हि १९९१-९२ ची गोष्ट आहे. मी पुण्यात एम डी करीत होतो. माझे लग्न झालेले नव्हते. सरकारी नोकरी होती. खिशात पैसे होते आणि घरची जबाबदारी हि नव्हती आई वडील आणि थोरला भाऊ नोकरी करीत होते. पुण्यात सायंकाळी वैशाली किंवा रुपाली मध्ये पुणेकर भाषेत पडीक असायचो.बरोबर अभियांत्रिकीतील मित्र जे असेच नोकरी संपल्यावर हिरवळ पाहण्यासाठी हजर असत.
एकदा एक मित्र म्हणाला कि अरे मी ज्या पंपावर पेट्रोल भरतो तिथे काम करणारा एक मुलगा जर बरा नाहीये बघतोस काय?
मग तो आणि मी कर्वे रोड वर माडीवाले कॉलनीच्या जवळपास कोणतातरी पेट्रोल पंप होता तेथे गेलो. तिथे एक राजू नावाचा किडकिडीत मुलगा (२५-२६ वयाचा) त्याने दाखवला. त्याला विचारले काय त्रास होतोय तर तो म्हणाला मला शौचाला साफ होत नाही आणि वारंवार
लघवी साठी जायला लागते. त्याला विचारले कि तुझे वजन किती कमी झाले आहे. तो म्हणाला काय १०-१२ किलो कमी झाले असेल.त्याच्याकडे पाहूनकाहीतरी फार वाईट आहे असे मला आतून वाटत होते मी त्याला तसाच माझ्या कायनेटिक होण्डा वर बसवून कमांड हॉस्पिटल ला आमच्या विभागात घेऊन गेलो. त्याची सोनोग्राफी केल्यावर मला असे जाणवले कि त्याचा शौचाचा मार्ग आणी मूत्राशय यात एक गोळा आहे आणी त्याच्या दबावामुळे त्याला वारंवार लघवी होत होती.त्याला विचारले तू राहतोस कुठे? तो मुंढवा गाव येथे राहत होता.त्याला रुबी हॉल मध्ये सी टी स्कॅन करण्यासाठी मी सांगितले तर त्याच्याकडे तेवढेहि पैसे (१३०० रुपये) नव्हते. मग मी त्याला २ दिवसांनी येण्यास सांगितले. दोन दिवसांनी
आमचा सी टी स्कॅन चे अंशान्कन recaliberation होणार होते तेंव्हा त्यात त्याचा सी टी स्कॅन मी फुकट करून दिला त्याला लागणारे औषध sampleचे दिले.दुर्दैवाने सी टी स्कॅन मध्ये त्याला गुद्द्वाराचा कर्करोग(anaplastic carcinoma rectum) असल्याचे दिसत होते (दुर्दैवाने माझी शंका खरी ठरली होती )आणि तो सर्वत्र पसरला होता. त्यने विचारले डॉक्टर काय निदान आहे.मी त्याला सांगितले कि तुला कर्करोग आहे त्यावर त्याला धक्काच बसला तो मला म्हणू लागला कि २५-२६ वयाला कसा कर्करोग होऊ शकतो.त्याला शांतपणे समजावले कि असे होते. तो म्हणाल मी दुसरीकडे दाखवून येतो. मी ठीक आहे म्हटले. आणि त्याला दोन दिवसांनी येण्यास सांगितले. तो दोन दिवसांनी परत आला तेंव्हा त्याच्या डॉक्टरनी तेच सांगितले होते.तो विचारात होता कि साहेब हा रोग बरा होईल ना? मला माहित होते कि त्याचा रोग चौथ्या टप्प्यात होता आणि त्याची सरासरी आयुर्मर्यादा २-३ वर्षे होती त्यामुळे तो रोग बरा होण्यातला नव्हता.पण मि त्याला सांगितले कि आपण शस्त्रक्रिया करून तो गोळा काढून टाकू त्यानंतर त्यावर औषधे देऊन उरलेला कर्करोग पूर्ण जाळून टाकू. तो यावर समाधानी दिसला.
आता प्रश्न हा होता कि याचे काय करायचे. कमांड हॉस्पिटल मध्ये फक्त लष्कराच्या लोकांना कर्करोगावर इलाज करण्याची परवानगी होती.सिविलिअनना नाही.पण माझ्यासारखे माझे काही मित्र होते जे अशी फुकटची समाजसेवा करण्यासाठी तयार असत.त्यातल्या माझ्या एका सर्जन मित्राला मी परिस्थिती सांगितली तर तो म्हणाला त्यात काय आहे आपण निदानात कर्करोग न म्हणता पोटात गोळा आहे असे म्हणून त्याची शस्त्रक्रिया तर करून घेऊ. केमोथेरपी चे नंतर पाहू.
त्याची शस्त्रक्रिया आम्ही प्रशिक्षणा साठी असतात त्या रुग्णात अंतर्भूत करून करवून घेतली. त्याने निदान त्याला शौचाचा त्रास आणि वारंवार लघवी होत होती तो त्रास तरी बरा झाला.शौचास साफ होऊ लागल्यामुळे त्याचा आहार हि सुधारला होता आणि रुग्णालयातून सुट्टी मिळेपर्यंत तो बर्यापैकी आनंदी दिसत होता पुण्यात तेंव्हा काही धर्मादाय गट कर्करोगाच्या रुग्णांना मदत करीत आम्ही त्याच्याशी संपर्क करायचे ठरविले होते. दुर्दैवाने राजू मला परत कधीही दिसला नाही. मी त्यानंतर त्या पेट्रोल पंपावर ३-४ वेळा गेलो देखील पण तेथे त्याचा पत्ता कोणीच सांगू शकला नाही.पुढे त्याचे काय झाले कोणास ठाऊक
कमांड हॉस्पिटल मधेच वंध्यत्व विभागात काम करीत असताना (१९९५-९६) एक दिवस माझ्या स्त्रीरोग तज्ञ मित्राचा फोन आला कि एक स्त्री आहे तिची जननेंद्रिये विचित्र आहेत जरा बघून घे. ती स्त्री आपल्या नवर्याबरोबर आली. नवर्याला बाहेर बसवून मी तिला तपासणी साठी आत घेतले. मी तिला विचारले कि तुला पाळी केंव्हा आली तर ती म्हणाली कि लग्न झाल्यापासून (२ वर्षापासून)पाळी थांबली आहे.सोनोग्राफी केली तर मला असे लक्षात आले कि तिची वरची ३/४ (तीन चतुर्थांश) योनी आणि गर्भाशय नाहीच( जन्मापासून तयारच झाले नव्हते( mullerian agenesis). मी तिला सरळ विचारले कि तुम्ही खोटे बोलता आहात तुम्हाला पाळी येणे शक्यच नाही कारण तुम्हाला गर्भाशय नाहीच. त्यावर ती म्हणाली कि होय हे खरे आहे मला पाळी कधीच आली नाही. त्यावर मी तिला विचारले कि तुम्ही तुमचा यजमानांना हि वस्तुस्थिती न सांगता ( फसवून) लग्न केले आहे. आणि तुमचे यजमान मुलासाठी इतके अधीर झाले आहेत कि त्यांना कळले कि तुम्हाला मुल होणे अत्यंत कठीण आहे तर तुमचे यजमान तुम्हाला सोडून देतील. त्यावर ती २३ वर्षाची स्त्री मला शांतपणे म्हणाली कि हे मला माहित आहे कि ते मला आज ना उद्या सोडून देणार आहेत पण माझे लग्न झाले नसते तर शेजारी पाजारी आणि नातेवाईक यांनी माझे आणि माझ्या आई वडिलांचे जिणे कठीण करून टाकले असते. आता मला यजमानांनी सोडून दिले तर सर्व लोक म्हणतील बिचारीला मूल होत नाही म्हणून नवर्याने टाकून दिले. मी माझे पोट धुणी भांडी करून आणि घरकाम करून भरीन पण चार दिवस तरी सव्वाशीण म्हणून आनंदात जगेन.असे ब्रम्हज्ञान इतक्या कमी वयाच्या बाई कडून ऐकून मी अवाक झालो.
त्या स्त्रीला ३/४ (तीन चतुर्थांश) योनी नव्हतीच. त्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे चालू होते हे त्या स्त्रीला विचारले तर ती म्हणाली व्यवस्थित चालू आहे. त्या नवर्याला सम्भोगाबद्दल अज्ञान असावे किंवा ती स्त्री खोटे बोलत होती.
त्या स्त्री कडून हे तत्वज्ञान ऐकून घेतले माझा रिपोर्ट लिहिला आणी तिच्या हातात ठेवला. दार उघडले तर तिचा नवरा बाहेर उभा होता आणि त्याने लगेच विचारले कि साहेब मुल होईल ना? त्या गरीब माणसाकडे पाहून मला कसेसेच झाले. त्याची दुहेरी फसवणूक झाली होती आणि त्यातून त्याला तुला मुल होणे फार कठीण आहे हे सांगण्याचा मला तेंव्हा तरी धीर झाला नाही. मी केवळ त्याला रिपोर्ट लिहिला आहे तुमच्या स्त्रीरोग तज्ञांना दाखवा एवढेच बोलून दुसर्या रुग्णास आत घेतले.
तिसरी गोष्ट २०१२ डिसेंबर ची आहे.
एक सासू आपल्या सुनेला( वय २१ वर्षे ) ३ महिन्यापूर्वी लग्न झाले आणि तिची पाळी आली नाही म्हणून माझ्या दवाखान्यात (मुलुंड ला) घेऊन आली होती.तिच्या मुत्र तपासणीमध्ये गर्भारपण नाही असे आले होते म्हणून ते तपासण्यासाठी ती आली होती. सुनेची सोनोग्राफी केली तर असे लक्षात आले कि तिच्या बीजांड कोशात (ovary) मध्ये स्त्री बीज निर्मिती थांबली होती. याचा अर्थ तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती.मी तिला विचारले पाळी केंव्हा पासून आलेली नाही. तर ती म्हणाली कि लग्न झाले आणि पाळी बंद झाली.मी तिला म्हटले कि पण तसे वाटत नाही कि तुमची पाळी ३ महिन्यांपासून बंद झाली आहे.
त्यावर ती म्हणाली कि माझी पाळी १ वर्षापूर्वी बंद झाली मी कल्याण ला एका स्त्रीरोग तज्ञाकडे गेले होते त्यांनी माझी रक्त तपासणी केली. ते रिपोर्ट पहिले तर तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाल्याचे दिसत होते. त्यानंतर त्यांनी त्यास्त्री रोग तज्ञांकडून पाळी येण्यासाठी औषधे घेणे सुरु केले आणि पाळी येत होती तेवढ्या सहा महिन्यात लग्न उरकून घेतले. लग्न झाल्यावर सासू कडे गोळ्या घेण्याची चोरी असल्याने तिची पाळी आता बंद झाली होती.
तिची मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती हा दुर्दैवाचा भाग होता पण ते लपवून त्यांनी लग्न उरकून घेतले होते. तिची तपासणी संपल्यावर मी बाहेर आलो तेंव्हा सासुबाई नी विचारले कि निदान काय आहे. मी फक्त एवढेच बोललो कि ती गरोदर नाही.पुढे ती तिचा नवरा आणि सासू काय करणार या प्रश्नाला मी बगल दिली.
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात.
हे वचन म्हणून त्रिकालाबाधित सत्य आहे असे वाटते
प्रतिक्रिया
2 Apr 2013 - 2:31 pm | नगरीनिरंजन
दोन्ही अनुभव फारच विदारक आहेत आणि एक डॉक्टर म्हणून तुम्हाला अशा अनेक अनुभवांना सामोरे जावे लागलेले दिसतेय.
हे सगळं वाचून 'बरं झालं डॉक्टरकीला नाही गेलो' असंच वाटतंय.
लिहीत राहावे.
2 Apr 2013 - 2:51 pm | सुकामेवा
+१
2 Apr 2013 - 3:46 pm | कवितानागेश
खरंय.
अश्या काही प्रोफेशन्समध्ये अनेक वेळेस 'आपण त्याजागी असतो तर काय केले असते', हा विचार अस्वस्थ करतो.
2 Apr 2013 - 5:57 pm | स्मिता चौगुले
+१
असेच म्ह्णते
2 Apr 2013 - 2:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर, वाचतोय एकेक अनुभव. :(
-दिलीप बिरुटे
2 Apr 2013 - 2:56 pm | चिगो
दोन्ही अनुभव विदारक.. दुसरा अनुभव जरा जास्तच टोचला मनाला..
2 Apr 2013 - 3:07 pm | प्रसाद गोडबोले
एक से एक अनुभव आहेत ! डोक्याला शॉट !
अशा प्रसंगांमध्ये पेशंटशी बोलताना त्याची मानसिकता , योग्यायोग्यता , इथिक्स वगैरे चा लईच घोळ होत असणार ह्यात शंका नाही .
(अवांतर : मागील लेखावर दिलेले प्रतिसाद पुर्ण त्रयस्थाच्या भुमिकेतुन देलेले होते ... आता हा लेख वाचुन , " ज्या माणसाला नेहमीच असे अनुभव समोर येतात , नेहमीच असले काही तरी निर्णय घ्यावे लागतात," त्याची अवस्था नक्कीच कठीण आहे असे जाणवत आहे ... मागील लेखावरील त्रयस्थ प्रतिसादांबद्दल दिलगीर आहोत . )
2 Apr 2013 - 3:14 pm | गणपा
तुमच्या या असल्या अनुभवांवर बेतलेल्या लिखाणाला खर तर काय प्रतिसाद द्यावा हा नेहमी प्रश्न पडतो.
पण नुसताच गप्प बसलो तर अनुल्लेखाने मारतो (जे हल्ली इतर अनेक धाग्यांबाबत करतोय) असं होईल.
म्हणुन हा प्रपंच.
तुम्ही लिहित रहा... आम्ही वाचतोय.
2 Apr 2013 - 3:53 pm | आदूबाळ
+१११
2 Apr 2013 - 3:55 pm | स्पा
ह्येच म्हणतो
2 Apr 2013 - 3:28 pm | मन१
कुणी कॅन्सरवाला अडचणीत दिसला तर इथे काही मिळतय का पहा :-
www.cancerarfoundation.org/
गरजूंना आर्थिक मदत मिळू शकते म्हणे
.
@ डॉ खरे :-
गणपा व ननिसारखेच म्हणतो.
2 Apr 2013 - 3:30 pm | प्रकाश घाटपांडे
डॉ साहेब विदारक अनुभव. अशा अनुभवांना सामोरे जाताना आपल्या सदसदविवेकबुद्धीची कसोटी लागत असणार!
2 Apr 2013 - 3:39 pm | प्रभाकर पेठकर
अंगावर काटा आला.
2 Apr 2013 - 3:44 pm | वेताळ
डॉक्टर तुसी ग्रेट हो.
2 Apr 2013 - 5:47 pm | मनराव
असेच म्हणेन
2 Apr 2013 - 3:46 pm | ऋषिकेश
रोचक अनुभव आहेत. रुग्णापासून खरी माहिती लपवली नाहीत व माहिती एखाद्या प्रशिक्षिताप्रमाणे योग्य वेळी, योग्य प्रकारे दिलीत हे उत्तम केलेत.
तसेच रुग्णाच्या हितासाठी लष्करी नियमांशी झगडलात त्याचेही कौतुक वाटते.
2 Apr 2013 - 4:37 pm | निनाद मुक्काम प...
हेच म्हणतो
2 Apr 2013 - 7:13 pm | बंडा मामा
असेच म्हणतो. रुग्णाच्या 'वैद्यकिय हितासाठी' हे महत्वाचे.
2 Apr 2013 - 3:59 pm | यशोधरा
दुसरा अनुभव मनाला अतिशय टोचला! पहिलाही दु:खदायक अहे.
2 Apr 2013 - 4:10 pm | प्यारे१
वाचतोय!
समजून घ्यायचा प्रयत्न करतोय.
2 Apr 2013 - 4:13 pm | पिलीयन रायडर
तुमचे अनुभव-विश्व फार मोठे आहे हो..
अवांतर- हेच मला म्हणायच होतं.. सरसकट सगळ्यांपासुन डॉक्टर लपवतात असा एक सुर लागुन जी चर्चा चालु होती त्याला पुर्णविराम मिळावा.. एवढा अनुभव असणार्या माणसाला कुणाला काय सांगावे ह्याचे तारतम्य नसेल काय? काटेकोर नियमात बसेल असं हे क्षेत्र नाही.. इथे प्रसंगावधान हवे.. जे डॉ. खरे नेहमी दाखवतात..
2 Apr 2013 - 4:31 pm | श्रावण मोडक
उत्तम लेखन. पहिला भागही वाचला आहे. तेथील प्रतिक्रियांचा अकारण आणि बऱ्याचदा पोरकट गदारोळ पाहून काही लिहिले नव्हते.
खरे आणि खोटे (सांगणे) म्हणजे काय, यातील सीमारेषा अत्यंत धूसर असावी, असे हे काही अनुभव पाहता म्हणता यावे. अर्थात, प्रश्न खरे आणि खोटे यांचा नाही. डॉ. सुबोध खरे या आयडीमागे असलेल्या व्यक्तीत बेरकी राजकारण नसावे, असा अंदाज आहे. आणि म्हणून त्यांना फायदा देतो. त्यांचे हे लेखन साधे-सरळच आहे.
पण एक स्पष्ट आहे. या लेखात एक पेच आहे. पहिल्या भागांतही डॉक्टरांनी रुग्णहक्कविषयक नियम आणि संकेत, त्यांच्यादृष्टीने रुग्णाच्या हितासाठी गुंडाळून ठेवले आणि असे नियम वगैरे गुंडाळून ठेवल्याबद्दल इथल्या वाचकांचे फटके खाल्ले. तर्कदुष्टता सोसली. आता पुन्हा एकदा डॉक्टरांनी नियम आणि संकेत, त्यांच्याच दृष्टीने रुग्णाच्या हितासाठी गुंडाळून ठेवले आहेत. आता प्रतिसाद कसे येणार आहेत ते पाहतो आहे.
मागल्या वेळी डॉक्टरांना फटके मारणारे आता त्यांच्या तर्कसंगत भूमिकांशी प्रामाणिक राहतात की डॉक्टरांनी व्यवस्थेशी संघर्ष केला असा पवित्रा घेतात हे पहायचे आहे. तसा पवित्रा घेणाऱ्यांची तर्कसंगत भूमिका अप्रामाणिक असेल. अगदी अप्रामाणिक म्हणण्याइतके ते उच्चभ्रू बुद्धीमत्तेचे नसावेत, असे म्हटले तर त्यांची भूमिका सवडीशास्त्राची आहे, असे म्हणावे लागेल. आणि ते प्रामाणिक असतील तर डॉ. सुबोध खरे यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांना म्हणावे लागेल. तेही ते म्हणणार नसतील तर ती मंडळी छानपैकी एक्स्पोज झाली आहेत, असे मानता येईल.
ही सारी गृहितके लिहून ठेवतोय. या धाग्यावर माझी मते बदलली तर त्यांना तसे म्हणता यावे.
2 Apr 2013 - 4:48 pm | प्यारे१
तुमच्या वर्तुळ कोनाचं नि कोणाकोणाचं काय काय झालं ते लिहा की... ;)
- हलूच काडीसारवी!
मागच्या लेखात देखील रुग्णाला म्हणजे त्या बाईला खरे सांगितलेच होते ना? असो.
2 Apr 2013 - 4:57 pm | श्रावण मोडक
ते लिहायची गरज काय? जागोजागी तो दिसू लागलेला आहेच पूर्वीपासून. या धाग्यावरही दिसेलच, याआधीच्याही धाग्यावर दिसला. आणि गंमत म्हणजे जिथे-जिथे 'डॉ. सुबोध खरे' हे वर्तुळ आहे त्याला कोनाकृती लावलेली दिसलीच. मग म्हटलं, उगाच ते लिहिण्याचे कष्ट का घ्या!
2 Apr 2013 - 5:13 pm | मन१
आशयाशी सहमत.
ह्या आणि अशा अनुभवांवर थेट चूक्-बरोबर भाष्य करणं सोपं नाहिच; ह्याची जाणिव जितक्या लवकर जितक्या अधिक लोकांना होइल ते बरं. नियम, कायदे, सामाजिक नैतिकता आणि वैयक्तिक मूल्ये ह्यांची विचित्र गुंत ह्या प्रकारांत असते. हाइंडसाइअट मध्ये दूरवरूनच "हे १००% चूक ते १००% बरोबर" असे करणे सोपे नाहिच. पुन्हा वर सांगितलेल्या गोष्टींतही(नियम,कायदे, नैतिकता) १००% स्पष्टता नाहिच. बराचसा धूसरपणा आहे.
अशाच घटनांना भाषेत "धर्मसंकट" म्हणतात. तुम्ही काहीही भूमिका घ्या; त्याला शिव्या घालणारा एक वर्ग असणारच.
(फिल्मी उदाहरण :- चित्रपटात खलनायकाने "आई वाचव नाही तर बाप " असा हिरोला सरळ ऑप्शन दिलेला असणे. कुणातरी एकाचा मृत्यू निश्चित असणे. धर्मसंकट म्हणतात ते हेच.)
माझ्या http://www.misalpav.com/node/23613 ह्या धाग्याची आठवण झाली.
2 Apr 2013 - 5:27 pm | श्रावण मोडक
'हाईंडसाईटमध्ये आणि दूरवरून खूप सोपेच असते. वास्तवात कठीण' असे म्हणायचे आहे का?
2 Apr 2013 - 7:24 pm | मन१
१.वास्तवाच्या तुलनेत हाइंडसाइटमध्ये बहुसंख्य गोष्टी सोप्या असतात.
२.सोप्या नसल्या तरी हाइंडसाइटमध्ये घेतलेले निर्णय आणि वास्तवातले हे दोन्ही प्रचंड वेगळे असू शकतात.
(त्या परिस्थितीतील ताण्/गुंत "काळ " नावच्या परिमाणाने अगदिच कमी केलेली असते.)
३.कित्येकदा हाइंडसाइअट वाल्या गोष्टींनाच योग्य ठरवण्याची मानवी भूमिका असते.
( "तेव्हा हे करायला पाहिजे होते" असे म्हणता तेव्हा सूर तोच असतो. "ते चूकच होते" हे अशा धर्मसंकटवाल्या स्थितीत म्हणणार्याला म्हणणे सोपे असते. टिपिकल उदाहरण :- सैनिकी कारवाईत कित्येकदा एखाद्या निरपराधाला संकटात ढकलून अधिक लोकांचे हीत साधता येते. पण "खरेच तसे करावे का?" हा नीतीशास्त्रातला जुनाच वाद आहे."गव्हासोबत किडे रगडले जाणारच" असे त्याचे स्पष्टीकरणही दिले जाते. किंवा "इतका त्याग तर करावाच लागतो सुरक्षेसाठी/प्रगतीसाठी" असे म्हटले जाते.
कित्येकदा धरण वगैरे साठी "राष्त्राच्या प्रगतीसाठी असा त्याग आवश्यक आहे" असे सांगितले जाते. अरे पण त्याग कोणता समाज करत आहे; प्रगती कोणत्या समाजाची होते आहे ते ही जरा पहा ना. नंतर एखाद्या राज्याची खरोखर प्रगती होतेसुद्धा आणी "त्यावेळी त्या सत्ताधार्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता; म्हणूनच ही प्रगती मिळाली" असे अभिमानाने सांगितले जाते. आता तुम्ही ज्याला आज योग्य/बरोबर म्हणताय ते खरेच योग्य/बरोबर होते का? वीस वर्षापूर्वी तुम्ही त्याला योग्य म्हटला असतात का? ह्याच्याच उलट उदाहरण म्हणजे "तेव्हा(दोन चार दशके आधीच)बाजारपेठ/अर्थव्यवस्था खुली केली नाही हे चुकलेच" असे आज म्हणणे. आज चूक वाटणार्या गोष्टी केल्या त्यावेळी त्या इतक्या चूक असतीलच हे नक्की कसे कळणार? त्या त्या ठोकताळ्यांनुसार त्या बरोबरही नसतील का? त्यावर अगणित परिमाणांचा परिणाम दरम्यानच्या काळात झालेला नसतो का?)
--मनोबा
2 Apr 2013 - 5:57 pm | कवितानागेश
अगदी अप्रामाणिक म्हणण्याइतके ते उच्चभ्रू बुद्धीमत्तेचे नसावेत, >>
भारी!!
:D
2 Apr 2013 - 9:21 pm | श्रावण मोडक
या नोंदीबद्दल धन्यवाद. माझ्याविषयीच्या इतर प्रतिसादांना ही परस्पर चपराक मानता यावी. :-)
2 Apr 2013 - 6:59 pm | निनाद मुक्काम प...
पहिल्या भागांतही डॉक्टरांनी रुग्णहक्कविषयक नियम आणि संकेत, त्यांच्यादृष्टीने रुग्णाच्या हितासाठी गुंडाळून ठेवले
आपण क्रमशः वाचले नसावे. ,
दुसऱ्या उदाहरणात असे दिसत आहे , खुद पेशंट खरे ह्यांना आता सत्य माझ्या नवर्याला कळले तरी हरकत नाही अश्या आशयाचे विधान करत आहे.,
पहिल्या उदाहरणात
इतर आयडी म्हणत होते तसे रोग्याला सत्य तारतम्य बाळगून म्हणजे त्यांची मन स्थिती पाहून सांगावे.
आता राजू पुढे खरे ह्यांना भेटला नाही ,माझ्या मते जर तो भेटला असता व खरे ह्यांनी त्यांची ट्रीटमेंट चालू ठेवली असती तर त्याला कोणत्या तरी क्षणी सत्य नक्कीच सांगितले असते असे मला वाटते.
बऱ्याचदा पोरकट गदारोळ पाहून काही लिहिले नव्हते.
श्रामो अश्या पोरकट गदारोळ करणार्यांचे तुम्ही ह्या धाग्यावर आभारच मानायला हवे ,
म्हणजे त्यांनी ह्या धाग्यावर सुद्धा गदारोळ घातला असता ,
तर तुमच्या अमुल्य पोक्त मताला , प्रतिसादाला मिपाकर मुकले असते. ,
लिहित राहा अधून मधून
बरे वाटते.
2 Apr 2013 - 7:09 pm | बंडा मामा
निनाद राव असू देत आपली मते पोरकट आणि ह्यांची उच्चभ्रु बुद्धीमत्तेची. काही हरकत नाही.
2 Apr 2013 - 7:05 pm | बंडा मामा
फरक आहे. इथे डॉक्टर साहेबांनी घेतलेली भुमिका ही केवळ रुग्णाचे 'वैद्यकिय हित' ही आहे. त्यासाठी त्यांनी वाकवले थोडे नियम तर माझा त्यांना पाठींबाच नसुन हे धैर्य दाखवल्याबद्दल त्यांच्याविषयी आदर आहे. मागच्या लेखात त्यांनी 'वैद्यकिय हित' ह्या कक्षेच्या बाहेर जाऊन ढवळा ढवळ करणारा किस्सा दिला होता त्यामुळे लोकांचा रोष ओढवला. हा फरक लक्षात घ्या.
3 Apr 2013 - 5:05 pm | यशोधरा
सहमत.
2 Apr 2013 - 4:41 pm | jaypal
डॉ. लिखाण आणि समयोचित घेतलेले निर्णय आवडले.

(काही गोष्टी जाहीर करण्यास खरच अवघड असतात)
2 Apr 2013 - 4:52 pm | पैसा
तुमचे लिखाण नेहमीच वाचनीय असते. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" असे तुमचे आयुष्य. लिहीत रहा. आम्हाला त्यातून काहीतरी शिकण्यासारखे नेहमीच मिळते.
2 Apr 2013 - 5:00 pm | स्पंदना
एक डॉक्टर असण आणि त्याबरोबर असं संवेदनाशील मन बाळगण खरच किती अवघड असेल तुम्हाला.
2 Apr 2013 - 5:21 pm | चौकटराजा
सुबोध साहेब, दोन्ही अनुभव वाचले, व आपण रिडर्स डायजेस्ट तर वाचत नाही ना असे वाटले कारण विलक्षण वेगळे अनुभव तिथे वाचायला मिळतात. मला आपले कवतिक आदर यासाठी वाटतो की "ओके नेक्स्ट " वाले एम्डी आपण नाही.
पैसा कमावताना कधीतरी मधुन मधुन आपले माणूसपण ही जपायचे असते हा धडा आपण स्वत: गिरवलेला आहेच. पण मिपावाल्यात कोणी सध्या ग्रेज अनाटोमीचे पुस्तक उशाशी घेऊन बसत असतील त्यानाही ही हा एक चांगला धडा ठरावा.
थोडे अवांतर -
यातून मला मतकरीची गोष्ट आठवली- त्यात शेवट असा असतो की --
एके दिवशी त्याच्याही हातावर पांढरा तांबूस चट्टा दिसायला लागला. त्याला विलक्षण आनंद झाला . आता आपल्याला भीक मिळायची मारामार नाय.. आता दादा आपले हात पाय तोडणार नाही डोळे काढणार नाही...
2 Apr 2013 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरेसाहेब, हे लेखन तुम्ही जरी स्वतःच्या अनुभवाचे कथन म्हणून लिहीत असलात तरी लिखाणामुळे आणि त्यावर होणार्या चर्चेमुळे वैद्यकीय निर्णयप्रक्रियेबद्दलची मते (व्यवसायाबद्दलची नाही) सर्वांगीण, वास्तववादी आणि जास्त प्रगल्भ (डॉक्टरला कोणत्या परिस्थितीत निर्णय घ्यावे लागतात आणि आजार एकच असला तरी कोणत्याच दोन रुग्णांच्या बाबतीत परिस्थिती कधीच एकसारखी नसते, म्हणून निर्णय एकसारखा नसला तर आश्चर्य वाटायला नको, हे कळल्यामुळे) होतील असे वाटते... म्हणून तुमचे खास अभिनंदन आणि धन्यवाद !
जरासे आवांतर: वैद्याकीय व्यवसायातल्या निर्णयप्रक्रियेबद्दलची मला भावलेली काही तत्वे खालीलप्रमाणे आहेत. (माझ्या मराठी भाषांतरातील तृटींमुळे त्यांचा वेगळा अर्थ होऊ नये यासाठीच केवळ ती इंग्लिश्मध्ये देत आहे) .
1. A good physician treats patient as a whole and NOT the disease alone. Treating patient as a whole involves consideration to patient’s body, mind and the environment in which she/he lives; all of which have strong influence on each other and ultimately on patient’s wellbeing.
2. Not to factor in environment in the society (including socioeconomic and cultural situation) in which ‘the patient lives’ and ‘the physician practices’ is like saying, “the state of atmosphere does not affect the people who live in it.”
3. It is duty of a physician to be sympathetic BUT avoid to be empathetic at all costs. Empathy raises the risk of distortion of physician’s medical judgment.
4. Because of all the above (and much more), medical practice is called “an art of practicing science”.
अती आवांतरः
Even law is always interpreted in light of the situational realities.
2 Apr 2013 - 6:52 pm | रेवती
नेहमीप्रमाणे लेखन विचारात पाडणारे आहे. लेखनशैली साधी आणि सरळ. या सगळ्याचा आम्हाला काही मिनिटे तरी त्रास होतो हे खरे पण तुम्हालाही तुमच्या व्यावसायीक जीवनाच्या सुरुवातीला होत असणार. साधारण किती वर्षांनी या प्रकारांना सरावलात? तसे सरावणे हे तारीख वार लक्षात ठेवून होत नसणारच, हळूहळू होणारी गोष्ट आहे ती! मी डॉक्टर होऊ शकले नसते किंवा झाले असतेच तर काम करू शकले नसते असे आता वाटते.
4 Apr 2013 - 11:12 am | अमोल खरे
अतिशय संयम हवा असे हे काम आहे. भयंकर कठीण. माझ्या अंदाजाने अनेक डॉक्टर अशा प्रसंगातुन तात्पुरते का होईना, काम करण थांबवत असतील.
2 Apr 2013 - 7:15 pm | उपास
पारदर्शी लिखाण आणि हलवून टाकणारे अनुभव. दुसर्या अनुभवातली त्या बाईने केलेली फसवणूक चटका लावणारी. खरं म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणून काय भूमिका घेतलीत (ती योग्य की अयोग्य मी ज्ञान आणी अनुभवाअभावी सांगू शकत नाही) ही उत्सुकता वाटून गेली. नवर्याला सांगणे की त्या बाईची प्रायव्हसी जपणे... मागे म्हटल्याप्रमाणे शिकतो आहेच.
2 Apr 2013 - 7:46 pm | अनन्न्या
काही वेळा निर्णय चुकतही असतील, पण आपल्यातील माणूस आणि डॉक्टर एकाचवेळी कार्यरत ठेवून प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आणि तितक्याच प्रामाणिकपणे ते मांडणे यासाठी त्रिवार सलाम!!
विषयांतर आणि मतमतांतर होऊ लागले की प्रतिक्रियाच सुचत नाहीत. त्यामुळे काहीवेळा प्रतिक्रिया न देता वाचनमात्र रहावे लागते. असो. आपले अनुभव लिहीत रहा. आपल्या लेखनाची फॅन....
2 Apr 2013 - 7:58 pm | अभ्या..
लिहित राहा डॉक्टरसाहेब. शुभेच्छा.
2 Apr 2013 - 9:03 pm | जुइ
लिहित राहा. वाचतेय. आपले अनुभव खुप विचारात पाडणारे आहेत.
3 Apr 2013 - 9:20 am | स्मिता चौगुले
असेच म्ह्णते
2 Apr 2013 - 10:46 pm | शिल्पा ब
अवघड ए राव !
अवांतरः लोकसत्तेत (बहुतेक) एक कोकणातल्या डॉक्टरांचे अनुभव असलेली लेखमाला यायची. असेच कसोटी पाहणारे क्षण डॉक्टरांना नविन नाहीत पण त्रासदायक मात्र असणार. असो.
3 Apr 2013 - 12:02 pm | पिलीयन रायडर
अहाहा काय आठव्ण काढली..!!
हा सगळा फुकाचा वाद घालण्या पेक्षा हे वाचा..!!
3 Apr 2013 - 6:59 pm | उपास
क्या बात है.. खूप थेंक्स ह्या लिंकसाठी पिलियन.
2 Apr 2013 - 10:52 pm | ५० फक्त
जळजळीत पण मला आवडणारं वास्तवातलं लिखाण,
2 Apr 2013 - 10:58 pm | बॅटमॅन
+१११११११११११.
हेच खरं वास्तव- अभिनिवेशरहित.
2 Apr 2013 - 11:02 pm | प्रचेतस
असेच म्हणतो.
7 Apr 2013 - 12:07 pm | सुधीर
डॉक्टर साहेब तुमचे अनुभव आवडले. गेल्यावर्षी लोकमान्यांचा गीतारहस्य हा ग्रंथ वाचनात आला होता. या ग्रंथातून लोकमान्यांनी मांडलेल्या नीतिमत्तेवरील विचारांनी मला भारावून टाकलं. या ग्रंथाच्या दुसर्या प्रकरणात टिळकांनी अहिंसा- आत्मसंरक्षण, सत्य-सर्वभूतहीत यात लढा कसा पडतो यावर खूप छान विवेचन केले आहे.
अकूजनेन चेन्मोक्षो नावकूजेत्कथंचन।
अवश्यं कूजितव्ये वा शंकेरन्वाप्यकूजनात्।
श्रेयस्तत्रानृतं वक्तुं सत्यादिति विचारितम्।। (शांतिपर्व १०९.१५,१६)
"न बोलता सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये; आणि बोलणे आवश्यकच असेल तर, किंवा न बोलण्यामुळे दुसर्यास शंका येण्याचा संभव असेल तर त्यावेळी सत्यापेक्षा खोटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारान्ती ठरलेले आहे."
नेहमी खरे बोलावे याला अपवाद सांगताना त्यांनी शांतीपर्वातील (भीष्माने युधिष्टिरास सांगितलेल्या) ह्या श्लोकाचा आणि बर्याच उदाहरणांचा दाखला दिला आहे.
8 Apr 2013 - 2:24 pm | सुमीत भातखंडे
.