श्यामलादण्डकम् !

चैतन्य दीक्षित's picture
चैतन्य दीक्षित in जनातलं, मनातलं
1 Aug 2012 - 7:49 am

मध्यंतरी माझ्या एका मित्राकडे त्याची आत्या आणि आतेबहीण काही कामानिमित्त आल्या होत्या. त्या दोघीही शास्त्रीय गायन शिकतात आणि त्या संदर्भात श्री. विकास कशाळकर यांच्याकडे त्यांचे काही काम होते. या मित्राशी शास्त्रीय संगीताबद्दल बर्‍याच वेळा बोलणे होते त्यामुळे त्याने त्याच्या आत्याच्या रियाजाबद्दल बोलता बोलता माहिती दिली. रियाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या दोघीही 'कालिदासविरचित श्यामलादण्डकम्' नावाचं स्तोत्र म्हणतात असे त्याने सांगितले. मी हे नांव प्रथमच ऐकल्याने त्याबद्दल त्याला 'आत्याकडून अजून काही माहिती मिळते का ते बघ' असे मी सांगितले. त्यावर त्याने सांगितले की 'हे स्तोत्र नित्य म्हटले असता, ज्या कुठल्या कलाक्षेत्रात तुम्ही अभ्यास करता आहात, त्यात तुम्हाला सुयश प्राप्त होते असे म्हणतात. खूप नादमय आणि अनुप्रासयुक्त असं स्तोत्र आहे.'
एकतर नादमय आणि अनुप्रासयुक्त काव्य, त्यात ते कालिदासानं लिहिलेलं मग ते खासच असणारच! असा विचार करून लगेच मी जालावर ते कुठे मिळतंय का ते पाहिलं.
प्रथम सापडला तो तेलगु गायक घंटसाला यांनी गायलेल्या गाण्याचा व्हीडिओ.
ह्या व्हीडिओत स्तोत्र पूर्ण गायलं नाहिये सुरुवातीचा थोडा भाग आणि एकदम शेवटचा भाग असं गायलंय. (सुरुवातीचा सतारीवरचा भूपालीतला झाला सुंदर आहे) म्हणून पूर्ण स्तोत्र असलेला ऑडियो किंवा व्हीडिओ मिळतो का ते पाहिले तर हा एक ऑडियो-व्हीडिओ मिळाला. यात कर्नाटकी पद्धतीने स्तोत्र गायलंय (गायिकांचा उल्लेख नाहिये :() यातलं व्हायोलीन आणि बासरीही श्रवणीय आहे. तरीही, घंटसाला यांच्या गायनातून अनुप्रास आणि त्या वृत्तातले खटके जसे जाणवतात तसे ह्या गायनात जाणवत नाहीत. अर्थात, हे एक 'स्तोत्र' आहे म्हटल्यावर त्याचे 'गायन' होणारच. तरी एक बरं आहे की त्या दोन्ही भल्या गायिकांनी गाताना संस्कृताची वाट लावली नाहिये. नाहीतर 'आराध्यो भगवान्व्रजेशतनयस्तद्धामवृंदावनं' ह्या चैतन्य महाप्रभूंच्या सुंदर श्लोकाचं 'गायन' कितीही चांगलं झालेलं असलं तरी संस्कृताचा पार बोर्‍या वाजलाय त्यात.
असो, तर मग असा विचार आला की आपणच हे स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करावं. विचार बरेच दिवस चालू होता आज मुहूर्त मिळाला. स्तोत्र (वरच्या लिंक मधली पीडीएफ फाईल) पाहूनच 'छ्या! अशक्य आहे हे म्हणणं.' असाच विचार आला होता. पण हळूहळू सराव केला आणि बरंच बरं म्हणता येऊ लागलं.:)
आज ४-५ वेळा प्रयत्न करूनही मनाजोगं रेकॉर्ड झालं नाही, म्हणजे बर्‍याच चुका होत होत्या म्हणताना. पण शेवटी झालं ठीक-ठाक रेकॉर्ड (एक दोन चुका आहेतच त्यातही :() असो. रेकॉर्ड इथे ऐकता येईल.

हे स्तोत्र कालिदासाला देवी शारदा प्रसन्न झाली त्यावेळी स्फुरलं असं म्हणतात.
अर्थात, या स्तोत्राचा कर्ता आणि मेघदूतादींचा कर्ता कालिदास हे एकच की वेगळे यावर निश्चित माहिती मिळत नाही. पण स्तोत्रात वापरलेल्या उपमांमुळे (उदा. चारुशिञ्चत्कटीसूत्रनिर्भत्सितानङ्गलीलाधनु' - जिचे कटिसूत्र हे कामदेवाच्या धनुष्यापेक्षाही उजवे वाटते अशी... इ.) तो महाकवी कालिदासच असावा असे वाटण्यास जागा आहे. ते काहीही असो, स्तोत्र आहे खास ! हे श्यामलादेवीचं म्हणजेच कालीमातेचं(?) स्तोत्र आहे.
स्तोत्रात अनेकानेक विशेषणं आणि उपमा वापरून देवीचं वर्णन केलं आहे.
अजून सगळ्या स्तोत्राचा अर्थ उमगेल किंवा जेवढा उमगला आहे तो नीट शब्दबद्ध करण्याइतकी माझी पात्रता नाही असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे खरं तर मी केवळ स्तोत्र म्हणता येतं म्हणून रेकॉर्ड केलंय इतकंच.
हे ऐकून स्तोत्र किंवा वाचून कुणाला हे स्तोत्र म्हणून बघण्याची किंवा थोडं पुढे जाऊन 'नक्की काय अर्थ असेल?' ह्या विचाराने संस्कृत शिकण्याची इच्छा निर्माण झाली तर तो नक्कीच या स्तोत्राचा प्रभाव असेल.

-चैतन्य

वाङ्मयलेखआस्वाद

प्रतिक्रिया

अरे वा! प्रथमच अशा काही स्तोत्राबद्दल माहीती मिळाली..
नक्कीच रेकॉर्ड करुन ऐकेन.. धन्यवाद.. :)

नीलकांत's picture

1 Aug 2012 - 11:49 am | नीलकांत

उत्तम माहितीबद्दल धन्यवाद...

रेकॉर्डींग ऐकतोय....

- नीलकांत

चित्रगुप्त's picture

5 Aug 2012 - 9:32 am | चित्रगुप्त

संस्कृत फारसे कळत नाही, पण जे काही थोडेसे कळते, त्यावरून हे एक थोर काव्य-लेणे आहे, हे जाणवले. विशेष म्हणजे तुम्ही चिकाटीने हे शोधून स्वतः गायले, ही खूपच आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे.
सवडीने पूर्ण स्तोत्र नीट समजून घेण्याचा प्रयत्न करेन.
माझ्याकडे बारा-तेराव्या शतकातील विष्णुस्तुती (हेमंतकुमारच्या आवजात, संगीत रविंद्रनाथ ठाकुरांचे) आहे, ते मिपावर देण्यासाठी प्रेरणा मिळाली.

चैतन्य दीक्षित's picture

5 Aug 2012 - 10:49 am | चैतन्य दीक्षित

अक्षया, नीलकांत आणि चित्रगुप्त,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

चित्रगुप्त,
ती विष्णुस्तुती नक्की मिपावर द्या.

धन्यवाद