त्या गुर्जरनगरी: प्रथम तुज पाहता

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
22 Jun 2008 - 11:40 am

भाग १त्या गुर्जरनगरी: ओळख वरून पुढे...

पहिल्या दिवशी सरळ ऑफिसाला जायचे होते व तेथून संध्याकाळी हॉटेलवर. प्रीपेड टॅक्सी केली. एकटाच असल्याचे पुढेच बसलो. गाडी विमानतळाच्या आवारातून बाहेर पडली आणि एका हमरस्त्याला लागली. अहमदाबाद विरळ होत गेलं आणि गांधीगरच्या रस्त्याला लागलो होतो. इथे माझं लक्ष वेधलं ते इथल्या रस्त्यांनी... अहाहा! रस्ते असावेत तर असे.. तेही भारतात.. संपूर्ण प्रवासात कुठेही खड्डा दिसलाच नाही. गांधीनगरला "म्युनिसिपाल्टी" नसावी अथवा असल्यास बाकी म्युनसिपाल्ट्यांसारखा कुठेही खोदण्याचा नावाचा रोग नसावा. पु. ल. जर इथे आता आले असते तर "खड्डे खोदून ठेवायची सवय जागतिक आहे.. मग ती म्युनसिपाल्टी मुंबईची असो की व्हेनेझुएलाची" या वाक्याला अपवाद मिळाल्याचा कोण आनंद झाला असता. लोण्यातून सुरी फिरावी इतका सहजतेने गाडी रस्त्या कापत होती. बरं रस्ते फक्त सपाट होते असे नाही तर भरपूर रुंद होते. कमीत कमी चारपदरी व साधारणतः सहापदरी! अमेरिकन फ्रीवेजच्या तोंडात मारतील इतके झ्याक रस्ते!

गांधीनगर हे अगदी आखीव शहर. खरंतर मला आखीव शहरांबद्दल फार ममत्व नाही. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात. परंतु सगळीच शहरं 'जिवंत' असणाऱ्या भारतात गांधीनगर सारखी आखीव शहरं असण्याचं महत्त्व वेगळंच. अपेक्षेप्रमाणे गांधीनगरच्या रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. बाहेरून सारं काही नीटनेटकं दिसत होतं. स्वच्छ सुंदर रेखीव वास्तू मागे सरकत होत्या. रस्त्यावर भरपूर दुचाकीस्वार होते. पुण्यासारखंच ललना चेहऱ्यावर स्कार्फ पूर्णपणे गुंडाळून स्कूटरवरून धावत होत्या. सगळं खूप चकाचक होतं. हे शासकीय शहर असल्याने एकूण वातावरण पाहून मात्र तिथे मानवी ओलावा आहे का नुसतीचा आखीव शिष्टता आहे असा मला प्रश्न मात्र पडला. अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे रस्त्यावरच्या पाट्या सूचना गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अश्या तिन्ही भाषेत होत्या. दुकानावरच्या पाट्या मात्र मुख्यतः गुजराती व क्वचित इंग्रजी मध्ये.

गांधीनगरला हरीत शहर म्हणून तीनदा पारितोषिक मिळाल्याचं ऐकीवात होतं. रस्त्याच्या दुबाजूला असणारी हिरवाई बघून ते का याबद्दल असणारा संदेह मिटला. ऐन उन्हाळ्यात गांधीनगरसारख्या शुष्क हवामानातही ही हिरवाई डोळ्यांना सुखावत होती. रस्त्यांच्या बाबतीत इथे गोंधळ उडण्याचा अजिबात संभव नाही. कोणत्याही आखीव शहरांप्रमाणे इथेही सेक्टर आहेत. पण इथली मजा आहे ती रोडच्या नावात. इथे ऍव्हेन्युजना चक्क 'क', 'ख', 'ग', 'घ'.. वगैरे नाव आहेत तर स्ट्रीटना १, २, ३ असे आकडे. त्यामुळे पत्ते इंग्रजीत लिहितानाही "घ५", "क९" असे एकदम भारतीय होतात. मला ही क.. ख.. ग.. घ... कंसेप्ट जाम आवडली

सपाट रस्त्यावरून भरधाव वेगाने, आखीव चौक, मैदाने, शासकीय इमारती इ. पार करत ऑफिसात पोचलो. आमच्या ऑफिससमोर टॅक्सी थांबली आणि ते लोकेशन एकदम आवडून गेलं. सभोवताली मोठी वृक्षराजी होती, वसंत ऐन बहरात होता. ऑफिससमोर हिरवळ होती. गाड्या व्यवस्थित पार्क केलेल्या होत्या, फुलझाडे होती आणि मुख्य म्हणजे त्या हिरवळीवर ३ मोर मुक्तपणे चरत होते. मोर किती देखणा पक्षी! गुजरात भागात अगदी सहज दिसणारा. एक खानदानी पक्षी! आल्याआल्या स्वागताला तीन तीन मोर पाहून अतिशय बरं वाटलं. त्यात सुरवातीला विमानतळावरील प्रेक्षणीय स्थळांइतकीच देखणी स्थळे ऑफिसात शिरली आणि त्या मोरांनी माझ्या मनात नृत्य देखील केले; )

तसा मी या ऑफिसात कोणालाच ओळखत नव्हतो, मात्र इथे मी त्यांच्याकडे रोजच खाकरा खायला जातो अश्या जवळकीने माझं स्वागत झालं. आणि ही जवळीक, ही आपुलकी पुढे अखंड महिनाभर मला मिळत राहिली. कंजूस कंजूस म्हणून ओळख असणाऱ्या गुजरात्यांची दुसरी ओळख मला इथे झाली. एका दिवसात जवळजवळ प्रत्येकाने मला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. "हॉटेल बघ कसं वाटतंय, कंटाळा आला तर सरळ माझ्या घरी येऊन राहा" असं पहिल्या भेटीत सांगितलं गेलं. माझी अडचण त्यांना सांगावी आणि ती लगेच दूर व्हावी असं चालू होतं.

थोडक्यात काय तर शहराच्या प्रथमदर्शनाने मी तरी खूश होतो. पुढील भागांत तिथली प्रसिद्ध खाद्यसंस्कृती आणि कुटुंबप्रधानता याबद्दल सांगिनच!

(क्रमशः)

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

अवलिया's picture

22 Jun 2008 - 11:45 am | अवलिया

गांधीनगर हे अगदी आखीव शहर. खरंतर मला आखीव शहरांबद्दल फार ममत्व नाही. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात.

वा तुम्ही आमच्याच जातकुळीतले... मस्त

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

ऍडीजोशी's picture

23 Jun 2008 - 6:13 pm | ऍडीजोशी (not verified)

अणूमोदण आहे :)

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

22 Jun 2008 - 12:03 pm | स्वाती दिनेश

प्रथम दर्शनाचे वर्णन आवडले.
इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात.
हम्म.. बरोबर.. पण गांधीनगर किवा चंदीगढ किवा अगदी आपलं नव्या मुंबईतलं वाशी सुध्दा कधी मैत्री करून जातं कारण त्या आखीव पोषाखीपणामागे सुध्दा अस्सल भारतीय मन असतं.त्यामुळे नीट भांग बिंग पाडून,स्वच्छ कपडे घातलेल्या गोंडस मुलासारखी ही शहरं वाटतात,तर आत्ताच मातीत मनसोक्त खेळून,पायाला चिखल,चुरगळलेले कपडे पण चेहर्‍यावर खेळाचा अपार आनंद..अशी आपली ही पेठा,गल्ल्या,बोळ वाली गावं दिसतात.ती ही तितकीच गोजिरवाणी वाटतात.
(मला दोन्ही प्रकारची शहरं,गावं वाचायला ; त्यांना भेटायला आवडतं.)
लेख उत्तम झाला आहे.पण आता गुज्जू आदरातिथ्य लवकर येऊ दे.जमल्यास फोटो टाक ना..
स्वाती

II राजे II's picture

22 Jun 2008 - 12:06 pm | II राजे II (not verified)

त्यामुळे नीट भांग बिंग पाडून,स्वच्छ कपडे घातलेल्या गोंडस मुलासारखी ही शहरं वाटतात,तर आत्ताच मातीत मनसोक्त खेळून,पायाला चिखल,चुरगळलेले कपडे पण चेहर्‍यावर खेळाचा अपार आनंद..अशी आपली ही पेठा,गल्ल्या,बोळ वाली गावं दिसतात.ती ही तितकीच गोजिरवाणी वाटतात.

वा वा काय उपमा दिली आहे छान !!!

बाकी लेखमाला जबरस्त चालू आहे... !
मोदीची माया आहे की काय असे वाटतं गुजरात मध्ये गेल्यावर... ;)

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

अनिल हटेला's picture

22 Jun 2008 - 5:33 pm | अनिल हटेला

छान प्रवास्वर्णन चालू आहे...

आवडल बुवा आपल्याला....

पु. भा.प्र...................

यशोधरा's picture

22 Jun 2008 - 5:37 pm | यशोधरा

छानच लिहिलय, पुढचे भाग लिहा पटपट...

चित्रा's picture

22 Jun 2008 - 9:38 pm | चित्रा

वाचायला आवडते आहे, पुढचे भाग पण लिहा भराभर!

मला आखीवरेखीव आणि 'जिवंत' अशी दोन्ही शहरे तितकीच छान वाटतात.
प्रशस्त गुर्जरनगरीत तीन तीन मोरांनी तुझे 'मोर'दार स्वागत केलेले वाचून छान वाटले. ;)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 5:04 am | विसोबा खेचर

ऋषिकेशशेठ,

मस्त रे! छोटेखानी लेख आवडला... :)

तात्या.

विद्याधर३१'s picture

23 Jun 2008 - 7:23 am | विद्याधर३१

तुमची गुजरात सफर वाचायला आवडेल.
मला ही क.. ख.. ग.. घ... कंसेप्ट जाम आवडली..... मलापण.

विद्याधर

सहज's picture

23 Jun 2008 - 7:31 am | सहज

गुजराथचे [गांधीनगर] वर्णन आवडले. वर्णनावरुन नक्कीच पारितोषीक विजेते शहर वाटते.

पुढचा भाग लवकर येउ देत.

अमोल केळकर's picture

23 Jun 2008 - 9:18 am | अमोल केळकर

गांधीनगर हे अगदी आखीव शहर. खरंतर मला आखीव शहरांबद्दल फार ममत्व नाही. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात.
एकदम बरोबर
मला वाटत त्यामुळे अहमदाबाद हे गांधीनगर पेक्षा जास्त जवळचे ( आपले) वाटते कारण आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे हे तुलनेने अहमदाबाद मधे जास्त आढळतात.

पुढचा भाग लवकर येऊ दे.खमण खाण्यास उत्सुक आहे

ऋषिकेश's picture

23 Jun 2008 - 10:28 pm | ऋषिकेश

सर्व प्रतिसादकर्त्यांचे, तसेच व्यनी-खरडींतून प्रोत्साहन देणार्‍या सार्‍यांचे अनेक आभार! :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश