सेल्समन भाग - २

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
5 Jun 2012 - 7:16 pm

शेवटी सगळे कँटीन मधून एचओडी च्या डिपार्टमेंट कडे निघाले.. कुणाचे हात घामेजलेले तर कुणाचे कपाळ..

आधीच फर्स्ट बेंचर्स ची लाईन लागलेली. अमित आणि त्यामागे राहुल मग बाकीचे अशी रांग लागली. कधी अभिनंदन तर कधी मास्तरांनी तिरस्कारासहित फेकलेल्या गुणपत्रिका उचलणारे विद्यार्थी बघून मनात चलबिचल होत रांग पुढे सरकू लागली.

मास्तरः या या.. भारताचे भविष्य मिस्टर अमित.. ही घ्या तुमची भेट असं म्हणत अमितची गुणपत्रिका हवेत उडवून मास्तरांनी अमितची टर उडविली. राहुलच्या मनात भयंकर संताप दाटला, गोरंपान नाक आणि कानशिलं लाल झाली. पण काय करणार. अमितनं काही न बोलता धुळीत पडलेली मार्कशीट उचलली आणि सरळ बाहेर निघुन गेला.

सावंत मास्तर: "अरे वा, दुर्मिळ दर्शन झाले. अरे कुणीतरी ढोल ताशा बोलवा रे.SSSSS. "
राहुलः "सर रिझल्ट द्या ना".
सावंत सरः "हो हो का नाही साहेब. खरं तर तुमच्या पिताश्रींच्या हस्तेच देणार होतो आम्ही. आले होते ते परीक्षेच्या आधी, तुला परीक्षेला बसू द्या अशी विनवणी करायला. आम्हीच मुर्ख होतो जे तुझ्यासारख्या विद्वान माणसाला परीक्षेला बसायला नकार देत होतो. काय ती प्रतिभा, काय ते ज्ञान.. वा वा.. " असं म्हणत सावंत सरांनी राहुलची मार्कशीट इकडे तिकडे न फेकता सरळ राहुलच्या तोंडावर फटकन भिरकावली.

ईतका वेळ कलकलाट करणारा गजबजलेला वर्ग चटक्यात शांत झाला, कारण असा प्रकार पहिल्यांदाच होत होता. कुजबुज सुरु झाली. राहुलला काय कराव उमजत नव्हतं. तो तसाच बाहेर पडला, मास्तरांचे, 'नालायक, निर्लज्ज, वाया गेलेला' असे शब्द ऐकत. मार्कशीट उचलायचीही त्याला शुद्ध नव्हती. अपमानाने आणि भितीने तो पेटला होता.

अमित कँटीनमधे टेबलावर स्वतःची मार्कशीट बघत डोक्यावर हात ठेवून बसला होता. राहुल त्याच्यासमोर जाऊन बसला.
अमित: "माझा बा लै हानल रे मला आज, आयच्या गावात.. ह्या मास्तरड्यांच्या.. दोन मार्कानं गेलं बग सगळं. तुझं काय झालं. काय व्हनार म्हना.. तु झाला अश्शील पास." आमीच तेवडे ******" अरं काय झालं बाबा.. माझं नको वाईट वाटून घ्युस.. कायतरी बोलं"
तेवढ्यात मागून केतकी राहुलचा रिझल्ट घेऊन आली, तिच्या मागे सुन्या, जाड्या आणि पंक्या. केतकीचे राहुलचा रिझल्ट त्याच्यासमोर ठेवला, अमितने तो खेचुन घेतला आणि त्याकडे पहातच राहिला.

राहुल जवळपास सर्वच विषयात नापास झाला होता. केतकी आणि सुन्या चांगल्या मार्कांनी पास झाले होते. जाड्या नापास झाला म्हणून तसा खुश होता कारण घरी शेतकरी श्रीमंती होती पण पंक्या पारच खचला होता कारण त्याला आता पुढे शिक्षण घेता येणार नव्हते. सुन्या आणि जाड्या सोड्ले तर सगळेच गरीब किंवा मध्यम परीस्थितीतले. केतकीचे अश्रू थांबत नव्हते.

राहुल कुणाशी काही न बोलता स्कुटरला किक मारून घरी येतो. घरात जायच्या आधी एक क्षण थांबतो. मग आत येतो.

माई: अरे बघ. आत्या आलीये. काय झालं रिझलटचं?
राहुल उसनं अवसान आणूनः " माई, मी नापास झालो, एक वर्ष वाया गेलं"
माईचं अवसान गळतं एक क्षण पण मग पुन्हा चिडून ती राहुलवर हातातलं लाटण उगारते, एक फटका लगावते तोच आत्या तिच्यावर खेकसते.
आत्या: "मारतेस काय पोराला, अगं नापास झालाय ना, खून तर नाही ना केला कुणाचा."
माई: "काय सांगू अक्का.. पोटच्या पोरासारखं वागवलं हो याला. काही म्हणजे काही कमी पडू दिलं नाही. आणि आता ह्यांना आल्यावर काय सांगू मी?" माई हुंदके देऊ लागली.
आत्या: "आप्पाला मी समजावते. आईविना वाढलं हे पोर किती वर्ष. माझं लेकरु" असं म्हणत आत्याने राहुलला जवळ घेतलं. राहुलने दुखावलेला हात चोळत आत्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. आत्या किती चांगली आहे आणि माई किती वाईट असा विचार करत थोडा वेळ तो तसाच पडून राहिला.

"हुश्शSSSS. अरे अक्का, कधी आलीस. अगं चहा तयार आहे का?" आप्पा घरात आले. हातातला डबा माईच्या हातात देत आप्पा खुर्चीत बसले. राहुलने आज स्वतःहून पाणी आणून दिलं.

आप्पा: "अरे वा.. राजे आज खुश वाट्तं" असं म्हणत आप्पा पाण्याचा घोट घेतात आणि मिशा सावरत शर्टाचं एक बटन उघडून राहुलकडे एक कटाक्ष टाकतात. "मग काय म्हणतय कॉलेज?" काय आला रिझल्ट. माई आप्पांकडे तिरकस पाहुन पुन्हा किचनकडे जाते.

आत्या: " मी सांगते, पण नीट ऐक. तुझा उगाच मोठा आवाज नको. हे बघ पोरगं नापास झालय. एक वर्ष म्हणे वाया गेलयं. पण तु त्याला रागवू नकोस, त्याने अभ्यास करेन असं वचन दिलय मला."
आप्पांच्या कपाळावरची आठी चढते. हसरा चेहरा गंभीर होतो. हातातला चहाचा कप पुन्हा बशीत ठेवत "अगं आक्के, ह्या नालायकाला घरात ठेवणार नाही मी. एक वर्ष झालं गावातल्या सांडासारखं हुंदडतोय. कपडे म्हणू नको, गाडी म्हणू नको, सगळं पुरवलं आणि हे दिवे लावलेत होय दिवट्यानं?"
तेवढ्यात माई बाहेर आली - "मी पण हेच म्हणत होते अक्काताईंना, पण माझं कोण ऐकतयं?" असं म्हणत माई पुन्हा मुसमुसायला लागली.

आत्या: "हे बघा, जे झालं ते झालं. आता पुढचं बघा. त्याला एक संधी द्या चूक सुधारायची. मला माहित आहे की तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवाल. आता मी निघते. संध्याकाळी रेल्वेनं निघायचंय पुतणीच्या लग्नाला. पोराला मारु नका" असं म्हणून आत्या पुन्हा एकदा राहुलला जवळ घेते निघते.

संध्याकाळ कुणी कुणाशी न बोलता निघून जाते. पालकची नावडती भाजी तक्रार न करता राहुल जेवणात घेतो आणि गुपचुप झोपी जातो.

क्रमशः

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

आचारी's picture

5 Jun 2012 - 9:34 pm | आचारी

चालु द्या मस्त आहे !

श्रीरंग_जोशी's picture

6 Jun 2012 - 10:25 am | श्रीरंग_जोशी

पुढील भाग लौकर येऊद्या.

वाचतेय ..
भाग अंमळ छोटा झालाय ,वाचयला घेतला ३ मिनिटात संपला ;)

अमितसांगली's picture

6 Jun 2012 - 2:47 pm | अमितसांगली

सुरुवात तर चांगली झाली आहे....

पैसा's picture

6 Jun 2012 - 8:46 pm | पैसा

पुढचा भाग लौकर येऊ द्या!

हं! एकुण कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे तर.

पुढ?