सैर भैर २

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
11 Apr 2013 - 1:21 am

१९९० सालची गोष्ट असेल. मी नौदलाच्या कुलाब्याच्या अश्विनी रुग्णालयात मनोविकार विभागात विभाग प्रमुख कर्नल पेठे यांच्या बरोबर बसलो होतो. त्यांनी पुढच्या रुग्णाला बोलावले. पुढचा रुग्ण एक वरिष्ठ कर्नल आपल्या पत्नीसमवेत आत आला. कर्नल साहेब ४५ ते ५० च्या मध्ये होते आणि ते गणवेशात होते.ते कुलाब्याच्या थळ सेनेच्या महाराष्ट्र गुजरात आणि गोवा विभागाच्या मुख्यालयात कामाला होते. त्यांची अंगकाठी सडपातळ आणी चालण्यात रुबाब होता. पत्नी साधारण ४० च्या आसपास होत्या.टापटीप आणि छान पोशाख केलेल्या. मी विचारात पडलो कि यात रुग्ण कोण? पेठे सरानी पत्नीला विचारले कि काय म्हणताय आणि साहेब काय म्हणताहेत? मैडम म्हणाल्या कि काय सांगायचे साहेबांचे तेच परत चालू आहे.मी विचारले म्हणजे काय? तर त्या म्हणाल्या डॉक्टर यांची(कर्नल साहेबांची) नजर साफ नाही. सारखी नजर इकडे तिकडे जात असते. मी परत विचारले म्हणजे काय? तर त्या म्हणाल्या साहेब सारखे काही न काही लफडे करण्याचा प्रयत्न करत असतात. मी कर्नल साहेबांकडे पहिले तर ते माझी नजर टाळून इकडे तिकडे पाहत होते. बाईसाहेब म्हणाल्या कि लग्नाला २५ वर्षे झाली तरी त्यांचे हे असे चालू आहे. मुले मोठी झाली तरी काही लाज नाही. पेठे सरानी विचारले कि केंव्हा केंव्हा ते असे करतात. त्यावर मैडम म्हणाल्या कि अहो कार्यालयात सुद्धा त्यांनी स्त्री कर्मचारी ठेवले आहेत. फक्त त्यांचे स्वीय सहाय्यक( assistant) आर्मी चा आहे.सारणी विचारले कि तुम्हाला कसे कळले कि त्यांचे काहीतरी चालू आहे. मैडम म्हणाल्या कि अहो २५वर्षापासून ओळखते मी त्यांना. काही विचारले तर नजर टाळतात. मी पण खमकी आहे मी सारखा त्यांच्या स्वीय सहाय्यकाला फोन करून विचारत असते कि साहेब काय करीत आहेत?पेठे सर म्हणाले कि कार्यालात बायका जास्त आहेत म्हणजे ते लफडे करतात असे होत नाही ना? तर मैडम म्हणाल्या कि डॉक्टर एक बाई सारखी त्यांच्या खोलीत काय करते?एका बायकोला नवर्याचे वागणे जास्त व्यवस्थित कळून येते. पेठे सरानी तेथून जाणार्या एका नर्सिंग च्या विद्यार्थिनीला बोलावले आणि तिचा हात धरला. त्यावर मैडम हसल्या आणि म्हणाल्या कि डॉक्टर हे तुम्ही मला चिडवण्यासाठी करीत आहात हे काय मला कळत नाही का?
यावर कर्नल पेठेनी मला त्या कर्नल साहेबांची मानसिक तपासणी करण्यासाठी वेगळ्या खोलीत जाण्यास सांगितले आणि मैडम शी त्यांनी बोलणे चालू ठेवले. मी कर्नल साहेबाना बाजूच्या खोलीत घेऊन गेलो. त्यांना विचारले कि हा काय प्रकार आहे? तर ते म्हणाले कि माझी बायको माझ्यावर सारखा संशय घेत असते. त्यांच्या डोळ्यात मला वेदना दिसत होती. मी विचारले कि पण तुमच्या कार्यालयात फक्त स्त्रिया कशा आहेत त्यावर ते म्हणाले कि हे आर्मी चे कार्यालय आहे आणि तिथे कोणाला कामावर ठेवायचे हे माझ्या हातात नाही. मी येथे १ वर्षापासून आहे आणि या बायका इथे १० -१५ वर्षापासून आहेतं. उलट कार्यालयात साथ टक्के पुरुष आहेत आणि ४० टक्के स्त्रिया आहेत पण माझ्या बायकोला फक्त त्या बायकाच दिसतात.मला दर अर्ध्या तासाने ती कार्यालयात फोन करते. मी उचलला नाही तर माझ्या सहाय्यकाला खोदून खोदुन प्रश्न विचारते. एखाद्या स्त्री ने चुकून फोन उचलला तर झालेच ती सरळ कार्यालयात येते आणि कोण बाई माझ्या खोलीत आहे ते पाहायला येते. डॉक्टर पार्टी मध्ये सुद्धा हि माझ्यावर बारीक नजर ठेवून असते. वरिष्ठांच्या बायकांशी बोललो तर शामत आणि नाही बोललो तर शिष्टाचाराच्या विरुद्ध गेल्यासारखे. माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या बायकांशी जर जरी हसत खेळत बोललो तर रात्रभर कटकट करीत राहते. डॉक्टर माझ्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत माझी दोन्ही मुले अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत मोठा मुलगा शेवटच्या वर्षाला आणि दुसरा मुलगा पहिल्या वर्षाला आहे.माझे वय आता ४८ आहे आता मी कशाला कुणाशी लफडे करायला जाऊ?आईच्या कटकटीमुळे मुले सुद्धा जास्त दिवस सुट्टीचे घरी राहत नाहीत. पहिल्यांदा त्यांना पण वाटे कि माझे काहीतरी लफडे आहे पण नंतर त्यांनी आडून आडून चौकशी केली तर त्यांना काही तथ्य दिसले नाही. आपली मुले आपल्यावर संशय घेतात हि किती लाजिरवाणी गोष्ट आहे हे म्हणून ते करड्या शिस्तीचे कर्नल साहेब अक्षरशः रडू लागले.ते म्हणू लागले कि डॉक्टर मुलांसाठी म्हणून मी तिला सहन(tolerate) करीत आहे नाही तर कधीच घटस्फोट दिला असता. काहीं काही वेळेला तर आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो. सर्विस रिव्होल्व्हर कानाला लावावी. एक ट्रिगर आणि खेळ खलास. पण मुलांचा विचार येतो आणि हिम्मत होत नाही. वाटते कि आई अशी आहे आणि बाप हि गेला तर मुले पोरकी होतील हो. कर्नल पेठे चे नाव ऐकून मी त्यांना भेटलो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर इलाज करण्याची बतावणी करून तिला घेऊन आलो आहे. आता जे काही करायचे ते तुम्हीच करा. असे म्हणून ते परत रडू लागले. मी कर्नल साहेबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोपटले दोन मिनिटांनी ते सावरले. मी त्यांना विचारले कि सर हे केंव्हा पासून चालू आहे?तर ते म्हणाले ती संशयी अगोदरपासुनच होती मला वाटले कि माझ्यावर अतिशय प्रेम करते म्हणून असेल पण नंतर हे वाढत गेले आणि गेले एक ते दीड वर्षापासून पाणी डोक्यावरून गेले आहे.
मी त्यांना सांगितले कि सर तुमची पत्नी एक मनोरुग्ण आहे(delusional disorder jealous type -विभ्रम किंवा अढळ विश्वास ) आणि तिचा उपचार करण्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. ते अर्थातच त्याला पूर्ण तयार झाले होते. मी त्यांना घेऊन परत पेठे सरांकडे आलो. सरानी तोवर मैडमना हे सांगितले कि तुमच्या यजमानानचा उपचार करणार आहोत पण त्यासाठी तुमचे डोके शांत ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला पण आम्ही काही गोळ्या देणार आहोत त्या तुम्ही सुद्धा घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने त्यांना औषधे सुरु केली गेली. साधारण पंधरा दिवसांनी त्यांच्यात फ़रक पडू लागला आणि जवळ जवळ महिन्याने त्यांना आपली काही तरी चूक होते आहे असे जाणवू लागले. त्यांचा इलाज पूर्ण तीन महिने चालला होता.
त्यानंतर एका पार्टीत कर्नल साहेब मला भेटले तेंव्हा अत्यंत जिव्हाळ्याने आणि कृतज्ञतेने त्यांनी माझी विचार पूस केली. आता त्यांच्या पत्नीची प्रकृती व्यवस्थित आहे असे त्यांनी मला आवर्जून सांगितले.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

11 Apr 2013 - 1:34 am | किसन शिंदे

सारखा संशय येणे हा सुध्दा एक रोग असू शकतो??

प्यारे१'s picture

11 Apr 2013 - 3:45 am | प्यारे१

अति तिथे माती!

किधर भी जाव.

अवांतरः आमच्या एका मैत्रिणीने दिलेला सल्ला: जास्त संवेदनाक्षम प्रगटीकरण असेल तिथे मैत्री करायच्या भानगडीत पडू नको. आम्ही लगेच ऐकतो आहोत. :)

बॉर्र्र.... हीच ती समाजाकडून मिळणारी वागणूक. असो.
मेंटल हेल्थ हा आपुलकीचा विषय असल्याने २ शब्द टंकले एवढेच.

प्यारे१'s picture

11 Apr 2013 - 10:07 pm | प्यारे१

मुदलात घोळ आहे!
प्रतिसाद आपल्यासाठी नव्हता नि नाही.

मेंटल हेल्थ हा 'स्वअनुभवाचा' विषय असल्याने २ शब्द टंकले एवढेच. :)
अगदी प्रत्येकाने योग्य वेळी, आवश्यक तेवढी नि तेवढीच मदत घ्यावी असे वैयक्तिक मत आहे.
मुळात प्रॉब्लेम आहे हेच मान्य होत नाही. जेवढा ऊशीर जास्त तेवढं दीर्घ उपचार करावे लागतात.
(खरे साहेब योग्य सल्ला देतीलच.)

अवांतरः (अगेन नॉट फॉर यु! ;) ) ह्याला आम्ही सभ्य भाषेत 'ये बैला मार मला' नि असभ्य भाषेत 'झगा अंगावर' असे म्हणतो.

मला माहीत आहे की प्रतिसाद माझ्यासाठी नव्हता. परंतु एखादी व्यक्ती संवेदनशील असल्याने मैत्री टाळणे हे सरसकट विधान समाजातील प्रवृत्तीचे निदर्शकच आहे यावर मी ठाम आहे.

प्यारे१'s picture

11 Apr 2013 - 10:20 pm | प्यारे१

ह्याचे कारण अशा व्यक्ती कधी कुठल्या गोष्टीचा कशा प्रकारे समज करुन घेतील ह्याची नसलेली शाश्वती. त्या भीतीपोटी असं होत असावं.

संवेदनशील असणं वेगळं, नि अतिसंवेदना व्यक्त करणं वेगळं. 'जाने तू...' चित्रपटातली नायिका मांजर मेल्यावर करत असलेला 'दीर्घकालीन' शोक हे अतिसंवेदनशीलतेचं एक लक्षण आहे.
(त्याच चित्रपटातली दुसरी नायिका एका वस्तूला पाहून दुसरं इमॅजिन करणं हे आणखीनच वेगळं आहे.)
शोक होणं वेगळं नि शोकाचं विषादात रुपांतर करणं हे वेगळं. विषादानं कुणाचं भलं होत नाही.

सुखे संतोषा न यावे| दु:खे विषादा न भजावे| लाभ-अलाभ न आणावे| मनामाजी ||

शुचि's picture

11 Apr 2013 - 10:30 pm | शुचि

कबूल आहे. पण अतिसंवेदनशीलतेचेही प्रकार आहेत. काहींना ऋतू बदलला तरी त्रास होतो. (सिझनल डिसॉर्डर) प्रमाणे तर काहींना वर सांगीतल्याप्रमाणे भान (राईट पर्स्पेक्टीव्ह) रहात नसेल. परंतु मैत्री (आपुलकी, साथ, प्रेम) ही सर्वांना आवश्यक असतेच. तेव्हा केवळ कोणी अतिसंवेदनक्षम आहे हा मैत्री नाकारण्याचा बेसिस असू नये. उदाहरणार्थ टीन एज मध्ये मुले (अनेकवचन) रिबेलियस होतात. कर म्हटलं की मुद्दाम करत नाहीत. तर मेनॉपॉजमध्ये अतिभावनाप्रधानता, उदासीनता (डिप्रेशन), हॉट फ्लॅशेस (हे झाले दिसणारे) वगैरे लक्षणे आढळतात. मग त्या त्या टप्प्यावर व्यक्तीला वाळीत टाकणे गैर आहे असे मला वाटते. कोणी कमी पडत असेल तर आपण आपला हात लांब करणे अधिक संयुक्तिक ठरेल असे माझे मत आहे.
एनीवे हा वाद घालण्यातही अर्थ नाही. प्रत्येकाने आपला निर्णय आपल्या क्षमतेनुसार, आवडीनुसार घ्यायचा असतो.

प्यारे१'s picture

11 Apr 2013 - 10:39 pm | प्यारे१

'मैत्री न करणे म्हणजे वाळीत टाकणे असे मत लगेचच बनणे ही अतिसंवेदनशीलता होय असे वाटते.

आपल्या सर्व उदाहरणांमध्ये योग्य वेळी, आवश्यक तितकी मानसोपचाराची मदत घेतली जावी असं वरील मत पुन्हा उद्धृत करुन मी माझे दोन शब्द संपवतो. इथे योग्य काऊन्सेलर, मानसोपचार तज्ज्ञ ह्यांची 'जास्त' गरज आहे.
योग, प्राणायाम, ध्यान हे सुद्धा बर्‍याचदा मनाची अस्थिरता कमी करण्यास मदत करतात.

डॉ. खरे (असाल तसे) हाजिर हो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! (हलके घ्या डॉक्टरसाहेब) ;)

सुबोध खरे's picture

11 Apr 2013 - 10:42 pm | सुबोध खरे

कोणत्याही वैयक्तिक वादात न पडता मी एवढेच सांगू इच्छितो कि प्रेमात ( किंवा मैत्रीत) पडणाऱ्या व्यक्तीने हे बघणे आवश्यक आहे कि ती व्यक्ती आपल्यावर मालकी हक्क दाखवीत नाही ना? जर एखादी मुलगी एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडली असेल आणि तो तरुण जर ती कोणत्याही दुसर्या मुलाशी नुसते बोलल्यावर सुद्धा भांडत असेल तर मुलीने सावध राहणे आवश्यक आहे. सुरुवातीला मुलीला असे वाटते कि तो माझ्यावर किती प्रेम करतो? पण नंतर तो तरुण तिच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवू इच्छितो हा प्रकार एका मनोविकाराचा( संशयग्रस्त) असू शकतो. नाते हा सम-बंध( सम बंध) असला पाहिजे ताबेदारी नव्हे

जेनी...'s picture

11 Apr 2013 - 6:23 am | जेनी...

हो तर !
आता इथलच घ्याना ... सगळे संपादक नैत का .. " तु कुणाचा डुआयडी ? ह्याचा का त्याचा ? " असा सारखा
संशय घेत असतात ;)

इरसाल's picture

11 Apr 2013 - 9:14 am | इरसाल

संपादक नै काई (बाबा किनई च्या चालीवर ) इथले रिकाम्टेकडे सदस्यच कर्त अस्त्तत.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Apr 2013 - 12:42 pm | बिपिन कार्यकर्ते

कृपया, संपादकांनी असं ’सारखं सारखं’ विचारलंय अशी ५ उदाहरणं दाखवून द्या.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Apr 2013 - 7:44 pm | निनाद मुक्काम प...

येथे आपले काम सांभाळून संपादकाचे विनामूल्य कार्य करायचे. म्हणजे सुळावरची पोळी आहे , सर्वांना एकाच वेळी खुश करणे शक्य नसते त्यामुळे बिचारे तोंड दाबून मुक्याचा मार सहन करतात ,
कोणीही यावे व शाब्दिक कानशिलात लगावून जाणे त्यांच्या नशिबी असते.

आपण त्यांच्यावर गमतीत सुद्धा टिप्पणी करू नये असे मला वाटते.
3D Smiley Says No Way

मुक्त विहारि's picture

11 Apr 2013 - 8:34 am | मुक्त विहारि

आवडला..

प्रकाश घाटपांडे's picture

11 Apr 2013 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे

आपण नेहमी वाचतो कि चारित्र्याच्या संशयामुळे पत्नीला मारहाण,छळ. इथे पुरुषप्रधान संस्कृती मुळे स्त्रियांवर बंधन तर येतातच पण चारित्र्याच्या / पावित्र्याच्या कल्पनांमुळे सहजीवन त्रासाचे होते. वरील उदाहरणात कर्नल साहेबांनी समजूतदारपणा दाखवला.
काही वेळा संशय खरा ठरल्याची उदाहरणे ही घडतात. आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी जरा चिकित्सक वृत्ती बाळगलेली बरी अशा भुमिकेतुन जाताना नॉर्मल कुठले व अतिरेक कुठला यात सीमा रेषा रहात नाही. इतरांच्या ती लक्षात येते.

अमोल खरे's picture

11 Apr 2013 - 9:51 am | अमोल खरे

हम्म. कठीण आहे. वेळीच उपचार झाले ते बरे झाले नाहीतर अनर्थ झाला असता, ह्या कर्नलने पण आत्महत्येचा विचार अनेकदा केला होता असं लिहिलाय, नशिब काही विपरित झालं नाही ते.

धमाल मुलगा's picture

11 Apr 2013 - 10:17 am | धमाल मुलगा

तो कर्नल बिचारा सभ्य मनुष्य म्हणायचा. आमच्यासारखं आडव्या टाळक्याचं एखादं असतं तर 'वाघ म्हणलं तरी खातो अन वाघोबा म्हणलं तरी खातोच नं? मग वाघ्याच म्हणतो साल्या' म्हणून कुठंतरी शेण खाऊन बसलं असतं राव!

अवघड आहे. डाक्टरबाबू, तुमच्या लेखांमधले एकेक किस्से वाचताना मती गुंग झाल्यागत होतं. मानसिक आजार असतात हे तथाकथित वेड लागणं, कपडे फाडणं हिंसक होणं वगैरे इतपतच ठाऊक होतं. छोट्या छोट्या गोष्टीतही ह्या बाबी कशा सापडू शकतात हे कळतंय ते तुमचे अनुभवसिध्द लेख वाचून.

लिहिते रहा डाक्टरबाबू, लिहिते रहा! तुम्ही एका खूप वेगळ्या बाबीवर प्रकाश टाकतात. आमच्यासारख्या अडाणी जनतेला एक नवा दृष्टीकोन मिळू शकतो ह्यातून.

आपला,
(अंमळ वेडगळ) धम्या.

धमाल मुलगा's picture

11 Apr 2013 - 10:20 am | धमाल मुलगा

"तुम्ही एका खूप वेगळ्या बाबीवर प्रकाश टाकतात" हे "तुम्ही एका खूप वेगळ्या बाबीवर प्रकाश टाकता आहात" असे वाचावे!

अवांतर - बा नीलकांता, हे विश्वकर्मा, निदान स्वतःची प्रतिक्रिया इतर कोणी उपप्रतिसाद देऊन बंद करण्यापुर्वी तरी संपादित करु दे रे बाबा! रोडगा वाहीन तुला. :)

आरति २३'s picture

11 Apr 2013 - 1:52 pm | आरति २३

आवडला..

दादा कोंडके's picture

11 Apr 2013 - 2:14 pm | दादा कोंडके

असल्या गोष्टीसुद्धा मानसिक रोग असू शकता आणि त्याच्यावर उपचार होउ शकतात हे वाचून आश्चर्य वाटलं.

खूप वर्षापुर्वी वाचलेल्या कुठल्याश्या लेखात परदेशी होणार्‍या नवनवीन (शारिरीक आणि मानसिक) रोगांवर होणार्‍या संशोधनाची खिल्ली उडवली होती. लेखकाच्या मते हे सगळे श्रिमंतांचे खेळ आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये रहाणारी माणसं बघा दगड खाउन दगड पचवतात. त्यांना तुमचे असले फिबिया किंवा क्यालेस्ट्र्वालची भिती वाटत नाही असंही त्यांचं म्हणणं होतं.

सुबोध खरे's picture

11 Apr 2013 - 10:19 pm | सुबोध खरे

धट्टी कट्टी गरिबी हा एक मराठी मनाचा आवडता खेळ आहे. आपल्या संपत्ती मिळवण्याच्या प्रयत्नात आलेले अपयश झाकण्यासाठी मराठी मनाने गेल्या काही पिढ्यांपासून मनाशी गोन्जारलेले हे वाक्य आपल्याला वेगवेगळ्या स्वरुपात भेटीस येते. लुळ्या पांगळ्या श्रीमंती पेक्षा धट्टी कट्टी गरिबी हि श्रेष्ठ आहे हे ते वाक्य.
दुर्दैवाने हे पूर्ण असत्य आहे( अर्धसत्य सुद्धा नाही).
झोपडपट्टीतील लोक दगड सुद्धा पचवतात या इतके असत्य वाक्य दुसरे नसेल. बालमृत्यू कुपोषण अकाली मृत्यू अकाली वार्धक्य हे गरिबीच्या पाचवीला पुजलेले आहेत. त्यांची आयुर्मर्यादा हि ५० आणि ५२ (स्त्री आणि पुरुष) आहे.
त्यांना होणारे मनोविकार हे व्यवस्थित उपचार न होता बाबा तांत्रिक मांत्रिक यांच्याकडे जास्त प्रमाणात नेले जातात आणि बिचारे रुग्ण फसवले जातात किंवा शोषण केले जातात.
त्यांना कोलेस्टेरोल रक्त दाब वगैरे रोग होत नाहीत हे तितकेच असत्य आहे. के इ एम किंवा नायर रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग पहिला तर या रुग्णांनी भरलेला आहे. दुर्दैवाने त्यांना रोजची औषधे पथ्य ई गोष्टी परवडत नाहीत. हातावर पोट असणार्या व्यक्तीला तुम्ही पूर्ण विश्रांती घ्या हे सांगणे डॉक्टरला शक्य नसते. जे आहे ते परवडणारी औषधे घेऊन जितके दिवस जास्त रेटत येतील तितके दिवस ते रेटीत असतात. हे कटू सत्य आहे. एशियन हार्ट रुग्णालयात किंवा नायर रुग्णालयात असे कित्येक रुग्ण बायपास शस्त्रक्रियेसाठी(economy class) मध्ये आलेले मी पाहिले आहेत. ते सुद्धा कोणत्यातरी समाजसेवी संस्थेने दिलेल्या देणगीतून शस्त्रक्रिया करु शकतातं (नायर रुग्णालयात खर्च १.२ लाख आणि AHI मध्ये २ लाख)

सहमत आहे. देअर इज नो सच थिंग अ‍ॅज टू मच मनी.

दादा कोंडके's picture

11 Apr 2013 - 11:55 pm | दादा कोंडके

त्यांना तसले आजार होत नसण्याचं कारण म्हणजे त्याचं निदानच होत नाही.

जे आहे ते परवडणारी औषधे घेऊन जितके दिवस जास्त रेटत येतील तितके दिवस ते रेटीत असतात. हे कटू सत्य आहे.

सिविल हॉस्पिटलमध्ये कित्येक गरीब रुग्ण जास्तीत जास्त दिवस थांबण्यासाठी आजार बरा झाला तरीही काहिही कारण सांगत असलेले बघितले आहेत. इतकच काय पण बाळंतपणासाठीसुद्धा पैसे नसलेल्या बायका दिवस भरत आले की किरकोळ गुन्हे करून पकडले जाण्याचा प्रयत्न करतात.

कधीतरी इस्पितळात जाण्याचा प्रसंग आला की अशा बाहेर बसलेल्या लोकांना शक्य तेव्हडी मदत करायचा प्रयत्न करतो. पण हे सगळं आतडी पिळवटून टाकणारं दारिद्र्य आणि अगतिकता रोज बघणार्‍या आणि त्याचा काही परिणाम न होउ देता काम करत रहाणं डॉक्टर आणि इतर कर्मचारी लोकांना किती अवघड असेल याची कल्पना येते.

प्रमोद देर्देकर's picture

11 Oct 2013 - 4:34 pm | प्रमोद देर्देकर

खरे आहे डॉक्टर साहेब अहो आपली अर्धी जनता हि कचरा खावूनच जगते. त्याना फक्त ५०% आयुष्य जगता येते आणि आले दिवस आपला म्हणून हे लोक धकलतात.

Mrunalini's picture

11 Apr 2013 - 2:20 pm | Mrunalini

लेख आवडला. :)

धन्य त्या कर्नलची जो इतकं सहन करीत राह्यला.
अन धन्य तुमची जो तुम्ही हा प्रकार औषधाने बरा होतो अस सांगताहात.
थ्यँक्यु!

चौकटराजा's picture

11 Apr 2013 - 5:35 pm | चौकटराजा

माझ्या ८५ वर्षाच्या मातोश्रीना अल्झाईमर चा विकार जडला आहे. हा पेशंट अत्यंत आत्मकेंद्री झालेला असतो. आरडाओरडा करणे , शिव्या देणे ई. लक्षणे आहेत. माक्ष्या वाचनात एक लेख आला .त्यावरून मी " केअरटेकर" या नात्याने स्वता: ला बदलले.पण हा बदल माझ्या पत्नीला करता आला नाही तिच्यात. सबब तिचीच कटकट अधिक वाढली.इतकी की मी तिला मानसोपचार तज्ञाक्डे दाखवू असे म्हणू लागलो. त्यामुळे तिच्या रागात भरच पडू लागली.म्हणे"तुमच्या आईला काय ते उपाय करा...माझ्याकडे बोट दाखवू नका ! " मला आता ८५ च्या घरात असलेल्या आईवर काहीही उपचार करायचे नव्हते.पण दोन दोन पेशंट घरात् नकोत म्हणून मी एक आयडीयेची कल्पना केली. आईला तज्ञाकडे न नेताच तिचे व्हिडीओ दाखविले . घरची इतर परिस्थीती सांगितली. त्याने औषध लिहून दिले. मी ते पंधरा दिवस मुद्दाम पत्नीच्या देखत आईला देउ लागलो. आईच्या वर्तणुकीत थोडासा फरक पडला. पण रोगीपणाचा शिक्का पत्नीवर न बसता आईवर बसला.याचे समाधान म्हणून की का पत्नीची कटकट बंद् झाली आहे. औषधाच्या काही गोळ्या शिल्लक आहेत. आता आई कशी का वागेना आता आमच्या घरात दोन नव्हे तर एकच पेशंट उरला आहे.

दादा कोंडके's picture

11 Apr 2013 - 6:10 pm | दादा कोंडके

मस्त उपाय केलात.

बाकी धागा आणि हा प्रतिसाद वाचून मला स्वतःमधे आणि आजुबाजुच्यांमध्ये असल्या विकारांची लक्षणं दिसायलागली आहेत. ,)

मनोरुग्ण आजूबाजूच्या नातेवाईकाना मनोरुग्ण बनविण्यात पटाईत असतो.( अहेतुकपणे) इतराना मोठ्या चातुर्याने स्व्तः ला
या फासातून वेळोवेळी सोडवावे लागते. मी माझ्या मतिमंद ( खरे तर गतिमंद ) मुलीचे ना कधी फार लाड केले ना तिला कधी हिडीस फिडीस केले.शेवटी आपल्यातही तारतम्य फार महत्वाचे असते. नाहीतर आपणही सायकियट्री विभागाची वाट चालू लागतो.

बाब्बौ! अवघड प्रकरण आहे हे!

अनन्न्या's picture

11 Apr 2013 - 6:59 pm | अनन्न्या

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

राही's picture

11 Apr 2013 - 8:06 pm | राही

अगदी जवळच्या नात्यांत ओसीडी,स्किझोफ्रेनिया,अल्झाय्मर असे रुग्ण पाहिले आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटतेच, पण या रोगांविषयी कितीही शास्त्रीय ज्ञान प्राप्त केले तरी त्यांना सांभाळून घेणे खूप कठिण असते.त्यांचे कोणते हट्ट पुरवल्याने ते शांत रहातील आणि कोणते हट्ट पुरवल्याने अधिकच बेताल,अधिकच हट्टी होतील हे ओळखणे कठिण. औषधांचे अवांतर परिणामही खूप असतात. आक्रमक होऊ नयेत म्हणून सौम्य सिडेटिव्ज दिली जातात. मग त्यांच्या झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या वेळा बदलतात. कधीकधी अतोनात भूक लागते. बुलेमिया होतो. त्यामुळे पोट बिघडते.भेटायला येणारे नातेवाईक मनोविकारांच्या बाबतीत बहुधा अनभिज्ञ असतात. त्यांच्या समोर अल्झाय्मर झालेली माणसे 'अरे,आज माझा चहा झालाच नाही' किंवा 'पुरणपोळ्या बर्‍याच दिवसांत खाल्ल्या नाहीत बुवा' असे काहीतरी बोलतात. ते खरे नसते हे समोरच्यांना समजत नाही. ते कुणाबरोबर तरी पोळ्यां पाठवून देतात. आणि पुन्हा फोन करून 'भरपूर खाल्ल्यात ना?'(तुमच्यापर्यंत पोचल्या ना?)असेही विचारतात. अशा बारीकसारीक अनेक गोष्टी घरातल्या इतरांच्या मनस्तापाला कारणीभूत होतात. बहुतेक मनोरुग्ण तक्रारखोर असतात. अख्खे जग आपल्यावर अन्याय करतेय,आपल्याकडे दुर्लक्ष केले जातेय,असा एक गंड असतो आणि तो आल्यागेल्यासमोर मांडून त्याची सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न असतो. विकार तीव्र असेल तर इतरांच्या लक्षात येतो आणि थोडीफार सहानुभूती मिळते पण सौम्य डिसॉर्डर असेल तर त्याला नॉर्मल समजून समाजाकडूनही अत्यंत वाईट वागणूक मिळते. आपल्याकडे याविषयी जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. मतिमंदांच्या, भिन्नमतींच्या मनोविकलांच्या संस्थांमधून थोडेफार काम करताना आलेले अनुभव वाईट आहेत. शहरी निम्नस्तर आणि ग्रामीण भाग येथे अशा लोकांना अत्यंत अमानुष वागणूक मिळते. पश्चिम भारतात श्रीमंती आणि दातृत्वाबद्दल प्रसिद्ध असलेल्या समाजातल्या एका धनिक कुटुंबातल्या एका मनोरुग्ण मुलीला बाल्कनीत अन्नपाण्याशिवाय कोंडून ठेवलेले पाहिले आहे. औषधोपचारासाठी काही डॉक्टरांची नावे सुचवली असता आणि स्वतः नेण्याची तयारी दर्शवली असता 'क्या करना है दवापानी करके? एक तो लडकी और ऊपरसे यह बीमारी' असे ऐकायला मिळाले होते. बाल्कनीच्या गजांआडून ती मुलगी येणार्‍या जाणार्‍यांकडे करुण नजरेने बघत असायची. अखेर या सगळ्याचा अपेक्षित तो शेवट झाला. अशा अनेक गोष्टी. आठवल्या की दु:ख होते, हतबल वाटते.

सुबोध खरे's picture

11 Apr 2013 - 9:44 pm | सुबोध खरे

अल्झाय्मर या रोगात जवळची स्मृती अगोदर नष्ट होते आणि जुनी स्मृती त्यामानाने जास्त टिकते त्यामुळे रुग्णाला थोड्यावेळा पूर्वी काय केले होते ते आठवत नाही पण खूप जुन्या गोष्टी आठवत राहतात. माझ्या सासुबाईनचे वडील यांना लग्नानंतर औरंगाबाद येथे भेटायला गेलो होतो (१९९३). तेंव्हा त्यांनी मला आम्लपित्त होते तर मला मारीची बिस्किटे आणून द्या असे अर्ध्या तासात तीन वेळा सांगितले. माझ्या पत्नीचे मामा हे अतिशय कानकोंडे झाले होते. पत्नी च्या आजोबाना भेटल्यावर मी मामांना बाहेरच्या खोलीत सांगितले कि हा त्यांच्या रोगाचा एक भाग आहे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही त्यांची हेळसांड करीत आहात असा माझा गैरसमज होण्याची शक्यता मुळीच नाही तेंव्हा तुम्ही निश्चिंत रहा. हे सांगितल्याने ते शांत झाले. नाहीतर बहिणीचा जावई पहिल्यांदा भेटीस आला आणि आपले वडील त्याला बिस्किटे आणून द्या म्हणून विनंती करतात हे त्यांच्या पचनी पडत नव्हते.

रुग्णाने मला काहीतरी आणून द्या हे सांगितल्यावर लोकसुद्धा आपण किती काळजी करतो हे दाखवण्यासाठी रुग्णाला मागितलेल्या गोष्टी लगेच आणून देतात पण त्यांना हे समजत नाही कि जवळच्या नातेवाईकाला किती संकुचित किंवा लाजिरवाणे होते.यात त्या रुग्णाची पूर्ण काळजी घेणाऱ्या व्यक्तीला विचारल्याशिवाय काही देऊ नये हि साधी गोष्ट लोकांना कळत नाही.
मनोविकार जर काठावर असेल तर तो रोग आहे हे मानण्याची सर्वसामान्य लोकांची तयारी नसतेच उलट तो रुग्ण नखरे करीत आहे अशीच धारणा केल्याने रोग बरा होण्यास तितका विलंब लागतो. त्यावर मनोरुग्ण म्हणजे वेडा आणि त्याला शॉक द्यावा लागेल. शॉक थेरेपी म्हणजे काही तरी भयंकर आहे असा गैरसमज पसरवण्यात प्रसारमाध्यमांचा अत्यंत वाईट असा हातभार लागत राहिला आहे. तसेच मनोरुग्णालयात भरती करणे म्हणजे भयंकर आहे असे पण पसरविले जाते त्यामुळे त्याबद्दल प्रचंड गैरसमज सुद्धा आहेत नुकत्याच चालू असलेल्या एका धारावहिकेत( राधा हि बावरी) मध्ये हाच प्रकार चालू आहे असे ऐकले.
वेड हा बरा न होणारा प्रकार नाही तो औषधांनी व्यवस्थित आटोक्यात येतो आणि रुग्ण जवळ जवळ सामान्य जीवन जगू शकतो. यात शॉक थेरेपी आणि औषधे हि तितकीच लागू पडतात. पण सहसा नातेवाईक शॉक थेरेपिला नकार देतात असे आढळून आले आहे. खरेतर औषधांचे अतिरिक्त परिणाम( side effects) हे शॉक थेरेपी पेक्षा कितीतरी जास्त असतात.
दुर्दैवाने मनोविकारांबद्दल जनतेत जितके ज्ञान आहे त्याच्या कितीतरी पट जास्त गैरसमज आहेत आणि जो वर हि परिस्थिती बदलत नाही तोवर मनोरुग्णांचा कोणीही वाली नाही

राही's picture

11 Apr 2013 - 8:19 pm | राही

मराठीमध्ये अल्झाय्मर्स डिसीझ च्या रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकांची कथा सांगणारे 'गोठलेल्या वाटा'हे शोभा चित्रे यांनी लिहिलेले पुस्तक वीसेक वर्षांपूर्वी वाचले होते ते तेव्हा खूप भिडले होते.

शिल्पा ब's picture

11 Apr 2013 - 11:54 pm | शिल्पा ब

असाच विचित्र प्रकार आमच्या ओळखीत पहायला मिळाला. नवरा सारखा बायकोवर "तु काय करते? कोणाशी बोलते? तुझं कोणाबरोबर तरी लफडं आहे.." "मी तुझ्यामागे डिटेक्टीव्ह सोडतो" असलं कैतरी चालायचं/ अजुनही असेल. ती बिचारी "मी दिवसभर घरातंच असते, काय डिटेक्टीव्ह लावायचेत ते लावा" असं म्हणुन दिवस काढते. आता काय बोलणार ! उपचार घ्या म्हणुन सांगितलं तर तो नवरा अजुनच पिसाळेल...मग अजुन त्रास.

गुलाम's picture

12 Apr 2013 - 6:20 pm | गुलाम

याच विषयावर डॉ. कृष्णा मस्तूद यान्चा सप्तरन्ग मधील हा लेख देखील वाचनीय आहे.

माझ्या स्वत:च्या नात्यातील एका व्यक्तीस हा प्रॉब्लेम आहे आणि मला त्याना मदत करायची खूप ईच्छा आहे. परन्तू अशा केसेस मधील सर्वात मोठा अडसर म्हणजे पेशन्टला मानसोपचार करून घेण्यासाठी राजी करणे. मला माहीती आहे की जर मी त्या पेशन्ट समोर असा काही बोललो तर तो कधीच राजी नाही होणार ऊलट "तुम्ही सगळे मला वेडे ठरवत आहात " असे म्ह्णून आकान्तताण्डव करेल. असे झाले तर प्रश्न जास्त चिघळेल. डॉक्टरसाहेब अशा पेशन्ट्ला ऊपचार करून घेण्यासाठी राजी कसे करावे याबद्दल कॄपया मार्गदर्शन करावे ही विनन्ती.

<<अवान्तरः अवान्तर मधे 'वा' वर अनुस्वार कसा द्यावा?? >>

दादा कोंडके's picture

12 Apr 2013 - 6:58 pm | दादा कोंडके

सहमत.

एखाद्याच्या/एखादीच्या मानसिक रोगावर खरोखरच समुपदेशन करायचं असेल तर वन-टू-वन संभाषण महत्वाचं असतं. त्यासाठी त्या व्यक्तीला विश्वासात घ्यावं लागतं. त्यासाठी हेतू स्वच्छ असणं गरजेचं आहे. उगाच आपण मदत करत आहोत हे चार-चौघांना कळण्यासाठी त्याव्यक्तीला मानसिक रुग्ण ठरवलं तर ती व्यक्ती जास्त बिथरण्याचा धोका असतो.

सुबोध खरे's picture

13 Apr 2013 - 1:18 pm | सुबोध खरे

"उगाच आपण मदत करत आहोत हे चार-चौघांना कळण्यासाठी त्याव्यक्तीला मानसिक रुग्ण ठरवलं"
अति उत्साही लोक रुग्णाला मदत करण्याऐवजी त्याचे नुकसानच करीत असतात अशा अतिउत्साही लोकांना आवर घालणे सुद्धा कठीण असते. यात "मी"पण रुग्णाला मदत करण्यापेक्षा जास्त असते

शुचि's picture

12 Apr 2013 - 7:00 pm | शुचि

उत्तम प्रश्न!!! आयर्न फीस्ट इन व्हेल्व्हेट ग्लव्ह लागते.

मनीषा's picture

13 Apr 2013 - 9:29 am | मनीषा

फक्त काही औषधे घेऊन अशा प्रकारचा मानसिक आजार बरा होऊ शकतो? की औषधोपचारांबरोबर इतरही काही उपाय करायचे असतात?
औषधे घेण्याचे थांबविल्यानंतर हा आजार परत उद्भवण्याची शक्यता असते का?

अतिसंशयी व्यक्तींबरोबर राहणे खरोखरीच अति कठिण असते. त्या कर्नलसाहेबांच्या सहनशक्तीची कमाल आहे.

सुबोध खरे's picture

13 Apr 2013 - 1:37 pm | सुबोध खरे

मनोरुग्णांचे ढोबळ मानाने दोन प्रकार असतात. एक म्हणजे न्युरोसीस म्हणजे ज्या रुग्णाला आपल्याला आजार आहे याची कल्पना असते असा(insight) उदा. नैराश्य (depression) किंवा OCD (obsessive & compulsive disorder) अशा रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकाला जर आपण त्याच्या आजाराची कल्पना दिली तर तो रुग्ण आपल्या वर इलाज करून घेण्यास तयार होतो.

दुसरा प्रकार म्हणजे सायकोसिस ज्यात रुग्णाला आपल्याला काही आजार झाला आहे हि कल्पनाच नसते ( lack ऑफ insight) उदा. एखादा वेड (उन्माद) याचा रोगी. त्या रुग्णालाला येणारे आवाज. हे त्याच्या दृष्टीने खरेच असतात किंवा त्याला आपण अतिविशिष्ट व्यक्ती आहोत असे वाटत असेल तर ते त्याला समजावून सांगणे अशक्य असते. DELUSION(FALSE BUT UNSHAKABLE BELIEF) अढळ विश्वास हे लक्षण असे आहे कि तुम्ही कितीही जीव तोडून सांगा त्याला ते पटत नाही. संशयग्रस्त माणसाला तुम्ही कितीही पुरावा द्या तो सहज तुमचे म्हणणे मान्य करणार नाही. यात जो रुग्ण बेफाम होतो किंवा अनावर होतो अशाला सरळ जबरदस्तीने मनोविकार तज्ञा कडे न्यावे लागते. पण जो रुग्ण एरवी सामान्य असतो त्याच्या बाबतीत प्रथम त्या मनो विकार तज्ञाकडे सल्ला मसलत करावी लागते आणि त्याप्रमाणे त्याला समजावून त्याच्याशी गोडीगुलाबीने वागून आपले काम साधावे लागते.
गेल्या १० -१५ वर्षात औषधे इतकी सुरेख आलेली आहेत कि आता बरेचसे मनोरुग्ण केवळ औषधावर पूर्ण बरे होतात किंवा आटोक्यात येतात. काही मनोविकार असे आहेत कि ते परत उदभवु शकतात यासाठी त्या रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकास त्यावर लक्ष ठेवावे लागते आणि वेळोवेळी मानसोपचार तज्ञाकडे जावे लागते. यासाठी कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरतो.
येथे सरसकट सर्व मनोविकारावर काय करावे हे सांगणे शक्य नाही. कोणाला विशिष्ट रोगाबद्दल माहिती हवी असेल तर व्य.नि. करावा हि विनन्ति.

अप्पा जोगळेकर's picture

13 Apr 2013 - 4:21 pm | अप्पा जोगळेकर

अति लाड झाल्यामुळे,अति कुरवाळले गेल्यामुळे काही व्यक्ती हिंसक,आक्रताळ्या बनलेल्या असतात. आणि अशा वर्तणुकीचा सोयीनुसार हत्यार म्हणून वापर करण्यात देखील त्या तरबेज असतात.
त्यामुळे बर्‍याच वेळेला ती विशिष्ट व्यक्ती ढोंगी आहे की मनोरुग्ण आहे हे ठरवणेच अवघड वाटते.
शिवाय आक्रस्ताळेपणा कुठे संपतो आणि मानसिक रोग कुठे सुरु होतो हे कसे ठरवणार.
आमच्या बिल्डिंगमधली एक बाई मनोरुग्ण होती. दरवाजांची आदळ आपट करणे, रात्री बेरात्री जोरजोरात विव्हळणे, मोठमोठ्याने शिव्या देणे, घरात नुसते बसून सदासर्वकाळ सिगरेटी फुंकत राहणे असे उद्योग चालत. तिचा नवरा जेंव्हा जेलमधून सुटून परत घरी आला तेंव्हा त्याने तिला पट्ट्याने झोडून आठ दिवसात सरळ केले.
त्याआधी तिला शॉक ट्रीटमेंट देउन सुद्धा काही झाले नव्हते पण नवर्‍याचा झटका बरोबर लागू पडला. याला काय म्हणावे ?

मनीषा's picture

13 Apr 2013 - 6:25 pm | मनीषा

बाप रे ! तुमच्या सोसायटीमध्ये असे लोक राहतात?

अप्पासाहेब,
शॉक ट्रीटमेंट ने सुधारली नाही याचा बहुधा अर्थ असा आहे कि तिला मनोविकार नसावा. आणि ढोंग दूर करणे हे मनोविकार तज्ञाच्या आवाक्याबाहेरचे आहे. तो जास्तीत जास्त हे सांगू शकेल कि तिला मनोविकार नाही. पुढचा भाग हा नातेवाईकांचा असतो तो बहुधा त्या नवर्याने केला असावा म्हणून गोष्टी सुधारल्या. (अर्थात हा कयास तुमच्या सांगण्यावरून बांधला आहे)

कवितानागेश's picture

13 Apr 2013 - 4:36 pm | कवितानागेश

...वाचतेय.

पैसा's picture

13 Apr 2013 - 6:27 pm | पैसा

अवघड आहे!

चौकटराजा's picture

13 Apr 2013 - 6:32 pm | चौकटराजा

मातोश्रीस अल्झाइमर झाल्याने काही त्रास सुरू झाले.जुने सारे आठवणे व जास्तच आठवणे व अलीकडचे न आठवणे हा एक ठराविक भाग या रोगाचा आहे. बाकी सारखे भूक लागली असे बडबडणे हे ही असते. पण माझ्या आईचा या ही अवस्थेत सेन्स ओफ ह्युमर खूप शाबुत आहे. व मी गमत्या स्वभावाचा असल्याने तिच्या बरोबरची माझी देवाणघेवाण क्लेशकारक नसते. तिच्या विस्मरण रोगामुळेच मला १९४० ते १९५० दरम्यानची कधीही न ऐकलेली गाणी कविता तिच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. ती काही वेळेस म्हणते "मर मेल्या मर" पण मी न रागावता तिला म्हणतो " आई, हे वाक्य जित्या मर जित्या असे हवे ना ? तू म्हणतेयस मर मेल्या ! मेलेला पुन्हा कसा मरणार ? यावर ती " हुशार आहेस असा रिमार्क मारते. याला जीवन ऐसे नांव !