चावडीवरच्या गप्पा - 'टोल'वाटोलवी

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
25 Jul 2012 - 11:27 pm

अरे वा!, सामान्यांची, आम जनतेची काळजी घेणारे आहे कुणीतरी”, खणखणीत आणि अनुनासिक आवाजात बोलत घारूअण्णांनी चावडीवर हजेरी लावली.

“काय झाले?”, कोणीतरी विचारले.

“काय? आजकाल पेपर वाचायचा सोडून सकाळी सकाळी नातवासाठीच वापरता की काय?” घारूअण्णा एंट्रीलाच नाट लागल्यामुळे खवळले. “अरे त्या राजने, म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेतल्या राजसाहेबांनी टोलवसूली विरूद्ध आवाज उठवला आहे, टोल भरू नका असा आदेश दिला आहे जनतेला”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा आनंदाने फुलून गेला होता.

“चला! म्हणजे भैय्यांचा मुंबैतला प्रॉब्लेम संपला म्हणायचा, सगळ्या भैय्यांना महाराष्ट्रियन बाप्तिस्मा देऊन झाला बुवा एकदाचा, हुश्श”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“तर तर, महाराष्ट्रभर सगळ्या दुकानांच्या पाट्यांचे मराठीकरणही करून झाले की”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली.

“ह्या... ह्या... असल्या खेकडा वृत्तीनेच आपण आपले नुकसान करून घेतो आहोत. अरे, टोल नाक्यांवर प्रचंड गैरव्यवहार होत असून टोल वसुलीमध्ये कोणताही पारदर्शकता नाहीयेय. इतक्या वर्षांमध्ये जमलेला टोलचा पैसा नेमका कोठे गेला?”, घारूअण्णा आवेगात विचारते झाले. त्यांचे अंग आवेशाने किंचीत कंप पावत होते.

“ह्म्म्म...पारदर्शकताsss”, भुजबळकाकांचा उपरोध.

“तुम्ही नुसते उसासेच टाकत बसा. बघा बघा, त्या राजने टोलनाक्यांवर मनसेच्या सैनिकांना सलग चौदा दिवस पाहाणी करायला लावून किती वाहने येतात व टोल भरतात याची नोंद करायला लावली. त्याशिवाय शासकीय स्तरावरही माहिती गोळा करायला लावली. ह्याला म्हणतात जनतेचा कैवारी!”, घारूअण्णा त्याच आवेगात आणि आवेशात.

“सैनिकsss, कैवारीsss, ऐकतोय, ऐकतोय, चालू द्या”, भुजबळकाकाही त्याच उपरोधात.

“काय? चालू द्या काय? त्या टोलच्या बदल्यात जनतेला नेमक्या काय सुविधा मिळतात हे जोपर्यंत सरकार स्पष्ट करत नाही तसेच त्यात पारदर्शकता येत नाही तोपर्यंत जनतेने टोल भरू नये असे आवाहन करण्यात गैर काय आहे? बोला ना बोला”, घारुअण्णा.

“इतक्या दिवसांनी बरी जाग आली”, शामराव बारामतीकर.

“अरे, जाग आली तर खरी. नाहीतर आम जनतेची लुबाडणूक चालूच आहे राजरोस, तुमच्या साहेबांची तर फूसच असणार त्याला, बसलेत दिल्लीवर आणि लक्ष राज्यावर”, घारुअण्णांचा राग अजुनही घुमसत होता.

“साहेबांना मध्ये घेण्याचे काम नाही, त्यांना असल्या फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालायला वेळ नाही”, शामराव बारामतीकरांची निष्ठा.

“हो ना, त्यांचे निष्ठावंत आहेतच की ती काळजी घ्यायला, त्यांना काळजी आता फक्त नंबर दोनचे स्थान मिळवण्याची, एक नंबर काही नशिबात नाही ह्याची खात्री झालीच आहे आता”, घारुअण्णा. “आम्हाला सरकारबरोबर कुठलाही संघर्ष नको. परंतु बळजबरी झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल! असे उघड बोलायला निधडी छाती लागते. स्वार्थासाठी पाठीमागून दगाबाजी करणार्‍यांतना काय समजणार हे”, घारुअण्णा आता पेटले.

“उगाच काहीही बरळू नका”, शामराव बारामतीकर.

“खरंय, घारुअण्णा, मुळ विषयाला बगल देऊ नका”, सोकाजीनाना न राहवून.

“काय, काय बगल देतोय मी?”, घारुअण्णा प्रश्नार्थक चेहेरा करून.

“तुम्ही मगाशी काय म्हणालात? इतक्या वर्षांमध्ये जमलेला टोलचा पैसा नेमका कोठे गेला? हाच खरा कळीचा मुद्दा आहे”, सोकाजीनाना, मिष्कील हसत.

“म्हणजे, काय म्हणायचंय तुम्हाला?”, सगळेच एकदम बुचकळ्यात पडून.

“अरे, सोपे आहे, हे सगळे बेरजेचे आणि पैशाचेच राजकारण आहे. एवढा अमाप पैसा गोळा होतो आहे टोल नाक्यावर. सेनेच्या सत्तेच्या काळातच त्याचा अंदाज सगळ्यांना आला होता. आता कदाचित ठेकेदार कंपन्यांवर कंट्रोल राहिला नसेल, टक्केवारी मिळत नसेल. ह्या एकढ्या मोठ्या टोलरूपी जमणार्‍या निधीच्या डबोल्यावर सर्वांचेच लक्ष असणारच, थोडाफार हिस्सा सर्वांनाच मिळायला नको का? पक्ष चालवायचे, सैनिक संभाळायचे, पोसायचे म्हणजे पैसा सगळ्यांनाच लागणार नाही का. थोडे दिवस थांबा! बेरजेचे राजकारण झाले, खोक्यांचा व्यवहार सेटल झाला की हाच टोल समाजसुधारणेसाठी कसा आवश्यक आहे ह्याचे धडे कृष्णकुंज मधून ऐकू येतील”, सोकाजीनाना, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हास्य तसेच ठेवून.

“आणि काय हो घारूअण्णा, भुजबळकाका आणि तुम्हीही बारामतीकर, तुमचे बुड कधी लाल डब्याच्या सरकारी गाडीखेरीज इतर कुठल्या गाडीला लागले आहे का? आँ? अहो ते टोल भरणारे सर्वसामान्य, आम जनता नसतात हो आपल्यासारखे. तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा.”

घारुअण्णांनी लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून चहा मागवला.

विनोदराजकारणमाध्यमवेध

प्रतिक्रिया

नर्मदेतला गोटा's picture

25 Jul 2012 - 11:29 pm | नर्मदेतला गोटा

इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका

इथे आम्ही समाप्त झालो

अन्या दातार's picture

25 Jul 2012 - 11:57 pm | अन्या दातार

२०१४ च्या निवडणुकीसाठीचे नगारे वाजायला सुरुवात झाली वाटते.

चिगो's picture

25 Jul 2012 - 11:59 pm | चिगो

मस्त लेख.. बादवे, खड्डयांची मुबलक पाखरण असलेल्या रस्त्यांवरही टोल नाके लागले, की बेक्कार मस्तकात जाते..

किसन शिंदे's picture

26 Jul 2012 - 1:36 am | किसन शिंदे

व्वा!! सोत्रि अण्णा, मस्त खुसखुशीत झालाय लेख. अगदी रविवारच्या लोकसत्तामधल्या 'ध चा 'मा'' या सदाराची आठवण झाली. :)

पैसा's picture

26 Jul 2012 - 9:20 am | पैसा

मस्त टोले लगावलेत!

विजुभाऊ's picture

26 Jul 2012 - 10:02 am | विजुभाऊ

अहो ते टोल भरणारे सर्वसामान्य, आम जनता नसतात हो आपल्यासारखे. तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा.”

सोत्रीकाका अभ्यास कमी पडतोय. एष्टीला सुद्धा टोल द्यावा लागतो. तो प्रवाशांच्या तिकीटातच अम्तर्भूत असतो.

वा सोकाजी
दणदणीत ब्याटिंग केलीत
छग्यांवर छ्गे हाणलेत =))

अनुप ढेरे's picture

26 Jul 2012 - 10:39 am | अनुप ढेरे

की एस.टी महामंडळ (हो.. तेच ते लाल डबे वाले...) आठवडयाला २८ लाख टोल भरते. त्या पैशात ते अनेक बशी घेऊ शकतात, आम जनतेला चांगल्या सुविधा पण पुरवु शकतात.

"अहो सोकाजीनाना, ह्यांना जरा सांगा चावडीवर अभ्यास, विदा वेग्रे नसते घेऊन यायचे. काय एवढं साध कळत नाय ह्या झंटलमन लोकांना", इती घारुअण्णा.

-(घारुअण्णांचा पंखा) सोकाजी

मस्त लेख. पेपरमधे सदर चालू करण्याच्या लेव्हलचं लिखाण होत आहे.

टोलची गरमागरमी ठाणे-मुंबई परिसरात चांगलीच जाणवते आहे. टोलची रक्कम कमी होत जाण्या ऐवजी वर्षांसोबत वाढत जाते आहे. २०-२५-३० वगैरे. मी किमान १९९६ पासून ही वसुली पाहतो आहे. एव्हाना कोणत्याही प्रकल्पाची किंमत वसूल झाली असणार असं म्हणायला पूर्ण जागा आहे.

काल मनसेने टोल भरु नका असं म्हटलेलं असूनही पोलीस बंदोबस्तात टोलवसुली चालू होती.

"मोटारगाडीतून फिरणार्‍या श्रीमंतांनाच टोल बसत असल्याने सामान्य लोकांना (दुचाकी, रिक्षा, पायी) टोलची झळ बसत नाही. " अशा आशयाचं विधान उपमुख्यमंत्रीमहोदयांच्या तोंडून निघाल्याचं मधे पेपरात वाचलं होतं. वार्ताहराने हे विधान संदर्भ सोडून काढलं नसेल असं गृहीत धरलं तर एकूण परिस्थिती भीषण आहे एवढंच म्हणू शकतो.

मन१'s picture

26 Jul 2012 - 12:09 pm | मन१

कणेकरस्टाइल खुसशुशीत लेखन आवडले.

!!२०१४ च्या निवडणुकीसाठीचे नगारे वाजायला सुरुवात झाली वाटते!!

सहमत