेत. पार्वतीच्या शेजारी असलेली एक दासी पाठमोरी होऊन पळून जात आहे. तर भयभीत पार्वतीला निर्विकार शंकर धीर देत असून एका पायाने कैलास दाबून धरत आहे. आकाशात अष्टदिक्पाल रावणाचे हे गर्वहरण पाहावयास जमले आहेत.

१४. रावणानुग्रहशिवमूर्ती किंवा कैलासोत्थापन

a

१५. रावणाची अचाट ताकत दाखवणारा मुद्राभिनय

a

हे शिल्प पाहून थोडे पुढे जाताच आपण अजून एका भव्य शिल्पपटापाशी येतो. रामायण शिल्पपट

रामायण शिल्पपट

हा शिल्पपट महाभारत शिल्पपटाच्या बरोबर विरूद्ध बाजूस आहे. म्हणजे कैलास मंदिराच्या डाव्या अंगाला महाभारतपट तर उजव्या अंगाला रामायणपट
या शिल्पपटात एकूण आठ थरांत रामायणातील विविध प्रसंग कोरून काढलेले आहेत. हा शिल्पपट उजवीकडून डावीकडे असा सुरु होतो व पुढील थरात तो उजवीकडून डावीकडे विस्तार पावतो व परत तसेच त्यामुळे ह्या शिल्पपटाला एकप्रकारे सलगता आलेली आहे.

१६. रामायणाचा संपूर्ण शिल्पपट
a

आता यातील थर आपण विस्ताराने पाहू

यातील पहिल्या थरांत सीतास्वयंवर ते राम, लक्ष्मण, सीता वनवासाला जातात इथपर्यंतचा कथाभाग आलेला आहे तर अगदी शेवटी निषादराज गुह्यकाच्या नौकेने ते नदी पार करताना दाखवले आहेत. दुसर्‍या थरात रामाशी विवाह करण्याच्या अभिलाषेने आलेल्या शूर्पणखेचे नाक कापतांना लक्ष्मण दाखविला असून नंतर शूर्पणखेने आपले राक्षसी रूप प्रकट केले आहे. त्यापुढे खर-दूषणादी राक्षसांचा वध करतांना दाखविले आहेत. तिसर्‍या थरांत सुवर्णमृग कोरलेला असून त्याशेजारी बसलेली सीता रामाला सुवर्णमृगाचे कातडे आणण्यासाठी पाठवीत आहे. रामाने केलेला सुवर्णमृगाचा वध आणि त्याने रामाच्या आवाजात फोडलेली किंकाळी पाहून लक्ष्मण रामाच्या शोधात निघालेला आहे हे पाहून रावण सीतेला बळजबरीने पळवून नेत आहे. त्यापुढे रथारूढ रावण खाली उतरून जटायूशी युद्ध करतांना दाखवला आहे तर त्याच्या पुढच्या शिल्पामध्ये हनुमानाची राम-लक्ष्मणाबरोबर झालेली पहिली भेट दर्शविली आहे.

१७. पहिले तीन थर
a

ह्या पुढच्या चौथ्या थरात रामाच्या सामर्थ्याविषयी शंकित सुग्रीवाला राम आपले अमोघ बाणसामर्थ्य दाखवतो आहे. सात प्रचंड सालवृक्षांच्या खोडातून एकच बाण तो आरपार मारीतो आहे. ह्याच्या पुढे वाली सुग्रीवाचे द्वंद्वयुद्ध सुरु असून राम पाठीमागून वालीचा वध करतांना दाखवला आहे. राज्यप्राप्तीमुळे संतुष्ट सुग्रीव आता वानरांना सीतेच्या शोधाची आज्ञा देत आहे. ह्या पुढच्या पाचव्या थरांत सीतेच्या शोधात निघालेले वानर दाखवले आहेत. तिथे हनुमान एका योद्ध्याशी युद्ध करताना दाखविला आहे. त्याच्या धारदार नाकावरून हा बहुधा जटायूचा भाऊ संपाती असावा. गैरसमजाचे निराकरण झाल्यावर स्वसामर्थ्याची जाणीव झालेला हनुमान महेन्द्र पर्वतावरून उड्डाण करून समुद्रोल्लंघन करायच्या तयारीत आहे तर त्यापुढे सिंहिका राक्षसीने सावली अडवून पकडलेला हनुमान मोठ्या उशिराने तिचा वध करून पुढे निसटून जात आहे.

१८. चौथा व पाचवा थर
a

यानंतरच्या पाचव्या पट्टीत अशोकवनातील सीता आणि हनुमानाची भेट चित्रित केली आहे व त्यापुढे हनुमान अशोकवाटिकेचा विद्ध्वंस करतांना दाखवला आहे. नंतर हनुमान अआणि इंद्रजिताचे युद्ध आणि त्यानंतर हनुमाना ब्रह्मास्त्राद्वारे बंदिस्त करून रावणापुढे सादर करणे. इथे पुढे मात्र शिल्पकाराने प्रसंग कोरण्यात थोडी गल्लत केलीय. इथे हनुमान रावणापुढे शेपटीच्या वेटोळ्यांनीच आसन तयार करून रावणापुढे बसलेला दाखवलाय वास्तविक हनुमानास येथे बंदीवान केलेले असते. समुद्रपार करून लंकेच्या तीरावर प्रवेश केल्यावर समेटाचा शेवटचा प्रयत्न करून म्हणून राम अंगदाला दूत म्हणून पाठवतो व तिथे दूताला साजेसे आसन न मिळाल्याने अंगद स्वत:च्याच शेपटीचे वेटॉळे करून आसन म्हणून त्याचा उपयोग करतो तो हा मूळ प्रसंग. याच्या पुढे हनुमान लंकेच्या प्रासादांवरून उड्या मारत लंकादहन करताना दाखवला आहे.
यानंतरच्या सहाव्या थरात हनुमान लंका भेटीचा वृत्तांत आणि सीतेचे कुशल श्रीरामाला कथन करताना दाखवला आहे. व त्यापुढे सेतूबंधनाचा प्रसंग कोरलेला आहे. प्रचंड खडक वानरसैनिक वाहोन आणत आहेत. त्यांछ्या भाराने ते वाकलेले आहेत. वाहताना होणारे कष्ट त्यांच्या देहबोलीत पुरेपूर जाणवत आहेत. थकलेल्या वानरांकडून पुढे दगड उचलायला नव्या ताज्या दमाचे वानर थांबलेले आहेत व ते दगड पुढे वाहून समुद्रात टाकत आहेत. समुद्राच्या पुढ्यातच श्रीराम बसलेले आहेत. लाटांचा आभास करून कोरलेला समुद्र अगदी खराखुरा वाटत आहे.

२०. पाचवा आणि सहावा थर

a

यानंतरच्या शेवटच्या थरात उजवीकडून डावीकडे जाता सुरुवातीला कुंभकर्णवधाचा प्रसंग कोरलेला आहे. नंतर वानरसैनिकांचे युद्ध, हनुमंतहस्ते (बहुधा) प्रहस्ताचा वध किंवा रावण- हनुमान द्वंद्व असा प्रसंग साकारला आहे. नंतर बहुधा सीता-श्रीरामाचे मिलन आहे. यात रावणवधाचा प्रसंग मात्र दिसत नाही. या शेवटच्या थरातील मूर्ती बहुतांशी भग्न असल्याने प्रसंग नीटसे ओळखता आले नाहीत. हाच थर डावीकडून उजवीकडे असा पाहिल्यास वानरसैनिकांचे युद्ध, हनुमानाची लढाई व शेवटी रामहस्ते रावणवध असाही वाचता येईल किंबहुना असाच वाचता आल्यावरच ही सर्व प्रसंगमालिका बरोबर जुळते पण मला तरी उजव्या कोपर्‍यातील राक्षसाची मूर्ती तिच्या भव्यतेमुळे कुंभकर्णाचीच अधिक वाटली.

२१. शेवटचा सातवा थर
a

इथे रामायणाचा भव्य शिल्पपट संपतो. कैलास लेणी मंदिराच्या ह्यापुढील भागात रामायणातीलच अजून काही प्रसंग भव्य स्वरूपात कोरलेले आहेत जटायू वध, वालीवध. वास्तविक ही सर्व शिल्पे तसेच यापुढील लिंगोद्भव, लकुलीश शिव आदी शिल्पपटांची थोडक्यात माहिती देऊन मग गाभार्‍यात नेऊन वेरूळ मालिकेचा समारोप करणार होतो पण लक्षात येत आहे मंदिरात अजून बरेच काही आहे, अजून बरेच काही लिहायचे राहिले आहे तेव्हा विस्तारभयास्तव येथेच थांबून पुढच्या भागात वेरूळ मालिकेचा समारोप करेन.

क्रमशः

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

16 Jun 2013 - 11:46 pm | लॉरी टांगटूंगकर

यातल्या बर्याच कथा माहिती नव्हत्या.

कथा+शिल्पे= मेजवानी :)
पुभालटा

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2013 - 12:36 am | अत्रुप्त आत्मा

लै जबरी हो !!! पहिल्याच फोटूमुळे कैलासा'स जाण्याचे प्रचंड ऑफ्सेशन आलेले आहे.

आंम्ही वल्लींबरोबर दोन लेण्या आणी तीन मंदिरांचे,असेच LIVE दर्शन घेतलेले आहे..आज वाचन करताना कल्पनेनी त्याचीच प्रचिती आली. http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif

स्पा's picture

17 Jun 2013 - 9:14 am | स्पा

कहर झालाय हा भाग :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2013 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा...! लेणी उलगडून दाखवावी ती वल्लीनेच. अभिमन्युवध, मार्कंडेयानुग्रह, रावणानुग्रह, रामायण,महाभारतातील कोरलेल्या प्रसंग...छान उलगड्न सांगितले आहेत.

मालक तुस्सी ग्रेट हो...!

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

17 Jun 2013 - 10:30 am | चित्रगुप्त

व्वा...! लेणी उलगडून दाखवावी ती वल्लीनेच... अगदी असेच म्हणतो.
पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2013 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्वा...! लेणी उलगडून दाखवावी ती वल्लीनेच. +११११११

वल्लीसाहेब, तुमच्याबरोबर लेणी आणि विशेषतः कैलास लेणे बघायला मिळावे अशी तीव्र इच्छा झाली आहे !

रुमानी's picture

17 Jun 2013 - 10:24 am | रुमानी

वा क्या बात है ! मस्त.. कालच वेरुळ ला गेले होते. तुमच्या लिखाणाचा लेणी बघताना अतिशय उपयोग झाला इतके दिवस केवळ बघत होतो आत्ता काय कसे आहे ते समजून त्याचा आनंद घेत आला . तुमचा हा धागा आत्ता नवरयाला ही वाचायला सांगितला आहे . :)
धन्यवाद.

पैसा's picture

19 Jun 2013 - 9:06 pm | पैसा

सगळे फोटो आणि वर्णन काय अप्रतिम आलंय! अगदी मीच तिथे जाऊन बघते आहे असा भास झाला, इतके जिवंत फोटो आहेत.

बॅटमॅन's picture

19 Jun 2013 - 10:12 pm | बॅटमॅन

कह्ह्ह्हर झालाय हा भाग!!!!!!!!!!

रामायण & महाभारत शिल्पपट आणि ३डी रावण हे लैच्च्च्च जबरी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

साला, लेणी उलगडावीत तर वल्लीनेच. बिरुटेसरांशी खंप्लीट सहमत!!!!!!

"मिठाई करण्यापेक्षा हलवायाशी मैतरकी अधिक गोडीची" असे पुल का म्हणाले होते ते आता कळतंय :)

प्यारे१'s picture

20 Jun 2013 - 12:16 am | प्यारे१

यु आर टू गुड रे वल्ल्या!

>>>विस्तारभयास्तव येथेच थांबून पुढच्या भागात वेरूळ मालिकेचा समारोप करेन.
हे चांगले केलेस. :)

सस्नेह's picture

20 Jun 2013 - 12:50 pm | सस्नेह

वेरूळ पाहताना हे सगळं दिसलं नाही इतकं आता स्पष्ट दिसत आहे.
रामायण महाभारताचे चित्रपट लै भारी !

सौंदाळा's picture

21 Jun 2013 - 12:25 pm | सौंदाळा

वल्ली,
जेव्हा अजंठा, वेरुळची पुढची वारी होइल तेव्हा तुमच्या लेखमालेची प्रिंट घेउन जाणार.
१. गाईडची गरज भासणार नाही.
२. सहलीचा आनंद द्विगुणित होईल.

अप्रतिम लेखमाला.

अवांतरः देवगिरीचा अभेद्य किल्ला पण या किंवा नंतरच्या लेखमालेत (वल्लीष्टाईल) कव्हर करा.

प्रचेतस's picture

22 Jun 2013 - 8:31 am | प्रचेतस

धन्यवाद.
आमच्या औरंगाबाद सहलीत भेट घडलेल्या या अभेद्य किल्ल्याचे वर्णन किसन देवांनी याआधीच दुर्गम दुर्ग - देवगिरी!!
या लेखात सविस्तर लिहिले आहे.

हा भाग थोड्या उशीरा आला त्याचे सार्थक झाले :)
नेत्रसुखद छायाचित्रे आणि तितकेच समर्पक वर्णन यामुळे हा भागही खूप छान झाला आहे मित्रा
डोंगरावरुन घेतलेल्या छायाचित्राने केलेली सुरुवात एकदम आवडली.

पुढील क्रमशः लवकर टाक रे

खुप मस्त रे, मजा आली वाचताना.

किसन शिंदे's picture

26 Jun 2013 - 5:02 pm | किसन शिंदे

वर बिरूटे सर आणि बॅटमॅनशी सहमत. प्रत्यक्षात माहिती 'सांगण्यापेक्षा' ती 'लिहिताना' तू जास्त खुलून येतोस. रामायण आणि महाभारताच्या शिल्पपटाबद्दल विस्तारपुर्वक वाचायला मिळालं. :)

सचिन कुलकर्णी's picture

30 Jun 2013 - 9:53 pm | सचिन कुलकर्णी

अप्रतिम वर्णन, फोटू आणि आपल्या अभ्यासाला _____/\_____ .

यशोधरा's picture

3 Jul 2013 - 1:48 am | यशोधरा

फार सुरेख जमला आहे हा भाग! कधी काळी ही लेणी बघायला जाईन तेह्वा ह्या लेखांची प्रिंट घेऊन जाणार.