शिंपीणिचं घरटं

गावाचं तेव्हा शहर व्हायचं होतं.वाड्याला लागून वाडे होते . छेडा-गाला-ठक्कर नावाची माणसं फिरकत नव्हती. गावाला गुजराथ्यांचं वावडं नव्हतं.गावात गुजराथी कुटुंब बरीच होती. त्यांना गुज्जर म्हणायचे. धारीया ,सेठ , शहा अशी नेमकीच आडनावं होती. गुज्जरांची मोजणी वेगळी नसायची. हळूहळू बदल येत गेला.भाडोत्री नावाची कुटुंब वाड्यात रहायला आली.त्यांना गावाबद्दल कधीच प्रेम नव्हतं.त्यांना त्यांचंच गाव आवडायचं .पण पोट भरायला बिचारी आमच्या गावात आली होती.पण हळूहळू बदल येत होता. पंचायतीची इमारत उभी राहीली.टेलीफोनच्या लायनी रस्त्यावरून लोंबायला लागल्या. शाळा मोठी झाली. खानदेशी मास्तर आले, घाटावरचे कुल्फीवाले आले ,भोज बनीयाचे दुकान सुरु झाले..बाया बापड्या नळाची स्वप्नं बघायला लागल्या. भिंतीभिंतीवर लाल त्रिकोणाच्या जाहिराती लागल्या.पांढर्‍या साडीतल्या नर्सा दुपारी घरी येउन आयाबायाना सल्ले द्यायला लागल्या.आमची आई एक दिवस कंटाळून म्हणाली " आता, सगळं झालं हो आमचं ."
"आज्जीनी मान डोलावली हो सहा म्हणजे झालंच म्हणायचं. "
"तेच म्हणते मी नर्स बाईला चेव आला.तुम्हीच हे सगळं सांगा की वाड्यतल्या बायकांना."
" मला नका बाई या भानगडीत पाडू. आत्ता ऐकतील मग भाड्याला उशीर करतील."आई फणकार्‍यानी म्हणाली .
भाडं वेळेवर येणे हा एक ज्वलंत इश्यु होता तेव्हा. बरेच खर्च भाड्यावर अवलंबून होते.
"मग या आता तुम्ही "असं म्हणून आई उठून गेली.
पण आज्जी आणि नर्स बाई बराच वेळ बोलत होत्या.
दुसर्‍या दिवशी आज्जी आणि बाई दोघी वाड्यात फिरत होत्या. आईला हे काही आवडलं नाही पण नाराजी दाखवायचे दिवस नव्हते ते. आज्जीला वाड्यात नाही म्हणणार कोण?
महिन्याभरात चार पाच ऑपरेशनं झाली. दोन चार लूप लागले. (तेव्हा तांबी नव्हती). पुढच्या महिन्यात नर्स बाई दुपारची आज्जीला भेटायला आली. हुश्शं करून बसली. झोळीतून काही नोटा काढून आज्जीच्या हवाली केल्या. आज्जी हरखून गेली.
"एवढे पैसे देतं का गवरमेट"असं म्हणत नोटा मोजत राहिली.
नर्स बाई गेल्यावर आज्जीला हसायला यायला लागलं जवळ जवळ महिन्याभराच्या भाड्याचे पैसे जमा झाले होते .आईला काहीच कळेना.(बाप रे आज्जी या वयात ... ) मग काही वेळानं तिच्या लक्षात आलं .दोन आठवडे एकच चर्चा "या पैशाचं करावं काय?"आज्जी आणि आई दोघींचं एकमत झालं. शिवणाचं यंत्र आणू या .चार पैसे गाठीला लागतील. आज्जी सुमतीबाई सुकळीकरांची पाठराखीण .धोरणी निर्णय वेळेवर घ्यायची .झालं ..एक दिवस दादांना विश्वासात घेतलं गेलं. डिसक्लोजर अर्थातच लिमीटेड होतं पण त्यांना ही बरं वाटलं .त्यांची एक बहिण अजून लग्नाची होती.
सिंगरचं शिलाई मशीन आमच्या घरात यायचं होतं ते असं.
माणसं तेव्हा फारशी दुरावली नव्हती . सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता .तालुक्यावरून मशिन घरी आलं तेव्हा घरात गणपती सारखी गर्दी झाली होती. मशिनीसोबत इंजनेर पण आला होता. त्याला चहा देउन लगेच पायटा जोडायला सुरुवात झाली. खोक्यातून मशिनीची बॉडी बाहेर काढली. पोरासोरांचा उत्साह उतू चालला होता. चकचकीत कव्हर जेव्हा बाहेर आलं तेव्हा सगळयानी श्वास रोखून धरला. घरात एक नविन दागीना आल्यासारखं वाटायला लागलं.इंजनेरनी बॉबीनीवर धागा चढवला तेव्हा धाग्याच रीळ जमिनीवर गडबडा लोळायला लागलं.पोरं खूष. बॅगेतून चिधीचा एक तुकडा काढून झर्रकन त्याच्यावर शिलाई मारून झाल्यावर त्यानी मान डोलावली.
"आक्का, या इकडं सगळं काही सांगतो."
आज्जीला पुढे घालून आई सगळं समजून घेत होती.
आज्जी म्हणाली "आमच्या भाउला सागां जरा ,मोठेपणी फिटर होणार तो."
आज्जीचा भाऊ मुंबईला होता. तो फिटर होता. त्यानी घर पण घेतलं होतं. म्हणून आमचा मोठा भाऊ फिटर होणार असंच ती म्हणायची. भाऊनी पण मन लावून समजून घेतलं .दुसर्‍या दिवशीपासून आईचा पाय मशिनच्या पायट्याला लागला तो सुटला पन्नास वर्षानी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जनसंपर्क, प्रसारण,विक्री ,वसूली वगैरे आज्जीनी आपणहून सांभाळायला सुरुवात केली.वसूली फार महत्वाची. नवरे घरी असताना जाता यायचं नाही. भाड्याच्या हिशोबात आम्हाला शिरकाव नव्हता.आई शिवणावर लक्ष ठेवायची आणि आज्जी वसूली. कामाची कमी नव्हती. घराघरात चार पाच मुलं. दोन तरी बाईमाणसं. तयार कपडे फारसे मिळत नव्हते. आयत्या कपडयांना फारसा मान नव्हता.शिंप्याकडे जाणं म्हणजे एक वाढीव काम.लंगोट्या, लंगोट, दुपटी, अंगडी, फ्रॉक, लाळेरी, पायजमे,मनीले, यादी फार मोठी होती.इलास्टीकचा जमाना यायचा होता. नाडीच्या चड्ड्या शिवणं हाच एक मोठा व्याप होता.
प्रॉडक्शन हाउस दुपारी मुलं घरी येउन अभ्यासाल बसली की सुरु व्हायचं ते संध्याकाळी पुरुष माणसं घरी येईपर्यंत.कट कट.. घर्र झर्र असा आवाज सतत चालू.भाऊ थोड्याच दिवसात तयार कारागीर झाला. आवाज थोडा वेगळा आला की आईला थांबवायचा.
तेलाचं एक पिटपिटं(लांब चोचीचं )इंजनेर देऊन गेला होता. दोन थेंब इकडे तिकडे टाकून मशिन चालवायचा. मग परत कट कत गर्र झर्र चालू.
साडे तीन वाजेपर्यंत आसपासच्या बाया कामं घेऊन यायच्या. आम्ही सगळी मुलं मधल्या खोलीत अभ्यास करत असायचो. गप्पा जोरात चालायच्या.एकएक नविन गोष्ट कळत जायची.
मला वाटतं ब्लाउज हा शब्द फारसा वापरात नव्हता.पोलकं जंपर(झंपर),हेच शब्द होते. ब्लाउज आणि ब्रेसीअर हा प्रकार नव्हता.पोलकं आणि आत घालायची बॉडी अशी जोडी होती. आसपासच्या आज्ज्या गाठीच्या चोळ्या वापरायच्या.वाढत्या मुली बॉडीफ्रॉक आणि फ्रॉक. थोड्या मोठ्या मुलींनी स्कर्ट वापरायला सुरुवात केली होती.
सामान्य ज्ञान वाढत होतं हे खरं .नंतर पोटीमा ची फॅशन आली.(काही चावट माणस याला पोटावर टिचकी मारा म्हणायचे) नवनव्या सुना यायला लागल्या आणि कटोरी ब्लाउज हा नविन शब्द कळला. त्यातला कटेंट कळायचं ते वय नव्हतं. बाह्या टिकून होत्या. लांब हाताच्या, फुग्याच्या, थोड्या मोठ्या वगैरे वगैरे. बाह्या नसण्याची फॅशन आली शहात्तर सालानंतर्.बाहीच्या आतून छोटीशी पट्टी जोडायची टूम पण तेव्हाच आली.नविन फॅशनी कळायला लागल्या.
महिन्याभरातच उत्पन्न वाढायला लागलं. छोटस गाव . या वाड्यातली बातमी त्या वाड्यात जायला फारसा वेळ लागायचा नाही. एका रविवारी बदले काका सकाळीच आले.गंध्र्यांकडे आलो होतो म्हणाले पण आले होते आमच्याकडेच.वडलांशी गप्पा मारता मारता त्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली. चहा फुर्रकरून प्यायले. जाताजाता म्हणाले" तुम्ही भटाईच काम केल्यावर आमच्या पोटावर पाय."
आईचा उत्साह जबरदस्त पण चार पाच महिन्यात पाठ दुखी सुरु झाली ती मग कायमची. रात्री धाकटा भाऊ पाठीवर पाय देऊन चेपून द्यायचा. आत्या ,ताई वगैरेंनी कामं वाटून घ्यायला सुरुवात केली. काज बटणं (हूक नव्हते) ,हात शिलाई, नाड्या घालणं ,शो बटणं जोडणं फ्रील शिवणं यासाठी दुसरी फळी तयार झाली.घरातल्या एका मशिननी सगळ्यांना कामाला लावलं.
संध्याकाळी आई मात्र एकटी पडायची. तिचा गळा मात्र सुरेल होता त्यामुळी गाणं गुणगुणत एकतीच काम करायची. माझ्या कानावर येता जाता संस्कार व्हायला लागले.
घर दिव्यात मंद ...बघ अजून जळते वात..तेव्हाच म्हणायला शिकलो .
आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते.
वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.
आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मशिन घरात आल्यावर आईनी पहिली शिलाई केली मशिनच्या कव्हरसाठी खोळीची.झालर असलेली खोळ त्यावर आईचं नाव कशिदा काढून लिहिलं होतं. नंतर पंधरा वर्षं कव्हराचं व्हिनीअर चकचकीतचं राह्यलं पण पोरांनी एक शोध लावला.कव्हर डफासारखं वाजायचं . दुपारी गाण्याच्या साथीला एक नविन वाद्य मिळालं. भाऊ छान ताल धरायचा.
शरद मुठ्यांची गाणी फेमस होती.
छान छान छान मनी माउचं बाळ कसं गोरं गोरं पान...
जिंकू किंवा मरू.......
असा कसा देवाचा देव बाई ठकडा....
गाणी जोरात व्हायला लागली. गाव गप्पा जोरात व्हायला लागल्या. वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. लहान होतो. समज नव्हती. आभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं.
भाऊ तिमाहीत नापास झाला. खापर फुटलं ते आईच्या डोक्यावर.दादा ताडताड आईला बोलले. बिचारी शांतपणे ऐकत राहिली.सहा मुलांच्या गरजा भागवण जसं काही तिची एकटीची जबाबदारी होती. आज्जी अशा वेळीदूर रहायची. आई एकटी पडायची.मशिनवर बसलेली शून्यात बघणारी आई मला अजूनही दिसतें. नंतर काय झालं ते कळलं नाही पण भाऊ आणि ताईचा अभ्यास दादांनी रोज घ्यायला सुरुवात केली.
आज्जी रात्री जेवायची नाही आणि सैपाकही करायची नाही. आत्या आणि ताई अभ्यासात.(आमच्या आत्या आणि ताई मध्ये दोन वर्षाचंच अंतर) संध्याकाळ खिचडीवर निभायला लागली.दादांनी हा बदल पण मान्य केला. नविन बदलाची सुरुवात झाली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळी घरी आलं की घरात कोर्‍या कपड्याचा वास दाटलेला असायचा. चिंध्या पायात पायात यायच्या. दादांना हे आवडायचं नाही. मग दादा येताना दिसले की आज्जी परवलीचं गाणं म्हणायची. विणून सर्व झालाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम.(दादांच नाव रामचंद्र ) आई घाईघाईनी काम आवरतं घ्यायची.रीळाचा डबा आत टाकायची.रीळच्या डब्याचं रहस्य एकदा असंच मला कळलं.रिकामं रीळ फेकल्यावर त्यातून एक रुपयाची नोट बाहेर पडली.शिलाईचे पैसे असेच लपवून ठेवले जायचे. दादांना हिशोब कळू नये म्हणून धडपड.एक अर्थानी मला वाटतं दादानी उत्पनाला मान्यता दिली होती. आता त्याचं काहीच वाटत नाही पण बायकोच्या कमाईला मान्यता मिळणं ही फारचं मोठी गोष्ट होती.बायकोचं इन्कम आता आपण हातचा एक धरून चालतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आई या दरम्यान आजारी पडली .आजाराचं स्वरुप कळण्याइतपत मी मोठा झालो नव्हतो. पण ताई आणि आत्या कावर्‍या बावर्‍या झाल्या होत्या. आज्जीचं हसणं लोप पावलं होतं.आईला पुन्हा एकदा एकदा दिवस गेले होते.तालुक्याला जाऊन इलाज झाला पण महिनाभर शिवण बंद पडलं.आई त्यानंतर फारच अबोल झाली होती. आज्जी आणि दादांची खुसफुस करत भांडण चालली होती. आईचं अंथरूण आम्हा मुलांसोबत घालायला सुरुवात झाली. शिवणाचा रगाडा परत सुरु झाला. थोड्याफार फरकानी आसपास हेच घडत होतं.तिशी पस्तीशीच्या बायका चरकातून काढल्यासारख्या दिसायच्या. रडरड करणारी मुलं आणि त्यांना सभाळ्णार्‍या ताया हा कॉमन सीन होता.पुरुषांना बदललं युद्धानंतरच्या महागाईनी.
या दरम्यान आत्याचं लग्न ठरलं. लग्नाच्या आदल्या दिवशी तिकडून निरोप आला मुलीसोबत शिवणाचं मशिन पाठवा . आज्जीनी बोलणी करताना केलेल्या फुशारक्या नडल्या. आयत्यावेळी मशिन आणायचं कुठून? आज्जी म्हणाली हेच आहे ते देऊ या. आयुष्यात पहिल्यांदा दादा आईच्या पाठी खंबीरपणे त्यांच्या आईच्या विरोधात ऊभे राहिले. लग्न मोडलं तरी चालेल या थराला गोष्टी गेल्या. मग चंदूमामानी तोडगा काढला.मुलाच्या बारशाला मशिन देऊ.आतापासून सुनेला कामाला लावणं चांगलं नाही दिसणार वगैरे वगैरे.पण मशिअन घरात राहीलं. पण आज्जीच्या मनातला सल तसाच राहिला.
दादा आर्वीला गेले होते. येताना हसतच आले. मिलिट्री कँपाचं काम मिळालं होतं.सैनीकांच्या ब्लँकेटला चारी बाजूनी शिलाई करून एक पट्टी सिवायची होती.चार महिने कँपाचं काम चाललं होतं.दादा ट्रकासोबत जायचे. थोड्या उशिरानी पैशे पण आले.आत्याच्या दिवाळसणाला मशिन दिलं .घरातली तेढ संपली ती तेव्हा.आत्यानी कधीच शिलाईचं काम केलं नाही. पण आमच्या प्रोडक्शन हाउस मधली दुफळी पडली ती कायमची.एक मोठा फायदा झाला म्हण्जे दादा आईच्या बाजूनी कायमचे उभे झाले.एक शिवणाचं मशिन आम्हाला सगळ्यांना बदलत होतं
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या टीम मध्ये खरी दुफळी पडली ती टीव्ही घरात आल्यानंतर. मधल्या खोलीत टीव्ही.बाहेर आई एकटी शिवण करत बसायची. तिलाही खूप वाटायचं सगळ्यांबरोबर बसू या पण पायाला लागलेला पायटा तिला सोडायला तयार नव्हता. अँडी रॉबर्ट चा संघ आला तेव्हा टीव्ही वर पहिली मॅच पाहिली. भाऊ नी सगळ्या वाड्यातल्या मुलांकडून एकएक रुपया जमा करून आईच्या हातात दिला. टीव्ही चे पैसे शिवणाच्या मशिननी दिले होते. पण आई एकटी पडली ती कायमची. दादा आता नाही म्हणायला तिच्या सोबत बोलत बसायचे . त्यांना फारसे बोलता यायचे नाही पण आईच्या बायकी गप्पांना दाद देत तिच्यासोबत बसायचे.
वर्ष पाठीमागे पडत जात होती.आई पन्नाशीला आली होती. आज्जी ऐंशी वर्षाची .आणि एक दिवस शामजी गडा नावाचा माणूस आमच्याकडे आला.त्याचं मुंबईला दुकान होतं तयार कपड्यांचं.एंब्रॉयडरीसाठी त्याला टीम बनवायची होती. कुठल्यातरी माहेरवाशिणीनी आईचं नाव मुंबई पर्यंत नेलं होतं.पुढची चार वर्षं तुफानी काम घरात आलं.दोन नविन मशीनी मुंबईहून आल्या. शेजारच्या दोन बायका मदतीला आल्या.भाऊचं इंजनीयरींग, माझं कॉलेज , ताईचं लग्नं या सगळ्या बाबी शिंपीकामातून भागल्या. दादा पेन्शनीत निघाले.आई सोबत दिवसभर बसायचे. आज्जी थकली होती. आतल्या खोलीतून आईला हाका मारत राह्यची.मशिन आणि आई दोघांना विश्रांती नव्हतीच.
सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती.
- वाडा चारी बाजूनी खचायला लागला तेव्हा गावात छेडा, गाला , सुरा, भानुशाली वगैरे माणसं फिरायला लागली होती. शामजी भाईच्या ओळखीनी एक बिल्डर आला तेव्हा वाड्याची सोसायटी करायची ठरलं. आज्जीनी आत्याला एक फ्लॅट द्यायला लावला. घरात खूप कधीच न पाहिलेले पैसे आले. पण आता ते हवे होते कुणाला.शिलाईच्या पैशावर वाढलेली मुलं श्रीमंत झाली होती. वेगवेगळ्या देशात राहत होती.
फ्लॅटचा नकाशा दाखवायला आर्कीटेक्ट आला तेव्हा त्यानी कागदावर दाखवलं हे तुमचं देवघर. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला.
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मशिन आईच्या बेडरूम मध्ये अजून तसंच आहे. आई मात्र आता शिवणयंत्रा कडे बघत नाही. टीव्ही बघत पेंगत राहते.समोरच्या डिश मध्ये मागून घेतलेलं आईसक्रीम विरघळून जातं. साखर खायची नाही म्हणून नातवानी बिनसाखरेच गोड आईसक्रीम आणलेलं असतं.सिरीयल संपते. आई जागी होते. परत चॅनेल बदलते.परत पेंगायला लागते . दादा हाक मारतात पण तिचं लक्ष नसतं. जाहिरातीत शिलाई मशिन आलं की टीव्ही खाडकन बंद करून रडायला लागते. मावशीबाई आईला समजावतात. दादा मुके मुके हूओन बघत राहतात. मशिनच्या बाजूला आईची व्हीलचेअर आहे. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखनविषय:: 

प्रतिक्रिया

थोडा थोडा लिहीताना हा लेख बराच मागे पडला होता. बोर्डावर दिसणार नाही म्हणून हा खटाटोप करतो आहे.

व्वा व्वा फार सुरेख अफलतुन ,

प्रतिसाद खरडला आहे.

इथे फक्त इतकेच सांगतो, अति अति सुंदर.

बिपिन.

"आई-शिलाई" च्या जोडीचा प्रवास अतिशय प्रभावी.

सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता.

अप्रतिम!

काय चटका लावणारं लिहिलं आहेत!!
आईसाठी जीव तडफडला.....

सगळं आयुष्य कष्टात काढलं त्या माऊलीनं..

गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.

निशब्द..

Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

ओह माय गॉड.. शेवट असा असेल या लेखाचा असं वाटलं नव्हतं!! खरच निशब्द केलंत..झटकाच बसला त्या वाक्याने.. :|

http://bhagyashreee.blogspot.com/

आणि अतिशय समर्पक नाव आहे.

शेवटची ओळ वाचतांना डोळ्यात पाणी टचटचले.

-दिलीप बिरुटे
(निशब्द )

अगदी असच.

"सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती."

अगदी खरं...त्यामुळेच ती पिढी सर्वोत्कॄष्ठ...त्या पिढीच्या ह्या गुणांच्या जोरावर आज काल आम्ही इतके वरती आलो. शतशः प्रणाम त्या पिढीला...असेच आमचे आई वडील सुद्धा...आठ्वणीने आज गदगद झालो.

सुंदर लेख...

लेख! वाक्यावाक्याला दाद घेऊन जाणारा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

इतके हृदयस्पर्शी लिखाण.
बोलती बंद झाली, प्रतिक्रिया दिली ती डोळ्यातल्या अश्रूंनी. कदाचित जे तोंडावाटेही परिणामकारकरित्या जे बाहेर यायचे नाही ते डोळ्यातून सहज आले.
पुण्याचे पेशवे

शब्द संपले.

असेच चांगले वाचायला मिळो..असेच लिहित रहा.

चकली
http://chakali.blogspot.com

लेखाच्या नावापासुनच शब्दन शब्द मनात घर करुन राहिला.
शेवट :(
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.

------- शब्द नाहीत---------

तात्या.

माणसं तेव्हा फारशी दुरावली नव्हती . सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता .

सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती.

एक शिवणाचं मशिन आम्हाला सगळ्यांना बदलत होतं.

अशी वाक्यं हा तुमच्या लिखाणाचा आत्मा आहे.

आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते.
वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.

हे तर मागच्या पिढीतल्या बायकांचं आयुष्याचं सारंच एका वाक्यात..

दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला.
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं.

क्या बात है! माणसं कशी हळूहळू विरघळत-विरघळत बदलत जातात ना?

आणि रामदास शेवटचं वाक्य तर भेदून गेलं हो! खरं सांगू, माझ्या डोळ्यात पाणी आलंच नाही - मी थिजून गेलो!
आता असंच कधीतरी सवडीने येईल ते पाणी, वाचलेलं सगळं पार आतात पोचेल तेव्हा!

चतुरंग

चतुरंगरावांशी शब्दश: सहमत !
निःशब्द झालो!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

नेहमीप्रमाणेच सुरेख लिखाण!!
रामदासजी, ही व्यक्तिरेखा काल्पनिक असेल अशी आशा आहे. कारण कुठल्याही आईला इतक्या त्रासातून जायला लागू नये हीच परमेश्वराजवळ प्रार्थना!!
-डांबिसकाका

मनाचा ठाव घेणारे लिखाण..

फारच सुरेख.....

(नि:शब्द झालेला)
मदनबाण.....

अतिशय सुरेख ललित लेख...
छान व्यक्तिचित्रण.. पुन्हा तुमची त्यातली हातोटी उठून दिसते.

विद्याधर

रामदास जी,
काय लिहू हेच कळेनासे झाले आहे... माझी सफर मध्ये मी फक्त मी मध्ये अडकलो होतो.... पण आज कळाले की माझ्या मी ला काहीच अर्थ नाही... मोठ मोठ्या गोष्टी लिहणे अथवा त्याची सही म्हणून उपयोग करणे वेगळी गोष्ट... पण सत्य हे नहमी वेगळेच असते.. तुमच्या आईच्या अनुभवाने मला माझ्या बालपणीचे १२ वर्ष आठवले तुमच्या व माझ्या जिवनामध्ये एक धागा आहेत जे सर्वस्वी एकच आहेत असे वाटावे इतके माझ्या ही जवळचे आहेत... एक शिलाई मशिन माझ्या ही घरी आहे आज ही.... !

घरी गेल्यावर नेहमी डोळे भरुन पाहत राहवे असे ते मशीन गेली ४५ वर्षे ने मशिन चालूच होते.. .. मागील वर्षापासून बंद करुन ठेवले आहे पण आज ही कधी मधी ते चालू होते...आपल्या नातवासाठी घोंगडी व लंगोटी तयार करण्यासाठी... ! त्या मशीनचे स्वप्न खुप मोठे होते... ! त्या स्वप्नात आम्ही कधीच पुर्ण झालो नाही... पण तुटलो जरुर !!!

धन्यवाद....! त्या माऊली ला माझे ही प्रणाम सांगा !

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!


जुनी पुस्तकं आवरताना हे मॅन्युअल सापडलं आणि लेख लिहीला.
१९६० च्या दरम्यान छापलेले हे पुस्तक आज एक कलेक्टर आयटम आहे. त्यातला हा एक फोटो.

अत्यंत प्रभावी लेखन.
अत्युच्च दर्जा...

वरवर साधा दिसणारा विषय एखाद्या प्रतिभाशाली लेखकाचा हात लागल्यावर सोन्याचा होतो.
हा रामदासांचा 'मिडास टच'!

सर्व कसे डोळ्यासमोर घडते असे वाटते,
आणि आई ने घरासाठी केलेले परिश्रम वाचुन आईचे मोठेपण अजुन जाणवते.
पण शेवट मात्र खुप खुप मनाला वेदना देतो.
इतके की डोळ्यातुन पाणी येते.

वाचताना डोळ्यातुन नकळत येणारे अश्रु आवरण्याचा प्रयत्न करतो आहे.!! अत्यंत प्रभावी !!
अभय

गोष्ट कशी प्रवाहिपणे पुढे पुढे जात रहाते.
...सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होत......
सुरेख उपमा. शेवटच्या परीच्छेदाने चटका लावला.

५ मिन्टा पूर्‍वि मिसळपाव वर आलो आणि हा लेखच पहिल्यांदा उघडला.
डोल्यातून पाणि आले.
अतिशय उत्तम लेख

काय प्रतिक्रिया देणार, शब्द नाहीत.

सुन्न करणारे लिखाण.

असे म्हणतात की एखादा लेख जेव्हा अस्सल उतरतो - मग ती कथा असो की व्यक्तिरेखा - तेव्हा त्यातले काय कल्पनेचे आणि काय घडलेले हा प्रश्न फजूल ठरत जातो. डांबिस यांच्या अब्दुलखानाबद्दल हाच अनुभव आला होता. लिखाण इतके अस्सल होते की, हा माणूस खराच भेटला का ? नक्की "सत्य" काय ? हा प्रश्न फजूल होतो. सत्य ते आणि तेव्हढेच जे लेखकाने मांडले , आपल्या लेखणीतून जे जिवंत केले.

प्रस्तुत लेखाबद्दलही हेच झाले आहे असे मला वाटते. गरीब , कष्टाचे जीवन जगणारी माणसे आपण आजूबाजूला पाहतोच की ! हलाखीचे , दुर्दैवाचे दशावतार असणारी अनेक आयुष्ये आपण आजवरच्या अनुभवांमधे पाहिली आहेत. प्रस्तुत लेखाचे - आणि माझ्या मते कुठल्याही उत्तम प्रतीच्या ललित लिखाणाचे - यश यात असते की त्याद्वारे लेखक त्या त्या काळाचे , व्यक्तीच्या सामाजिक , कालसापेक्ष बदलणार्‍या पर्यावरणाचे अगदी सूक्ष्म चित्रण करतो ; माणसाच्या वेदनेच्या दुखर्‍या नशीच्या अगदी नेमके जवळ नेऊन वाचकाला ठेवतो , आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने स्थलकालाला ओलांडून वाचकाला त्या त्या प्रदेशात नेमके नेऊन सोडतो. या कथेमधे "आई" या पात्राच्या तोंडी कसलेही - अगदी जुजबीसुद्धा - संवाद नाहीत ! तिच्या मूक वेदनेला याहून चांगले शब्दरूप कुणाला देता आले नसते. लेखाकाची अल्पक्षरत्वाची , तुटक वाक्यांची शैली अतिशय प्रभावी आहे. तपशीलाच्या पसार्‍याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते. प्रत्येक वाक्यात तीव्रतेने जाणवलेले एकेक सत्य. आणि अशा एकेक वाक्याने केलेले चिरेबंदी काम.

रामदास , तुमचे लिखाण शैलीच्या बाबतीत पानवलकरांची , वेदनेचा वेध घेण्याच्या बाबतीत जी एंची , तत्कालीन सामाजिक चित्रणाच्या बाबतीत गाडगीळांची आठवण करून देणारे आहे.

तुमची जी नॅरेशन स्टाईल आहे ना, खरंच अप्रतिम आहे...
... मुक्तसुनित यांनी म्हटल्याप्रमाणे अशा कष्टाचे जीवन संगणार्‍या कथा आपण अनेकदा वाचत असतो पण अशी ताकदवान कथा क्वचित वाचायला मिळते...
तपशीलाच्या पसार्‍याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते
हेच म्हणतो...
शेवट ग्रेट....आणि शीर्षक उत्तम...
असेच लेख वाचायची अपेक्षा करत राहीन.. :)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अगदी हेच म्हणतो.
अतिशय सुंदर लेख.

नील.

काय बोलु? भरुन आलं... रडावस वाटल शेवटी...

तुमचा कवितेवरील सुंदर लेख आणि हा भावस्पर्शी लेख दोन्ही लेख फार आवडले. लेखाची मांडणी, वातावरण निर्मिती, शेवट सगळेच जमून आले आहे.

आपला लेख वाचुन, डोळ्यात पाणी उभे राहीले.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मी खूप वेळ प्रतिक्रीया देऊच नाही शकले......
डोळ्यात खूप पाणी आलं....

एक नि:शब्द करणारा प्रवास... मानलं बुवा तुम्हाला.

खुप छान लेख रामदास .. आपण तर फ्यान बॉ तुमचे !

रडावस वाटल शेवटी...
अप्रतिम!!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आई उभी राहिली डोळ्यासमोर...
तिची तगमग, दु:ख , हतबलता ..
रडवलंत अगदी....

व्यक्तिचित्रण.
सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता
मस्तच

आम्हि, आता या रामदासापुढेहि हात जोडतो.
तुम्हि असले अफ़ाट कसे काय लिहिता बुवा....
लेख अत्युत्तम झालाय.मन:पुर्वक अभिनंदन.
वरील बहुतेकांनी म्हंटल्याप्रमाणे आमच्या डोळ्यातून पाणि काढलेत.
आपले असेच अप्रतिम लेख उत्तरोत्तर वाचायला मिळोत.
=D> =D> =D> =D> =D>

अभिज्ञ

"सहज सुंदर भाषा. चपखल शब्दयोजना. उत्तम वातावरणनिर्मिती" अशासारख्या कोरड्या शब्दांनी आपला अपमान करू इच्छित नाही.

- सर्किट

अतिशय कसदार, सहज अनुभवलेखन. बाकी इतरांनी लिहिलेच आहे.

अवांतर :
सुमतीबाई सुकळीकर ह्यांचे घर रामदासपेठेत. तुम्ही रामदासपेठेतच राहता का? बाय द वे, "नर्सा" हा शब्द वाचून फार बरे वाटले. अगदी पुन्हा नागपूरला गेल्यासारखे वाटले.

------- शब्द नाहीत---------

अतिशय हृदयस्पर्शी वाटला हा लेख.....
मन सुन्न झाल.... डोळ्यात कधी टचकन पाणी आले कळलेच नाहि.

रामदास तुमचे मनापासून अभिनन्दन......

प्रतिक्रिया लिहायला शब्दच नाहित. 'झिजुनि स्वतः चंदनाने दुसर्‍यास मधुगंध द्यावा' वृत्तिने उभ आयुष्य जगणार्‍या 'आईला' शतशः प्रणाम.

काय हो लिहिलंत हे!!! कोणत्या शब्दांत प्रतिक्रिया लिहावी कळत नाही.
तुम्हाला आणि तुमच्या लेखणीला साष्टांग नमस्कार!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

असच लिहित जा ..

मानलं बुवा तुम्हाला. ...

....बन्ड्या

असे किती पँडोराज बॉक्स आहेत मुनिवर्य.

मुक्तसंगः अनहंवादि
झालो. अधिक लिहिणे केवळ अशक्य!
धन्यवाद आणि असेच लिहिते रहा.

हे असं लेखन आजकाल अभावानेच वाचायला मिळतं.

१. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.

२. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला.
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं.

३. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. -

- डोळ्यात पाणी आलं

केवळ अप्रतिम!
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

अफाट, अप्रतिम, ह्रिदयस्पर्षी. शब्द कमी पड्तील लिखाणाचे कौतुक करताना. मागे तुमचे काटेकोरांटीची फुले (तुमचेच होते ना ते पण?)?वाचले होते. ते पण निव्वळ अप्रतिम होते.

>>आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते.
वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.>>

काळजाला भीडलं!!!

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
शेवटच वाक्य वाचुन जीव चरकला आणि त्याच क्षणी आईचा चेहरा डोळ्यासमोर आला...........पाय हा अवयव फक्त नावापुरता शरीराला जोडलेला आहे त्यातल त्राण तर केंव्हाच निघुन गेलय्.आयुष्यभर संसारासाठी काढलेल्या खस्तांमुळे व खर्चाचा ताळमेळ बसवताना केवळ शक्य तितके पैसे वाचवता यावेत यासाठी तरुणपणी परळ ते वरळी ,आणि नंतर रेमंड ते हरिनिवास सर्कल असे रोजच्यारोज व सतत बरेच वर्ष चालत केलेल्या प्रवासापायी आज आई स्वतःच्या पायावर उभी देखिल राहु शकत नाही........
संसारासाठी व आपल्या पिलांसाठी सतत कष्ट उपसणार्‍या अश्या असंख्य माऊल्यांपुढे सदैव नतमस्तक...........
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

हे माझ्या नजरेतून कसे काय सुटले? आज मुखपृष्ठावर पाहिले तेव्हा आधाशासारखे वाचून काढले.
अप्रतिम!
स्वाती

आधीपण वाचले होते आणी आता परत वाचले, दुसर्‍यांदा वाचाताना पण त्याच भावना येण हे तुमच्या लिखाणाच कौशल्य.

--टुकुल

संध्याकाळी आई मात्र एकटी पडायची. तिचा गळा मात्र सुरेल होता त्यामुळी गाणं गुणगुणत एकतीच काम करायची. माझ्या कानावर येता जाता संस्कार व्हायला लागले.
घर दिव्यात मंद ...बघ अजून जळते वात..तेव्हाच म्हणायला शिकलो .
आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते.
वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.
आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते.

निशब्द !!

जाहिरातीत शिलाई मशिन आलं की टीव्ही खाडकन बंद करून रडायला लागते. मावशीबाई आईला समजावतात. दादा मुके मुके हूओन बघत राहतात. मशिनच्या बाजूला आईची व्हीलचेअर आहे. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.

वाचून खुपच बधीर झाले ....डोळे पाणावले अन सुन्न झाले .. शेवटच्या Paragraph ने तर भलतिच भावनिक कलाटणी घेतली !
नेहमी प्रमाणेच अप्रतिम !!

~ वाहीदा

नि:शब्द!

अतिशय हृद्य लेख. शिंपिनीच्या घर्रट्यात समद्यांना जागा आहे.
रामदासांचे लेख अंतर्मुख करायला लावतात ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

रामदासजी तूमचे लेखन नेहमीच अप्रतीम असते. हा लेख माझा वाचायचा सुटला होता.
आपल्यासारख्यांमुळे मिपा वर वारंवार यावेसे वाटते.

आपल्या नव्या लेखाच्या प्र्तीक्षेत --- मोहन

आपण तर नि:शब्द!
प्रसंगनिर्मिती आणि लेखनशैली अतिशय परिणामकारक..
आईंना प्रणाम आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जोपासणार्‍या, त्यांनी आयुष्यभर केलेल्या श्रमांचे मोल समजून घेणार्‍या मुलां नातवंडांचही कौतुक..
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार

(नि:शब्द) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

माझी सायीसारखी सुरकुतलेली आजी आणि तिचं मशिन आठवलं. हृदय ठिसूळ झालं वाचून.

अप्रतिम !

आतून आतून आलेलं, नितळ लेखन !!!

बापरे!

बापरे!

लेख.
शेवट अनपेक्षीत.

आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं.
....................कित्येकदा वाचलं तरी शेवटच्या परीच्छेदानंतर नकळत डोळ्यात पाणी तरळते.
रामदासकाका, या दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या लेखणीमधून अजून अशाच लेखांच्या माणकांची आशा आहे.

रामदास तुमच्या कथा वाचायच्या म्हणजे अगोदर धैर्य गोळा करायला लागतं

धागा वर आणल्याबद्दल आभार विजुभाऊ..!

.

कसलं सुंदर लिहिलय ...

इंटर्नेटवर बर्‍याचदा "हसता हसता खुर्चीवरुन पडावे " असे विनोदी लेखन पहायला मिळते ...
पण इतकं हळ्वं करणारं लेखन फारच क्वचित ...

शेवट्याच्या वाक्यावर डोळ्यात पाणी तरळल :(

फारच मनस्वी... काळजला हात घालणारं लेखन !!

+१

तुम्ही आयडी सारखेच दिसता राव1

म्हणजे निष्पाप, निरागस वैग्रे का? ;)

मध्यमवर्गीय कौ

मध्यमवर्गीय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध, कष्टणारी मागची पिढी, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, प्रसंगी आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून, आपली स्वप्ने बासनात गुंढाळून मुलांचे शिक्षण, कोणाचे लग्नकार्य, कोणाचा सांभाळ, कोणाचे आजारपण ह्या कौटुंबिक कर्तव्याला दिलेले प्राधान्य वगैरे वगैरे वाचताना मी माझा राहिलोच नाही. त्या घरातला सदस्य झालो, त्या कष्टाळू आणि सोशिक आईचा मुलगा झालो....शेवट वाचून अक्षरश: ढसाढसा रडलो.

आई आणि तिचे शिलाई मशीन हा माझ्याही बालपणाच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे.

निव्वळ नि:शब्द. :(

तरल, लिखाण !
घरच्या मशीनची आठवण आल्याबिगर राहवलं नाय !

रामदासकाका, तुम्ही लिहित रहावं, आम्ही थक्क होऊन वाचत रहावं आणि कळत-नकळत गुंतत जावं!

निशब्द ......जयपाल
sw

ह्या इतक्या ताकदीच्या लि़खाणावर प्रतिक्रिया द्यायची माझी लायकी नाहीये, हे माहीत असूनही हिम्मत करतोय..

काका, शक्य झाल्यास तुम्हाला भेटून तुमचा हात हातात घेईल म्हणतो..

सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता .

शब्दच खुंटले ह्या असल्या अस्सल उपमांपुढे..
मुजरा स्विकारावा, मालक !

धागा वर आलेला दिसला आणि आपसूकच पुन्हा एकदा उघडला गेला.
पुन्हा एकदा प्रतिक्रिया लिहीताना शब्द संपले..
स्वाती

आईची आठवण आली . माझ्या आईनेही वयाच्या पन्नाशीपर्यंत काम केलं .शेवटी गुढगे दुखीनं तिला मशिनीपासुन दूर केलं , पण माझ्या आणि माझ्या भावाचा शिक्षणाचा बराच वाटा आईच्या मशिनिनं उचललाय.
खुप छान मांडणी केलीय लेखाची .
आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते.

खरच खूप छान वाट्ले वाचून.. सुन्दर लेखन

खरच नि:शब्द.......

Pages