मि. पा. (का. घो. आ. फे.) मुंबई कट्टा पंचनामा - पुरवणी

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
6 Feb 2013 - 12:29 pm

आदिजोशीने दिलेला 'आँखो देखा हाल' फक्त चर्चगेटहून आलेल्या मिपाकरांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएम) कडून आलेल्या लोकांची संख्या जास्त होती, पण त्यातल्या कुणीच काही लिहिले नाही आणि बहुधा त्यांनी आदीला 'फीडबॅक' दिला नसेल म्हणून त्यानेही त्यांच्याबद्दल फारसे लिहिलेले दिसत नाही. त्यामुळे मीच पुढाकार घेऊन चार ओळी लिहायचे ठरवले. हे जर प्रतिसादात दिले असते तर कुणी वाचले नसते असे मला वाटले म्हणून वेगळा लेख लिहिला आहे.

मला मिळालेल्या संदेशानुसार मी बरोबर ११ वाजता बृ.मुं.म.न.पा.च्या बहिर्गमनद्वारापाशी (एक्झिटगेटजवळ) जाऊन पोचलो. तिथे दोन तरुण उभे होते. त्यांच्या पाठीवरील हॅवरसॅकमुळे ते एमार किंवा आयटीवाले वाटत होते आणि मिपाचे सदस्य असण्याची दाट शक्यता होती. त्यातला एकजण कानाला मोबाईल लावून बोलत होता आणि दुसरा ते लक्षपूर्वक ऐकत होता. ते बहुधा त्यांच्या मिपाकर मित्रांना ते केंव्हा पोचणार असे विचारत असतील असे मला वाटले. पण अचानक तो बोलणारा गृहस्थ एका दिशेला आणि दुसरा त्याच्या विरुध्द दिशेला चालले गेले. बहुधा त्यांना हव्या असलेल्या दिशा त्यांना फोनवरून मिळाव्या असाव्यात. मी बृ.मुं.म.न.पा.पासून तिथे येणार्‍या भुयाराच्या दारापर्यंत फेर्‍या मारत असतांना माझा भ्रमणध्वनी खणाणला. त्यावर किसनने माझी चौकशी केली. आणखी दोघांसह तो स्टेशनवर उतरला होता आणि लवकरच 'मीटिंग पॉइंट'ला पोचणार होता. आम्ही एकमेकांना पाहिलेले नसल्याने कसे ओळखणार हा एक प्रश्न होता. येतांना प्रत्येकाने पावाचा तुकडा सोबत आणावा आणि उंच धरावा असा एकादा आदेश किंवा एकादा कोडवर्ड दिलेला नव्हता. मग आम्ही एकमेकांच्या शर्टांचे रंग विचारून घेतले. त्यांची वाट पहात मी भुयाराच्या दारापाशी उभा राहिलो. किसनच्या सोबत रामदासही होते. मी त्यांना पूर्वी दोन वेळा भेटलेलो असल्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना लगेच ओळखले. मग शर्टांच्या रंगांकडे पहाण्याची गरज उरली नाही.

किसनला आणखी फोन येत होते. मिपाच्या 'आयडी'ज दुसरी तुकडी स्टेशनवर उतरली होती आणखी कोणी कोणी गाड्यांमध्ये प्रवासात होते वगैरे. त्यांना आपण लगेच दिसावे म्हणून आम्ही फिरोजशा मेहतांच्या पुतळ्यापाशी जाऊन उभे राहिलो, पण ऊन सहन करण्याची त्या पुतळ्याला जितकी सवय होती तेवढी मला नसल्यामुळे मी बृ.मुं.म.न.पा.च्या मुख्यद्वारापाशी सावलीची जागा पाहिली. माझ्या सुदैवाने तिथे बसायला एक अगदी पिटुकला कट्टाही मोकळा मिळाला. तिथे एकटाच पेपर वाचत बसलो. आमचे शूरवीर साथीदार उन्हाची पर्वा न करता उभे होते, पण काही वेळानंतर ते नजरे आड झाले. आणखी काही नव्याने आलेल्या सदस्यांसह ते भुयाराच्या दारापाशी जाऊन सावलीला उभे राहिले होते. त्यांच्यातल्या तीन चारजणांनी मिळून एक वर्तमानपत्र धरले होते आणि ते त्यात काही तरी पहात होते. ती इतकी इंटरेस्टिंग बातमी किंवा लेख पाहण्यासाठी मीही आपले डोके त्यात खुपसले तर त्यात माझ्या पूर्वीच्या ऑफीसचा लोगो दिसल्यामुळे माझी उत्सुकता अधिकच वाढली. लोगो पाहून ओळखण्याचे ते एक कोडे आहे असे समजले आणि त्यातले एक उत्तर तर मला पाहताक्षणी मिळाले होते. इतर कोड्यांची उत्तरे रामदास सांगत होते. त्यातल्या '3M' मधल्या तीन शिलेदारांची नावे त्यांनी सांगितली, ती माझ्या कानावर पडली खरी, पण मेंदूपर्यत पोचून त्यांची नोंद काही झाली नाही. माझ्या आयुष्यात मला त्यांची कधी गरज पडली नव्हती आणि पडण्याची शक्यताही नव्हती. मी त्यांच्या उपयोगी पडण्याची शक्यता त्याहून कमी होती. कोडे असलेला तो लेखच रामदास यांनी लिहिला होता असे समजले आणि कट्ट्याची आठवण म्हणून मी ते वृत्तपत्र लगेच खरेदी करून पिशवीत ठेवले.

साडे अकरा वाजेपर्यंत आणखी काही 'आयडी'ज आल्या. चर्चगेटपाशी जमलेले लोक तिकडेच येणार असल्याचे आधी कळले होते, पण त्यांनी पुनर्विचार करून हुतात्मा चौकात येऊन भेटायचे ठरवल्याची बातमी मिळाल्यावर आम्हीही प्रस्थान केले. भुयारातून रस्ता ओलांडून पलीकडे जाताच तिथे मुंबईतला सर्वोत्तम 'काला खट्टा' मिळतो तो प्राशन करून पुढे जायचा बेत रामदास यांनी सांगितला. माझ्यासकट सगळेजण दूरदूरच्या ठिकाणांहून आलेले होते. पदयात्रा सुरू करायच्या आधी सगळ्यांनाच एका 'वेलकमड्रिंक'ची नितांत गरज होती. त्यामुळे कोणीही त्यावर उपसूचना मांडली नाही. ते पेय पिऊन आम्हाला थोडी तरतरी येईपर्यंत आणखी काही 'आयडी'ज येऊन आम्हाला मिळाल्या. त्यातल्या चिमुकल्या आर्याने लगेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तिथून आमचा 'हेरिटेज वॉक' सुरू झाला. अर्थातच रामदास हे आमचे मार्गदर्शक होते. बोरीबंदर स्टेशनच्या इमारतीवर असलेले तीन चार घुमट कसे निरनिराळ्या वास्तुशिल्पांच्या शैली दाखवतात ते त्यांनी विशद केले. इंग्लंडमध्ये न सापडणारा भारताचा राष्ट्रीय मयूरपक्षी तिथल्या खिडक्यांवरल्या जाळ्यांमध्ये कोरलेला असल्याचे दाखवले. या इमारतीचे बांधकाम चालले असतांना मध्येच त्याचा आर्किटेक्ट बदलला गेला असावा असा शेरा कोणीतरी मारला. इमारतीच्या मोठ्या कळसावरल्या मूळच्या लाइटनिंग अरेस्टरवर एकदा खरोखरच वीज कोसळल्यामुळे तो नष्ट झाला होता. त्यानंतर जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या खाली असलेल्या पुतळ्यासकट नवा विद्युतनिरोधक तयार करून तिथे बसवला ही माहिती दिली. त्या चौकामधून मी हजारो वेळा गेलेलो असूनसुध्दा त्या इमारतीच्या शिखरावर एक बाई हातात विजेच्या तारा घेऊन उभी आहे हे यापूर्वी माझ्या ध्यानात आले नव्हते.

आमचा दहा पंधरा जणांचा घोळका तिथून निघून गजगतीने हुतात्मा चौकाच्या दिशेने चालत राहिला. रविवार असल्यामुळे रस्त्यात फारशी वाहतूक नव्हती. फुटपाथ तर ओस पडले होते, पण त्यावरून चाललो असतो तर आजूबाजूच्या इमारती दिसल्या नसत्या आणि 'हेरिटेज वॉक'चा उद्देश सफळ झाला नसता. त्यामुळे आम्ही रस्त्याचा थोडा भाग अडवून त्यावरूनच चालत राहिलो. आमची संख्या आणखी मोठी असती तर तो कदाचित एकादा मोर्चा वाटलाही असता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या प्रत्येक इमारतीचे नाव, त्याचा मूळ मालक कोण होता, ती इमारत कधी आणि कशासाठी बांधली गेली होती, त्या काळात कोणत्या कामासाठी तिचा उपयोग केला जात असे, आता तिथे काय चालते वगैरे इत्थंभूत माहिती रामदास सांगत होते आणि माझ्यासह काही लोक श्रवणभक्ती करत होते. काही लोक तत्परतेने त्या इमारतींचे किंवा त्यात दाखवलेल्या वैशिष्ट्यांचे सटासट फोटो घेत होते. काही जणांनी आपापले उपगट बनवून वेगळ्या चर्चा चालवल्या होत्या. काही मिनिटांच्या चालण्यानंतर आम्ही हुतात्मा चौकात येऊन पोचलो. चर्चगेटकडून आलेला प्रवाह आमच्या प्रवाहात मिसळला. पुढला वृत्तांत आदीने त्याच्या खुसखुशीत शैलीमध्ये दिला आहेच.

मिपावर रोजच्या रोज अक्षरे, विरामचिन्हे, स्मितके आणि छायाचित्रे यांचा जो मुसळधार पाऊस पडतांना दिसतो तो पाडणारे कोण आहेत याची मला उत्सुकता वाटते. त्यातल्या काही मुंबईकर लोकांना पहायला मिळावे एवढी माझी माफक इच्छा होती ती सफळ झाली. ही मंडळी याहून जास्त संख्येने येतील अशी माझी अपेक्षा होती, तसे झाले नाही, ते का झाले नाही याच्या कारणांच्या गवताचा ढीग झालेला आहेच. 'चालताफिरता कट्टा' म्हणजे काय असतो हे पाहण्याची उत्सुकता होती. सर्वांबरोबर घोळक्यात चालतांना मला मजा आली, माझ्या ज्ञानात भर पडली, पण तो 'कट्टा' वाटला नाही. अर्थातच हा अनुभव प्रातिनिधिक नसणार. इतर वेळी याहून वेगळा अनुभव येत असेल. मी पहिल्यांदाच मिपाच्या कट्ट्यावर गेलो असल्यामुळे मला त्याची कल्पना नाही. आता पुढच्या कट्ट्याला बोलावले तर यायचे असे मी ठरवले आहे.

मौजमजालेखअनुभव

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Feb 2013 - 12:34 pm | पैसा

पुरवणी पण मस्त!

सूड's picture

6 Feb 2013 - 12:54 pm | सूड

पुरवणी छान !! पण फोटो??

घारे काका, अप्रतिम पुरवणी. खरंय तुम्ही म्हणता ते. सीएसटी कडून गेलेल्यांनी जास्त गोष्टी केल्या आणि पाहिल्या, पण आपण कोणीच अ‍ॅड्याला व्यवस्थित वृत्तांत दिला नाही. त्यामुळे या सीएसटी विशेष पुरवणीला जास्त महत्त्व. :)
आणि सूडराव, फोटु येऊ घातलेत हो.. थोडा धीर धरा..

आणि लोगो ओळखण्याचे ते कोडे रामदास काकांनीच लिहीले होते... रविवारच्या प्रहार या वर्तमानपत्रात ते सर्वांना पाहता येईल...

पुरवणी सुद्धा आवडली. इमारतींकडे लक्ष न जाण्याविषयी १०० % सहमत.

इथे शंभरदा जाऊनसुद्धा अश्या इमारती किंवा त्यावरचं डिझाईन कधीही दिसलेलं नव्हतं. ऐला, टर्मिनस बिल्डिंगच्या आत शिरतानापासूनच इंडिकेटर या एकाच शिल्पाकृतीकडे डोळे लागून राहिलेले असतात.

शिवाय रस्त्यांवरुन चालताना मुंबईत कोणीही आयुष्यभरात शक्यतो स्वतःच्या खांद्याच्या वरच्या लेव्हलला नजर टाकत नाही..हे अतिशयोक्त नाही...

ऋषिकेश's picture

6 Feb 2013 - 1:43 pm | ऋषिकेश

खुसखुशीत लेखाची पुरवणी वेगळ्या शैलीत पण तितकीच खुस्खुशीत आहे!
एकूणच काय मजा आहे बॉ लोकांची! ;)

यादीत नाव न देता अचानक स्ररप्राईज म्हणून जायचे असे ठरवून मी ही आलो होतो पुण्याहून. साडेदहाच्या सुमारास मेन गेट मधून बाहेर पडलो . व एका खांबाजवळ उभा राहिलो तेवढ्यात तिकडून वल्ली व मन१ येताना दिसले. वल्लीच्या हातात कॅमेरा तर मन १ च्या हातात दुरबीण होती. माझा " सरप्राईजचा" बेत असल्याने मी लपून लपून त्यांच्या मागे गेलो . तर हे महाराज टॅक्सीवाल्याशी गेटवे वरून घारापुरीकडे जाणार्‍या बोटीबद्द्ल चौकशी करीत होते. मी जीवाचा कान करून ऐकू लागलो मन १ वल्लीला विचारत होता. " वल्ली , सातवाहन व घारापुरी यांचे कनेक्शन नक्की आहे ना ? आयला नाहीतर वारी फुकट जायची.
मी त्यांचा नाद सोडला.. दुरूनच फक्त पन्नास आपल्या पोटावरून हात फिरवीत सहकुटय्म्ब येताना दिसले. त्याच्या कट्ट्याविषयीच्या उत्साहाची दाद द्यावीशी वाटतेय तोच ते कुटंबाला म्ह्णणतात कसे " ते स्पेशल चाट कॉर्नर चर्नीरोड जवळ आहे ना ग? " माझा उत्साह मावळला. मला वाटले ओन्ली फिफ्टी सुद्धा आपल्या सारखेच सरप्राईज मूड मधे दिसतायत ! आता खरे सरप्राईज मागूनच येत होते. दोन आप्तांसह टीपटाप वेषात मोद्क येताना दिसले. मागे मागे मागे राहाणार्‍या
आप्तांकडे वळून ते म्हणत होते " लवकर पावलं उचला ! आपल्याला एका दिवसात तीन ठिकाणी कांदेपोहे खायचेत आज" एक बाप्या लायनीला लागतोय याचे सुख वाटत होते. पण हे ही बुवा कट्ट्याला येत नाहीत असे पाहून मी पार
कोसळलो. सरप्राईजचा माझा मूडच गेला. व मी चिचवडचे तिकिट काढण्यासाठी लायनीत उभा राहिलो.

स्पा's picture

6 Feb 2013 - 2:45 pm | स्पा

=)) =))

इनिगोय's picture

6 Feb 2013 - 3:22 pm | इनिगोय

हशा आणि टाळ्या!! :))

घारापुरी ते कांदेपोहे.. ब्येष्ट!

बॅटमॅन's picture

6 Feb 2013 - 3:24 pm | बॅटमॅन

वा वा चौरीचौरा!!! एकच नंबर :)

दादा कोंडके's picture

6 Feb 2013 - 2:16 pm | दादा कोंडके

ही पुरवणी आवडली. अगदी फोटूची आवश्यकता सुद्धा वाटली नाही.

हे काही सीएसटी वाल्यांचे फोटु-

a
वेलकम ड्रिंक (काला खट्टा) घेऊन झाल्यावर वॉकसाठी ताजेतवाने झालेले मिपाकर्स.

s
मुंबैची शान - छत्रपति शिवाजी टर्मिनस (याची स्थापत्यशैली रामदास काकांनी सांगितली होती. आता नक्की आठवत नाहीये.)

v
हेरिटेज वॉकला तय्यार..

g
बृ.मुं.म.पा. ची सुंदर इमारत.

j
कमान कशी असावी याचा उत्कृष्ट नमुना. (इति- रामदास काका. उगाच या विषयात मला फार कळतं असा लोकांचा गैरसमज व्हायला नको.)

h
हेरिटेज वॉकला प्रारंभ.

a

a
हाँगकाँग बँकेची इमारत - स्वातंत्र्यानंतर हैदराबादच्या निजामाचा सर्व खजिना येथे तळघरात ठेवला होता. त्यात काही कॅरेट्सचा एक हिरादेखील होता ज्याची त्या काळी किंमत अंदाजे ७५ करोड रुपये होती. आताच्या किंमतीनुसार त्याची किंमत किमान २५०० करोड रुपये आहे.

b
न्यू इंडिया अ‍ॅश्योरन्सच्या इमारतीवरील कोरीवकाम.

k
आणि हे मिपा चे दोन लाल - प्रास आणि निखील देशपांडे. :)

केदार-मिसळपाव's picture

6 Feb 2013 - 4:28 pm | केदार-मिसळपाव

मस्त मस्त...

आनंदकाका आणि प्रथम, आम्ही (चर्चगेटवाले) हे जे काय मिसलो ते इथे टाकल्याबद्दल आभार. फोटो झकासच :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2013 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घारे साहेब, प्रामाणिक वृत्तांत आवडला.
(अदिजोशीनं लिहिला तो प्रामाणिकच आहे)

मिपावर अगदी छोट्या आर्या पासून ते वयाने वडीलधारे असलेले घारे साहेबांपर्यंत सर्वांना मिपा हवहवसं वाटतं. सर्वांना एकमेकांच्या भेटी व्हाव्यात असं वाटतं. पूर्णपणे अनोळखी वाटणारे एकत्र येतात, गप्पा मारतात. विचारांची देवाण-घेवाण करतात. तेव्हा ''तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे' चा खर्‍या अर्थाने प्रत्यय येतो.

-दिलीप बिरुटे

केदार-मिसळपाव's picture

7 Feb 2013 - 12:27 am | केदार-मिसळपाव

१०००० टक्के आनुमोदन

मस्त लिहिलं आहे घारेकाका.

वा! हा वृत्तांतही आवडला. प्रथमने नंतर दिलेले फटू आवडले. ;)

सस्नेह's picture

7 Feb 2013 - 2:01 pm | सस्नेह

अगदी अगदी..
आधीचा अन हा दोन्ही वृत्तांत आवडले.
अन कट्टा चुकल्याबद्दल पुन्हा एकदा हळहळ वाटली..

तिमा's picture

6 Feb 2013 - 5:44 pm | तिमा

घारेसाहेब,
तुमचा हा प्रवास कळला नव्हता. वेगळा लेख लिहिल्याबद्दल आभार.

-- तिमा

मस्त!!! फोटो तर खल्लास छान.

नक्शत्त्रा's picture

7 Feb 2013 - 3:56 pm | नक्शत्त्रा

आता कसे पुरवणी ने काम पूर्ण केले.. वेगळा प्रवास -वेगळा लेख लिहिल्याबद्दल आभार!!!!

अन कट्टा चुकल्याबद्दल पुन्हा एकदा हळहळ वाटली... मला पण स्नेहांकिता सारखेच वाटतेय.

हे मिपा चे दोन लाल -पण छान दिसत आहेत .....

एकंदरीत सर्व सविस्तर सांगलीतल्या बद्दल आि ण फोटोत दाखवल्या बद्दल आभार.