रात्री साडेबारा वाजता फ़ोन आला....सकाळी ३ वाजता एअरपोर्टला जाऊन कार रेंट करायच्या आहेत, ४ वाजता परत येऊन सगळ्यांना घेऊन आरकंसास च्या ओझार्क टेकड्यांकडे निघायचंय...२ दिवस कॅम्पिंग करायचीय. नकार द्यायचा प्रश्नच नव्हता..कारण तसा ऑप्शन दिलाच नाही....नुकताच टॅको बेल मधुन चालुपाज घेऊन आलो होतो. दोन-दोन चालुपाज हादडले...किचनची आवराआवर, डिश वाशर लावता लावता १:३० वाजले आणि मग बेडवर लॅपटॉप घेऊन ऑर्कुटींग सुरु केली. काही पोस्ट वाचता वाचताच झोप आली...आणि तसाच झोपलो. ३ वाजता उठायचे टेंशन होतेच. पण तरीही ४:१५ वाजता फ़ोन आला तेव्हाच उठलो. काही मिनिटातच तयार होऊन खाली उतरलो...बघतो तर राजीव, विरल, हिरा आधीच बिल्डिंगखाली येऊन बसले होते बाकड्यावर.
"चला"
"तुझी कार कुठे आहे? "
"मी चावी आणलीच नाही"
"अरे तुला फ़ोनवर सांगितले ना...तुझ्या कारने एअरपोर्टवर जायचयं"
"कधी...मला नाही काही कळलं...मी झोपेत होतो. तुमच्या गाडीला काय झालंय? इथवर आलात ना कारनेच?"
"बरं चला आधीच उशीर झालाय. माझ्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम आहे इंजिनचा..माहित नाही ७० च्या स्पीडने फ़्रिवेवर पळेल की नाही. पण हरकत नाही. चला जाऊया माझ्याच कारने" राजीवला नेहेमीच परिस्थितीचे भान असते.
मग त्या कारने सरळ एअरपोर्टच्या कार रेंटल्स मधे गेलो. एक ७ सिटर KIA Borrego आणि एक sedan शेवी इंम्पाला रेंट केली. प्रत्येक कार वर दोन दोन ड्रायव्हर्सला टाकले. माझे नाव मी बोरेगो मधेच टाकले. चौघांमधे तीन गाड्या (२ रेंटेड आणि १ राजीवची) वाटल्या. निघण्यापुर्वी फ़ोन करुन प्रत्येकाला तयार रहा आम्ही आलोच असा दम भरला आणि पुन्हा घरी निघालो.
घरी आल्यावर आम्ही निवांतपणे १ तास तयारी केली. लोकांचे फ़ोन येतच होते. आम्ही तयार आहोत. कधी निघायचंय म्हणुन. मग एकदाचे निघालो. गॅस शेगडी, प्रोपेन सिलिंडर, तंबु असं बरंचसं कॅम्पिंगचं सामान कोंबलं. आणि मग एकेकाला घेत घेत निघालो. ३०० मैलांचा ड्राइव्ह होता hot spring पर्यंतचा. hot Springs हे बिल क्लिंटनचं जन्मगावाजवळंच एक छोटं शहर. तिथल्या गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि ओझार्क टेकडीच्या पायथ्याशी आहे. तिथुन पुढे ५० एक मैलावर टेकड्यांनी वेढलेला Lake Ouachita (उचिता) आहे. त्याच्या आसपास भरपुर कॅम्पिंग साईट्स आहेत. कुठेही डेरा टाकुन राहु असा विचार होता.
शहराबाहेर आल्यावर लगेच ब्रेक घेतला. गाडी माझ्या ताब्यात आली. तिथुन टेक्सासची हद्द पार करेपर्यंत बोरेगोची राइड. काय मस्त गाडी आहे...नुसता थोडा अॅक्सेलरेटर टच केला तरी 70miles च्या वर स्पीड पकडते. पोलिस मामांपासुन सावधान राहत अशी गाडी चालवणं म्हणजे किती संयम पाळावा लागतो याचा अनुभव घेत होतो.शक्य तेव्हा ८५ च्या स्पीडने मामा लोकांचा अंदाज घेत चालवली..काही तासातच टेक्सासची हद्द क्रॉस करुन आरकंसास मधे प्रवेश केला. सीमेवरील टेक्सारकाना ह्या शहरात ब्रेक घेतला. त्याआधी आमच्या गाडीमधे अंताक्षरीचा प्रोग्राम झाला. मी ज्या टीममधे होतो अर्थातच ती टिम जिंकणार होती. प्रंचंड उन्ह पडलं होतं. किरणं रस्त्यावर रिफ़्लेक्ट होऊन डोळ्यात घुसत होती. गाडी चालवतांना बराच डोळ्यांचा व्यायाम केला होता. ब्रेकमधे डोळ्यांवर पाणी मारुन...गाडीची चावी राजीवकडे परत केली. आता आराम करायचा टाइम होता. पुढचा एक तास ड्रायव्हरच्या बाजुला बसुन निवांतपणे आरकंसासची हिरवाई पाहता पाहता hot spring मधे प्रवेश केला. गाडीत गॅस भरला...आणि तडक ब्रॅडी माउंटनकडे कुच केली. लेक उचिताला लागुनच असलेला हा ब्रॅडी माउंटन कॅम्पर्सचे फ़ेव्हरिट ठिकाण आहे.
शहर सोडताच अगदी आपल्या कोकणातल्या रस्त्यांसारखे छोटे छोटे रस्ते दिसु लागले. दुतर्फ़ा गर्द उंच झाडे. इथली झाडं ओळखीची नाही वाटत अजिबात. कुठली असतात माहीत नाही. पण असतात. शेवटी रस्ते चुकत चुकत कॅम्प साईटला पोहोचलो...पाहतो तर काय कॅम्प साईट्स फ़ुल. नो एंट्री. मग तिथुनच माहीती काढत कळलं की १० मैलांवर लेक उचिताच्या अगदी बाजुला जॉप्लिन नावाच्या जंगलात २ कॅम्प साईट्स उपलब्ध आहेत. पण जो आधी येईल त्याला ती साईट मिळेल. मग काय आम्ही सुसाट गाडी सोडली. आमची दुसरी गाडी भरकटलेलीच होती. त्या गाडीचा GPS हि गोंधळला होता. मोबाईलची रेंज गेलेली होती. एका ठिकाणी चुकुन रेंज मिळाली. भरकटेल्यांना रस्ता सांगितला आणि डायरेक्ट जॉप्लिनला यायला सांगितले.
जॉप्लिनला पोहोचलो. दोन्ही कॅम्प साईट्स अजुन उपल्ब्ध होत्या. पहिल्या साईटवर गेलो. लेक उचितोच्या काठावर, पण काठ सरळ नव्हता, उतार होता. मग दुसरी साईट बघायचे ठरविले. पण तोवर जर कोणी आधीच आले आणि दुसरी साईट ह्यापेक्षाही खराब असेल तर काय करायचं ह्या विचाराने अमितला तिथेच उभे केले आणि आम्ही गाडीने दुसऱ्या साईटवर पोहोचलो. अगदी जशी हवी होती तशीच साईट होती. तळ्याकाठची आणि जमीनही बऱ्यापैकी सपाट होती. मग मी तिथेच थांबलो आणि राजीव अमितला घ्यायला पहिल्या साईटवर गेला. अमितला घेऊन परत येतच होता.तेव्हढ्यात त्याच्यामागे एक RV (recreational vehicle, स्वदेशमधे शाहरुख कडे असते तशी व्हॅन) आली. त्या RV मधुन एक अमेरिकन कुटुंब बाहेर आलं आणि अमितशी काहीतरी बोलायला लागलं. ते लोकं जरा वैतागलेली वाटत होती. काय झालं म्हणुन आम्हीही गेलो त्यांच्याजवळ. आणि काय प्रकार घडलाय ते लक्षात आलं. झालं असं होतं की अमित पहिल्या साईटवर उभा असतांना ते लोकं तिथे गेले होते आणि त्यांना अमितने सांगितले की ती साईट त्याने बुक केलीय.म्हणुन ते दुसऱ्या साईटकडे आले पण रस्ता भटकल्याने त्यांना थोडा उशीर झाला. तोवर राजीव अमितला घेऊन दुसऱ्या साईटवर नुकताच पोहोचला होता. इथेही अमितला पाहुन ती मंडळी वैतागली होती. अमेरिकन बायका फ़ारच तापट असतात ह्या बाबतीत. त्या बाईने सरळ कॅम्पसाईटच्या रेंजर्सला फ़ोन केला आणि झाला प्रकार सांगितला. थोड्याच वेळात रेंजर पोहोचला. कशीबशी समजुत काढुन त्यांना पहिल्या साईटवर रवाना केले, पण ह्याच अटीवर की जर ती साईट तोवर जर कोणी बुक केली असेल, तर आम्हाला आमची साईट त्यांना द्यावी लागेल. मोठीच रिस्क होती. सुदैवाने ते कुटुंब परतले नाही. बहुधा त्यांना ती साईट मिळाली असेल.
मग आमची दुसरी गाडीही आली तिथे. सगळं कॅम्पिंगचं सामान त्यातच होतं. तोवर दुपारचे तीन वाजले होते. सगळे थकले होते. पण कॅम्प उभा करणे बाकी होते. आणि भुकही लागली होती. मग २-३ जणांना कार घेऊन शहरात जाऊन पिझ्झा आणि रात्रीच्या जेवणाचे, कॅम्प फ़ायरचे सामान आणायला पाठविले. बाकी आम्ही तिथेच कॅम्प सेटअप करायला थांबलो. काही अनुभवी कॅम्पर्सच्या मदतीने झोपायचे तीन तंबु उभे केले. बऱ्यापैकी जिकीरीचं काम होतं. नंतर किचन प्लॅटफ़ॉर्मवर कॅनोपी चढवली. किचन सेटअप केले. गॅस कनेक्शन जोडले. मग तंबुवर लाईटींग केली. हे करता करता पाच वाजले. अजुन जेवणाचा पत्ता नव्हता. शॉपिंग ला गेलेले गडी अजुन परतले नव्हते. फ़ोनाफ़ोनी सुरुच होती. येतो येतो करता करता सहा वाजता मंडळी परतली. पिझ्झा थंड झाला होता. बऱ्याच जणांची भुकही मेली होती. संधीचा फ़ायदा उठवत मी भरपेट पिझ्झा खाल्ला. पिझ्झा खाऊन बऱ्यापैकी सुस्तावलो. बोट रॅम्प (जिथुन बोटी तळ्यात प्रवेश करतात) जवळ एक कॉमन एरिआ होता. तिथे काही बाकडी होती. त्यावर जाऊन अंग टाकले. दिवसभरच्या मेहनतीचा थकवा तळ्याकाठावरुन थंड गार वाऱ्याच्या झुळकांनी हळु हळु वाहुन जात होता. सुर्यास्तापर्यंत (म्हणजे जवळपास साठे आठ वाजेपर्यंत) मी तिथेच पडुन होतो. अंधार झाल्यावर मात्र कॅम्पवर परतलो. सगळ्या मुली रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या. आम्हीही मग कॅम्प फ़ायर पेटवला. आणि तळ्याकाठी खुर्ची टाकुन गप्पा मारत बसलो. छोले-भाताचे जेवण झाले आणि मग गुज्जु दांडिया सुरु झाला. रात्री दहा नंतर आवाज करणं जरा रिस्कि होतं कारण आजुबाजुच्या कॅम्प वाल्यांनी तक्रार केली तर आमची गच्छंती अटळ होती. हे अमेरिकन अजुनही संध्याकाळी लवकर जेवुन झोपतात आणि पहाटे लवकर उठतात.सुदैवाने आमच्या बाजुची कॅम्प वाली मंडळीही जोरजोरात गप्पा मारत होती. त्यामुळे आम्हालाही थोडा जोश चढला. नेहेमीप्रमाणे उत्साही मंडळी नाचायला वगैरे लागली. आम्हाला त्यात ओढायला लागली. पण आम्ही धर्मेंद्रचे चाहते. नाच पाहुन लांब पळतो. लोकं का नाचतात हा प्रश्न मला नेहेमीच पडतो, तेव्हाही पडला. पण उत्तर काही मिळाले नाही.
त्यानंतर मात्र थकुन सगळे तंबु मधे शिरले, मला मात्र झोप लागेना...रोज रात्री ऑर्कुट लागतो झोपायला. मग मी लोकांना भुताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. काही वेळातच सगळी सामसुम झाली आणि मीही निरुपयोगाने डोळे बंद केले. सकाळी सुर्योदय पहायला लवकर उठायचेय असं ठरलंही होतं.
सकाळी उठुन मग सुर्योदय, तळ्यातल्या पाण्यात थोडी मस्ती आणि फ़ोटोसेशन असे कार्यक्रम उरकले. काही उत्साही मंडळींनी नाश्ता बनवायला घेतला. तो करुन आम्ही गाशा गुंडाळायला सुरुवात केली. पुढचे लक्ष होते हॉट स्प्रिंग्स. शहराचे नावच गरम पाण्याच्या झऱ्यावरुन पडले आहे. त्या झऱ्याचे पाणी औषधी असतं असा समज आहे. लोकं मोठ मोठाले कॅन्स घेऊन आले होते पाणी घेऊन जायला. एका गरम पाण्याच्या कुंडात आमचा मित्र त्याचे मोडलेले बोट शेकायला लागला (चप्पल घालुन टेनिस खेळतांना पडला आणि करंगळी मोडुन घेतली). पण पाणी इतके गरम होते की त्याला जास्त वेळ बोट बुडवायला जमत नव्हते. शेवटी त्याच्या मोरल सपोर्ट साठी आम्ही एक गेम खेळलो. प्रत्येकाने आपापले बोट त्या उकळत्या पाण्यात टाकायचे आणि जो सगळ्यात शेवटी बोट बाहेर काढेल तो जिंकला. ह्यात मी बाजी मारली. ह्या गेमचे ४-५ राउंड्स झाले. मला कॉम्पिटीशन द्यायचा खुप प्रयत्न् झाला. पण अर्थातच अयशस्वी प्रयत्न होते ते.
दुपार झाली होती. लंच टाईम..आणि पुढे दिवसभर काय करायचे हाही प्रश्न होताच. मग पेटीट-जीन माउंटन गाठायचे ठरवले. रस्त्यातच पुन्हा टॅको बेल मधे खाऊन निघालो. दोन तासाचा डेंजरस ड्राइव्ह होता. भारतातल्या घाटांप्रमाणेच, पण स्पीड कमीत कमी ताशी ४० मैलांचा ठेवावा लागत होता नाहीतर मागे गाड्या हॉन्क करुन जात. इथे कोणी आपल्याला हॉन्क केले म्हणजे आपला अपमान झाला अशी समजुत बाळगुन गाडी चालवावी लागते. पेटीट-जीन हे अरकंसास मधे वर्ल्ड-फ़ेमस असलेले प्रेमी युगल होते, त्यांना काही कारणांनी डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करावी लागली होती. अमर प्रेमाचे प्रतिक म्हणुन त्या डोंगराला पेटीट-जीन नाव दिले होते. अर्थात ओझार्क टेकड्यांचा एक भाग होता हा डोंगर.
ओझार्क टेकड्या ह्या आपल्या सह्याद्रीसारखा अजिबात नाहीत. सह्याद्री जसा कठीण अग्निजन्य खडकांचा काळाकभिन्न दगडी वाटतो, त्याच्या उलट ओझार्क टेकड्या ह्या सेडिमेंटरी रॉक्सच्या (एकावर एक मातीचे थर जमा होऊन पुढे खडक बनतात) बनलेल्या असतात...अगदी वीटांनी बनलेल्या भींती वाटाव्यात अशा. हजारो वर्षांपुर्वी हिमनगानींना हे खडक छाटुन टाकले होते आणि त्या मार्गावर सेडार फ़ॉल्स नावाचा एक छोटासा धबधबाही निर्माण झालाय.
वर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते. आम्ही तिथल्या टुरिस्ट सेंटरमधुन पॉइंट्स चा मॅप मिळवला आणि गाडीनेच सगळे पॉइंट्स बघितले. हा अनुभव अगदीच सॉलिड होता. अगदी जंगली पायवाटांवरुन गाडी चालवावी लागत होती. दोन्ही बाजुला गर्द झाडी. अमेरिकन गाड्यांना पायवाटांची अजिबात सवय नसते. अगदी कमी स्पीडवर हळु हळु आम्ही डोंगरमाथा फ़िरत होतो. काही काही पॉइंट्स वरुन खालची सपाट खोरी दिसत होती...असले दृश्य भारतात खुपदाच बघायला मिळते, पण आठवण झाली ती एलोराच्या डोंगरावरुन जसे तापीच्या खोऱ्यातील खानदेश दिसतो त्याची. प्रत्येक पॉइंटवर आमचे फ़ोटोसेशन झाले. आणि परतीचा रस्ता धरला. पुन्हा दोन तासाचा बिकट रस्ता पार करुन हॉट स्प्रिंगला पोहोचलो.
साडे नऊ वाजले होते. सगळे रेस्टॉरंट्स बंद. शेवटी पुन्हा टॅको बेल ने आसरा दिला. आणि खाऊन आम्ही रात्री साडे-दहाला आम्ही निघालो. आणखी पाच तासांचा ड्राइव्ह बाकी होता. मी गाडी राजीवला दिली, आणि बाजुला बसलो. प्रचंड थकवा आला होता. मस्त एक झोप काढली. रस्ता सुमसान होता, पण जास्त स्पीडने चालवल्यास मामांची भीती म्हणुन ताशी ७५ मैलांच्या स्पीडला क्रुझ सेट केले आणि राजीव मांडी घालुन बसला. पण असं बसणं म्हणजे झोपेला निमंत्रण. १२ वाजता आमची गाडी इकडे तिकडे लेन च्या बाहेर जाऊ लागली. राजीव झोपेशी झगडत होता. शेवटी एका गॅस स्टेशनवर गाडी थांबवली. गॅस भरला. माझ्याकडे गाडीचा ताबा आला. जनरली ऑर्कुटींग मुळे रात्री जागण्याची माझी सवय, त्यामुळे मी बऱ्यापैकी कंडीशन मधे होतो. अजुन तीन-साडेतीन तासांचा ड्राइव्ह होता. मी क्रुझ वर गाडी न ठेवता नेहेमीसारखा अंदाज घेत ८०-८५ मैलाच्या स्पीडने निघालो. क्रुझ वर गाडी ठेवली असती तर झोप आली असती. त्यापेक्षा नॉर्मल मामा लोकांचा अंदाज घेत गाडी चालवणं सोपं वाटलं मला. रात्री तीन वाजता आम्ही प्लॅनोपासुन ३० एक मैलांवर पोहोचलो होतो आणि आता मात्र माझे डोळे मिटु लागले. हा अनुभव अविस्मरणीय होता. काही सेकंदासाठी डोळे बंद व्हायचे आणि अचानक खडबडुन जागे व्हायचो. गाडी लेनच्या बाहेर कशीही जात होती. सुदैवाने गाडीत इतर सगळे झोपले होते. फ़क्त राजीव बाजुला बसला होता. एकदा तर बाजुच्या रस्ते कामाला गाडी खरचटणार तेव्हढ्यात राजीव ओरडला, माझे डोळे उघडले आणि अगदी थोडक्यात वाचलो. मधे कुठे थांबायलाही जागा नव्हती. सगळेच जागे झाले होते. जीव मुठीत धरुन मग पुढचा अर्धा तास बिचार बसले होते. कधी एकदाचा मी लोकांना त्यांच्या अपार्टमेंटमधे उतरवतोय असं झालं होतं मला. शेवटी तो क्षण आला. गाडीतुन सामान उतरवलं आणि एकाच्या गॅरेजमधे टाकलं. सकाळचे पावणेचार झाले होते. गाड्या परत करायच्या होत्या. सकाळी साडेचारच्या नंतर परत केल्या असत्या तर एका दिवसाचा रेंट भरावा लागला असता. मग तसेच आम्ही चार जण तीन गाड्या घेऊन एअरपोर्टच्या दिशेने निघालो.
एअरपोर्टच्या रिटर्न्समधे कार परत केल्या. आणि घरचा रस्ता धरला. एक मोठी ट्रिप संपली होती. लोकं फ़िलॉसॉफ़िकल बनत होते. मधेच राजीवने गाडी त्याच्या आवडत्या धार्मिक विषयांवर नेली. आणि मग खरा टाइमपास सुरु झाला. पुढचा पुर्ण वेळ मी आणि राजीव भांडत होतो. विषय नेहेमीचेच. वालीला का मारले, सीतेची अग्निपरिक्षा का घेतली, तीला का सोडुन दिले, शुर्पणखेचे नाक का कापले वगैरे वगैरे.
घर कधी आलं ते कळलंच नाही. पण घरी जाताच शांत झोप आली,ऑर्कुटवर कम्युनिटीजवर पोस्ट करायची गरज पडली नाही, कारण त्याची उणीव कार मधे भांडुन पुर्ण केली होती.
प्रतिक्रिया
17 Dec 2012 - 12:33 pm | येडगावकर
त्याआधी आमच्या गाडीमधे अंताक्षरीचा प्रोग्राम झाला. मी ज्या टीममधे होतो अर्थातच ती टिम जिंकणार होती. >>>
प्रत्येकाने आपापले बोट त्या उकळत्या पाण्यात टाकायचे आणि जो सगळ्यात शेवटी बोट बाहेर काढेल तो जिंकला. ह्यात मी बाजी मारली. ह्या गेमचे ४-५ राउंड्स झाले. मला कॉम्पिटीशन द्यायचा खुप प्रयत्न् झाला. पण अर्थातच अयशस्वी प्रयत्न होते ते. >>>
मी क्रुझ वर गाडी न ठेवता नेहेमीसारखा अंदाज घेत ८०-८५ मैलाच्या स्पीडने निघालो.>>>>
17 Dec 2012 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार
अध्ये मध्ये इतरांचे लिखाण वाचायला आणि कौतुक करायाला पण येत चला मिपावरती.
19 Dec 2012 - 4:23 pm | कुंदन
ओक्के
17 Dec 2012 - 1:02 pm | चिरोटा
टेक्सास्,अर्कांन्सास राज्यात मराठी दादांचे प्राबल्य आहे हे कळले.
17 Dec 2012 - 11:01 pm | ५० फक्त
नंबरप्लेटला घड्याळाचं स्टिकर लावलं होतं का?
18 Dec 2012 - 6:25 pm | शैलेन्द्र
बापरे.. रात्री गाडी चालवताना तुमच जे झाल, तेच माझही झाल लेख वाचताना.. :)
18 Dec 2012 - 6:32 pm | बॅटमॅन
लेख रोचक, पण ते रोज ऑर्कुटिंगचं काही कळेना राव, इथे जन्ता फेस्बुकावर पडीक असते तर तुम्ही ऑर्कुटवर कसे काय? इतिहासप्रेमी (पूर्वीचं नेट राहिलं नै) किंवा ब्रझीलप्रेमी आहात काय ;)