शिंपीणिचं घरटं

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
24 Jun 2008 - 8:13 pm

गावाचं तेव्हा शहर व्हायचं होतं.वाड्याला लागून वाडे होते . छेडा-गाला-ठक्कर नावाची माणसं फिरकत नव्हती. गावाला गुजराथ्यांचं वावडं नव्हतं.गावात गुजराथी कुटुंब बरीच होती. त्यांना गुज्जर म्हणायचे. धारीया ,सेठ , शहा अशी नेमकीच आडनावं होती. गुज्जरांची मोजणी वेगळी नसायची. हळूहळू बदल येत गेला.भाडोत्री नावाची कुटुंब वाड्यात रहायला आली.त्यांना गावाबद्दल कधीच प्रेम नव्हतं.त्यांना त्यांचंच गाव आवडायचं .पण पोट भरायला बिचारी आमच्या गावात आली होती.पण हळूहळू बदल येत होता. पंचायतीची इमारत उभी राहीली.टेलीफोनच्या लायनी रस्त्यावरून लोंबायला लागल्या. शाळा मोठी झाली. खानदेशी मास्तर आले, घाटावरचे कुल्फीवाले आले ,भोज बनीयाचे दुकान सुरु झाले..बाया बापड्या नळाची स्वप्नं बघायला लागल्या. भिंतीभिंतीवर लाल त्रिकोणाच्या जाहिराती लागल्या.पांढर्‍या साडीतल्या नर्सा दुपारी घरी येउन आयाबायाना सल्ले द्यायला लागल्या.आमची आई एक दिवस कंटाळून म्हणाली " आता, सगळं झालं हो आमचं ."
"आज्जीनी मान डोलावली हो सहा म्हणजे झालंच म्हणायचं. "
"तेच म्हणते मी नर्स बाईला चेव आला.तुम्हीच हे सगळं सांगा की वाड्यतल्या बायकांना."
" मला नका बाई या भानगडीत पाडू. आत्ता ऐकतील मग भाड्याला उशीर करतील."आई फणकार्‍यानी म्हणाली .
भाडं वेळेवर येणे हा एक ज्वलंत इश्यु होता तेव्हा. बरेच खर्च भाड्यावर अवलंबून होते.
"मग या आता तुम्ही "असं म्हणून आई उठून गेली.
पण आज्जी आणि नर्स बाई बराच वेळ बोलत होत्या.
दुसर्‍या दिवशी आज्जी आणि बाई दोघी वाड्यात फिरत होत्या. आईला हे काही आवडलं नाही पण नाराजी दाखवायचे दिवस नव्हते ते. आज्जीला वाड्यात नाही म्हणणार कोण?
महिन्याभरात चार पाच ऑपरेशनं झाली. दोन चार लूप लागले. (तेव्हा तांबी नव्हती). पुढच्या महिन्यात नर्स बाई दुपारची आज्जीला भेटायला आली. हुश्शं करून बसली. झोळीतून काही नोटा काढून आज्जीच्या हवाली केल्या. आज्जी हरखून गेली.
"एवढे पैसे देतं का गवरमेट"असं म्हणत नोटा मोजत राहिली.
नर्स बाई गेल्यावर आज्जीला हसायला यायला लागलं जवळ जवळ महिन्याभराच्या भाड्याचे पैसे जमा झाले होते .आईला काहीच कळेना.(बाप रे आज्जी या वयात ... ) मग काही वेळानं तिच्या लक्षात आलं .दोन आठवडे एकच चर्चा "या पैशाचं करावं काय?"आज्जी आणि आई दोघींचं एकमत झालं. शिवणाचं यंत्र आणू या .चार पैसे गाठीला लागतील. आज्जी सुमतीबाई सुकळीकरांची पाठराखीण .धोरणी निर्णय वेळेवर घ्यायची .झालं ..एक दिवस दादांना विश्वासात घेतलं गेलं. डिसक्लोजर अर्थातच लिमीटेड होतं पण त्यांना ही बरं वाटलं .त्यांची एक बहिण अजून लग्नाची होती.
सिंगरचं शिलाई मशीन आमच्या घरात यायचं होतं ते असं.
माणसं तेव्हा फारशी दुरावली नव्हती . सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता .तालुक्यावरून मशिन घरी आलं तेव्हा घरात गणपती सारखी गर्दी झाली होती. मशिनीसोबत इंजनेर पण आला होता. त्याला चहा देउन लगेच पायटा जोडायला सुरुवात झाली. खोक्यातून मशिनीची बॉडी बाहेर काढली. पोरासोरांचा उत्साह उतू चालला होता. चकचकीत कव्हर जेव्हा बाहेर आलं तेव्हा सगळयानी श्वास रोखून धरला. घरात एक नविन दागीना आल्यासारखं वाटायला लागलं.इंजनेरनी बॉबीनीवर धागा चढवला तेव्हा धाग्याच रीळ जमिनीवर गडबडा लोळायला लागलं.पोरं खूष. बॅगेतून चिधीचा एक तुकडा काढून झर्रकन त्याच्यावर शिलाई मारून झाल्यावर त्यानी मान डोलावली.
"आक्का, या इकडं सगळं काही सांगतो."
आज्जीला पुढे घालून आई सगळं समजून घेत होती.
आज्जी म्हणाली "आमच्या भाउला सागां जरा ,मोठेपणी फिटर होणार तो."
आज्जीचा भाऊ मुंबईला होता. तो फिटर होता. त्यानी घर पण घेतलं होतं. म्हणून आमचा मोठा भाऊ फिटर होणार असंच ती म्हणायची. भाऊनी पण मन लावून समजून घेतलं .दुसर्‍या दिवशीपासून आईचा पाय मशिनच्या पायट्याला लागला तो सुटला पन्नास वर्षानी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जनसंपर्क, प्रसारण,विक्री ,वसूली वगैरे आज्जीनी आपणहून सांभाळायला सुरुवात केली.वसूली फार महत्वाची. नवरे घरी असताना जाता यायचं नाही. भाड्याच्या हिशोबात आम्हाला शिरकाव नव्हता.आई शिवणावर लक्ष ठेवायची आणि आज्जी वसूली. कामाची कमी नव्हती. घराघरात चार पाच मुलं. दोन तरी बाईमाणसं. तयार कपडे फारसे मिळत नव्हते. आयत्या कपडयांना फारसा मान नव्हता.शिंप्याकडे जाणं म्हणजे एक वाढीव काम.लंगोट्या, लंगोट, दुपटी, अंगडी, फ्रॉक, लाळेरी, पायजमे,मनीले, यादी फार मोठी होती.इलास्टीकचा जमाना यायचा होता. नाडीच्या चड्ड्या शिवणं हाच एक मोठा व्याप होता.
प्रॉडक्शन हाउस दुपारी मुलं घरी येउन अभ्यासाल बसली की सुरु व्हायचं ते संध्याकाळी पुरुष माणसं घरी येईपर्यंत.कट कट.. घर्र झर्र असा आवाज सतत चालू.भाऊ थोड्याच दिवसात तयार कारागीर झाला. आवाज थोडा वेगळा आला की आईला थांबवायचा.
तेलाचं एक पिटपिटं(लांब चोचीचं )इंजनेर देऊन गेला होता. दोन थेंब इकडे तिकडे टाकून मशिन चालवायचा. मग परत कट कत गर्र झर्र चालू.
साडे तीन वाजेपर्यंत आसपासच्या बाया कामं घेऊन यायच्या. आम्ही सगळी मुलं मधल्या खोलीत अभ्यास करत असायचो. गप्पा जोरात चालायच्या.एकएक नविन गोष्ट कळत जायची.
मला वाटतं ब्लाउज हा शब्द फारसा वापरात नव्हता.पोलकं जंपर(झंपर),हेच शब्द होते. ब्लाउज आणि ब्रेसीअर हा प्रकार नव्हता.पोलकं आणि आत घालायची बॉडी अशी जोडी होती. आसपासच्या आज्ज्या गाठीच्या चोळ्या वापरायच्या.वाढत्या मुली बॉडीफ्रॉक आणि फ्रॉक. थोड्या मोठ्या मुलींनी स्कर्ट वापरायला सुरुवात केली होती.
सामान्य ज्ञान वाढत होतं हे खरं .नंतर पोटीमा ची फॅशन आली.(काही चावट माणस याला पोटावर टिचकी मारा म्हणायचे) नवनव्या सुना यायला लागल्या आणि कटोरी ब्लाउज हा नविन शब्द कळला. त्यातला कटेंट कळायचं ते वय नव्हतं. बाह्या टिकून होत्या. लांब हाताच्या, फुग्याच्या, थोड्या मोठ्या वगैरे वगैरे. बाह्या नसण्याची फॅशन आली शहात्तर सालानंतर्.बाहीच्या आतून छोटीशी पट्टी जोडायची टूम पण तेव्हाच आली.नविन फॅशनी कळायला लागल्या.
महिन्याभरातच उत्पन्न वाढायला लागलं. छोटस गाव . या वाड्यातली बातमी त्या वाड्यात जायला फारसा वेळ लागायचा नाही. एका रविवारी बदले काका सकाळीच आले.गंध्र्यांकडे आलो होतो म्हणाले पण आले होते आमच्याकडेच.वडलांशी गप्पा मारता मारता त्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली. चहा फुर्रकरून प्यायले. जाताजाता म्हणाले" तुम्ही भटाईच काम केल्यावर आमच्या पोटावर पाय."
आईचा उत्साह जबरदस्त पण चार पाच महिन्यात पाठ दुखी सुरु झाली ती मग कायमची. रात्री धाकटा भाऊ पाठीवर पाय देऊन चेपून द्यायचा. आत्या ,ताई वगैरेंनी कामं वाटून घ्यायला सुरुवात केली. काज बटणं (हूक नव्हते) ,हात शिलाई, नाड्या घालणं ,शो बटणं जोडणं फ्रील शिवणं यासाठी दुसरी फळी तयार झाली.घरातल्या एका मशिननी सगळ्यांना कामाला लावलं.
संध्याकाळी आई मात्र एकटी पडायची. तिचा गळा मात्र सुरेल होता त्यामुळी गाणं गुणगुणत एकतीच काम करायची. माझ्या कानावर येता जाता संस्कार व्हायला लागले.
घर दिव्यात मंद ...बघ अजून जळते वात..तेव्हाच म्हणायला शिकलो .
आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते.
वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.
आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मशिन घरात आल्यावर आईनी पहिली शिलाई केली मशिनच्या कव्हरसाठी खोळीची.झालर असलेली खोळ त्यावर आईचं नाव कशिदा काढून लिहिलं होतं. नंतर पंधरा वर्षं कव्हराचं व्हिनीअर चकचकीतचं राह्यलं पण पोरांनी एक शोध लावला.कव्हर डफासारखं वाजायचं . दुपारी गाण्याच्या साथीला एक नविन वाद्य मिळालं. भाऊ छान ताल धरायचा.
शरद मुठ्यांची गाणी फेमस होती.
छान छान छान मनी माउचं बाळ कसं गोरं गोरं पान...
जिंकू किंवा मरू.......
असा कसा देवाचा देव बाई ठकडा....
गाणी जोरात व्हायला लागली. गाव गप्पा जोरात व्हायला लागल्या. वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. लहान होतो. समज नव्हती. आभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं.
भाऊ तिमाहीत नापास झाला. खापर फुटलं ते आईच्या डोक्यावर.दादा ताडताड आईला बोलले. बिचारी शांतपणे ऐकत राहिली.सहा मुलांच्या गरजा भागवण जसं काही तिची एकटीची जबाबदारी होती. आज्जी अशा वेळीदूर रहायची. आई एकटी पडायची.मशिनवर बसलेली शून्यात बघणारी आई मला अजूनही दिसतें. नंतर काय झालं ते कळलं नाही पण भाऊ आणि ताईचा अभ्यास दादांनी रोज घ्यायला सुरुवात केली.
आज्जी रात्री जेवायची नाही आणि सैपाकही करायची नाही. आत्या आणि ताई अभ्यासात.(आमच्या आत्या आणि ताई मध्ये दोन वर्षाचंच अंतर) संध्याकाळ खिचडीवर निभायला लागली.दादांनी हा बदल पण मान्य केला. नविन बदलाची सुरुवात झाली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळी घरी आलं की घरात कोर्‍या कपड्याचा वास दाटलेला असायचा. चिंध्या पायात पायात यायच्या. दादांना हे आवडायचं नाही. मग दादा येताना दिसले की आज्जी परवलीचं गाणं म्हणायची. विणून सर्व झालाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम.(दादांच नाव रामचंद्र ) आई घाईघाईनी काम आवरतं घ्यायची.रीळाचा डबा आत टाकायची.रीळच्या डब्याचं रहस्य एकदा असंच मला कळलं.रिकामं रीळ फेकल्यावर त्यातून एक रुपयाची नोट बाहेर पडली.शिलाईचे पैसे असेच लपवून ठेवले जायचे. दादांना हिशोब कळू नये म्हणून धडपड.एक अर्थानी मला वाटतं दादानी उत्पनाला मान्यता दिली होती. आता त्याचं काहीच वाटत नाही पण बायकोच्या कमाईला मान्यता मिळणं ही फारचं मोठी गोष्ट होती.बायकोचं इन्कम आता आपण हातचा एक धरून चालतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आई या दरम्यान आजारी पडली .आजाराचं स्वरुप कळण्याइतपत मी मोठा झालो नव्हतो. पण ताई आणि आत्या कावर्‍या बावर्‍या झाल्या होत्या. आज्जीचं हसणं लोप पावलं होतं.आईला पुन्हा एकदा एकदा दिवस गेले होते.तालुक्याला जाऊन इलाज झाला पण महिनाभर शिवण बंद पडलं.आई त्यानंतर फारच अबोल झाली होती. आज्जी आणि दादांची खुसफुस करत भांडण चालली होती. आईचं अंथरूण आम्हा मुलांसोबत घालायला सुरुवात झाली. शिवणाचा रगाडा परत सुरु झाला. थोड्याफार फरकानी आसपास हेच घडत होतं.तिशी पस्तीशीच्या बायका चरकातून काढल्यासारख्या दिसायच्या. रडरड करणारी मुलं आणि त्यांना सभाळ्णार्‍या ताया हा कॉमन सीन होता.पुरुषांना बदललं युद्धानंतरच्या महागाईनी.
या दरम्यान आत्याचं लग्न ठरलं. लग्नाच्या आदल्या दिवशी तिकडून निरोप आला मुलीसोबत शिवणाचं मशिन पाठवा . आज्जीनी बोलणी करताना केलेल्या फुशारक्या नडल्या. आयत्यावेळी मशिन आणायचं कुठून? आज्जी म्हणाली हेच आहे ते देऊ या. आयुष्यात पहिल्यांदा दादा आईच्या पाठी खंबीरपणे त्यांच्या आईच्या विरोधात ऊभे राहिले. लग्न मोडलं तरी चालेल या थराला गोष्टी गेल्या. मग चंदूमामानी तोडगा काढला.मुलाच्या बारशाला मशिन देऊ.आतापासून सुनेला कामाला लावणं चांगलं नाही दिसणार वगैरे वगैरे.पण मशिअन घरात राहीलं. पण आज्जीच्या मनातला सल तसाच राहिला.
दादा आर्वीला गेले होते. येताना हसतच आले. मिलिट्री कँपाचं काम मिळालं होतं.सैनीकांच्या ब्लँकेटला चारी बाजूनी शिलाई करून एक पट्टी सिवायची होती.चार महिने कँपाचं काम चाललं होतं.दादा ट्रकासोबत जायचे. थोड्या उशिरानी पैशे पण आले.आत्याच्या दिवाळसणाला मशिन दिलं .घरातली तेढ संपली ती तेव्हा.आत्यानी कधीच शिलाईचं काम केलं नाही. पण आमच्या प्रोडक्शन हाउस मधली दुफळी पडली ती कायमची.एक मोठा फायदा झाला म्हण्जे दादा आईच्या बाजूनी कायमचे उभे झाले.एक शिवणाचं मशिन आम्हाला सगळ्यांना बदलत होतं
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या टीम मध्ये खरी दुफळी पडली ती टीव्ही घरात आल्यानंतर. मधल्या खोलीत टीव्ही.बाहेर आई एकटी शिवण करत बसायची. तिलाही खूप वाटायचं सगळ्यांबरोबर बसू या पण पायाला लागलेला पायटा तिला सोडायला तयार नव्हता. अँडी रॉबर्ट चा संघ आला तेव्हा टीव्ही वर पहिली मॅच पाहिली. भाऊ नी सगळ्या वाड्यातल्या मुलांकडून एकएक रुपया जमा करून आईच्या हातात दिला. टीव्ही चे पैसे शिवणाच्या मशिननी दिले होते. पण आई एकटी पडली ती कायमची. दादा आता नाही म्हणायला तिच्या सोबत बोलत बसायचे . त्यांना फारसे बोलता यायचे नाही पण आईच्या बायकी गप्पांना दाद देत तिच्यासोबत बसायचे.
वर्ष पाठीमागे पडत जात होती.आई पन्नाशीला आली होती. आज्जी ऐंशी वर्षाची .आणि एक दिवस शामजी गडा नावाचा माणूस आमच्याकडे आला.त्याचं मुंबईला दुकान होतं तयार कपड्यांचं.एंब्रॉयडरीसाठी त्याला टीम बनवायची होती. कुठल्यातरी माहेरवाशिणीनी आईचं नाव मुंबई पर्यंत नेलं होतं.पुढची चार वर्षं तुफानी काम घरात आलं.दोन नविन मशीनी मुंबईहून आल्या. शेजारच्या दोन बायका मदतीला आल्या.भाऊचं इंजनीयरींग, माझं कॉलेज , ताईचं लग्नं या सगळ्या बाबी शिंपीकामातून भागल्या. दादा पेन्शनीत निघाले.आई सोबत दिवसभर बसायचे. आज्जी थकली होती. आतल्या खोलीतून आईला हाका मारत राह्यची.मशिन आणि आई दोघांना विश्रांती नव्हतीच.
सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती.
- वाडा चारी बाजूनी खचायला लागला तेव्हा गावात छेडा, गाला , सुरा, भानुशाली वगैरे माणसं फिरायला लागली होती. शामजी भाईच्या ओळखीनी एक बिल्डर आला तेव्हा वाड्याची सोसायटी करायची ठरलं. आज्जीनी आत्याला एक फ्लॅट द्यायला लावला. घरात खूप कधीच न पाहिलेले पैसे आले. पण आता ते हवे होते कुणाला.शिलाईच्या पैशावर वाढलेली मुलं श्रीमंत झाली होती. वेगवेगळ्या देशात राहत होती.
फ्लॅटचा नकाशा दाखवायला आर्कीटेक्ट आला तेव्हा त्यानी कागदावर दाखवलं हे तुमचं देवघर. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला.
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मशिन आईच्या बेडरूम मध्ये अजून तसंच आहे. आई मात्र आता शिवणयंत्रा कडे बघत नाही. टीव्ही बघत पेंगत राहते.समोरच्या डिश मध्ये मागून घेतलेलं आईसक्रीम विरघळून जातं. साखर खायची नाही म्हणून नातवानी बिनसाखरेच गोड आईसक्रीम आणलेलं असतं.सिरीयल संपते. आई जागी होते. परत चॅनेल बदलते.परत पेंगायला लागते . दादा हाक मारतात पण तिचं लक्ष नसतं. जाहिरातीत शिलाई मशिन आलं की टीव्ही खाडकन बंद करून रडायला लागते. मावशीबाई आईला समजावतात. दादा मुके मुके हूओन बघत राहतात. मशिनच्या बाजूला आईची व्हीलचेअर आहे. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संस्कृती

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

27 Mar 2013 - 12:25 pm | सुबोध खरे

अप्रतिम लेखन

बाळ सप्रे's picture

10 May 2013 - 2:04 pm | बाळ सप्रे

परत परत वर आणावा असा धागा..
अशा "निवडक" लिखाणाचा एखादा वेगळा विभाग नाही का करता येणार?

खबो जाप's picture

10 May 2013 - 2:49 pm | खबो जाप

"घरात खूप कधीच न पाहिलेले पैसे आले. पण आता ते हवे होते कुणाला.शिलाईच्या पैशावर वाढलेली मुलं श्रीमंत झाली होती. वेगवेगळ्या देशात राहत होती."
---एक नंबर वाक्य
फ्लॅटचा नकाशा दाखवायला आर्कीटेक्ट आला तेव्हा त्यानी कागदावर दाखवलं हे तुमचं देवघर. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला.
--एकदम काळजाला भिडून गेले.

गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.

--ह्या वाक्यावर डोळ्यात खळकन पाणी आले.
बस नकळत कुठेतरी गुंतत जावे असे लिखाण, एकदम आवडेश.

आर्या१२३'s picture

10 May 2013 - 3:05 pm | आर्या१२३

शेवट वाचुन मन सुन्न झाले.
तुमच्या आईंना, तुमच्या लेखणीला आणि संवेदनशीलपणाला सलाम!!

तर्री's picture

10 May 2013 - 3:39 pm | तर्री

अरविंद गोखल्यांची लघुकथा वाचावी तसे वाटले.

भटक्या..'s picture

10 May 2013 - 4:19 pm | भटक्या..

डोळ्यात टच्कन पाणी आल...

देशपांडे विनायक's picture

11 May 2013 - 10:29 am | देशपांडे विनायक

सुंदर लिखाण .
पण गंमत बघा ! या मशीनचा धक्का मला फार मोठा बसला
बायकोला मनापासून साथ देणारा मी ,ती जेव्हा माहेरहून मशीन आणते म्हणाली तेंव्हा चक्क ओरडून नाही म्हणालो
ते मशीन तिने तिच्या पगारातून मोठ्या हौसेने घेतलेले होते
माझे ओरडणे ऐकून ती आशचर्याने पाहू लागली कारण असे मी ओरडत नाही
मराठी सिनेमा पाहणे हा नित्य कार्यक्रम असण्याचा हा परिणाम होता
शिवण्याचे मशीन आणि घरावर येणारे संकट यांचे घनिष्ट संबंध मी विसरूच शकत नव्हतो
ते मशीन मी आणि बायको निवृत्त झालो तेंव्हा घरी आणले
कालानुसार त्यात बदल केला ,त्याला इलेक्ट्रिक मोटार लावली पण तिला काम नसते
आता ते मशीन का घरात आहे याचे साधे सरळ उत्तर आताच्या पिढीला रुचेल ?

पिलीयन रायडर's picture

11 Oct 2013 - 1:54 pm | पिलीयन रायडर

__/\___

शब्द नाहीत...
आईची फार फार आठवण येतेय...

कॅलिडोस्कोप सारखं प्रत्येक वेळी नवं वाटणारं नि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे भिडणारं, बरंचसंच्च रिलेट करणारं....

आईवडलांचे कष्ट, एकत्र घरातली परवड, एकाच्या जीवावर दुसर्‍यानं खाऊन माज दाखवणं, सगळे प्रकार. त्यातून घरातून बाहेर पडणं असं सगळं. नंतर ह्या माज कर्त्या काकानं वडिलोपार्जित जमीन परस्पर विकणं असं सगळं केलं.
वडील शिक्षक. अतिशयच सरळमार्गी. ट्युशनचा पैसा पण नको म्हणणारे.
१० बाय १५ च्या भाड्याच्या खोलीत रात्र रात्र शिवणयंत्र चालवणं, चहापावडर, गंध, कॉस्मेटिक्स, ब्लँकेट्स, ब्लाऊजपीस विकणं, हे सगळं आईनं केलंय. ७२ला लग्न झाल्यावर ८६-८९ बाह्य परीक्षा देऊन मराठी बी ए झाली. आईनं भाकरी करता करता नोट्स वाचून दाखवायच्या बहिणीने. ८९ ते २००३ बँक कलेक्शन चं पिग्मीचं काम. १०० रु ला ३ रुपये मिळणार. आज प्रत्येक वेळी हॉटेलात खर्च करताना, ब्राण्डेड कपडे घ्यायचे म्हटलं की आधी तेच आठवतं.
लिहीण्यासारखं बरंच आहे. बहिणींनी ह्यापेक्षाही जास्त हाल काढलेत.

आज ईशकृपेनं बरं आहे पण भूतकाळ आठवला की शहारायला होतं.

बॅटमॅन's picture

11 Oct 2013 - 2:53 pm | बॅटमॅन

..............

आयुर्हित's picture

15 Jan 2014 - 12:17 am | आयुर्हित

अप्रतिम लेखन! मानलं बुवा आपणाला.

मित्रांनो, चला तर मग अशा एका आजाराला हद्दपार करू या ! परत असा end कुठल्याच कथेचा नसावा.
कृपया आपले प्रश्न/शंका असतील तर खालील धाग्यावर भेटू या!
"मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत)"

आपला मिपास्नेही: आयुर्हीत

कपिलमुनी's picture

16 Jan 2014 - 6:24 pm | कपिलमुनी

आवरा स्वतःला !

अहो ते नक्की कशाची जाहिरात करतायत हेच कळलेलं नाहीये!

पिलीयन रायडर's picture

18 Jan 2014 - 5:27 pm | पिलीयन रायडर

येक्झॅक्ट्ली...
ह्यांचे आणि मधुनेहाचे काही ना काही "आर्थिक" संबंध नक्कीच आहेत!!

पिलीयन रायडर's picture

18 Jan 2014 - 1:26 pm | पिलीयन रायडर

तुम्हाला वेड लागलय का?

पिलीयन रायडर's picture

18 Jan 2014 - 1:26 pm | पिलीयन रायडर

तुम्हाला वेड लागलय का?

मनीषा's picture

15 Jan 2014 - 9:23 am | मनीषा

अप्रतिम.. !

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Jan 2014 - 10:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी

या माणसाला कुठे पाहीले कां कोणी इतक्यात?
सध्या गायबलेत जणू!!

भाते's picture

15 Jan 2014 - 11:42 am | भाते

कालच जे. डीं. चा चा ठाणे कट्टा आटोपल्यावर आम्ही काकांकडे गेलो होतो.

मारकुटे's picture

16 Jan 2014 - 5:47 pm | मारकुटे

हा धागा कसा काय वर आला?

शैलेन्द्र's picture

18 Jan 2014 - 4:30 pm | शैलेन्द्र

मला वाटतं, धाग्याचा "मधुमेह" उफाळला..

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2015 - 11:02 pm | बोका-ए-आझम

लाभले आम्हास भाग्य की वाचतो मराठी!

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 1:42 pm | एक एकटा एकटाच

अप्रतिम लिहिलय

मराठी कथालेखक's picture

17 Mar 2016 - 4:10 pm | मराठी कथालेखक

छान कथा, आकर्षक शैली.

दिपुडी's picture

17 Mar 2016 - 6:25 pm | दिपुडी

रामदास भौ कथा अप्रतिम आह काटकोरंटीची फूले इतकीच् भावली

स्वीट टॉकर's picture

18 Mar 2016 - 10:51 am | स्वीट टॉकर

कसलं टचिंग लिहिलं आहेत! ___/\___

नीलमोहर's picture

18 Mar 2016 - 11:43 am | नीलमोहर

__/\__

वामन देशमुख's picture

18 Nov 2019 - 10:15 pm | वामन देशमुख

आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.

खरंच निर्दय लेखक आहात तुम्ही, रामदास! काळजावर सुरी चालवलीत शेवटच्या वाक्यात.

खुप दिवसांनी पुन्हा वाचली ,डोळे भरून आलेच आपोआप

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

21 Nov 2019 - 6:40 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

किती सुंदर, जिवंत लिहिलं आहे तुम्ही! लेखातल्या जुन्या खुणा वाचता वाचता त्या काळात घेऊन गेल्या अलगद. तो काळ पाहिला असल्यानं ते सारं ओळखीचच होतं. हे असं ; भूतकाळ वर्तमानाच्या मुठीत पकडणं सोप नाही हो. तुम्ही ते लिलया केलत! त्या माऊलीच्या कष्टाला सलाम. त्यांना प्रणाम. शेवटच्या परिच्छेदाने मन पिळवटून गेलं. मला माझी आईच आठवली. पुन्हा पुन्हा धन्यवाद या अति सुंदर लेखबद्दल. असेच आणखी लिहा. वाचायला आवडेल.