वेरूळः भाग २ (ब्राह्मणी लेणी)

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
26 Mar 2013 - 7:10 pm

वेरूळ: भाग १ (जैन लेणी)

वेरूळची जैन लेणी पाहून निघालो. शेवटच्या क्रमांकाच्या असलेल्या जैन लेणींपासून सुरुवात केल्यामुळे साहजिकच आम्ही आता पोचलो ते वेरूळच्या क्र. २९ च्या लेणीपुढे. १३ ते २९ ही सर्व ब्राह्मणी लेणी असून एक दोन वैष्णव लेणी सोडून इतर सर्वच शैवपंथीयांची लेणी आहेत. अर्थात शैव लेणींमध्ये वैष्णव मूर्ती कोरल्याचेही येथे बर्‍याच प्रमाणात दिसून येते.
बहुतेकांकडून फक्त कैलास लेणेच पाहिले जाते व इतर लेणी दुर्लक्षितच राहतात पण इथली इतर लेणी काही आगळ्या शिल्पांनी नटलेली आहेत त्यातलीच आपण आता पाहू.

लेणी. क्र. २९: सीतेची नहाणी

हे लेणे अतिशय भव्य आहे. वेरूळ लेण्यांच्या भटकंतीत हे लेणे आवर्जून पाहायलाच पाहिजे असे आहे. या लेण्यांत तीन बाजूंनी प्रवेश करता येतो त्यापैकी एक मुख्य प्रवेशद्वार लेण्यांच्या समोरच आहे तर त्याच्या डावीकडेच घळीसारखा खडक फोडून दुसरे प्रवेशद्वार केले आहे तर तिसरे प्रवेशद्वार लेण्यांच्या आतील बाजूस उजवीकडेने कातळ फोडून केले आहे व हा मार्ग दरीकडच्या चिंचोळ्या वाटेने पुढील लेणीकडे सरकतो.

या लेण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत प्रवेश केला. त्याच्या दोन्ही बाजूंस सिंह कोरलेले आहेत. अत्यंत देखणी अशी ही सिंहशिल्पे आहेत.

हे लेणे आतल्या बाजूने प्रचंड मोठे आहे. भव्य असा सभामंडप, मंडपातील कोरीव स्तंभ व चौबाजूंनी भव्य द्वारपालांनी घेरलेले गर्भगृह व आतमध्ये शिवलिंग अशी याची रचना.

१. प्रवेशद्वारावरील सिंहशिल्प
a

२. प्रवेशद्वार (पाहा बरे यांतले मिपाकर ओळखता येतात का ते)
a

प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडच्या बाजूस कोरलेले शिल्प आहे ते अंधकासुर वधाचे

अंधकासुर वध

हे शिल्प अतिशय प्रत्यककारी आहे.
खवळलेल्या, क्रोधाने दग्ध झालेल्या आठ हात असलेल्या शंकराने एक पाय मुडपून आपल्या हातातली तलवार जोराने अंधकासुराच्या छातीतून आरपार खुपसलेली आहे. शिवाचे खोबणीतून बाहेर आलेले डोळे, कपाळावरचा उमलू पाहणारा तिसरा डोळा व भयानकपणे विचकलेले दात त्याला आलेला भयानक क्रोध दर्शवत आहेत. तर आपला अंतःकाळ आता जवळ आलेला आहे हे ओळखून अंधकासुर दोन्ही हात जोडून त्याची क्षमा मागतोय. शिवाच्या उजवीकडे खालच्या बाजूला पार्वती बसली असून पतीचा हा पराक्रम पाहून तिला वाटत असलेले कौतुक तिच्या चेहर्‍यावर विलसत आहे. शिवाने एका हातात वाडगा धरलेला असून अंधकासुराचे पडत असलेले रक्त तो त्यात गोळा करतो आहे. अंधकासुराचे पापी रक्त पार्वतीच्या अंगाला लागू न देणे म्हणूनच ही योजना. शिवाच्या दुसर्‍या हातांमधली तलवार, डोक्यावर धरलेले चाबूकरूपी गजचर्म ही आयुधेपण अतिशय प्रेक्षणीय अशी आहेत.

३. अंधकासुर वध
a

४. क्रोधित शिव
a

अंधकासुरवधशिल्पाच्या बरोबर समोर आहे ती रावणानुग्रह किंवा कैलासउत्थापन शिल्प

रावणानुग्रह शिल्प

कैलासपर्वतावर शंकर पार्वती शांतपणे बसलेले असून उन्मत्त झालेला रावण कैलास पर्वतापाशी पाठमोरा होऊन आपल्या २० हातांनी कैलास पर्वत हलवण्याच्या प्रयत्न करत आहे. रावणाच्या डावी उजवीकडे असलेले शिवगण भयचकित झालेले असून काही रावणावर हल्ला करायचा प्रयत्न करत आहेत तर काही शंकराची हात जोडून प्रार्थना करत आहेत.
दुसर्‍या पातळीवर शंकर पार्वतीच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल कोरलेले असून चामरधारी सेविका शांतपणे चवरी ढाळत उभी आहे. तर एकदम वरच्या पातळीत दोन्ही बाजूस सप्तमातृका, काल व विद्याधर दाखवले असून त्यापैकी हाडाचा सापळा असलेली चामुंडा व कालची मूर्ती सहजी ओळखू येतेय.
शंकराने आपल्या उजव्या पायाने पायाने कैलासाला दाबून धरलेले असून डाव्या हाताने पार्वतीला घट्ट धरून ठेवलेले आहे. चेहर्‍यावरील भाव अत्यंत निराकार किंवा अतिशय शांत असेच कोरलेले आहेत. तर पार्वतीही पतीने सावरून घेतल्यामुळे आश्वस्त झालेली आहे.

ही रावणानुग्रहमूर्ती वेरूळ लेणीसमूहाच्या इतरही बर्‍याच लेणीत कोरलेली असून दिसायली जरी सारखीच वाटली तरी प्रत्येकीत काही वेगळे बारकावे आहेतच.

५. रावणानुग्रह शिल्प
a

इथून पुढे देखण्या स्तंभांवर सभामंडप तोलून धरलेला दिसून येतो. त्यापैकी एका बाजूला नटराजाची भव्य मूर्ती कोरलेली असून ती अपूर्णावस्थेत असल्याने इतकी आकर्षक वाटत नाही तर याच्या समोरील भिंतीवर लकुलीश शिवाची मूर्ती आहे.
मंडपातील स्तंभांवरही काही कोरीव शिल्पे आहेत. एका स्तंभावर नटराजाची मूर्ती आहे तर दुसर्‍या स्तंभांवर कल्याणसुंदर शिवाची मूर्ती कोरलेली आहे.

६. सभामंडप
a

७. सभामंडप
a

८. नटराज
a

९. स्तंभांवरील नटराज व कल्याणसुंदर शिवमूर्ती
a-a

लकुलीश शिव

लकुलीश हा शिवाचा एक अवतार समजला जातो. हा कमळावर बसलेला असून नागसेवकांनी कमळाचा देठ घट्ट धरून ठेवला आहे. शिवाला दोनच हात दाखवले असून त्याचा उजवा हात व्याख्यान मुद्रेत आहे तर दुसर्‍या हातात त्याने लगूड अथवा लाकडी सोटा उचलून धरला आहे. गळ्यात नागरूपी हार असून कपाळी अस्पष्टसा असा तिसरा डोळा दिसतो आहे. हे शिवाचे योगी स्वरूप.
लकुलीश शिव प्रतिमा ही बुद्धासारखीच दिसते. किंबहुना बुद्धप्रतिमेवरूनच शिवाचे हे रूप तयार झाले असावे. कित्येक महायानकालीन बौद्ध लेण्यांत पद्मपाणी बुद्धाची अगदी अशीच प्रतिमा कोरलेली आढळते.

१०. लकुलीश शिव
a

सभामंडपाच्या डाव्या बाजूला भिंतीवर कासवावर उभी राहिलेली यमुनेची प्रतिमा कोरलेली आहे. एका हातात तिने शंख का फूल असे कायसे धरीले आहे तर दुसरा हात सैलसर असा कमरेच्या बाजूला मुक्त सोडलेला आहे. तिने अगदी तलम वस्त्र नेसलेले नसून यात तिच्या प्रवाहीपणा प्रकट होतो तर बाजूला एक सेविका दाखवलेली असून वर आकाशगामी गंधर्व कोरलेले आहेत.

यमुना

या बाजूलाचा यमुनेच्या पुढ्यातच परत दोन्ही बाजूंना सिंह कोरलेले आहेत तर चार पायर्‍या खाली उतरून जाताच अजून एक लेणे आहे पण यात कसलीही मूर्ती कोरलेली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे हे कसलेतरी कोठार म्हणून उपयोगात आणले जात असावे.

११. यमुना व तिच्या पुढ्यातील सिंह
a

मध्यभागी गर्भगृह असून ते छताला भिडलेले आहे. व आतमध्ये शिवाची पिंडी अधिष्ठित आहे. गर्भगृहाच्या चारही बाजूंनी अतिशय भव्य असे द्वारपाल कोरलेले आहेत. द्वारपालांबरोबरच सेविकांची चित्रे पण कोरलेली आहेत तर त्यांच्या डोक्यावर गंधर्व विहरतांना दाखवलेले आहेत. इतके भव्य द्वारपाल मी अद्यापपावेतो इतरत्र कुठेही पाहिलेले नाहीत किंबहुना वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास एकाश्ममंदिरातही इतके भव्य द्वारपाल नाहीत.

१२. गर्भगृह व भव्य द्वारपाल
a

शिवपार्वती विवाहपट

गर्भगृहाच्या पाठीमागच्या बाजूस उजव्या बाजूच्या भिंतीत शिवपार्वती विवाहाचा एक देखणा शिल्पपट कोरलेला आहे. मध्यभागी पार्वतीचा हात हाती घेऊन शिव उभा असून पार्वती शिवाच्या बाजूने वळली आहे. पार्वतीच्या डाव्या बाजूले तिचे पिता हिमालय पर्वत व आई मेना उभी आहे तर शंकराच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेव विवाहाचे पौरोहित्य करत बसलेला आहे तर त्याच्या शेजारी विष्णू उभा आहे. विष्णूच्या डोक्यावर स्वर्गातून आलेला ऐरावतारूढ इंद्र तर त्याच्या शेजारी मकरवाहन गंगा आलेली आहे तर त्यांच्याहीवर अप्सरा, गंधर्व आलेले आहेत तर डाव्याबाजूला वरच्या बाजूस यम,वायु,अग्नी, निऋती, कुबेर, वरूण इत्यादी अष्टदिक्पाल त्यांच्या रेडा, बैल, बोकड, नर आदी वाहनांवर आरूढ होऊन विवाहसोहळ्यात आप्तेष्ट म्हणून आलेले दाखवलेले आहेत.

१३. शिवपार्वती विवाह
a

याच शिल्पपटाच्या बाहेरील बाजूस सरस्वतीची उभ्या अवस्थेतील मूर्ती कोरलेली आहे.

१४. सरस्वती
a

याच्या समोरच अजून एक शिल्पपट आहे. यात शिवपार्वती विवाहानंतरचा प्रसंग दोन पातळ्यांत कोरलेला आहे.
खालच्या पातळीत मंगलघटांची मांडणी केलेली आहे तर डावी उजवीकडे विष्णू आणि ब्रह्मदेव आहेत तर मध्यभागी नंदी असून शिवगण त्याची थट्टा करतांना दाखवलेले आहेत. तर वरच्या पातळीत शिवपार्वती मजेने गप्पा मारत बसलेले असून शिवाने पार्वतीचा हात थट्टापूर्वक घट्ट पकडून ठेवला आहे आणि त्याच्या चेहर्‍यावर मिष्किल हास्य विलसत आहे तर पार्वतीची मुद्रा लाजरी दाखवलेली आहे. शिवगण आणि पार्वतीच्या सख्या मोठ्या कौतुकभरल्या नजरेने ह्या दोघांकडेही पाहात आहेत. तर आकाशातून अप्सरा, गंधर्वसुद्धा हा सोहळा मोठ्या कौतुकाने पाहात आहेत.

१५. शिवपार्वती शिल्पपट
a

या बाजूनेच एक जिना दरीच्या कडेने बारीक वाटेने उतरून पुढील लेणीकडे जातो. या मार्गात उंच कडा, खोल दरी आणि दरडी कोसळण्याचे भय असल्यामुळे हा मार्ग सध्या पुरातत्व खात्याने बंद केला आहे. त्यामुळे आम्ही आता परत फिरून गाडीमार्गाने निघालो व थोड्याच वेळात इथल्या अजून एक अतिशय सुंदर अश्या लेणीकडे पोहोचलो. ते लेणे म्हणजे क्र. २१, रामेश्वर

१६. लेणी क्र. २९ वरून उतरणारा चिंचोळा रस्ता (हा रस्ता मध्येच बंद केला आहे)
a

लेणी क्र. २१- रामेश्वर

हे लेणे सुद्धा वेरूळ बघताना आवर्जून बघावे असेच आहे. लेणीच्या प्रांगणात एका चौथर्‍यावर बसलेल्या नंदीचे मोठे सुरेख शिल्प आहे.
प्रांगण, ओसरी, ओसरीतील कोरीव सभामंडप आणि आत वेगवेगळ्या खणांत विभाजीत झालेला सभामंडप अशी याची रचना.
ओसरीच्या एका बाजूला गंगेची अतिशय देखणी मूर्ती आहे. गंगेचे वाहन असलेल्या मकरावर गंगा उभी आहे. मकराच्या मुखातून हत्तीची सोंड बाहेर आलीय तर मकराचे पाय मात्र सिंहाचे आहेत. गंगेने नेसलेले झिरझिरीत उत्तरीय तिचा प्रवाहीपणा दाखवते. वेगामुळे ते विस्कळीत होऊ नये म्हणून तिने ते हाताभोवती लपेटलेले आहे तर तोल सांभाळायला तिने एका सेवकाच्या मस्तकी हात ठेवला आहे. तर बाजूला सेविका आणि आकाशी गंधर्व कोरलेले आहेत.

१७. सर्वांगसुंदर गंगा
a

गंगेच्या समोरच्या बाजूलाच कासवावर आरूढ असलेली यमुनेची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती जवळपास गंगेसारखीच असून तीची बर्‍याच प्रमाणात भग्न झालेली आहे.

१८. यमुना
a

ओसरीचा कठडा कोरीव कामाने सुशोभित केलेला आहे. कठड्यातून कोरीव स्तंभ निर्मिलेले असून प्रत्येक स्तंभांवर शालभंजिकांच्या प्रमाणबद्ध अशा देखण्या मूर्ती झुकलेल्या अवस्थेत कोरलेल्या आहेत. प्रत्येक मूर्तीच्या दिमतीला सेवक आहेत.

लेणीच्या अंतर्भागात डावी उजवीकडे दोन खण असून एका खणात शिवपार्वती विवाहाची कथा अगदी सविस्तर पद्धतीने तीन शिल्पपटांद्वारे मांडली आहे. तर उजव्या बाजूला शिवपार्वतीची अक्षक्रीडा तर त्याच्या आतल्या बाजूला सप्तमातृकापट आहे तर मधल्या भागात गर्भगृह असून बाहेरच्या बाजूला द्वारपाल असून आतमध्ये रामेश्वर शिवलिंग आहे.

१९. स्तंभांवरची सुरेख कलाकुसर व शालभंजिकांच्या मूर्ती
a

२०. शालभंजिका तसेच प्रांगणातील नंदी
a

२१. स्तंभांवरील कलाकुसर
a

शिवपार्वती विवाह

ही कथा तीन टप्यांत कोरलेली आहे. उजवीकडच्या कोपर्‍यात पार्वती तप करताना दाखवलेली असून तिच्याशेजारी बटूवेषधारी शिव हाती कमंडलू घेऊन लग्नाची मागणी घालताना दाखवलेला आहे. तर याच शिल्पपटाच्या डाव्या कोपर्‍यात साक्षात ब्रह्मदेव पार्वतीचा पिता हिमवान पर्वताकडे शिवाचे स्थळ घेऊन आलेला दाखवलेला आहे. ब्रह्माकडून शिवासाठी पार्वतीची मागणी आल्याने झालेला आनंद हिमवानाच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसतो आहे.
तर ह्या दोन्ही शिल्पांच्या मधल्या भागात शिवपार्वतीचा विवाहविधी प्रत्यक्ष कोरलेला आहे. शिवाच्या बाजूस लक्ष्मी-विष्णू, शची-इंद्र अस देव आलेले आहेत पर शिव पार्वतीच्या मध्ये कन्यादान करण्यासाठी हाती कमंडलू घेऊन हिमवान पर्वत उभा आहे तर पौरिहित्य ब्रह्मदेव करत आहे. या शिल्पपटाच्या खालच्या बाजूस शिवगण दाखवलेले आहेत.

२२. शिवपार्वती विवाह (उजवीकडे ब्राह्मणवेषधारी शिव तपःशालिनी पार्वतीकडे मागणी करताना) तर डावीकडे शिवपार्वती पाणीग्रहण
a

या शिल्पपटाच्या उजव्या कोपर्‍यात उभ्या अवस्थेतील कार्तिकेयाची सुरेख मूर्ती कोरलेली आहे. त्याचे वाहन मोर शेजारी उभे असून कार्तिकेयाने डाव्या हाती कोंबडा पकडलेला आहे. कार्तिकेयाच्या दोन्ही बाजूला मेंढी आणि बोकड यांची तोंडे असलेले त्याचे नैगमेष आणि छगवक्त्र नावाचे दोन सेवक त्याची आज्ञा झेलण्यासाठी तत्पर उभे आहेत.

२३. कार्तिकेय
a

कार्तिकेयाच्या समोरच महिषासुरमर्दिनीची सुरेख मूर्ती कोरलेली आहे. देवीच्या एका हाती विष्णूने दिलेले चक्र तर दुसर्या हाती शंकराने दिलेला त्रिशूळ आहे. महिषासुराह्च्या पाठीवर उजवा पाय रोवून तर त्याच्या तोंडावर डावा हात दाबून धरून ती त्याचा वध करते आहे. बाजूलाच देवीचे सेवक हत्यारे घेऊन उभे आहात तर आकाशातून विद्याधर हा सोहळा बघत आहेत.

२४. महिषासुरमर्दिनी
a

शिवपार्वती अक्षक्रिडा पट

गर्भगृहाच्या दुसर्‍या बाजूच्या खणाच्या सुरुवातीला शिव पार्वतीच्या अक्षक्रिडेचा दोन पातळ्यांत देखावा कोरलेला आहे. खालच्या बाजूला मध्यभागी नंदी दाखवलेला असून इतर शिवगण त्याची उगाच पाय धरणे, शेपटी ओढणे अशा नाना प्रकारांनी खोड्या काढताना कोरलेले आहेत तर वरच्या पातळीत शिवपार्वतीचा सारीपाट खेळ मांडलेला आहे. शंकराच्या खेळातील लबाडीमुळे वा चातुर्यामुळे चिडलेली पार्वती निघून जायचा प्रयत्न करते आहे तर शंकर तिचा पदर धरून तिला आग्रहाने बसवून ठेवत आहे आणि फक्त आता फक्त एकच डाव खेळ असे एक बोट उंचावून तिची मनधरणी करत आहे. तर आजूबाजूला सेवक मोठ्या कौतुकाने ही क्रिडा बघत आहेत.

२५. शिवपार्वती अक्षक्रिडा
a

शिव पार्वती जवळून
a

कटीसममुद्रानृत्य

इथल्या शेजारच्या दालनात शंकराचे कटीसममुद्रानृत्य दाखवलेले आहे. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. दोन्ही पाय गुढघ्यात मुडपून डावा पाय किंचीत वर उचलून शंकर मोठे विलोभनीय नृत्य करतोय. त्याचे दोन्ही हात कंबरेभोवती आलेले आहेत. शिवाच्या बाजूला पार्वती एक लहान मूल कडेवर घेऊन उभी आहे तर आजूबाजूला गणेश आणि वादकांच्या मूर्ती आहेत.

२६. कटीसममुद्रानृत्य

a

कटीसममुद्रानृत्य शिल्पाच्या शेजारच्या भिंतीवर सप्तमातृकापट कोरलेला आहे.

सप्तमातृकापट

या शिल्पपटाच्या सुरुवातीला सप्तमातृकांच्या बाजूला वीरभद्राची मूर्ती असून वाराही, ऐंद्री, वामनी, नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या पूर्णपणे अनार्य अशा सप्तमातृका कोरलेल्या आहेत व शेवटी गणेशाची मूर्ती आहे. शाक्तपंथाचे प्रतिकच जणू हा पट. सप्तमातृका मूळाच्या अनार्य देवता. कोकणात ह्यांनाच साती आसरा अथवा जलदेवता म्हणत असावेत. आ प्रत्येक मातृका अतिशय देखणी आणि सालंकृत असून प्रत्येकीजवळ तिचे बाळ आहे तर खालच्या बाजूला वराह, हंस, मोर घुबड असे प्रत्येकीचे वाहन तिच्या मूर्तीखाली कोरलेले आहे. सप्तमातृका म्हणजे मातेचे म्हणजे जीवनशक्तीचे प्रतिकच. तर याच जीवनमरणाच्या फेर्‍याला दर्शवण्यासाठी या शिल्पपटाच्या बाजूला असितांग भैरव-काल कालीचे शिल्प कोरलेले आहे.

२७. सप्तमातृका पट (सर्वात डावीकडचा वीरभद्र)

a

२८. सप्तमातृका पट (सर्वात उजवीकडे गणेश)
a

काल-काली

सप्तमातृका म्हणजे मातेचे म्हणजे जीवनशक्तीचे प्रतिकच. तर याच जीवनमरणाच्या फेर्‍याला दर्शवण्यासाठी या शिल्पपटाच्या बाजूला असितांग भैरव-काल कालीचे म्हणजे प्रत्यक्ष मृत्युचे शिल्प कोरलेले आहे.
भयानक डोळे असलेल्या पूर्णपणे अस्थिपंजर असलेल्या कालाच्या हाती रूंद व टोकदार कट्यार आहे. एक सापळा त्याच्या पायाला मिठी मारून बसलेला आहे आणि त्याच्या मागे असलेली काली त्या सापळ्याला खेचून काढत आहे. तर तिच्याच बाजूला एक सापळा उभा आहे.

जन्ममृत्युची जणू ही दोन प्रतिकेच असे हे सप्तमातृका आणि असितांग काल काली शिल्पपट आहेत.

२९. काल काली
a

ही अद्भूत गुहा पाहूनच पुढच्या २० क्रमांकाच्या लेणीकडे वळलो.

लेणी क्र. २०.

यात फारसे बघण्यासारखे काही नाही. दरवाजाजवळ कुबेराची हातात पैशाची थैली घेतलेली प्रतिमा आहे व आतमध्ये गर्भगृह असून त्यामध्ये शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल कोरलेले आहेत.

३०. कुबेर
a

आता इथून परत आम्ही लेणी क्र. २१ च्या पुढे निघालो. ते लेणी क्र. २२ पाशी

लेणी क्र. २२: नीळकंठेश्वर

ह्या लेणीच्या प्रांगणात नंदीची मूर्ती चौथर्‍यावर कोरलेली असून आतल्या दालनात वीरभद्र आणि गणेशमूर्तीसह सप्तमातृका आहेत. यातली वाराही ही वाराहमुखी दाखवलेली असून ब्राह्मणी त्रिमुखी आहे.प्रत्येकीजवळ तीचे बालक कोरलेले आहे.
लेणीच्या आतल्या भागात गाभारा असून आतमध्ये शिवलिंग आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही भिंतींवर जय विजय शैलीत द्वारपाल कोरलेले आहेत. तर जवळच गजान्तलक्ष्मी आणि सरस्वतीच्या प्रतिमा आहेत.

३१. नीळकंठेश्वर लेणीतील सप्तमातृकापट (इथेही डावीकडे वीरभद्र, उजवीकडे गणेश तर गणेशाच्या शेजारी असितांग कालाचे शिल्प आहे)
a

इथून पुढची काही लेणी भव्य आहेत पण आतमध्ये पाहण्यासारखे काही नाही पण जवळपास प्रत्येकीत गाभार्‍यासह शिवलिंग आहे. तर ओसरीतले स्तंभ कोरलेले आहेत. यापुढचे महत्वाचे लेणे म्हणजे क्र. २७

३२. मधल्या काही लेण्यांचे मुखदर्शन
a

३३. मधल्या काही लेण्यांचे मुखदर्शन
a

३४. मधल्या काही लेण्यांचे मुखदर्शन
a

लेणी क्र. २७: जानवसा

या लेणीमध्ये काही निवासकक्ष कोरलेले आहेत तसेच ह्याच ह्या शेजारच्या सीतेच्या नहाणी (क्र. २९) या लेण्यांत शिव पार्वती विवाह कोरलेला असल्याने ह्या लेणीला जानवसा असे म्हटले जाते. विश्रांतीकक्ष असल्याने हे लेणे मूळचे बौद्ध लेणे असल्याचे वाटते. कालांतराने याचे वैष्णव लेणीत रूपांतर झालेले आहे. शैव लेणींचे प्राबल्य असलेल्या वेरूळ मधले हे एक वैष्णव लेणे. याची निर्मिती राष्ट्रकूटांच्या काळात न होता यादवकाळात झालेली असावी असा माझा अंदाज. या लेणीच्या वरच जलप्रपात कोसळत असल्याने तसेच येथला दगड ठिसूळ असल्याने इथल्या मूर्ती बर्‍याच ओबडधोबड झालेल्या आहेत.
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस नांगरधारी बलराम, सुभद्रा आणि श्रीकृष्णाच्या मूर्ती आहेत तर बाजूच्या कोपर्‍यात भग्नावस्थेतील शेषशायी विष्णू प्रतिमा आहेत. तर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा तीन दैवतांच्या प्रतिमा तर कोपर्‍यातील भिंतीत विष्णूचा वराह अवतार कोरलेला आहे. शेजारीच महिषासुरमर्दिनीचीही मूर्ती आहे.
आतल्या गाभार्‍यात कसलीही मूर्ती नाही.

३५. लेणी क्र. २७ आणि २६ चे मुखदर्शन (सीतेची नहाणी लेणीवरून)
a

३६. बलराम, सुभद्रा आणि कृष्ण
a

३७. ब्रह्मा, विष्णू आणि महेश
a

३८. वराहावतार
a

हे लेणे पाहून आम्ही आता परत फिरलो ते क्र. १७ च्या लेणीकडे
१८/१९/२० क्रमांकाच्या लेणी साध्या आहेत एका ठिकाणी शंकराची त्रिमुखी मूर्ती कोरलेली आहे.

३९. त्रिमुखी शिव
a

लेणी क्र. १७.

हे एक अत्यंत सुंदर लेणे आहे पण अपूर्णावस्थेत आहे कदाचित इथला खडक हे लेणे खोदण्यासाठी पुरेसा योग्य नसावा.
इथले स्तंभ अतिशय आकर्षक आहेत आणि स्तंभांवर शालभंजिकांच्या सुरेख प्रतिमा आहेत तसेच ठिकठिकाणी भारवाहक यक्षसुद्धा कोरलेले आहेत. दरवाजाजवळच भिंतीत गणेशाची अभंग प्रतिमा असून एका हातात परशु, दुसर्‍या हातात कमळ, तिसर्‍या हातात माळ तर चौथ्या हातात लाडवांचे पात्र आहे त्यातले लाडू तो आपल्या सोंडेने खात आहे. तर गणेशाच्या समोरच्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीची प्रतिमा कोरलेली आहे. एका ठिकाणी भिंतीत ब्रह्मदेवाची विद्याधर आणि सेवकांसह प्रतिमा कोरलेली आहे.
लेणीच्या अंतर्भागात नक्षीदार स्तंभ असून त्याजवर सुरेख शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभांवरच्या कमानीचा आकार बुद्धविहारातील चैत्यकमानींशी विलक्षण साधर्म्य दाखवतो.

४०. स्तंभांवरील शालभंजिका
a

४१. कोपर्‍यातल्या भिंतीतील ब्रह्मदेवाची प्रतिमा
a

४२. लाडू खात असलेला गणपती
a

४३. स्तंभांवरील देखणी स्त्री प्रतिमा
a

४४. गुहेतील कोरीव स्तंभ
a

४५. महिषासुरमर्दिनी
a

इथपर्यंत आमच्या ब्राह्मणी लेणी पाहून संपल्या खरे तर संपवल्या म्हणणे जास्त योग्य ठरावे ही सर्व लेणी पाहण्यासाठी ३/४ तास अजिबातच पुरेसे नाहीत तर ३/४ दिवस इथे वेरूळला मुक्काम ठोकावा लागेल.

आता आम्ही आलो होतो वेरूळमधल्या सर्वात भव्य, सर्वात नेत्रदिपक आणि सर्वात सुंदर अशा कैलास लेणीमंदिराकडे त्याविषयी पुढच्या भागात.

क्रमशः

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

26 Mar 2013 - 7:44 pm | स्मिता.

हा भाग छान मोठा असल्याने वाचतांना मजा आली. तसेच शिल्पांची चित्रे सुद्धा सुरेख आहेत. प्रत्येक शिल्पातल्या प्रत्येक आकृतीचा अर्थ तुम्हाला कसा काय लागतो याचे मला नेहमीच कौतुकामिश्रित आश्चर्य वाटते.

स्पा's picture

28 Mar 2013 - 10:05 am | स्पा

असेच म्हणतो , तुफान निरीक्षणशक्ती , एक एक शिल्प एवढ्या बारकाईन पाहणे म्हणजे खरच कमाल आहे
आम्ही लगेच कंटाळतो , तेचतेच पणा वाटतो.

पण वल्ली ने सांगितलेल्या शिल्पान्मागच्या कथांमुळे फोटो खूपच रोचक वाटले .

अंधकासुरवध तर कमाल आहे

सुरेख झालाय हा भागही

लॉरी टांगटूंगकर's picture

26 Mar 2013 - 7:53 pm | लॉरी टांगटूंगकर

वल्ली स्टाईल खास माहिती ने ठासून भरलेला लेख....
बघितलेल्या जागा पण या चष्म्यातून बघायला जाम भारी वाटते ...

मालोजीराव's picture

26 Mar 2013 - 7:56 pm | मालोजीराव

वल्ली जोन्स…नादखुळा चित्र सगळी…फक्त चित्र पहिलीत,वाचून पुन्हा प्रतिक्रिया देण्यात येईल.
दुसर्या चित्रातील पांढर्या रंगाचे संपादकीय शिल्प आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2013 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीशेठचं कौतुकच आहे. जबरा.

लेणी बघायला येणारे 'शीवपार्वतीच्या विवाहाप्रसंगी' चे कसे साक्षीदार होत होते तो फोटो कोणाकडे आहे.
इथे डकवा.

-दिलीप बिरुटे

तो फोटो बहुतेक किसनदेवांकडे आहे. त्याने मोबाईलमधून काढला होता.

@पैसाताई: किडनॅप करायची काय गरज, वेरूळ म्हटले की मी एका पायावर तयार होणारच. :)

अनन्न्या's picture

26 Mar 2013 - 8:11 pm | अनन्न्या

लेण्यांच्या माहितीमुळे लेणी पाहताना मजा आली.

पैसा's picture

26 Mar 2013 - 8:24 pm | पैसा

मी जेव्हा कधी ही लेणी बघायला जाईन तेव्हा वल्लीला किडनॅप करून नेणार हे पक्कं! =))

चौकटराजा's picture

26 Mar 2013 - 8:44 pm | चौकटराजा

वल्ली बुवांचा धागा पाहून माहिती मिळाली. त्यामुळे परत तिसर्‍यांदा वेरूळला जाउन यावेसे वाटतेय ! २६ क्र च्या चित्रातील
प्यानल फारस सुंदर आहे. आम्ही एक लेख लिहिला (एस एल आर वर ) त्यावरून वल्ली यानी डीएसेलार क्यामेरा घेतला
असल्यास आमची कालर ताठ कारण या सर्व फोटोत तो डोकावत आहे. अर्थात वल्ली ची नजर भारी आहे हे ही सांगणे न लगे ! बाकी ज्याना वल्ली वेरूळ सहली साठी किडनॅप करावासा वाटतो त्यानी पहिली दोन पहिलवानांची सोय करावी अशी गंमतीची सूचन करावीशी वाटते.

वल्लीशेठ, तुमच्या ईतिहासाच्या अभ्यासाची, कलादृष्टीची पावती याआधीही खुप वेळा दिली आहे. पुन्हा एकदा देतो, सुंदर लेख !!!

प्यारे१'s picture

26 Mar 2013 - 9:06 pm | प्यारे१

+१.

वल्लीयाना जोन्स. असंच एकदा एखाद्या अजंठाचा शोध घेताना वल्लीची 'पारो का कोण ती?' सापडावी म्हणजे झाले...! कसे???? ;)

भारी!! नेहमीप्रमाणेच माहितीने खचाखच भरलेला भाग.

तुझ्या वाचनव्यासंगाचे खरंच कौतुक वाटते रे!

मूकवाचक's picture

29 Mar 2013 - 2:51 pm | मूकवाचक

+१

महाराष्ट्रपाषाणशिल्पबोधविचक्षण, सातवाहनपारंगत, भटकेश्वर वल्लियाना जोन्स यांचा विजय असो!!!!! विजय असो!!!!!! विजय असो!!!!!!!!!!!!!
_/\_

सध्या इतकेच लिहितो. रसग्रहण अत्युत्कृष्ट जमलेय.

महाराष्ट्रपाषाणशिल्पबोधविचक्षण

अ..फा..ट!

कुठून सुचतात रे तुला असले शब्द.

अर्धवटराव's picture

26 Mar 2013 - 9:49 pm | अर्धवटराव

तुमचा व्यासंग आणि नजर, दोन्हि अफाट आहेत हो वल्लीशेठ. सलाम.

अर्धवटराव

यशोधरा's picture

26 Mar 2013 - 10:11 pm | यशोधरा

अतिशय सुरेख!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2013 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

आधि धाग्याला/माहितिला/ती देण्याच्या चिकाटिला _/\_/\_/\_

आणी सगळ्यांच्याच प्रतिसादाला 1

वाचतो आंम्हिही... पण ते असं काँक्रिट होऊन,सॉलिड होउन बाहेर येत नाही !

अभ्या..'s picture

27 Mar 2013 - 4:20 am | अभ्या..

वल्ली, अत्यंत सुरेख फोटो आले आहेत. माहीती पण खूप रसाळ.
काल काली चे शिल्प पाहताना त्याचे वेगळेपण जाणवले.
धन्यवाद.

५० फक्त's picture

27 Mar 2013 - 8:33 am | ५० फक्त

मस्त माहिती रे,धन्यवाद.

प्राध्यापक's picture

27 Mar 2013 - 10:09 am | प्राध्यापक

नेहमी प्रमाणेच अप्रतीम वर्णन व फोटो,एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देताना सर्वांनाच त्याची पुर्ण माहीती असते असे नाही,त्यामुळे माहीती बद्द्ल धन्यवाद्.
काही दिवसांपुर्वीच वेरुळ ची लेणी पुन्हा बघण्याचा योग आला,त्या निमित्ताने पडलेले काही प्रश्नः
लेणि क्रं.३३ च्या इंद्र सभेच्या गर्भगॄहाला चौकटीवर जी अप्रतीम कलाकुसर दिसते,तसेचत्या लेणी मधील मातंगी यक्ष प्रतीमा त्यांच्या डोक्यावरील छतावरील कलाकुसर ही जी महत्वाची वैशीष्टे दिसतात्,याचा अभाव पुढील लेणी क्रं.२९ मधे दिसतो(विशेषतः लेणी क्रं.२९ मधील गर्भगॄहाची चौकट) त्याचे कारण काय असावे.
तसेच लेणी क्रं.२९ मधे सभामंडपाच्या दोन्ही बाजुला (आत प्रवेश केल्या नंतर डाव्या व उजव्या) दोन मोठे खड्डे दिसुन येतात त्याचे काय प्रयोजन असावे,माझा एक अंदाज आहे की त्या खड्डंयामधे पाणी भरत असावेत व त्या पाण्यावर प्रकाश पडुन त्याचा प्रकाश परावर्तीत होउन सर्व लेण्यांमधे प्रकाश पसरत असेल, त्यासंबधात आणखी काही माहीती असल्यास उत्तमच होइल.
धन्यवाद.

प्रचेतस's picture

27 Mar 2013 - 11:48 am | प्रचेतस

,तसेचत्या लेणी मधील मातंगी यक्ष प्रतीमा त्यांच्या डोक्यावरील छतावरील कलाकुसर ही जी महत्वाची वैशीष्टे दिसतात्,याचा अभाव पुढील लेणी क्रं.२९ मधे दिसतो(विशेषतः लेणी क्रं.२९ मधील गर्भगॄहाची चौकट) त्याचे कारण काय असावे.

मातंग यक्षाची प्रतिमा असलेले लेणे हे जैन लेणे आहे तर सीतेची नहाणी(क्र. २९) हे ब्राह्मणी लेणे आहे साहजिकच दोघांच्या शैलीत काही फरक आहे. तसेच ही ३० ते ३४ क्र.ची जैन लेणी वेरूळ लेणीसमूहात सर्वात शेवटी खोदली गेली त्यामुळे रचनेत हा फरक आहे.

तसेच लेणी क्रं.२९ मधे सभामंडपाच्या दोन्ही बाजुला (आत प्रवेश केल्या नंतर डाव्या व उजव्या) दोन मोठे खड्डे दिसुन येतात त्याचे काय प्रयोजन असावे,

त्या खड्ड्यांना 'कूर्मचिती' असे म्हणतात. कासवाची पाठ उलटी केली कसा आकार दिसेल तसा आकार अशा खड्ड्याचा असतो. हे खड्डे यज्ञवेदी म्हणून वापरले जात होते. या कूर्मचितीमध्ये यज्ञहोम करून हवन केले जात असे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Mar 2013 - 12:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

वल्ली बुवांना मनापासुन नमस्कार

वल्ली मित्रा,

अजंठा-वेरुळ ला न जाताच कित्येकांना ही नेत्रसुखद यात्रा घडत आहे त्याबद्दल तुझे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
वेरुळ-२ हा भाग मनापासून आवडला. भरपूर छायाचित्रे आणि त्याअनुषंगाने मोलाची माहिती. सुंदरच

या भागातील कित्येक शिल्पांचे फोटो विशेष आवडले - जसे अंधकासुर वध, कटीसममुद्रानृत्य , काल काल,, इ...

अंधकासुर वध या अनुषंगाने तू दिलेली माहिती रोचक आहे. येथे तू असे म्हटले आहेस की 'शिवाने एका हातात वाडगा धरलेला असून अंधकासुराचे पडत असलेले रक्त तो त्यात गोळा करतो आहे. अंधकासुराचे पापी रक्त पार्वतीच्या अंगाला लागू न देणे म्हणूनच ही योजना.'

शिल्प पाहिले की प्रथमदर्शनी तू म्हणतोस त्याची प्रचिती येतेच. पण येथे एक पुराणकथा आठवली ती सांगतो. खरे म्हणजे शंकर अंधकासुराचे रक्त गोळा करतो आहे ते पार्वतीच्या अंगावर ते पडू नये यासाठी नव्हे. तर अंधकासुराला (ब्रह्मदेवाकडून) एक वरदान प्राप्त झालेले होते. या वरदानानुसार अंधकासुराचा कोणी वध करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे जेवढे रक्त जमिनीवर सांडेल त्यातून अंधकासुर पुन्हा निर्माण होईल असा तो वर होता. इंद्रासह अनेक देवतांनी अंधकासुराशी युद्ध करुन त्याच्याकडे असलेल्या या वरदानामुळे दारुण पराभव पत्करला होता. अंधकासुरापासून वाचवण्यासाठी देवांनी शंकराला साकडे घातले. तेव्हा शंकराने अंधकासुराचा वध असा केला की त्याचे रक्त जमिनीवर पडू नये. तो वाडगा अंधकासुराचे रक्त जमिनीवर पडू नये यासाठी आहे. :)

प्रचेतस's picture

27 Mar 2013 - 6:45 pm | प्रचेतस

धन्स रे मित्रा.
त्या पुराणकथेप्रमाणे हे शिल्प तर अधिकच रोचक होते.

सागर's picture

27 Mar 2013 - 6:59 pm | सागर

त्या पुराणकथेप्रमाणे हे शिल्प तर अधिकच रोचक होते.

+१ सहमत आहे :)

प्रसाद प्रसाद's picture

27 Mar 2013 - 6:20 pm | प्रसाद प्रसाद

लेख नेहमीप्रमाणे सुंदर.

प्रचि क्र. १४ मध्ये असलेले शिल्प सरस्वतीचे हे कसे काय ओळखले? हातात वीणा, हंस वाहन काहीच मला त्या प्रचिमध्ये दिसले नाही.

ते सरस्वती देवीचे शिल्प नसून सरस्वती नदीचे शिल्प आहे.
याच्याच पलीकडच्या बाजूला यमुनेचे शिल्प आहे. नदीचा प्रवाहीपणा दाखवणारे उत्तरीय, दिमतीला घेतलेला बटू आणि सेविका अशी काही लक्षणे.

वेरूळ लेण्यांत एके ठिकाणी वीणा आणि पोथी हाती घेतलेल्या सरस्वती देवीचेही शिल्प आहेच.

प्रसाद प्रसाद's picture

27 Mar 2013 - 6:50 pm | प्रसाद प्रसाद

ओक्के........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2013 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बलराम,कृष्ण आणि सुभद्राच्या शिल्पांना वल्लीने खुलासा करेपर्यंत मी राम,लक्ष्मण,सिता म्हणत होतो. :)
वल्लीला कोणतंही शिल्प पटापट ओळखता येतात, हे मी पाहिलं आहे. केवळ थक्क होऊन जातो माणूस.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

28 Mar 2013 - 8:26 am | किसन शिंदे

क्या बात है वल्ली!

ह्या भागात खचाखच भरलेली माहिती पाहून आनंद झाला. जबरदस्त माहितीपुर्ण आहे हे लेखन.

या लेण्यांवर पी.एच्.डी का करत नाहीस तू?

या लेण्यांवर पी.एच्.डी का करत नाहीस तू?

असेच म्हणतो. सीरियसलि विचार कर मित्रा.

मन१'s picture

28 Mar 2013 - 10:44 am | मन१

दोन्ही भाग आवडले.बरीच नवीन माहिती समजते आहे.

नानबा's picture

28 Mar 2013 - 10:57 am | नानबा

मस्त माहिती आणि फोटु...
थोडं अवांतर - कॅमेरा कुठला आहे तुमचा?? फोटु एकदम खत्र्या आलेत म्हणून..

प्रचेतस's picture

29 Mar 2013 - 8:44 am | प्रचेतस

धन्यवाद.

कॅमेरा कॅनन ५५० डी आहे.

नानबा's picture

29 Mar 2013 - 10:06 am | नानबा

तर्रीच इतके मस्त फोटु आलेत. :)

पियुशा's picture

29 Mar 2013 - 10:38 am | पियुशा

वल्ली तुला माझ्याकडुन या विषयात पी.एच्.डी. प्रदान करत आहे ;)
आजसे तुम डॉ. वल्ली हो ;) भारी रे ,तशी मी गेले असते ना तर १५ मिनिटात सर्व पाहुन बाहेर आले असते ;) पन आता कधी योग आला ना जाण्याचा तर तुझ्या या माहितीचा पुर्ण उपयोग करुन घेइल :)

सस्नेह's picture

2 Apr 2013 - 2:17 pm | सस्नेह

तशी मी गेले असते ना तर १५ मिनिटात सर्व पाहुन बाहेर आले असते
अगदी अगदी. मला तर सगळी नक्षी सारखीच दिसते.

सौरभ उप्स's picture

29 Mar 2013 - 2:47 pm | सौरभ उप्स

भारीच रे .... सगळ दर्शन इथेच होत बसल्या जागी फिरून यायचा आनंद मिळतो...

पाषाणभेद's picture

30 Mar 2013 - 10:20 pm | पाषाणभेद

भारतीयांच्या अनमोल ठेव्याचे अनमोल शब्दात केलेले विवेचन आवडले.

सुमीत भातखंडे's picture

2 Apr 2013 - 1:46 pm | सुमीत भातखंडे

तिकडे न जाताच हे दर्शन घडलं त्याबद्दल धन्यवाद... अप्रतीम वर्णन आणि फोटो

साला लेण्यां-देवळांवर आधारलेले लेख लिहावे तर ते केवळ वल्लीशेटने.

स्पा's picture

3 Apr 2013 - 11:56 am | स्पा

पुढील भाग कधी???