असाही एक Near Death Experience

संपत's picture
संपत in जनातलं, मनातलं
8 Jun 2012 - 7:19 pm

आज Near Death Experience वरचा लेख वाचून माझ्या लहानपणी घडलेला एक किस्सा आठवला. माझे मुळ गाव अलिबाग.. कोकण पट्टयात असल्याने भूतखेते भरपूर. पण सर्वाधिक भूतांचा प्रदेश म्हणजे मुरुड जंजिरा. तिथे चिंचेच्या झाडावर एक दगड भिरकावला तर चार चिंचा आणि दहा भुते पडायची.. तिथे माझ्या मावशीच्या शेजाऱ्यांकडे घडलेली ही घटना..

तर ह्या शेजाऱ्यांचा बाबू नावाचा मुलगा चित्रपटांचा भारी शौकीन. त्यावेळी रात्री रस्त्यांवर पडदे टाकून चित्रपट दाखवले जात. शौकीन लोक चांगला चित्रपट फुकटात बघायला लांब लांब जायचे. असाच एकदा मे महिन्यात 'कुर्बानी' चित्रपट पाहायला हा बाबू गेला. रात्री यायला उशीर झाला. बाबूचे घर अवघे दोन खोल्यांचे. बाहेरची खोली आणि स्वैपाक घर. बाबूचे आईवडील तेव्हा मुंबईला काही कामानिमित्त गेले होते. घरात लग्न झालेला भाऊ रंगा आणि त्याची बायको होते. ते आतून कडी लावून स्वयंपाक घरातच झोपायचे.

बाबू बाहेरचे लोटलेले दार उघडून घरी आला. त्याला थोडीशी तहान लागली होती पण वहिनी बाहेर तांब्यात पाणी ठेवायला विसरली होती. रात्री भावाला त्रास कशाला द्या म्हणून बाबू तसाच तहानलेला झोपला.

इथे रात्री भावाला तहान लागली म्हणून तो उठला. पाण्याच्या मडक्यावरील झाकण काढून तो पाणी प्यायला आणि पुन्हा झाकण मडक्यावर ठेवले. अचानक रात्री मडके जोरजोरात हलायला लागले. आतून कोणाचे तरी घुसमटलेल्या सारखे आवाज ऐकू येवू लागले. रंगाच्या बायकोला जाग आली. तिने रंगाला देखील उठवले. आपल्यासारखा एखादा शहरी अडाणी माणूस असता तर त्याला वाटले असते कि एखादा उंदीर मडक्यात पडला असेल. पण रंगा आणि त्याच्या बायकोचे आयुष्य गावात गेल्यामुळे त्यांनी लगेच ओळखले कि हे काहीतरी भूताखेताचे काम आहे.

रंगा लगेच बाहेर गेला बाबुला बोलवायला. बाबुला हात लावला तर त्याचे शरीर थंडगार.. श्वासही लागत नव्हता. रंगा जोरात ओरडलाच. रंगाची बायको धावत बाहेर आली.. ती अर्थातच रंगापेक्षा अधिक हुशार असल्याने तिच्या घडला प्रकार लगेच लक्षात आला.

तिने धावत जाऊन मडक्यावरचे झाकण काढले. झाकण काढल्याबरोबर बाबूने बाहेरच्या खोलीत जोरात श्वास घेतला. आता त्याचा श्वास नियमित चालू लागला आणि शरीरदेखील उबदार झाले.

अशा तऱ्हेने रंगाच्या बायकोच्या हुशारीमुळे बाबूचा प्राण वाचला.

अजूनदेखील कोणाला एक नक्की काय झाले हे कळले नसेल त्यांच्यासाठी स्पष्टीकरण - बाबूचा आत्मा पाण्यासाठी तळमळत होता. रंगाने मडक्यावरचे झाकण काढले तसा बाबूचा आत्मा पटकन मडक्यात गेला. पण रंगाने झाकण लावल्यावर तो आतमध्येच अडकून पडला.

असा होता आमचा गावठी Near Death Experience .

इथे काही नतद्रष्ट काहीतरी खुसपट काढतील त्यांना आमच्या गावाच्या शाळेत रात्र काढायला सांगा. तिथल्या बुटानी तर अनिसच्या कार्याकार्त्यानाही पळवून लावले होते.. पण तो किस्सा पुन्हा कधीतरी..

थोडा खुलासा : भूतान्बाबतीत माझी भूमिका नेहमीच 'नरो व कुंजरो वा' राहिली आहे. मला स्वताला कधी भूत दिसले नाही. पण अनेक जवळच्या व्यक्तींनी असे किस्से सांगितले आहेत. त्यावर अविश्वास दाखवावा तर ते खोटे बोलताहेत किंवा मुर्ख आहेत असे समजावे लागेल. दोन्ही मान्य करण्याची तयारी नसल्याने ह्या विषयावर अजून संशयाचा फायदा देतो. पण वरील किस्सा ऐकताना मात्र न हसता चेहरा सरळ ठेवणे हाच एक Near Death Experience होता.

कथाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

8 Jun 2012 - 7:21 pm | नाना चेंगट

>>>तिथल्या बुटानी तर अनिसच्या कार्याकार्त्यानाही पळवून लावले होते.. पण तो किस्सा पुन्हा कधीतरी..

बुट कसा काय पळवतो अनिसला? सांगा ना काका लवकर.. :)

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2012 - 7:23 pm | परिकथेतील राजकुमार

तुझा हा प्रतिसाद अंमळ जास्तीच मोठा झाला आहे. त्यात थोडी भर घालून नवा प्रश्नार्थक धागाच का काढत नाहीस ?

नाना चेंगट's picture

8 Jun 2012 - 7:24 pm | नाना चेंगट

हां यार लक्षात नाही आले.
पण तुझा प्रतिसाद माझ्या प्रतिसादापेक्षा मोठा आहे त्याचे काय?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2012 - 7:38 pm | परिकथेतील राजकुमार

पण आजकाल तशी फॅशन आहे म्हणून सुचवले मी तुला.

एक काम कर, तू प्रतिसादात थोडे पाणी घालून धागा टाक आणि मग मी त्याचे रसग्रहण करीन.

बाकी मी निघतोय आता, तू पण पोच लगेच. आणि प्लिज आज पुन्हा चिझ फ्लेवरचे लेझ आणू नकोस __/\__.

संपत's picture

8 Jun 2012 - 9:54 pm | संपत

साधा नव्हता भुताचा बूट होता तो.. सांगीन किस्सा कधीतरी.. लगेच धागा टाकला तर लोक जिलब्या आणि डायऱ्या पाठवतात..

शिल्पा ब's picture

9 Jun 2012 - 7:43 am | शिल्पा ब

<<लगेच धागा टाकला तर लोक जिलब्या आणि डायऱ्या पाठवतात..

कोण करतं असं? न घाबरता नाव सांगा. (आपण त्याचं घर उन्हात बांधु.

अहो, घर बांधण्याचे कष्ट कशाला घ्यायचे सरळ त्याला त्या शाळेतच झोपायला पाठवू.

प्रास's picture

8 Jun 2012 - 7:31 pm | प्रास

लेखातला निअर डेथ एक्स्पिरियन्स वाचून जितका हसलो तितकाच परा नि नानाच्या प्रतिसाद - प्रतिसाद खेळाने हसलो.

मजा आली. जियो...!

बाकी, बुटाचा किस्सा लौकर लिवा, संपतराव.....!

सुनील's picture

8 Jun 2012 - 10:08 pm | सुनील

धमाल किस्सा!!!

बंद दरवाजा आणि भिंतीतून आत गेलेला बाबूचा आत्मा झाकणातून बाहेर येऊ शकत नाही. बहुधा झाकण धातूचे असेल आणि बाबूला धातूफोबिया असेल, नाही का?

तिमा's picture

9 Jun 2012 - 8:19 pm | तिमा

बाबूच्या आत्म्याने मडक्यात पडण्याआधी , काय काय पाहिलं कुणास ठाऊक !

जाम घाबरलो आहे कथा वाचुन ,आता रात्री झोपताना पाणी पिउन अन बाकी सर्व विधी उरकुनच झोपणार. :crazy:

हंस's picture

9 Jun 2012 - 2:26 pm | हंस

<बाकी सर्व विधी उरकुनच झोपणा>
हो ना, आता झोपण्यापूर्वी टॉयलेटलापण जाउन येणार, नाहीतर च्यायला रात्री कुणी टॉयलेटला गेला तर रात्रभर आत अडकुन पडावे लागेल. ;)

स्पंदना's picture

9 Jun 2012 - 5:59 am | स्पंदना

मश्तु !

पैसा's picture

12 Jun 2012 - 7:55 am | पैसा

तुम्हीच एकदा तो नारळाचा किस्सा लिहिला होता ना? एक भुताच्या गोष्टींची लेखामालिकाच लिहा बघू!