असुर कोण ? (२)
भारतात जी परिस्थिती होती ती युरोप, आफ़्रिका, मध्य आशिया, चिन सगळीकडे सारखीच होती. आर्य व असुर बरोबर रहात होते. त्यांच्या देवता, आचारविचार, आराधना सगले जवळजवळ सारखेच होते. त्यातील काही आर्य-असुर भारताकडे गेले. काही तेथेच राहिले. चार-पाचशे वर्षांनी भारतातले काही अनार्य परत पश्चिमेकडे परत फिरले. पण आता त्यांना आढळले की स्थानिक असुरांमध्ये बराच फरक पडला आहे. आता "इंद्र" ही प्रमुख देवता नाही. आता तेथे "विरोचन" प्रमुख देवता आहे. अजुनही दोघे वरुण, सूर्य, अग्नी यांना पुजत होते. अहुरमझ्दा (महान असुर) हाच पुढे असुरांचा इन्द्र झाला. म्हणजे देव-असुर यांच्यात फरक पडावयास सुरवात झाली होती. जरी काही असुर (प्रल्हाद, बळी) देवांच्या "धर्मा"त होते तरी फूट पडली होती व काही शतकांनी दोघांत सार्वत्रिक संघर्ष सुरू झाला. आता दोघे एकमेकांना शत्रु समजू लागले. पुराणांत देव विरुद्ध असुर-राक्षस-दैत्य-दानव अशा दोन "पार्ट्या" तयार करण्यात आल्या. हल्ली सर्वसाधारण जनता वेदातील गोष्टी वाचत नाही, पुराणातल्याच वाचते.
असुरांचा देश कोणता ? हिन्दकुश पर्वाता जवळील डोंगराळ भागात गंधर्व व असुर एकत्र रहात होते. त्यातील दक्षिण भागात असुर. पुढे ते आणखीन दक्षिणेकडे म्हणजे समुद्रापर्यंत पोचले व चांगले दर्यावर्दी बनले. दर्यावर्दी माणुस व्यापारी होऊन गब्बर बनतो. त्याच्या स्वभावातही दुर्गुणांची वाढ झालेली दिसते. ते पिंगट, सूर्याच्या किरणासारखे, सुवर्णवर्णी धिप्पाड होते. त्यांचा व राक्षसांचा काही संबंध नाही. प्राग्ज्योतिषपुर आसामात नसावे. बाणा्सुराची मुलगी उषा हिने कृष्णाचा मुलगा पळवून आपल्या नगरात नेला व जेव्हा बाणासुराने त्याला कैद केले तेव्हा कृष्णाला तेथपर्यंत जाऊन लढाई करून त्याला सोडवावे लागले. कृष्णाबरोबर गेलेल्या लोकांनी असुरकन्यांशी विवाह केला असेही पुराणे सांगतात. त्या शहराचे केलेले वर्णन पारशी इतिहासकारांशी जुळते. महाभारतातील युद्धांत असुरांचा राजा भगदत्त कौरवांच्या बाजूने लढला. तो उत्तर-पश्चिम दिशेने म्हणजे बल्क देशाहून आला असावा. वरुण ही असुरांकडून मिळालेली देवता. असुरांना पूर्वदेव म्हणजे देवांची अधी निर्माण झालेले म्हटले आहे. यज्ञ बहुदा त्यांच्याकडून आला असावा. थोडे असुरविवाहाबद्दल. विवाहाच्या आठ पद्धती सांगितल्या आहेत. दैव,ब्राह्म, राक्षस वगैरे. त्यातील एक आसुर. या पद्धतीत मुलीच्या बापाला व नातेसंबंधितांना पैसे देऊन विवाह करत. असुर दर्यावर्दी झाल्यवर गबर झाले हे वर सांगितले आहेच. तेव्हा ही पद्धत त्यांना सोयिस्कर होती.
पारश्यांच्या इतिहासात पूर्वीच्या असुर राज्यातील एक पद्धत वर्णन केली आहे. मुलींचे विवाह मुलगी किंवा आईवडील ठरवत नसत. तो अधिकार राज्याचा होता. विवाहायोग्य सर्व मुलींना एकत्र करत. प्रत्येकीची बोली होई. जास्त बोली बोलणार्या माणसास ती मुलगी मिळे. जमलेले पैसे सरकारजमा होत. सामान्य मुलींच्या गळ्यात काही पैसे अडकवत व तिला पतकरणार्या पुरुषाला ते मिळत. जास्त कुरुप मुलगी, जास्त पैसे. एखा॒दा गरिब पैशाकरिता तिच्याशी लग्न करे. अशा मुलींचिही सोय लागे. कल्याणकारी सरकार ! हा इतिहास आपल्या धर्मग्रंथांवरून. आता पश्चिमेकडील पारशी इतिहासात काय माहिती मिळते ते बघू.
"स"चा "ह" होत असल्याने (सिन्धू-हिन्दू) असुरचा झाला अहुर. अहुर काही काळ इतरांचे प्रजाजन होते , काही शतके त्यांचे स्वत:चे राज्य होते. बॅबिलॉन ही तायग्रस नदीची काठची त्यांची राजधानी. साम्राज्य प्रचंड होते. अहुरांचे व देवांचे सार्वत्रिक वैर या कालातीलच. याचा काहीसा इतिहास भाजलेल्या वीटावरील चित्रलिपीतून आता उपलब्ध झाला आहे.
"लोकायतकार" पं. देविप्रसाद हे साम्यवादी विचारसरणीचे. त्यांना आर्यांनी आक्रमण करून येथील शांतताप्रिय रहिवाश्यांचा, असुरांचा, विनाश केला हे सिद्ध करावयाचे होते. हे असुर इहवादी, त्यांच्या या इहवादातून चार्वाकाचा लोकायताचा जन्म झाला व यज्ञकर्त्या आर्यांनी त्यांचा नाश केला असा त्यांचा युक्तिवाद. ते पुरावा देतात इन्द्र-वृत्र युद्धाचा व असुरांची संस्कृती प्रतीक असलेली नगरे हडप्पा-मोहेन्जदरो (सिन्धू संस्कृती) यांच्या विनाशाचा. पैकी इन्द्र-वृत्र युद्धाबद्दल आपण वर पाहिलेच आहे की हा आर्य-अनार्य असा संघर्षे नव्हता. सिन्धु संकृती कोणाच्या (आर्यांच्या) आक्रमणाने नष्ट झाली नाही हेही आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. पर्यावरणाचा र्हास हेच कारण सगळ्यांनी मान्य केले आहे. हा र्हास इ.स.पूर्व १५००-१९०० च्या दरम्यान झाला व आर्य इ.स.पूर्व ३०००-४००० दरम्यान आले हेही आता मान्य आहे. तेव्हा सिन्धु संस्कृती व आर्य किमान २००० वर्षे एकत्र, शेजारी शेजारी sनांदत होते हे स्विकारले पाहिजे. असो.
आपण असुर कोण याचा आढावा घेतला आहे. यात इथल्या ग्रंथांचा जास्त उपयोग केला आहे व पाश्चिमात्य इतिहासाचा थोडाच उपयोग केला आहे. एखदा इतिहासप्रेमी त्यावरही लिहील अशी आशा करू. या अशा निरस विषयावर दोन लेख कां ? असते एखाद्याची हौस, दुसरे काय ?
शरद.
प्रतिक्रिया
9 May 2013 - 10:38 pm | पैसा
बरीच माहिती मिळाली. पण असुरांना दुर्गुण कसे चिकटले? आसुरी महत्त्वाकांक्षा, हास्य इ शब्द कसे पचलित झाले असावेत?
10 May 2013 - 1:37 am | अग्निकोल्हा
.
10 May 2013 - 7:07 am | स्पंदना
दोन्ही लेख वाचले अन पचवले.
बरीच माहीती मिळाली, पण तरीही आपल्यामध्ये असुर हे वाईट अन सुर(देव) चांगले ही कल्पना कोठुन आली?
10 May 2013 - 7:10 am | यशोधरा
दोनही लेख वाचले, आवडले. माहितीबद्दल धन्यवाद.
10 May 2013 - 9:20 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
10 May 2013 - 11:39 am | आदूबाळ
मला वाटतं जेत्यांच्या बाजूने लिहिलेल्या इतिहासात असुरांना वाईट असं रंगवलं गेलं असावं.
ही लेखमाला जरी संपली असली तरी तुमचे पुढील लेखन वाचायला आवडेल!
10 May 2013 - 11:42 am | चावटमेला
श्रीकृष्णाचा मुलगा नाही, त्याच्या नातवाला अनिरुध्दाला पळवून नेले होते. प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुध्द.
बाकी लेख नेहमीप्रमाणेच आवडला
11 May 2013 - 9:31 am | उद्दाम
आर्यानी असुर म्हणजे वाइट हे चित्र रंगवले... यादव कुळ असुर होते ना?
11 May 2013 - 9:40 am | प्रचेतस
यादवकुळ क्षत्रियच होते पण तत्कालिन आर्यावर्तात यादवकुळाला कमी प्रतिष्ठा होती.